Friday, June 22, 2018

सरदार जी. जी. हायस्कूलच्या आठवणी

सरदार जी. जी. हायस्कूलच्या आठवणी 

आम्हाला आमच्या सरदार जी. जी. हायस्कूल या रावेरच्या शाळेत शिकवणारे शिक्षक फारच छान असायचे.
हिंदी शिकवायला तिवारी सर होते. त्यांचा शुद्धलेखनावर इतका काही भर होता की, कोणी काही त्याच्या उत्तरांत, गृहपाठात, निबंधात अशुद्ध लिहीले की ‘ फिरसे लिखो’ हा त्यांचा आवडता शेरा लाल शाईचा शेरा हमखास असायचा. निबंध तर लाल शाईने रंगलेला असायचा. त्यांच्या या कडक तपासणीत काहींना त्यावेळी तिमाहीत चाळीसपैकी अर्धा मार्कसुद्धा मिळालेला आहे. त्यांनी आम्हाला इतिहास पण अप्रतिम शिकवला. इतिहास, त्यांतील महत्त्वाच्या नोंदी व दिनांक, अगदी मुखोद्गत ! शिकवतांना त्यांच्या हातात कधीही पुस्तक नसे. पण शुद्धलेखन ? अहो, काय सांगू, इतिहासाच्या उत्तरपत्रिका तपासतांना पण, त्यांचे शुद्धलेखनाचे फटके आम्ही खाल्लेले आहे.
संस्कृतला डेरेकर आणि पुराणिक सर होते. पुराणिक सर यांचा तर उच्चारसुद्धा अचूक हवे, हा आग्रह ! ‘आपल्याला लिहायचे असेल तर उच्चार आठवून लिहीता येते’ हे त्यांचे म्हणणे. ते खरे होते. संस्कृतमधील सुभाषिते लिहीतांना त्याचे मोल जाणवायचे.
मराठी शिकवण्यास सुरूवातीला एस् आर कुलकर्णी सर (ज्यु) तर नंतर एन् एस् पाटील सर होते, ज्यांनी आमचे व्याकरण चांगले करून घेतले. पितळे बाई पण नंतर होत्या. हे सर्व अत्यंत कडक, गुण देण्याच्या बाबतीत ! त्यांच्याकडून, विशेषत: पितळे बाईंकडून, वर्गात प्रथम क्रमांक येणारा विद्यार्थी देखील, मराठीत पन्नास देखील गुण मिळवू शकत नसे. मला अनुभव आहे. एन् एस् पाटील सरांनी काही निबंधांस दिलेला, ‘Good’ च्या वरचा ‘छान’ हा शेरा आणि पितळे बाईंनी केवळ चार वेळा दिलेले ‘Good’ शेरे मला अजून लक्षात आहे.
शालांत परिक्षेच्या अगोदर होणाऱ्या प्राथमिक परिक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा दहा टक्के गुण तुम्हाला जास्त मिळतील, हे आमचे शिक्षक छातीठोकपणे सांगायचे. तरी त्यावेळी शालांत परिक्षेचा निकाल हा ३०% ते ४०% यांत लागायचा. आता मुलांना मिळणारे गुण पाहून विनाकारण विचित्र वाटते.
Praveen Bardapurkar यांनी मराठीबद्दल लिहिण्यास सुरूवात केली, अन् आमचे हे गुरूवर्य व त्यांचा दरारा आठवला.

१९.६. २०१८

‘भटके जोशी’

‘भटके जोशी’

‘भटके जोशी’ हे भृगूवंशीय ब्राह्मणच ! अशी पोस्ट वाचनात आली.
मात्र या बोलण्यात काहीही अर्थ नाही. सरकारच्या दृष्टीने जे पुढारलेले ठरवले गेले, मग ते पुढारलेलेच आणि जे मागासलेले ठरवले गेले, ते मागासलेलेच ! मग प्रत्यक्षात काही वेगळी आकाशपाताळ अशी सर्वस्वी भिन्न परिस्थिती असली, तरी हरकत नाही.
सरकारचे चालत आलेले धोरण व घेतलेले निर्णय हे वस्तुस्थितीशी सुसंगत असतात किंवा असले पाहीजेत असे अजिबात नाही. सरकारी धोरण हे नेहमी सत्ताधारी राजकीय पक्ष ठरवतो आणि ठरवत आलेला आहे, त्यांच्या सोयीने ! —— त्यांचे, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे, धोरण पण हा पक्ष कायम सत्ताधारीच रहावा असे असते.
——— आता बादरायण संबंध जोडायचा कार्यक्रम आहे की काय, देव जाणे ?

