Monday, January 8, 2018

दोन्ही मुलींच्या लग्नाची व्यवस्था करून गेले --------------

दोन्ही मुलींच्या लग्नाची व्यवस्था करून गेले --------------

माणसाच्या आयुष्यात केव्हा काय होईल याचा नेम नाही, मग तुम्ही 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' वगैरे काव्यमय भाषेत बोला किंवा नका बोलू ! घरातील कुटुंबकर्त्याची जबाबदारी तर अजूनच जास्त असते म्हणूनच त्याने जबाबदारीने वागले पाहीजे. कुटुंबकर्ता कसाही वागला किंवा व्यवस्थीत वागूनही काही दुर्दैवी घटना घडली तर त्या बिचाऱ्या घरातील लक्ष्मीवर जो प्रसंग गुदरतो त्याचे तर वर्णन करता येत नाही. घरातील परिस्थिती जर संपन्न असेल, घरातील माणसे सुसंस्कृत असतील, तिच्या पतीने काहीतरी बेगमी तिच्यासाठी करून ठेवली असेल तर ठीक; अन्यथा तिची परिस्थिती म्हणजे आपले सर्वस्व गेले, हे जे म्हटले जाते ते खरेच ठरते. बिचारी छोटीछोटी लेकरे, त्यांना तर काय झाले आहे हे नेमके समजत देखील नाही. त्यांना एवढेच समजते की आपल्याला एक माणूस जो नेहमी दिसायचा, आपले कोडकौतुक करायचा, फिरायला घेऊन जायचा, कड्यावर उचलून घ्यायचा, पटापट मुके घ्यायचा तो आता दिसत नाही. ते बालमन काय विचार करत असेल हे तरी आपल्याला काय समजणार ? मुलं जर थोडी मोठी असतील तर त्यांना थोडे समजते की आपले 'बाबा' आता दिसत नाही. विचारतात बिचारे आपल्या आईला, 'बाबा कोठे गेले ? बाहेर कोठे गेले ? येत का नाही घरी ? केव्हा येतील ? मला खाऊ आणतील काय ?' ती माउली बिचारी यांवर काय उत्तर देणार ? तिला तर बिचारीला बऱ्याच वेळा रडण्याची पण चोरी असते. काही काळानंतर तिची रवानगी तर बहुतेक तिच्या माहेरीच होते आणि ती देखील बिचारी आपल्या मुलांची होणारी सततची हेंडसाळ पाहू शकत नाही आणि एका दिवशी ती माहेरी येते ती कायमचीच !

रस्त्यावर होणारे सततचे अपघात, त्यांत आपला जीव गमविणारे किंवा अपंग होऊन आयुष्यभर जीवन कंठणारे दुर्दैवी जीव आणि त्यामुळे उघड्यावर पडलेले, संकटांत सापडलेले त्याचे कुटुंब ! अशीच एक घटना सन २००१ मधील ! हा आणि त्याचा मित्र मोटारसायकवर राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. वेळ रात्रीची, ११ - १२ दरम्यानची होती. महामार्ग असल्याने वाहतूक होती पण महामार्ग असल्याने गावांत असणारे दिवे रस्त्यावर नव्हते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा जो काही तेवढ्यापुरता प्रकाश रस्त्यावर पडत असेल तोच, अन्यथा अंधार ! त्याला रस्ता केंव्हा संपेल असे होऊन गेले होते. अधूनमधून येणाऱ्या रस्त्यातील गड्ड्यांची चालविणारा हा तम बाळगत नव्हता आणि त्यामुळे मोटारसायकल आपल्या गतीने जात होती. या विचारांत आणि धुंदीत रस्ता अगदी सरळ असल्याने त्याच्या मनात वेगळा विचार येण्याचे कारणच नव्हते. मनाच्या या अवस्थेने रस्त्यांत नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रककडे लक्ष द्यायला त्याला सुचले नाही कारण अंधारात तो ट्रक दिसतच नव्हता आणि मध्ये काही अडथळा असेल हा विचार नव्हता. वाहनाने त्याला गती असल्याने त्याचे काम केले आणि ती मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ट्रकचा आकार, मोटारसायकलचा वेग, त्याचा गाफीलपणा याचा एकत्रीत परिणाम काय तर जोरदार अपघात आणि त्याला झालेल्या जीवघेण्या जखमा ! त्यामुळे आलेल्या बेशुद्धीने त्याला कोणी दवाखान्यांत हलविले हे पण समजले नाही. त्याच्या एकंदरीत झालेल्या पहाता, दवाखान्यांत हलविणे हा केवळ उपचार होता. त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याने औषधोपचार सुरु असतानांच आपला प्राण सोडला. पोलीसांकडे तक्रार, गुन्हा नोंदणी, पंचनामे, उत्तरतपासणी वगैरे सर्व सोपस्कार पार पडले. त्याचा एकाच निष्कर्ष निघाला की त्याची पत्नी वयाच्या पंचविशीतच विधवा झाली आणि त्यांच्या दोन्ही छोट्याछोट्या शाळेत जाणाऱ्या मुली उघड्यावर पडल्या. त्यांच्या स्वप्नातील रंग उडाले. आता फक्त काळीकुट्ट स्वप्ने आणि पांढरेफटक कपाळ घेऊन आयुष्य काढायचे होते तिला ! यथावकाश लवकरच ती तिच्या माहेरी आली. धावपळ सुरु झाली ती मग तिच्या वडीलांची. 

याला त्याला भेटत, माहीती विचारत, वकिलांना भेटून मग कसेबसे समजले की त्या ट्रकवाल्याचे विरुद्ध नुकसानभरपाईचा दावा 'मोटार वाहन कायदा, १९८९' नुसार करता येईल. तिच्या वडीलांनी मग कागदपत्रे गोळा केली, वकिलांकडे दिली. सुदैवाने त्या ट्रकचा विमा उतरविलेला होता. नुकसान भरपाई कमी त्रासाने मिळण्याची शक्यता निर्माण झाली. वकिलांनी माहीती घेऊन न्यायालयांत नुकसानभरपाईसाठी ट्रकमालक आणि त्याची विमाकंपनी यांचे विरुद्ध दावा दाखल केला. विरुद्ध बाजूला नोटीस लागणे, ते सर्व न्यायालयांत हजर होणे, त्यांनी ही नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी लेखी म्हणणे देऊन नाकारणे, शेवटी साक्षीदारांचे जाबजबाब होऊन निकालासाठी ठेवणे, यांत नऊ वर्षे गेली. निकालाचा दिवस आला. आपले माणूस तर आता परत मिळणार नाही पण निदान पोटापाण्याची आयुष्यभर जरी नाही तरी निदान पोरं मोठं होईपावेतो सोया झाली तरी खूप या मोठ्या आशेने तिचे वडील आणि ती, हे न्यायालयांत आले. पुकारा झाला, ते न्यायाधीशांसमोर उभे राहीले. 'बाई तुमचा नुकसानभरपाईचा अर्ज रद्द केला आहे. तिला काय बोलले हे समजलेच नाही. दुसऱ्या कामाचा पुकारा झाला अन हे बाहेर आले. त्यांच्या वकीलांनी सांगीतले, 'आपल्याला वरच्या कोर्टांत जावे लागेल. काळजी करू नका. ' तिच्या डोळ्यासमोर घरी परत येतांना अंधार होता. नवरा गेल्यावर, काही पैसे मिळतील या आशेवर दहा वर्षे गेली, आता अजून किती वर्षे थांबायचे अजून ? मुली मोट्या होताहेत, त्यांची शिक्षणे, त्यांची पुढची लग्नकार्ये ! तिला रडूच कोसळले ! बाप समजावीत होता, 'रडू नको मार्ग निघेल !' भारतीय सेनेमधील असलेल्या आणि शत्रूपुढे न डगमगणारा बाप मुलीच्या या दुःखापुढे हतबल झाला. 
   
