Monday, October 30, 2017

कायद्यानेच लावली पोटापाण्याची व्यवस्था

कायद्यानेच लावली पोटापाण्याची व्यवस्था

कोणावर केव्हा, काय आणि कोणते संकट येईल ते कोणालाच नक्की सांगता येते का ? हे दुर्दैवी संकट जर घरातली कर्त्या पुरुषावर आले, तर अजूनच अवघड परिस्थिती ! या संकटाने संपूर्ण घरदार अक्षरशः रस्त्यावर येते. मदत कोण करणार आणि किती करणार ?

आपल्या समाजातून, कोणत्याही कारणाने असो पण, 'एकत्र कुटुंब पद्धती' हद्दपार होत आहेत. पूर्वी बऱ्याच प्रमाणांत 'एकत्र कुटुंब पद्धत' होती, कुटुंबातील कोणावरही आलेले संकट हे त्या संपूर्ण कुटुंबाचे समजले जायचे आणि मग त्या कुटुंबातील इतर व्यक्ती त्या गरजवंताला हातभार देवून त्या संकटातून बाहेर काढत आणि सुखरूपपणे मार्गाला लावत. या बाबतीत समाजाचा पण पूर्वी बऱ्यापैकी वचक असायचा, त्यामुळे ते कुटुंब आणि त्यांतील सदस्य हे तुलनेने समाजाच्या अपेक्षेच्या विपरीत वागत नसत, समाजाची त्यांच्याकडून असलेली अपेक्षा ही शक्यतोवर मोडली जायची नाही. परिणामी समाजातील कोणत्याही कुटुंबावर वा त्यातील एखाद्या सदस्यावर आलेल्या संकटावर, या अशा अचानक आलेल्या अडीअडचणींवर अनायासेच मार्ग निघून जायचा. त्या कुटुंबाचे किंवा त्या सदस्यांच्या पत्नीवरील, मुलाबाळांवरील संकट दूर व्हायचे, तेथे सुरळीतपणे वा कसेबसे, पण त्यांतल्यात्यांत बरे म्हणावे असे, जीवन जगणे सूरु होई. कुटुंब हे समाजाचा घटक असल्याने हे समाजातील संभाव्य संकट दूर व्हायचे, समाजात शांतता रहायची. समाजात, म्हणजे अंतीमतः कुटुंबात तसेच  वैयक्तिक जीवनांत शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करणे हे देखील समाजव्यवस्थेचे महत्वाचे काम आहे.

असे काही घडले की पुढील अपेक्षा असायची की, समाजाच्या दबावाने, कुटुंबातील अन्य सदस्यांच्या दबावाने, ज्या कुटुंबाचे संकट निवारण झाले, त्यांनी यदाकदाचित जर पुन्हा त्याच कुटुंबातील अन्य कोणाला मदतीची गरज लागली, तर ती पूर्ण करायला हवी; इतकेच नाही तर समाजातील इतर कोणांवर पण जर काही अडचण आली तर ती दूर करण्यास मदत करावयास हवी. या अपेक्षेत काहीही गैर नाही, योग्य अपेक्षा आहे. एवढेच नाही तर त्या संकातून बाहेर आलेल्याचे ते सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. मात्र असे झाले नाही तर मग पूर्वी मदत केलेल्या कुटुंबातील सदस्यांचे आणि अंतीमतः समाजाची अपेक्षित गणिते चुकतात. मग निष्कर्ष निघू लागतात - कोणाला, काही मदत करण्यात अर्थ नसतो. आपल्या गरजेच्या वेळी कोणीही धावून येत नाही. आलेले संकट एकट्यालाच निवारावें लागते आणि त्या संकटे दूर करण्याच्या काळांत आणि नादांत, आपल्या आयुष्यातील महत्वाची वेळ आणि अनेक महत्वाच्या संधी निघून जातात. त्या पुन्हा येत नाहीत. या सर्व नुकसानीला जबाबदार मग पूर्वी ज्याने मदत केली आहे त्याला धरले जाते ! कारण त्याने या अडीअडचणीत असलेल्यांना मदत करून आपल्या जवळची साधनसामुग्री संपवून टाकलेली असते, की जी आता त्यांना उपयोगी आली असती. परिणामी, ही असा अनुभव घेतलेली मंडळी नंतर कोणालाही मदत करण्याच्या भानगडीत पडत नाही आणि 'ज्याने त्याने आपले आपले पहावे' हे तत्व जन्माला येते. या आणि अशाच घटनांमधून आपली जुनी 'एकत्र कुटुंब पद्धती' आणि 'एकत्र विचार पद्धत' संपुष्टात आली. 'विभक्त कुटुंब पद्धत' दिसायला लागली. परिणामी आता आपल्याला 'एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे' आणि 'विभक्त कुटुंब पद्धतीचे' तोटे एकाच वेळी दिसायला लागले आहेत.

यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेवटी आपल्यालाच करावा लागणार, समाजालाच करावा लागणार. अलीकडे समाज म्हणजे शासन ! समाजाने लोकशाही मार्गाने निवडून दिलेले सरकार ! त्यांना अशा कल्याणकारी आणि समाजहिताच्या योजना, कल्पना राबवाव्या लागू लागल्या. भारतीय राज्यघटनेत सरकारचे हे कार्य समजले गेले आहे. त्यातून वेगवेगळ्या योजना, कल्पना आणि धोरणे जन्माला आली. त्यांतील तत्वे प्रथमतः उपयोगांत आणली जातात ती सरकारच्या व्यवस्थापनांत ! यातील काही म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याचे कामावर असतांना दुर्दैवाने निधन झाले अथवा तो त्याचे काम करण्यास सक्षम राहिला नाही तर त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कुटुंबातील एका सदस्याला सरकारने 'अनुकंपा तत्वावर' कामाला लावणे, त्याचेकडून त्या सर्व कुटुंबियांची जबाबदारी पार पाडेल जे काम गमाविलेल्यावर अवलंबून होते, असे मान्य करून घेतले जाते. मगच नोकरी दिली जाते. एकदा नोकरी मिळाल्यावर किंवा आपला हेतू साध्य झाल्यावर, आपला शब्द कोण आणि किती पाळतो हे आपण सर्व जाणतातच. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे.

दुसरे अजून एक आहे ते म्हणजे - नोकरीवर असतांना दुर्दैवाने काही घटना घडून तो कर्मचारी अपंग झाला आणि ते त्याचे काम करण्यास लायक राहीला नाही, तर त्याला कामावरून पूर्वी काढले जाई. नोकरी गेल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडे. त्या अडचणीत भर म्हणून त्या अपंग माणसाला देखील सांभाळावे लागे. ही अपंग व्यक्तींसंबंधाने समस्या सर्वदूरच असते, जगात असते. मग विविध देशांच्या बैठकीत असे धोरण झाले की याबद्दल सर देशांनी काहीतरी एकसारखे धोरण चाखावयास हवे. त्यातून मग आपल्या भारतांत देखील सन १९९६ मध्ये याबद्दल वेगळा स्वतंत्र कायदा झाला आणि ही मंडळी अपंग जरी असली तरी या कारणाने त्यांना इतरांप्रमाणेच पूर्ण आणि पुरेशा संधी द्यावयास हव्या हे धोरण गृहीत धरून त्याबद्दलचा कायदा झाला. त्यानंतर मात्र सरकारी किंवा अन्य ठिकाणच्या कर्मचाऱ्याला हे कायद्यातील तरतुदीचे संरक्षण मिळाले. त्यामुळे नोकरीवर असतांना तो जरी कोणत्याही कारणाने अपंग झाला आणि त्याचे काम करण्यास अक्षम ठरला तरी त्याला कामावरून न काढता, त्याला जे काम करता येणे शक्य आहे, ते काम त्याला दिले जाते.