18.6.2018


चावरेऽऽ वकीऽऽऽल

चावरेऽऽ वकीऽऽऽल
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कै. सुधाकर मुकीमबुवा रावेरकर हे आमच्या गांवातील ! नारदीय पद्धतीचे अप्रतिम कीर्तन करायचे ! यांच्याकडे पूर्वीपासूनच, समर्थ रामदास स्वामींचा ‘दासनवमी’ हा उत्सव खूप जोरात साजरा व्हायचा. दरवर्षी माघ महिन्यात वद्य प्रतिपदा ते नवमीपर्यंत दिवसभर दासबोध या ग्रंथाचे सर्व भाविकांनी इच्छेप्रमाणे जसे जमेल तसे, वाचन करायचे. हा ग्रंथ त्यांच्याकडे देवासमोर ठेवलेला असायचा. थोडक्यात तिथं दिवसभरांत जो कोणी येईल, तो ग्रंथातील तोपर्यंत जो भाग वाचला गेला असेल, त्याच्या पुढे वाचायला सुरूवात करायचा. यांत कोणालाही मज्जाव नसायचा. या उत्सवाच्या निमित्ताने मग बुवासाहेबांची गांवातीलच परिचित मंडळी नाही, तर खेडोपाडीची प्रेमी आणि शिष्यमंडळी देखील, आमच्या गांवी यायची. मनोभावे समर्थ रामदासांच्या चरणी आपली सेवा समर्पित करायची. उत्सव समारोप म्हणजे दासनवमीला भंडारा आणि रात्री किर्तनाचा कार्यक्रम ! रात्री किर्तनाच्या वेळी यांत मग हौशी किर्तनकार, ज्यांना समर्थांच्या उत्सवात किर्तनसेवा करायची, ते पण किर्तन करायचे. शेवटी मग कै. मुकीमबुवा किर्तन करायचे. जवळपास रात्रभर हा कार्यक्रम चालायचा. आम्ही लहान असल्याने इतका वेळ जागे रहाणे शक्य नसायचे, आम्हाला कोणी जागरण पण करू देत नसत. मग असे रात्रभर किर्तन व्हायचे, हे आम्ही फक्त ऐकलेले, पण प्रत्यक्ष किर्तन ऐकण्याचा योग मात्र त्यावेळेस आला नाही. आता येणं अवघडच ! या उत्सवाला मात्र आम्हा बाळगोपाळ मंडळींची आवर्जून हजेरी असायची, ती म्हणजे भंडाऱ्याला !
घटना जुनी, त्यावेळी मी शाळेत शिकत होतो, कदाचित आठवी-नववीत असेन ! त्या वर्षी देखील मी असाच दासनवमी उत्सवाच्या निमीत्त तेथे, मुकीमबुवांकडे, दुपारी भंडाऱ्याला गेलो होतो. जेवणे सुरू होती. वाढण्याचा आग्रह सुरू होता. माझ्या समोरच्या रांगेत, पंगतीत प्रकृतीने मजबूत म्हणता येईल असा उजळ पण सावळासा, चष्मा घातलेला तरूण बसलेला होता. मोकळेपणाने त्याचे सर्वांशी बोलणे सुरू होते. मी आपला तेथील गंमत बघत व ऐकत होतो.
‘काय रे, तुझे नांव काय ?’ त्याने मला विचारले. मी सवयीने पूर्ण नांव सांगीतले.
‘हं, म्हणजे अण्णांचा मुलगा तू !’ त्याचे उद्गार !
तेवढ्यात, ‘प्रकाश, तू नुसत्या गप्पा मारतो आहे, का जेवण करतो आहे ? अरे, याला वाढा. पुण्याला जरी शिकतोय तरी गांववाल्याला विसरून कसे चालेल ?’ बुवासाहेब बोलले आणि त्यांनी जवळच असलेल्या वाढणाऱ्याला आग्रह करून तिथे थांबवले, त्याच्या पानांत वाढायला सांगीतले.
‘बुवासाहेब नको. पोट भरत आलंय. जास्त होईल. नको.’ तो पानावर हात धरून म्हणतोय.
‘पोट भरत आलं आणि पोट भरले, यांत फरक आहे.’ हे अगोदरच्या वाक्यावर उत्तर देतानाच, वाढणारा थांबलेला पहाताच, ‘अरे, तू त्याच्याकडे लक्ष देवू नको. तू वाढ ! तू का थांबला ?’ हे वाढणाऱ्याला समजावीत, पुन्हा त्या तरूणाला, ‘हे पहा, प्रकाश, नेहमी माणसाने तब्येतीने आणि तब्येतीप्रमाणे खावे.’ बुवासाहेबांचे बोलणे सुरूच होते. गप्पा मारण्यात आणि जेवतांना जेवणाऱ्याला वाढण्याचा आग्रह करण्यात ते कोणालाही हार जाणार नव्हते. त्याने मग अरे, अरे म्हणेपर्यंत त्याच्या पानात पदार्थ पडलेला होता.
‘प्रकाश, तुझ्याकडे व तुझ्या तब्येतीकडे न पहाता, आम्ही तुला जर चिमणीच्या घासाएवढे वाढले, तर समर्थ काय म्हणतील ?’ इति बुवासाहेब ! जेवतांना भरभक्कम आग्रह, हा मुकीमबुवांचा स्थायीभाव ! कमकुवत जेवणारे कच्चे लिंबू, त्यांना चालत नसत.
‘माणसाने आपल्या पानात कितीही पडले, काहीही पडले, तरी तिकडे लक्ष देवू नये. अहो, खाण्याचेच पदार्थ वाढणार जेवतांना ! बस, आपलं थोडंथोडं खात रहावं. मग नक्की एकवेळ अशी येते, की आपल्या पानातलं आपोआप सर्व संपलेले असते. मग वाटलं तर पुन्हा घ्यावं. पुन्हा हेच ! अहो, आद्य शंकराचार्य म्हणतातच, ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ !’ बुवा रंगात आले होते.
‘बुवासाहेब, आपलं जेवण झाल्यावर उठता तर आले पाहीजे, घरी जायला.’ तो तरूण !
‘उठता न यायला काय झालं ? चावरेंचे घर किती लांब आहे इथून ? जेवणानंतर खरकटे हात धुवायला घरी जाता येईल.’ मुकीमबुवांचे उद्गार ! मग मला समजले की हा तरूण म्हणजे प्रकाश चावरे !
तसं पाह्यलं तर, या चावरे कुटुंबाचे आणि आमचे तीन पिढ्यांचे गांवातील संबंध ! यांचेच काय, पण गांवातील इतर मंडळी देशमुख, आठवले, प्रचंड, दीक्षित, रावेरकर, देव, डोखळे, डोहळे, विटवेकर, केऱ्हाळकर, मुजुमदार, महाजन, दलाल, वाणी, पाटील वगैरे अशी कित्येक घरे होती, की या मंडळींचे संबंध हे आमच्या घराशी पिढ्यांमधे मोजले जात, वर्षांमध्ये किंवा दिवस-महिन्यात नाही. अर्थात त्यावेळी तसे संबंध ठेवणारी पण मंडळी असायची, म्हणून हिशोब हा वर्षांचा किंवा महिन्यांचा किंवा दिवसांचा नसायचा, तर थेट पिढ्यांच्या संबंधाचा असायचा. आता पिढीजात संबंधाबद्दल कोणाला क्वचितच विचारले जाते. विचारले तर, ‘आपली यांची कधीपासून ओळख ?’ असे विचारले जाते. यांवर आपण काय उत्तर देणार ? मग सांगावे लागते, ‘काही नाही, तशी ओळख ही अलिकडचीच, म्हणजे याच किंवा फार तर गेल्या वर्षातलीच’ असे विचारणाऱ्याला सांगावे लागते. आता गांवातील मातीत आणि त्या मातीत बांधलेल्या जुन्या वास्तूत रूजलेल्या पिढ्या संपल्या, आणि दुर्दैवाने, हो, दुर्दैवानेच म्हणेन मी, पण त्याबरोबर पिढ्यांचे संबंध पण संपले. गांवातला माणूस परगावी गेल्यावर लॉजवर उतरला वा बाहेर जेवला हे समजले, तर गांवी आल्यावर ते लक्षात ठेवून आपल्या घरी येवून, सर्वांसमक्ष आपली याबद्दल बिनपाण्याने हजामत करणारे, सर्व जातीतील न्हावी, आता कमी होत चाललेय ! खानावळी आणि विश्रामगृह वाढताय, घरं कमी होत आहेत. आता ओळख झाली आणि ओळख होऊन किती दिवस झालेत, हे सांगण्याचे दिवस आलेत. कालाय तस्मै नम: ।
तर प्रकाश चावरे यांच्याबद्दल नंतर पुन्हा एकदा ऐकायला मिळाले, ते त्यांच्या पुतण्यांकडून ! या माझ्या आईकडे गाणं म्हणजे शास्त्रीय संगीत शिकायला यायच्या. आमच्या भागातील शास्त्रीय संगीत शिकलेला किंवा शिकलेली, ही एकतर माझ्या आईकडे शिकलेली असते किंवा तिच्याकडे जो शिकलेला आहे, त्याच्याकडे शिकलेली असते. डॉ. चावरे हे आमच्या गांवातील प्रसिद्ध डॉक्टर ! ॲड. प्रकाश चावरे हे त्यांचे बंधू ! मी बहुतेक दहावीत होतो. माझी शालांत परिक्षा झाली होती, त्यामुळे निवांतपणा होता. उन्हाळा संपून पावसाळा हा असा तोंडावर होता, आणि या सर्व पळतपळत घरी आल्या. पुढे जावून कोण पहिले बातमी सांगते, या धावपळीत आल्या, अन् ‘बाई, बाई, आमचा प्रकाशकाका हा बी. ए. (आॅनर्स), एल् एल्. बी. झाला.’ असे म्हणत त्यांनी पेढे दिले. त्यावेळी समजले की प्रकाश चावरे हे आता आपल्या गांवातील नविनच वकील झाले आहे.
माझी त्यांच्यासोबत, चावरे वकिलांसोबत, खरी उठबस झाली, ती मी वकिल झाल्यानंतरच ! वर्ष सहा महिने मुंबईला काढल्यावर, मी परत आमच्या भागांत, जसा गांवच्या कोर्टात जास्त रमायला लागलो, त्याचवेळी ! इकडे जसा आलो, तसा मी आपला गावच्या कोर्टात माझी नेहमीची बॅग घेवून आलो. आमच्या गांवचे कोर्ट म्हणजे, तेथे पोलीस स्टेशन, तहशीलदार कार्यालय, सबरजिस्ट्रार कार्यालय, वनविभाग कार्यालय, भूमापन कार्यालय, ट्रेझरी वगैरे जवळपास सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी ! आमची बाररूम म्हणजे फक्त बारा बाय सहा फूट, अशी दोन चौक्याची खोली आणि बाजूला तीन चार खोल्या या कोर्टासाठी ! तेथील सर्व इमारत ही कौलारू, जुन्या पद्धतीची व एकमजली बैठी ! बाररूममधे एकासएक लागून दोन गाद्या टाकलेल्या, समोर सागवानी लाकडी टेबल, त्याच्या दोन्ही बाजूला लाकडी हाताच्या जुन्या खुर्च्या ! दरवाज्याजवळच लोखंडी कपाट त्यांत बाररूमची सर्व कागदपत्रे, पुस्तके, कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी म्हणून घेतलेल्या डिशेश, कपबशा ! त्या दरवाज्या समोरच पाण्याचा माठ मावेल एवढीच छोटी मोरी व पाण्याने भरलेला माठ ! टेबलावर सर्व वकिल मंडळींच्या बॅगा, एकावर एक व शेजारी शेजारी ! काही निवांतपणा हवी असलेली वकिल मंडळी, ही तेथे पसरलेल्या गादीवर, लोडास टेकून एक पाय दुसऱ्या पायाच्या गुढग्यावर टेकवून आराम करताहेत ! आणि वर ‘कुच्युंऽग कुच्युंऽऽग कुच्च’ असे आवाज करत फिरत असलेला, निदान त्या कौलारू घराच्याच वयाचा छताला लटकून फिरणारा पंखा !
माझ्या डोळ्यांसमोर असलेले पूर्वीचे आणि आताचे दिसणारे चावरे वकील यांच्यात बराच फरक दिसला. त्यावेळची मजबूत तब्येत आता उतरली होती. उजळ सावळावर्ण जावून गोरेपणा वाटायला लागला होता. हनुवटीकडे किंचीत निमुळता होत जाणारा चेहरा, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा ! डोक्याला टक्कल पडलेले आहे, हे जाणवू लागलेले. मात्र चेहऱ्यावर बुद्धीचे असलेले तेज अजूनच झळाळू लागले होते. माझे निरीक्षण चालू होते, तेवढ्यात कोर्ट हॉलकडून, पांढरी स्वच्छ दाढी असलेल्या अब्दुलचा, कोर्टाच्या शिपायाचा पुकारा ऐकू यायचा, ‘च्चाऽऽव्वरे वकिऽऽऽल’ ! मग चावरे वकिल, समोरचे पायाजवळचे चामडी अथवा कापडी बूट पायात, झटकन घालून उठून कोर्टाकडे चालायला लागत. काही वेळा पक्षकाराला धीर निघवत नसे, तो सोबत आलेल्याला बाररूमच्या दरवाजावर उभा करायचा. तिकडच्याने खूण केली, की ‘चला, साहेब पुकारा होतोय.’ म्हणून चावरे वकिलांना घाई करायचा.
‘अरे, ऐकू तर येवू दे. काम व कोर्ट कुठं पळून जात नाही. माझ्याशिवाय काम सुरू होणार नाही.’ म्हणत ते उठू लागत. उठून फाईल घेवून कोर्टात जात. काम सुरू करत. पक्षकाराची तपासणी आणि सामनेवाल्या साक्षीदाराची उलटतपासणी ते उत्तम घेत. माझे काका कै. वसंतराव भोकरीकर हे पण तिथं पूर्वीचे नावाजलेले वकील ! स्वाभाविकच त्यांचा प्रभाव तेथील बऱ्याच नवशिक्या व जुन्या वकीलांवर ! मला मात्र त्यांना प्रत्यक्ष काम चालवतांना पहाता आले नाही. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच ते वारले. त्यामुळे त्यांच्या कोर्टातील गोष्टी समजल्या, या तेथील वकील मंडळीनी सांगीतल्यावरच !
‘वसंतराव नेहमी म्हणायचे, एकवेळ सामनेवाल्याची उलटतपासणी सोपी, कारण ती आपण घेतो; पण जर आपला पक्षकार मूर्ख असेल, तर त्याची सरतपासणी कठीण ! कारण वाटेल ते, हा पठ्ठ्या आपल्या तपासणीतच कबूल करतो, मात्र यावेळी कोर्टासमोर आपल्याला बोलता येत नाही. त्याला काही सांगता पण येत नाही, की हे असे बोलू नको. मग स्वत:च्या केसचा बट्ट्याबोळ हा स्वत:च करतो.’ त्यांचे मला सांगणे ! ‘पण मग विरूद्ध बाजूचे वकील पण काही वेळा आपल्या मदतीला येतात आणि उलटतपासणीत काहीतरी चमत्कारिक प्रश्न त्यांच्या उलटतपासणीत विचारून, सरतपासणीत कमावलेल्यावर पाणी फिरवतात.’ ते सांगत त्यांचा अनुभव !
‘हे पहा, माझे मत म्हणजे, आपण आपला धीर सोडायचा नाही, अगदी शेवटपर्यंत ! मग समोरच्याच धीर सुटायला लागतो. प्रयत्नांती परमेश्वर मिळतो. मग हे काय घेवून बसलात, आपली काळजी देवालाच !’ माझे उत्तर.
‘तुझा देवावर भलताच भरवसा दिसतोय रे !’ त्यांचा प्रतिवाद !
‘पण आपण आपले काम निष्ठेने करावे. गीता सांगते.’ मी !
‘भगवद्गगीतेशिवाय तू बोलत नाही.’ त्यांची कोपरखळी !
‘मी अगदी लक्षात ठेलंय, तुझे काका, वसंतराव फौजदारी लिहीत, ती फक्त दीड-दोन पानात ! पण त्यांत सर्व घटना आणि संबंधीत सेक्शनचे सर्व मुद्दे आले असत.’ त्यांचे मला एखादे वेळी सांगणे होई.
दुपारच्या वेळी चहाला बरोबर जायचे, ते लालचंदच्या हॉटेलमधे ! तिथं लालचंद गंजी पाटील आणि मदनलाल बोरा यांची जोडी उभी असे. चहा पिऊन झाला की आम्ही बाहेर पडत असू. ‘पैसे कोणाकडे ?’ मदनचे विचारणे.
‘सिनीअर कोण आहे ?’ माझे उत्तर !
‘बास, या वेळी मी सिनीअर म्हणून आठवते. इतर वेळी नाही.’ चावरे वकिल कृतककोपाने पैसे देत बोलत.
‘तुम्ही मग आर. जी. चौधरी साहेबांना सोबत आणत जा. सोपा उपाय !’ माझे उत्तर !
‘तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.’ चावरे वकील असे बोलत व आम्ही बाररूमकडे चालू लागत. त्यांचे पक्षकारांना बसवून ठेवण्याचे ठिकाण म्हणजे कोर्टाच्या दरवाज्याजवळच बसलेल्या पंढरीजवळ ! श्री. पंढरीनाथ श्रावक म्हणजे त्यांचे काय, सर्वांचेच कारकून !
तसे त्यांच्या माझ्या वयांत बरेच अंतर ! बोलतांना हे विसरले जाई. मनापासून गप्पा चालत बाररूममधे ! तसे आमच्या बाररूममधे वातावरण अगदी निर्मळ ! विरूद्ध बाजूच्या वकीलाला पण कायद्यातील काही शंका विचारायला नविन वकील मंडळी कचरत नसत आणि नवीन वकीलांना मार्गदर्शन करणे, हे जेष्ठ वकीलांचेच काम व कर्तव्य आहे, ही भावना, ज्येष्ठांची असे. काही वेळा किरकोळ वाद व्हायचे, नाही असे नाही; पण मग येथील जेष्ठ मंडळी, विशेषत: कै. ॲड. आर. जी. चौधरी ते निपटून काढत. त्यांचे बोलणे हे गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यासारखे असे ! तुरटीने पाणी स्वच्छ होते, तसे यांच्या बोलण्याने गढूळ वातावरण स्वच्छ होई.
चावरे वकीलांची शेतीबाडी, घरदार गांवातच ! माझे पण जवळपास तसेच ! काही वेळा दुसरीकडे जायचे विचार माझ्या मनांत येत, नाही असे नाही. मी त्यांच्याकडे बोलून पण दाखवीत असे.
‘अरे, आपली शेतीवाडी, घरदार इकडे आहे. काय करतो, दुसरीकडे जावून ? तुझ्याकडे काम येत नाही का ? ते तर भरपूर येतंय ! मग चलबिचल करू नको.’ असे ते नेहमी मला सांगत, समजावत. काहीवेळा कोर्ट कामाच्याच नाही तर, खाजगी, घरगुती बाबींबाबत पण गप्पा होत. काही माहिती किंवा शंका त्यांना असली, तर माझ्या संपर्कामुळे मला काही विचारत. मग जर चहा पिण्याची वेळ झाली असेल, तर मी मुद्दाम म्हणायचो, ‘साहेब, तुमचा प्रश्न, समस्या कठीण आहे.’ ते माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहात. मग घड्याळ्याकडे पाहिल्यासारखे दाखवत, नाईलाज झाल्यासारखे दाखवत, ‘आणि या वेळी तर माझं अजिबात डोकं चालत नाही.’ हे मी म्हटल्यावर, ‘बस, तुला माझ्याकडून चहापाण्याला कारणच हवं !’ असे त्यांचे उत्तर येई. ‘वेळेचा परिणाम’ असे मी म्हणत आम्ही लालचंदच्या हॉटेलकडे चालू लागत.
‘हे पहा, जास्त गाजावाजा करू नको. गुपचूप जाऊ.’ असे ते म्हणाले की आपण ओळखून घ्यावे की आज त्यांचा मूड बरा आहे. त्यांनाच गाजावाजा हवा आहे. मग रस्त्यात कोणाचा पण ओळखीचा भेटला की त्याला काहीही कारण नसतांना मी निरोप देई, ‘हे पहा, पंढरी किंवा आर. बी. चौधरी वकील भेटले, तर निरोप द्या, की आम्ही लालचंदकडे आहे. लगेच येतो आहे.’ तो माणूस आवर्जून निरोप देई. निरोपाचा योग्य तो बोध घेतला जाई, आणि आमचा चहा तयार होतो आहे, तोच ॲड. रमेश चौधरी, ॲड. टी. डी. पाटील वगैरे सर्व मंडळी लालचंदच्या येथे येतांना दिसे.
‘अरे, चावरे साहेब तुम्ही इथं ? आम्ही तुम्हाला तिकडेच बघतोय !’ ॲड. रमेश चौधरी मुद्दामहून !
‘सालं, चहा प्यायचा म्हटले तरी शांतता नाही.’ चावरे वकील.
‘एकटे एकटे पिताय वाटतं चहा !’ ॲड. टी. डी. पाटील.
‘लालचंद, दे रे भो सगळ्यांना चहा ! मदन, तुला हसायला काय झालं ?’ चावरे वकील.
‘यांचा निरोप मिळाला की आम्ही इथंच आहोत. लगेच येतोय.’ माझ्याकडे हात दर्शवत ॲड. आर. आर. पाटीलांची प्रतिक्रिया !
‘भोकरीकरला बरोबर नेले की सगळं गांव गोळा होतं आपोआप !’ चावरे वकिलांचा वरवर संताप ! तेवढ्यात पंढरी त्यांना सांगायला येतो की ‘ॲड. आर. जी. चौधरी त्यांना पहात होते.’ हे ऐकल्यावर, ‘त्यांना इथं असल्याचा निरोप द्या.’ सांगून पाठवले जाई. हे होईपर्यंत सगळ्यांचा चहा तयार व्हायला वेळ लागे. मग रमतगमत तिकडून ॲड. आर. जी. चौधरी, ॲड. एम् ए खान व ॲड. युसूफ येतांना दिसत !
‘क्यो, अकेले अकेले चाय चल रहीं हैं !’ ॲड. एम् ए खान !
‘तुला कोण अकेले दिसतंय ? सर्व बार जमा झालाय ! चहा प्यायला !’ चावरे वकील. ते आणि ॲड. एम् ए खान वर्गबंधू ! खास मित्र !
‘वास्तविक सगळ्यांना इथं बोलावण्यापेक्षा बारमधे चहा बोलावला असता, तर आणला नसतां का मदनने ?’ माझा प्रश्न — मुद्दाम !
‘अब देखो, मै नहीं बोल रहा, तुम्हारा खास आदमी बोल रहा हैं !’ ॲड. एम् ए खान ! असे काहीबाही बोलत, हसतखेळत चहापान होई. ही अशी वेळ आमच्या बारमधे कोणावर पण येई आणि असेच संवाद होत निभावली जाई. अत्यंत निरोगी व निर्मळ वातावरण !
त्यांचे आणि माझे गुण जमण्याचे अजून एक कारण म्हणजे - शास्त्रीय संगीत ! दोघांनीही त्याची आवड ! एकदा मला समजले की जळगांव आकाशवाणीतर्फे संगीत सभा आहे, कृषक भवनांत ! गायक होते, पं. प्रभुदेव सरदार ! चावरे वकीलसाहेबांना मी निरोप दिला. चलायचं का म्हणून विचारले. त्यांनी होकार दिला. त्यांच्या स्कूटरवर दुपारच्या सुटीनंतर निघालो. गप्पा मारत, रस्त्याची अवस्था बघून, त्याची कशी वाट लावली आहे वगैरे बोलत बामणोद गांव लागले. तिथं वळणावर कॉफी चांगली मिळते हे त्यांना माहीती होते. मग थांबून कॉफी घेतली व निघालो.
कुठं, काय खाण्याचं चांगलं मिळतं ही माहिती त्यांच्याजवळ अगदी अद्ययावत असे ! त्यांना खाण्याची मोठी आवड ! जळगांवचा महालक्ष्मी आणि पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा, बुरहानपुर येथील मिलन मिठाईचे दुकान, बुरहानपुर येथील मोरे यांचा चिवडा, धनजीशेटचे गाठीशेव, आसोदा-भादलीचे भरीत, सातव यांच्याकडचा दराबा, नगरिया आणि रेल्वे स्टेशनवरच्या कचोऱ्या, शिंदे तसेच मानकर यांच्या हॉटेलमधील झणझणीत मिसळ वगैरे अशी ही भलीमोठी यादी होती.
‘प्रभुदेव सरदार हे नाट्यगीत आठवणीने म्हणतात. पुण्याला यांचे नेहमी कार्यक्रम होत. ऐकले आहे मी.’ चावरे साहेब मला सांगत होते. त्या रात्री पं. प्रभुदेव सरदार यांचे गायन खरोखर चांगलेच रंगले. त्यांनी नाट्यगीते पण सुरेख म्हटली. दुसऱ्या दिवशी सकाळी जळगांवहून परत घरी ! येतांना ज्या संगीतावर गप्पा झाल्या त्यांत, त्यांनी टीव्हीवर शास्त्रीय संगीताचे खूप छान कार्यक्रम असतात, हे सांगीतले. पं. किशन महाराज यांचा तबल्यावर कार्यक्रम असायचा रात्री नऊच्या दरम्यान, याला येत जा ! ‘कोणी सोबतीला रसिक असला तर ऐकायला पण बरं वाटतं’, ही त्यांची भावना !
गेल्या एक तपाहून जास्त काळ मी इथं गांव सोडून, वकिलीच्या निमित्ताने उच्च न्यायालयांत औरंगाबादला आलो आहे. तिथं गांवाकडे जाणं तसं कमी कमी होत गेलं. एकदा समजलं की राम नवमीच्या उत्सवाचे वेळी गांवात झालेल्या दंग्यात डॉ. चावरे यांचे संपूर्ण घर पेटवून दिले गेले. त्यांच्यापैकी कोणी तिथं नव्हते. चावरे वकिलांवर पण हल्ला झाला. नंतर त्यांची प्रकृती बिघडलीच. दवाखान्यात जळगांवी भेटायला गेलो होतो. त्यांना बोलायचे नेहमीप्रमाणेच खूप होते. ‘माझे मन ते माझे जळत असलेले घर बघीतले आणि विदीर्ण होवून गेले.’ ते एवढे बोलले आणि गप्प बसले. त्यांना फार काही बोलता येत नव्हते का भावना दाटून येत होत्या ? माझा हात त्यांनी हातात घेतला. काही वेळ शांतपणे बघत होते. मलाच काही रहावेना. मीच आपल्या येथील आठवेल त्या गोष्टी सांगायला लागलो. त्यांना बरं वाटत असल्याचे जाणवत होते. थोडा वेळ थांबून मी निघालो. निघावेच लागते. नंतर तब्येत सुधरली, नेहमीप्रमाणे कोर्टात जावू लागले.
नंतर एखादे वेळी गांवी जाणे झाले, तर भेट होई. कोर्टात गेलो, तर घरी ते आवर्जून बोलावत. ‘तुम्ही बोलावले म्हणजेच मी येईन आणि बोलावले नाही तर येणार नाही, असं वाटतं का तुम्हाला ?’ या माझ्या प्रश्नावर ‘तुला यायचं असेल तर ये.’ हे नॉर्मल उत्तर आले की मला पण बरं वाटे. त्यांच्या घरीच काय पण संपूर्ण गांवाला हा आमचा अकृत्रिम स्नेह माहीत होता.
‘बरं झालं, तू औरंगाबादला गेला ते. तुझी कमाल आहे. खडकावर नाव चालवतोय तू ! काळजी करू नको आणि हिंमत हरू नको. जगाच्या पाठीवर कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो, तरी आपल्याकडे पक्षकार आपल्याला शोधत येतील. आपली प्रॅक्टीस मेरीटची आहे. निघेल अडचणीतून मार्ग !’ माझ्यावर आलेल्या असंख्य, कल्पनातीत अडचणींची त्यांना कल्पना होती.
बरं, केदार भेटतो की नाही. त्याच्याकडे लक्ष ठेव.’ त्यांची त्यांच्या मुलाबद्दलची चौकशी !
‘तुम्ही या एकदा तिथं !’ माझा आग्रह !
‘मी आता जळगांवला पण जास्त जात नाही. पण तिथं आलो, तर तुझ्याकडे नक्की येईल.’ त्यांचे उत्तर ! असेच गडबडीत एकदा औरंगाबादला थोडा वेळ घरी आले होते, पक्षकाराबरोबरच ! गप्पा झाल्या. आठवणी निघाल्या. माझ्या बायकोला माझ्याबद्दल धीर दिला.
‘आपल्याला पेन्शन नाही, प्रॉव्हीडंट फंड वा ग्रॅच्युइटी नाही. नियमीत पैसे किती मिळतील याचा भरवसा नाही. पक्षकार असे तर कोर्टाची परिस्थिती अशी ! मोठी कठीण अवस्था असते वकिलांची ! पण तुझ्या काकांचे, वसंतरावांचे वाक्य मला नेहमी आठवते, ‘आपण रस्त्याने जे सुखरूप चालतो आहे ना, ते कोर्ट आहे म्हणून !’ काय खोटं आहे यांत ? बरं झालं, तू इथं आलास. मोठं क्षेत्र मिळालं.’ त्यांच्या शुभेच्छा होत्या, आशीर्वाद होते का माझ्याबद्दलचे ह्रदगत होतं कोणास ठावूक ? पण माझी भेट झाल्यावर ते पूर्वीपेक्षा भरभरून बोलत.
‘अरे, बारमधे बोलावे, कोणाशी बोलल्यावर बरं वाटेल अशी माणसं पण कमी होत चालली आहे. त्यांची सर्व गणितंच वेगळी. ‘पंच, साक्षीदारांचे तू पाहून घे, मग बाकी मी सांभाळतो.’ असे खुशाल पक्षकाराला सांगतात.’ ते बोलत होते.
‘सर्व साक्षीदार पंच, फोडल्यावर केसमधे काय रहाते ?’ माझा प्रश्न !
‘तेच म्हणतोय मी ? मी पक्षकाराला सांगायचो, ‘सांग साक्षीदाराला माझे चावरे वकील आहे. किती फिट पडायचा तो पड. मी पहातो.’ चावरे वकील स्वत:ची व्यथा सांगत होते का व्यवसायाची दुर्दशा सांगत होते, समजत नव्हते.
एक दिवशी गांवाहून असाच निरोप आला, ‘चावरे वकील गेले’ ! मी सुन्न झालो. सुचेना काही. कोर्टातून कसाबसा घरी आलो आणि मिळेल त्या गाडीने रात्री गांवी पत्नीसह पोहोचलो. रस्त्याने त्यांच्या माझ्या परिचयांच्या सर्वांना या दुर्दैवी, धक्कादायक बातमीचे मेसेज पाठवीत होतो. सकाळी उठून त्यांच्या घरी निघालो. त्यांच्या घरी पोहेचेपर्यंत निदान दहा लोकांनी, ‘चावरे वकील’ गेल्याची बातमी सांगीतली. माझे घर ते त्यांचे घर पाच मिनीटाच्या अंतरावर, त्यासाठी वीस मिनीटे लागली. तेथे श्री. अरविंद पाठक बसलेले होते. त्यांनी मी आलेलो आहे, हे अगोदरच सांगीतले होते. मला बघीतल्यावर त्यांनी, ‘तुम्ही येथे आलात म्हणजे याचसाठी ! हेच मी सर्वांना सांगीतले. फार वाईट झाले.’
त्यांचे जाणे हे त्यांच्या घरासाठी तर वाईट होतेच पण गावासाठी पण वाईट होते. पक्षकाराच्या पाठीशी समर्थपणे उभा राहून, प्रामाणिकपणे लढणारा लढवय्या वीर गेला.
आमचे येथे राहून गेलेले न्यायाधीश ही बातमी ऐकल्यावर बोलून गेले, ‘तुमच्या बारचे ‘नानी पालखीवाला’ गेले ! मला पण खूप शिकायला मिळाले.’
त्यांच्याकडून कोणाला शिकायला मिळाले नाही ? नवोदित वकिलांना व न्यायाधीशांना पण ! दावा कसा लिहावा, कैफियत कशी लिहावी, नोटीस केव्हा द्यावी वा देवू नये, केव्हा आपसात करावे वा करू नये, तपासणी व उलटतपासणी कशी घ्यावी, त्यांत काय बोलावे वा बोलू नये, काय विचारावे वा विचारू नये ! युक्तीवाद कसा करावा, सामनेवाल्याचे म्हणणे प्रतिवादात कसे खोडून काढावे, वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय कसे द्यावेत ! असंख्य गोष्टी आहेत, काय व किती सांगणार ?
काही जण आपल्या आयुष्यात येतात. त्यांची आपल्यासाठीची भरभक्कम भूमिका बजावतात. आणि आपल्याला न विचारतां कायमचे निघून जातात. ‘ज्ञान दिल्याने वाढते, साठवून ठेवल्याने कमी होते, काही दिवसांनी लुप्त होते’ यांवर श्रद्धा असलेल्या माझ्या हितचिंतकांपैकी एक नांव कायमचे मिटले गेले.

