Saturday, January 18, 2020

चहाचे बील कोणी द्यावे ?

चहाचे बील कोणी द्यावे ?
नुकतीच वकीली सुरू केली होती, त्यावेळी रावेरला आमच्या बाररूममधे चहापाण्याची वेळ आली, की मजा यायची ! तशी चहाची फार अशी आवड मला नव्हती, मग माझ्यासाठी मुद्दाम काॅफी बोलावली जाई. आमचा कॅंटीनवाला, लालचंद पाटील तर फक्त ‘मी आहे का’, एवढी चौकशी करून माझी काॅफी बऱ्याचवेळा पहिले घेऊन येई. यांवर पण, मला गमतीने बोलणे खावे लागत.
‘या ज्युनिअर लोकांचे बरे आहे, सिनीअरांच्या अगोदर नंबर !’
एकदा आम्ही असेच कॅंटीनमधे चहा प्यायला म्हणून, पाचसहा वकील मंडळी गेलो होतो. मी तर सर्वात ज्युनिअर !माझे चहापाण्याचे काम आटोपले, पण इतर वकील गप्पा मारत होते. मी उठलो आणि काउंटरपाशी आलो, आणि सर्वांचे चहापाण्याचे पैसे दिले. तेवढ्यात सर्वांचे आटोपले, आणि ते पण आले. आमच्याकडे त्यावेळी सर्वात जेष्ठ वकील हे, आर. जी. चौधरी होते. त्यांनी पैसे देण्यासाठी पैसे काढले. लालचंद पाटील यांनी, त्यांना मी पैसे दिल्याचे सांगीतले. एरवी शांत असणारे आर. जी. चौधरी वकील रागावले, आणि म्हणाले -
‘लालचंद, चहाचे बील कोणी द्यायचे असते ? लहानांनी का मोठ्यांनी ? ते पैसे परत दे, आणि इतके माहीत नाही तुला ? यापुढे लक्षात ठेव !’ लालचंद पाटील यांनी मला पैसे परत दिले. आर. जी. चौधरी वकीलांनी पैसे दिले. ही गंमत मदनलाल बोरा हा लालचंद पाटलांचा सहकारी पहात होता.
तिथून निघाल्यावर चावरे वकील त्यांना म्हणाले, ‘आज रामभाऊंना रागवतांना बघीतले बुवा.’ त्यांवर आर. जी. चौधरी वकीलांना हसू आले. मात्र, त्यांनी चावरे वकीलांना व मला ‘वडीलधारेपण जपणाऱ्या ज्या पद्धती आहेत, त्या आपण सर्वांनी जपल्या पाहीजेत. आपल्यांत आपुलकीची भावना रहाते. उद्या तुम्हाला व्यवसायातील काही अडीअडचण आली, तर याच आपुलकीच्या भावनेने तुम्ही नि:शंकपणे आमच्याकडे याल. यातूनच पुढची पिढी घडत असते. यापुढे तुमच्यापेक्षा कोणी सिनीअर वकील असेल, तर असे करू नका. तुम्हाला विशेष वाटत नाही, पण तो दुखावतो.’ मी हे ऐकल्यावर अक्षरश: खजील झालो.
तेव्हापासून ठरवून टाकले, आमच्यासोबत चहापाण्यास जर कोणी वडीलधारा वकील योगायोगाने जरी आला असेल, तर प्रघाताप्रमाणे, चहापाण्याचे बील त्याने द्यायचे असते. ज्युनिअर वकीलाने पैसे द्यायचे नसतात. यावरून शहाणा होऊन, मी वरिष्ठ वकील श्री. वालावलकर, यांना मुंबईला काही कामाने भेटायला गेल्यावर, चुप्प काउंटरपाशी त्यांची वाट बघत उभा होतो. माझा अविर्भाव पाहून, त्यांना पण हसू आले.
आता ज्ञानाने झालो आहे, किंवा नाही ते सांगत नाही, पण वयाने बऱ्यापैकी वरिष्ठ झालो आहे. ही चालत आलेली पद्धत आता, मी कटाक्षाने पाळतो, अगदी अपरिचित वकील जरी सोबत असेल तरी ! चांगल्या, आपुलकी निर्माण करणाऱ्या पद्धती, आपण किरकोळ व्यवहाराचा विचार करत, गमवायला नको. त्या व्यवहारातून मिळणाऱ्या तात्पुरत्या फायद्यापेक्षा, कायमस्वरूपी होणारा तोटा जास्त असतो.
आताच Rajesh Mandlik यांची पोस्ट वाचली. वडीलधारा म्हणून बील दिले आणि मला आमच्याकडील वकीलांत असलेली, पद्धत आठवली.
—— अलिकडे यांत पण बदल होत आहे. वेदना होतात त्यावेळी ! व्यवहाराच्या नादात आपण कितीतरी चांगल्या, आपुलकी निर्माण करणाऱ्या गोष्टी सोडून देत आहोत.

25.12.2019

आवाजातील वेदना !

आवाजातील वेदना !
अलिकडे काय होतं, कोणास ठाऊक ? कोणाची एखादी पोस्ट वाचावी, तर ती आपल्या डोक्याला चालना देत, मनातील जुन्या व हळव्या ठिकाणांना हात घालते. काल श्री. जयंत विद्वांस यांनी लिहीलेली, चित्रपटातील दु:खद प्रसंगावरची पोस्ट वाचली, अन् का कुणास ठाऊक मला मराठी नाटक आणि नाट्यप्रसंग आठवायला लागले. आज नाटकांतील काही प्रसंग त्यांना आठवले, त्यांवर ते व्यक्त झाले.
ते वाचले, आणि मला आकाशवाणीवर गाजलेली नभोनाट्य आठवली.
शांता जोग ! आकाशवाणीवर त्यांनी भूमिका केलेले ‘स्पर्श’ नांवाचे नभोनाट्य आहे. महारोग्याच्या भावनांवर, त्यांना महारोग झाला होता असं दाखवलंय ! मी ऐकलंय.
करूणा देव, पूर्वीच्या नीलम प्रभू ! यांची आवाजावर कमालीची हुकूमत ! त्यांचे पण एक नभोनाट्य आहे, ‘त्या तिघी’ नांवाचे ! त्यांत तीन पिढ्यातील तीन स्त्रिया, आजी, आई आणि मुलगी, हेच तीन पात्र होते. या तिन्ही भूमिका त्यांनी केल्या होत्या. आवाजातील बदल ऐकावा त्यांचा ! मी हे पण ऐकलंय !
अजून एक, ‘गॅरंटी’ या नांवाचे, व. पु. काळे यांचे ! यांतील भूमिका बहुतेक विनय आपटे यांनी ! काळीज हलवून टाकणाऱ्या कथानकाला, पाझर फोडणारा आवाज आहे.
‘राऊ’ या नांवाचे अजून एक नभोनाट्य ! थोरल्या बाजीराव पेशव्यांवर आणि मस्तानीवर ! त्यात बाजीरावाचे काम केले होते, प्रसिद्ध नाट्यकलावंत भैय्या उपाख्य गजानन उपासनी यांनी ! बाजीरावापासून मस्तानीला तोडण्याचे जे कारस्थान सुरू असते, ते पाहून वाईट वाटते. अरे, बाजीराव पण माणूस होता. त्याला पण भावना होत्या. भैय्या उपासनींचा आवाज, काय लागला होता. मला आठवायचे कारण, मी चिमाजी अप्पाची भूमिका केली होती.
हे सर्व नभोनाट्य मी काॅलेजला असतांना ऐकले, अनुभवले ! अजून कानांत ऐकू येतात. गवयाचा गायनातील स्वर आणि नटांचा नाटकांतील स्वर काही विशेष फरक नसतो. दोन्ही पण ह्रदयाला हात घालतात, मनाला हात घालतात, रक्तबंबाळ करतात.

