Wednesday, September 16, 2015

भाद्रपद शुध्द तृतीया ! - 'हरतालिका'


आज भाद्रपद शुध्द तृतीया ! यादिवशी आपण म्हणजे विशेषतः महिला 'हरतालिका' साजरी करतात. कोणी काही म्हणो अथवा कसाही उलटसुलट अर्थ काढो, पण आपल्या संस्कृतीतील दोन सणांनी किंबहुना व्रतांनी समस्त महिलांनी आम्हा पुरुष जातीला कायमचे, जन्मोजन्मीचे उपकृत करून ठेवलेले आहे - ती दोन व्रते म्हणजे आजचे - 'हरतालिका' आणि जेष्ठ शुध्द पौर्णिमेला असणारे 'वटसावित्री'चे व्रत !  

भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या म्हणजे हरतालिकेच्या दिवशी देवी पार्वतीने भगवान शंकराला आपल्या तपश्चर्येने पती म्हणून मिळविले होते त्यावेळी त्याची संपत्ती, ऐश्वर्य पाहिले नव्हते ! तसेच जेष्ठ शुध्द पौर्णिमेला 'सती सावित्रीने' आपल्या पतीचे, सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमराजाकडून त्याला संतुष्ट करून परत मिळविले होते सोबत यमराजाने प्रसन्न होवून तिला 'इच्छित वर' दिले होते. आपल्या संस्कृतीतील या दोन स्त्रिया या समस्त पुरुषजातीला खरोखरच कायमच्या ललामभूत आहेत, यांत शंका नाही.    

भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या म्हणजे गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिलावर्ग  करतात. मनासारखा पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका हे व्रत मनोभावे करतांत जे देवी पार्वतीने 'भगवान शंकर' आपणांस पती म्हणून मिळावे यासाठी केले. काही कुमारिका, सुवासिनी हे व्रत अतिशय कडक करतात. त्यादिवशी उपवास करतांत, काहीही खात-पीत नाही फारतर फलाहार करतांत. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतरही करतात कारण एकदा घेतलेले भोळ्या शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते या भावनेने हे व्रत आजन्म करतात.

त्यामागची पौराणिक कथा अशी - राजाधिराज हिमालय, राजा हिमवान याची देवी पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. ती उपवर झाल्यावर तिच्या पित्याला तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी स्वाभाविक काळजी लागली. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले असता, म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने यापूर्वीच मनोमन भगवान शंकराला पती म्हणून वरले होते. मात्र तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.` देवी पार्वतीने आपल्या मैत्रिणींसह अरण्याचा रस्ता धरला, अरण्यांत तिने घोर तपश्‍चर्या केली.

नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने पाने खाणेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या घनघोर तपश्‍चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यांनी तिला वर मागायला सांगितले. "तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत राजा हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला. तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.

आपल्या इच्छित पतीची, भगवान  शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या कडक तपश्‍चर्येने केली, म्हणून त्यामागील परंपरेने चालत आलेल्या श्रध्देने आपणांस मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. व्रताचे विधी कोणते हे येथे महत्वाचे नाही तर त्यामागील अकृत्रिम, निर्लेप, पराकोटीची भावना महत्वाची आहे. या तिच्या अलौकिक त्यागाने, कर्तृत्वाने ती भगवान शंकराच्यापुढे झाकोळली तर नाहीच पण उलट समाजात त्यामुळे  'उमा-महेश्वरा'चा जोडा हा देवी पार्वतीला यथार्थ प्राधान्य शब्द परिचित झाला तर भगवान शंकराला 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून ओळखू लागले.