17.
6.2018

Wednesday, June 13, 2018

‘परमाणू’ हा चित्रपट

‘परमाणू’ हा चित्रपट

काल ‘परमाणू’ हा चित्रपट बघीतला. सन १९९८ साली झालेल्या ‘पोखरण अणुचाचणी’ या विषयावर आधारलेला. विषय मनाला भावणारा ! या अणुचाचणीच्या वेळी पंतप्रधान होते मा. अटलबिहारी वाजपेयी ! त्यांचे तत्कालीन भाषणाचे अंश चित्रपटात दाखवले, आणि मनाला त्या काळात चित्रपट घेवून गेला. चित्रपटाची कथा, त्यातील प्रसंग व त्यांची मांडणी याच्या सत्यासत्यतेच्या बद्दल लिहीत नाही.
मात्र ‘पोखरण’ येथील अणुचाचणी मग ती माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांच्या काळातील असो वा अलिकडची मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील असो. या आम्हा भारतवासीयांची मान जगात उंचावणाऱ्या घटना आहेत. आम्हाला समर्थ वीराची शांतता हवी आहे, दुर्बलाची हतबल शांतता नको, हे खंबीरपणे सांगणाऱ्या या दोन अणुचाचण्या आहेत. निसर्गन्याय हा समर्थाला मिळतो, जो जगायला लायक आहे ! दुर्बळाला किंवा समोरच्याच्या चांगुलपणावर, त्याच्या न्याय बुद्धीवर अवलंबून असलेल्याला क्वचितच मिळतो. समोरचा जर स्वार्थी असेल, आणि तो असतोच, तर मग आपण समर्थ बनले पाहीजे. समोरच्याच्या न्याय्यबुद्धीवर आपले अस्तित्व अवलंबून असणे हे धोकेदायकच !
चित्रपट बघायला हवा. विषय सर्वज्ञात आहे, मनाला साद घालणारा आहे. कलाकारांची कामे विषयानुरूप, चांगली आहेत.