26.12.2019

बैल, छत्री आणि लालसर पंचा !

बैल, छत्री आणि लालसर पंचा !
काही काही माणसं ही गांवावरून ओवाळून टाकलेली असतात, गांवाला भयंकर उपद्रवी व त्रासदायक असतात. त्यांचा हक्कांबाबतचा कायदा फार पक्का असतो. त्याचे निर्लज्जासारखे ते सर्वांसमोर त्याचे प्रदर्शन करतात, परिणामी भिडस्त व पापभीरू माणसं, ही मुकाट्याने त्यांचा मुजोरपणा सहन करतात. त्यांच्या कर्तव्याबाबत मात्र बोंब ! आपण त्या गांवचेच नाही, अशी त्यांची तऱ्हा ! मात्र एखादेवेळेस अशी काही घटना घडते, की त्यांचा बऱ्यापैकी हिशोब बसला जातो, अगदी व्याजासहीत. अशीच एक ही घटना ! तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची. आता कदाचित काहींना समजणार नाही, तर काहींना कालबाह्य वाटेल.
गांवाकडची गोष्ट ! फटफटलं, पहाट झाली, की कामाला जाणारे शेतकरी, मजूर ! हे सर्व बहुतेक लवकर उठून शेतात कामाला जायचे. त्यावेळचे शेताचे रस्ते, विचारू नका. सर्व कच्चे रस्ते आणि त्याची अवस्था पावसाळयात तर विचारायलाच नको. रस्त्यावरचा चिखल अगदी सरसरीत लगदा असायचा. पायताण घालून जाण्यापेक्षा अनवाणी जाणं परवडायचं अशा वेळी ! शिष्टासारखे नव्या वहाणा पायात घालून गेलेले, कित्येक जण रस्त्याच्या मधोमध एक वहाण एका पायात, आणि दुसरा पाय अनवाणी, त्याची वहाण दोन्ही हातात धरून बघताय, काय झाले तिला, अशा अवस्थेत उभे असलेले दिसायचे.
सर्व माणसांची जाण्यायेण्याची लगबग असायची, ती मात्र पावसाळ्यातच ! केव्हा पाऊस येईल याचा नेम नसायचा. तो आला, की झाडाखाली आसरा घ्या ! डोक्यावर गोणटं उलट दुमडून पण काही जात असायचे. चालतातालता असे काही रस्त्यात घसरून पडणे, मग अंग चिखलाने लडबडणे, यांत कोणाला काही विशेष वाटत नसे, कारण शेतातल्या कामात पण मातीत खेळावे लागे. त्यामानाने रस्त्याने जाणाऱ्या बैलगाड्यांवर बसलेली माणसे भाग्यवान ! त्यांचा या चिखलात घसरून पडण्याशी फारसा संबंध येत नसे. मात्र बैलगाडीला रस्ता मोकळा करून देण्याच्या नादात, रस्त्याने चालणाऱ्यांना, रस्त्याच्या इतके काही कडेला जावे लागे, की तिथं असलेल्या निसटाणीवरून, घसरून त्यांना पुन्हा रस्त्यात पडायची नामुष्की येई. हातातले जेवण्याचे गाठुडं सर्व खराब होई. काही वेळ तर या गडबडीत, पाय काट्यावर पडे, कारण कोणाच्या शेताच्या हद्दीवर, शेतात ढोरंढाकरं घुसू नये, म्हणून काट्यांचे कुंपण लावलेले असे. मग हे संकट आल्याने अज्ञात पोकळीत शिव्यांचा त्राग्याने मनाशीच भडीमार होई.
या गडबडीत चिखलात भरलेल्या पायात काटा जाऊन, तो पायात मोडला, की भयंकर त्रासदायक प्रकार होई. लंगडत लंगडत, उचकत उचकत चालत, घरी किंवा शेतात पोहोचल्यावर, तो बारीक सुईने कोणाकडून तरी काढून घ्यावा लागे. काहीवेळा तो अर्धवट निघे, आणि बाकीचा पायातच राही. मग त्या ठिकाणी कणभर गूळ लोखंडी सराट्यावर घेऊन, जरा चुलीच्या किंवा शेकोटीच्या जाळावर धरत. तो गूळ वितळून पातळ होई, की तो रस अगदी सराट्यासहीत, जिथे काटा टोचला असे, तिथं टेकवला जाई. काही वेळ पायाला चटका जाणवे, मात्र काटा काढण्याच्या नादात बरीच कातडी सोलली गेली असेल, तर चटका जोरात बसे. असे केल्यामुळे काटा वर येतो, लगेच काढता येतो, ही समजूत.
काही वेळा, ज्यांचे शेत त्यांच्या घरापासून जरा जवळ असे ते, किंवा ज्यांची गाडी काही कारणाने शेतात राहिली, किंवा बैलगाडी नादुरुस्त असली, मात्र बैलांकडून तर शेतात काम करून घ्यायचे आहे, अशावेळी मग ते, बैलांना जू बांधून त्यांवर नांगर, वखर उलटे टाकलेले अशा स्थितीत, बैलांमागे शेतकरी कासरा घेऊन जात असे. हा एक अजून धोकादायक प्रकार असे. यांना जातांना जागा कमी लागत असल्याने, जाताजाता बैलाच्या शेपटीचा फटकारा किंवा बैलाचे तोंड आपल्याला लागायचे. काही वेळा बैल रस्त्यात उधळायचे, त्यावेळी मात्र बैल सावरणारा आणि रस्त्याने जाणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडत असे. त्यात पण माणसांची, त्यांच्याजवळ असलेल्या सामानाची पडझड व सांडलवंड होत असे. काही वेळा ही धावपळ अचानक, लगबगीने, विनाअंदाज करावी लागत असल्याने यांत खरचटणे, रस्त्यावर फरफटत जाणे, जमिनीवरून अधांतरी उचलले जाऊन मग उंचावरून पडणे वगैरे प्रकार क्षणात आणि विनासायास होत असत. काही वेळा अशा अपघाती घटना मुद्दाम घडाव्या, म्हणून देखील काहींचा जाणीवपूर्वक प्रयत्न असे, कारण दुसऱ्याची फजिती करायची आणि ती बघायची, तेवढीच करमणूक !
गांवात एक जण होता, त्याला काहीही नांव द्या, कारण असा उपद्व्यापी प्रत्येक गांवात असतो. तो आपल्यासोबत कायम काळी छत्री आणि खांद्यावर लालसर पंचा बाळगायचा. तो रस्त्याने जात असला, अन् बैलगाडी मागून येत असली, की हा अचानक त्याच्या छत्रीची उघडझाप करायचा. काही वेळा बैलाच्या डोळ्यासमोरून लालसर पंचा विनाकारण झटकायचा. बैलाची काय भावना आहे, कल्पना नाही, पण बैल छत्रीच्या उघडझापीने व लाल कापड डोळ्यांसमोर दिसले, की बावचळतात, बिथरतात आणि नियंत्रणाबाहेर जातात. या बैलांचे पण तसेच व्हायचे. ते अचानक डोळ्यांसमोर काळे लालसर नाचले, की बावचळायचे. अशा बावचळलेल्या क्षणी माणूस काय करेल, याचा नेम नाही; ते तर बिचारे जनावर ! ते आपल्या अंगभूत ताकदीने व मस्तीने सर्व बंध तोडायला बघायचे. त्यामुळे गाडीवानाला बैलांना सावरतां सावरतां नाकी दम यायचा. गाडीवान बैलाचे कासरे ओढताओढता इतक्या काही विचित्र शिव्या द्यायचा, की पुन्हा त्याच द्यायला सांगीतल्या, तर देता येणार नाही. या आरड्याओरड्यामुळे बैल रस्त्याच्या पटकन दुसऱ्या कडेला जायचे, अन् तिकडून मुकाटपणे चालणारे धडपडून व ठेचकाळून पडायचे. आणि ‘अरे अरे अरे’ म्हणता म्हणता, बैल खाली मान घालत, तिरपे बघत किंवा खालून मान वर करून मानेला हिसडे देत, झपकन उडी मारल्यासारखे करत गाडी पुढे न्यायचे. एका हाताने कासरा आणि दुसरा हात व दोन्ही पायांनी बैलगाडीतील सामान पडू नये, म्हणून धडपड करत गाडीवानाची क्षणांत दमछाक व्हायची. काही वेळा तो पण गाडीतल्या गाडीत वेडावाकडा व्हायचा. गाडीत बसलेल्या सर्वांची बुडे एका क्षणात किंचींत वर येऊन दुसऱ्या जागेवर धडपडायची. गाडीतून पडून नये म्हणून स्वत:ला सावरावे, का सामान आवरावे, का खिशातल्या व पिशवीतल्या वस्तू सावराव्या, या द्विधा मनस्थितीत बसणाऱ्यांचे काहीतरी तंत्र बिघडायचेच ! गाडी वेडीवाकडी पुढे गेलेली असायची. ही गंमत पहात, हा मग मनाशीच हसत, मागे रेंगाळायचा.
