Monday, February 26, 2018

आनंदाचे दुःख

आनंदाचे दुःख 

मी सातवी किंवा आठवीला असेल. आमच्या घरी त्यापूर्वी पासून एक पोरसवदा तरूण यायचा.त्यावेळी त्याचे वय नेमके सांगता येणार नाही, पण साधारणत: वीस बावीस वय असावं, असं आज वाटतंय. गोरापान, गोलसर चौकोनी चेहरा, देखणेपणात जमा होणारा ! कपाळ बऱ्यापेकी उंच, त्यावर मध्यभागी दुरून दिसत असलेली आडव्यी गंधाची रेघ ! मात्र आपण त्याच्या जरा जवळ गेल्यावर, ती गंधाची रेघ नसून कपाळावरची आठी आहे, हे लक्षात यायचं. मला तर ती रेषा, नेहमीच त्याच्या कपाळावरची भाग्यरेषा असल्यासारखी वाटायची. माणसांचं भाग्य त्या वेळी पण मला समजत नव्हतं आणि आज पण नाही. मात्र भाग्यवान व दुर्भागी जीव बरेच बघीतलेत आणि आजही बघतोय ! आसपास जर लक्ष दिलं तर ते कोणालाही पावलोपावली दिसतात. त्यांच्या नांवाचा, कामाचा आणि भाग्याचा संबंध नसलेले, हे जीव या जगांत येतात, त्यांचे जे काही कार्य त्यांच्या भाग्यात असेल ते करतात, आणि निमूटपणे एखाद्या दिवशी चालते होतात, समोरच्याला हळहळ लावून, हुरहूर देत ! जरा बसक्या आवाजात बोलणारा, हा मध्यम उंचीचा, ज्याला मजबूत म्हणता येईल अशा शरीरयष्टीचा ! बऱ्याच वेळा खाकी अर्धी चड्डी आणि अर्ध्या बाहीचा मनीला घालून हा आमच्याकडे यायचा ! काही वेळा वेगळ्या रंगाची कापडं असायची अंगावर ! त्याच्या त्या अर्ध्या चड्डीमुळे व मनिल्यामुळे, त्याचे मजबूत शरीर त्यातून स्पष्ट दिसायचे. ‘आनंद’ यांचे नांव, नांवाप्रमाणेच आनंदी दिसायचा ! हा खरोखर आनंदी आहे का ?, किंवा जीवनातील आनंद म्हणजे काय ? हे समजण्याचे आमचे त्यावेळी वय नव्हते, आणि आजही हे तत्वज्ञान समजले आहे, असा माझा दावा नाही. त्यावेळेस आम्हांस लहानपणापासूनच व्यायामाचे महत्व कोणी ना कोणी सांगत असायचे, स्वाभाविकच त्याचे कुतूहल निर्माण व्हायचे व नंतर आवडही निर्माण व्हायची. याला पण व्यायामाची आवड, आखाड्यात जायला आवडायचे ! आनंद पण नियमीत आखाड्यात जायचा, त्याचे शरीर त्याची साक्ष होते.
‘आनंद’ हा बाह्मणाचा मुलगा ! वडील लहानपणीच कायमचे सोडून गेलेले ! घरी विधवा आई, मोठा भाऊ व वहिनी ! घरी आई गलितगात्र, त्यामुळे ती तशी नांवालाच होती. घरी थोडीफार शेती होती, बागायती ! बाह्मणाची शेती, तो कशी करणार आणि त्याला कोण कशी करू देणार ? त्यामुळे शेती होती, पण उत्पन्न नव्हते. मोठ्या भावाचे शिक्षण बेतासबात, त्यामुळे त्याने सुरूवातीला कसले तरी सायकल दुरूस्तीचे काम केले. नंतर लाउडस्पिकर भाड्याने देणे, त्यावरून गांवात व खेडोपाडी जाहिरात करणे वगैरे काम याचा भाऊ करायचा, आणि घरातील मंडळींच्या रोजच्या जेवणाची कशीबशी व्यवस्था करायचा. आमच्या खेडेवजा गांवात, जेथे कुठं खुट्ट वाजलं, तरी गांवातील प्रत्येक घरांत ज्याचा आवाज ऐकू येतो, तेथे कोण व कसल्या कामाची लाउडस्पिकरवरून जाहिरात करणार आहे ? थोडाफार धंदा होई तो निवडणूकीच्या काळांत, व गांवात काही सभासमारंभ असले तरच ! निवडणुका व समारंभ पण दैनंदिन असण्याचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात जेमतेम हातातोंडाशी गाठ पडत असलेले हे कुटुंब !
आनंद हा आमच्यापेक्षा वयाने बराच मोठा, पण आम्ही लहान मुलं पण त्याला ‘आनंद’ याच नांवाने हाक मारायचो. आमच्या बाळगोपाळ मंडळींचा आनंद अतिशय आवडता, आमच्यासारखा होऊन काही वेळा आमच्यात गप्पा मारायचा. त्याच्या ताकदीचे आम्हाला कोण कुतूहल व कौतुक ! आम्हा मुलांची, त्याला त्याच्या नांवाने हाक मारलेली कधी आईच्या, आजीच्या कानावर आली तर मग, आजी वा आई सांगायची, ‘अरे, असं उध्दटासारखं बोलू नये आपल्यापेक्षा मोठ्यांशी ! तो मोठा आहे तुमच्यापेक्षा, त्याला दादा म्हणावं !’ मग यांवर, ‘असू द्या हो काकू, त्यांना काय समजते ? लहान आहेत.’ असे म्हणून तो त्या विषयावर पडदा पाडायचा. मग काही दिवस आम्ही बालगोपाळ मंडळी त्याला ‘दादा किंवा आनंददादा’ म्हणून हाक मारून बोलवायची. सर्व गांव, लहानथोर मंडळी ही आनंद या एकेरी नांवाने बोलवत असलेल्या या आनंदला, आमच्यासारख्यांच्या ‘दादा वा आनंददादा’ या बहुमानाने मारलेल्या हाकेची सवय नव्हती. त्याच्या कानापर्यंत ही हाक लवकर जायची नाही, आपल्या या नांवाने कोणी बोलवत असावं हेच त्याची बुद्धी स्विकारत नसावी ! मग दोन तीन हाका दिल्यावर त्याच्या लक्षात यायचं, की आपल्याला हाक देतंय कोणी, यांवर, ‘हं, काय आहे ?’ हे त्यानं विचारले की, ‘आईने बोलावलेय’ हे आमचे उत्तर ठरलेले ! बहुमानाने बोलावण्याचा व ऐकून घेण्याचा पण अनुभव लागतो, तेव्हा सवय होते बहुमानाची. सवय नसलेल्या कानाला, अशी कोणी बहुमानाने हाक मारली, तर ती आपली वाटत नाही, आपल्यासाठी वाटत नाही. तो त्या दिशेने अपरिचितासारखे, त्रयस्थपणे बघतो. आनंदची अवस्था तशी होत असावी.
न बोलावतां पण अधूनमधून घरी येणारा आनंद कोणी बोलावल्यावर येणार नाही, असे शक्यच नव्हते. ‘अरे आनंद, उद्या पाहुणे येताहेत. पाणी जास्त लागेल.’ आई सांगायची. ‘काकू, काळजी करू नका. मी भरून देतो हौद !’ आनंदचे तात्काळ उत्तर ! मग साधारणपणे सकाळची वेळ असेल तर मग, ‘काकू, चहा द्या ! म्हणजे पेट्रोल पडल्यावर गाडी चालायला लागेल.’ हे आनंदचे बोलणं ऐकण्याच्या अगोदरच, आईने चुलीवर किंवा स्टोव्हवर चहाचे आधण ठेवलेले असायचे. चहा प्यायल्यावर, मग आनंद आडाजवळ जायचा, रहाटाच्या दोराला असलेली बादली आडात सोडायचा आणि बादल्यांमागून बादल्या न मोजता संपूर्ण हौद भरून द्यायचा.
घामाने थबथबलेला आनंद, मग टॉवेल लावून स्वच्छ आंघोळ करायचा. त्याचे हौद भरून, आंघोळ करून कपडे घालून होईपावेतो, आईचा स्वयंपाक झालेला असायचा. पाने मांडलेली असायची किंवा त्याचे एकट्याचेच पान असायचे. आई त्याला जेवायला हाक द्यायची. तो यायचा, पानावर बसायचा. निवांत जेवण करायचा. जेवतांना काही वेळा आई बोलायची, ‘अरे, असे किती दिवस चालणार ? काही तरी कायमचा उद्योग कर. तू ब्राह्मणाचा मुलगा, कुठे जमाखर्च लिही, भिक्षुकी कर ! हे असं कोणी बोलावले की त्याचं काम करून दे, याचं करून दे, हे किती दिवस चालणार ?’ आईचा आवाज कातर झालेला असे.
‘काकू, तुम्हाला काय वाटते, मी प्रत्येकीकडेच जातो ? नाही, तुमच्यासारखी दोन-चार घरं आहेत, जी मला केलेल्या कामाकडे न पहाता घरच्यासारखे पोटभर जेवू घालतात, तेथेच मी जातो, घरचे म्हणून ! पुष्कळ वेळा तर भूक लागल्यावर, ‘भूक लागली, जेवायचं आहे’ असं सांगूनही मी जेवलो आहे.’ आनंद सांगायचा.
‘अरे बाबा, घरचे धान्य आहे, ती तापीमाय देते आहे, त्यांत तुझा वाटा आहे, काही मागच्या जन्मीचा, म्हणून तुला जेवू घालते आहे.’ आई म्हणायची.
‘नाही काकू, मी परवा कुस्तीचा फड होता यात्रेत, तो मारला, सव्वाशे रूपये मिळाले.’ आनंद उत्साहाने सांगायचा.
‘रोज का कुस्त्यांचे फड होणार आहेत ? आपल्याला नियमीत असे काही तरी मिळायला हवे.’ आई तिचा धागा सोडत नसे.
‘काकू, मी आता मागच्या आठवड्यापासून मार्केट कमिटीत हमाली सुरू केली आहे. पोत्यामागे दर बरा आहे. कष्टाचं काम आहे, पण दोन पैसे मिळतात.’ आनंद सांगायचा.
‘अरे तू ब्राह्मणाचा ना रे, मग हमाली काय करतोस ?’ आईला वाटणारे दु:ख तिच्या स्वरात आलेले असे.
‘हेच, हेच म्हणतात मला तिथं पण ! मी म्हणतो, ‘मी चोऱ्या तर करत नाही, कष्टाचेच पैसे कमवतो ना ? पण पटत नाही कोणाला ! पाच-पंचवीस रूपये मिळतात रोज ! काकू, माझ्यासाठी मुलगी पहा एखादी, गरिबाघरची असू द्या. आपल्याला मोठ्याची नको आणि देणार तरी कोण ? लग्न करायचेय मला !’ आनंद आईला आपली मागणी सांगायचा. यांवर काय बोलावे हे आईला सुचत नसे.
‘हो, पहाते कोणी बघण्यात आली तर ! पण काय सांगणार तिला, ‘मुलगा हमाली करतो म्हणून ?’ आई ! यांवर त्याचा पण चेहरा गोरामोरा होई. ब्राह्मणाच्या मुलाने पैलवानकी करून ठीक, पण हमाली करून पोट भरणे समाजाला मान्य नव्हतेच.
‘असं कसं ? आमच्याकडे शेती आहे, बागायती ? रहायला घर आहे. माझी ही अशी तब्येत आहे, बायकोकडे वाकड्या नजरेने पहाण्याची कोणाची हिंमत होणार नाही ! हे त्यांना सर्व सांगता येईल. अजून काय हवं ?’ आनंदच्या सरळ भाबड्या मनाला या मतलबी जगाचे नियम कसे सांगावेत, हेच आईला समजत नसे.
असे दिवस चालले होते. सकाळ उजाडल्यावर उठावे, आखाड्यात जावे, नंतर आंघोळ करावी, कोणाचा काही निरोप आला तर तेवढे काम करून द्यावे, जेवण करावे व आपल्या नित्य कामास लागावे, ही दैनंदिनी आनंदाची होती. जास्तीचे दळण आणायचे असेल, तर दळणाचे बाचके डोक्यावर घेऊन दळण आणून द्यायचा. कोणाकडे कसलेही लग्नकार्य असले, कसला काही कार्यक्रम असला, कोणी पाहुणेरावळे येणार असले, कोणा म्हाताऱ्याकोताऱ्यांस किंवा अगदी तरण्याताठ्या मुलीला गांवी पोहोचवायचे किंवा आणायचे असेल तर विश्वासाचे नांव म्हणून पुढे येई ते - आनंदचेच ! लग्नकार्य असो, साखरपुड्याचा समारंभ असो किंवा घरचा कसलाही कार्यक्रम असो, आनंदला हक्काने बोलवायचे त्याच्या ठरलेल्या घरातले घर असेल तर त्याने यावे, घरच्यासारखे काम करावे, कोणी खुशीने काही दिले तर याने घ्यावे. याला अगदी सोवळ्यात स्वयंपाक होणार असला तरी थेट स्वयंपाक घरांपर्यंत जाण्याची मुभा त्याला होती. ब्राह्मण असल्याचा जो काही फायदा मिळाला असेल त्याला, तर हा एवढाच होता. बाकी सर्वत्र तोटा, मानहानी आणि त्रासच ! ब्राह्मण असल्याने त्याच्या मागचे कष्ट काही कमी झाले नव्हते आणि कमी होत देखील नाही म्हणा, किंबहुना वाढतातच ! अजून कोणा काही मुलीने, तिला भक्कम संरक्षण लाभणार असले तरी आनंदकडे आपली दृष्टी वळवली नव्हती. आनंद अजूनही अधूनमधून आईला त्याच्यासाठी मुलगी बघायला सांगायचा, शेजारच्या काकूला पण सांगायचा. मात्र अजून काही त्याच्या लग्नाचा योग आला नव्हता.
एके दिवशी दुपारी शाळेतून घरी आलो, तर घरी चर्चा सुरू होती. ‘कोणीतरी अदावत ठेवली असणार ! गरीब ब्राह्मणाचे तरणेताठे, गोरेगोमटे पोर, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. समोरून कोणी आलं असतं तर चार जणांना याने लोळवलं असतं ! कोणीतरी घाला घातला बिचाऱ्यावर ! मुंजाला मारले, चांगलं नाही होणार, ज्याने कोणी केलं असेल त्याचं ! लोकांना चांगलं पहावलं जात नाही, सरळ काम करणारी माणसं ! बिचाऱ्याचा जीवापरी जीव गेला, तो परत थोडी येणार आहे. परमेश्वरसुद्धा गरिबांचा वाली नसतो.’ मला समजेना नेमके काय झाले ते ! मी विचारल्यावर फक्त एवढेच समजले की, - आपल्याकडे अधूनमधून येणारा आनंददादा आता या जगात नाही. त्याला मरण काही चांगले आले नाही.
लहानपणी शालेय जीवनात विविध लेखकांची पुस्तके वाचली, त्यांत महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व ‘पु. ल. देशपांडे’ यांची पण पुस्तके होती. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘चितळे मास्तर’ लक्षात आहे, ‘हरितात्या’ समजलाय, ‘अंतू बर्वा’ पण वाचलाय ! तशा सर्वच वल्ल्या वाचल्याय, बघीतल्या आहेत ! ‘नारायण’ याची छटा दाखवणारा हा काहीसा ‘नंदा प्रधान’ पुलंनी जर बघीतला असता, तर कसा लिहीला असता ? ‘नारायण’चे लग्न झालेले होते आणि नारायण आपल्या पत्नीसह, मुलांसह समारंभात सामील व्हायचा. पण या बिचाऱ्या आनंदाचे लग्नच झाले नव्हते, लग्न समारंभासहीत सर्व समारंभात, हा नुसताच एकटा प्रत्येक ठिकाणी खपत असायचा. देखणे, बलदंड शरीर असलेला हा आनंद, पुलंच्या नंदा प्रधानासारखाच देखणा व दु:खी होता, हेच ते काय साम्य !
परमेश्वर पण काय एकेकाच्या कपाळी भाग्य लिहीतो, त्याचे जे काय तरणेताठे, बलदंड आयुष्य असेल, ते त्याने आयुष्यभर जरी आनंद हे नांव घेवून जगलेले असले तरी, त्याच्या आयुष्यात त्याला हवा असलेला खरा आनंद कधी आलाच नाही. आयुष्यभर सर्वांना आपल्या कामाने, आपल्यावरच्या विश्वासाने आनंद देणाऱ्याच्या जीवनांत हे असे दु:खद मरण लिहीले असावे ?
केव्हा कुठे काही तरी दृष्टीस पडते माझ्या, आणि स्मृतीतील आठवणींचे कागद असे फडफडत उडायला लागतात. लहानपणचे कागद, त्यावरील लिहीलेले काही वेळा नीट वाचता येत नाही की समजत नाही. त्यावेळचे न समजलेले जे काही वाचून, आता काहीतरी समजते, उमजते ते लिहीण्याचा प्रयत्न करावा.

