Tuesday, December 23, 2014

न्यायालयातील आठवणी - २

ही घटना साधारणतः २० - २२ वर्षांपूर्वीची असावी. जेमतेम शिकलेला, ड्रायव्हर असलेला मुलगा आणि थोडीफार शिकलेली मुलगी यांचे लग्न झाले, कोळी समाजातील हे जोडपे ! लग्नाची नवलाई संपली आणि मग एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम हळूहळू सुरु झाले. आपणा सर्वाना अनुभवाने कल्पना आहे की नवरा-बायकोत जर व्यवस्थित पटत असले तर ते घरातील लोकांना फारसे आवडत नाही, 'मग मुलगा बायली झाला', 'वडीलधारी मंडळीना आता काही किंमत राहिली नाही', 'आमच्यावेळी असे नव्हते' इत्यादि बोलणे सुरु होते, स्वयंपाकातील असलेल्या आणि नसलेल्या खोड्या काढल्या जातात, मुलीला धूर्तपणे उपाशी ठेवले जाते मात्र उपाशी ठेवले जात आहे हे जाणवू नये याची काळजी घेतली जाते, पती-पत्नीला एकमेकांपासून शक्यतो सर्वार्थाने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा स्वाभाविक परिणाम हा पती-पत्नीतील वादविवाद नसले तरी सुरु होण्यात होतो. हे कौशल्य सुशिक्षित तसेच अशिक्षित अशा प्रत्येक कुटुंबाकडे सारख्याच प्रमाणात असते जरी प्रत्येकाचे कौशल्य वेगवेगळे असले तरी त्याचे परिणाम मात्र सारखेच होत असतात.

येथेही अशीच परिस्थिती झाली, मुलगा ड्रायव्हर असलेने जास्त काळ घराबाहेर असावयाचा, पती-पत्नीचा सहवास कमी, त्याला आल्यावर वाटायाचे की पत्नीने फक्त आपल्याच भोवती असावे मात्र ही त्याची अपेक्षा घरातील मंडळी समर्थपणे परतवून लावायची आणि बिचारी पत्नी त्याचे वाटेस येते न येते तोच त्याची पुढील कामाची वेळ आलेली असायची. तो गेल्यावर घरातील मंडळी त्याच्या पत्नीलाच बोलायची 'नवरा थकून भागून येतो, त्याचे जवळ जायला सुद्धा तुला वेळ नाही' आणि हे पुढच्या वेळेला त्याच्या कानावर पडेल अशी व्यवस्था केली जायची, परिणाम भांडणे वाढावयास लागली, एकमेकांच्या घरच्या - माहेरच्या - सासरच्या - नातेवाईकांचे उद्धार व्हावयास लागले. एके दिवशी मुलगी माहेरी रवाना झाली.

माहेरच्यांनी त्यात भर टाकली की 'आता कायदे सर्व बायकांच्या बाजूने असतात, तुझ्या नवरा आणि तुझ्या सासरची माणसे आत्त्ता नाक घासत येतील. तू फक्त खावटीची केस टाक.' त्याप्रमाणे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १२५ नुसार खावटीची केस पत्नीने टाकली, नोटीस निघाली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली. (त्यावेळी नुकताच आलेला महिला अत्याचार विषयक कायदा नव्हता हे नशीब). सासरच्या माणसांना नाक घासायला लावण्याचा आग्रह हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे, ती माहेरच्या माणसांची फारच मनापासून इच्छा असते.  

हे झाल्यावर सासरचे काही मागे नव्हते त्यांनी, 'हिच्यासारख्या छप्पन्न पोरी मिळतील माझ्या पोराला' असे म्हणून तो निरोप मुलीच्या माहेरी व्यवस्थित पोहोचेल अशी व्यवस्था केली. अशा वेळी असे निरोप अत्यंत तातडीने, अगदी आपले महत्वाचे काम असले तरी ते बाजूला ठेवून हा निरोप जीवन-मरणाचा समजून देणारे लोक पूर्वीही होते आणि आताही आहेत. हा निरोप व्यवस्थित पोहोचविला गेला. मग पत्नीकडील माणसांनी 'तुमच्या सारख्या भिकारी लोकांना मुलगी द्यायचीच नव्हती पण द्यावी लागली, अजूनही वेळ गेलेली नाही, देवाने लक्षात आणून दिले - बरे झाले' वगैरे वगैरे. झाले. पतीने घटस्फोट  मिळावा म्हणून न्यायालयात मागणी केली, त्याची नोटीस निघाली आणि मग पतीकडूनही न्यायालयात येरझारा सुरु झाल्या.

तारखेच्या दिवशी पती-पत्नी समोरासमोर असावयाचे, मात्र कोणीही कोणाशी बोलू नये याची खबरदारी घेतली जायची. बऱ्याच तारखा झाल्यात, दोन्ही  रडकुंडीला आले, करणार काय? घटस्फोटाची तारीख जिल्ह्याच्या गावी आणि खावटीची तारीख तालुक्याच्या ठिकाणी, पती बिचारा काम-धाम सोडून न्यायालयाच्या चकरा मारतोय आणि पत्नी नवऱ्याला आज न उद्या पाझर फुटेल या आशेवर येते आहे आणि जाते आहे, पैसे खर्च होत आहे आणि नियमित जाणाऱ्या वेळेबरोबर पैसादेखील जाऊ लागला. पूर्वी त्यांच्या बाजूने बोलून त्यांना भरीस पडणारे आता हळूहळू त्यांच्याच विरुद्ध बोलू लागले. हा त्या लोकांचा पवित्रा या दोघांना नवीनच आणि अनपेक्षित होता.