रस्त्याने जाताजाता, अधूनमधून कोणी नसतांना कोणाचा पाण्याचा बांध फोडणे किंवा दुसऱ्या वाफ्यात लावून देणे, हा त्याच्या हाताचा मळ होता. मग शेतात पाय ठेवल्याबरोबर जेमतेम पावशेर वजनाची चप्पल ही चिखलामुळे पाचकिलोची होऊन जायची. माणूस पायाला वजन बांधून चालणाऱ्या पैलवानासारखा चालायला लागायचा. हा तिथं नसायचा, पण मनातल्या मनांत डोळ्यांसमोर ते चित्र आणून खूष व्हायचा.
याच्या या स्वभावाबद्दल गांवात त्याला बरेच जण बोलायचे, कारण याचे उपद्व्याप सर्वांना माहीत असायचे. मात्र यांवर त्याची काही उत्तरे लोकांच्या पाठ झाली होती.
‘मी केले हे कशावरून म्हणताय ? पुरावा हवा. नाही त्याचे आरोप माझ्यावर करू नका.’
‘रस्त्याने जातांना छत्री, पंचा न्यायचा किंवा नाही, यांवर कायद्याने कोणी बंधन आणू शकत नाही.’
‘छत्री केव्हा उघडायची, किंवा उघडून लगेच बंद करायची, किंवा तिची उघडझाप करायची, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तुमच्या बैलगाडीकडे पाहून मी कधीही असे केलेले नाही, करत नाही. छत्री व बैलगाडीचे येणे हा योगायोग असू शकतो. त्याच्या परिणामांस मी जबाबदार नाही.’
‘मी कोणत्या रंगाचा पंचा वापरावा, आणि त्याचा कसा वापर करावा, यांवर कायद्याने कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही. माझ्या पंचाने बैलांची माथी भडकतात आणि ते उधळतात, ही केवळ तुमची कल्पना आहे. याला कसल्याही पुराव्याचा आधार नाही.’
सर्व गाव व गांवकरी याच्या वागणुकीने त्रस्त झाले होते. हा रस्त्यावर जात असला, तर लोक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जायचे. थांबून जायचे. काही तर घाबरून, हा पार दिसेनासा होईपर्यंत झाडाखाली आराम करायचे. काहींनी याच्या येण्याजाण्याच्या वेळेचा छडा लावला, आणि ती वेळ टाळून ते जाऊ लागले.
या त्याच्या अशा उत्तराने, वागणुकीने त्याने एकदोनदा पोलीसस्टेशनच्या पण वाऱ्या केल्या होत्या. मात्र याचे बिनतोड मुद्दे ऐकल्यावर फौजदार चरफडण्या व्यतिरिक्त काही करू शकला नाही. कावेबाजपणे वागणारे आणि कायदेबाज लोकांपासून पोलीसस्टेशन पण जरा जपून असते. कोणतीही गोष्ट निष्कारण त्यांच्यावर शेकून, गाजावाजा खूप होतो. मग ते निस्तरता निस्तरता विनाकारण तिसऱ्याच भानगडी त्यांच्या मागे लागतात. मात्र अशा व्यक्तींसाठी पोलीसस्टेशन संधीची वाट अवश्य पहात असते. हे असे जास्त काळ किंवा कायमचे चालू शकत नाही. शेरास सव्वाशेर कोणीतरी भेटतोच, किंवा तशी वेळ यावी लागती. ती वेळ आली.
एकदा त्याच्या अशाच उपद्व्यापाने एकाचा पाय जोरात मुरगळला. त्याला जमीनीवर पाय टेकवता येईना. त्याच्या पोराला याची शंका होतीच. दिवस पावसाळ्याचेच होते. त्याच्या पोराने दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाण्याची तयारी केली. त्याला तशी सवय नव्हती. त्याने नुसते बैलाच्या मानेवर जू ठेवले आणि त्यांवर वखर पालथे घालून तो निघाला. पावसाळ्याचे दिवस असल्याने त्याने पण छत्री, त्या वखराच्या दांड्याला बांधली. पुढे समोर हा चालतच होता. पाऊस सुरू झाला. मुलाने छत्री सोडवली आणि उघडली. बैलाच्या पाठीवर पावसाचे थेंब पडले, त्याची पाठ थरारली. त्याच्या कानाने ‘भप्प’ असा छत्री उघडल्याचा आवाज टिपले. बैलाची चाल वाढली. पाऊस सुरू झाला. त्याने पण भप्पकन छत्री उघडली आणि ती या बैलांच्या डोळ्यांसमोर नाचली. बैल उधळले. समोर हा दिसत होताच. एका क्षणात हा जमिनीपासून वर उचलला जाऊन, सरसरीत चिखलात पडला. त्याच्या क्षणभर अगोदर, आभाळ दिसणे, म्हणजे काय, याचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने, त्याने जो काही किंकाळी वेड्यावाकड्या आवाजात फोडली, ते ऐकून शेजारपाजारच्या शेतातून काही जण धावून आले. वहाता शेताचा रस्ता व सकाळची वेळ, त्यामुळे शेतात जाणारे सर्वजण ही गंमत बघायला आवर्जून थांबले.
त्याच्या सुप्रसिद्ध छत्रीची अवस्था केवीलवाणी झाली. त्याला चिखलातून उठता येईना. कपडे सर्व चिखलाने लडबडलेले ! पायांतील दोन्ही चपला हवेतूनच नाहीशा झालेल्या ! समोर जवळच दोन्ही बैल ! हे पाहून त्याची कंबरच खचली. हे एका क्षणांत घडले. शेवटी त्या पोराच्या लक्षात आले. त्याने बैलांना बाजूला ओढले. पाऊस पडत होता. त्याचेकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्याला कसेबसे उचलले आणि एकाची बैलगाडी थांबवून त्यांत टाकले. तोवर जरा तरतरी आली असावी.
‘चला भाऊ, बरं वाटते ना ? दवाखान्यात जायचे का घरी ? ‘ गाडीवाल्याने विचारले.
‘बरं आहे. घरी सोड.’ तो.
‘ठीक आहे. घरी सोडतो तुम्हाला.’ गाडीवाला.
‘पण भाऊ, ती छत्री नसती ना, तर हे इतकं घडलं नसतं !’ गर्दीतील एक जण !
— छत्रीमुळे पडलो, हे सांगायची त्याला चोरी होती. पण एक झाले, त्यानंतर त्याची छत्री आणि लालसर पंचा कायमचे गुप्त झाले.
(पोस्ट आवडली असल्यास शेअर करण्यास हरकत नाही.)
© ॲड. माधव भोकरीकर