२५.२. २०१८

Tuesday, February 20, 2018

पंचविसावा व्हलेंटाईन डे झिंदाबाद !

मागे एकदा सिनेमाला गेलो होतो. मध्यंतर झालं. तिथल्या दुकानदाराने त्याच्या माणसाला पॉपकार्न, समोसे, कॉफ़ी, चहा, थंड वगैरे विचारायला पाठवलं. ‘कॉफी आहे का, विचारा ?’ शेजारून विचारणे. ‘पंचवीस पंचवीस वर्ष झाली कॉफ़ी पिताय !’ माझं उतर ! तिथल्या शेजारिणीकडून मनापासून हसण्यानं दाद ! (दाद कोणाला ते सांगता येणार नाही)
काल महाशिवरात्र ! सकाळी उठलो, फिरायला निघालो. कसातरी पायजमा आणि शर्ट चढवला ! निघतांना विचारले, ‘यायचं का फिरायला ?’ यांवर ‘कोणत्यावेळी कोणते, कसे कपडे घालावं हे पण समजत नाही. साखरपुड्याला इस्त्री नसलेल्या कपड्याने आले होते. मी आहे, म्हणून बरं आहे.’ — महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर-पार्वती संवाद !
- आजच्या दिवशी काही ‘गिफ्ट’ आणायचे असते.
- माझ्याजवळ काही आणण्यासाठी तरी मी ठेवतो ?
पंचविसावा व्हलेंटाईन डे झिंदाबाद !

14.2.2018

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं
जाईच्या पाकळया दवं अजून सलते गं