ही अशीच एक महिलेच्या बाबतीत घडलेली घटना, साधारणपणे २००५ नंतरच्या काळातील प्रसंगाची -

सरकारच्या एका विभागांत कारकून म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचे अकाली दुर्दैवाने निधन होते. परिणामी नियमितपणे  त्याच्या घरांत येणारा पगार बंद होतो. नियमितपणे जेवायला मिळू शकेल, उत्तम जरी नाही तरी बऱ्यापैकी शिक्षण सुरु राहील या किमान असलेल्या त्या कुटुंबाच्या सर्व शक्यता धोक्यांत येतात. मिळणार ते फक्त त्याच्या पत्नीला 'कौटुंबिक निवृत्तीवेतन' ! यातूनच त्याचे पश्चात त्याची विधवा पत्नी आणि मुलंबाळं जीवन जगणार ! त्या बिचारीला पतीनिधनानंतर स्वतःला सांभाळून किंवा स्वतःकडे लक्ष न देता, आता तिच्याच फक्त राहिलेल्या कुटुंबाकडे म्हणजे त्याच मुलाबाळांकडे बघावे लागणार असते. मुलांना उपाशी रहावे लागेल, मुलांचे हाल होतील, त्यांच्यावर संकटे येतील म्हणून वाटेल ते करणाऱ्या मातांची असंख्य उदाहरणे आहेत. पतीच्या निधनानंतर सरकार दरबारी खेटे मारून, वाटेल त्याच्या हातापाया पडून, तिने सरकारी विभागांत नोकरी मिळविली. सन १९९८ सालात अखेर तिची नोकरी सुरु झाली - 'अनुकंपा तत्वावर'. पती असतांना असलेल्या परिस्थितीपेक्षा वाईट स्थितीत, पण तो गेल्यानंतर आलेल्या, भोगलेल्या परिस्थितीपेक्षा बऱ्या अशा अवस्थेत तिचा आणि तिच्या मुलाबाळांचा जीवनक्रम सुरु झाला. तिला बिचारीला आशा हीच - हे पण दिवस निघून जातील, मुलंबाळं चांगली शिकतील, हुशार आहेत ना, मग काही काळजी नाही. आपण कष्ट केल्याने का मरणार आहे ? आज पर्यंत जास्तच करत आले आहे, बायकांच्या जातीचा कष्ट कुठे चुकले आहेत का ? मुलंबाळं चांगली उद्योगाला लागतील. त्यांची लग्न होतील, ते सुखांत रहातील आणि मग या आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. म्हातारपणी निवांत 'आरामात' दिवस काढू, मुलांचे सुखाचे सोहोळे पाहू.

आपण काय ठरवत असतो याला त्या परमेश्वराची संमती असेल तर त्याप्रमाणे घडते अन्यथा त्याच्याच मनाप्रमाणे घडते. तिच्या या 'अनुकंपा तत्वाने' मिळालेल्या नोकरीचे काही दिवस बरे गेले. ती नोकरीत रुळू लागली. ती शिकलेली असल्याने तिला लिखाणाचे कारकून म्हणून काम दिले गेले. कार्यालयाचे काही तरी लिखाण काम करावे लागे, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या खरोखर असलेल्या किंवा मुद्दाम निर्माण केलेल्या समस्यांना उत्तर देणे, सुखदुःखाच्या काही गोष्टी कोणा सहकाऱ्यांशी बोलणे आणि सरते शेवटी दिवसभर हा दिनक्रम आटोपल्यावर संध्याकाळी घरी जाणे. काही वेळा वेळेवर जाणे होई, तर काही वेळा उशीरा ! कार्यालयात असलेल्या कामावर तेथील कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची वेळ अवलंबून असते. मुलंबाळं शाळेतून, महाविद्यालयातून घरी आलेली असत, तिची वाट पाहत ! काही वेळा घरी स्वयंपाक करावा लागे, तर काही वेळा मुलीने तिला जसा जमेल तसा केलेला असे. मुलीने केलेले अन्न आपल्या डोळ्यातील पाणी दिसू न देतां खाणं तिला जड जाई. आलेल्या संकटाने मुलं अकाली समजदार होतात, त्यांचं बालपण हरवते. कार्यालयांत जर काही कामाचा वेडीवाकडा  ताण  पडला तर तिचे मन थाऱ्यावर नसे. त्यांत घरी जाऊन स्वयंपाक करायचा असला, तर अजूनच चिडचिड होई. तो राग काढणार कोणावर ? समोर तिचीच मुलं असत, मग त्यांच्यावरच निघे ! काही कारण नसतांना ! मग त्या रात्री झोप येत नसे, 'मुलांवर विनाकारण राग काढला, त्यांची काय बिचाऱ्याची चूक ?' दुसऱ्या दिवशी बिचारी अपराधी भावनेने मुद्दाम लवकर उठे, घरातील आवरासावर करी. आदल्या दिवशीचा मुलांवरच काढलेला राग तिला आठवी.  काही वेळा याला आपणच जबाबदार आहे असे तिला उगीचच वाटे.

देवाला तिची ही अशी ओढग्रस्तीची आणि तडफड होत असलेली दिनचर्या पण काही पाठवली गेली नाही. सन २००५ सालात, तिला दुर्दैवाने एक प्रकारचा पक्षाघात झाला. हातावर परिणाम झाला, काहीही लिहिता येईना. कसेतरी वेड्यावाकड्या अक्षरांत, किंवा कोणाकडून तरी कार्यालयाचे लिखाणाचे काम पूर्ण करून घेई. कर्मचारीपण जशी जमेल तशी मदत करत, पण त्यांची मदत म्हणजे त्यांचे काम झाल्यावरच असे, ते स्वाभाविक होते. एके दिवशी अचानक दुसऱ्या वरिष्ठ कार्यालयातील तपासणी पथक आले. त्यांना तिची ही अवस्था दिसली, 'काही काम करता येत नाही का ? लिहिता तरी येते का ?' या प्रश्नावर तिच्याकडे तरी काय उत्तर असणार आहे. अनुकंपा तत्वावर लागलेली, अधिकाऱ्यांच्या हातापाया पडून लागलेली कर्मचारी महिला वरिष्ठांसमोर काय बोलणार ? ती गप्प होती. अगतिकता आणि गरिबी माणसाला गप्प करते. त्यांनी मेडिकल बोर्डाकडून या कामांसाठी शारीरिकरीत्या पात्र असल्याचा दाखला आणण्यास सांगीतले आणि तिला तोपावेतो नाईलाजाने 'मेडिकल लिव्ह'वर जावे लागले. मेडिकल बोर्ड तिला तपासते आणि दाखला देते - 'तिने निदान सहा महिने औषधोपचार घ्यावेत, त्यानंतर कार्यालयीन काम करण्यास योग्य आहे का हे पुन्हा तपासणी केल्यावर ठरवता येईल. सध्या काम करण्यास अयोग्य !' इतका स्पष्ट अभिप्राय मेडिकल बोर्डाकडून आल्यावर, तिला सक्तीने सहा महिने घरी बसणे आले आणि त्या काळांतील पगाराचे पण वांधे आले. नंतर सहा महिन्याने मेडिकल बोर्डाने तपासले आणि पुन्हा तोच अभिप्राय की - 'प्रगती नाही. सहा महीने औषधोपचार केल्यानंतर काही फरक पडतो ते पुन्हा तपासणी केल्यावर ठरवता येईल.' पुन्हा सहा महिने सक्तीने घरी बसावे लागणार, पगार अर्थातच जवळपास काही नाही. पुन्हा सहा महिन्यानंतर मेडिकल बोर्डाने तपासले. दुर्दैवाने आता तिच्यावर घालाच घालायचे ठरविले होते. त्यांचा स्पष्ट अभिप्राय आला - 'ती तिच्या आजाराचे स्वरूप बघता आणि तिची गेल्या १८ महिन्यातील प्रगती बघता, ती कायमस्वरूपी आणि पूर्णपणे तिचे कार्यालयीन काम करायला शारीरिकदृष्ट्या अपात्र आहे.' यावर घ्यायचा होता तो निर्णय तिच्या कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या ठरावाच्या आधारे घेतला आणि 'संबंधित कर्मचारी ही काम करण्यास  मेडिकल बोर्डाच्या अभिप्रायानुसार शारीरिकदृष्ट्या कायमस्वरूपी आणि पूर्णपणे अपात्र असल्याने तिला कामावरून कमी करण्यात येत आहे. असे पत्र दिले. तिची नोकरी गेली. गाडे मूळपदावर किंबहुना त्यापेक्षा वाईट अवस्थेत !