27.12.2019

देववाणी शिकवणारे आमचे कै. पुरुषोत्तम विष्णु पुराणिक सर !

देववाणी शिकवणारे आमचे कै. पुरुषोत्तम विष्णु पुराणिक सर !
तसं बघीतलं तर, आम्ही शाळेत असतांना, बऱ्याच शिक्षकांचा परिचय, आम्हाला आम्ही शाळेत जाण्यापूर्वीच झालेला असायचा; कारण आमचं गांव, रावेर, ते केवढं ! ते जरी तालुक्याचे गांव असले तरी, गांवातील जवळपास सर्व एकमेकांना नांवाने जरी नाही, तरी चेहऱ्याने ओळखत असतील, एवढी आपुलकी म्हणा, वा जवळीक म्हणा, होती ! गांवात विविध कार्यक्रम व्हायचे तिथं बहुतेकांचे, येणेजाणे असायचेच ! शिक्षक मंडळी ही गांवातील शिक्षीत आणि समाजाला दिशा देणारी मंडळी समजली जायची. त्यांचा परिचय तिथं शाळेत जाण्याअगोदरच व्हायचा !
गांवातील भाजीबाजारात तर भाजी घेण्याचा निमित्ताने, बहुतेकांना जावं लागायचंच ! भाजी बाजाराजवळच आहे आमचा पाराचा गणपती, हा रावेर गांवचे ग्रामदैवत ! त्या मंदीराच्या रस्त्यावरून येणारा जाणारा तर प्रत्येक जण, जरी त्याला मंदीरात चढून जाऊन नमस्कार करणे शक्य नसेल तर, पायातील चपला घाईघाईने काढून तेथूनच, गणपतीला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. त्या पलिकडच्या गल्लीत, रामस्वामी मठ ! रामस्वामी या थोर सत्पुरूषाने तिथं संजीवन समाधी घेतली. रावेर गांवच्या ‘समस्त ब्रह्मवृंदाची’ ती जागा ! गांवातील सर्वात जुना, अठरापगड जातींचा ‘सार्वजनिक गणपती’ मठात बसणार आणि सर्व गांव तिथं दर्शनाला येणार !
त्या भाजीबाजाराजवळ माझे दोन वर्गमित्र रहायचे. एक म्हणजे गजानन प्रचंड आणि दुसरा रविंद्र वानखेडे ! काही वेळा मी अभ्यासाला तिथं जायचो, पण माझ्या आईचा मित्रांनी एकत्र अभ्यास करण्यावर फारसा विश्वास नव्हता. मित्र फक्त गप्पा मारण्यांत अभ्यास विसरून जातात, हा तिचा विश्वास ! माझा एकट्यानेच अभ्यास चांगला होतो, हे तिचे मत. प्रचंड यांच्या घरासमोर पुराणिक सरांचे घर होते. तिथं बऱ्याच वेळा शिकवणीला आलेले विद्यार्थी व्हरांड्यात बसलेले असत.
सरदार जी. जी. हायस्कूलला मी पाचवीला प्रवेश घेतला. आठवीपासून मला संस्कृत होते, हिंदी व संस्कृत हा संयुक्त अभ्यासक्रम ! पुराणिक सर, हे आम्हाला फक्त एकच वर्ष शिकवायला होते, दहावीला ! मी दहावी ‘अ’ या वर्गात होतो. तो वर्ग शिकवायला मिळावा, ही बहुतेक शिक्षकांची पण इच्छा असायची, हे आम्हाला नंतर समजले. संस्कृत शिकवणारे तीन-चार शिक्षक आमच्या शाळेत होते. पुराणिक सर आम्हाला संस्कृत आणि इंग्रजी शिकवायचे !
उंच, सडसडीत बांधा, काळ्याकडे झुकणारा वर्ण, डोक्याचे कुरळे केस मागे वळवलेले ! अंगात पांढरा मनीला आणि बहुतांशवेळा पांढरा पायजमा ! अगदी क्वचित पॅंट घालायचे. शर्टच्या डावीकडे खिसा, त्यांत निळ्या शाईचा आणि तांबड्या शाईचा असे दोन शाईचे पेन ! काही वेळा डोळ्यावर, तर काही वेळा चष्माच्या घरात असलेला काळपट चाॅकलेटी चष्मा !
पुराणिक सर आम्हाला तसे पूर्वीपासूनच परिचयाचे ! आमचा शाळेत आम्ही सर्व विद्यार्थी ‘विद्यार्थी बंधू संघ’ या नांवाने गणेश चतुर्थीला पाच दिवसाचा गणपती बसवायचो. गणपतीची स्थापना विद्यार्थ्यांचा सेक्रेटरी करायचा. त्या दिवशी गणपतीची स्थापना शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हायची, ती एकतर पुराणिक सर किंवा व्यवहारे सर यांच्या मंत्राने ! पाच दिवसांनंतर गणेशाचे विसर्जन व्हायचे ते गांवाच्या बाहेरील टेकडीकडील डोहात, त्यावेळी पण आमच्यासोबत या दोघांपैकी कोणीतरी असायचे. नंतर व्यवहारे सरांची बदली कन्या शाळेत झाल्यावर पुराणिक सरच असायचे सोबत ! रामस्वामी मठात स्वामींचे दरवर्षीचे उत्सव, गीता जयंतीचे कार्यक्रम व्हायचे, तिथं पण पुराणिक सर दिसायचेच !
दहावीच्या अभ्यासक्रमातील काही भाग हा पूर्वी जोशी सरांनी शिकवला होता. त्यांचे पण शिकवणे अप्रतिम ! त्यानंतर काय कोण जाणे, पण पुराणिक सर आम्हाला इंग्रजी शिकवायला आले. शिकवायला आले, तसे त्यांनी व्याकरण आणि धडे यांवर सारखाच भर द्यायचा हे सांगीतले. संस्कृत मात्र ते दहावीला पहिल्यापासून शिकवीत. इंग्रजी असो, वा संस्कृत ही भाषा जशी आपल्याला येणं महत्वाची आहे, तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाचे, हे त्या परिक्षेत मार्क्स मिळवणे, हे आहे. ‘तुम्हाला भाषा खूप चांगली आली, आणि परिक्षेत नापास झालात, तर तुम्हाला भाषा येत नाही, हेच सिध्द झाले असते’ हे त्यांचे ठाम मत ! परिक्षेचे स्वरूप, येणारे प्रश्न, त्यांचे स्वरूप, कोणता विषय किंवा प्रश्न किती मार्कांना, या दोन्ही भाषांत व्याकरण किती मार्कांचे येणार आणि पुस्तकातील धड्यांवर किती मार्कांचे विचारणार, यांची तंतोतंत कल्पना पुराणिक सरांना असे, आणि ते आम्हाला देत ! पुस्तकातील धड्यांवर किती मार्कांचे आणि कवितांवर किती मार्कांचे विचारणार, हे पण त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे श्रम सार्थकी लागावे, विनाकारण श्रम करावे लागू नये, अभ्यास योग्य दिशेने व्हावा, याची त्यांच्याएवढी काळजी क्वचितच कोणी घेतली असेल.
संस्कृत शिकवतांना, ते खास रंगात येत ! संस्कृतमधे पाठांतराला जसे महत्व आहे, तसे काय पाठ करायचे आणि कसे पाठ करायचे, याला जास्त महत्व आहे, असे ते नेहमी सांगत ! संस्कृतातील कोणत्याही शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर तुम्हाला इकडेतिकडे जायची गरज नाही. त्या शब्दाच्या अर्थासाठी, त्याच शब्दाकडे नीट बघावे लागते, तोच शब्द अर्थ सांगतो. संस्कृत शब्द हे त्याचा अर्थ सुचवतात, हे त्यांनी कित्येक शब्दांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यामुळे संस्कृत शिकण्याची सोपी पद्धत समजली, युक्ती समजली.
‘हे पहा, तुम्ही माझ्या पद्धतीने पाठांतर केले, तर जरी तुम्ही परिस्थितीने पुढे संस्कृत पंडीत होऊ शकले नाही, तरी पण जाणकार व्हाल, निदान रसिक निश्चित व्हाल, ही मला खात्री आहे.’ असे ते आवर्जून सांगत. पाठांतर करतांना, त्यातील दीर्घ, ऱ्हस्व, विसर्ग, वगैरे लक्षात ठेवत उच्चारच तसे करायचे, म्हणजे संस्कृत लिहायची वेळ आली, तर त्याप्रमाणेच लिहायचे, लिहीतांना चुका होत नाही, शुद्ध लिहीले जाते.
संस्कृतातील सुभाषितमाला शिकवणे, ही तर त्यांची अत्याधिक आवडती बाब ! सुभाषिताचा वाच्यार्थ, ध्वन्यार्थ वा व्यंगार्थ ते व्यवस्थित सांगत ! त्यांत दडलेला अर्थ ते उलगडून दाखवत ! सुभाषितात काही कूट श्लोक असत, अशावेळी त्याचे दोन अर्थ कसे, हे तर अप्रतिमपणे सांगत !
‘नीलकंठ’ म्हणजे मोर आणि शंकर, हे दोन्ही अर्थ कसे होतात ? भगवान शंकर एकदा घरी आले, पार्वतीला राग आला होता. ती दार उघडायला तयार नव्हती त्यावेळचे संभाषण पुराणिक सर समजावून सांगत होते. आता मला फार आठवत नाही, जेवढे आठवते, ते सांगतो.
दरवाजा उघडायला शंकरांनी सांगीतले. यांवर ‘कोण ?’ म्हणून पार्वतीने विचारणा केली.
‘मी नीलकंठ (शंकर) आहे’ हे सांगीतल्यावर पार्वती म्हणते, ‘नीळकंठ (मोर) मग बागेत जा आणि तिथे नर्तन कर !’ यांवर शंकर त्रस्त झाले, ते पुढे म्हणाले -