आमचे गांवातील घर म्हणजे, लहानपणी मला आठवते तसे, आमच्या गल्लीतील, भोकरीकर गल्लीतील ! गल्लीतील सर्व वयोगटांतील मुलामुलींसाठी ते त्यांचे स्वत:चेच घर होते; परकेपणा अजिबात नाही. किंबहुना घरी तरी कमी मस्ती करत असतील ही बालगोपाळ मंडळी, पण इथं त्यांना तसं बंधन नसे ! आमचं घर तसं मोठं असल्याने, त्यांना घरात किंवा अंगणात मस्तीला नुसता उत येई. घरातील बंगळीवर बसून मोठमोठे झोके घेणं, हा दिवसभरचा नित्याचा कार्यक्रम होता. त्यांना काही वेळा माझी आजी, आई, काकू रागे भरून बंधन घालत, घरी जायला सांगत, नाही असं नाही ! पण त्या रागावण्यात किंवा दटावण्यात, मुलांची काळजी जास्त डोकवायची का या दंग्याने त्यांच्या कामात अडथळा आल्याने व्यक्त झालेला त्रस्तपणा असायचा, हे ठरवणे कठीण असे. त्यांत घरातील माझ्यासारखी पण त्यांना सामील असत. त्यामुळे त्या रागवण्याचा, त्या मुलांवर तात्पुरता परिणाम होई, मुळापासून उपाय होत नसे, आणि तशी इच्छापण नसे; परिणामी ही सर्व मंडळी दुसऱ्या दिवशी पुन्हा वेळेवर आमच्या घरी हजर !
हाच गुण माझ्या येथील औरंगाबादच्या घराला लागला असावा. शेजारपाजारची बालगोपाळ मंडळी, आमच्या या तुलनेने छोट्या घरात, आनंदाने फिरत असते. पुस्तके, टेबलावरील कागद, रॅकमधील फाईल्स, पेन, पेन्सील वगैरे सर्व गोंधळापासून अलिप्ततेचे पांघरूण घेत ही मंडळी रमतात.
दोन-तीन दिवसांपूर्वीच शेजारची एक ठमकाई, अनुष्का नांवाची, अगदी नऊवार पातळ, नाकात नथ, हातांत बांगड्या, पायांत पैंजण लेवून, डोळ्यांत काजळ वगैरे घालून, नटून सजून आली होती. हात मेंदीने नक्षी वगैरे काढून छान रंगवले होते. मोगऱ्याच्या पानाएवढे जेमतेम हात असतील तिचे !
‘काका, माझ्या स्कूलचे गॅदरिंग आहे. आमचा डॉन्स आहे तिथं. मी आहे त्यात.’ मग तिचे, शाळेतील तिचा डॉन्स किती महत्वाचा आहे, हे मला सांगणं सुरू होतो.
‘अग, पण कोणती शाळा तुझी ?’ मी.
‘शाळा काय म्हणतां ? स्कूल आहे माझं, स्कूल ! ‘किंडर गार्डन’ नांव आहे. किती वेळा सांगायचे ? आता लक्षात ठेवा.’ तिची दटावणी.
‘बरं, मग पुढच्या वर्षी तू ‘एल्. के.जी’ ला जाणार का ‘प्ले ग्रुपला’ ?’ माझा सरळ प्रश्न !
‘अहो, आता मी ‘यु. के. जी.’ला आहे आणि पुढच्या वर्षी ‘फर्स्टला’ जाईल ! किती वेळा सांगायचे ? आणि असं ‘डाऊन डाऊन’ कसं काय मी जाईल ?’ तिचा मी अडाणी असल्याबद्दलचा पक्का ग्रह !
‘बरंऽऽऽ ! मी आता तुझा फोटो काढतो छान ! ड्रेस छान आहे गं. हात पण रंगवले आहेत छान ? रंग कोणता वापरला ?’ मी.
‘अहो, परवाच नाही का, मी हाताला मेंदी लावून आले होते ? तीच मेंदी आता लाल झाली.’ तिचे उत्तर !
‘पण परवा तर तुझ्या हातावर हिरवे हिरवे लावून आली होती. आता तर तुझे हात लाल दिसताहेत. असं कसं काय ?’ मी.
‘मेंदी हिरवीगारच असते, काका ! तशीच हाताला लावायची. दिवसभर ठेवावी लागते. मग हात धुतला की हात आपोआप लाल होतो. माहिती आहे ?’ तिचे मला, अडाणी काकाला, ज्ञानदान करणे.
‘मग जेवण कसे काय ?’ मी.
‘आईनी खाऊ घातले. अहो, हाताला मेंदी लावल्यावर कसं खाता येईल मला ? मेंदी नाही का जाणार पोटात ?’ मी किती अडाणी आहे, याचा तिला अंदाजच येत नव्हता.
‘पण, मधे तुझ्या हाताला मेंदी नव्हती तरी तुला काकू जेवू घालत होती.’ मी. तिचा चेहरा गोरामोरा झाला.
‘मला कंटाळा आला होता जेवायचा. पण भेंड्यांची भाजी होती ना, मग काकूच म्हणाली ‘मी खाऊ घालू का ? भेंड्यांची भाजी आहे. तुला आवडते ना.’ म्हणून मी हो म्हणाले. समजलं.’ ती ठमकाई ऐकायला तयार नव्हती. शेवटी माझी सौ. नेहमीप्रमाणे तिच्या मदतीला आली. ‘किती त्रास देताय ? तुम्ही फोटो काढा तिचा ? छान दिसतेय. तिच्या आईला कार्यक्रमावरून आल्यावर दृष्ट काढायला सांगते.’ माझी सौ.
‘बरं, मी फोटो काढून, तुझ्या बाबांना पण पाठवतो.’ मी तिच्या आवडीचा विषय काढत म्हटलं.
‘ठीक आहे. मी स्कूलचा डॉन्स करून दाखवते. त्यावेळी काढा. नीट काढा फोटो. पण खरं म्हणजे, व्हीडीओ करायचा असतो डान्सचा ! फोटो चांगले नाही वाटत इतके, पण व्हीडीओ काढता येईल का तुम्हाला ? नाही तर, जावू द्या. फोटोच ठीक आहे.’ ती ठमकाई.
मी फोटो काढले, व्हीडीओ पण काढला आणि तिच्या बाबांना पाठवल्याचे सांगीतले. जशी आली तशी लगेच पळाली, तिच्या घरी !
निर्व्याज, निरागस, आनंदी जीव ! छोट्या घटनांनी आनंदी होणारे, खुशीत नाचणारे आणि चिमुकल्या दु:खाने डबडबून, डोळ्यातून दु:ख वाहू देणारे, ते सर्वांसमोर दाखवणारे, दिसत असले सर्वांना तरी न रोखणारे, हे पारदर्शक मन असणारे जीव !
—— ——- ——— ——— ———-
आमच्या घरात आम्ही सर्व एकत्रच रहात. आताच्या नव्या पिढीसारखे सख्खे व चुलत यांचे अर्थ इतके नीट समजले नव्हते. चुलतच काय पण चुलतचुलत असलेले नाते पण, अजिबात लांब वाटत नसे. त्यामुळे हे सर्व नाते भाऊ, बहिणी, काका व काकू इतक्या सुटसुटीत नात्यात सांगता येई. गल्लीच्या अगदी पार टोकाशी रहात असलेला पण, आमचा शेजारीच असे. नातेवाईक आणि शेजारी हे इतके जवळजवळ आल्याने, शेजारी देखील पहातापहाता नातेवाईकांसारखे वागू लागत. कोणाच्या घरी काही कार्यक्रम असला, आणि भांडीकुंडी काही कमी पडली, तर गल्लीतल्या कोणत्याही घरातून मागून आणण्यात, कोणालाही कमीपणा वाटत नसे, किंवा ते देणाऱ्याला अहंपणा वाटत नसे.
या अशा वातावरणांत माझ्या बहिणी आणि शेजारच्या घरातील मुली वाढल्या. या सर्वच बहुतेक माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. काही लहान पण होत्या, पण त्यांना या मोठ्यांच्या कोणत्याही कामात, हरकाम्या सारखीच भूमिका निभवावी लागे. या सर्व मुलींचा, साधारणत: हिवाळयात, एक कार्यक्रम हमखास असे, तो म्हणजे हाताला मेंदी लावणे ! मेंदी लावायची, हे या गटाने ठरवले की मग शोध सुरू होई, तो मेंदीची झाडं चांगली कुठं बहरली आहेत याचा ! मेंदी त्या वेळी पण, मे. अवधूत शेट किंवा मे. रघुनाथ हरि यांच्या दुकानांत, भुकटीच्या स्वरूपात विकत मिळे. गांधी चौकातील गबाशेट तेली यांचे दुकान पण मोठे होते. पण विकत आणायचा बेत, थोड्या चर्चेनंतर या सर्व मुलींमध्ये हाणून पाडला जाई. मुख्य कारण म्हणजे, कोणालाही त्यांच्या घरातून हे असं हाताला मेंदी वगैरे लावण्याच्या थेराला पैसे दिले जात नसत.
‘हाताला मैंद्या लावताय ? घरच्या कामाला हात लावा, तेवढीच आईला मदत होईल. आधीच कामाच्या नांवाने बोंब आणि हाताला मेंदी लावली, की मग बघायलाच नको. ‘काम केलं की मग मेंदी झडेल ना तुझी’ अशी परिस्थिती होईल तुझी.’ अशा जळजळीत स्वरूपात, बहुतेक सर्वच घरातून, पैसे मागीतल्यावर उत्तर येई. तसेच दुकानातून मिळणारी मेंदी ही चांगली नसते, त्याच्यात कसल्या पाल्याची भुकटी करून टाकली जाते, त्याने हात जळजळतात, चरे पडतात, रखरखीत होतात वगैरे ऐकायला मिळायचे.
थोडक्यात मेंदी विकत आणायचा विषय बाद झाल्यावर, मग मेंदींची झाडं कुठं असणार हे ठिकाण डोळ्यांसमोर यायचे ! हायस्कूलजवळ विवऱ्याच्या देवघर म्हणून ओळखले जाणारे ‘कुलकर्णी’ यांचा मोठा बंगला आहे, त्याच्या सभोवताली मोठे शेत ! त्या बंगल्याभोवती मेंदीचे कुंपण असे, ती झाडं बऱ्यापैकी वाढलेली असत. त्याला धण्याच्या आकाराची मेंदीची बारीक फळं पण आलेली असत. त्या बंगल्यात गांवात कोणी बदलून आलेला बॅंकेतील किंवा वीजमंडळाचा अधिकारी रहात असे. त्याची बदली झाल्यावर पुन्हा नवा येई. त्याला पण मुलंबाळं असत, त्यामुळे हा आमच्या गल्लीतील मुलींचा थवा, तेथे मेंदीची पाने तोडायला गेला, की तेथे रहाणाऱ्याची मुलगी किंवा तेथे रहाणारीच, जर ती मेंदी लावणाऱ्या वयांत अजूनही असेल तर, आनंदाने व उत्साहाने सहभागी होई. मग काय विचारतां, त्यामुळे विरोध हा असा नसायचाच ! मेंदीच्या पानांचा हा भारा तोडून मग घरी आणला जाई. भारा आल्याची बातमी गल्लीत पसरे आणि आमच्या घरात सर्व गल्लीतील मुलींची वर्दळ एकदम वाढे.
‘अग, या सगळ्या पोट्ट्या त्या आडावर गोंधळ करताय. आडावर जाऊ नका देवू त्यांना. तो रहाट हलका आहे. तिथं कोणी आहे की नाही ? तो आडावरचा दगड, सगळा रंगवून ठेवतील. निसरडा करून टाकतील सगळा. पडलं कोणी, तर हात पाय रंगायचे पण आणि मोडायचे पण !’ माझी आजी तिच्या देवघरासमोर असलेल्या खाटेवरून, देवाकडे पहात पण या सर्व मुलींना बोले. त्यावेळी आमच्या आडावरचा आंघोळीचा दगड, म्हणजे निदान चार फूट लांब व अडीच फूट रूद असा होता. नवराबायको व मुलगा आरामात त्यांवर आंघोळ करू शकत, एवढा मोठा होता.
या दगडावर एका टोकाला, या मेंदीच्या पानातून एक घमेलभर पाने टाकली जात. नंतर त्या झुडूपाच्या काड्यांवरून सरासर पाने वरून खाली ओढून काढली जात. त्यांवर थोडे पाणी शिंपडले जाई. मग पाला वाटण्याची सुरूवात करण्याची वेळ येई. पाला बत्त्याने थोडा कुटून चदरवदर केला जाई. त्यावेळी मग ठोकण्याचा आवाज येई, तो आला की, ‘अग, पोरी काय करताहेत ? कुटताय की वाटताय ? परवा कुळाचार आहे. या काय पाट्या-वरवंट्यावर मेंदी वाटताय का ? पुरण कशावर वाटणार आहे ? सगळा पाटा-वरवंटा खराब होईल.’ हा आजीचा आवाज ! मग काकूंपैकी किंवा काकांपैकी, बहुतेक काकूच म्हणे, ‘मी धुवून टाकेल वरवंटा. करू द्या पोरींना. त्यांच्या त्याच करताय !’ काकूने सावरलेले असे.
‘अग, मग तू इथं काय करतेय ? तो जड वरवंटा पोरींच्या हातापायावर पडला म्हणजे ? त्या पोरी केवढ्या आणि वरवंटा किती जड आहे ?’ असे म्हणून आजी मग काकूला आडावर पिटाळे. तिथं या मुलींसमोर मी, माझी इतर भावंड, गल्लीतील मुली अगोदरच बसलेली असत. वरवंटा एकच असे आणि प्रत्येकीला आपण मेंदी वाटावी असे वाटे; हे जमणे शक्य नसे. मग काही वेळा शेजारच्या काकूंकडून त्यांचा वरवंटा आणला जाई. दोन्हीकडून मग मेंदी वाटणे सुरू होई.
वाटतावाटता मेंदीचे जरा घट्टसर वाटण झालं, की मग त्यांत अजून टाकायच्या राहीलेल्या गोष्टींची आठवण येई. कोणी मेंदी जास्त रंगावी म्हणून लिंबू पिळायला सांगे. लिंबाचे झाड मागेच होते, त्यामुळे लिंबू लगेच मिळत. ते झाल्यावर कोणाला त्यांत काथ टाकायचे सुचायचे. मग काथाची डबी शोधा. यावेळेस या लहान बहिणी व लहान भाऊ यांचा हरकामे म्हणून उपयोग करण्याची वेळ येई. या शोधाशोधीत काही सांडालवंड होई, गलका वाढे पण मुलींच्या आया जास्त वाढू देत नसत. मग त्या वाटणात काथाची सबंध डबी रिकामी केली जाई. मग अजून कोणी तरी सुचवे की ‘चिमणीची शीट’ यांत टाकावी, म्हणजे मेंदी लालभडक रंगते. यांवर मात्र प्रकरण स्तब्ध होई. टाकावी का नाही ? ती टाकायची कल्पना कशीतरीच वाटे, पण हात कसे लालभडक दिसले पाहिजेत. सरतेशेवटी लालभडक हात दिसणे महत्वाचे, यांवर एकमत होई. त्यावेळी आमच्यासारखे लहान भाऊ भिंतीवर, पत्र्यांवर चढून चिमण्यांची शीट गोळा करत. चिमणीचा जीव केवढा, तिची शीट केवढी आणि आम्हा गोळा करणारांचा जीव केवढा ! मग ती प्रयत्न करूनही किती मिळणार ? या गडबडीत कोणीतरी भिंतीवर चढताचढता पडे. मग रडारड ! हां, हूं करून कसेतरी तो विषय मार्गी लावला जाई. मिळालेली चिमण्यांची शीट त्या गोळ्यात जाई. त्यावेळी निदान चिमण्या भरपूर असल्याने ती अडचण नव्हती. आजच्या काळात तर चिमण्याच राहिलेल्या नाही, घरांत, गांवात ! चिंमण्यांना घर करायला जागाच नाहीत. शेवटी कोणी तरी पुन्हा टूम काढे, ‘भेंडीचे पाणी’ यांत टाकावे, म्हणजे मेंदी कशी हाताला पक्की चिकटून बसते. लालचुटूक रंग पक्का बसतो. त्या वेळी भेंडी ही सर्वसामान्याची भाजी नव्हती. त्यामुळे हा भेंडीचा प्रयोग जेथून मिळेल तेथून आणून, त्या सर्व चौकशांना उत्तरे देवून, बऱ्याच उशीरा पूर्ण होई. लक्षात ठेवावे लागे ते, वाटतांना जास्त पाणी टाकायचे नाही, मेंदीचा रस वाहून जाईल मग फक्त कुच्चा उरेल. तो काही कामाचा नसतो, हे पथ्य कायम डोक्यात ठेवावे लागे. शेवटी मग अगदी गुळगुळीत, जाडसर असा मेंदीचा वाटलेला गोळा तयार होई. तो नीट गोळा करून मग पातेल्यात ठेवला जाई.
आता पुढचा टप्पा मुलांच्या कामाचा नसे, कारण मेंदी फक्त मुलीच लावतात, हा तत्कालीन सर्वमान्य नियम ! त्यावेळी पण काही बंडखोर असत नाही असे नाही, पण अपवादानेच ! आमच्याकडे अपवाद कोणी नव्हते. मग अंतीम काम, ‘ज्याचसाठी केला अट्टाहास, हात सर्व हा मेंदीमय व्हावा’ तो येई. म्हणजे तो वाटलेला मेंदीचा गोळा, आपल्या हातावर हवा तसा, हवा तसे नक्षीकाम करून ठेवणे. हे फक्त ठेवणाऱ्याचेच कौशल्य नसे तर जिच्या हातावर ठेवला जाई, तिने तो सांभाळणे हे पण कौशल्याचेच काम असे. या गडबडीत काहींची मेंदी पडून जाई, काहींना हात धुवावे लागत. मेंदी भरपूर असल्याने पुन्हा लावता येई, एवढे मात्र असे. मेंदी लावण्याची खरी वेळ, म्हणजे रात्री मेंदी लावून, त्यांवर फडके गुंडाळून झोपून जाणे व सकाळी उठून आपल्या मेंदीची किंवा हाताची अवस्था पहाणे. या एवढ्या दिवसभराच्या दगदगीने सर्व मुली थकलेल्या असत. जेवण केले, हात धुतले, की मेंदी लावायला बसत. आई, काकू किंवा दुसरी बहीण फडके गुंडाळून देई आणि मग पहातापहाता झोप येई. संपूर्ण रात्र आपला हात मेंदीने कसा रंगला आहे, या स्वप्नातच निघून जात असावी.
सकाळी उठल्यावर काहींची मेंदी चांगली रंगलेली असे, तर काहींची मेंदी झोपेतच पडून गेली असे. त्यामुळे हात थोडाफार रंगलेला असे, नाही असे नाही. आता या उटारेटा करून मेंदी लावणाऱ्या आपापल्या घरी कधीच्याच गेल्या. भेटी जाऊ द्या, फोनवर बोलणं पण होत नाही. काही मेंदी लावणाऱ्या कुठे आहे, काय करताहेत याची पण कल्पना नाही. त्यावेळच्या मेंदीच्या पानावर त्यांच मन झुलतंय का नाही, याची मला कल्पना नाही. मात्र असा काही, त्या छोट्या मुलीने विषय काढून माझं मन मात्र त्या मेंदीच्या पानावरुन झुलतझुलत त्या आडाच्या दगडावर गेलं !
खरंच, त्या वाटलेली मेंदी हाताला लावली जायच्या काळातील मंडळी अजूनही येथे आहे, आता वयानं जरा मोठी झाली असतील ! त्यांना आठवत असतील का या गोष्टी ? त्यांच्या मोठेपणीच्या डोळ्यातील, या कोवळ्या आठवणी, त्यांना हुळहुळ्या करत असतील ? लहानपणचे हे मेंदी लावणारे हात, त्यांच्या मोठेपणी कुठं जातील आणि कुठं नाही ? त्यांना कधी पुन्हा मेंदी लावायला मिळेल का नाही ? —- या कधीही मेंदी न लावणाऱ्यास पण त्याची काळजी वाटते !