निकालाच्या नकला काढणे, पुन्हा वरच्या न्यायालयाचा म्हणजे 'उच्च न्यायालयाचा' दरवाजा ठोठावणे आले. शेवटी हा निकाल मान्य नाही म्हणून उच्चन्यायालयांत अपील दाखल केले. अपिलाचे काम सुरु झाले. युक्तिवादाचे वेळी विमा कंपनीचे बाजूने खालच्या न्यायालयाचा निकाल असल्याने, त्यांना सोपे काम होते. खालच्या न्यायालयाचा निकाल बरोबर आहे, त्यांत काही बदल करण्याची आवश्यकता नाही, हे गृहीत होते. चिकीचे काय झाले हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही अपील करणाऱ्यावर होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी खालील कामकाजाची सर्व कागदपत्रे बघीतली. त्यांना त्यांत काही गैर वाटेना. चुकीचे काही आढळले नाही तर येथेपण निराशाच पदरी पडणार असे बिचारीच्या वडिलांना वाटू लागले. शेवटी पंचनाम्याचे कागद बारकाईने दाखविल्यावर, थोडा उलगडा होऊ लागला. रस्त्यात ट्रक थांबला होता ती जागा, महामार्गाची रुंदी, त्याचा डांबरी भाग, इतर वाहतुकीसाठी उरलेला रस्ता आणि त्या ट्रकवाल्याने न दाखविलेला 'सिग्नल' अथवा 'अडथळ्याची खूण' वगैरे बारकाईने दाखविल्यावर हेच सांगीतले की इतर वाहन कोठूनही आले असते तरी हा ट्रक असा मधोमध उभा होता की कोणत्याही बाजूने या अपघात हा होणारच होता. ही त्यांची, ट्रकवाल्याची कृती म्हणजे निष्काळजीपणा होय. त्या कारणासाठी म्हणून ट्रक मालक आणि त्याची विमा कंपनी वैयक्तिकपणे आणि संयुक्तपणे जबाबदार अर्जदाराच्या या अपघातामुळे झालेल्या नुकसानभरपाईस जबाबदार राहील. न्यायालयाने हे म्हणणे स्विकारले आणि मान्य केले. तिच्या पतीच्या घटनेच्या उत्पन्नाप्रमाणे, त्याचे मृत्यूसमयी असलेले वय, त्याच्यावर घरातील अवलंबून असलेली माणसे, पत्नीच्या आयुष्याचे आणि मुलांच्या भविष्याची जी धूळधाण झाली त्याची काही अंशाने का होईना पण पैशाच्या रूपात काय भरपाई करता येईल हा विचार झाला. तिचा पती जर जगला असता तर भविष्यातील महागाई आणि त्यानुसार त्याचे वाढणारे उत्पन्न यांचा मेळ घालून भविष्यांत त्याला किती उत्पन्न कमवता आले असते हे विचारात घेतले आणि नुकसानभरपाई देण्याचा आदेश ट्रकमलक आणि विमाकंपनी यांचे विरुद्ध दिला. तिच्या बिचारीच्या आयुष्याची बऱ्यापैकी बेगमी झाली. 

एके दिवशी तिचे वडील आले. हातावर पेढा ठेवला आणि 'साहेब, त्या पोरींचे वडील तर गेले पण त्यांच्या दोन्ही पोरींच्या लग्नाची बेगमी करून गेले. माझ्या मोठया नातीचे लग्न ठरविले आहे. आता हे पैसे कामास येतील. माझा पोरीला मी आहे तोवर सांभाळील त्यानंतर तिच्या मुली-जावयांनी सांभाळावे हीच परमेश्वराजवळ प्रार्थना ! 

समाजातील अनपेक्षित येणाऱ्या संकटांना तोंड देता यावे म्हणून समाजघटकांच्या हिताचे विविध कायदे शासनाने केले आहेत. गांजलेल्या, पिडलेल्या लोकांना विविध कायद्यानुसार काही मदत नेहमीच केली जाते. आपण रस्ता चालत रहावयास हवे, थांबायचे नाही.       

(संक्षीप्त रूपात 'दैनिक लोकमत जळगांव यांत दिनांक ३१. १२. २०१७ आणि ७. १. २०१८ रोजी प्रसिद्ध)

http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_JLLK_20171231_8_3&arted=Jalgaon%20Main&width=500px

http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/2018-01-07/6#Article/LOK_JLLK_20180107_6_3/123px