मधल्या काळातील औषधोपचाराचा पैसे नसतांना करावा लागलेला खर्च, त्यासोबत कुटुंबाचा दैनंदिन खर्च आणि दिवसेंदिवस मुलांचा वाढत जाणारा शिक्षणाचा खर्च ! काहीही दिसत नसलेला आशेचा किरण ! तिच्या आणि तिच्या हितचिंतकांच्या, त्यांच्या ओळखीपाळखींच्या सल्ल्याने दोन-तीन वेळा मंत्रालयापर्यंत तिच्या नोकरीचे प्रकरण गेले, प्रत्येक वेळी तिची तिला कार्यालयाने कामावरून ज्या कारणाने काढले तो आदेश कायम करण्यात आला. संबंधितांना काही अन्य मार्गाने समजावून आपले काम होईल का याचा पण तिची ताकद नसतांना प्रयत्न झाला. गरजवंताला अक्कल नसते. त्याची अक्कल चारचौघांमार्फत काढण्याचा अधिकार सर्वांना असतो. काहींनी मेडिकल बोर्डाला साधून घेतले असते तर प्रकरण इतपर्यंत आलेच नसते असा अभिप्राय दिला, तर काहींनी अगदी सुरुवातीलाच वरिष्ठांना साधले असते तर हे प्रकरण वाढलेच नसते असे पण सांगीतले. यांवर आता काय करायचे हे कोणीच सांगत नव्हते. तिने 'तिला अगदी शिपाई म्हणून काम दिले तरी चालेल पण कामावरून काढू नका' ही विनंती केली. त्यावर आणखी बराच पत्रव्यवहार झाला. मेडिकल बोर्डाकडे पाठविले, तपासण्या झाल्या, पुन्हा तपासण्या झाल्या. तिची त्या काळातील अवस्था आणि आलेले अनुभव मला येथे आजही लिहीता येत नाही, मी अस्वस्थ होऊन जातो. सरते शेवटी कार्यालयाचा निष्कर्ष तोच 'तिला कामावर घेता येणार नाही कारण - ती कोणतेही कार्यालयीन काम करण्यास पूर्णपणे आणि कायमची अपात्र आहे. हा सरते शेवटचा निघालेला निष्कर्ष अतिशय वाईट, चिंताजनक आणि कुटुंबाचे स्वास्थ्य कायमचे हरवणारा होता. नोकरी कायमची गेलेली होती आणि त्याच्यावर काहीही उपाय नव्हता.

तो पावेतो २००९ चा डिसेंबर उजाडला, सन २००५ ते २००९ ! पूर्ण पाच वर्षे वणवण फिरणे सुरु होते ! नोकरीबद्दल कसलाही आशेचा प्रकाश दिसत नव्हता. आता सर्व करता येण्यासारखे उपाय संपल्यावर प्रत्येकाला येणारी आठवण तिला पण आली, ती म्हणजे न्यायालयाची ! शेवटी सर्वांनी सांगीतले 'तुम्ही वकिलांना भेटा. त्याशिवाय काही मार्ग निघणार नाही.' तिचा महाविद्यालयांत जाणारा मुलगा माझ्याकडे आला तो माझ्या शाळेतील मित्राला, त्याच्या शेजारी रहायचे हे. त्याने पुन्हा माझ्या भाच्याशी पण ओळख सांगीतली. 'अरे, ओळख असली किंवा नसली, पैसे दिले किंवा दिले नाही त्यामुळे मी आजपर्यंत माझ्या कामांत काही फरक केलेला नाही. ठीक आहे, बरे झाले, या निमित्ताने या पण ओळखी निघाल्यात. त्याला सर्व माहिती विचारली आणि त्याने हे सर्व सांगीतले. मी सर्व कागदपत्रे आणायला सांगीतली, त्यावेळी त्यातली काही होती आणि काही नंतर आणून दिली.

एकंदरीत प्रकरण आणि असलेली कागदपत्रे पाहून मी काम तयार केले.  त्यांत आवश्यक ते सर्व पक्षकार आणि महाराष्ट्र शासनास सामील केले. ती शासकीय कर्मचारी असल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण येथे हे काम दाखल केले. न्यायाधिकरणाने संबंधीत सामनेवाल्यांना मी काम दाखल केल्याबद्दल नोटीस काढली आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते सादर करावे ते सांगीतले. सरकारने त्यांचे म्हणणे सादर केले. काम चौकशीला लागले, ते दोन न्यायाधीशांसमोर ! प्रशासकीय न्यायाधीकरण यांत तेथे दाखल असलेल्या कामांचे निर्णय देण्यासाठी विविध व्यक्ती घेतल्या जातात. त्यांत महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेतील निवृत्त कर्मचारी जसे घेतले जातात, तसेच न्यायालयातून निवृत्त झालेले जिल्हा न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायाधीश पण घेतात. हे काम चौकशीसाठी प्रशासन सेवेतील निवृत्त कर्मचारी आणि उच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायाधीश यांच्या समोर होते.

सरकारचे मुख्य म्हणणे म्हणजे मेडिकल बोर्डाचा अभिप्राय हा डावलता येण्यासारखा नाही. कर्मचारी हा कायमस्वरूपी आणि पूर्णपणे काम करण्यास शारीरिकदृष्या अपंग म्हणून अपात्र आहे. अशा परिस्थितीत काय करावे या बद्दलचा 'शासन ठराव' अगदी स्पष्ट आहे त्यामुळे शासनाने काहीही चूक केलेली नाही. शासन संवेदनशील असले, कर्मचाऱ्याच्या या अवस्थेबद्दल आणि ओढवलेल्या आपत्तीबद्दल जरी शासनाला सहानुभूती असली तरी शासन हे कायद्याने बांधलेले आहे. या परिस्थितीत शासन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याला काहीही मदत करू शकत नाही. कार्यालयाने कामावरून कर्मचाऱ्याला काढलेले योग्य आणि कायदेशीर आहे. कार्यालयाचा आदेश कायम करावा. त्यांनी आवर्जून शासनाचा ठराव त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत जोडलेला होता.

काम चौकशीसाठी न्यायाधीशांसमोर निघाले. मी घडलेली वस्तुस्थिती पूर्ण सांगीतली. सरकारने काय करावयास हवे होते ते सांगीतले आणि अपेक्षेने न्यायाधीशांकडे पाहिले. न्या. दाभोळकर आणि मा. आर. गोपाळ यांचे कोर्ट होते.सरकारी वकील तात्काळ उठले आणि शासनाचा ठराव पुन्हा कोर्टाला दाखविला. मग मला बोलावे लागले, 'मी कोर्टापासून शासनाचा हा ठराव लपविलेला नाही. एवढेच नाही तर भारत सरकारचे अपंगांबद्दलचे धोरण काय आहे याचे पण कागदपत्र सोबत जोडलेले आहेत.'

यांवर हंसत न्या. दाभोळकर म्हणाले, 'Mr. Bhokarikar, In stead of stretching this issue, show me the provision applicable for the disabled persons which you have just argued before me in last month.'