18.2.2018

Monday, February 19, 2018

इतिहासावरचे संशोधन

वर्तमान पत्रातील संशोधनपर लेख वाचल्यावर मला पण मी आजवर केलेले इतिहासावरचे संशोधन आठवले. अजून अपूर्ण आहे.
मी नम्रपणे सुचवू इच्छितो, की माझं पण नवीन सनसनाटी संशोधन येतंय, पुराव्यांकडे ‘काणाडोळा’ न करता ! थोडक्यात काही निष्कर्ष -
१. हिंदवी स्वराज्यांत त्या वेळच्या छत्रपतींनी त्यांच्या दरबारी फक्त मुस्लीमांचाच आणि मुघल शासक व सर्व पातशाह्यांनी त्यांच्या दरबारी फक्त हिंदुंचाच भरणा करण्याचे ठरवलं होतं.
२. सर्वधर्मसमभाव हा त्या वेळीपासूनच काय पण महंमद घोरीच्या आक्रमणापासूनच आहे. महाराज पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप यांनी यांत अडथळा आणल्याचे पुरावे मिळून आले आहेत.
३. मुघल शासक व पातशाह्यांमधील अतिक्रमण विभाग हा स्वाभाविकच हिंदुंकडे असल्याने त्यांनी नि:पक्षपणे बरीच मंदीरे, देवळे, मठ यांना अतिक्रमण केले असल्याने कायद्याचे राज्य म्हणून नेस्तनाबूत केले.
४. हिंदवी स्वराज्यात स्वाभाविकच सर्व मुस्लीम मंडळी कामाला असल्याने, ती या अतिक्रमणाच्या बाबतीत कामचुकार नव्हती.
५. हिंदवी स्वराज्यात असलेल्या सर्व मुस्लीम कर्मचाऱ्यांनी सर्वधर्मीय मान ठेवायचा म्हणून, सुभेदाराची सून किंवा कोणत्याही स्त्रीला, अजिबात धक्का लागू दिला नाही. या उलट मुघल शासन व पातशाह्यांमधे त्यांचे कर्मचारी हे बहुसंख्य असलेल्यांनी अल्पसंख्यांकासाठी त्याग करायला हवा या उदात्त हेतूने फक्त हिंदुंकडूनच सर्व अपेक्षा पूर्ण करवून घेतल्या. त्याला निष्कारणच लूटमार, अत्याचार वगैरे शब्द वापरण्याची फॅशन आली आहे.
सध्या इतकेच !

19.2.2018

Saturday, February 17, 2018

नविन अभ्यासक्रम 'भारतीय राजकारण'

नविन अभ्यासक्रम 'भारतीय राजकारण' असा जर येथे सुरू केला, तर त्या परिक्षेतील संभाव्य प्रश्न -
१. कोणत्याही निवडणुकीत कोणाच्या बाजूने कोण आहे आणि कोणाच्या विरूद्ध कोण आहे हे नेमके कसे ओळखाल ?
२. कोणत्याही निवडणुकीत वरवर कोणाच्या बाजूने राहून कोण प्रत्यक्षात कोणाच्या विरूद्ध आहे व वरवर पहाता कोणाच्या विरूद्ध राहलेले दिसत असतांना प्रत्यक्षपणे कोण बाजूने काम करत आहे, हे कसे माहीत करून घ्याल ?
३. कधीही पूर्ण करता न येणारी आश्वासने मतदारांना निवडणूकीपूर्वी देवून निवडून आल्यावर विरोधी पक्षांमुळे ती कशी पूर्ण करता येत नाही हे कसे सिद्ध करून दाखवाल ?
४. जगावेगळी आश्वासने कशी पूर्ण करता येतील, हे विरोधी पक्षात असतांना मतदारांना त्यांना मूर्ख बनवत आहोत हे समजू न देता कसे पटवाल ? तसेच सत्ताधारी पक्षात आल्यावर सोपी कामे करणे पण कसे अशक्य आहे, हे जनतेला कसे पटवाल ?
५. वेळोवेळी सत्तेच्या मागे लागून पक्षबदल केला तरी हा बदल तत्वासाठीच व जनतेच्या हितासाठीच केला आहे, त्यांत आपले कसलेही हित नसून आपले नुकसानच कसे होणार आहे हे जनतेच्या कसे गळी उतरवाल ?
६. आपण राजकारण अजिबात करत नसून समाजकारणासाठीच कसे आपले आयुष्य आहे, हे निवडणुकीला उभे असतानांच कसे समजवाल ?
७. निवडणुकीत आपण पडलो तरी चालेल किंवा समोरच्याला पाडण्यासाठीच उभे राहीले असतांना, त्याचा सुगावा लागू न देता प्रचार कसा कराल ?
८. निवडणुकीत पक्षाचे तिकीट मागतांना 'सक्षम उमेदवार' असल्याचे संबंधीत पक्षाकडे सिध्द करतांनाच आयकर खात्याकडे आपले उत्पन्न हे नियमाप्रमाणे फारच कमी आहे हे कसे दाखवाल ? हे करत असतांनाच, जनतेत आपण पैसे कमविण्यासाठी निवडणुकीला उभे रहात नसून जनतेची सेवा करण्यासाठी स्वत:ची पदरमोड करत आहोत, हा जनतेचा (गैर)समज कसा करून द्याल ?