दंगेधोपे आणि रोजीरोटी

दंगेधोपे आणि रोजीरोटी
सन १९९० च्या दरम्यानची घटना असावी. रस्त्यावरील सायकल पडल्यातून किंवा पाडण्यातूनन झालेल्या किरकोळ, फालतू बाचाबाचीला धार्मिक रंग देण्यात येवून गुन्हा नोंदण्यात आला. मुस्लीम तक्रारदार होते आणि स्वाभाविकच तक्रार हिंदूंविरूद्ध होती. दोनचार जण जखमी झाल्याचे दाखवले होते. सायकलच्या पडण्यातून झालेल्या अपघातात किती लागणार ? काय जखमा होणार ? झाल्या तरी त्या कशा स्वरूपाच्या असणार ? याचा आपण अंदाज करू शकतो. पण ‘हो गई, हो गई’ वगैरे आरड्याओरड्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यासारखे केले गेले असावे.
पोलीसांचे एक बरे असते, असलेल्या वस्तुस्थितीपेक्षा ते पूर्वी राज्यकर्त्यांच्या इच्छेला जास्त महत्व देत असत, तर आता आकांडतांडव करणाऱ्यांना ! राज्यकर्त्यांच्या वर्तुळातील हे आकांडतांडव करणाऱ्यांपैकीच जास्त असतात व ते त्यामुळे महत्वाचे असतात. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने त्यांच्या महत्त्वाच्या मतदारांना दुखावणे हे त्यांच्या हिताचे नसते.
समाजातील कायदा व सुव्यवस्था, समन्यायी धोरण, भारतीय राज्यघटना आणि त्यातील मूलभूत अधिकार, सर्वधर्मसमभाव, सहिष्णु वृत्ती, जातीयवाद वगैरे गप्पा या सार्वजनिक व्यासपीठावरून बोलायलाच चांगल्या असतात. त्या आपण प्रत्येक भारतीय नागरिकाने पाळल्या पाहीजेत ही अपेक्षा, पण तसे बंधन कुठे आहे ? राज्यकर्ते, पुढारी, अधिकारीवर्ग वगैरे तर आपल्या स्वत:ला विशेष समजतो आणि समाजाने पण तसे गृहीत धरलेले आहे. त्यामुळे आपण एकदा का राज्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या मतदारांमधे आले की आपल्याला आपोआपच विशेष वागणूक मिळते, हे समजण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची गरज नाही. हे अगदी पूर्वी साक्षरता कमी होती, त्या वेळेपासून ‘महत्त्वाच्या मतदारांना व त्यांच्या पुढाऱ्यांना’ माहिती आहे. आता साक्षरता वाढल्यामुळे ते इतर बिनमहत्वाच्या मतदारांच्या लक्षात येऊ लागले, एवढाच काय तो अलिकडचा बदल ! राज्यकर्त्यांचे ‘महत्वाचे मतदार’ कोण असतात हे सर्वांनाच माहीती असल्याने, ते पुन्हा येथे सांगण्याची जरुरी नाही. त्यांना कायद्याचे संरक्षण देणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्यच असते. मात्र या गडबडीत एखादे वेळेस इतरांचे कायदेशीर अधिकार डावलले जातात, एवढीच काय किरकोळ गफलत होते. त्याला काही इलाज नसतो, हे पण आता स्विकारले जात आहे; काही वेळा अपवाद घडतात, नाही असं नाही. असो.
त्यामुळे हिंदूमुस्लीम हा विषय आला की घटना काहीही असो, चूक कोणाची पण असो पोलीसांना मात्र दोन्हीकडील व्यक्तींवर केसेस करणे भाग असते. अर्थात अशावेळी तक्रार करणारे उत्साही तयारच असतात. काही जण तर तक्रार कशी करावी, त्यांत कोणाला व कसे अडकवावे, या प्रसंगाचा फायदा घेऊन आपल्या वैयक्तिक भांडणाचा कसा वचपा काढायचा, याचा फायदा वैयक्तिकपणे आर्थिक व इतर बाबींमधे कसा करता येतो वगैरे साध्य करण्याइतपत तज्ञ असतांत. काहींनी तर यांत इतके कौशल्य मिळवलेले असते की कशी तक्रार केल्याने काय होईल याचे आडाखे पण पक्के बांधून तयार असतात, फक्त दंगल करण्याचीच काय ती खोटी असते. त्यामुळे काही वेळा या सर्व आडाख्यांच्या पूर्ततेसाठी पण नाईलाजाने छोटी-मोठी दंगल व सदृश्य परिस्थिती घडवावी लागते. त्याला काही इलाज नसतो, काय करणार ?
एखाद्यास आपले समाजात, राजकारणात बस्तान बसवून विशिष्ट जागा व स्थान निर्माण करायचे असेल तर याचा पण उपयोग थोडा का असेना पण होवू शकतो. अलिकडे तर बदललेल्या परिस्थितीत याचा मुख्य उपयोग होऊ लागला आहे. तात्पर्य काय तर या सर्व मानसिकतेमुळे वस्तुस्थितीच्या विपरीत केसेस, त्या विषयाशी संबंध नसलेल्या व्यक्तींवर होतात. त्यांना वर्षोगणती न्यायालयांत हेलपाटे मारावे लागतात.
तर मुस्लीम माणसाने पोलीस स्टेशनमधे तक्रार केली, ती साधारणपणे चाळीस लोकांच्या विरूद्ध असावी. त्यांचे चाळीस जामीनदार, त्यांच्या सोबतीला येणारे आणि यांत काय होते याची गंमत पहायची इच्छा असलेले बरेचसे, असे निदान दीडशे लोक कोर्टात असायचे. त्यामुळे अशा दिनांकाचे दिवशी कोर्ट भरगच्च दिसायचे. या दरम्यान काहींचे पूर्वीचे वादविवाद मिटायचे, तर काही वेळा यांतून नवीन पण सुरू व्हायचे. काहीही असले तरी कोर्टाच्या बाहेरील हॉटेलवाल्याचा व्यवसाय मात्र बरा होई.