‘मी हिमालयाच्या दुहितेचा पती आहे,’ या शंकराच्या आवाजावर, ‘मग नदीचा पती समुद्र इकडे कसा आला ?’ या प्रश्नाने शंकराला निरूत्तर करते. या दोन्ही शब्दांची त्यांनी सुंदर फोड करून सांगीतली होती. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे यथास्थित दिल्यावर देखील शंकराला, पार्वती माता आटोपली नाही. शेवटी तो भोळा सांब पार्वतीस शरण जातो, आणि त्याचा हा याचनेचा स्वर ऐकल्यावर, ती जगज्जननी पार्वती दरवाजा उघडून शंकराला आंत घेते. यांतील शृंगारीक वर्णन जसे सरांनी सांगीतले, तसे शब्दांतील श्लेष आणि त्याचे सामर्थ्य कसे असते, हे पण सांगीतले.
पुस्तकातील चुकीची वचने कोणती, आणि बरोबर कोणती, आणि ती का बरोबर आहेत, हे पण स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.
‘मी सांगतो, तसे उत्तरपत्रिकेत लिहा. तुम्हाला गुण द्यावेच लागतील.’ एवढा विश्वास त्यांचा स्वत:वर होता. गाईडवर त्यांचा विश्वास नसायचा. एखादे महत्वाचे रूप, सुभाषित, उत्तर किंवा परिच्छेद शिकवण्याच्या ओघात आले असेल, आणि ते परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असेल तर, ते त्याच्या उजवीकडे ‘Very Imp’ किंवा ‘Imp’ किंवा ‘Most Imp’ असे त्याच्या महत्वाप्रमाणे लिहून ते अधोरेखित करत.
‘ते परिक्षेत आल्याशिवाय रहाणार नाही’, हे पण सांगत ! यांवर आपण त्यांना विचारले, ‘कशावरून परिक्षेत येईल असे सांगता आपण ?’ यांवर ते उत्तरणार की ‘ही फसवी रूपे आहेत. तुमची परिक्षा घ्यायची असते, ती असेच प्रश्न विचारून !’ असे सांगत ! खरोखर त्यांनी सांगीतलेले प्रश्न येतात, हे जुनी मंडळी सांगत. यांवर ‘पुराणिक सरच बोर्डाची प्रश्नपत्रिका काढतात’ अशी पण बातमी फुटली होती.
पेपर अतिशय कडक तपासणे, हे आमच्या शाळेच्या प्रत्येक शिक्षकांचे वैशिष्ट्य ! मात्र त्यामधे सरांमधे तिवारी सर आणि मॅडममधे पितळे बाई, यांना कोणीही स्पर्धक नव्हते. वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला पण आपले मार्क दुसऱ्या कोणाला सांगतांना लाज वाटेल, असे मार्क्स असत. यांच्या कडक पेपर तपासण्याचे किस्से पुन्हा केव्हातरी ! मात्र शाळेचे आणि शिक्षकांचे तसेच नांव होते परिसरांत ! आमची दहावीला प्रिलीमिनरी परिक्षा झाली, पुराणिक सरांनी पेपर शाळेच्या किर्तीला जागून कडक तपासले होतेच. सर्वांना उत्तरपत्रिका वाटल्यावर मात्र ते म्हणाले, ‘आता जितके गुण मिळाले असतील, असाच जर अभ्यास ठेवला, तर तुमचे दहा टक्के वार्षिक परिक्षेत वाढू शकतात.’
संस्कृत शिकवणारे संस्कृती पण जपण्याचा प्रयत्न करत असतात, अशी आपली भावना ! आम्हाला भगवद्गीतेतील एक श्लोक होता अभ्यासात !
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥
आपणच आपले शत्रू कसे, आणि आपणच आपले मित्र कसे यांत सांगीतले आहे, हे त्यांनी सांगीतले.
एका दिवशी अचानक त्यांना काय वाटले, कोणास ठाऊक ? ते आमच्या वर्गावर आले. तसा अभ्यासक्रम तर संपलेला होता. विषयाची रिव्हिजन सुरू होती. त्यांनी विचारले आम्हाला, ‘काही कोणाला अडीअडचण असेल तर विचारा’ असे पण त्यांचे सांगणे नेहमीच असे. दहावी उत्तीर्ण झाल्यावर कोणता विद्यार्थी कुठे जाईल, हे कोण सांगणार ? पुन्हा या वर्गात भेट होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यांच्या मनांत काही तरी असावे, त्यांच्यातला विद्यार्थ्याची निरंतर काळजी वहाणारा शिक्षक त्यांना स्वस्थ बसू देत नसावा ! फळ्यावरील लिहीलेले तसेच राहू देत त्यांनी विद्यार्थ्यांकडे बघीतले. टेबलाच्या पण थोडे पुढे आले, आणि अचानक त्यांनी सर्व वर्गाला संबोधले,
‘मी सर्वांना एक प्रश्न विचारतोय. कोणाला उत्तर येत असेल तर सांगा. दहावीच्या परिक्षेच्या अभ्यासक्रमातील हा प्रश्न नाही, त्यामुळे तुम्हाला उत्तर आले किंवा नाही आले, तरी परिक्षेत काही फरक पडणार नाही. मात्र हा प्रश्न या परिक्षेतला नाही, पण तुमच्या जीवनाच्या अभ्यासक्रमातील आहे, तुमच्या आयुष्यातल्या परिक्षेत येणारा आहे. याचे उत्तर पहा कोणाला येते का ? उत्तर कोणाला आले नाही, तर नंतर सांगेल, असे म्हणाले.
‘दारू पिणे वाईट आहे, तेव्हा दारू पिऊ नको’ हे कोणाला सांगावे ? असा त्यांचा प्रश्न होता. प्रश्न विचारल्यावर आम्हा काही विद्यार्थ्यांचे हात उत्साहाने वर आले. ‘जो भरपूर पितो त्याला सांगावे !’ असे सर्वसाधारण काहींनी उत्तर दिले. मात्र पूर्ण असे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणाला आले नाही. ते क्वचितच हंसत. पण त्यांच्या चेहऱ्यावर किंचिंत हसू जाणवले.
‘याचे उत्तर सोपे आहे, आणि तुम्हाला न पटणारे आहे. याचे उत्तर - जो दारू पीत नाही, त्याला सांगावे की दारू पिऊ नको !’ पुराणिक सरांचे उत्तर ! यांवर आम्ही विद्यार्थी अवाक् होणे स्वाभाविक होते. त्यांवर त्यांनी जे सांगीतले, ते आज पण मी विसरलो नाही. त्यांनी सांगायला सुरूवात केली -
आज आपली परिक्षा तोंडावर आली आहे. काही दिवसांनी परिक्षा होईल, परिक्षा झाल्यावर आपली भेट होईल, किंवा होणार नाही. कोणी कुठे जाईल शिकायला, काही आपल्या उद्योगाला पण लागतील. आपले या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक हे नाते संपेल त्यावेळी ! मात्र ते नाते संपले, तरी गुरू व शिष्य हे नाते संस्कृतीप्रमाणे रहावे, असे मला वाटते. लक्षात ठेवा, आपली बुद्धी जोवर शाबूत आहे, तोवर ते मनाला नियंत्रणांत ठेवेल. तुम्ही तुमचे मन एकदा का ताब्यात ठेवले, की तुम्हाला काहीही निर्णय बुद्धीचा योग्य वापर करून घेता येतात. तुमची दारू पिण्याची इच्छा झाली, तुम्ही दारू प्यायला सुरूवात केली, की तुमची बुद्धी चालत नाही. तुमच्या बुद्धीचे नियंत्रण सुटले, की मग तुमचे मन थोडीच तुमच्या ताब्यात रहाणार आहे ? तुमच्या मनाचा एकदा का तोल ढळला, की बुद्धीने निर्णय घेणे संपते. नंतर सुरू होतो, तुमचा उतरतीचा प्रवास ! तुम्ही सांगायला सुरूवात करतात, की दारू पिणे कसे चांगले, त्यामुळे कसे काही नुकसान होत नाही. तुम्ही वारंवार हेच सांगतात. न पिणाऱ्यांना बहकवतात ! त्यांना नंतर काहीही सांगून उपयोग होत नाही, आपली शक्ती व्यर्थ जाते. ती व्यर्थ जाऊ नये, यांवर चांगला मार्ग म्हणजे, जो दारू पीत नाही, त्यांना सर्व सांगा. तो चुकूनही दारूकडे वळायला नको. तिकडे प्यायला हात गेला, की हे सर्व आठवून त्याचा हात आपोआप मागे यायला हवा ! हे ‘Most Imp’ आहे, लक्षात ठेवा. मला विसरलात, तरी चालेल पण मी शिकवलेले ‘Most Imp’, ‘Very Imp’ ‘Imp’ कधीही विसरू नका. ते लक्षात ठेवा, आयुष्यातल्या कोणत्याही परिक्षेत तुम्ही कधी नापास होणार नाही. हे संस्कृत, देववाणी शिकवणाऱ्या शिक्षकाचे सांगणे आहे.
सर बोलत होते, आम्ही ऐकत होतो. एका सोप्या प्रश्नाचे उत्तर इतके वेगळे असू शकते. भलेमोठे असू शकते आणि आयुष्यभर लक्षात ठेवावे असे असू शकते. तास संपल्याची घंटा शाळेच्या शिपायाने, हरिभाऊने दिली. त्याने आम्हाला भानावर आणले. आम्ही जेमतेम पंधरा-सोळा वर्षाचे विद्यार्थी सुन्न होऊन गेलो होतो. पुराणिक सरांनी संस्कृत तर अवश्य शिकवले होते, पण आयुष्यभर जपावी लागणारी संस्कृती शिकवली होती. सुसंस्कृतपणे कसे जगायला हवे हे सांगीतले होते.
सरांनी हे शिकवायला आता खूप वर्षे झालीत, सन १९७७ साली शिकवले होते. त्यांच्याप्रमाणे तंतोतंत सांगायचे, तर बेचाळीस वर्षे झालीत. काही वर्षांनी पन्नास पण होतील, त्यापेक्षा पण जास्त होतील. काळ कोणासाठी थांबत नाही. आज पुराणिक सर नाही या जगांत, पण सरांनी शिकवलेली शिकवणूक आणि त्यांची ही ‘Most Imp’, ‘Very Imp’ ‘Imp’ शिकवण व वाक्ये अजून आठवतात ! —- आणि मग अशी कधीतरी लिहावी वाटतात !