'Yes, My Lord may see Section 47 of the Persons with Disabilities (Equal Opportunities, Protection of Rights and Full Participation) Act, 1996 which itself is clear and requires no further argument in this case for allowing my petition.' मी बोललो आणि त्यांच्याकडे ते पुस्तक दिले. त्यांनी ती तरतूद वाचली. त्यांची आणि मा. आर. गोपाळ यांची एकमेकांशी थोडी चर्चा झाली.
मला मा. आर. गोपाळ यांनी विचारले - 'But what about the Government Resolution of our State of Maharashtra?
'There would also not be the dispute that law will prevail over any resolution of any Government.' मी बोललो. शेवटी 'Yes, we are going to allow the petition.' असे त्यांनी आम्हा दोघा वकिलांना सांगीतले. माझ्या पक्षकाराला तिला कामावरून काढून टाकल्यापासूनची वेतनश्रेणी मिळाली, नोकरीत सातत्य गृहीत धरले. ती कोणते काम करू शकते ते काम तिला द्यावे आणि पगार पूर्वीप्रमाणेच द्यावा. हे निर्देश दिले.

एकदा कर्मचारी हा एकदा कामाला लागल्यावर जर कोणत्याही कारणाने अपंग झाला अथवा ते काम करण्यास अपात्र ठरला तरी त्याला कामावरून काढून टाकता येत नाही, अथवा त्याचा दर्जा कमी करता येत नाही तर तो अशा परिस्थितीत कोणते काम करू शकतो ते पाहून ते काम त्याला द्यावे आणि पगार मात्र पूर्वीचाच द्यावा. जर त्याला करता येईल असे काम उपलब्ध नसेल तर ते उपलब्ध होईपावेतो थांबावे पण त्याला कामावरून या कारणाने कमी करता येत नाही.     

सरकारचे धोरण कितीही चांगले असले, त्या बद्दलचे कायदे कितीही उत्तम आणि आदर्श असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी मंडळी जर त्या धोरणाप्रमाणे काम करत नसतील तर त्याची फळे मिळतच काय पण कोणाला दिसतही नाही. सरकारचे किंवा कोणत्याही व्यवस्थेचे यशापयश हे त्याच्या धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. 

(संक्षीप्त रूपांत दिनांक २२ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर, २०१७ ला 'दैनिक लोकमत' जळगांव आवृत्तीत प्रसिद्ध झाले होते)

http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/2017-10-28/8#Article/LOK_JLLK_20171028_8_5/450px

http://epaper.lokmat.com.s3-website.ap-south-1.amazonaws.com/eNewspaper/News/LOK/JLLK/2017/10/22/ArticleImages/1DE2737.jpg

दिनांक ३०. १०. २०१७

 

           