हे या केसचे न्यायालयातील काम पूर्वी माझेकडे नव्हते. मात्र या होणाऱ्या येरझारांच्या दरम्यान त्यातील एकाला सैन्यात नोकरी मिळाली आणि तो तिकडे हजर झाला. सरकारी नोकरी ! मग त्याच्या वैयक्तिक चारित्र्य, काही केसेस वगैरे संबंधाने चौकशी, संबंधीत विभागाकडून येथील पोलीस स्टेशनला करण्यात आली. पोलीस स्टेशनला हा रिपोर्ट तर पाठवायचा होता. तो चुकीचा पाठवणे शक्य नव्हते. यांतील नोकरी नुकत्याच लागलेल्यावर रिपोर्ट पाठविण्याचे वेळी केस होती, असे कळविले तर याची नोकरी जाणार हे निश्चित होते.
या मुलाचे वडील बिचारे शाळेत शिपाई ! त्यांची ताकद किती असणार आणि धाव तरी कुठवर असणार ? बिचारे आपल्या रोजच्या भजनांत ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ किंवा ‘ऊस डोंगा परि भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’ किंवा ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया’ किंवा ‘हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना, कोण करी’ म्हणत रमणारा हा जीव ! दिवसभर शाळेचे काम आणि रात्री देवाचे नांव घेत निद्रेच्या अधीन होणारा, त्या मुलाचा बाप ! बोलता बोलता कुठं तरी बोलला ‘मुलाला नोकरी लागली आहे. पोलीसांचा रिपोर्ट गेला, की काम आटोपले.’ आपले हितचिंतक जसे असतात तसे हितशत्रूपण असतात. हितचिंतकापेक्षा हितशत्रू जास्त दक्ष असतात, आपल्याला नुकसान पोहोचवावे यासाठी ! ‘पोलीस का क्या रिपोर्ट जानेवाला हैं ? जैसा है वैसाही जायेगा । तुम्हारे लडकेकी नोकरीका कोई सच्चा नहीं ।’ एक जण बोलून गेला. हा बिचारा चौकशीसाठी पोलीसस्टेशनला गेला, सोबत गांवातील मंडळी होतीच ! पोलीसस्टेशनामध्ये पण सह्रदयी मंडळी असतात. त्यांनी केसचे कागद बघीतले. त्यांच्या घटना लक्षात आली. पण त्यांची पण मदत करण्याची मर्यादा असते, त्या पलिकडे ते मदत करू शकत नाही. ‘आम्हाला या तारखेपर्यंत रिपोर्ट पाठवायचा आहे. तोपर्यंत काय करायचे असेल ते करा.’ त्यांच्या या सांगण्यावर या मुलाच्या वडिलांकडे काही उत्तर नव्हते. गांवातील मंडळींनीच विचारले, ‘काय व कसे करायचे ?’ यांवर ‘कोर्टाचा आदेश द्या. आम्ही तसे कळवू. मग तुम्हाला अडचण येणार नाही.’ असे उत्तर दिले. ही सर्व मंडळी तेथून निघाली आणि मग चहा प्यायला हॉटेलमध्ये बसली. तेथे असतांना, संबंधीताने चहा पिण्याच्या निमित्ताने हॉटेलात येवून सांगीतले, ‘केस चालवून निकाल घ्या, तुमच्या बाजूने ! केसमधे काही दम नाही, हे माहीती आहे. किंवा तक्रारदाराला केस मागे घ्यायला सांगा, दुसरा मार्ग नाही.’ ही सर्व मंडळी विचारात पडली. शेवटी आपापल्या घरी गेली.
ज्या वकिलांकडे हे काम होते, त्यांना विचारले तर त्यांनी निदान दोनतीन वर्षे तरी काम चालणार नाही, असे काहीसे सांगीतले. यांच्याजवळ तर इतका वेळ नव्हता. आपसात करून केस मागे घ्यावी म्हणून सगळे प्रयत्न झाले. केस संपल्या शिवाय नोकरीचे खरे नाही, हे समजल्यावर तर तक्रार करणाऱ्यांना व ‘जखमी’ झालेले दाखविल्यांना फारच महत्व आले. गांवातील प्रतिष्ठीत, वजनदार मंडळींनी भरपूर प्रयत्न केले. त्या वेळच्या त्याच्या मित्रांची, कार्यकर्त्यांची धावपळ तर विचारू नका. या परिस्थितीचे पोलीसांना पण वाईट वाटत होते.
सत्य कधीही अनाथ नसते तर त्याचे पितृत्व, पालकत्व स्विकारायला परमेश्वर स्वत: येतो, अगदी कोणाच्याही रूपात ! निदान तशी बुद्धी तरी कोणाला देतो आणि कोणीही त्याच्या बाजूने उभा रहातो. अनाथ असते ते असत्य ! एरवी डौलात मिरवणारे, वैभवाच्या झगमगाटात विहार करणारे उघडे पडले की त्यांचे पालकत्व स्विकारायला कोणी नसते, तर उलट त्याला झटकून टाकून, अनौरस असल्याचा देखावा निर्माण केला जातो.
शेवटी एकाला वाटले असावे, माझ्याकडे यावे. एके दिवशी हा सगळा घोळका माझ्याकडे ! ही सर्व मंडळी पाहिल्यावर, गांवातील काही विषय असावा हा अंदाज आलाच ! भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, विश्व हिंदू परिषद, संघ, भाजीचे व्यापारी वगैरे ही सर्व मंडळी माझ्याकडे ! ऑफिस बाहेरील चहावाला मोठ्या किटलीभर चहा घेऊन सर्वांना ग्लासमधून देत होता. ‘वकीलसाहेब, हे असे त्रांगडे झाले आहे.’ म्हणत त्यांनी सर्व हकीकत सांगीतली. त्या मुलाच्या वडीलांच्या चेहऱ्यावरील भाव न बोलता समजत होते. ‘तुम्ही वकील लावलेले आहेत, ते पण आपलेच आहे. ते काय म्हणताय, त्याप्रमाणे करा. ते आणि मी वेगळे नाही.’ मी माझी अडचण सांगीतली. त्यांवर सर्वांनी ‘ते पण वकील तेच म्हणाले, भोकरीकर वकील करणार असतील, तर ते आणि मी वेगळे नाही. त्यांनी केले तरी मीच केले असे समजा.’ सांगीतले. ‘मोठे ब्रह्मसंकट टाकले बुवा तुम्ही माझ्यासमोर.’ मी म्हणालो. ‘काही करा, तुम्ही नाही म्हणू नका. हे कोर्टातून मार्गी लावा, नाही तर याची नोकरी जाईल.’ हे ऐकल्यावर मी नाही म्हणणार नव्हतोच याची त्यांना कल्पना होतीच. ‘विश्वास असेल तर मग माझ्या म्हणण्याप्रमाणे करावे लागेल. फाटे फोडायचे नाही.’ मी म्हणालो. त्यांची आपसांत काय बोलणे झाले याची प्रगती ऐकली. विरूद्ध गट तक्रार मागे घेणे कठीण होते, त्यांनी घेतली तर न्यायालयाने ऐकले पाहीजे, ही अडचण होती. सर्वांना कोर्टात यायला सांगीतले. सोबत तक्रार करणाऱ्यांना पण निरोप देण्यास सांगीतले.