17.2.2017

Tuesday, February 13, 2018

विश्व खूप मोठे आहे.

फेसबुकवर आपण केवळ राजकारणावरच लिहिणार आणि बोलणार असू, तर आपल्याला राजकारणातील घाण दिसणारच आणि त्याचा वास जबरदस्तीने आपल्याला येणे हे स्वाभाविकपणे होणारच कारण आजच्या राजकारणाचा 'दर्जा' जसे असेल तसेच अनुभव लिहिले जाणार त्यांच्या बहुसंख्य समर्थकांकडून ! येथील बहुसंख्य जणांना फक्त घाणेरडा वासच येणार कारण त्याचा उपजीविकेचा व्यवसाय वेगळा आहे त्यामुळे राजकारणातील फायदे त्याला मिळणारच नाही.
दुसरी बाब म्हणजे आपल्या लोकशाहीत किती डोके आपल्यासोबत आहेत हे मोजले जाते त्या डोक्यांत काय आहे, किंवा काय दर्जाची डोके आहेत हे मोजले जात नाही किंवा अगदी क्वचितच मोजले जाते. पूर्वी असलेली डोक्यांत काय आहे किंवा / आणि त्याचा दर्जा काय आहे हे मोजणाऱ्यांची संख्या ही जास्त होती, म्हणून बरे होते असे वाटायचे. हे आता दिवसेंदिवस कमी होत जात आहे, वेगवेगळ्या कारणांमुळे ! त्यामुळे हा अनुभव येणारच !
ठरवा आपण त्यांत किती रमायचे हे ! जगांत इतरही खूप आणि महत्वाचे विषय आहेत. राजकारण हे एकमेव जग नाही, विश्व खूप मोठे आहे.

19.12.2017

प्रथम तुझ पाहता जीव वेडावला

कोर्टाला हिवाळी सुट्यांचे वेध लागले आहे. घाईचीच कामे दाखल करून चालवण्याची गडबड ! आज मात्र कामाच्या गडबडीत विश्रांती म्हणून थोडा निवांतपणा काढला आणि जुने चित्रपटगीत ऐकले.
जळगांवला चित्रा टॉकीजमधे खूप वर्षांपूर्वी न समजत्या वयात हा चित्रपट पाहिला होता. ‘मुंबईचा जावई’ ! कै. व. पु. काळे यांच्या कथेवरून हा चित्रपट कै. राजा ठाकूर यांनी दिग्दर्शीत केला आहे. समर्थ गीत - कै. ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत - कै. सुधीर फडके यांचे तर गायनस्वर - रामदास कामत यांचा !
पं. रामदास कामत हे काही चित्रपटांची गीते गाणारे गायक नाही, शास्त्रीय संगीतातील हे नांव ! पण काही शास्त्रीय संगीत गाणारे गायक अशी काही गाणी गाऊन जातात आणि खरोखर चित्रपट संगीताला त्या निमित्ताने एक नवा अलंकार मिळतो. कलावती रागातील हे गीत, खरोखर छानच आहे.
प्रथम तुझ पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
प्रथम तुझ पाहता
नयन का देहही मिटुनी तू घेतला
जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा
प्रथम तुझ पाहता
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला
प्रथम तुझ पाहता...

20.12.2017

https://www.youtube.com/watch?v=Pl41q9YH8LE&feature=share

देशाचा स्वार्थ पहा

तुमच्याजवळ गडगंज संपत्ती असेल, अगदी सात पिढ्या काय सत्तर पिढ्या पुरतील एवढी पण असेल ! आम्हाला आमची रोजची सोय बघायची असते, ती तुम्ही नाही बघत आणि आम्ही बघीतली नाही, तर आम्ही उपाशी राहू, तुम्ही नाही !
गाड्या, दुकाने, घरदार पेटविण्या अगोदर आपण हे लक्षांत ठेवा, आपण गाडी पेटवून त्याची पोटासाठीची धडपड, गतीमानता संपवीत आहोत, त्याचे दुकान पेटवून त्याची रोजीरोटी मातीत कालवीत आहोत आणि त्याचे घर पेटवून त्याचे छप्पर उजाड करीत आहोत ! कोणाचा मृत्यू म्हणजे तर त्याच्या भविष्यावर पाणी फेकणे होय ! आपण त्याला काही देऊ शकत नाही हे निश्तित आहे, तर निदान त्याचेकडून हिसकावून तर घेऊ नका. तुमचे हे कृत्य सर्वांना समजेल, जरी लपून राहीले तरी लक्षांत ठेवा, त्या वरच्या जगन्नियंत्याला तर नक्कीच समजेल. त्याचा हिशोब तर सर्वानाच माहीत आहे, अजिबात चुकत नाही !
पण येथे हे पण लक्षांत ठेवा चिथावणीखोर, अपमानास्पद अशी भाषणे नियमीत कोण आणि कशासाठी करतात ? त्यांवर वेळीच कठोर उपाय योजले पाहीजेत. निवडणूकीतील फायद्याची गणितं बाजूला ठेवून ! ही तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे नाही तर कायमच्या उपायासाठी आहे. आपण कोणाच्याही सहनशीलतेची सत्वपरिक्षा पाहू नये.
आपण सर्व समजूतदार आहात पण आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या समाजाचा म्हणजे देशाचा स्वार्थ पहा, तुमचाच नाही तर सर्वच समाज तुम्हाला डोक्यावर घेईल ! सुरुवात तर करा !

3.1.2018

'कुटुंब कर्ता' हा कायमच रहाणार आहे

एकत्र कुटुंबातील कर्त्याला काही वेळा मोठ्या कठीण प्रसंगास तोंड द्यावे लागते. कर्ता जर कमविता बाप किंवा आजोबा असेल तर ठीक आहे, त्याच्यापासून थोडा लाभ असतो. नाईलाजाने सोबत रहावे लागते. अलिकडे वृद्धाश्रम सुरु झाल्यापासून, ती पण अडचण होत आहे, मग ही मंडळी सरळ वृद्धाश्रमातच रवाना होतात. मात्र काही वेळा यांनी कर्तेपणाची झूल उतरविल्यावर, त्याला मार्गदर्शक म्हणूनही बऱ्यापैकी मान असतो, अडीअडचणीच्या वेळी हा मार्गदर्शक मोलाचे, सर्वांच्या हिताचे आणि व्यावहारिक शहाणपणाचे सल्ले देतो, आपल्या अनुभवाच्या जोरावर ! त्याने द्यायला पाहिजे ही अपेक्षापण असते.
कर्त्याची भूमिका मोठ्या भावाकडे असेल तर फारच अडचण असते, आणि काही वेळा तर जाणीवपूर्वक इतरांकडून केली जाते. इतरांना त्याचा मोठेपणा सहन होत नाही, त्याबद्दलचे दुःख कोणाला सांगता पण येत नाही. वयाने, अनुभवाने हा मोठा असल्याने, त्याच्याकडे मोठेपण येतेच. त्यांत त्याचे कर्तृत्व जसे असते, तसेच त्याचा अनुभवाचा मोठेपणापण असतो. काही वेळा त्याला विनाकारण कुटुंबाच्या हितासाठी स्वतःकडे कमीपणा घेऊन, प्रसंगी स्वत:ला नुकसान सोसून, त्याच्या पदाच्या मोठेपणाचा आब राखावा लागतो. त्याला नि:पक्ष रहावे लागते. कारण समाजातील मोठी माणसे ही 'तू तर मोठा होता, तुला तर समजते. सोडून द्यायचे. ते लहानच आहेत आणि रहातील.' असे त्याला सांगतात, त्यांनी सांगायला पण हवे. मात्र हे उपद्रव करणाऱ्याला अभावानेच सांगतात; मग हे साटेलोटे म्हणा का हिंमत नाही म्हणा !
लहान भावांची अडचण, कुटुंबातील व्यक्तींची अडचण ही त्यांनी कुटुंबातील कर्त्याकडेच आणायची असते, ती दूर करण्यासाठी, आणि तोच दूर करतो किंवा करत नाही. अर्थात आपल्याला त्या कुटुंबांत रहायचे असेल तर त्याचे 'कर्ता' म्हणून असलेले अधिकार मानावेच लागतात, इच्छा असो किंवा नसो ! ते जर मानायचे नसतील तर त्यापेक्षा मोठया मार्गदर्शकाकडे जायला पाहीजे. ---------- अर्थांत कुटुंबांत रहायचे असेल तर ! घरातील या गोष्टी, थेट व निष्कारण पारावर सांगून काही उपयोग होत नाही, त्याने तुमच्यासमोर जरी कोणी सहानुभूतीने कोणी बोलले, तरी ते त्याच्या हेतू साध्य करण्यासाठीच बोलण्याची शक्यता जास्त असते. दुसरी म्हणजे तुम्हालाच त्या कुटुंबाची धूळधाण करायची असते, कोणत्याही कारणांसाठी तर मग तो वेगळा विषय ! या सर्वांवर अगदी त्रयस्थाने ‘निःपक्षपणे न्याय द्यायचा' तर मग कर्त्यासोबत तुमचेपण ‘कर्तृत्व व कार्य’ निश्चितच 'सीसीटीव्ही'मार्फत अगदी 'क्ष किरण' वापरून करून पहावे लागते.
अलीकडे मात्र 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वाची' इतकी काही धुळवड उडविली गेली आहे की त्यांत त्या तत्वाचे खरे रूपच दिसेनासे झाले आहे. काहींना अस्पष्ट दिसते, तर काहींना वेगळ्याच आकारांचा भास होतो आणि मग त्यालाच ते 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' मानू लागतात. त्यामुळे कोणाला काही वाटले की थेट पारावरच येऊन बोलायचे हे स्विकारले जाते. पारावर रिकामी मंडळी भरपूर असते आणि असा काही तुम्ही ‘खेळ करून दाखवत’ असाल तर जास्तीची जमतात पण ! अरे, हे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' नाही, तुमचा 'अहंभाव' आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर यापेक्षा दशांगुळे जास्तच आहे, एवढेच नाही.
'कुटुंब कर्ता' हा कायमच रहाणार आहे, कारण तो लोकशाही पद्धतीने निवडला जात नाही किंवा बदलविता येत नाही, त्यासाठी आपल्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीची वाटणीच करावी लागते.
------- जाऊ द्या ! 'सर्वांचेच पाय मातीचे' असतात आणि 'अत्युचीपदि थोरही बिघडतो हा बोध आहे खरा' ! तुमचे घर नेस्तनाबूत झाले तर त्यांत हित असणारे पण होते, आहेत आणि असतील; हे लक्षात ठेवले तरी ‘त्या खऱ्या कुटुंबकर्त्याला’ पुरे !

