Friday, June 2, 2017

लावणी आणि भावगीत

लावणी आणि भावगीत

भाग - १

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडीगोडीत तुम्ही फिरवता पाठीवरती हात
सध्या उन्हाचा तडाखा खूपच जाणवत आहे. असाच दुपारी निवांत पडलो होतो. दुपारचे वेळी उन्हामुळे काहीवेळा काहीही काम करावेसे वाटत नाही. मग फेसबुक सहज चाळत बसलो होतो. बघताबघता येथे एक दुर्मिळच म्हणावा असा कार्यक्रम बघायला मिळाला तो श्री. वसंत नाडकर्णी याच्या 'वॉल'वर ! मुंबई दूरदर्शन 'सह्याद्री वाहिनी' यांनी दाखविलेला, कै. सुधीर फडके यांचा कार्यक्रम होता. सोबत उपशास्त्रीय संगीतातील प्रख्यात नाव म्हणजे शोभा गुर्टू दिसत होत्या. मला राहवले नाही मी गाणे लावले. कै. सुधीर फडके गात होते, चक्क लावणी गट होते ! आपल्या चिरपरिचित पद्धतीत, म्हणजे सोबतच्या हार्मोनियमची डावी बाजू आपल्या डाव्या मांडीवर कलती घेऊन आणि एकदा भाता लोटल्यावर डावा हात प्रेक्षक-श्रोत्यांकडे उंचावून ! कै. बाबूजी उपाख्य सुधीर फडके लावणी गात होते -
असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडीगोडीत तुम्ही फिरवता पाठीवरती हात
याचा बोभाट होईल उद्या
मला लौकर घराकडे जाऊ द्या
अहो सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या !
अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठुन तुम्ही इथं धावला
आहे तस्साच काटा तिथं राहू द्या
मला लंगडत घराकडं जाऊ द्या !
तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी
इथं शेजारी नणंदेची झोपडी
आहे तस्संच येणं जाणं राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या !
हे गीत म्हणजे होते एक लावणी, बैठकीची लावणी म्हणतात ती. लावणी आणि पुरुषाच्या आवाजात ! गीताचे शब्द होते 'आधुनिक वाल्मिकी' म्हणून कै. ग. दि. माडगूळकर यांचे आणि संगीत स्वतः कै. सुधीर फडके यांचे ! मुळातील या गीताला समर्थ स्वर आहे, की जिच्या गाण्यात गाणे गातांना शब्द आपल्याला केवळ ऐकू येत नाही तर ते आपल्याशी बोलतात असे आपल्याला वाटते, ते शब्द आपल्या प्रतिसादाची वाट पहातात आणि आपला प्रतिसाद मिळाला आहे हे गृहीत धरून स्वतः प्रतिसाद देतात, असा अनुभव येतो; त्या विश्वविख्यात गायिका 'आशा भोसले' यांचा ! आता आशा भोसले यांनी गायलेल्या लावणीचे गायन कै. सुधीर फडके करणार ! आशा भोसले यांनी गायलेली लावणी - यापेक्षा जास्त सांगता येत नाही कोणाला आणि त्याची काही आवश्यकता पण नाही, ते प्रत्यक्ष ऐकल्यावरच आपल्याला जाणवते.
लावणीतील पुरुषासंबंधीच्या शृंगारिक भावना स्त्रीच्या आवाजांत तिने पुरुषाला संबोधून केलेले ऐकण्याची आपल्याला सवय असते. पुरुषाच्या स्वरात नाही ! मात्र इथे मी पुरुषाच्या स्वरांत ती स्त्रीची भावना ऐकत होतो, तो स्वर स्त्रीचा आहे असे कल्पून ऐकत होतो. स्त्री त्याच्याशी कसे बोलेल, वरवर नकार देत असतांना प्रत्यक्षांत होकार कसा देईल. मात्र या वरवरच्या नकाराचा तिच्या प्रेमावर विपरीत परिणाम होणार नाही याची ती कशी काळजी घेईल, कोणते शब्द वा भाव दाखवेल, कशा स्वरांत बोलेल, समजावेल ? अगदी सर्व भावना लावणी या शृंगार गीतांत असतात. त्या सर्व भावभावना हा पुरुषी स्वर येथे दाखवत होता. समोर दिसत होते म्हणूनच पुरुष गातो आहे हे समजत होते. लावणीच्या भावभावनेंत काहीही कमतरता नव्हती. मी गाणे ऐकत होतो, शेवटच्या कडव्यावर तर कै. बाबूजींना शिटीची प्रतिक्रिया मिळाली. अजून प्रशंसा ती काय असते लावणीला ? ती लावणी संपत आली असतांना कै. बाबूजींनी आपली नजर सहजच कै. शोभा गुर्टू यांचेकडे अपेक्षेने वळवली आणि त्यांनीही मग आपला सूर दिला ! त्यांची मराठीत गायलेली गीते तशी कमी आहेत. त्यांची मराठीतील गायलेली गीते कमी असतील, पण त्याचा उपशास्त्रीय संगीतातील आवाज हा मोठा, सच्चा आणि मान्यताप्राप्तआहे यांत शंका नाही. मग त्या पुरुषाने गायलेल्या लावणीची सांगता झाली. मी सुन्न झालो. काय ही माणसे परमेश्वराने आपल्याकडे पाठविली होती ! आता त्यापैकी कोणीच आपल्यांत नाहीत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग - २

मराठी गीतांचा इतिहास लिहायचे म्हटले तर गीतकार म्हणून कै. ग. दि. माडगूळकरांचे एक स्वतंत्र प्रकरण त्यांत ठेवावे लागेल. यांनी आपल्या आयुष्यांत गीताचा कोणता प्रकार हाताळलेला नाही ? परमेश्वराच्या आळवणीसाठी भक्तीगीत, शृंगारिक भावना दर्शविणारी लावणी आणि अध्यात्म सांगणारी लावणी, निखळ शृंगारगीते, माणसाच्या मनातील विविध भावभावना दाखविणारी भावगीते, वीरश्रीयुक्त पोवाडा, लहान मुलांच्या भावना ओळखून त्यांना समजतील अशी बालगीते ! शृंगार, हास्य, करूण, क्रोध, वीर, भयानक, बीभत्स, अदभूत आणि शांत; ही साहित्यातील नवरस मानली गेलेली, त्या भावनेतील विविध गीते आपल्या समर्थ शब्द रचनेने त्यांनी अमर केलेली आहेत.
कै. सुधीर फडकेंबद्दल काय लिहीणार ? मराठी चित्रपट संगीताचा इतिहास लिहावयाचा असेल तर यांच्या नांवाला डावलून पुढे जाताच येणार नाही आणि मराठी भावगीतांचा इतिहास लिहावयाचा म्हटला तरी यांचे नांव डावलता येणार नाही. संगीतकार म्हणून कै. सुधीर फडके यांचे नाव मोठे होते का गायक म्हणून, हा तर वादाचा विषय होईल, इतकी त्यांची दोन्ही क्षेत्रांत भरीव आणि मजबूत कामगिरी आहे. स्पष्ट शब्दोच्चार, स्वरांचे व शब्दांचे दीर्घ-ऱ्हस्वत्व, श्वासोच्छवास व त्याचा गाण्यातील उपयोग, आणि त्यातील स्वर व शब्दभाव शिकावेत बाबूंजींकडूनच, असे आजही नावाजलेले गायक सांगतांना दिसतात. त्यांनी आपल्याला शिकविले, आपण त्यांच्या देखरेखीखाली गीत गायले हे आपले भाग्य, ही भावना कित्येक गायक-गायिका बोलून दाखवितात; अगदी त्यांत त्यांची अनेक गीते गाणाऱ्या समर्थ गायिका आशा भोसले देखील आहेत.
कै. सुधीर फडके जर गीत गात असतील तर तुम्ही ते गीत कागदावर उतरविण्यासाठी आपल्याजवळ कागद आणि लेखणी घेऊन बसा. त्यांचा ते गीत गातांना जसा शब्दाचा उच्चार असेल तसेच लिहा, अगदी संपूर्ण गीत शुद्धलेखनासारखे लिहून पूर्ण झाले आहे, हे तुमच्या लक्षांत येईल. कवीने आणि गीतकाराने लिहीलेल्या गीतातील शब्दांतील भाव हे त्याच्या उच्चारातील स्पष्टतेवर अवलंबून असतात हे दाखवायला आजही कै. सुधीर फडके यांच्याशिवाय दुसरे नाव पटकन आठवत नाही, यातच त्यांचे मोठेपण आणि महत्ता दिसते.
कै. ग. दि. माडगूळकर आणि कै. सुधीर फडके यांनी फक्त 'गीतरामायण' जरी लिहीले असते तरी त्याचे नांव अजरामर झाले असते अशी वस्तुस्थिती आहे. ही अशी देवदुर्लभ माणसे आपल्याला मिळालीत, आपल्यात राहिलीत आणि आपल्यासाठी हे न विसरता येण्यासारखे, डोंगराएवढे कार्य करून देवाकडे चालती झाली.
हे स्वर्गीय आवाजातील गीत ऐका, 'यमन कल्याण' या नितांत सुंदर रंगात - कै. ग. दि. माडगूळकर आणि कै. सुधीर फडके या दोन्ही कलाकारांचे - गीत रामायणातील अमर गीत -
दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा ?
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा ?
संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग - ३