६. ६. २०१८

Image may contain: 1 person, text

फोन आणि एस् टी डी बूथ












फोन आणि एस् टी डी बूथ

आमच्या सरदार जी. जी. हायस्कूलसमोरच कृषी उत्पन्न बाजार समिती होती. आम्ही मुले केव्हातरी मधल्या सुटीत अधूनमधून बाजार समितीत जात ! कारण काय, काहीच नाही ! आपण काय धान्याचे लिलाव थोडीच घेणार होतो ? पण ती तेथील लिलावाची लगबग, वाढत जाणाऱ्या धान्याच्या भावाच्या बोल्या ! आणि शेवटी एकवार, दोनवार आणि तीनवार, म्हटले, की मग लिलाव फायनल आणि सर्वांनी पुढच्या धान्याच्या ढिगाकडे जायचे, सोबत आम्ही पण ! गंमत वाटायची, आमची मधल्या सुटीची वीस मिनीटे बघताबघता संपायची. यांत आमचा जर एखादवेळेस बरा योग असला तर, बाजार समितीत भुईमूगाच्या शेंगांचा लिलाव असायचा. छोटेछोटे ढीग असायचे मग, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे ! मग जरा धाकधुकीने, तसेच दुसरे कोणी उचलत असेल तर, आम्हाला पण, आमच्या शालेय छोट्या मुठीत, शेंगा उचलतां यायच्या ! शेंगाच्या मालकाचे व माल घेतलेल्या व्यापाऱ्याचे आमच्याकडे लक्ष असायचे, पण बघीतल्यावर काही कोणी बोलत नसे. आमच्या या शालेय मुठीत किती शेंगा मावणार ? फार तर पाच-सात शेंगा येत असतील. मात्र हा असा लाभ योग कमी यायचा, कारण आमच्या तिकडील भागांत भुईमूगाचा पेराच एकंदरीत कमी !
या मार्केट कमिटीच्या आवारातच, तिथं जवळच एका इमारतीत दूरसंचार विभाग म्हणजे ‘टेलिफोन एक्सचेंज’ होते. तिथं जाऊन आम्हाला त्यांचे काम बघायला पण गंमत वाटायची. दूरसंचारचे कर्मचारी त्यांच्या कामात असायचे. गांवातून कोणाचा तरी फोन यायचा, मग तेथील आॅपरेटर त्याच्याजवळचा विशिष्ट फोन उचलून, ‘कोणता नंबर हवा’ म्हणून विचारायचा. तिकडून नंबर समजल्यावर, कर्मचाऱ्याच्या हातातील वायर जोडलेली जाड दाभणासारखी व इंजेक्शन सारखी दिसणारी पितळी पीन, त्या बऱ्याच खाचा असलेल्या बोर्डवर, योग्य नंबरच्या ठिकाणी लावायचा व मग पुन्हा त्या विशिष्ट फोनमधून ‘हं, सुरेशशेट, लाईन लागली आहे, बोला आता !’ असे म्हणत निवांत बसायचा. तेवढ्यात दुसऱ्या कोणाचा फोन यायचा व पुन्हा हे असेच ! नुसती पितळी दाभणासारखी पीन टोचली की ती कोणत्याही माणसाचे बोलणे इकडून तिकडे पाठवते, कमाल आहे ! कोणी शोध लावला असेल बरं टेलिफोनचा ? आम्हाला फार म्हणजे फारच कौतुक वाटायचे, अगदी काहीच्या काहीच ! अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे नांव त्या वेळी शोधायला फार त्रास पडला.
खरं तर, त्यावेळी गांवात टेलिफोन फारच कमी होते. हा काळ्या रंगांची दहा छिद्र असलेली तबकडी असलेला, जड मजबूत फोन म्हणजे एक भारदस्तपण वाटायचे. आपले गांवातील प्रस्थ इतरांना दाखवण्यासाठी, टेलिफोन नंबर पण कामास यायचा. त्यामुळे गल्लीत, किंवा अगदी पलिकडच्या गल्लीत जरी फोन असला, तरी हा टेलिफोन नंबर, त्या गल्लीतील बऱ्याच जणांच्या, बाहेर गांवच्या नातेवाईकांकडे असायचा. मग कोणा एखाद्यासाठी बाहेरून फोन आल्यावर, ज्यांचा फोन आहे, त्यांना निरोप द्या किंवा जर घरगुती संबंध असले, तर तो निरोप ठेवून घ्यावा लागे, आणि त्याचेकडे कोणास तरी पाठवून निरोप द्यावा लागे. त्यावेळी बाहेरगांवासाठी फोन लावायचा, म्हणजे दिव्य असायचे. तो केव्हा लागेल, लागेल किंवा नाही, याचा नेम नसायचा. काही वेळा लगेच लागायचा, तर काही वेळा नाही. लवकर लागला नाही, तर मग ‘लाईन खराब आहे’ असा निरोप आपल्याला ‘टेलिफोन एक्सचेंजकडून’ मिळायचा. हे समजले की ‘मग, अर्जंट लावा’ असे सांगावे लागे. पण त्याचा देखील काही वेळा उपयोग होत नसे, मग ‘लाइटनिंग कॉल’ लावा असे सांगायचे. आपले नशीब चांगले असले तर लागायचा, बोलणं व्हायचं; नाहीतर शेवटी कंटाळून बुकींग रद्द करण्याचा पण निरोप द्यावा लागे. पण तसं बघीतलं तर त्यावेळी फोन करण्याएवढी तातडी कोणालाही अगदी अपवादानेच असायची. त्यामुळे लागला जरी नाही, तरी कोणाचे फार काही अडायचे नाही, दुसऱ्या दिवशी पण हा प्रयोग केला जायचा, मग लागायचा पण ! त्या जगन्नियंत्याला पण दया येत असावी, यांच्या वाट पहाण्याची. हे काहीही असले तरी पण या निमित्ताने ‘सरकारचा कारभार कसा ढिसाळ असून, त्याचं कसं काही खरं नाही’ ही टीका त्वेषाने करता यायची. सरकारला व सरकारी अधिकाऱ्यांना दोन शिव्या देता यायच्या. सरकार विरोधी पक्षाचे असेल तर दोनाच्या ऐवजी चार देता यायच्या, एवढाच काय तो फरक ! ‘हे पत्र म्हणजे तार समज आणि लगेच ये’ असं पोस्टकार्डात लिहीणारी मंडळी असलेल्या काळात, सर्वसामान्यांच्या आयुष्यांत फोनला काय महत्व असणार ? मुख्यत: फोन म्हणजे व्यापार करणाऱ्यांना लागायचे.
आमच्या टेलिफोन एक्सचेंजची क्षमता वाढली, पण त्याचवेळी प्रलंबित मागणीदारांची यादी बरीच मोठी असल्याने, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. जरा जास्त फोन दिसायला लागले एवढेच ! त्यावेळी सहजासहजी टेलिफोन मिळतच नसे. आम्हाला टेलिफोन हवा होता, तर त्यावेळी खासदार कोट्यातून घेतला होता. याचा त्यावेळी केवढा गवगवा, टेलिफोन एक्सचेंजला ?
गांवात काळाची पावले ओळखत, नंतर ‘एस् टी डी’ची सोय आली आणि बघताबघता क्रांती झाली. कोणत्याही गांवाला, जिथं ‘एस् टी डी’ची सोय आहे, तिथं नुसते ‘कर्रऽऽटक् कर्रऽऽटक्’ करत डायल केले की भराभर फोन लागू लागले. लगेच तिकडून ओळखीचा आवाज येवू लागला. बुकींग कंटाळून कॅन्सल करायची गरज नाही ! फोन करतोय आणि लगेच बोलतोय ? चमत्कारच हा ! तासनतास थांबल्यावर पण, शेवटी बुकींग केलेला फोन टेलिफोन एक्सचेंजला सांगून रद्द करण्याची सवय असलेल्यांना, हा म्हणजे आश्चर्याचा धक्काच होता. कोणीही गंमत म्हणून ‘जरा, फोन लागतोय का म्हणून पहातो’ म्हणत फोन लावायचा. तो नक्की लागायचा. ‘आॅं, लागली की लगेच’ म्हणत तो हवं ते बोलायचा आणि स्वाभाविकच त्याचे बील त्या फोनधारकाच्या खात्यात धरले जायचे. मात्र याचा परिणाम हा नंतर दिसला. काहींना हजारांत बिलं आलीत. ‘एस् टी डी’ चे काही खरं नाही, बीलं हजारात येतात’, ही बातमी गांवभर पसरली. ‘हे नविन झेंगट आलंय ‘एस् टी डी’चे फोन लागतात, पण पैसे किती घेताय ? आपण काही बोललो की नाही पहा, तर आलं बील ! सरकार पैसे उकळतंय पहा नुसतं !’ अर्थात ‘सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते पैसे उकळण्यासाठीच असते’ हे त्याचे म्हणणे खरेच होते. मात्र हे असे म्हणत, बऱ्याच मंडळींनी आपापले फोन उचलून कोणाला सहजी दिसणार नाही, अशा ठिकाणी ठेवले. त्यामुळे त्याचा परिणाम फोन करायच्या वेळी किंवा बाहेरून आल्यावर होणाऱ्या धडपडीत, फोन हातातून खाली पडून काही वेळा ते नादुरूस्त होवू लागले. यांवर तोडगा म्हणून मग, काहींनी त्या डायलवरील दोन छिद्रात बसेल असे छोटे फोनचे कुलूप आणले, आणि त्याची छोटी किल्ली बंदोबस्तात ठेवली. कोणी आले फोन करायला तर, ‘तू माझ्याकडून जेवून जा. त्या फोनला हात लावायचा नाही. भयानक बील येते. बीलापायी घरदार विकावं लागेल’ म्हणत फोन बाजूला घेवू लागले. यांवर ‘जगात काय याच्याकडेच फोन आहे ? अरे फोन आहे तर बोलायसाठी नाही, तर कशासाठी ? कुलूप लावताय ! कंजूष —— ****’ असे पण बोलले जायचे. फोनवाला काहीवेळा दुर्लक्ष करायचा तर काही वेळा मासलेवाईक बोलायचा.
काहींचे डायलचे फोन नव्हते, तर नवीन निघालेल्या बटनांचे फोन होते. त्यांना हे असे लॉक लावता येईना. संपूर्ण आकडे झाकणारी झडप निघाली. त्याला कुलूप लावता येत असे, पण मग पुन्हा कोणाच्यातरी भीडेखातर ते उघडावे लागे व त्यांना फोन करू द्यावा लागे. फोनधारकाची परिस्थिती ही फोन रक्षकाची झाली. समोरचा म्हणेल तेव्हा किल्लीने कुलूप उघडून त्याला फोन करू द्यायचा अन्यथा बोलाचाली, टोमणे, एकमेकांचा उद्धार ठरलेला !
यांवर पण मार्ग काढणे भाग होते. फोन तर मोकळा दिसायला हवा, मात्र लावता तर यायला नको. या द्विसूत्रीतून कोड नंबरने फोन लॉक करता येतो, ही माहिती मिळाली. मग या धोरणी फोनधारकांनी टेलिफोन एक्सचेंजकडून लॉक करण्यासाठी ‘कोड नंबर’ मागीतले. सवय नाही कोणाला, त्यामुळं ही तर मोठीच गोंधळाची पद्धत ! पण पैसे वाचवायचे म्हटल्यावर काय ईलाज ? याच्या गमतीजमती तर विचारू नका ! एकदा मी असाच एका ठिकाणी बसलो होतो. त्याचेकडे फोन होता, एस् टी डी होता. विचारले ‘कारे, एस् टी डी आल्याने सोय झाली पहा. तुझ्याकडे आहे का ?’ हे मी विचारल्यावर, होकार देत तो म्हणाला, ‘रिकामी डोकेदुखी लागली आहे. फोन लॉक करावा लागतो. कोड नंबर दाबून. काय सांगू ? इतका गुंता होतो, बटन दाबतांना की विचारू नको.’
मग पद्धत अशी सुरू झाली, की त्या कोड नंबरचा फोन लॉकसाठी उपयोग करत. यांत मुत्सद्दीपणा पण दिसे. समोर फोन मोकळा दिसायचा. कोणी लावायला आले, तर काही बोलायचे नाही. पाच-पंचवीस वेळा बटन दाबून तो कंटाळायचा, संतापायचा ! हे त्याच्या बटनावर जोर देण्याच्या आविर्भावातून लक्षात यायचे ! बटन फोनच्या आंत जातील, असा जोर लावला जायचा. फोनवाला शांतपणे बघायचा. शेवटी मग फोन लावणारा, फोन सरकावून ‘पहा तर जरा, लागत नाही ये.’ याला सर्व माहिती असायचे, मात्र हा पण मग थोडे नाटक करून ‘खराब झालाय वाटतं’ म्हणत आपली असमर्थता, खाली मान घालून ओशाळल्या स्वरांत व्यक्त करायचा. ‘त्याच्या @&@*#% @&*%# सरकारच्या ! तिसरा फोन आहे हा, खराब झालेला ! दोन ठिकाणी गेलो, तिथं पण @&**%# साले खराब ! म्हटलं इथं जावं, इथं चांगला असेल तर इथं पण *%#*@& तेच, तिच्या &@%#*# ! अरे, द्यायचे तर चांगले द्या. खराब झालेले देताय @&*#% वगैरे वगैरे’ म्हणत तो याच्याकडे संशयाने पहात ‘सालं, कोण लबाडी करतंय, काही समजत नाही’ असे बडबडत व त्यासोबत या फोनधारकाला टॉंन्ट मारत निघून जायचा.
हा फोन लॉक करणे म्हणजे काही सोपं नव्हतं ! त्यांनी सांगीतलेल्या नियमाप्रमाणेच विविध आकड्यांची बटने दाबावी लागत, तरच फोन लॉक होत असे. निर्जीव, यांत्रिक फोन तो त्याच्या मेकॅनिझमप्रमाणे चालणार, आपल्या मनाप्रमाणे थोडाच चालणार किंवा लॉक होणार ? लॉक करायचा की पहिले हा चार आकडी नंबर, त्या नंतर दोन आकडी हा नंबर, मग हा तीन आकडी नंबर वगैरे असे दाबून पहावे लागत. शेवटी हे नीट जमलं की नाही, याची खात्री व ताळा करून पहाण्यासाठी बाहेरगांवी ‘एस् टी डी’ फोन करून पहावा लागे. फोन लागला नाही, की समाधानाने सुस्कारा सोडत. हे नेहमीचे होऊन बसले. तो एक चाळाच लागला.
प्रत्येकवेळी तुमच्या आयुष्यात सुखसमाधानच असते असं नाही. एखादा दिवस अडचणीचा पण येतो. यांत मग एकादे वेळी असा योग येई, की हे लॉक करण्याचे सव्यापसव्य होते न होते तोच, घरातून गृहमंत्र्यांचा निरोप येई की, ‘त्यांच्या चुलतमावशीच्या जावेच्या जावयाकडे फोन आहे, कुठं अहमदाबादला असतो. त्यांच्याकडे चारचार फोन आहेत म्हणे. ‘तुमच्याकडे एस् टी डी फोन नाही ना, त्यामुळे फोन करता येत नाही.’ असं नेहमी म्हणतो. त्याला लावा जरा, आपल्या इथं पण आलीय एस् टी डी ! समजू द्या जरा ! शिष्ट कुठला ?’ शेवटचे ‘शिष्ट’ हे कसल्याही व कोणाच्याही अध्यातमध्यात नसलेल्या, त्या कोणीही न बघीतलेल्या, अहमदाबादच्या जावायाला उद्देशून ! यांवर ‘दिवसा कुठं फोन करतेय अहमदाबादला. बील जास्त येईल.’ इतकं म्हणायचा अवकाश, ‘मी पहिल्यांदा सांगतेय फोन करायला, अगदी पहिल्यांदा ! आतापर्यंत एस् टी डी होती का ? तुम्हाला काय ? इथं एस् टी डी नसल्याने, चारचौघात मान खाली घालावी लागते. आता जरा कुठं संधी आहे, नाक ठेचण्याची, तर घरातूनच फितूर !’ ही अशी सरबत्ती झाल्यावर, काय करणार ? यांवर कुठं अपीलाची सोय नसल्याने, नुकताच समाधानाने सोडलेला सुस्कारा वापस घेत, बिचाऱ्याला पुन्हा तिथं अहमदाबादला फोन करण्यासाठी बटन दाबायला सुरूवात करावी लागे. मग या संतापासंतापात फोनचे ते कोड नंबर उलटसुलट होवून जात आणि तोपर्यंत सुतासारखा सरळ चालणारा फोन लॉक होवून जाई. नंतर कुठलेही, नंबर कसेही फिरवले तरी कुठेही फोन लागत नसे. ‘फोन बंद पडला’ या आपल्या सांगण्यावर, ‘माझ्याच वेळी बरे बंद पडतात फोन ! शेजारीपाजारी येवून फुकटात फोन करतात, ते बरं चालते तुम्हाला !’ असा शेरा मारत फणकाऱ्याने आंत जाणे होई. चारचौघात या फोनमुळे पुरुषांवर मान खाली घालण्याची अशी वेळ येई.
यांवर उपाय म्हणून निघाले ‘एस् टी डी बूथ’ ! दूरसंचार विभागाने सार्वजनिक वापरासाठी फोन, पण खाजगी व्यक्तीकडे असायचा, त्याबद्दल सेवा म्हणून काही रक्कम प्रत्येक कॉलमागे मिळायची व कदाचित कमिशन पण मिळायचे, अशी पद्धत काढली. यासाठी एखादी छोटी टपरी किंवा खोली असली की पुरे झालं ! रोडलगत असेल तर उत्तमच ! टेलिफोन एक्सचेंजमधे ‘एस् टी डी बूथ कनेक्शन’ साठी अर्ज करायचा. आतून बाहेरूनपण तो मिळण्यासाठी ‘वेगळी न दिसणारी लाईन’ काही वेळा टाकावी लागे. बेरोजगार दाखला, अपंगत्वाचा दाखला आणि कसलेकसले दाखले त्यावेळेस ‘एस् टी डी बूथ’ मिळावा म्हणून काढले जात. प्रत्येकालाच आपण काहीतरी बसल्याबसल्या कमवावे, हे वाटणे अगदी स्वाभाविकच होते. हा असा कसातरी हायउपस करत, लागेबांधे लावत, टेलिफोन मिळवायचा, अर्थात नियमाप्रमाणे पण मिळत असे, नाही असे नाही. नियमाप्रमाणे काही झाले तर त्याची चर्चा किंवा गवगवा जास्त होत नाही. ज्या गोष्टी गुपचूप ठेवायच्या असतात, त्याचीच उत्सुकता जास्त असते, म्हणून चर्चा जास्त होते. आणि सरतेशेवटी फोन मिळाल्यावर मग ‘एस् टी डी बूथ’ सुरू करायचा. फोनचे लोकांकडून बील वसूल कसे करायचे, या करण्याच्या हिशोबासाठी, बिलींग मशीन आणायचे आणि बस ! गिऱ्हाईकांची वाट बघायची ! ही सर्व गंमत नविनच असल्याने, प्रत्येकालाच बाहेरगांवी फोन करणे आवश्यक असल्याची आठवण यायची. त्यामुळे गिऱ्हाईक भरपूर ! ज्यांच्याकडे एस् टी डी नसेल पण फोन असेल यांना मग काहीतरी व्यवस्था करून घरातून बाहेर न पडता, त्याच्या घरच्याच फोनवरून एस् टी डी वरून बोलता यायचे.
बिलींग मशीनवरून आलेल्या बीलाच्या वैधतेबद्दल पण शंका उपस्थित केली जायची. काही बोलणे होवो किंवा न होवो, तुम्हाला तिकडून आवाज येवो किंवा न येवो, तुम्ही ज्यांना फोन लावला, त्याने तिकडून फोन उचलला की भरकन, इंडिकेटरवरचे लाल प्रकाशातील दिव्याने चमकणारे आकडे बिलाची रक्कम दाखवू लागत. बोलणे नीट सुरू असेल तर प्रश्न नाही. याने फोन ठेवल्यावरच ‘टर्रर्रऽऽऽ टक्क’ करून बील यायचं ! मात्र तिकडून फोन उचलला गेला आहे, याला इकडे काही ऐकू येत नाही. हा हॅलो हॅलो करतोय, तिकडील ऐकू येत नाही. शेवटी याचे हे ‘हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽऽ हॅलोऽऽऽऽऽऽऽऽ’ इतक्या मोठ्या आवाजात होते की ते एस् टी डी बूथच्या केवळ बाहेरच ऐकू येत नाही तर थेट पलिकडच्या फोनवर बोलणाऱ्याला पण ऐकू येत असेल, अशी खात्री पटते. या गडबडीत त्याने फोन ठेवला की लगेच टर्रर्रऽऽऽ टक्क’ करून बील आलेच ! हे बील त्याचे समोर दाखवल्यावर एस् टी डी बूथधारक व हा गिऱ्हाईक यांच्यात जी जुगलबंदी होते, त्यांत कोणाकोणाचा उद्धार होत नसे ? सरकारचा उद्धार हा तर आवश्यक असे, पण काही वेळा समोरचा मुद्दाम बोलत नसावा अशी शंका आली तर त्याचा पण होत असे.
एस् टी डी फोन करायचा असेल तर त्याचे दिवसा वेगळे दर, रात्री वेगळे दर, पहाटे वेगळे दर ! ज्यावेळी कमी दर असत त्याचवेळी एस् टी डी बूथवर गर्दी जास्त होणे, हे स्वाभाविक ! एकाचे बोलणे झाल्याशिवाय दुसऱ्याला बोलता येत नसे. तिथं पण नंबर लावा. दिवसा पूर्ण दर तर रात्री नऊनंतर निम्मा व रात्री अकरानंतर पहाटे सहापर्यंत पाव दर असायचा ! ज्यांना थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील, पण लवकर बोलता आलं पाहीजे असं वाटायचे ते नऊ ते अकरा दरम्यान येत. ज्यांना पैसे वाचवणे आणि जास्त बोलणे असे दोन्ही डाव साधायचे असत, अशी धोरणी, मुत्सद्दी व हुशार मंडळी रात्री अकरा नंतर येत !
येथे हिवाळयात चहावाल्याची टपरी आणि उन्हाळयात आईस्क्रीम, लस्सीवाल्याची गाडी हमखास टेलिफोन बूथच्या आसपास लागलेली असे. त्याला पण या टेलिफोन गिऱ्हाईकांच्या गर्दीमुळे दोन पैसे मिळत. कारण येथे गांवातीलच मंडळी असल्याने, रिकाम्या गप्पा पण बऱ्याच होत. चहापाणी, पानगुटखा वगैरे होई. त्यातून काही नवीन माहिती समजल्याने पण, बाहेरगांवी फोन करावा लागे. पुन्हा दुसऱ्या दिवशी भेटीचा कार्यक्रम पक्का होई.
दूरसंचार विभागाने केलेल्या दरम्यानच्या आश्चर्यकारक प्रगतीने आणि खेडोपाडी झालेल्या फोनच्या सहज उपलब्धतेने सर्वदूरच फोनची संख्या बऱ्यापैकी वाढली. खूप घरांमधून फोन दिसू लागले. दरम्यान एस् टी डी बूथ मिळविणे पूर्वी जे कठीण होते, ते विशेष कठीण राहीले नाही. एस् टी डी बूथ पण उदंड झाले, मात्र गिऱ्हाईकच कमी झाले. स्वाभाविक परिणाम हे न परवडणारे व्यवसाय होवू लागले. त्यात कडी केली ती मोबाईलने, आणि मग ‘एस् टी डी बूथ’ चालवणे ही कल्पना अत्यवस्थच झाली. टेलिफोन पण हळूहळू परत करू लागले. बस, खिशात छोटा मोबाईल ठेवला की झाले ! फोन करायचा असेल तर तुमच्या खिशातच फोन असल्याने बूथवर कोण आणि का जाणार ? शेवटी हळूहळू ‘एस् टी डी बूथ’ या कल्पनेने राम म्हटला ! आज कुठं बघायला पण मिळतील की नाही शंकाच आहे !