31.12.2019
लग्न ठरवतांना, शक्यतोवर मुलाकडे मुलीकडची मंडळी जातात, कार्यक्रमाला ! पूर्वी पंचक्रोशीतील मुलगी असायची, ओळखीपाळखीतील असायची, कोणाच्यातरी नात्यागोत्यातील पण असायची, अपरिचित किंवा त्रयस्थपणा कमी असायचा, त्यामुळे नवीन नातं लवकर जोडले जायचे. आता वधूवर वेगवेगळ्या गांवातील असतात, बऱ्याच वेळा दूरचे असले, पूर्वपरिचय नसला तर कोणाबद्दल विशेष माहिती नसते. त्यामुळे वधूवरसूचक मंडळे निघालीत. त्यांच्याकडून काहीतरी समजते.
दूरदूरवरून दुसरीकडे जायचे म्हटले, तरी पैसा आणि वेळ खर्च होणारच ! नंतर त्यातून निष्पन्न काय होईल, ते पण अनिश्चितच ! त्यामुळे आपण जागेवरून न हलता, समोरचा पाहुणा फक्त कार्यक्रमापुरताच आपल्याकडे कसा येईल, हे बघीतले जाऊ लागले. ही युक्ती दोन्हीबाजूने होऊ लागली. मुलाकडचे ‘मुलाला वेळ नसून, रजा मिळत नाही. पद्धतीनुसार मुलीला घेऊन या. घर पहाणे होईल.’ अशा स्वरुपाची कारणे सांगायची, आणि मुलीकडे जायला टाळायची. मुलीकडची ‘मुलाकडे कार्यक्रम व्हायची पद्धत जुनी झाली आहे. मुलीला ठिकठिकाणी मिरवायचे ते बरोबर दिसत नाही.’ वगैरे सांगू लागली. इथपर्यंत ठीक होते, पण एकदा जायचे नाही, म्हटल्यावर काहीही कारणे पुढे येऊ लागली.
एकदा शेजाऱ्यांच्या मुलीला स्थळ आले होते. मुलगी खान्देशची, तर स्थळ दूरचे, पाचशे किलोमीटरवरचे ! त्यावेळचे संभाषण कानावर पडले, तसे देतो.
मुलीकडचे - तुम्ही रात्री तेथून बसले, की सकाळी इथं आरामात याल. मुलीला तिकडे घेऊन यायचे, म्हणजे उतरायचे तर तिकडे कोणी नातेवाईक, स्नेही नाही. लाॅजमधे रहायचे, त्यापेक्षा तुम्ही या. तुमचे नातेवाईक, स्नेही तरी आहेत इकडे !
मुलाकडचे - ते ठीक आहे. पण कोणाकडे कशाला जायचे ? इथून तुमचे ठिकाण फार लांब आहे. जमणे कठीण आहे, तुम्हीच या !
मुलीकडचे - पहा बुवा, आम्ही मुलीकडचे आहे, हे ठीक आहे ! पण इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, अंतर तर सारखेच ना ?
मुलाकडचे - पण लांब आहे फार !
मुलीकडचे - आम्हाला पण तितकेच लांब आहे.
या अशा संवादातून काय साधते ?