'साहित्यातील व्याकरण' याचा विचार केला तर गीतप्रकारात, काव्यांत 'यती' हा शब्द नेहमी वापरत येतो. जेथे काव्यातील ओळीत एखाद्या अथवा काही शब्दानंतर क्षणभर थांबले पाहिजे असे वाटते किंवा थांबावे असा संकेत असतो की ज्यामुळे त्या काव्यातील कवीला अपेक्षित असलेला अर्थ समजण्यास आपल्याला मदत होते आणि तो अर्थ गायकाला इतरांपर्यंत पोहोचविता येतो; याला आपल्या सोप्या शब्दांत 'यती' म्हणता येईल. गीतातील अथवा काव्यातील एखादी ओळ वाचतांना, गातांना व्याकरणाच्या नियमानुसार 'यतिभंग' व्हावयास नको. तो काव्यातील दोष मानतात. कवीने ज्या भावनेने हे काव्य, गीत लिहीलेले असेल ते सर्व भाव अगदी सरसपणे आपल्या गाण्यातून व्यक्त व्हावयास हवे, तरच तो गीतकार आणि गायक समर्थ !
आता आपला नेहमीच वादग्रस्त असलेला विषय म्हणजे - गीतकार / कवी, संगीतकार आणि गायक / गायिका या पैकी कोण श्रेष्ठ ? कविराजांचे काम म्हणजे काव्याला जन्म देणे, ही आद्य निर्मिती ! सरस्वतीचा हा पुत्र आपल्या शब्दांतून आपल्या मनांतील भावना व्यक्त करतो. कविकुलगुरू कालिदासाच्या म्हणण्याप्रमाणे - या सरस्वतीपुत्रांच्या शब्दांमागून अर्थ धावत असतो, त्यांना अर्थासाठी शब्द लिहावे लागत नाहीत. असे सामर्थ्य हे गीतकारांत / कविराजांत अपेक्षिलेले आहे, त्यामुळे गीतकार हा काव्याचा निर्माता / पिता आहे सबब गीतकार श्रेष्ठ असे नेहमीच म्हटले जाते.
गीतकारांचे कागदावर असलेले शब्द हे कोणीतरी उच्चारल्याशिवाय समजणार कसे ? यासाठी 'गायक / गायिका' महत्वाचे आहेत. गीतातील अपेक्षित भावनांना योग्य स्वर दिला तरच ती भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकेल अन्यथा नाही. करून रसातील विरहगीत कोणी हास्यरसांत गाणार नाही, त्यासाठी तो स्वर असाच लावावा लागतो की ज्यातून कवीला अपेक्षित असलेला भाव श्रोत्यांपर्यंत पोहचविता येईल; म्हणूनच गायकांस श्रेष्ठत्व आलेले आहे.
या गायकाने जरी गावयाचे ठरविले तरी गाणार कसे ? मग हे समर्थपणे सांगणारा असतो तो संगीतकार ! त्या गीतकाराच्या, कविराजांच्या शब्दांमध्ये जीव टाकतो, त्यांत प्राण भरतो, त्या शब्दांना सजीव करतो तो हा संगीतकार ! जीवन देणारा, सजीव निर्मिती करणारा म्हणून संगीतकार हाच खरा सर्वश्रेष्ठ होय, ही संगीतकार सर्वश्रेष्ठ म्हणण्यामागची भावना आहे. साहित्यातील नवरसांपैकी गीत, काव्य कोणत्या भावना व्यक्त करतांत हे पहिले संगीतकाराला लक्षांत घ्यावे लागते. त्या नुसार कोणते स्वर योजावे लागतील, त्यासाठी कोणत्या रागांत हे गाणे, गीत बसवावे लागेल हे ठरवावे लागते. काही वेळा एकाच गीतांत वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात त्यावेळी पुन्हा त्या कडव्यासाठी वेगळ्या रागांचा विचार करावा लागतो. भारतीय शास्त्रीय संगीत या बाबतीत कमालीचे समृद्ध आहे. रागचक्रातील रागांची मांडणी लक्षांत घेतली, रंगांचे 'थाट' लक्षांत घेऊन त्या गीताला / कवितेला स्वरसाज चढविला तर त्या कविराजांच्या / गीतकारांचे मनांतील भावना स्वरांच्या पाऊलवाटेने आपल्या मनापर्यंत सहज पोहोचविता येतांत. गायकाच्या / गायिकेच्या स्वरातील सामर्थ्य आणि मर्यादा यांचा वापर करून हे गीत / काव्य कोणाकडून गावयाचे, आपल्या स्वरांना आणि कवींच्या शब्दांना कोण यथोचित न्याय देईल हा अत्यंत महत्वाचा निर्णय देखील घेतो तो संगीतकाराच ! हा केवळ गायकासाठीच दिशादर्शक नसतो तर गीतकारासाठीपण सहाय्यकर्ता असतो. गीतकारांना, कविराजांना काय म्हणायचे आहे, हे संगीतकार आपल्या स्वरसामर्थ्याने जिवंत करून गायकांमार्फत रसिकांसमोर ठेवतो. आणि मग ज्ञानदेवांच्या भाषेतील मायबाप रसिक त्याचा आस्वाद घेतात.
हे ऐकल्यावर मला अजून एका गीताची आठवण झाली की जे गीत कै. सुधीर मोघे यांचे आहे, संगीतकार कै. रामचंद्र कृष्णाजी फाटक ज्यांना आपण राम फाटक म्हणून ओळखतो आणि गायलेले आहे मात्र समर्थ अशा दोन वेगवेगळ्या गायकांनी - कै. सुधीर फडके आणि भारतरत्न कै. पं. भीमसेन जोशी यांनी ! ही सर्व मंडळी आज आपल्यांत नाहीत हे सांगावे लागते इतकी ती आपल्यात भिनलेली आहेत, विरघळून गेलेली आहे. कै. सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीतातील त्यांचे स्वरोच्चार आणि घेतात भावाला महत्व देण्याचे वैशिष्ठय येथेही दिसते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग - ४