२९. ५. २०१८

‘कॉमन खेळाडू’

‘कॉमन खेळाडू’ 

सत्ता हवी असल्याने सर्व राजकीय पक्ष अस्तित्वात असतात. ते सर्व एकमेकासारखेच असतात. काही वेळा एक जिंकतो तर काही वेळा दुसरा ! जो जिंकला असतो, त्या पक्षात हरलेल्या पक्षातील मंडळींची जाण्याची लगबग सुरू असते.
मला लहानपणची एक गोष्ट आठवली. क्रिकेट मॅच खेळायची असायची. निदान ११+११+१ = २३ जण हवेत. दोन संघांचे बाबीस आणि एक पंच, असे तेवीस ! पण इतकी तर मुलं नसायची. काही वेळा पंधरा, काही वेळा बारा तर काही वेळा अठरा ! याच्यावर काही संख्या जायची नाही. मग अशावेळी आम्हाला ‘कॉमन खेळाडू’ ठरवावे लागत. हे दोन्हीकडून बॅटींग करत. बॅटींग नसेल तर मग बाकी वेळ फिल्डिंग ! तशी ही काही ‘कॉमन खेळाडू’ असलेली मंडळी आहेत. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, ही भोवती दिसतातच ! ही खेळतच असतात, दोन्हीकडून ! काय करणार ? बिचाऱ्यांची लहानपणापासूनची सवय !
आता Praveen Bardapurkar यांचा ‘निर्लज्जम् सत्ता सुखी’ हा लेख वाचला, अन् हे सुचलं !

२८.५. २०१८

औरंगाबादची दंगल

औरंगाबादची दंगल 

औरंगाबादची नुकतीच झालेली व दंगल म्हटली गेलेली घटना बघीतली, तर यांमागची कारणं शोधायला हवी वगैरे ठरलेली पोपटपंची करणे हे आपल्या नित्याचे आहे की ज्यांचा फारसा उपयोग नाही. तात्कालिक कारण कोणतेही असो, ते अजिबात महत्वाचे नसते.
आपल्या काहीही मनाविरूद्ध झाले, तर या विचाराची मंडळी व त्यांचे अनुयायी हे असेच वागणार असतात, आणि आजवरचा इतिहास व अनुभव हेच सांगतो. यांवर ‘विश्वामित्री पवित्रा’ कोणीही घेवू नये. त्यामुळे उपाय सापडत नाही आणि प्रत्येक वेळी याची वेगवेगळी कारणे पुढे येतात. विशेष आश्चर्य हे की अशी कृती करणारी माणसं आणि त्यांचे अनुयायी तेच असतात. सबब वरवर दिसणारे किंवा सांगीतले जाणारे, या घटनेचे कारण हे खरेखुरे कारण नसून, ही असा विचार करणारी माणसं कारण आहेत. यांनी अशी काही कृत्ये केलीत की त्यांवर स्वसंरक्षण ही प्रतिक्षिप्त क्रिया किंवा अपवादाने आक्रमण ही क्रिया समोरच्याकडून होणार आणि मग आपले सरकार त्यांना पकडून, त्यांच्यावर केसेस भरणार. मात्र ही अशी सुरूवात करणाऱ्यांवर लुटूपुटूच्या केसेस करणार की ज्यांवर सर्वजण हसतील. हे काहीही उपयोगाचे नाही. यांवर म्हणजे, दोन्हींवर उपाय शोधायला हवा.
आपला समाज, समाजशासक जोपर्यंत मतलबी अर्धसत्याचा किंबहुना असत्याचा त्याग करून निर्वेध त्रिकालाबाधीत वस्तुस्थितीवर आधारीत सत्य स्विकारत नाहीत, तर त्याऐवजी आपण स्विकारलेल्या मतलबी अर्धसत्याचे गुणगान गात तेच खरे असल्याचे सांगत असतील, तर परिणाम हेच होणार !
यांवरील कारणांची कठोर व तर्कशुद्ध मीमांसा करून त्याची काटेकोर अंमलबजावणी जोपावेतो करत नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.
(काल Praveen Bardapurkar यांची पोस्ट वाचली, आणि हे जाणवलं)