Tuesday, October 24, 2017

पहिली फूलपॅंट व पहिला कोट

पहिली फूलपॅंट व पहिला कोट
ज्याला लहानपणी स्वत:ची चड्डी पण सावरता येत नाही, त्याला पण आपण मोठ्या माणसांसारखे ‘फूल पॅंट’ घालून ऐटीत फिरावेसे वाटते. ‘फूल पॅंट’ घातल्यावर ऐटदार दिसतो का हाप चड्डीच चांगली आहे ? या वादात मला शिकायचे नाही. पण हा मानवी स्वभाव आहे, आपल्याजवळ जे नाही ते आपल्याला नेहमीच हवेसे वाटते. यांत काही वेळा आपल्यापाशी असलेल्या बहुमूल्य वस्तू आपण विसरतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हा पण माणसाच्या स्वभावाचाच भाग आहे.
सातवीतील गोष्ट असेल ! मला पण वाटू लागले, आसपास पाहून, आपण फूलपॅंट शिवावी. तो पावेतो, कपडे म्हणजे काय तर बहुतांश विद्यार्थ्यांचे शाळेचेच गणवेश असायचे - खाकी हाप चड्डी आणि पांढरा सदरा ! कोणालाही परवडेल, सहजसाध्य असेल असाच गणवेश असावा. सर्व एकच आहोत ही भावना निर्माण व्हायला मदत होते. अलिकडे काही शाळांमधून असलेले गणवेश व त्यांच्या किंमती पाहिल्यावर हा विचार बदलत चालला आहे की असे वाटते.
मला फूलपॅंट हवी म्हणजे मागणार कोणाजवळ, तर वडिलांकडे ! एकदा वडिलांसोबत चिमणाराम मंदीरात गेलो होतो. कै. बाबुकाका डोखळे यांना भेटायचे होते. तेथे कै. नाना शिंपी पण आले होते. कै. नाना शिंपी म्हणजे काळसर उभट चेहरा, डोक्यावर मळकटच म्हणता येईल अशा रंगाची काळी टोपी. पांढरा पायजमा आणि पांढरा मनिला ! उंची बेताची ! नाना शिंपी हे त्या काळातील ‘कोट स्पेशालीस्ट’ होते. ‘कोट शिवावा तर नाना शिंप्यांनी !’ ही त्यांची प्रसिद्धी ! खेडेगांवात, तालुक्याला पण नियमीत कोट घालणारी मंडळी होती त्यावेळी ! त्याला गरिबी आडवी येत नसे. नाना शिंपी रहायचे कै. वसंतकाकांच्या समोरच ! कै. वसंताकाका वकिल होते. त्यांच्याकडे म्हणजे नाना शिंप्यांकडे तसे जाणे येणे असायचेच ! त्यांच्याकडे संतोषीमातेचे व्रत कै. लक्ष्मीकाकूंनी केल्याचे अजून आठवते. जेवायला बोलावलेल्या मुलांत मी पण होतो.
त्या वेळी कोणीही कोणाकडे न विचारतां आणि कसल्याही कामाशिवाय जावू शकत असे. लहान मुलांना तर कसलाच धरबंद नसे. ओळखीच्या सर्वांच्या घराचा उपयोग हा आमच्या सारख्यांला बालगोपाळ मंडळींना खेळण्यासाठी असतो, ही त्यावेळची आमची समजूत ! या समजूतीला धक्का लावणारी मंडळी त्या काळी कमी होती, त्यांचा जरी काही विरोधी सूर असला, तर तो बहुसंख्य मंडळी, ही आम्हाला दटावून दाबून टाकत असे. ‘अहो, पोरं खेळणार नाही तर काय आपण खेळणार आहे ? खेळू द्या त्यांना, कशाला रागवताय ?’ हे कोणीही म्हणत असे. हा विरोधी स्वर त्यांच्या घरातूनसुद्धा येई. हे त्यांना म्हटल्यावर मग आपल्याला, ‘कारे पोरांनो, काय मस्ती लावली आहे ? खेळायचं तर नीट खेळा ! मस्ती काय करताय ?’ असे म्हटले जाई. आता मस्ती आणि खेळ यांत नेमका फरक काय हे शोधण्यात आम्ही वेळ घालवत नसू व थोडं थांबल्यासारखं करून पुन्हा खेळायला म्हणजे मस्ती करायला लागत असू.
तर चिमणाराम मंदीरात ते, नाना शिंपी, दिसल्यावर माझ्या फूलपॅंट या विषयाने पुन्हा उचल खाल्ली, ‘मग केव्हा शिवायची ?’ मी वडिलांना विचारले. ‘काय म्हणतोय पोरगा, अण्णा ?’ त्यांनी विचारले. ‘नसते मागणे, फूलपॅंट शिवायची म्हणतोय.’ वडिल उत्तरले. बहुतेक सर्वांच्या वडिलांना मुलांच्या मागण्या या अवास्तव वाटतात. ही एक प्रथाच पडलेली आहे. ‘घेऊन द्या त्याला. काय मोठंस त्यात ? तुम्ही कापड आणून द्या. मी शिवून देईन !’ नाना शिंपी बोलले. झालं, मला बरंच झालं. ‘केव्हा, जायचं आणायला कापड ?’ मी वडिलांना विचारले. हा विषय दोन-तीन दिवस चालला. शेवटी वडिलांनी, बहुतेक कंटाळूनच, मला म्हटले, ‘चल, नानाला सांगून ये. गांधी चौकात ये. कापड घ्यायचेय तुला.’ ही बातमी मी अजिबात वेळ न दवडता त्यांच्या घरी जाऊन सांगीतली. ‘काका, लवकर चला, गांधीचौकात. फूलपॅंटचे कापड घ्यायचे आहे. वडिलांनी बोलावले आहे तुम्हाला.’ मी निरोप देवून वडिलांसोबत गांधीचौकात कपड्याच्या दुकानांत गेलो. तेथे वडिलांच्या व दुकानदाराच्या गप्पा सुरू ! नाना शिंप्यांचा पत्ता नाही. ही मोठी माणसं काम सोडून इतर गप्पा का मारतात हे लहानपणचे कोडे अजून सुटत नाही, — कारण आता मी गप्पा मारत असतो, मुलांना कुठे घेऊन गेलो तर ! नाना शिंपी दुकानांत आले. दुकानदाराने कापड समोर ठेवलेलेच होते. त्यातले कापड निवडले, पॅंटला किती लागेल ते वडिलांनी त्यांना विचारले. त्यांनी सांगीतले, ‘नाना पॅंट माझ्या पोराची शिवायची आहे. आपली नाही.’ यांवर दुकानदाराला पण हसू आले. ‘अण्णा, फूलपॅंटला कापड इतकेच लागते. लहानमोठा असे काही नाही.’ इति नाना शिंपी ! शर्ट व पॅंटचे कापड घेतले. ते कापड घेऊन गेले. जातांना, ‘काका मला दसऱ्याला पॅंट घालायची आहे. लवकर द्या.’ मी सांगीतले.
शिंप्याच्या हातात गिऱ्हाईकाचे कापड आल्यावर ज्याला कपडे शिवून घ्यायचे असतात, त्याच्या कोणत्याच गोष्टीला शिंपी नकार देत नाही; मात्र त्याला जे करायचे असेल तेच करतो. हा शिंप्यांचा परंपरागत गुण अलिकडे नाहीसा होत चालला आहे, चक्क वेळेवर कपडे देतात. ही काळजीची बाब आहे. त्यांनी ज्या दिवशी कपडे शिवून तयार होतील असे सांगीतले असते, त्या दिवशी प्रत्यक्षात कापड कापलेले पण नसते. आपण कपडे घ्यायला गेल्यावर तो कापड कपाटातून किंवा आपल्या खालून काढतो आणि कात्री घेतो. अगोदर घेतलेले माप पाहून घेतो, काही वेळा पुन्हा माप घेऊन खात्री करून घेतो. कपड्यावर त्याच्याजवळच्या खडूने किंवा पेन्सीलीने त्यांवर वेड्यावाकड्या रेषा मारून ते कापड खराब केल्याची आपली खात्री करतो. मग त्या भल्यामोठ्या लाकडी टेबलावर कात्री टेकवून, तिचे एक पाते कापडाच्या खाली आणि एक वर असे ठेवून ‘कच्यॉंग कच्यॉंग, कच्यॉंग किच्च’ असे करत कापतो. फार छान वाटतो तो आवाज ! ते नव्याकोऱ्या कापडाचे हे असे सर्व तुकडे केलेले पाहिल्यावर आता याची पॅंट किंवा शर्ट कसा होणार, ही आपल्याला शंका असते. पण तो खरच कलाकार असतो. अगदी आपल्या मापाला बसेल असे कपडे शिवतो. ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ उगीच म्हणतात का ? आपल्यासमोर कापड कापल्यावर आता आपली खात्री होते.
हे त्यांनी माझ्या फूलपॅंट बद्दलही केले. मग मी ‘काका, हे काय तुम्ही आत्ता कापले कापड, नवरात्र सुरू होईल दोन तीन दिवसांत !’
‘हॅं, रात्रीतून शिवून होईल. पण तू नवरात्राच्या पहिल्या माळेला ये.’ त्यांचे उत्तर !
मी पहिल्या माळेला गेल्यावर ते तुकडे अर्धवट शिवलेले दिसत होते, पण ‘आज होऊन जाईल. तू दोन दिवसांनी ये.’ त्यांचे उत्तर ! मी बरोबर तिसऱ्या माळेला त्यांचेकडे. ‘काका, पॅंट !’
‘काचबटन राहिले आहे. परवा ये.’ त्यांचे उत्तर ! पण बरीचशी पॅंट शिवली होती. मी बरोबर तिसऱ्या दिवशी त्यांचेकडे !
‘काका, झाली का पॅंट ?’ मी रडवेला.
‘बैस जरा. इस्त्री करतो आणि देतो. का संध्याकाळी येतो ? असं कर, उद्या घेऊन जा !’ त्यांचे उत्तर. हे असे सवालजबाब त्यांचे माझ्यासमोर येणाऱ्या इतर गिऱ्हाईकांसोबतही चालूच होते. ‘सणावाराचे काम पडून असते.’ काय करणार ?’ त्यांचे स्पष्टीकरण ! दुसऱ्या दिवशी मी पुन्हा हजर !
‘काका, सर्व नवरात्र संपत आले. पॅंट तयार नाही.’ मी रडवेला. ‘पोराला काय त्रास देताय ?’ माझा आवाज ऐकून आतून काकू !
बैस जरा, घेऊन जा !’ त्यांचे उत्तर. त्यांनी इस्री काढली. त्यांत कोळसे टाकले ते पेटवले. शेजारच्या पाण्याच्या वाटीतील पाणी कपड्यांवर शिंपडत इस्त्री केली. नविन फूलपॅंट व शर्ट माझ्या हातात होते, दसऱ्याला घालायला. ही माझी पहिली फूलपॅंट कै. नाना शिंपी यांनी शिवलेली.
मध्यंतरी बरीच वर्षे गेली. सन १९८५ सालातील गोष्ट ! मी सातवी ते एल् एल्. बी. चे शेवटचे वर्ष हा पल्ला पार केला होता. मध्यंतरी शिक्षणा निमीत्ताने बाहेरगांवी रहात असल्याने, गांवाशी संबंध कमी यायचा. पण वकिली सुरू करायची होती. एल् एल्. बी. चा रिझल्ट यायचा होता, तो आला. मी एल् एल्. बी. झालो, पहिल्या वर्गात ! नाना शिंपी आता पार थकले होते. अशीच त्या दरम्यान एकदा भेट झाली त्यांची व वडिलांची ! वडिलांनी त्यांना सांगीतले, ‘पोरगा वकिल होतोय. रिझल्ट आलाय.’ हे त्यांचे बोलणे होत नाही तर ते वडिलांना म्हणाले, ‘त्याचा वकिलीचा कोट मी शिवणार आहे. कापड पाठवून द्या.’ घरी आल्यावर हे वडिलांनी मला सांगीतले. मी काही बोललो नाही. जळगांवला असाच कामानिमीत्ताने गेलो होतो. कोटाचे काळे कापड घेतले. दुकानदार म्हणाला, ‘शेजारी टेलर आहे. शिवून देईल.’ मी एक क्षण थांबलो व सांगीतले ‘नंतर शिवायचा आहे.’ कापड घेवून मी घरी आलो.
दुसऱ्या दिवशी कापड घेऊन नाना शिंपी यांचेकडे गेलो. म्हटले ‘काका, कापड आणले आहे. कोट शिवायचा आहे. पण वेळेवर द्या. पॅंटसारखे नको.’
‘पोरा, कोणते कपडे केव्हा द्यायचे हे माहिती आहे आम्हाला ! हे कोटाचे काम आहे, कोर्टाचा कोट आहे. नविन सुरूवात आहे. वेळेवर देईन. काळजी करू नको.’ ते म्हणाले, ‘पूर्वीचे दिवस वेगळे होते. काम भरपूर होते. आता होत नाही आणि काम पण नाही. कोट घालणारे पण कमी झाले आहे. तुम्हाला पण कोट घालावाच लागतो म्हणून तुम्ही शिवताय, नाहीतर तुम्ही पण कशाला शिवला असता.’ त्यांचा स्वर बदलला. आंतमधे डोकावून बघत, ‘अग, अण्णांचा मुलगा वकील झालाय. कोट आणलाय शिवायला, आपल्याकडे.’ त्यांनी काकूंना सांगीतले. त्या बाहेर आल्या. ‘वकिल झालास. छान ! तुझ्या काकांकडून आता होत नाही रे काम पहिल्यासारखे ! पण करावे लागते ना ? जेवायला तर लागते भूक लागली की ? यांच्यासारखा कोट शिवणारे आहे तरी कोण आता ?’ ती माऊली आपली अडचणीची परिस्थिती सांगत होती, आपल्या नवऱ्याची प्रकृती व म्हातारपण सांगत होती का नवऱ्याचे कौशल्य सांगत होती ? त्यांत कोणती भावना नव्हती. म्हातारपणी नवऱ्याला विश्रांती, आराम मिळणे तर दूर पण पोटासाठी काम करावे लागते, हे खूप दु:ख असते पत्नीसाठी !
‘काका, शिलाई किती द्यायची याची ?’ मी विचारले.
‘मोठा आला आहे शिलाई द्यायला ? तू अजून वकिली सुरू करतोय ! काय घ्यायचे ते घेईल अण्णांकडून ! दोनशे काय सव्वादोनशे घेईन ! पण माझी आठवण राहील असा कोट होतो की नाही बघ.’ त्यांचे उत्तर ! त्यांच्याने पुढे बोलवेना. त्या काकाकाकूंना नमस्कार करून त्यांच्या घरून निघालो.
त्यांनी अगदी वेळेवर कोट दिला. माझा पहिला कोट ! छानच शिवला होता - ‘कोट शिवावा तो नाना शिंप्यानीच ! काही वर्षांनी तो कोट मला होईना. दुसरा शिवला. दुसरीकडे शिवावा लागला. त्यावेळी कोट शिवायला नाना शिंपी नव्हते, ते जग सोडून निघून गेले होते. माझ्या पहिल्या कोटाची आठवण मागे ठेवून !