कोर्टात ही सर्व मंडळी आली. तक्रारदार आले नाही, ते येणारच नव्हते. लालचंद पाटलांच्या कॅन्टीनमधे बसून चहा पीत असतांना होत असलेली चर्चा त्यांनी ऐकली. त्यांनी चहाचे पैसे घेतले नाही. ‘साहेब, माझ्या पोरासाठी तुम्ही एवढं करताय आणि मी चहासुद्धा पाजणार नाही.’ म्हणाल्यावर काय बोलणार ? सरते शेवटी ‘आपसांत करायला तयार नसतील तर मग आपल्याला एक फौजदारी करावी लागेल. याच्या मागे मेंदू कोणाचा आहे हे तर शोधावे लागेल ना ?’ मी सांगीतले. बारमधे हे ऐकू जाईल असे बोलल्यावर संध्याकाळी तक्रारदार त्यांच्या वकिलाकडे हजर ! ते ‘त्यांच्या वकिलांना’ चहाला घेऊन गेले. मी घरी निघून गेलो.
दुसरे दिवशी, पुन्हा सर्व मंडळी माझ्या ऑफिसवर ! ‘तक्रारदार तयार आहे ना ?’ मी विचारल्यावर होकार आला, आश्चर्याने ! त्यांची पंचायत बसली होती आणि आपसात करून टाका म्हणून ठरले. ‘आता वेळ घालवू नका. सर्व जण कोर्टात लवकरात लवकर केव्हा येतील ते आणा. मी कागद तयार ठेवतो. तीनचार दिवसांत ही गांवातील मंडळी मागे लागली आणि सर्वांना कोर्टात हजर केले. अर्ज देवून केस बोर्डावर घेतली. ही भलीमोठी यादी पाहिल्यावर ‘यांची हजेरी असिस्टंट रजिस्ट्रार ऑफिसमधे घ्या. सर्व असल्यास सर्वात शेवटी माझ्याकडे पाठवा.’ न्यायाधीशांनी सांगीतले. हे सांगीतल्याने ‘आज काही तरी या केसमधे होतेय’ ही बातमी गांवात लागली. मग काय, कोर्ट सुटण्याच्या वेळेस कोर्टात जायला जागा नाही आणि आवारात गर्दी मावेना ! कोर्टातील त्यावेळचे असिस्टंट रजिस्ट्रार श्री. एम्. डी. परदेशी होते. ते कायद्याच्या बाबतीत नेहमीच चौकस असत. त्यांनी मला विचारले, ‘हे होईल कसे ?’ यांवर मी न बोलता, त्यांना न्यायालयात दाखवणार असलेली ॲथॉरिटी दाखवली व शांत रहाण्यास सांगीतले. त्यांनी वाचली, भराभर सर्वांची हजेरी घेतली तोवर साडेचार-पावणेपाच वाजले होते. फाईल न्यायालयात आली. युक्तीवाद सुरू झाला. ‘गावातील वातावरण चांगले रहावे, दोन्ही समाजात शांतता रहावी व सामंजस्य टिकून रहावे यासाठी, आपसांत करण्याचे ठरले आहे.’ मी सांगीतले. न्यायाधीश बहुतेक श्री. शेख होते. ‘सरकारी केस आहे ही, सेक्शन बघीतलेत का ?’ त्यांनी विचारले. यांवर ‘हो, बघीतले. आपसात करता येते. न्यायालयाची परवानगी लागते. ती त्यांनी तक्रारदार व जखमी असलेल्यांची चौकशी करून खात्री करून घेऊन मग द्यावी. सर्व हजर आहेत.’ मी सांगीतले आणि अशाच घटनेत उच्च न्यायालयाने अशा वेळी खालील न्यायालयांनी काय करावयास हवे याचे निर्देश असलेला निर्णय त्यांना दिला. तक्रारदार व जखमी झालेले हे वेगवेगळे अगोदरच उभे ठेवले होते, ऐनवेळेस शोधाशोध नको. एकदा हे हुकले की पुन्हा जमणे कठीणच ! न्यायाधीशांनी तक्रारदार व जखमींना विचारले. त्यांनी तेच सांगीतले, तिखटमीठ लावून ! न्यायाधीशांना हसू आले. त्यांनी निर्णय वाचला. सर्व कागदपत्र वाचले. त्यांच्याच सह्या असलेची विचारून खात्री केली. ‘केस काढून टाकायची का ?’ हे विचारले, यांवर होकारार्थी उत्तर आल्यावर ‘ठीक आहे. केस काढून टाकली.’ असे त्यांना सांगीतले आणि ज्यांच्यावर केस होती त्यांना ‘तुम्हाला या केसमधून सोडून देण्यात आले आहे.’ हे सांगीतले. आम्ही सर्व बाहेर आलो. बाहेरील लोकांना काय झाले नेमके समजत नव्हते. मी बाररूम मधे आलो आणि जो समोर होता, त्याला ‘आपली केस संपली आहे. सर्वांसाठी चहा सांग’ म्हणून सांगीतले. ‘तुम्ही सर्व उद्या भेटा ऑफिसवर !’ हे सांगून जायला सांगीतले.
दुसऱ्या दिवशी सर्व आल्यावर प्रत्येकालाच उत्सुकता की हे कसे काय झाले ? म्हटलं ‘हे जर आम्ही सांगायला लागलो, तर आमचे कसे होईल ?’ खोट्यानाट्या तक्रारीने एकाची आयुष्याची रोजीरोटी जाणार होती. सर्व गांव एक झाल्याने दबाव वाढला आणि सरते शेवटी माझे संत रामदास स्वामींचे ‘ठकासी व्हावे ठक, उध्दटासी उध्दट’ हे ब्रह्मास्त्र कामास आले. ‘तक्रार कोणालाही कोणाच्याही विरूद्ध करता येते, हे लक्षात ठेवा.’ हे बारमधे मी बोललो अन् वातावरण बदलले.
गेल्या आठवडाभरातील ज्या मूर्खासारख्या, डोके भडकविणाऱ्या खोट्यानाट्या घटना पाहिल्या अन् हे आठवलं !