1.1.2020
अलिकडच्या मनस्ताप देणाऱ्या घटना बघीतल्या, विशेषत: जनतेला भेटीचे औदार्य पण न दाखवणारे राज्यकर्ते बघीतले, की कित्येक विचार मनांत येतात. फार थोडे मांडतां येतात.
पूर्वजांच्या पुण्याईची फळे सर्वांनाच मिळतात असे नाही, काहींच्या वाट्याला अजूनही काटेच येतात. पांडवांचा वनवास बारा वर्षांनी व वर्षाच्या अज्ञातवासाने, प्रभू रामचंद्रांचा वनवास चौदा वर्षांनी संपतो. हे सर्व अवतारी पुरूष !
राणा प्रताप यासारख्या रणधुरंधराचा वनवास मरेपर्यंत संपला नाही, शेवटपर्यंत आपल्या चितोडच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारा स्वातंत्र्यवीर गवताच्या गादीवर झोपताझोपता स्वर्गवासी झाला !
काहींचा वनवास त्यांच्या मृत्युनंतर संपतो, त्यांच्या योगदानाची जाणीव कृतज्ञतेने ठेवली जाते. काही दुर्दैवी जीवांचा वनवास, मात्र त्यांच्या मृत्युनंतर पण संपत नाही.
या ऐतिहासिक पुरूषांची, भल्याभल्यांची ही अवस्था तुम्हीआम्ही केली, तर अलिकडचेच असलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा ? —- शिंतोडे उडवायला काय जाते आमचे ! गंगोदकाचे काय आणि गटारीच्या पाण्याचे काय ? आमची जशी लायकी ते पाणी आम्हाला आवडेल !