कै. सुधीर फडके यांचे भावगीतातील योगदान आणि सामर्थ्य याबद्दल आपण सर्वच परिचित आहांत. भारतरत्न कै. पं. भीमसेन जोशी यांच्याबद्दल काय सांगावे ? 'किराणा घराण्याचे' हे गायक जेथे कोणाचे शब्द पोहोचत नाही तिथे यांचे स्वर पोहोचतात, त्यांना काही वेळा तर शब्दांची पण गरज लागत नाही एवढी याची स्वरावर हुकूमत ! एकाच स्वराला वेगवेगळे भाव दाखवायला भाग पाडणारे हे सरस्वतीचे पुत्र ! सारस्वतांची ही भलीमोठी मायंदाळी आपल्याला आपल्या भाग्याने लाभलेली आहे. शब्दांतील विविध भाव कै. सुधीर फडके आणि कै. पं. भीमसेन जोशी आपल्या गायनातून कसे दाखवितात हे त्यांच्या ज्या बोलताना आहेत यांतून हृदयाला भिडते. प्रत्येकाचे सामर्थ्य हे वेगवेगळे कसे आहे हे पहा या गीतातून. गीत आहे -
सखि मंद झाल्या तारका
आता तरी येशील का ?
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला,
त्या अर्थ तू देशील का ?
हृदयात आहे प्रीत अन्‌
ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा,
सूर तू होशील का ?
जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का ?
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी..
पण सांग तू येशील का ?

No comments:

Post a Comment