१९. ५. २०१८

उन्हाळ्यातील हवाहवासा गोड गारवा - आईस्क्रीम

उन्हाळ्यातील हवाहवासा गोड गारवा - आईस्क्रीम
आता तर इतकं काही सोपं झालंय, की जरा मनाला वाटलं की आईस्क्रीम खावे, तर मग सरळ उठावं आणि त्या दुकानांत जावं. आपल्याला हवा असलेला आईस्क्रीमचा नमुना आहे का, हे त्या वरचे झाकण काचेचे असलेल्या फ्रीजमधे पहावे. त्यातून दिसणारे प्रकार काही पसंत पडलं नाही, असं आपल्या चेहऱ्यावर दिसलं, की मग तिथला माणूस वेगवेगळ्या आईस्क्रीमच्या प्रकारच्या तेथे असलेल्या यादीचा रंगीत, लॅमिनेशन केलेला जाड कागद आपल्या हातात देतो. मग त्यात पाहून एखादा पाहून प्रकार घ्यावा. आईस्क्रीमच्या दुकानाचे एक बरं असते, की तिथून माणूस काहीही न घेता, खाली हाताने, परत जात नाही. कोणत्यातरी प्रकारचे आईस्क्रीम घेतोच. आईस्क्रीम घेणे हे महत्वाचे असते, त्याचा प्रकार हा दुय्यम असतो. आईस्क्रीम कोणत्या कंपनीचे आहे, म्हणजे अमूल, वाडीलाल, दिनशॉ वगैरे असले तरी चालते. काही वेळा जरा मोठे गांव असले तर नॅचरल्सचे पण आईस्क्रीम असते. खरंय, फार सोपं झालंय, हव्या त्या कंपनीचं आईस्क्रीम घेणं !
एकवेळ होती, आईस्क्रीम मिळणे म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ ! कंपन्यांची लेबले असलेली आईस्क्रीम तर देवाचे नांव घ्या. कसंतरी ऊसाच्या रसासोबत रसवंतीतून आईस्क्रीमचा एखादा छोटा स्कूप मिळायचा किंवा ‘मलाऽऽय कोऽल्फी’ची चव घेत आईस्क्रीमचा अंदाज करायचा. एकदा असाच विषय निघाला, तिथं पक्षकार होता, त्यानं ऐकलं आणि त्याने‘आईस्क्रीम पॉट’ मला पाठवून दिला. आईस्क्रीम कसे करायचे ते सांगीतले.
मला सर्व काही पदार्थ करता येतात ही माझी प्रामाणिक धारणा, तर ‘यांनी कधी नांव तरी ऐकलं होतं का, आणि करायला निघाले आहेत ‘ ही माझ्याबद्दल, माझ्या सौभाग्यवतीची धारणा ! बरं गंमत ही, की ती सर्वच आसपासचे, शेजारीपाजारी, पैपाहुणे, नातेवाईक यांचे मनापासून व भरपूर करत असल्याने, तिची बाजू नेहमीच माझ्यापेक्षा भारी असते. मी नेहमी अल्पमतात आणि त्यामुळे माझी बोळवण, ‘पण घरून विरोध तर नाही ना ?’ एवढ्यावरच होते. पण एकदा मी काय करू शकतो, ते दाखवणारा प्रसंग आलाच !
उन्हाळ्याचे दिवस, ते पण जळगांव जिल्ह्यातील ! उन्ह मी म्हणतंय ! रणरणतं उन्ह ! अन् घरी ही पाहुणे मंडळी व त्यांची मुलंबाळं ! आईस्क्रीम पॉट मिळाल्याने, आईस्क्रीम करायला हवं, ही सर्वांचीच इच्छा होती. आईस्क्रीम करायचे तर उत्तम दूध, साखर, सुका मेवा, कस्टर्ड पावडर हे लागणारच ! मॅंगो आईस्क्रीम करायचे तर आंबे हवेत. सोबत बर्फ व मीठ देखील लागणार ! घरी पाहुणे मंडळी आलेली, हे एका पक्षकाराने बघीतले. तो बर्फाचा व्यापाऱी होता. ‘उन्हाळा आहे, आईस्क्रीम करा. मी बर्फ पाठवतो.’ हे सांगत दुसऱ्या दिवशी सकाळी ही भलीमोठी बर्फाची लादी त्याने घरी पाठवून दिली. आता घरी एवढी मोठी बर्फाची लादी आलेली पाहिल्यावर, बाळगोपाळ मंडळी तर अगदी उत्साहाने नाचत होती. आजपावेतो बर्फाचा गोळा किसून त्यांवर रंग घालून चघळता येईल, एवढाच बर्फ हातात घेतल्याचा अनुभव ! आणि आता त्यांवर झोपतां येईल, एवढी मोठी ती लादी होती. त्यामुळे बाथरूममध्ये बर्फाची लादी नीट सुरक्षीत आहे की नाही, हे पहायला जात होती. हात लावून बघत होती, खात्री करून घेत होती. सराट्याने एखादा तुकडा तोडतां येतो का, हे पहात होती. इतकी तयारी सुरू झाल्यावर, मग इलाज नव्हताच, आइसक्रीम पॉट हा स्वच्छ धुवून पाण्याच्या हौदात टाकला. त्याचे लाकूड पाण्यात राहून फुगल्याने, दोन लाकडी रिफांमधील भेगा जवळपास बुजतात, मग त्यातून बर्फ वितळून बाहेर येत नाही, तर ते सर्व आंतच रहाते, परिणामी भांड्यात जास्त वेळ थंडावा रहातो.
मग आता संध्याकाळी घरी आईस्क्रीम तयार करायचे ठरवून, लगेच सकाळीच बाजारात गेलो. दूध व आंबेच जास्तीचे आणावे लागले. तसेच खडे मीठ पण मुद्दाम आणावे लागले. शाळेत शिकलेले शास्त्रीय ज्ञान की बर्फ व मीठ यांचे मिश्रण केले की तपमान हे -१८ पर्यंत खाली येते. याचा अनुभव घ्यायची वेळ आली. बाथरूममध्ये ती भलीमोठी बर्फाची लादी, तागाच्या पोत्यात गुंडाळून ठेवली होती. बर्फ जास्त विरघळून जावू नये म्हणून ! पूर्वी बर्फ हा लाकडाच्या भुशात ठेवायचे. मात्र लाकूड कमी झाले, गांवातील लाकडाच्या वखारी कमी झाल्या व सहज मिळणारा लाकडाचा भुसा पण कमी झाला.
बाळगोपाळ व पाहुणे मंडळी म्हणजे माझी भाचेमंडळी व बहीण, मावस बहिणी व मावशी आणि घरची सर्व कंपनी ! चिल्लर कंपनीची जेवणं दुपारची कशीबशी झाली. नंतर थोड्याथोड्या वेळाने पाण्याच्या हौदात डोकावून आइसक्रीम पॉट किती फुगला हे पहाण्यास चिल्लर कंपू धावत होता, तर ‘अरे, उन्ह काय पडलंय ? त्या उन्हात हौदात डोकावून पाहू नका, तोल जाईल, उन्ह लागेल रे !’ हे घरातील प्रत्येक जण ओरडून सांगत होते. तिकडून हाकललं तर बाथरूममधे बर्फ फोडायला सराटा व बत्ता घेऊन जाणार ! शांत बसणे किंवा असे काहीही ऐकण्याच्या कोणीही मनस्थितीत नव्हते. शेवटी बऱ्याच वेळाने चार-साडेचार वाजले, उन्ह जरा उतरल्यासारखी वाटली. मी व घरातील मंडळी पण सारख्या हाका मारून, मुलांना आवरून कंटाळून गेली होती. शेवटी मग हौदाजवळ गेलो, पाण्याच्या हौदातून दोरीने ओढून आइसक्रीम पॉट वर काढला व बाथरूममध्ये आणला. त्यावेळी मागेपुढे हा लवाजमा होताच. तोवर एकाने खडे मीठाची पिशवी तेथे आणून ठेवली होती. दुपारीच स्वयंपाक, जेवणखाण व भांडीकुंडी आवरल्यावर, सौभाग्यवतीने भल्या मोठ्या पातेल्यात दूध तापवून ठेवले होते. सुकामेवा बारीक करून ठेवला होता. आइसक्रीमचे भांडे अगदी चक्क घासून ठेवले होते.
मी बाथरूम मधे सराट्याने बर्फ फोडायला सुरूवात केली. आइसक्रीम पॉटमधे ते आइसक्रीम तयार करण्याचे भांडे ठेवले. लोखंडी सराट्याने बर्फाची लादी फोडून, मोठ्या तुकड्यांचा चुरा करून पॉटमधे टाकायचा व वरून त्यांवर मूठमूठ खडे मीठ भुरभुरायचे ! धातूच्या भांड्याच्या आसपास जवळपास बर्फ व मीठ भरत आल्यावर, दूध त्या भांड्यात टाकले. छोट्या पातेलीत आइसक्रीमचा मसाला एकत्र करून ते मिश्रण मग त्या दुधात टाकले. झाकण लावले व मग ते आइसक्रीम पॉटचे हॅंडल फिरवायला सुरूवात केली. त्या पॉटभोवती बाळगोपाळ उकिडवे बसून, डोकावून पहात होते. आईस्क्रीम होते म्हणजे नेमके काय होते ? त्या उत्सुकतेपोटी प्रत्येकालाच ते हॅंडल फिरवून आइसक्रीम तयार करण्याची इच्छा होती. सुरूवातीला भांड्यातील आतले दूध पातळ असल्याने पॉटचे हॅंडल सहज फिरत होते. प्रत्येकाने दहा-दहा वेळा हॅंडल फिरवायचे हे ठरले. हॅंडल फिरवणारी मंडळी तीन ते आठ वर्षे वयातील होती. मोजतांना कोणीही जास्त वेळा फिरवू नये यासाठी मी आकडे मोजत होतो व माझ्यावर हे लक्ष ठेवून होते. तरी कोणीतरी जास्तवेळा हॅंडल फिरवल्याचा सूर निघायचा. थोड्या वेळाने ते कंटाळल्यासारखे झाले, लहान मुलांचा उत्साह खूप असला तरी त्यांचा जीव तो काय ? ‘बराच वेळ फिरवून झाले, तयार झाले असेल आता. आपण खाऊ या.’ म्हणत सर्व बाळगोपाळ ते भांडे उघडा म्हणून घाई करायला लागली. एका दोघांनी वाटी-चमचा पण आणला, लवकर मिळावे म्हणून ! शेवटी सांगावे लागले, ‘तुम्हाला व मला हे हॅंडल फिरवता आले नाही, की मग आईसक्रीम तयार झाले.’ ते आईस्क्रीम झालेले नव्हतेच, हॅंडल फिरवणे सोपे होते. मी नंतर फिरवायला लागल्यावर थोडेथोडे जड लागू लागले. शेवटी अशी वेळ आली की आता कोणाकडूनही हॅंडल फिरणे जड जावू लागले. त्याबरोबर सर्वांनी स्वयंपाकघरात धाव घेतली. वाटी चमचा किंवा हाती जे मिळेल ते भांडे आणले.
सौ. ने सर्व खाण्याची तयारी जय्यत करून ठेवली होतीच ! अगदी श्रीखंडासारखे भरगच्च डावाने वाढणे सुरू झाले. कसलीही हयगय नव्हती. दोन तीन डिशेश या प्रमाणात कशाबशा खाल्ल्यात आणि बाळगोपाळ मंडळी मग ढेकर द्यायला लागली. पोट भरले. ‘दुकानापेक्षा पण छान लागते आहे.’ मावशी तर सारखे म्हणत होती. अशा वातावरणांत व गप्पांमधे आईस्क्रीम खाण्याचा योग कोणाकडे नेहमी येतो थोडाच ? ‘आईस्क्रीम पॉट भाड्याने कसे मिळते ? हे घरी कोण विकत घेणार ? गरज काय त्याची ? ही सर्व मोठ्या माणसांची कशी लक्षणे आहेत ? पण काही म्हण अगदी पोटभर झाले’, म्हणत होतो व खात होतो. जीभ थंडगार झाल्याने बोलणे जड जात होते, बोबडे बोल येत होते. सर्वांचे पण तुडुंब पोट भरले, आम्ही किती खाल्ले हे मोजत नव्हतोच ! त्यामुळे पोट भरल्यावरच समजले. नंतरही काही वेळा आईस्क्रीम केले. बाळगोपाळ मंडळी व पाहुणे रावळे असले की उन्हाळयात या अशा केलेल्या आईस्क्रीमचा गारवा हवाहवासा व जास्त जाणवतो. अगदी आजपर्यंत !

No automatic alt text available.

१६. ५. २०१८

बंद झालेले व्यवसाय - भाड्याची सायकल

बंद झालेले व्यवसाय - भाड्याची सायकल
‘देवाने मला हे मजबूत दोन पाय दिलेले आहेत, तुझ्या तकलादू गाडीचा माज दाखवू नको. आता पण उठलो अन् चालायला लागलो तर, बोलबोलता पाच कोस सहज चालून जाईन.’ हे बोलणारा दिसायला मजबूत असायचा किंवा नसायचा पण ! मात्र त्याचा मजबूत आवाजच सांगायचा, की हा खरंच आता चालायला लागला, तर पाच कोस सहज चालून जाईल. ही वाक्ये आम्ही ऐकताऐकता लहानाचे मोठे झालो. जसजसे लहानपण सरत होतं, वयाने मोठे होत होतो, तशी ही वाक्य दमदारपणे म्हणणारी माणसं पण कमीकमी होत गेली. आता तर कोपऱ्यावर जरी जायचं असले, तरी पायी जाणे शक्य नसते, तेथे जायला आम्हाला कोणतेतरी वाहन लागते. स्वत:चे नसले तर भाड्याचे, रिक्षा, टॅक्सी वा कोणाची तात्पुरती गाडी लागते.
पायी चालणं हे नैसर्गिक असल्याने यांत लाजिरवाणे काही नाही. तसा समज पण कोणाचा नव्हता, तर उलट पायी चालणे हे सर्वमान्य होते. फारच झालं तर काही जण यासाठी बैलगाडी, सायकलचा उपयोग करत. त्यातल्या त्यात, एखाद्यास आसपासच जायचं असेल, तसेच लवकर जायचं असेल व पायी जाण्यापेक्षा बऱ्याच वेळा सायकलवर जावं लागायचं. जास्त माणसं असली तर मग बैलगाडी हवीच ! तशी सायकलपण सर्रास सर्वांकडे नसायची. त्यामुळे आपली लाख इच्छा असो, सायकलवर जाता येत नसे, कारण आपल्याजवळ सायकल असेल तरच जाता यायचे. अशा वेळी, एकतर उधार उसनवार अशी कोणाची तरी सायकल घ्यायची, किंवा मग सायकलच्या दुकानातून भाड्याने सायकल घ्यायची, हे दोन मार्ग उपलब्ध असत.
माझ्या घराच्या मागच्या बाजूला बऱ्यापैकी मोकळी जागा होती, त्याला नाल्याचा भाग म्हणत ! त्या खालून गांवाचा नाला गेलेला आहे. गांवातील सार्वजनिक सभा घेण्याची ठिकाणे ठरलेली असत. बैठक किंवा थड्यावरील मोकळ्या जागेत, गांधी चौकात, नाहीतर गांवाच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘नाल्यावर’ ! आसपासची गांवे येणार असतील तर मग थोडी गांवाबाहेरची जागा म्हणजे, देवघरवाल्यांची ‘रामबाग’ !
येथे नाल्यावर बऱ्यापैकी मोकळी जागा असल्याने, बाळगोपाळ मंडळी घाईगर्दीत सायकल चालवू शकत. जवळच बैठक व थडा हा भाग असल्याने, नाल्यावरून त्या भागांत सायकल चालवत नेणे सोपे असे. तेथे नाल्यावर एकाचे सायकल भाड्याने देण्याचे दुकान होते, त्याचा मालक गुरव ! गावांत अजून एक लोहार स्टोअर्सशेजारी दुकान होते, त्या दुकान मालकांना पेंटर म्हणून ओळखले जाई. त्यांच्याकडे भाड्याने सायकलीच नाही, तर लग्न मिरवणूकीत, सभा किंवा कार्यक्रम असल्यास लागणाऱ्या गॅसबत्त्या पण भाड्याने मिळत.
त्यावेळी जरा वेळ मिळाला, हातात चार-आठ आणे असले, की काहींना सायकल शिकायची फार हौस येई. स्वत:ची सायकल असली तर प्रश्नच नसे, मात्र स्वत:ची सायकल घेवू शकणारी फार मंडळी नव्हती त्यावेळी ! मग मार्ग काय, तर नाल्यावर सायकली भाड्याने देणाऱ्या दुकानात जायचे. भाड्याने सायकली घेवून आपले काम करून घेणे, यांत कोणीही, कसलाही कमीपणा मानत नसत. शहरात गेल्यावर अगदी मालदार मंडळी पण, भाड्याची सायकल घेवून दोन-चार कामे उरकून टाकत.
सायकली या लहान मुलांच्या व मोठे माणसांच्या, अशा दोन प्रकारच्या सायकली असत. मात्र या नाल्यावरच्या दुकानात जास्त गर्दी लहान मुलांचीच ! लहान सायकलचे भाडे म्हणजे, सुरूवातीला दहा पैसे ते नंतर वाढत चार आणे तासाला झाले. ही अशी वाढत जाणारी महागाई मी बघीतलेली आहे. ही सायकल कशी असायची, हे बघीतले, तर दुकानदार ग्राहकाची किती काळजी आपल्या काटकसरीपायी घ्यायचा, हे दिसेल. या सायकलला मागे बसण्यासाठी व सायकल उभी करता येण्यासाठी स्टॅंड नसायचे. सायकल चालवतांना, पुढे चालणाऱ्यास, आपल्या मागून सायकल येते आहे, ही सूचना मिळावी, यासाठी पण सायकलला घंटा नसायची. ब्रेक पण यथातथाच, कारण सायकलची कंडीशन दुकानदाराने कितीही व्यवस्थित ठेवली, तरी ही अशी आणि इतकी मंडळी, अशा पद्धतीने सायकल वापरणारी असल्यावर तिची कंडीशन, काय आणि कशी रहाणार ? तसेच किती दिवस ठीक रहाणार, याचा अंदाज येवू शकतो. सायकल भाड्याने घेतल्यावर निदान ती किंवा त्यावरील स्वार दोन-तीन वेळा रस्त्यावर पडल्याशिवाय, ती परत केली जात नसे.
सुरक्षित सायकल चालवता यावी, तर मग सर्व भर चालविणाऱ्याच्या आरड्याओरड्यावर ! या वेळी चालवणारा जसा हाका द्यायचा, तसेच ही सायकल धरून, त्या सायकलच्या मागे, त्याला सायकल शिकवणारे किंवा याच्यानंतर याच सायकलवर लगेच सायकल शिकणारे, यांच्या पण हाका, त्यांत असायच्या. काही वेळा दोनापेक्षा जास्त जण जर सायकल शिकण्याची अपेक्षा धरत असतील, तर त्याला छोट्या वरातीचे स्वरूप यायचे ! मग हा एक नवरदेव सायकलवर बसलेला आणि मागून हीऽऽऽ वरातीतील सर्व मंडळी हाकारे देत पळत आहे. त्यामुळे सायकलपुढे चालणाऱ्याला, आपल्या मागून हे आवाज करणारे, काय भलमोठं येतं आहे, याचा अंदाजच यायचा नाही. तो घाईघाईने रस्त्याच्या कडेला सरकायचा, तेवढ्यात इतक्या बाळगोपाळांमधील एक तरी त्याच्या अंगावर बेसावधपणे यायचा, आणि दोघे रस्त्याच्या कडेला गटारीत घसरायचे. गटारीत पाणी नसायचेच, नुसतीच घसरगुंडी ! हा उठेपर्यंत त्या बाळगोपाळांना वेळ कुठं असायचा ? त्यांची वरात आरडाओरड करत केव्हाच पुढे निघून गेली असायची. ‘पोट्टे, **डीचे बेफाम सायकली चालवतात ! सरळ चालणं कठीण झालंय !’ असे काहीबाही बोलत हा पण चालायला लागायचा. त्याच्या हातातलं काही सामानसुमान पडून नुकसान झालं किंवा समाजातील जरा ‘प्रतिष्ठीत’ व्यक्तीवर जर हा प्रसंग आला, तर ‘शिव्यांच्या प्रयोगाचे’ दोन अंक जास्त व्हायचे, यापेक्षा जास्त काही नाही. ज्यांच्यामुळे हे प्रयोग व्हायचे, ते निर्विकारपणे पसार झालेले असायचे. शेवटी रस्त्यावरचा, एरवी कधीही पैसे घेतल्याशिवाय काहीही न देणारा दुकानदार, हा ‘जावू द्या, पडले तर पडले ! पोरं हाय ती ! ती खेळणार नाय, तर मग कोण खेळणार ?’ असा मोफत सल्ला याला द्यायचा. हे ऐकल्यावर त्याची तोपावेतो, कसलीही आग करत नसलेली जखम, आग करायला लागायची.
आपण सायकलवर बसलो, म्हणजे सायकल आपोआप चालत नाही, तर ती आपल्याला चालवावी लागते. ती चालवता यावी असे वाटत असेल, तर पहिले ती सायकल शिकावी लागते. चालवतांना तोल सांभाळावा लागतो. आम्हा बाळगोपाळ मंडळीत सायकल शिकणे हा पैसेवाल्याचा खेळ मानला जायचा. सायकल भाड्याने घ्यायची तर पैसे लागायचे, तासाप्रमाणे ! सायकल शिकवायला, ज्यांना सायकल चालवता येते हे जसे तयार असायचे, त्यापेक्षा जास्त उत्साह हा, ज्यांना सायकल चालवता येत नाही, त्यांचा शिकवण्याबद्दल असायचा. ‘तू फक्त सायकलवर बैस आणि पायडल मारत रहा. सायकल आपोआप पुढे जाते.’ इतकं त्यांचे साधसोपं शिकवणं असायचे ! हा शिकणारा पण सुरूवातीला तसाच करायचा. त्याची मोठी अडचण व्हायची, ती सायकल चालवता चालवता पायडलवरून पाय निघाला, की मग ते पायडल पायाला लवकर सापडायचं नाही. पोटरीला, पायाला फाडकन् लागायचं पण पायाला मात्र सापडायचं नाही. पायडल कुठं आहे, हे शोधायला खाली बघावं, तर लगेच सूचना असे, ‘समोर बघ, खाली बघू नको.’ या सगळ्या गदारोळात समोरून कोणी आलं किंवा वळण आलं तर मोठीच पंचाईत ! पायाला पायडल जरी सापडत नसले तरी, त्याची उणीव ही सायकल शिकवणारे सायकल ताकदीने लोटून भरून काढायचे. त्यामुळे चालवणारा पायडल मारत जरी नसला, तरी त्याने फार काही बिघडायचे नाही, ही सायकल पुढे जातच असायची ! शेवटी सायकलवर बसणाराच ब्रेक शोधायचा व खच्चून दाबायचा. त्याबरोबर, मागे मडगार्डपाशी असलेले एकदम हॅंडलपाशी येत. काही वेळा चालवणारा भूमातेला साष्टांग नमस्कार घालायचा. त्यामुळे बाकीचे काही जण आपोआपच, त्यांच्या काही लक्षात यायच्या आंत साष्टांग नमस्कार घालत ! हाताचे कोपरे, गुढगे रक्ताळत पण त्यामुळे सायकल थांबत नसे कारण एकाची सायकल थांबल्यावर दुसरा लगेच तयार असायचा.
जरा जास्त गोंधळ व्हायचा, तो संध्याकाळच्या वेळी ! त्यावेळी गांवाबाहेर चरायला गेलेली गुरे, घरी परत येण्याची वेळ झालेली असायची. त्यांचे याच रस्त्याने परत येणे आणि हा बाळगोपाळांचा सायकलचा गोंधळ ! यांचा संगम झाल्यावर मग काय विचारतां ? गायी, म्हशी शेण टाकत व शेपट्या, मान हालवत चालायच्या. या गडबडीत कोणाला शेणाच्या शेपटीचा सपकारा बसायचा, तर कोणी शेणावरून घसरून पडायचा. हातापायाला लागायचे, सायकल आणि शरीर विभक्त व्हायचे किंवा आतापर्यंत सायकलवर बसलेला सायकलस्वार असे काही चमत्कारिक आयन करायचा की क्षणात याच्या शरीरावर सायकल स्वार व्हायची ! रस्त्याचे, वाहतुकीचे किंवा मानवनिर्मित कोणतेही नियम पाळण्याचे बंधन त्या गुरांवर नसल्याने, ते त्यांच्या नियमाने रस्त्याने जायचे. ढोरांच्या मागचा ढोरकी हा संत तुकाराम महाराजांच्या चिंतनात असल्याप्रमाणे - ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे’ म्हणत जात असल्यासारखा दिसायचा ! त्याला कुणी, ‘ढोरं हाकतोय, का गंमत करतोय *****’ असं काही म्हटलं की त्याच्या अंगात मग समर्थ रामदास संचरायचे - ‘आधी गाजवावे तडाखे, तेव्हा भूमंडळ धाके’ आणि ‘हत् हिच्या बाड ******* *************तिच्या’ म्हणत समोर दिसेल त्या ढोरावर हातातील काठीचा उपयोग करायचा. याचा परिणाम एकच व्हायचा, जी ढोरं त्यांच्या नियमानुसार बऱ्यापैकी रस्त्यांने रांगेत जात असायची, ती उधळायची आणि पळत सुटायची. हे पाहिल्यावर सायकल चालवणारी बाळगोपाळ मंडळीच नाही, तर इतरही लगबगीने रस्त्याच्या कडेच्या दुकानावरील ओट्यावर जावून उभे रहात, व सर्व रस्ता हा ढोरांना व त्यांच्या ढोरक्यांना मोकळा करून देत. ही खूण म्हणजे मुलांना सायकल चालविण्याची वेळ संपल्याची असे. संध्याकाळ झाल्यावर सर्व सायकली त्या गुरवाच्या दुकानावर जमा होत.
आता भाड्याने घेवून सायकल शिकणारे राहीले नाही आणि सायकल चालवता येत नसतांना पण, शिकवायला तयार असणारे, बाळगोपाळ पण राहीले नाहीत. सायकल शिकायची तर ती विकत घेवूनच शिकावी लागते. ‘मोटार ड्रॉयव्हिंग क्लास’ सारखे दरमहा फी घेवून शिकण्याचे ‘सायकल ड्रॉयव्हिंग क्लास’ नाहीत. शिक्षणातून फावला वेळच मिळेनासा झालाय, मिळाला तर त्यांना त्यावेळी अवांतर क्लास असतात किंवा टी. व्ही.वर काही बघायचे असते. मग सायकल कोण चालवणार ? आता तो गुरव पण तिथं नाही आणि भाड्याने सायकल देण्याचे पण दुकान नाही. सायकल भाड्याने देण्याचा व्यवसायच कुठं राहीलाय आता ?