13..2018

‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

बऱ्याच वर्षांपूर्वी जळगांवला वल्लभदास वालजी वाचनालयांत सुप्रसिद्ध गीतकार कै. जगदीश खेबुडकर यांचा कार्यक्रम होता. मी त्यावेळी असांच सुटीनिमीत्ताने जळगांवी गेला होतो. त्या वाचनालयांत तत्कालीन मंडळी खूप छान कार्यक्रम ठेवत, कार्यक्रम ठेवण्यासारखी माणसं पण विपुल होती त्यावेळी, आजच्या तुलनेने !
त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध घटना, अनुभव व नंतर चित्रपट क्षेत्रांत अनुभवांस आलेल्या गमतीजमती सांगीतल्या ! त्यांची एक त्यांना न विसरतां येणारी आठवण आणि त्यावेळी त्यांना स्फुरलेली पहिली कविता ऐकवली. सन १९४८ च्या वेळी त्यांना म. गांधी यांच्या त्या मृत्युतून निर्माण झालेल्या, केल्या गेलेल्या प्रसंगांचे चटके बसले होते. त्यांचे घरदार जाळले गेले. ते पहात पहात स्फुरलेली त्यांची ही कविता ! त्याची पहिली ओळ मी विसरू म्हटले तरी विसरतां येत नाही.
‘मानवते तू अनाथ झालीस, मानवते तू विधवा झालीस’ आपले कवी, गीतकार म्हणून आठवणी ते सांगत होते.
नंतर एक सांगीतली - कै. बाबूजी उपाख्य सुधीर फडके हे सव्यसाची संगीतकार व गायक होते.
त्यांना तुम्ही गायला सांगा, ते गीतातील गीतकाराच्या भावना आपल्या स्पष्ट व शुद्ध शब्दोच्चाराशी तडजोड न करता, अगदी सुंदर व्यक्त करीत. चित्रपटात काय प्रसंग असू शकेल, नायक कोणत्या भावनेने गीत गात असेल याचा अंदाज येवू शके; इतके समर्थ गायन त्यांचे होते.
त्यांच्यातला संगीतकार तर अगदी अफलातूनच ! गीताला चाल लावायला त्यांना किती वेळ लागेल ? ते कितीही वेळांत आणि कुठेही चाल लावू शकत. काही वेळा त्यांना अगोदरच एखादी सुंदर चाल सुचलेली असे मग ते गीतकाराला चाल ऐकवत. डाव्या हाताने हार्मोनियमचा भाता थोडा ओढून हवा आंत ओढून घेतल्यावर, हार्मोनियमच्या त्या काळ्यापांढऱ्या पट्टयातून, त्याच्या उजव्या हाताच्या बोटांतून, हो अगदी बोटांतूनच वाटत, जे रंगीबेरंगी, अमृतमय स्वर यायचे, ते त्यांना जाणवायचे, दिसायचे ! आपल्याला दाखवायला, त्यांची दिशा दाखवायला तो हवेत थोडा उंचावला जायचा डावा हातच ! डोक्यातील रचना आवडली की तालात हलायची ती मान !
कै. जगदीश खेबुडकर सांगत होते - त्यांना त्यावेळी चाल सुचलेली होती, यमन रागातील ! त्यांनी गाऊन दाखवली.
‘डाडा डडाडा, डाडा डडाडा, डाडडाड डाड डडाडाडडाडा’ ते म्हणाले, ‘नायक आपले प्रेम, प्रीत व्यक्त करतोय. नायिकेला पण हे समजतंय आणि ती पण त्याच्या साद घालण्यास प्रतिसाद देतेय ! हे बघ शब्दांची ओढाताण, तोडमोड व्हायला नको.
म्हटलं - तुमचं, ‘डाडा’ हे तर काय समजणार कोणाला ?
ते म्हणाले - मग यांत शब्द भरा. मी प्रसंग सांगीतला आहे. त्यांची भावना सांगीतली आहे. मी आणि आशा भोसले गाणार आहे. ‘धाकटी बहीण’ या चित्रपटात !
ते म्हणाले - परमेश्वर पण काय माणसं जन्माला घालतो एकेक ! त्याला प्रत्यक्ष येता येत नाही म्हणून ! ही माणसं त्याचीच एकेक गुण घेऊन येतात. सर्व संबंधीत मंडळी बसलेली होतीच, गप्पाटप्पा करत !
ते म्हणाले - मग, मलाच काही सुचेना लवकर. थोड्या वेळाने मला काही शब्द सुचले, त्याच चालीवर ! यमन कल्याण रागातील भाव दाखवणारे, चित्रपटातील नायक-नायिकेची भावना व्यक्त करणारे, त्या प्रसंगाला साजेसे ! मग ही कविता, हे गीत जन्माला आलं ! ते पहिले कडवे, धृवपद होते -
‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना
आज सकाळी जळगांवी जाताजाता औरंगाबाद आकाशवाणीवर मराठी चित्रपटगीते या कार्यक्रमांत हे सुंदर गीत लागले होते. गाडीत ऐकत होतो. एखादा प्रसंग, घटना, बोलणे, गीत आपल्याला कोणत्या आठवणींत गुंतवून टाकेल, त्यातून आपल्याला काय आठवेल, सांगता येत नाही.
आता आपणा सर्वांसाठी -
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा
चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना

21.1.2018

https://www.youtube.com/watch?v=793SssOcPBk&feature=share

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

बाकी सर्व ठीक आहे; पण यांत आक्षेपार्ह, देशाप्रति प्रतारणा सुचवणारे, निंदाजनक असे काय आहे ?
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।
।। भारत माता की जय ।।

30.1.2018

अ आ आई, म म मका

अ आ आई, म म मका
लहानग्यांच्या भावविश्वात संगीताचे, शब्दांचे किती महत्व असते, हे समजायला एक तर आपल्याला खूप लहान व्हायला हवं; पण त्यावेळी आपल्याला काय समजणार ? समज नसते आपल्याला, मोठ्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्याची ! मग मोठ्यांनाच लहान व्हावं लागते आणि लहानग्यांत रमावे लागते. ही जर का मग गट्टी जमली, तर मग ही मोठी माणसं पण लहानग्यांची आपली माणसं व्हायला वेळ लागत नाही.
बालांना त्यांच्या मनाप्रमाणे तर हवे असते पण त्यांचा मानपान पण खूप असतो; तो मानपान राहिला नाही, काही मनाप्रमाणे झाले नाही तर मग तो राग नाकावर येतो. नाक अगदी सरळ असो वा नकटे, राग मात्र तेवढाच असतो. त्यांना राग येतो आणि आपल्याला मात्र प्रेम, जिव्हाळा वाटतो. वात्सल्याने भरभरून आपले बोलणे, जेव्हा या नकट्या नाकावरील राग उडवत उडवत बोलणाऱ्या धाकट्या ताईशी सुरू असते, ती सुरूवातीला दाद देत नाही. नंतर मात्र ती विरघळते, आपण तर सुरूवातीलाच विरघळून गेलेले असतो. मग त्यावेळी बालगीताचे महत्व आणि सामर्थ्य आपल्याला समजते.
गीतकार मधुसूदन कालेलकर यांचे ‘एक धागा सुखाचा’ या चित्रपटातील हे गीत, कै. राम कदम यांनी आपल्या समर्थ संगीताने लहानग्यांचे हे बालगीत खूप मोठे केले आहे. कै. मन्ना डे यांच्या गायनातील मोठेपणाबद्दल काय सांगावे ?
पण खरं सांगू, इतक्या वर्षांनंतर देखील हे बालगीत आपल्यासारख्या मोठ्यांना पण खूप आवडत, लहान व्हायला भाग पाडते !
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरी खट्याळ, तरी मला हवा
ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडीवर बसा नि खुदकन हसा
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

31.1.2018

https://www.youtube.com/watch?v=Q-bh3Q3qFEk&feature=share

तार, टपाल आणि फोन !