4.1.2020

उस्ताद शफात अहमद खान !

उस्ताद शफात अहमद खान !
काहीतरी ऐकत असलं, की काही वेगळीच आठवण येते. आज कोर्टातून घरी आलो. विदुषी मालिनी राजूरकर यांचा ‘मारवा’ ऐकावा का, हा मनांत विचार येत होता, आणि इंटरनेटवर चाळत होतो. तेवढ्यात कसे कोण जाणे, नांव दिसले - उस्ताद शफात अहमद खान !
उस्ताद शफात अहमद खान ! तबल्यातील जी विविध घराणे आहेत, त्यापैकी दिल्ली घराण्याचे हे नामवंत तबलावादक ! उस्ताद छम्मा खान साहेब यांचे शिष्य ! यांची तबल्याची साथ खूप वर्षांपूर्वी ऐकली होती.
पूर्वी जमायचं मला, कुठे कार्यक्रम असला की जायला ! काम कमी, जवळ पैसे कमी, पण उत्साह त्यामानाने जास्त असायचा ! असाच पुण्याला गेलो होतो, संगीत सभेला. ती बहुदा अखिल भारतीय गांधर्व महाविदयालय यांनी आयोजित केलेली संगीत सभा असावी. त्यातील एक कार्यक्रम होता, बासरीवादनाचा ! सुविख्यात बासरीवादक, पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा ! यांच्याबद्दल काय सांगणार ? भगवान श्रीकृष्णाची बासरी ऐकायला मिळणे तर शक्य नाही, पण असं म्हणायचे, निदान पं. पन्नालाल घोष किंवा पं. हरिप्रसाद चौरसिया यांना तरी ऐकावे.
त्या कार्यक्रमांच पं. हरिप्रसाद चौरसियांसोबत बासरीच्या साथीला होते, त्यांचे शिष्य श्री. रूपक कुलकर्णी ! त्यांचे बासरीवादन सुरू झाले, स्वरविस्तार, आलाप सुरू झाला ! श्रोते अगदी रंगून गेले होता. आता कोणता राग त्यावेळी वाजवला, ते आठवत नाही. यानंतर पंडीतजी बासरीवर गत सुरू करणार, तोच झब्बा पायजम्याच्या वेषात, सर्व श्रोत्यांना नमस्कार करत आणि टाळ्यांच्या कडकडाटात, उस्ताद शफात अहमद खान आले. त्यावेळी मी त्यांना सर्वप्रथम बघीतले. त्यानंतर मात्र अप्रतिम बासरी वादन आणि तितकीच तोलामोलाची साथ ऐकली. मन अगदी भरून आलं होतं !
त्यापूर्वी सन १९७२ मधे इंदोरला, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांचे संगीत संमेलन झाले होते. तिथं ऐकायला, माझी आई आणि मामा गेले होते. मला जाता आले नाही. तिथं कार्यक्रमानिमीत्त प्रसिद्ध झालेली स्मरणिका मी बघीतली मात्र ! त्यावेळी तिथं पं. गोपीकृष्ण यांचे नृत्य आणि साथीला होते, पं. किशन महाराज ! त्या स्मरणिकेतील अजून एक नांव त्याचवेळी लक्षात राहिले, शफात अहमद ! त्यांच्या पोरसवदा असलेल्या फोटोखाली, लिहीले होते - अद्भूत तयारी ! तबल्यांत, संगीतात बुद्धीला जितके महत्व आहे, तितकेच महत्व हे कठोर मेहनतीला पण आहे.
आज बरीच जुनी आठवण आली, ती आपल्यासाठी ! कदाचित पुण्यातील मित्रांना आठवत असेल, ही संगीत सभा ! आपल्याला तसे फार लवकर सोडून गेले ते !

10.1.2020

मकर-संक्रांत परवा आहे.

मकर-संक्रांत परवा आहे. उद्या मकर संक्रांतीचा आदला दिवस असल्याने भोगी आहे.
आपल्याला कल्पना आहे, सर्व महिलावर्ग संक्रांतीच्या हळदीकुंकवाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने, संक्रांतीपासून ते थेट माघ शुद्ध ७ पर्यंत, म्हणजे 'रथ सप्तमी' पर्यंत साजरे करीत असतात. त्यासाठी त्या अगदी आवर्जून, समोर का होईना, पण 'गोडगोड' (काही जण याला ‘गोग्गोड’ पण म्हणतात) बोलत असतात.
मी आपला, सकाळी जरा स्नान वगैरे झाल्यावर, वातावरण व वेळ पाहून, नम्रपणे एक साधा प्रस्ताव ठेवला, फार विस्तीर्ण व विस्तृत क्षेत्रासाठी नाही; तर तो पण अगदी मर्यादीत क्षेत्रात, फक्त घरापुरताच मर्यादीत ! प्रस्ताव पण अगदी-अगदी गोड भाषेत (संक्रांत लागलेली नसतांना देखील), आणि घाबरत-घाबरत ठेवला की - आपण संक्रांत ते रथ सप्तमी पावेतो तरी निदान 'गोडगोड बोला' हे पथ्य पाळावे. विचार करायला पण पुरेसा वेळ दिलेला आहे.
-- यावर अजून तरी काहीही उत्तर उत्तर आलेले नाही. उत्तर येते का येत नाही, संक्रांत जाणे ! मी रथ सप्तमी पर्यंत वाट पहायला तत्वतः तयार आहे.

13.1.2020