२२ ऑक्टोबर, २०१७

Wednesday, October 18, 2017

किर्तनकार - मुकीमबुवा रावेरकर


किर्तनकार - मुकीमबुवा  रावेरकर

आज कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी !

दोन एकादशीमध्ये आपण मानतो, तो हा चातुर्मास सांभाळला जातो, आषाढी एकादशी म्हणजे ‘देवशयनी एकादशी’ ते कार्तिकी एकादशी म्हणजे ‘प्रबोधिनी एकादशी’ ! देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात. आपल्याला सोयीच्या असलेल्या कल्पना आपण प्रसृत करतो, मानतो व पाळतो. देवाला कसली आहे, झोप व जाग ! तो कायम जागा असतो, तुमच्या आमच्यासाठी ! पण आपण ‘प्रबोधिनी एकादशीला’ देव जागृत होतात हे मानतो, हे मात्र खरे !

अजून याची आवर्जून आठवण यायची दोन कारणे - एक म्हणजे या दिवशी जळगांवचा रथ असतो. प्रभू रामचंद्रांचा रथोत्सव असतो. जुन्या जळगांव मधील पुरातन मंदीर आहे, रामरायाचे ! त्यानिमीत्त हा वहने निघतात उत्सवा निमित्ताने व कार्तिकी एकादशीला रथ निघतो.

दुसरे म्हणजे - या दरम्यान तिथं तीन दिवस आमच्या गांवचे प्रसिद्ध किर्तनकार कै. सुधाकरराव मुकीमबुवा रावेरकर यांचे सलग तीन दिवस म्हणजे, नवमी ते एकादशी असे किर्तन व्हायचे. कार्तिकी एकादशीचे दिवशी शेवटचे किर्तन !

आज कार्तिक एकादशी म्हणून आठवले.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