८. ५. २०१८


‘अरूण दाते’ आमच्यातून कायमचे गेले

‘अरूण दाते’ आमच्यातून कायमचे गेले
Image may contain: 1 person

आज भावगीताच्या आकाशात शुक्रताऱ्याप्रमाणे चमकणारे ‘अरूण दाते’ आमच्यातून कायमचे गेले.
आम्ही गेली कित्येक वर्षे ऐकतोय, तसेच आमची मागची पिढी पण ऐकत आली आहे, ही भावगीते ! कै. मंगेश पाडगांवकरांचे भावविभोर शब्द, या शब्दांतील लिहीलेले व न लिहीलेले भाव आपल्या समर्थ संगीताने दृष्टीला दाखवणारे व कानाला ऐकवणारे श्री. यशवंत देव आणि हे भावविभोर शब्द, त्यांतील भाव आपल्या ह्रदयापर्यंत पोहोचविणारा हा ‘शुक्रतारा’ ! आता सांगावे लागणार - कै. अरूण दाते !
यांचे हे गीत -
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥
राजा वदला, “मला समजली, शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा”
का राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥
राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
“उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा”
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥
तिला विचारी राजा, “का हे जीव असे जोडावे ?
का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?”
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी ॥३॥
का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना ?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ?
वार्‍यावरती विरून गेली एक उदास विराणी ॥४॥
गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार : यशवंत देव
गायक : अरुण दाते


६. ५. २०१८

१ मे म्हणजे 'महाराष्ट्र दिन' !

१ मे म्हणजे 'महाराष्ट्र दिन' ! 

१ मे म्हणजे 'महाराष्ट्र दिन' ! आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! या मोठ्या, कर्तृत्ववान प्रदेशात आपण जन्माला आलो आहोत. निश्चितच अभिमान बाळगावी अशी गोष्ट आहे. चक्रधर स्वामी यांच्या संप्रदायातील वाङ्मय हे मराठीत आहे, यातील 'महाराष्ट्र देशी असावे' हे आम्हाला असलेला 'कुमार भारती' या पाठ्यपुस्तकातील धडा अजूनही आठवतो.
प्रसिद्ध साहित्यिक कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी 'महाराष्ट्र गीत' लिहिलेलं आहे. मला खूप आवडते हे गाणं. प्रसिद्ध संगीतज्ञ कै. पं. शंकरराव व्यास यांनी या गीताला संगीत दिले तर प्रसिद्ध गायिका कै. ज्योत्स्ना भोळे, प्रसिद्ध संगीतकार कै. स्नेहल भाटकर यांनी हे गीत गायलेले आहे. ----------- फक्त आज आपला महाराष्ट्र कुठे आहे, हे गीत वाचून ठरवा !
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

https://www.youtube.com/watch?v=nJT8gGc5fMI

१. ५. २०१८

समाजातील बुवाबाजी

समाजातील बुवाबाजी

गेल्या काही दिवसांपासून येथे, वर्तमानपत्रात आसाराम बापूंबद्दल भलेबुरे, उलटसुलट, वेडेवाकडे लिहून आले होते. तसेच विविध समाजातील बुवाबाजीबद्दल देखील जोडीला वाचायला मिळाले. काहींनी यापूर्वीच्या त्यांच्या समाजासाठी, हिंदुधर्मासाठी केलेल्या चांगल्या कामांची भलावण केली. काहींना अजूनही वरिष्ठ न्यायालयांत हा निकाल फिरेल व ते निर्दोष सिद्ध होतील, ही खात्री वाटते. तर काही झाले हे फार चांगले झाले, आमचा भारतीय न्यायसंस्थेवर विश्वास आहे, असे म्हणत अजून काही बुवाबाजी करणाऱ्यांची नांवे सांगीतली. ही नांवे हिंदुधर्मातील व्यक्तींची होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून काहींनी मुस्लीम व ख्रिश्चनांमधे काय चालते, याचे वर्णन केले. थोडक्यात कोणी कमी नाही किंवा कोणी जास्त नाही, फक्त गवगवा मात्र कमी जास्त आहे.
एक लक्षात ठेवले पाहीजे की यांनी जनतेला दिसणारी काही चांगली कामे जर केली, तर समाजाचे पुढारीपण हळूहळू त्यांच्याकडे सरकू लागते. हे पुढारीपण प्राप्त व्हायला सुरूवात झाली की त्यामागून काही उलटसुलट कामे केली जातात. ती किरकोळ असली, त्याने विशेष नुकसान होणार नसेल तर ती धकवली जातात. यांतून हिंमत वाढते आणि अशी कामे ज्यांना धकवली जाणे आवश्यक असते, ही मंडळी सोबत जमा होवू लागतात.
केलेल्या चांगल्या कामाचे जसे बक्षीस मिळते, तसे वाईट कृत्याची शिक्षापण मिळते; मग ती न्यायालयाची असेल वा सामाजिक असेल !
ही बुवाबाजींची विकृत उदाहरणे व विकृती समोर आली तशी यांवर आजपावेतो किती घटना घडलेल्या आहेत, ज्यांवर समाजप्रबोधन व्हावे म्हणून नाटक, एकांकिका लिहील्या गेल्या व चित्रपट निर्माण केले गेले, ते डोळ्यांसमोर आले.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहीलेलं व अत्यंत गाजलेले नाटक ‘तो मी नव्हेच’ हे पुन्हा बघीतलं. सत्य घटनेवर आधारलेल्या या नाटकातील खलनायक हा ‘माधव काझी’ या नांवाचा इसमाने आहे. याची ही कृष्णकृत्ये सन १९५५ ते १९६० च्या दरम्यान घडलेली आहेत. कित्येक मुलींच्या आयुष्याची माती करणारा हा नराधम, कित्येकांना आर्थिक बाबींत फसवणारा हा लोभी माणूस समाजास कसा उपद्रव देणारा आहे व त्याला कशी शिक्षा होते, हे या नाटकांत दिसतेच.
मात्र इतक्या वर्षांनंतरही आपण पुन:पुन: हेच आणि या सारखेच अनुभव घेत रहाणार असू, तर आपल्या शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे, हे कशाच्या आधारावर म्हणतोय आपण ? शिक्षणामुळे शहाणपणा येतो, समाजऐक्य होते, समाज प्रगती पथावर जातो, विकृती व उपद्रव कमी होवून समजूतदारपणा, न्यायपालनवृत्ती वाढते वगैरे हे अपेक्षित आहे. हे किंवा यापैकी काही जर होणार नसेल तर आपल्या शिक्षणांत, त्यातून मिळणाऱ्या ‘ज्ञानात’ काहीतरी गफलत होत आहे हे नक्की ! ती गफलत दूर करण्याचे उपाय योजायला हवेत.
श्री. Praveen Bardapurkar यांची या विषयांवरची पोस्ट वाचली. पुन्हा ‘तो मी नव्हेच’ हे नाटक बघीतले. परिस्थिती फारशी बदललेली वाटत नाही. हुशारी वाढली तशी लबाडी पण वाढली. एकंदरीत परिस्थिती जैसे थे !