माझ्या कारकुनाशी मी बोलत होतो, त्याने त्या मुलाची माझी ओळख करून दिली, थोडा वेळ मी त्याच्याशी बोललो, ऑफिसला भेटावयास सांगितले, तो आला. त्याला सर्वात पहिला प्रश्न केला 'तुझ्यात आणि तुझ्या बायकोत काही भांडण आहे का?' त्याने निर्मळपणे 'नाही' म्हणून सांगितले. 'तुला बायकोस वागवायचे आहे का?' म्हणून विचारले - त्याने 'हो' म्हणून सांगितले. त्यास फी जमा करण्यास सांगितले आणि 'पुढच्या तारखेस निर्णय होईल' असे सांगितले. त्याला आश्चर्य वाटले. पुढील तारीख आली, न्यायालयासमोर काम निघाल्यावर 'आम्ही आपसात करणेस तयार आहोत' असे सांगितले, विरुद्धबाजूचे वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला, 'यांनी जळगावला घटस्फोट मागितला आहे' हे सांगितले. 'आम्ही अर्जदारास आजही घेवून जाण्यास तयार आहोत' हे सांगितले, विरुद्धबाजूचे वकिलांनी 'अर्जदाराने कपडेदेखील आणले नाही, कसे जाणार?' म्हणून सांगितले. मी फक्त एवढेच म्हणालो, 'अर्जादाराला तर विचारा, ती यायला तयार असेल तर आताच पक्षकाराला बाजारातून कपडे वगैरे घ्यायला सांगतो, त्याची बायकोच आहे.' न्यायाधीशांनी अर्जदार - पत्नीस विचारले, दैव बलवत्तर होते. तिने होकार दिला, दोघेही सोबत निघून गेले, त्यानंतर ते दोघेही तारखेवर आलेच नाही.

त्यानंतर साधारणपणे ३ / ४ वर्षानंतरची घटना, मी माझ्या वकील मित्रांशी तालुका न्यायालयात बोलत उभा होतो. न्यायालयाची इमारत ही स्वतंत्र नव्हती तर तेथे पोलीस स्टेशन, सिटी सर्व्हे ऑफिस, वनसंरक्षक कार्यालय इत्यादी कार्यालये होती. अचानक माझ्या समोर एका व्यक्तीने येउन मला अक्षरशः 'साष्टांग नमस्कार' केला, या अचानक घडलेल्या घटनेने मी आणि आसपासचे सर्व जन अचंबित झालो आणि दचकलोही. ती व्यक्ती उठून उभी राहिली आणि मग माझ्या लक्षात आले की हा पत्नीला न्यायालयातून परस्पर घेऊन गेलेला आणि त्यानंतर माझेकडे अथवा न्यायालयाकडे न फिरकलेला माझा पक्षकार आहे. मला हसू आले, 'असे आहे?' मी विचारले. 'त्या दिवशी तुम्ही होता म्हणून आमचा संसार सुखाचा झाला, माझी बायको तर गाडीमध्ये संपूर्ण प्रवासात रडत होती, तुमच्या मनोमन पाया पडत होती. कधीची तीच मागे लागली आहे की त्या देव माणसाला भेटा  आणि भेटल्यावर 'साष्टांग नमस्कार' करा, म्हणून मी आपणास 'साष्टांग नमस्कार' केला. मला हसू आले, त्या अर्धशिक्षित माणसाची प्रामाणिक भावना माझ्या लक्षात आली. 'अरे, बायकोचे असे पहिल्यापासून ऐकले असते तर बरे झाले असते.' 'मग साहेब, आपली भेट कशी झाली असती?' त्याचे हे उत्तर मला निरुत्तर करणारे होते.  

आपल्या संस्कृतीत, समाजात असे मानले जाते की - लग्नाच्या गाठी ब्रह्मदेव स्वर्गात बांधतो आणि लग्ने पृथ्वीवर लावली जातात, पती - पत्नीचे नाते हे एका जन्माचे नसते तर ते सात जन्माचे असते, विवाह हा संस्कार आहे तो नष्ट करता येत नाही किंवा तो करार नाही कि आपल्या मनास  वाटेल तेंव्हा मोडता येईल, लग्न हे पवित्र बंधन असते, पती-पत्नीने एकमेकांशी एकनिष्ठ असावे वगैरे. या सर्वांचा मी काढलेला मतितार्थ एवढाच की आपल्या समाजाने एकंदर मानवी स्वभावाचा विचार करून, आपली समाजव्यवस्था कायम रहावी, नातेसंबंध टिकून रहावे, मुलांचे  आई - वडिलांविना हाल होऊ नयेत, व्यभिचार वाढू नये, यातून गुन्हेगारी वाढू नये, विविध समस्या निर्माण होऊन आपल्या समाजाची शांतता बिघडू नये, समाजस्वास्थ्य धोक्यात येऊ नये यासाठी तत्कालीन व्यवस्थेनुसार व्यवस्था लावलेली आहे. आजच्या काळात आपल्या पती-पत्नीतील असलेल्या नातेसंबधातील विरळ होत चाललेला ओलावा, दृढता, पक्केपणा आणि आर्थिक बाबींना येत असलेले कमालीचे महत्व, किंबहुना त्यात आलेले एक प्रकारचे व्यावसायिकपण हे लक्षात घेता आपल्या समाजातील आजपावेतो घट्टपणे टिकून राहिलेले बंध विसविशीत होत असल्याचे जाणवत आहे, हे समाजाची प्रकृती बिघडल्याचे लक्षण आहे, हे लक्षण दूर करून आपण सर्वांनी आपल्या समाजाचे स्वास्थ्य दुरुस्त करावे हे आपण सर्वांची जबाबदारी आहे किंबहुना ते आपले एक पवित्र कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवून आपले वर्तन असावे ही अपेक्षा!    

No comments:

Post a Comment