शाळेची सहामाही परिक्षा झाली की लगेच सुटी लागायची दिवाळीची ! त्या वेळी सहामाहीचे पेपर पाठोपाठ होत. साधारण आठवडाभर परिक्षा असे, यापेक्षा जास्त काळ अपवादानेच असेल. काही वेळा तर वेळेत परिक्षा संपावी म्हणून असेल पण एका दिवसांत दोन पेपर असत. पुढे दिवाळीची साधारणपणे तीन आठवडे सुटी दिसत असल्याने त्या एका दिवसांत दोन पेपर दिल्याचे पण आम्हाला काही वाटत नसे.
घरी आलो शेवटचा पेपर देवून, की घरी पत्र आले असायचेच, आजोळहून ! आई सांगायची ‘दिवाळीसाठी बोलावलंय आजोबांनी ! जाणार आहे का ?’ या प्रश्नाला काही विशेष अर्थ नसायचा. कारण कसे जायचे, हा प्रश्न असायचा. ‘जायचे का नाही’ हा प्रश्नच नव्हता. आई बहुतेक पाडवा झाल्यावर यायची पण आम्हाला गांवाला जायला मिळणार याचेच अप्रूप ! त्यावेळी आजच्या सारख्या महामंडळाने रावेर-जळगांव अशा भरपूर बसेस पण सुरू केल्या नव्हता. जळगांवी जाणारी विश्वासाची सोबत मिळाली तर त्याचे बरोबर पण मी जायला तयार असायचो.
जळगांवी पोचल्यावर मामा आणि मावशी यांना आनंद वाटायचा. जास्त आनंद होत असावा आजोबांना ! त्यांचे आजीला उद्देशून मामा-मावशींना नक्की वाक्य असायचे. ‘तिची नातवंडं आली आहेत आज, आता तुझी आई आपल्याकडे काही पहाणार नाही.’ यांवर आजी काही बोलत नसे, नुसती हसे. दुपारच्या वेळी मग फराळाचे पदार्थ तयार करण्याचे काम ! चिवडा बहुतेक सर्वात पहिले होई. मग चकल्या, करंज्या ! शेव, कडबोळी वगैरे धनत्रयोदशीला ! लाडू, अनारसे हे लक्ष्मीपूजनाचे दिवशी होत. पाडव्याचे दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी आई येई जळगांवला ! मग ती आणत असे काही, ताई म्हणून तिच्या भावांना !
रोज अकरा वाजता मुंबई आकाशवाणी केंद्राची ‘कामगार सभा’ कामगारांसाठी कार्यक्रम सुरू होई. शेजारी रेडिओ होता, तो सर्वांना गाणी ऐकता यावी या आवाजात लावला जाई. त्यांनी तसा लावला नाही तर त्यांचेकडे जाऊन ऐकणे किंवा जाऊन आवाज मोठा करून येणे ! यांत ना कोणाला कमीपणा वाटे, ना कोणाचा अहंभाव सुखावे ! सर्वांनाच हे सर्वसाधारण वागणे वाटे. सर्वांना रेडिओ घेणे त्यावेळी परवडत नव्हते का तशी मानसिकता होती, कोण जाणे ? पण गाणी सुंदर लागत त्या कार्यक्रमात ! गुरूवारची आर. एन्. पराडकरांची गाणी ! आजही त्यांची गाणी लागली की मला दिवाळीची सुटी व जळगांव आठवते.
माझे दुपारचे काम ठरलेले ! विविध स्त्रोत्रे आजोबांकडून शिकणे. सुरूवात भगवद्गीतेने झाली. ते एक त्यावेळी कंटाळवाणे वाटणारे काम असे. पण जरा ते काम आटोपले की नुकतेच केलेले फराळाचे खाता येई. चिवडा कितीही खाल्ला तरी त्या वेळी पोट का भरत नसे, हे मला आज पण समजले नाही. आता मात्र लगेच पोट भरते, असे का ? हे पण गूढ उकलत नाही. तेथील पाडवा, भाऊबीज झाली की आई बहुतेक निघून जाई. आम्ही थांबत असू तेथेच !
तेथे कार्तिक शुद्ध ११ ला रथ यात्रा असते. उत्सव असतो तेथे मोठा ! ते एक महत्वाचे होते. नवमी, दशमी व एकादशी अशी तीन दिवस तेथे आमच्या गांवचे, पण त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले किर्तनकार मुकीमबुवा यांचे किर्तन असायचे. मुकीमबुवा म्हणजे रावेर येथील कै. सुधाकर देवराव मुकीम ! यांची किर्तनातील किर्ती म्हणजे, आमच्या भागांत कोणी जर नुसता टकमक पहात ऐकत असला, की त्याला जाणीव करून देऊन ‘हे काय मुकीमबुवांचे किर्तन चालले आहे का ?’ असे सांगून कामांची आठवण करून दिली जाई. नंतर यांना या कामांची जाणीव ठेवून महाराष्ट्र सरकारतर्फे ‘किर्तनकार पुरस्कार’ देखील मिळाला. बहुतेक बाबामहाराज सातारकर यांच्यासोबत ! या किर्तनाच्या निमित्ताने ते महिनोमहिने बाहेरच असायचे. सध्या ते आपल्यांत नाही.
तर त्यांचे उत्सवा दरम्यान किर्तन व्हायचे ते नवी पेठेत ! बहुतेक तेथील प्रसिद्ध व्यापारी जोशी बंधू ठेवायचे किर्तन ! किर्तन अप्रतिम करायचे मुकीमबुवा ! सलग पंचवीस वर्षे किर्तन केले त्यांनी जळगांव येथे कार्तिक एकादशीच्या उत्सवात ! गर्दी किर्तनाला अफाट, त्या राजकोटीया यांच्या दुकानापासून ते थेट मद्रास बेकरीपर्यंत असायची ! त्या वेळी मला किर्तनातील त्यांचा पूर्वार्ध आवडत नसे तर उत्तरार्धातील गोष्ट आवडे. मी किर्तनाला गोष्ट ऐकता येते त्यासाठी जात असे. मात्र आजोबा म्हणायचे ‘पूर्वार्ध कसा सांगतात, यांवर किर्तनकार कसा आहे हे ठरते.’ हे मोठ्या माणसांचे तिरपागडे नियम मला काही त्या वेळी समजत नसत. पण त्यांनी, ‘आम्ही जाणो हरिचे पाय’ हे सुरूवातीचे त्यांच्या पूर्वजांचे म्हणजे ‘अमृतराय मुकीम’ यांचे पद सुरू केले की श्रोते सावरून बसायचे. पूर्वार्धात विवरणाला एखादे पद वा अभंग घ्यायचे आणि अगदी छान, विविध दृष्टांत देत सांगायचे. ‘मुकीमबुवांचे किर्तन, म्हणजे काही पहाणेच नाही.’ शेजारचे एक आजोबा माझ्या आजोबांना सांगत. ही बैठक असे थेट पूर्वार्ध संपेपावेतो !
मग उत्तरार्ध सुरू व्हायचा. मी आणि माझ्यासारखी तेथे आलेली नातवंडमंडळी मग सावरून बसायचे. एक जण तबक व त्यात हार बुक्का घेऊन यायचा. मुकीमबुवा हे गळ्यातील उपरणं मग कमरेभोवती गुंडाळायचे. तो तबक घेऊन आलेला उभा असायचा. तबक पेटीवाल्याच्या टेबलावर ठेवायचा आणि बुवांच्या गळ्यात हार घालायचा, कपाळाला बुक्का लावायचा. बुवा मग त्याच तबकातील चिमूटभर बुक्का घ्यायचे, श्रोत्यांमधे आसपास लावल्यासारखा उधळायचे, त्या तबक घेऊन येणाऱ्याला लावायचे. तो मग खाली उतरून सर्व श्रोत्यांना बुक्का लावायला सुरूवात करायचा.
मग बुवासाहेब सांगायचे ‘पूर्वार्धातील अभंगासाठी दृष्टांत म्हणून एक कथा सांगतो. त्यानंतर आम्ही सर्व बालगोपाळ रमून जायचो. कथा एखादे वेळी मंगळवेढ्याच्या संत दामाजीपंतांची लावली जायची. बादशहाचा अधिकारी, त्या वर्षीचा दुष्काळ आणि लोकांची अवस्था ! काही वेळा त्या दुष्काळाचे मंगळवेढ्याचे वर्णन ऐकून डोळ्यांत पाणी यायचे. संत मनाचे हे दामाजीपंत, त्यांच्या जीवाची होणारी तडफड, त्याची मुकीमबुवांची उदाहरणे आणि शेवटी जनतेला धान्यवाटप त्या बादशहाच्या गोदामातून !
दामाजीपंतांनी सर्व गांवाला बादशहाच्या गोदामातील त्यांना सांभाळायला दिलेले सर्व धान्य दुष्काळामुळे वाटून दिल्याने बरे वाटायचे. पण एकंदरीत बादशहाची आमच्या समोरची प्रतिमा पाहून दामाजीपंतांची खूप काळजी पण वाटायची. आमचा आवडता प्रसंग मग सुरू व्हायचा तो की इकडे दामाजीपंत पांडुरंगाची पूजा करताहेत, त्याला सांगताहेत ‘मला हे सांगायला उद्या बादशहाकडे जावे लागेल. याची काय शिक्षा मिळेल ते मला माहिती आहे. उद्यापासून तुझ्या पूजेला मी नसणार.’ आमच्या डोळे वहात असायचे.
त्याचवेळी हा पंढरीचा पांडुरंग दामाजीपंतांनी गांवासाठी दिलेल्या धान्याचा मोबदला, बादशहाला महाराच्या वेषात जाऊन सोन्याच्या नाण्यांच्या रूपात मोजत असायचा. थैलीतून नाणी पडताहेत आणि बादशहाची माणसं मोजताहेत. नाणी पडताहेत आणि माणसं मोजताहेत. मोजलेले नाण्यांचे वेगळे ढीग पुन्हा सारख्या पडतच असलेल्या थैलीच्या नाण्यांत मिसळून जातात. नाणे पडताहेत आणि माणसं मोजताहेत. हाती काहीच लागत नाही. शेवटी बादशहाचाच मोजणारा माणूस म्हणतो - जहापन्हा, ज्यादा भेज दिये । अपना अनाज कम था । आम्ही ही होत असलेली फजिती पाहून हसतोय. मोठमोठयाने ! प्रत्यक्ष पांडुरंग भक्तासाठी काय करणार नाही. तो पावती मागतो, धान्याचे पैसे मिळाल्याची बादशहाला ! बादशहा पावती देतो.
दुसऱ्या दिवशी दामाजीपंत उठतात. आता पांडुरंगाची आपल्या आयुष्यातली शेवटची पूजा करावी म्हणून देवघरात देवासमोर पाट मांडतात. तो तेथील पोथीवरील कागद पाहून उचलतात ! बादशहाच्या शिक्क्याचा कागद ! मजकूर वाचतात आणि काही न बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा सुरू होतात. त्यांना एवढेच बोलता येते, ‘आयुष्यभर भक्ती करतोय तुझी आणि तू माझा नोकर बनून दुसरीकडे जातोय. कोणत्या जन्माचे हे पाप आहे का पुण्य आहे ते पण मला समजत नाही.’
शेवटी मुकीमबुवा म्हणायचे, ‘आता जर तुम्ही दामाजीपंतांना विचारले की दुष्काळ केव्हा होता, तुम्ही धान्य कसे वाटले, बादशहाला पैसे कोणी दिले, त्याची पावती तुम्हाला कशी मिळाली, पुढे काय झालं ? तर ते एकच सांगतील आम्ही ते काही जाणत नाही, आम्हाला ते काही आठवत नाही. आम्हाला आठवते ते एकच - आम्ही जाणो हरिचे पाय !’ मग त्यांचा सुरूवातीचा अभंगाची एक ओळ भैरवीत मुकीमबुवा म्हणायचे आणि समस्त श्रोतृवृंदाला जमिनीवर हात टेकवून नमस्कार करत ‘हेचि दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा । तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा ।।’ म्हणत तबलापेटी वाद्यांवर हात ठेवत त्यांना थांबवायचे आणि आरती सुरू व्हायची. मी मनाने मंगळवेढ्यात दामाजीपंतांकडे तर शरीराने मुकीमबुवांना नमस्कार करण्यासाठी जात असायचो.