तार, टपाल आणि फोन !
मध्यंतरी भारतीय डाकविभागाने ‘तार सेवा’ कायमची बंद केली ! कालाय तस्मै नम: ! आणि तारेबद्दलच्या काही आठवणी मनाला हलवून गेल्या, हळवं करून गेल्या. ‘तार’ करायची म्हणजे बहुतेक त्यांत ‘Start immediately’ किंवा फार तर ‘Mother serious, Start immediately’ असेच लिहीता येत असावे, या शिवाय दुसरा मजकूर लिहायला परवानगीच नसावी, किंवा इतर काही लिहीलं तर बहुतेक ‘तार’ स्विकारतच नसावेत, ही आमची लहानपणी वाचलेल्या कथांमधून झालेली समजूत ! ‘Serious’ म्हणजे, ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा’ या आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या ‘गीत रामायणातील’ उक्तीप्रमाणे सर्वांचे, सर्व काही संपलेले आहे, हाच अर्थ माझ्या डोक्यात बरेच दिवस पक्का बसला होता. अगदी बातमी सांगतांना पण त्यावेळी, कोणाच्या घरी काय झाले हे सांगतांना, ‘काल त्याच्याकडे तार आली होती, —-राव लगोलग, मिळेल त्या बसने गेले.’ हे गंभीरपणे बैठकीत सांगणारे असायचे. समोरच्याला येथील परिस्थितीचे गांभीर्य समजावे म्हणून काही वेळा, ‘त्याला तार करून हे सर्व कळव’ असे सांगीतले जायचे.
विवाह व मौजीबंधनाच्या वेळी, जरा उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्यांकडून त्याला येणे शक्य नसल्याची तार यायची, हे आपल्याला साजेसे म्हणून का त्याला शोभेसे म्हणून कोणास ठावूक ? मला मात्र तार आल्याचा अनुभव हा चांगली बातमी कळाल्याचाच आहे. मी एल् एल्. बी. ला सन १९८५ ला पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो, ही बातमी मला माझ्या भावाने तारेने कळवली होते.
पोस्टातला ‘तारवाला’, ‘एक्सप्रेस डिलीव्हरीवाला’ हे वेगळा माणूस असायचा. छोटे पोस्ट ऑफिस असले तर मग एकच जण हे काम करायचा. आमच्या गांवी एकच जण होता. जरा बेताची उंची, गोल चेहरा व काळसर वर्ण आणि खाकी पेहराव ! मग त्याच्या खिशात ती कार्बन पेन्सील व सहजासहजी न समजणारी नांवे लिहीलेला कागद असायचा. तो कोणाकडे तार वा एक्सप्रेस डिलीव्हरीचे टपाल घेवून आला, की त्याच्या भोवती ही बालगोपाळ मंडळी जमायची, घरातीलच नाही तर शेजारची पण ! आम्हाला व गल्लीतील सर्व चिल्लर कंपनीला गल्लीतील सर्व घरात मस्ती करण्याशिवाय दुसरे मुख्य काम नसायचे. मग घरातील वडिलधाऱ्यापैकी कोणी, मग सही करून ती तार घ्यायचे. ‘तारवाला’ म्हटल्यावर घरातील वातावरण निशब्द होऊन जात असे ते नेमके काय झाले, हे समजेपर्यंत ! शेवटी तार वाचून, मजकूर सांगीतला जायचा आणि एकतर सुटकेचा निःश्वास सोडला जायचा किंवा रडारड सुरू व्हायची किंवा धावतपळत जो समोर असेल त्याला टांगा आणायला पिटाळले जायचे.
यांतील थोडा काटकसरीचा प्रयोग पण त्यावेळी खूप जण नेहमी करायचे, तो म्हणजे - साध्या पोस्टकार्डावर पत्र लिहीले जायचे मात्र शेवटची ओळ ही ‘तार समजून निघून ये’ अशी असायची. कोणताही जास्तीचा खर्च न करता, कमीतकमी खर्चात भरपूर मजकूर लिहून, तो कोणाचीही घबराट उडणार नाही, याची काळजी घेऊन ते सर्व पोस्टकार्डाने कळवणाऱ्याच्या धोरणीपणाचे कौतुकच करायला हवे.
रोज काही कोणाचे टपाल यायचे नाही, पण हे माहीत असून देखील, आमच्या गांवी सकाळी साधारणत: आठ-पावणे आठच्या दरम्यान पठानकोटने येणारे टपाल भुरासिंग किंवा श्रावणच्या टांग्याने आणले जाई. पुढच्या गवत ठेवण्याच्या कप्प्यात पोतं, त्याच्या शेजारी पोतं आणि मागे दोन पोतड्या ! काही वेळा टांगा उलाल होऊ नये म्हणून टांगेवाला त्या पुढच्या पाटीवर दाबून बसत असे. पोस्टाचा माणूसही पुढेच बसे. हे सर्व पाहण्यासाठी रोजची नियमीत येणारी मंडळी पोस्ट ऑफिसवर हजर असे.
टपाल आल्यावर ते टांग्यातून शिपायामार्फत उतरवणे, मग त्याचे गांवातील विभागानुसार गठ्ठे बनवणे, ते आपापसांत ‘जोशीबुवांकडे’ का ‘ठाकूरनानांकडे’ द्यायचे हे ठरले जाई. त्यांत मनीआर्डरचे फ़ॉर्म किती, रजिस्टर, पार्सल, व्हीपीपी वगैरे बघीतले जाई. मग जोशीबुवा किंवा ठाकूरनाना आपापल्या टपालाचे सार्टिंग करत. त्यावेळी समोरच्या गजांच्या दरवाज्यासमोर ठाकूरनाना असत तर मागच्या गल्लीतील उघड्या गजांच्या खिडकीच्याजवळ, केऱ्हाळकरांच्या घराच्या जवळच्या बोळीत, जवळपास अंधाऱ्या जागेत जोशीबुवा टपाल लावत बसलेले असत. टपालाच्या सॉर्टिंगला दोन्हीकडे वेळ लागायचाच ! तोपावेतो समोर ‘टपाल आहे का’ हे विचारणाऱ्यांची गर्दी दाटत असे. तो पावेतो, जोशीबुवा व ठाकूरनानांनी टपाल विचारण्यास कोणकोण आले आहे, हे पाहून ठेवलेले असे. ‘हं, देव, घ्या तुमचे ! पाटील तुमचे नाही, नाईक नाही, महाजन तुमचे हे घ्या !’ असे ऐकू येई. ज्याच्याकडे टपाल आलेले असे, त्याला काहीही कारण नसतांना बरं वाटे, तर ज्यांचेकडे टपाल आलेले नाही, त्यांना विनाकारणच खट्टू वाटे. ज्याच्याकडे टपाल आले तो ते फोडून, उघडून घेऊन वाचतवाचत रस्त्याने जाई. कोणाला काही वावगे वाटत नसे. दिवाळीच्या वेळी दिवाळी म्हणून द्यावी लागणाऱ्यांत पोस्टमन पण असे.
त्यावेळी फोन हे तर फारच मोठेपणाचं लक्षण ! वाटेल त्याला फोन मिळत नसे. आपल्या घरातील फोनचा नंबर गांवातील निदान पंचवीस घरातील लोकांनी त्यांच्या संबंधीतांना दिलेला असे. हा असा नंबर दिलेला आहे, हे सांगण्याची पण कोणी तसदी घेत नसे. याला तुम्ही आजच्या भाषेत कदाचित बेजबाबदार पणा म्हणाल पण आमच्या गांवच्या हिशोबाने तो जिव्हाळा होता, आपुलकी होती. हा फोन आपला आहे, आपल्याला उपयोगी पडणारा आहे, ही भावना होती. आमच्या घरातील फोन तर ‘खासदार कोट्यातील’ होता. त्या वेळी फोनचे कनेक्शनच शिल्लक नव्हते म्हणे !
अशी ही एकेकाची तऱ्हा होती, वैशिष्टय होते, दरारा होता. आता तर कोणाच्याही हातात मोबाईल दिसतो. टपाल जवळपास नामशेष होत आलं आहे. फोन पण कमी होत आहेत. —— काही म्हणा पण पोस्टमनने आणून दिलेले टपाल पाकिट उघडून, त्यातील कागद झटकून वाचण्यात जो एक खानदानीपणा आहे, तो ई-मेल वाचण्यात नाही. तबकडीचे डायल फिरवून फोन लावून समोरच्याशी बोलण्याने जे ऐटीचे समाधान लाभते ते ॲपलच्या मोबाईलवरूनही बोलण्यात नाही.

9.2.2018


Monday, February 12, 2018

बंद झालेली सिनेमा थिएटर्स आणि मनाचे उघडलेले दरवाजे !