7.1.2018

Thursday, January 4, 2018

रात्रीचा पहारा !

रात्रीचा पहारा !


एक गंमत आम्हाला आमच्या लहानपणी, अधूनमधून अनुभवायला मिळायची. ती म्हणजे गल्लीत होणारा गल्लीतील मंडळींनीच केलेला रात्रीचा पहारा !
उन्हाळा सरतीच्या दिवसांत किंवा उन्हाळा जरा लांबल्याने, पाऊस अपेक्षेप्रमाणे वेळेवर किंवा लवकर आला नाही, की वडिलधारी मंडळी म्हणायची, ‘हा उन्हाळा लांबतोय, पावसाचा पत्ता नाही. लोकांना कामधाम नाही. चोऱ्या सुरू व्हायला नको म्हणजे झालं !’ त्यांच्या तोंडातून अनुभवाचे भविष्य बोलायचे अन् खरोखर बऱ्याच वेळा तसेच घडायचे. गांवात चोऱ्या सुरू व्हायच्या.
त्यावेळी गांवात पोलीसांची संख्या ती किती असायची, फारच थोडी ! आता पण तुलनेने काही विशेष फरक पडलेला नाही. मात्र त्यावेळी असे काही गांवात चोऱ्यामाऱ्यांचे प्रकार सुरू झाले, की तक्रारी वगैरे होत असतील, पण तरी त्यावेळी आम्हा त्यावेळच्या गांवकऱ्यांचा, पोलीसांपेक्षा स्वत:वरच जास्त भरवसा ! पण गावकऱ्यांचा स्वत:वर विश्वास असलेने खरोखर हे प्रकार कमी व्हायचे, ताबडतोब ! फार झालं तरच पोलीस स्टेशन ! हल्ली उठता बसतां पोलीस स्टेशन ! खरं असो का खोटं ते ठरविणार पोलीस ! त्यामुळं ताण इतका वाढलाय की याकडे सर्वसामान्यांची बघण्याची दृष्टी बदलली.
त्यावेळी या गल्लीतील मंडळी रात्री पहाऱ्याच्या निमीत्ताने दुसऱ्या गल्लीतील मंडळींना भेटायची. गप्पा व्हायच्या, मग त्या गप्पांना ना आदि ना अंत, ना शेंडा ना बुडखा ! सुदैवाने त्यावेळी जर कोणाच्यातरी घरी जाग असेल, तर या सर्वांना मध्यरात्री चहा पण मिळायचा. त्या अंधारात चहात किती दूध आहे, चहात साखर आहे का गूळ आहे, चहाची पावडर कोणती आहे आणि चहा आणलेले कप कसे आहे, याकडे कोणाचे लक्ष पण नसायचे. पण यामुळे एक व्हायचे, गांवातील एकी, मैत्री आपोआप दृढ व्हायची. या निमित्ताने किरकोळ विसंवादी सूर विसंवादी रहायचे नाही.
त्यामुळे ही एक आम्हा बालगोपाळ मंडळींसाठी ‘गंमत’ असायची. वडील, काका, शेजारचे काका रात्री पहाऱ्याला जायचे. सकाळी केव्हातरी चार-पाच दरम्यान ते यायचे, आम्ही तर झोपलेले असायचो. दुसऱ्या दिवशी मग घराच्या ओट्यावर जेवणखाण, भांडीकुडी आटोपल्यावर जी महिला मंडळींची बैठक व्हायची, त्यात रोज नवी बातमी असे. ‘आज रात्री काय तर या भागातून पळाले, आठ-दहा होते.’ दुसऱ्या दिवशी ‘आज तर तोंडाला फडके बांधल्याचे बघीतले.’ वेगवेगळ्या गप्पा आम्हाला रोज शाळा सुटल्यावर ओट्यावर ऐकायला मिळायच्या.
ज्यांच्या गल्लीत कुत्र्यांची संख्या जास्त तिथे तर भलताच कालवा ठरलेला ! उन्हाळयात गांवात बहुतेक जण बाहेरच झोपत. घरासमोर ज्यांचे ओटे प्रशस्त ते ओट्यावर झोपत. प्रत्येकाने आपल्याच घराच्या ओट्यावर झोपले पाहिजे असे नाही, जिथे जागा रिकामी असेल तिथं गोधडी टाकून झोपायचे हे सर्वांना माहीत ! काही तर सरळ खाटा टाकून रस्त्यातच झोपत, खाटा पुरल्या नाहीत तर मोकळ्या जागेतही झोपणारी मंडळी होती. त्यात कोणाला लाज वाटत नसे अथवा भिती पण वाटत नसे. रात्र ही विश्रांतीसाठी असते, जिथे जागा मिळेल तिथे पथारी टाकायची, हा पक्का समज ! ‘भुकेला कोंडा अन् निजेला धोंडा’ ही म्हण प्रत्यक्षात आम्ही अशी बघीतलेली आहे. अशा ठिकाणी जर मग काही कालवा झाला तर मग विचारू नका. घरातील व पहाऱ्यांच्या माणसांचे चढलेले आवाज, घरातील बायामंडळी जागी होऊन बाहेर आल्याने त्यांच्या हलक्या आवाजात संवाद आणि कुत्र्यांचा कालवा !
ही गंमत, एक प्रकारचा थरार असलेली, रोज गांवात कोणत्या तरी भागांत घडतच असे ! मग जिथे असे काही घडलेले असे, त्यांचा मान जास्त; कारण त्यांच्याकडे असलेली बातमी जास्त खमंग असे ! तसे पाहीले तर प्रत्येकाकडेच काही ना काही सांगण्यासारखे असेच ! पण यांच्या घटनेचा त्या दिवशी पहिला मान ! मग तो प्रत्यक्ष घडलेले, ऐकलेले आणि घडावे असे वाटलेले यांचे एकत्रित मिश्रण करून पण सांगायचा. ते प्रत्येकालाच ऐकण्याची उत्सुकता व गोडी, आज काय झाले याची !
दुसरा एक प्रकार म्हणजे थंडीच्या काळात ! दसऱ्यानंतर थोडी थंडी पडायला सुरूवात व्हायची. शेतकऱ्यांचा पीकांचा सर्व हंगाम शेतात असायचा, तो थेट कपाशी पूर्ण घरी येई पावेतो. खरं तसं जर पाहिलं, तर मग ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, त्यापैकी गहू, हरबरा अन् थोडी मोहरी पेरणारे पण कमी नव्हते. त्यांचा हंगाम यायचा निदान होळीच्या मागेपुढे ! या काळात या सर्व मंडळींचा शेतात हंगाम उभा आणि शेतात राखणीला गेलं नाही, तर मग शेतात चोऱ्या होणार ! शेतकऱ्याची वर्षभराची, हंगामभराची मेहनत, एका क्षणात दुसरा लुटून घेवून जाणार; आपल्या हाती रिकामी जमीन रहाणार ! त्यामुळे भर थंडीतही शेतात राखोळीला जावेच लागे, मजूरीवर रखवालदार ठेवला तरी ! ‘कुंपणच शेत खाते, तळे राखील तो पाणी चाखील’ अशा कित्येक म्हणी या ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ हीच म्हण खरी असल्याचे सिद्ध करतात. शेतातली चोरी म्हणजे त्याचवेळी सापडली तरच नंतर माल मिळायचा, चोरट्याला धडा शिकवून; नाही तर मग काही खरं नाही.
चोरी करणे हा पूर्वीपासूनच कौशल्याचा भाग मानला गेला आहे, एवढेच नाही तर तिला ‘चौर्यकर्म’ म्हणून आपण वर्गवारी केलेल्या ‘चौदा विद्या व चौसष्ठ कला’ यांत देखील स्थान दिले आहे. अलिकडे या कलेत बरीच मंडळी पारंगत झाल्याने त्यांना क्षेत्र कमी पडू लागले. त्यामुळे फक्त शेतीतच नाही तर जिथं कुठं याला वाव दिसेल अशी विविध क्षेत्र शोधण्याचे काम सातत्याने सुरू असते. या कष्टाला फळ येणारच ! आता तर इतकी क्षेत्रं शोधलेली आहेत आणि हे कौशल्य इतक्या क्षेत्रांत पसरलेलं आहे की असे अपवाद म्हणूनही कोणते क्षेत्र शिल्लक नसेल की जिथं चोरी झाली नाही किंवा ज्या क्षेत्रांत आपल्या ‘चौर्यकर्माचे कौशल्य’ दाखवणारी मंडळी नाहीत. असो. आपण प्रगतीपथावर आहोत.
