Thursday, August 20, 2015

ओवी, श्लोक, आर्या आणि अभंग


आज सकाळी गप्पा मारता मारता सहजच विषय निघाला तो जुन्या काळातील प्रसिध्द मराठी कवींचा ! अर्थात त्यावेळी बहुतांश काव्य हे निवृत्तीपर, पौराणिक विषयावर, अध्यात्मिक अशा स्वरूपाचे असे. काव्यप्रकार आणि ते समर्थपणे हाताळणारे कवी कोणते असा विचार मनांत आला तेंव्हा - १. ओवी, २. श्लोक, ३. आर्या आणि ४. अभंग हे काव्य प्रकार प्रामुख्याने डोळ्यासमोर आले. या प्रत्येक प्रकारांत एकेका कवीचे नांव घेतले जाते. 

१. ओवी - ओवी ज्ञानेशाची ! 

संत ज्ञानेश्वर ! ज्ञानेश्वर माउली ! यांच्याबद्दल मराठी जाणणाऱ्याला मी काही सांगावे असे नाही. सन १२७५ ते १२९६ या छोट्याशा काळांत हिमालयाएवढे कार्य करून 'सदेह संजीवन समाधी' घेणारे हे संत ! संन्यासाची पोरे म्हणून समाजाने कोणताही त्रास देणे शिल्लक ठेवले नसतांना संपूर्ण प्राणिमात्रांसाठी परमेश्वराला 'पसायदान' मागणारी ही संत विभूती ! त्याचे वर्णन मी काय करणार ? 

यांनी असंख्य ओव्यांमधून आपले चिरंतन अध्यात्मिक विचार प्रकट केले आहेत. आपणा सर्वांना परिचित असणारे 'पसायदान' -  

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
  
--------------------------------------------------------------------------
२. श्लोक - सुश्लोक वामनाचा ! 

पंडित कवी - वामन पंडित ! सन १६०८ ते १६९५ या काळातील प्रतिभावंत पंडित कवी, भगवद्गीतेवरील ज्या मराठीमधील टीका झालेल्या आहेत त्यांत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली 'भावार्थदीपिका' जी आपण सर्व 'ज्ञानेश्वरी' या नांवाने ओळखतो. दुसरी म्हणजे 'यथार्थदीपिका' जी या 'वामन पंडित' यांनी लिहिली आणि तिसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 'श्रीभगवतगीतारहस्य तथा कर्मयोगशास्त्र' ही होय. संस्कृतचा गाढ व्यासंग असल्याने अलंकार, वृत्त अशा विविध शब्दसामर्थ्याने यांनी साहित्यसेवा केली. यांनी लिहिलेल्या असंख्य सुंदर श्लोकांमुळे 'सुश्लोक वामनाचा', श्लोक म्हटले कि वामन पंडित आठवू लागले. 'यमक अलंकार' हा अतिशय समर्थपणे हाताळल्याने 'यमक्या वामन' म्हणूनही ते परिचित होते. 

त्यांच्या श्लोकाचा एक नमुना -    

वंशी नादनटी, तिला कटितटी खोवूनि पोटी पटी |
कक्षे वामपुटी स्वश्रृंगनिकटी वेताटिही गोमटी।
जेवीं नीर तटी तरू तळवटी, श्रीश्याम देही उटी |
दाटी व्योम घटी सुरा सुखलुटी, घेती जटी धूर्जटी ||

--------------------------------------------------------------------------------

३. आर्या - आर्या मयुरपंतांची ! 

पंडित कवी - मोरेश्वर रामचंद्र पराडकर ! सन १७२९ ते १७९४ या कालखंडातील संस्कृतवर प्रभुत्व असणारे प्रतिभावंत कवी ! मोरोपंत तथा मयुरपंत या नांवाने परिचित असणारे पंडित कवी !  आर्याभारत,  रामायण,  आर्याकेकावली, मंत्रभागवत,  कृष्णविजय, हरिवंश, ब्रह्मोत्तरखंड, केकावली, संशय-रत्नमाला यासारखी साहित्यकृती त्यांचीच ! 'आर्या' आणि 'पृथ्वी' हि वृत्ते त्यांची आवडती, यांत त्यांच्या बऱ्याच परिचित रचना आपणांस माहित आहेत. 

पृथ्वी या वृत्तातील आपणांस परिचित रचना - 
सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चारित्री जडो ॥

न निश्चय कधी ढळो; कुजनिवघ्नबाधा टळो;
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो; ।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरिभमान सारा गळो;
पुन्हा न मन हे मेळो दुिरत आत्मबोधे जळो ॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; ।
कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,
तशि प्रकट हे िनजाश्रितजनां सदा सावरी ॥

दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे।
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?
तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे ॥

             ----------------

आर्य वृत्तातील ही सुंदर रचना - 

श्रीशंभुच्या प्रसादे झाली त्रिजगी मदालसा मान्या,

बुध हो ! या साध्वीते, सेवुनि सुयश, न वदाल सामान्या 

----------------------------------------------------------------------------------------------------

४. अभंग - अभंग तुकयाचा !

संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील संत ! समाजाला भागवतधर्माच्या रस्त्याने भक्तिमार्गाला नेणारे वारकरी संप्रदायाचे थोर अध्यात्मिक पुरुष ! भगवान विष्णूचा अवतार मनाला गेलेला विठ्ठल, त्याच्या भक्तीने ओथंबलेले काव्य हे खरोखरच अभंग ठरले आहेत आणि 'अभंग' म्हणूनच ओळखले जातात. जनमानसांत अत्यंत परिचित असलेल्या रचना संत तुकारामाच्याच ! 

दोन सुंदर अभंगरचना  - 

कन्या सासुर्‍यासीं जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी ॥४॥   

           ------------------------------

जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
चालविसी हातीं धरुनियां ॥१॥
चालों वाटे आह्मीं तुझा चि आधार ।
चालविसी भार सवें माझा ॥२॥
बोलों जातां बरळ करिसी तें नीट ।
नेली लाज धीट केलों देवा ॥३॥
अवघें जन मज जाले लोकपाळ ।
सोईरे सकळ प्राणसखे ॥४॥
तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें ।

जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥५॥

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
 






No comments:

Post a Comment