बंद झालेली सिनेमा थिएटर्स आणि मनाचे उघडलेले दरवाजे !
तो - घराच्या जवळ चित्रपटगृह असेल तर चांगला चित्रपट आल्यावर लगेच जाता येत.
ती - तसं काही नाही, बरं ! अलिकडे बहुतेक सर्व सिनेमा थिएटरवर तिकीटे ‘ऑन लाईन’ बुक करता येतात. मग तिथं जायला काय वेळ लागतो ? लगेच जाता येतं. मल्टीप्लेक्स असेल तर दोन-तीन तरी स्क्रीन असतातच. मग हवा तो मूव्ही अन् हवी ती वेळ !
तो - हल्ली सिनेमे तरी पहाण्यासारखे कोणते येतात ?
ती - ऑं ! का नाही ? दृष्टी हवी तशी, म्हणजे दिसतं !
एक वाक्य बोलल्यावर किंवा प्रश्न विचारल्यावर , त्याला खोडून काढत निदान चार-पाच भरभक्कम वाक्य उत्तर; हा संवाद कोणा-कोणांत असेल हे येथील अनुभवी व्यक्तींना सांगण्याची आवश्यकता नाही. मी चमकून त्या संवादाच्या रोखाने बघीतले तर ‘नातेसंबंध’ हा अस्तित्वात आलेला नव्हता, तर ‘संभाव्य’ अवस्थेत होता. कोण म्हणते, या रणरागिणींना कमकुवत ? अजून काय ‘अच्छे दिन’ यायचे बाकी आहे ?
सिनेमा टॉकीज किंवा सिनेमा थिएटर किंवा चित्रपटगृह हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व जिवाभावाचा विषय ! आदल्या दिवशी ‘सिनेमा’ पाहून आल्यावर, त्याची ‘स्टोरी’, त्यांत पदराचे काहीबाही घालून, बघीतलेल्या सिनेमापेक्षा जास्त तन्मयतेने व मनापासून, दुसऱ्या दिवशी शाळेत जसा वेळ मिळेल, जिथे वेळ मिळेल तिथे, सांगीतली नाही, असा मित्र किंवा मैत्रिण अजून जन्मायची आहे.
जसेजसे आपण मोठे होत जातो तसे ही तन्मयता कमी होत जाते, ‘स्टोरीत’ टाकली जाणारी फोडणी कमी होत जाते आणि आपण ती ‘कथावस्तू’ मग तुलनेने साक्षेपी किंवा कशी कमकुवत आहे, तिचा कथा मांडणीतील तोल, कसा किंचीत डावीकडे किंवा उजवीकडे कलला आहे, त्यामुळे कलाकृतीच्या नैसर्गिक बांधेसूदपणाला कशी हानी पोहोचते, त्यामुळे व्यापक अनुभूतीपासून प्रेक्षक वंचित रहातो. असे याचे मूल्यात्मक रसग्रहण करतो ! (हुश्श ! यापेक्षा ‘सिनेमा’ पाह्यलेला परवडतो बघा !)
आमच्या गांवाला ‘स्वस्तिक सिनेमा टॉकीज’ ! हिचे मालक गांवातील नाईक कुटुंब ! खूप जुनी टॉकीज ! त्यावेळी भुसावळला, बहुतेक मोठ्या सिनेमा वितरकांची कार्यालये असत. आम्ही केव्हातरी रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टॅंडवर गेलो तर, प्लॅटफार्मवर किंवा बसच्या ताणकाट्याजवळ ती चिरपरिचीत ‘सिनेमाची पेटी’ दिसायची. गॅल्व्हनाईज्ड टिनशीटची असलेली, सर्व बाजूनी चेपल्याने आकार बदललेली, पण तरीही उभट चौकोनी वाटणारी व चारही बाजूनी मध्यभागी काळ्या पट्टीचा बंध असलेली ! ती बघीतली की दोन-तीन दिवसांत सध्याचा सिनेमा बदलणार, हा आम्हाला अंदाज येई. मग पुढची उत्सुकता की कोणता सिनेमा लागणार ? आम्ही सध्या सुरू असलेला पण बघीतलेला नसायचा, व पुढे येणारा पण आम्हाला बघायला मिळण्याची शक्यता नसायची. ‘मुलं बिघडवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे, पोरांना सिनेमा पहाण्याची परवानगी देणे !’ हे सर्वमान्य तत्व त्यावेळी होते. सिनेमा पहाण्यासाठी पैसे मिळणं हे तर महाकर्मकठीण ! पण काही वेळा असा योग जुळून यायचा, कपिलाषष्ठीप्रमाणे, आणि आम्ही मग सिनेमाला जायचो. सोबत वडिलधारी बहीण, गल्लीतील काकू, आई वगैरे कोणी असायचे.
या गोंधळातून आमच्या वाटेला आलेले सिनेमे म्हणजे - सखू आली पंढरपूरा, वीर भीमसेन, रामराज्य, हर हर महादेव, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जय संतोषी मॉं, कृष्ण बलराम, राजा शिवाजी, जनम जनम के फेरे ! यांवरून कोणालाही कल्पना येईल, की सिनेमा पहायला मिळणं हे किती अवघड असे त्या काळी ! सोंगाड्या, पिंजरा, कभीकभी, आखरी खत, यादों की बारात, मैं सुंदर हूॅं, ज्वार भाटा, राजा जानी, जिने की राह वगैरे सिनेमे काहीतरी जबरदस्त योगामुळेच बघायला मिळाले आहेत.
स्वस्तिक टॉकीज ही नाईक कंपनीची ! तेथे सर्वात पुढे जमिन, त्याच्या मागे बाक आणि त्याच्या मागे खुर्च्या ! खुर्च्यांच्या मागे महिलांसाठीचा ओटा ! खुर्चीचा जो काही थोडाफार आराम बसणाऱ्याला मिळे तो महिलावर्गाच्या सिनेमाबद्दलच्या धावत्या वर्णनाने हिरावला जाई. काहींची रडती, दूधपिती मुलं सोबत असल्याने, त्यांचे रडणे थांबवून त्यांना गप्प करणे, हे पडद्यावरील दृश्यापेक्षा महत्वाचे असे. बाकी बाक आणि खुर्च्यांत आजच्या हिशोबाने फारसा काही फरक नव्हता. जो काही थोडा फरक डोळ्याने दिसे, तो त्यांवर प्रत्यक्ष बसल्यावर मनातून निघून जाई आणि दोघांतील साधर्म्य जाणवे. तीन किंवा चार इंटरव्हल संपूर्ण सिनेमात होत. त्यांतील एका वेळी, ‘इंटरव्हल’ हा शब्द समोर येई, त्यामुळे तो इंटरव्हल आहे, हे निश्चित सांगता येई, तर इतर वेळी असा शब्द न येता सिनेमा बंद होवून थिएटरात लाईट लागत, त्यामुळे त्याला पण प्रेक्षकांना इंटरव्हल मानण्यावाचून गत्यंतर नसे.
एखादे वेळेस सिनेमा पहाता पहाता कोणाला, जनावर निघाले असे देखील जाणवे. त्यावेळी तर मग हे प्रेक्षक पडद्याकडे पहायच्याऐवजी, जमिनीवर उड्या मारत खाली जमिनीवर काही दिसते का हे शोधत. अंधार असल्याने कोणाला काही दिसत नसे, मात्र बहुतेकांजवळ आगपेटी असल्याने, थोड्यांच वेळांत बहुतेकांच्या हातात पेटत्या आगकाड्या दिसत. एका बाजूस ही अशी पेटत्या आगकाड्यांची दिवाळी दिसली, की दुसऱ्या भागातील मंडळी पण, मग पाय वर करून लगबगीने बाक किंवा खुर्च्यांवर उभे राहून ‘सर्रर्र सर्रर्र’ असे आवाज करत, या दिवाळीत आपल्या जवळच्या आगकाड्या ओढून सहभागी होत. या गडबडीत पेटती काडी कोणाच्यातरी अंगावर पडे, किंवा निदान काडी ओढणाऱ्याच्या तरी बोटाला चटका हमखास बसे. मग, ‘हात तेच्या बाड्झवू’ या प्राथमिक शांतीमंत्रापासून सुरूवात होवून, नंतर मुख्य मंत्र खणखणीतपणे म्हटले जात. मग एकदम, ‘हा गलका काय झाला’, हा विचार करून, तिथला डोअरकिपर आंत डोकावला, तर त्याच्याकडे पहात, भन्नाट जोडशब्दांची उधळण करत ! अन् मग थिएटरांत तात्काळ लाईट लागत ! —- हे आणीबाणीचे इंटरव्हल ! हा पण प्रसंग एखादवेळेस येई ! मात्र त्याचे फारसे कोणाला काही वाटत नसे. ‘शेजारी रान आहे, जनजनावर निघतेच’ ही अशी एकमेकांची समजूत घालत, पुढचा सिनेमा पहायला प्रेक्षक तयार असत. ‘लिंक’ तुटण्याच्या पलिकडची ही मंडळी खरी सिनेमाची मायबाप आहेत. त्यांचे प्रेमही तसेच व रट्टे पण तसेच !
दुसरी टॉकीज म्हणजे लोहार कंपनींची ‘लक्ष्मी टुरिंग टॉकीज’ ! ही ओपन टॉकीज ! प्रत्यक्ष आकाशातले ग्रहतारे पहातापहाता येथे सिनेमा पण पहाता येत असे. येथील प्रेक्षक हे कोणत्याही कारणावरून नेहमीच पडद्यावरील मारामारी व प्रसंग, आपापसांत आणि त्याच थिएटरांत, तेथेच करून बघण्याची अपेक्षा करत, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना संपूर्ण सिनेमा सुखरूप पहायला मिळणे, हे एक दिव्यच असे. त्याचा परिणाम, जे या प्रयोगात भाग घेत नसत, त्या प्रेक्षकांवर पण होत असे. त्यामुळे येथे तुलनेने जास्त सुरक्षा लागे. यांवर टॉकीज मालकांनी ही नेहमीची सराव परिक्षा टळावी यासाठी, चांगले व जुने सिनेमे आणायचे धोरण ठेवले होते. कोणी गोंधळ करायला लागले, की प्रेक्षकातीलच अंतर्गत सुरक्षारक्षक बाकीच्यांना, दोनदोन देवून, गप्प करत व तुलनेने थिएटर मालकावरचा ताण कमी होई.
आमच्या गांवाचे रक्षण समर्थपणे करू शकणारा भाग म्हणजे - बैठक, थडा व बाहीरपुरा ! या भागातील लोक या सिनेमा थिएटरच्या आंतील किरकोळ दंगामस्तीला थोडीच दाद देणार होते. लाईट लावून पाचसहा टॉकीज मालकाच्या घरचीच मंडळी थिएटरांत आली, की हा गोंधळ लगेच आटोक्यात येई ! टॉकीज मालक बैठकवरचे ! खरोखर आमच्या गांवात, या प्रत्येक भागाची स्वतंत्र बटालियन असावी, आमच्या गांवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायमचा सुटेल; हे माझे प्रामाणिक मत आहे.
तिसरे सिनेमा थिएटर म्हणजे - तिरूपती चित्र मंदीर ! अत्यंत सुंदर बांधलेले, छान व्यवस्था असलेले हे थिएटर ! बहुतेक ‘राम तेरी गंगा मैली’ या राज कपूरच्या चित्रपटाने या थिएटरची सुरूवात झाली. आमचे गांव सुधरले आहे, हे गांवात येणाऱ्या पाहुण्यास दाखवायचे असले, तर गांवातील मंडळी त्याला, ‘तिरूपती चित्र मंदीरात’ सिनेमा पहायला घेऊन जात. चित्रपट पाहून आल्यावर पाहुण्याला थिएटर कसे आहे हे विचारण्याची गरज नसे, त्याने इंटरव्हलच्या अगोदरच ‘थिएटर मस्त आहे’ हे कबूल केलेले असे.
आमच्या सरदार जी. जी. हायस्कूल येथे पण काही सुंदर चित्रपट विद्यार्थ्यांना शाळेकडून दाखविले जात. मी शाळेत ‘शेजारी’ हा चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांचा गजानन जागीरदार यांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेला चित्रपट पाहिलेला आहे. या विद्यार्थ्यांच्या वानरसेनेला समर्थपणे व प्रेमाने आवर घालणारी त्यावेळची आमची गुरुजन मंडळी होती. कै. वि. ब. दीक्षित, कै. एम्. पी. कोल्हे, कै. आर. बी. जोशी, श्री. एस्. एस्. तिवारी, श्री. के. एम्. पाटील वगैरे !
पंचवीस पैशात आमच्या मराठी शाळेने दाखवलेला आणि ‘स्वस्तिक टॉकीज’मधे बघीतलेला आचार्य अत्रे यांचा सुवर्णकमळ विजेता ‘श्यामची आई’ हा सिनेमा असो ! ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटातील प्रसंगात भूलोकीची अप्सरा असलेल्या मधुबालावर ‘रजपूत का वचन’ निभावण्यासाठी तुरूंगातून सुटका करण्यासाठी आलेला सलीमचा दोस्त अजित, हा पाणी शिंपडतांना, ‘आमच्या अंगावर का पाणी पडतेय’ या साधर्म्याने अवाक् झालेले आम्ही, प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्याने ‘लक्ष्मी टुरिंग टॉकीज’ मधून, त्या मधुबालाचे पुढे काय झाले, याचा विचार न करता, घरी धावतधावत येणारे आम्ही ! किंवा हाच सिनेमा संपूर्ण रंगीत केल्यावर ‘तिरूपती चित्र मंदीरात’ बघीतल्यावर, ‘वकिलसाब, कोई ऐसा सिनेमा हो, तो हमें देखने आना अच्छा लगता हैं’ म्हणणारा चिवडा विकणारा भैय्या असो ! या अशा मंडळींनी व तेथे पाहिलेल्या या अशा सिनेमांनी, माझी सिनेमा थिएटरची आठवण जिवंत ठेवलेली आहे. ही तिन्ही थिएटर आता कालौघात बंद झालेली आहेत, असे ऐकतो आहे. पण यासंबंधीच्या माझ्या आठवणी मात्र कशा बंद होणार ?
मुलं आता येथे म्हणतात, ‘बाबा, पीव्हीआरला —- हा मूव्ही लागला आहे. चांगला आहे, तुम्हाला आवडेल. तुमच्या दोघांची तिकीटे काढली आहेत. नाही म्हणू नका.’ आम्ही दोघं जातो, जावं लागतं. तसं मी बऱ्याच वेळा मुलांच्या किंवा माझ्या गृहमंत्र्यांच्या आग्रहाने सिनेमाला जातो. माझा रिकामा वेळ व त्या सिनेमाचा वेळ, याचा योग येता येता, सिनेमा बदलून जातो, पहाणे होत नाही. काही वेळा हे सर्व जमतं व आम्ही जातो. येथील टॉकीज चांगलीच आहे. आंत बसल्यावर गार वाटतं. आवाज, चित्र छान दिसतं. चित्रपट चांगला असेल तर तो पण आवडतो.
येथे संपूर्ण चित्रपटात एकच होणाऱ्या इंटरव्हलला कोणीतरी येते ‘खायला काय हवे’ म्हणून विचारतो. मी ‘काही नको’ म्हणून सांगतो, सवयीने ! कारण पूर्वीच्या इंटरव्हलला त्यावेळी मिळणारी पाच पैशाची शेंगदाण्याची पुडी घेण्याची आमची इच्छा असायची, पण हिंमत होत नसे. काही गोष्टी आपल्या कशा व केव्हा अंगवळणी पडतात लक्षातच येत नाही.

11.2.2018