थोडक्यात पण मग थंडीचे दिवस आले की हाच प्रकार ! नंतरच्या काळात वयोमानाने ही मंडळी रात्रीच्या पहाऱ्यासाठी म्हातारी झाली आणि आमच्यासारखी तरूण मंडळी त्यांची जागा घ्यायला आली.
वीसबावीस वर्षांपूर्वी हाच प्रकार झाला. आमच्या कॉलनीत ही बातमी पसरली. बाहेरून गॅंग आलीय, चोऱ्या वाढल्याय ! आमच्या कॉलनीत तर सुटीसुटी पण निदान शंभर तरी घरं होती, पण ही कॉलनी गावाबाहेर, अगदी भर रस्त्याला लागून ! रस्त्याला घर लागून असले की जसे ‘सर्वांचे लक्ष असते त्यामुळे सहसा चोऱ्यामाऱ्या कमी होतात. कोणी पाहील, ही भिती असते.’ हा फायदा तसेच ‘सर्व काम आटोपून, चोरट्याला लगेच पसार होता येते’ हा तोटा ! कॉलनीसाठी वॉचमन ठेवायचा का नाही ? यांवर चर्चा झाली. ‘काही गरज नाही. भर रस्त्यावर आपली घरं आहेत. कोण येतोय मरायला ? त्या गावातल्या गुरख्यालाच देवू दहा रूपये वाढवून, झाले ! तो चांगला लक्ष देईल मग !’ एकाने आपले सडेतोड मत व्यक्त केले. जणू गुरखा दहा रूपये कमी मिळत असल्याने, काम नीट करत नव्हता किंवा गुरख्याला दहा रूपये जास्तीचे मिळावे, म्हणून चौर्यकर्म करणाऱ्यांनी आपले कौशल्य दाखवायला सुरूवात केली होती. पण हे असे अनुभव सर्व ठिकाणी येतात, कारण प्रत्येक ठिकाणी या विचाराची मंडळी असते. बरीच भवती न भवती होऊन कॉलनीसाठी शेवटी वॉचमन नेमायचा ठरला ! त्याचे पैसे ठरले.
हा वॉचमन मग कामावर येवू लागला. रात्री साधारणत: नऊ साडेनऊच्या दरम्यान त्याचे शिट्यांचे आवाज यायचे. ते येत असल्याने आम्ही निर्धास्त होतो. जेवणखाण आटोपून दहा-साडेदहाला झोपायचे, तर पहाटे पांचच्या दरम्यान उठायचे हा माझा नेम ! त्यामुळे हा वॉचमन रात्रभर जागतो का नाही, याची मला कल्पना नव्हती. तरी वॉचमन पण बरोबर काम करतो की नाही, यांवर बारीक वॉच ठेवणारी मंडळी आमच्यात देखील होती. ही अशी मंडळी प्रत्येक ठिकाणी असतात, त्यामुळेच सर्वत्र बरं चाललंय ! ‘रात्री मोठ्या मुश्कीलीने बारा-एक पर्यंत असतो, मग काही त्याचा आवाज येत नाही. नेहमीच्याच गुरख्याचा आवाज येतो.’ ही त्यांनी दिलेली माहीती आम्हाला नवीन होती. आता यांवर काय करणार ? ‘त्यांनी त्यांच्या ड्युट्या वाटून घेतल्या असतील. तुम्हाला काय समजणार ?’ यांची विचारशक्ती अफलातून होती. ‘मग करणार काय ? वॉचमनला काढून टाकायचे का ?’ मी विचारले. ‘ते तर अजिबात नाही करायचे. तसे केले तर मग विचारायलाच नको, कारण मग हेच त्यांना आपली घरं दाखवतात xx करायला. कुठला रखवालदार सुटला ही माहीती ताबडतोब xxx कळते.’ ते निराशेने व भितीने बोलले. फुल्यांच्या जागचा शब्द बोलायला पण ते घाबरत होते. ‘मग काय करणार ? वॉचमनला काढायचे नाही, कारण तो आपली घरं दाखवेल चोरांना आणि तो काम पण करत नाही. मग नुसता पगार द्यायचा का मग ?’ मी त्राग्याने बोललो. ‘रात्रीच्या वेळी हे असे शब्द बोलायचे नसतात. भिंतीला कान असतात. काही करता, काही भलतंच व्हायचं ! तुम्ही पोरं तुम्हाला काय समजतं ?’ त्यांचा सूज्ञ सल्ला. ‘मग तुम्ही सांगा !’ आमच्यापैकी एकाने त्यांनाच मोठेपणा दिला. ‘सर्वात पहिले हे ठरवा की वॉचमनला अजिबात काढायचे नाही. त्याची फक्त वेळ बदलवायची.’ त्यांनी सांगीतले.
त्यांचे दोन्ही उपाय मनोमन पटलेलेच होते, अगदी सर्वांनाच ! कारण हा वॉचमन रात्रीचा तुलनेने लवकर येत असलेने, ज्यांची लहान मुले होती आणि ती चौकस होती, ती प्रश्न विचारून भंडावून सोडत की ‘बाबा, शिट्या कोण वाजवतोय ? का वाजवतोय ? मला पण आणून द्या शिटी, मला आवडते ती.’ यांची उत्तरे देतादेता आणि बालमानसशास्त्रानुरूप वागता वागता डोकं पकण्याची वेळ आली होती. पण त्या आठवड्यात एक लक्षात आले की कॉलनीतील जवळपास सर्व लहान मुलांजवळ शिट्या दिसायल्या लागल्या होत्या. दिवसभर घरात व कॉलनीत यांच्या शिट्यांची ‘फुर्रऽऽऽऽ फुर्रऽऽऽऽ’ आणि रात्र झाली की वॉचमनची ‘फुर्रऽऽऽऽऽ’ ! सर्वजण त्रस्त झाले होते. वॉचमनला कामावरून काढून, आपले घर चोरांना दाखवले जावे, हा धोका पण कोणाला पत्करायचा नव्हताच.
मग सर्वानुमते ठरले, की आपणच रात्रपाळी करून पहारा देत जावू. याची कल्पना त्या वॉचमनला देवू. त्याला पण बरे वाटेल व त्याच्यावर वचक राहील. प्रत्येक घरातून निदान एक-दोन जण घ्यायचे. आपली शंभर घरं आहेत, निदान शंभर जण तरी निघतील, याची यादी करा. सर्वांचे मग दहा-दहाचे गट करायचे, म्हणजे घरातील प्रत्येकाला दहा-अकरा दिवसांनी ड्यूटी करावी लागेल, कोणावर ताण पडणार नाही. जर कोणी काही कामामुळे रात्रपाळीला येणार नसेल, तर त्याने अगोदर कल्पना आपल्या गटात द्यायची; म्हणजे दुसऱ्या दिवशी जो असेल, त्याला घेता येईल आणि हा मग जो त्याच्या जागेवर गेला त्याच्या रात्रपाळीच्या दिवशी जाईल. सर्वांना सोबत शस्त्र ठेवायला सांगीतली. जाडजूड काठी प्रत्येकाजवळ हवी. त्याला खाली लोखंडी रिंग बसवून घ्यायला सांगीतले कारण काठीला मजबुती येते. मग राखण फिरस्ती ही रात्री अकरा वाजेपासून ते साधारणत: चार-साडेचारपर्यंत करा. रस्त्यावर वाहतूक चांगली सुरू झाली की घरी जायला मोकळे.
आम्ही रहात असलेला भाग शेताचाच व गांवाबाहेरील असल्याने जनजनावर नेहमीच तिकडे हमखास असायचेच. घरांना लागूनच बागायतीचा भाग असल्याने थंडी जास्तच जाणवायची, जंगलातील जनावरांचा पण काही वेळा वावर असायचा. त्यांच्या घरावर आक्रमण केल्यावर ते काय करणार ? तसे पाहिले तर आमचे गांव हे सातपुड्याच्या कुशीतीलच !
आमची रात्रपाळी सुरू झाली. रात्री अकराच्या बातम्या संपल्या की सर्व जण थंडीचा व्यवस्थित बंदोबस्त करून बाहेर पडायचे. कॉलनी तशी खूप मोठी नसल्याने सर्व कॉलनी पार करायला, अगदी रमतगमत पण, पंधरा मिनीटे लागायची. सर्वांच्या घरांवरून जायला पाहीजे, हे ठरवल्यावर मग अर्धा-पाऊण तास लागू लागला. गप्पा करत जायचे, पण थंडीत काय गप्पा मारणार आणि रोज नवीन विषय तरी काय आणणार ?