३०.४. २०१८

भावडू न्हावी

भावडू न्हावी
लहानपणी मी सकाळी झोपेतून उठून ओट्यावर आलो, की मला बहुतेक सर्व घरांसमोर सडा टाकलेला दिसायचा. काहींच्या, म्हणजे गुरंढोरं असलेल्यांच्या घरासमोर तर शेण कालवून सडा टाकलेला असायचा. एखाद्या अंगणात काही जणी रांगोळी काढण्यात दंग असायच्या ! माझ्यासारखी शाळेत जाणारी मुलं रांगोळी पहात उगाचच रेंगाळत असायची, तर शाळा नसलेली बाळगोपाळ मंडळी त्या रांगोळीभोवतीच ठाणं मांडून, मान वेळावत, वाकडी करत, रांगोळी काढतांना पहात बसलेली असायची.
अशा सकाळी काही वेळा, हातात छोटी लोखंडी पेटी उजव्या हातात आणि डाव्या हातात धोतराचा सोगा घेवून निवांत रमतगमत इकडेतिकडे पहात, उजवा पाय किंचित उचलून पुढे टाकत, गल्लीतून भावडू न्हावी जायचा ! भावडू म्हणजे शिडशिडीत अंगकाठीचा ! रंगाने उजळ पण सावळा वाटावा असा रंग. कंबरेला सैनाचे धोतर व अंगात डोक्यातून घालावा लागणारा सदरा, डोक्यावर गांधी टोपी. तोंडातले दोन-चार दात पडलेले. चालतांना उजवा पाय किंचीत उचलून पुढे टाकण्याची लकब ! उजव्या हातात ही छोटी लोखंडी, त्याची अन्नदाती पेटी तर डाव्या हातात धोतराचा सोगा ! निवांत रमतगमत जायचा, घाईघाईने जावून उपयोग नसायचा. कोणाला दिसले तरच कटिंग दाढीसाठी थांबवले जाणार !
भावडूचा अनुभव लहानपणी मी कटिंगच्या वेळी नेहमीच घेतलेला आहे. लहान मुलांची कटिंग म्हणजे त्याच्या दृष्टीने दिव्य असे, तर आमच्या दृष्टीने संकट ! ‘लहान जीवाला कटिंग करतांना शस्त्र लागायला नको’, हा त्या म्हाताऱ्या जीवाचा विचार ! मग कटिंग करतांना आपली मान हलून वेडीवाकडी जखम होवू नये यासाठी, भावडू हा त्याच्या म्हाताऱ्या झालेल्या, पण ताकदवान अशा दोन्ही गुढघ्यात आपलं डोकं असं काही गच्च पकडायचा, की आपले डोकंच काय, पण आपल्याला पण हलता यायचं नाही. तो अजिबात त्याच्या गुढग्यातून आपलं डोकं बाहेर येऊ द्यायचा नाही, त्याच्या अगदी पूर्ण मनासारखी कटिंग झाल्याशिवाय ! आता ही सगळी अवघडलेली स्थिती आणि हे सगळं सव्यापसव्य आटोपतं केव्हा आणि आपल्याला मान वर करायची संधी मिळते केव्हा, यासाठी मी काय आणि सर्वच मुलं काय, इतके काही घायकुतीला आले असत की, त्याने गुढगे जरा ढिले केले, की आपल्याला पुन्हा जगांत आल्याचे समाधान मिळायचे ! हे सर्व त्याच्या एकदा मनासारखे झालं की कटिंग कशी झाली, हे आपल्या चेहऱ्यावर पहायला मग तो पारा उडालेला आरसा आपल्यासमोर धरायचा. त्यांत आपले नाक, डोळे, चेहरा, कान दिसायचे पण डोकं मात्र दिसू द्यायचा नाही. कटिंग कशी झाली याचा अंदाज आपल्याला यायचा नाही. त्याने कितीही बारीक कटिंग केली, तरी घरातील मंडळीच्या दृष्टीने कटिंगच झालेली नसे. आपले विशेष केस कापले नाही, या आनंदात आंघोळ झाल्यावर कपडे घालतांना घरातील आरसा बघीतला, की वस्तुस्थितीची जाणीव होई. डोक्यावर केस असतात, हे समजण्यापुरताच केस असत. नंतर आरडाओरड किंवा तणफण करून काहीही उपयोग नसे.
गल्लीतून भावडू रमतगमत जात असतांना, घराबाहेर कोणी शेजारचे, वा समोरचे काका ओट्यावर त्याची वाट पहात उभे असले तर, त्याला थांबवत, लगेच ‘भावडू, थांब जरा ओट्यावर, मी आलोच’ म्हणत त्याला थांबवायचे. तो थांबायचा, पायऱ्या चढून ओट्यावर यायचा. आपली छोटी लोखंडी पेटी खाली टेकवायचा. थोड्याच वेळात घरातून फक्त धोतरावर उघडेबंब होवून ते काका बाहेर येत. त्यांच्या एका हातात तागाचे गोणपाट आणि दुसऱ्या हातात पाण्याने भरलेली तपेली असे. तोवर भावडूने खाली बसत आपली खूरमांडी घातलेली असे. बाजूला ती छोटी लोखंडी पेटी ठेवलेली असे. पेटीतून एकेक वस्तू काढणे सुरू होई. आरसा म्हणता येईल असा, फ्रेम केलेला काचेचा तुकडा एका बाजूला काढलेला असे. त्या शेजारीच साबणाने वापरून वापरून बुळबुळीत झालेली पितळेची वाटी ठेवलेली असे. या वाटीचा आकार आमच्या नेहेमीच्या वाटीपेक्षा मोठा व पसरट असे. त्याच्या शेजारी थोडेफार केस शिल्लक असलेला व लाकडी मूठ असलेला ब्रश ! त्याच्या शेजारी वेगळी गोल प्लॅस्टीकची वाटी ! त्यात मध्यभागी खोलगट व आसपास शिल्लक आहे असा दिसणारा कंकणाकृती पांढरट खड्यासारखा दिसणारा व बऱ्यापैकी झिजलेला साबणाचा तुकडा, दाढीसाठी उपयोगाचा म्हणून !
तोवर भावडूने खाली बसत आपली खूरमांडी घातलेली असे. मग त्या पेटीतून एकेक साहित्य बाहेर यायचे. काय असायचे त्यात ? तर लहानमोठ्या, वेगवेगळ्या नंबरच्या केस कापायच्या मशीनस् ! तीन-चार वेगवेगळ्या साईजच्या, उंचीच्या आणि पाती असलेल्या कात्री ! दोन- तीन कंगवे, त्यातला एक मोठ्या साईजचा व सर्वदूर सारखेच दात असलेला आणि दुसरा एकीकडून दुसरीकडे दांत लहान होत गेलेला कंगवा ! तिसरा असाच मध्यम साईजचा कंगवा ! हाच कंगवा जरा बरा दिसे, बाकीच्या दोन्ही कंगव्याचे मधले काही दात सलगपणे तुटल्याने, ते कंगवे पण दांत पडलेल्या बोळक्या तोंडाप्रमाणे वाटत. आरसा म्हणून ओळखू येईल इतपत स्थिती असलेला, काचेचा फ्रेम केला चौकोनी किंवा आयताकृती तुकडा ! लाकडी मूठ असलेला व थोडेफार केस असलेला दाढीचा ब्रश ! गोल प्लॅस्टीकची थोडाफार कंकणाकृती साबण शिल्लक असलेली डबी, त्याचे झाकण असायचे किंवा नसायचे पण ! एक तुरटीचा मोठा तुकडा ! पितळेची जरा मोठ्या आकाराची पसरट वाटी, तिला कधी कल्हईचा स्पर्श झाला होता किंवा नाही, ही शंका यावी असे तिचे रूप ! एक लाकडी मूळ असलेला मोठ्या आकाराचा व एक जरा छोट्या आकाराचा वस्तरा ! वस्तऱ्याला घासून धार लावता येईल असा कसाचा दगड ! छोटी पोलादाची नखे काढण्यासाठीची नखाळी ! गळ्याला गुंडाळून दोन्ही खांद्यावरून घेतल्यावर खाली मांडी घालून बसले तर दोन्ही मांड्या पूर्ण झाकल्या जातील एवढ्या आकाराचे सैनाचे कापड, रंग शक्यतोवर पांढराच ! हे सर्व त्या छोट्या लोखंडी पेटीत काही वेळा बसतही नसे, मग तो सैनाच्या कापडाचा बोळा पेटीवर येई.
काकांनी थांबवलेले असे, ओट्यावर बसत त्याचे पेटीतील सामान काढून लावणे सुरू असायचे. तेवढ्यात त्याला आतून काका बाहेर आलेले दिसले, की मग नेट लावून, पण लगबगीने उठत भावडू त्यांच्या हातातील गोणपाट व तपेली हातातून घेई. मग गोणपाट नीटपणे उभट खाली नीट अंथरले जाई. गोणपाट म्हणजे जाड, दडस असे दुहेरी विणीचे तागाचे पोते असे. खाली ओट्यावर तरट अंथरून त्यांवर बसल्यावर ओट्याचा थंडावा जाणवत नसे, उब जाणवे ! पाण्याने भरलेली तपेली बाजूला, त्या छोट्या लोखंडी पेटीच्या शेजारी ठेवली जाई. काका मांडी घालून बसत आणि मग भावडू आपल्या हातात ते पांढरट क्रिम कलरचे सैनाचे कापड गळ्याभोवती गुंडाळण्यापूर्वी, ओट्याखाली दोन्ही हातात धरून जोरात झटके. फटाक् फटाक् आवाज आला, की उगीच वाटे की कापडाच्या सर्व सुरकुत्या गेल्या, त्यावरील सर्व केस झटकले गेले, कापड स्वच्छ झाले ! मग ते स्वच्छ झटकलेले कापडाचा एकीकडचा ठराविक भाग, त्या काकांच्या मानेभोवती गुंडाळून, दोन्ही खांद्यावरून घेत, मग छातीवरून खाली घातलेल्या मांडीवरून सोडून दिले जाई. काकांचा मानेपासून ते मांडीपर्यंतचा भाग कापडाने झाकला जाई.
भावडू तेथील तपेलीतले पाणी मग आपल्या पितळी वाटीत ओतून घेई. त्यातील थोडे पाणी आपल्या मुठीत घेऊन ती मूठ डोक्यावरील केसांवर सांडेल अशी उपडी केली जाई, तेल लावल्यासारखे तो पाणी लावी. मग आपोआपच तेवढा केसांचा भाग, त्याला पाणी लावल्याने चमकदार होई, असे दोन-चार वेळा केले की डोक्यावरील सर्व केस बऱ्यापैकी चमकू लागत. ही कटिंगची प्राथमिक तयारी झाली, की मग त्याच्या उजव्या हातात मोठ्या पात्याची पोलादी कात्री व डाव्या हातात मोठा कंगवा आलेला असे. कच्यांऽग कच्यांऽग कच्चऽऽ कच्यांऽग कच्यांऽग कच्च असे करत मग डोक्यावरील केसांत त्याचा कंगवा झपाट्याने फिरू लागे. क्षणाक्षणाने तो पुढेपुढे सरकत असे. त्या बरोबरच त्या कंगव्यावर आलेले केस, ही कात्री सपसप कापू लागे. पहातापहाता डोक्यावरील केसांचा भार कमी झालेला दिसे. मग तो उचलायचा ते लोखंडी मशीन ! उजव्या हाताने चिपळ्या वाजवतांना हाताची जशी हालचाल होई, तसे ते मशीन कटकटकटकट करत मानेभोवती मागून, कानाच्या लगत फिरे. मशीन फिरल्यावर त्यांवर केसांचा छोटा पुंजका आलेला दिसे, आणि मग आपोआपच काकांच्या मानेजवळील व कानाजवळील भाग स्वच्छ झालेला दिसे.
सर्व सोपस्कार होवून कटिंग झाली की भावडू दाढी करण्यासाठी तयारी करीत असे. हात वाटीतील पाण्यात बुडवून ते ओलसर हात, गालाला लावून पाणी लावून मालीश केल्यासारखे करीत असे. त्याला गालाची कातडी दाढी करण्याएवढी पुरेशी नरम झाली की मग तो शेजारची लाकडी मूठ असलेला व थोडेफार केस शिल्लक असलेला ब्रश वाटीतील पाण्यात बुडवून मग ओला करी. त्याला ओला केल्यावर त्या कंकणाकृती साबणाच्या वडीवर घसघस घासीत असे. साबणाचा फेस त्या साबणावर व ब्रशावर दिसायला लागला, की हा साबणाचा फेस गालावर झरझर फासला जाई. मग ब्रश खाली ठेवून, पेटीतील वस्तरा बाहेर काढला जाई. पायाची एक मांडी जमीनीवर व एक मांडी उभी या अवस्थेत बसलेला भावडू, मग त्या वस्तऱ्याची धार आपल्या पोटरीवर वरखाली करून तपासून घेई. धार कमी आहे असं वाटलं, तर मग पेटीतून आयताकृती छोटा काळा कसाचा मध्यभागी घासूनघासून खोलगट झालेला दगड बाहेर काढी. त्यांवर पाणी टाकून आपल्या उजव्या हातातील वस्तरा चट्कपट्क चट्कपट्क करत एकदा एका बाजूने डावीकडून उजवीकडे व दुसऱ्या बाजूने उजवीकडून डावीकडे घासत फिरवी. जरा धार आली असे वाटले की मग पुन्हा ती त्याच्या पोटरीवर तपासली जाई. समाधान झाले की मग लक्षात येई, की दाढीचा साबण वाळून गेला. पुन्हा वाटीतील पाण्यात बुडवून तो ब्रश गालावर फिरवून साबण ओला केला जाई. मग हळूहळू वस्तरा गालावरून फिरवत तो साबण साफ केला जाई व आपोआप दाढी होई. पुन्हा ब्रशने साबणाचा दुसरा हात जरा काळजीपूर्वक देवून दाढी पूर्ण होई. दाढीसोबतच मानेवरील केस वस्तऱ्याने नीट कोरून घेत दाढी व कटिंग पूर्ण होई. मग तुरटीचा खडा पेटीतून काढत, वाटीतील पाण्यात बुडवून गालावर फिरवला जाई. तेवढ्यात काका घरातून खोबरेल तेलाची बाटली मागवत. याचा अर्थ भावडूच्या लक्षात येई. हाताचा अंगठा खोबरेल तेलाच्या बाटलीच्या तोंडावर दाबून धरत डोक्यावर धरत किंचीत अंगठा उचलला जाई. डोक्यावर खोबरेल तेलाची बारीक धार डोक्यावर पडे. मग खसखसून डोक्यावर तेल केसांवर लावले जाई, डोक्यावर राहीलेले थोडे केस चमकू लागत. मग डोक्यावर चट्चट् चट्चट् करत दोन्ही हाताची आडवी उभी ओंजळ पाणी घेऊन वाजवत डोके, डोक्याचा वेगवेगळा भाग आपल्या अंगठ्याने, पहिल्या बोटाने जोर देत दाबला जाई. चिमटीने कातडी ओढली जाई. दोन्ही कानामागच्या नसा दोन्ही बोटांनी ओंजळीत मान घेवून दाबल्या जात. कपाळावरून तडतड् उडणारी शीर कपाळावर घट्ट हात दाबून धरत दाबली जाई. काकांची तंद्री लागलेली असे. ते आपले डोळे बंद करून हे सुख अनुभवत असत. शेवटी केस झटकायच्या ब्रशने सर्व उरलेसुरले केस झटकत डोकं साफ झालं की दाढीकटींग आटोपली.
समाधानाने काका म्हणत, ‘भावडू चहा घे.’ चहा होणार, याची भावडूला व काकांच्या घरातही कल्पना असायची, कारण कटिंगच्या दरम्यान घरातील छोटा मेंबर बाहेर ओट्यावर येवून डोकावून जात असे. घरात खोबरेल तेलाची बाटली मागवली की चुलीवर चहा ठेवला जाई. कटिंग आटोपली की एका हाताने चिमट्यात गरम चहाचे भांडे घेतलेले व दुसऱ्या हातात कपबशा घेवून कोणी येई. चहा कपबशांमधे ओतला जाई. काका हलक्या झालेल्या डोक्याने चहाचा घोटाघोटाने आनंद घेत, तोवर भावडूचा चहा पिवून, त्याने तपेलीतले उरलेल्या पाण्याने कपबशी विसळून ठेवून पालथी घातलेली असे. पैसे घरातून मागवले जात. तोवर भावडू चटचट लोखंडी छोट्या पेटीतून आपला बाहेर काढलेला पसारा परत ठेवण्यात दंग असे. घरातून पैसे आले की ते घेवून मग भावडू पुन्हा रमतगमत चालू लागे रस्त्याने, दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या दिशेने !

३०. ४. २०१८