पहिल्या दिवशी रात्री दीड-दोनच्या दरम्यान नेहमीचा गुरखा आला, त्याची शिटी लांबून ऐकू यायची. जवळ आल्यावर त्यांने आम्हाला सर्वांना पाहिल्यावर तो चकीत झाला. ‘साब, क्या हुआ । आज आप सब लोग ?’ त्याने विचारल्यावर त्याला ही हकीकत सांगीतली. हे सर्व आपल्यातलेच झाले म्हटल्यावर मग त्याला पण बरे वाटले. त्याने मग त्याच्या कामातल्या एकेक खुब्या सांगीतल्या. शिटी का मारायची ? किती वेळाने मारायची ? तिचे किती प्रकार, त्या प्रत्येक शिटीचा अर्थ ! एकमेकांना आम्ही लांबून निरोप कसे पोहोचवतो, कोणत्या भाषेत ! सर्व गांवाची राखण कशी करावी लागते ? किती लोक लागतात ? सध्या किती आहे ? एक भाग किती वेळात होतो ? या भागातील निरोप शेवटपर्यंत कसा पोहचविला जातो. एकच गुरखा एकाच भागांत नसतो, तो पण त्याचे भाग बदलवतो, जरी पैसे देणारी त्याची घरे बदलविली नाही तरी ! त्याला शिटी कुठे आहे हे विचारल्यावर त्याने ‘हम अलग मेटलवाली शिटी नहीं रखते । हम अपने मुँहसे बजाते ।’ आणि त्याने वाजवून दाखवली. आजपासून तुम्ही म्हणजे गांववाले राखण करताहेत हे कळवतो इतरांना म्हणजे तिकडून असा निरोप येईल. त्याने निरोप देण्याची व उत्तर येण्याची, अशा दोन्ही शिट्या हळू वाजवून दाखवल्या; मग जोरात वाजवून दाखवल्या ! खरोखर तिकडून उत्तर आले. पुन्हा शिटी आली. याचा अर्थ विचारल्यावर ‘हे इतरांना कळवतो. आपल्याला बरे झाले.’ हा अर्थ असल्याचे सांगीतले. गुरख्याच्या शिटीच इतके अर्थ असतात हे मला त्या दिवशी प्रथमच समजले. आपण शिटीचे निष्कारणच वेडेवाकडे अर्थ काढतो.
कुठला नेपाळ आणि तेथून कोणीही बोलावलेले नसतांना, ही मंडळी येतात प्रत्येक गांवात. स्वत:हून राखणदारीचे काम सुरू करतात, घरप्रत पंचवीस-तीस रूपये घेवून आपला विनातक्रार उदरनिर्वाह करतात. कसली ग्रॅच्युईटी, कसला प्रॉव्हीडंट फंड, कसली कंटीन्युईटी ऑफ सर्व्हीस, कसले रिटायरमेंट बेनिफिटस्, कसले पेन्शन ? यांना यांत काय मिळत असावे की हे पिढ्यानपिढ्या यांतच आहे ? प्रामाणिकपणे सतत काम करत राहीले की तुम्ही याच कामासाठी ओळखले जाणार, एवढे निश्चित ! यांचे या कामात इतके नांव झाले, विश्वासार्हता आहे की ‘राखणदार नेमला’ या ऐवजी ‘गुरखा’ नेमला हे आपण म्हणू लागलो.
रात्री दीडदोनला असेच फिरत असतांना, बातमी समजली की आठदहा जणांची टोळी अजंद्याहून निघून विवऱ्याकडे गेली आहे. तीनचा सुमार असावा, तेवढ्यात कोणीतरी शहाणा गाडीवाला बुरहानपुरहून आला, गाडीत मुलंबाळं आणि स्त्रियां होत्या; अन् त्याला जळगांवकडे जायचे होते. त्यात रस्त्याबद्दल त्याला खात्री नव्हती. त्याने आम्ही सर्व उभे होतो, रेस्टहाऊसपाशी; आम्हाला ‘कोण म्हणून’ विचारले. आम्ही कॉलनीवाले म्हणून सांगून रस्ता सांगीतला, अन् आठवणीने सांगीतले, ‘रस्त्यात कोणी हात दाखवला तरी अजिबात थांबू नका. सरळ जावू द्या.’ त्याने भराभर मुंडी हलवली आणि जोरात गाडी सोडली. पाचपन्नास फूट गेला असेल, तो थांबला. गाडी वळवली, पुन्हा आमच्याकडे आला, गाडीतल्या स्त्रियांनीच आमचे आभार मानले, ‘आप जैसे मिल गये, अच्छा हो गया । इनको क्या समजता ?’ रात्री अपरात्री यांना काही समजत नाही, हे आत्मविश्वासाने सांगणारी स्त्री दुसरी कोण असणार ? आमचे आभार मानून त्यांनी गाडी सुसाट गांवात घातली.
या गडबडीत आमचे सकाळचे फिरणे थोडे विस्कळीत झाले होते. वडीलधाऱ्या मंडळींचा सकाळी मैल दोन मैल फिरण्याचा दिनक्रम मात्र नियमीत सुरू होता. आम्ही अधूनमधून जायचो, रात्रपाळीची रखवाळी सांभाळत. असे साधारणपणे चारपाच आठवडे गेले असतील. सकाळी असाच फिरायल्या गेल्यानंतर घरी परत आलो तर काय ? ओट्यावर ही सर्व वडीलधारी मंडळी वर्तमानपत्र घेऊन बसली होती. मी आल्याबरोबर, ‘हे रात्रभर गस्त घालत फिरणे काय खरं आहे काय ? पेपरमधे काय आलंय, वाचलं का ?’ विचारले. मी म्हटलं, ‘काय ? मला कल्पना नाही.’ यांवर त्यांनी वर्तमानपत्र हातात दिले, अन् ‘वाचा, काय रात्रीचं फिरणे म्हणजे जीवावर उदार होणं झालंय !’ म्हणाले. मी वर्तमानपत्र पुढूनमागून बघीतले. रोजच्याच बातम्या ! विशेष काही नाही. ‘शेवटच्या पानाच्या आदल्या पानावर खाली कोपऱ्यात वाचा.’ हे बोलल्यावर बघीतले. तर ‘स्टेशनरोड अजंदा उटखेडा भागांत वाघाच्या पायाचे ठसे दिसल्याचे वार्ताहर सांगतो.’ अशी बातमी तपशीलवार छापली होती, ती वाचली. ‘हं, इकडे वाघ फिरतोय आणि त्याच्या बरोबरीने सोबत काय आपण फिरणार ? हे म्हणजे ‘असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’ झालं.’ अशी प्रतिक्रिया नोंदविली. ‘मग रात्रीची गस्त ?’ मी म्हणालो ! ‘ते रात्री पाहू,’ त्यांचे तात्काळ उत्तर !
रात्री सर्वांची बैठक नेहमीप्रमाणे झाली. ही बातमी तर जोरात चर्चेत होती. पहातापहाता एकदीड वाजला. नेहमीचा गुरखा आला. आम्ही सर्व एका ठिकाणी बसलेले असू हे त्याला अपेक्षित होतेच. त्याला ही बातमी सांगीतल्यावर आश्चर्य वाटले नाही. ‘ये तीन दिनसे मालूम था मुझे । कुछ जंगलका माहोल बदल गया था ।बादमें आया पेपरमें । अभी रात जादा घुमनेंकी जरूरत नहीं । एक जगह बैठकर शिटी मारते रहना, पंधराबीस मिनीट बाद आगे जाना । खेतींमे चोरी तो छोड दो अभी । जब शेरोंवाली मॉं ख़ुद रक्षा करने लिए बाहर पड़ी हैं तो ऐसे थोड़ी जायेगी, और किसकी हिंमत हैं की उनके सामने कोई चोरी करें।’ हे त्याचे बोलणे ऐकल्यावर आम्हाला त्या मध्यरात्री पण हसू आले. आणि खरोखरच —— नंतर शेतातल्या चोऱ्यांच्या बातम्या ऐकू येईनाशा झाल्या. आमची गस्त पण अधूनमधून झाली.
‘जब शेरोंवाली मॉं ख़ुद रक्षा करने लिए बाहर पड़ी हैं तो किसकी हिंमत हैं की उनके सामने कोई चोरी करें।’