दिनांक - १५. १०. २०१७

Monday, October 16, 2017

आणि त्याने कपाळाला लावला हात ---

आणि त्याने कपाळाला लावला हात ---

जसा जन्म होतो, तसा शाळेत प्रवेश घ्यावाच लागतो तो 'जीवनाच्या शाळेत' आणि शिकावेच लागते प्रत्येकाला अनुभव घेत घेत ! तुमची इच्छा असो व नसो ! या शाळेत मग काही अनुभवाने शहाणे होतात, तर काही आयुष्यभर शिकल्यावर देखील शहाणे होताच नाही. प्रत्येकाच्या क्षेत्रातील अनुभव हे त्याचे स्वतःचे आणि त्याच्या व्यवसायातूनच मिळतील, असे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव असतात ! माझा व्यवसाय हा 'वकिलीचा' ! यांतील अनुभवाचे भाग म्हणजे - पहिले म्हणजे ज्यांना कोणीतरी फसविले ती मंडळी, दुसरे म्हणजे जे अगदी व्यवस्थीत व योजनाबद्ध पद्धतीने दुसऱ्याला फसवतात ती मंडळी आणि तिसरे म्हणजे कोणताही संबंध नसतांना जे संकटात सापडतात ती मंडळी ! पण, एक मात्र गंमत असते, यातील प्रत्येकाला या संकटातून सुटका, अगदी कायदेशीर सुटका हवीच असते. मग न्यायालयाशिवाय दुसरा मार्ग नाही, जो सर्वसंमत आहे. बस, या निमित्ताने असेच काही आलेले अनुभव आणि घडलेल्या घटना आपल्याला गप्पा मारत, सांगाव्यात असे मनांत आले. बघू या, आपल्याला आवडतात का आणि आपणांस यातून काही शिकता येते का ? 

साधारणतः फेब्रुवारी १९९८ मधील घटना असावी. सातपुड्याच्या पायथ्याच्या गांवातील महाराष्ट्रातील एक कुटुंब ! हिंदू कायदा लागू असलेले ! सर्वसाधारण गरीबच म्हणता येईल, पण शेतीबाडी बाळगून असलेले ! दिवसेंदिवस कुटुंब वाढणार आणि मिळणारे उत्पन्न त्या मानाने नाही, हे ठरलेले ! शेवटी कुटुंबाची एक शाखा १९३०-३२ चे सुमारास मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या गावी पोटापाण्याच्या उद्योगाला गेली. कुटुंबात खाणारी माणसे कमी झाली. गाव वा घर सोडतांना सोनेनाणे, पैसाअडका, भांडीकुंडी नेता येतात, काही वेळा पोटापुरते का होईना पण काही दिवसाचे धान्य नेता येते. पण कुटुंबाची स्थावर मिळकत म्हणजे घरदार, शेतीबाडी कशी नेणार ? ती तेथेच रहाते, तेथे राहणाऱ्या मंडळींसाठी ! हे सर्व माहित असणारी पिढी जोपर्यंत जिवंत असते, तो पावेतो त्यातील सदस्यांना वाटते, 'घर सोडून गेलेल्यांच्या पण यांत हिस्सा आहे, हक्क आहे. अधूनमधून ते तसे बोलतात पण, आणि त्यांच्या वागण्यातूनही ते जाणवते. तो पावेतो ठीक असते असे समजावे लागते. काळपरत्वे माणसे जग सोडून जातात आणि कारभार पुढच्या पिढीच्या हातांत येतो. घर सोडून गेलेल्याबद्दल काही कृतज्ञता असेल किंवा मागील पिढीने काही सांगितले असेल आणि ही पुढील पिढी त्याचा मान ठेवणारी असेल, तरी पण ठीक असते. मात्र कालांतराने ही पिढीपण निघून जाते. नातेसंबंध विरळ होत जातात आणि स्वार्थाची वीण घट्ट होत जाते. जे काही आहे ते सर्व आपलेच आहे, यांत कोणाचाही कसलाही संबंध नाही असे ते सुरुवातीला दबक्या आवाजात आणि नंतर खुल्या, मोठ्या आवाजात सांगू लागतात ! कालांतराने ते आपल्याच मनाला समजावतात की 'हे आता सर्व आपलेच आहे, कोणाचाही कसलाही संबंध नाही'. गंमत म्हणजे त्यांचाही हळूहळू हाच समज होत जातो. याला 'वरवर कायदेशीर' स्वरूप देण्याचे काम करतो ते, ब्रह्मदेवसुद्धा जे कोणाच्या ललाटी लिहू शकत नाही ते लिहीणारा 'सरकारी नोकर तलाठी' ! आपल्या सर्वांच्या परिचयाचा ! गांव सोडून गेलेल्या मंडळींची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नांवे ७/१२ चे उताऱ्यावरून गुप्त करणे हे त्याच्या दृष्टीने काही विशेष नसते. एक दिवस गाव सोडून गेलेल्या पिढीतील सर्वांची नांवे ७/१२ च्या उताऱ्यावरून पूर्णपणे अदृश्य होतात आणि ही मिळकत सरकारदप्तरी फक्त यांचीच दिसायला लागते. १९३०-३२ मध्ये ओंकारेश्वरला गेल्या पिढीचे, त्यांच्या वारसांची नांवे १९९७-९८ पावेतो पूर्णपणे गुप्त, नाहीशी झालेली होती. त्या शेतीशी असलेला त्या कुटुंबाच्या शाखेचा ७/१२ च्या उताऱ्यातून दिसणारा संबंध संपला, संपवला गेला, तसे दाखवले गेले.

दरम्यानच्या काळांत त्यांनी उताऱ्यावरील असलेल्या किती मिळकती एकट्याने, एकट्याच्याच समजून विकल्या, त्याची कल्पना त्या ओंकारेश्वरच्या शाखेला दिली किंवा नाही हे त्या 'ओंकारेश्वरच्या ममलेश्वरालाच' माहीत ! हा विषय आजचा नाही. शेवटची शेती राहीली होती विकायची, व्यवहार ठरला. त्या अगोदर ७/१२ चे शेतीचे उतारे घेणाऱ्याने बघीतले. बऱ्याच वर्षांचे जुने उतारे वरवर बघीतले तरी त्यांत शंका येण्यासारखे काही दिसत नव्हते, कारण गेल्या कित्येक वर्षांत त्या गावांत हे एकटेच कुटुंब राहत होते, हे एवढेच कुटुंब आहे, असा समज होण्यासाठी पुरेसे होते. अशी कोणास ठाऊक, पण ही बातमी ओंकारेश्वराला त्या कुटुंबातील सर्वात वृद्ध माणसाला समजली. 'येथे आपली वडिलोपार्जित शेती आहे. ती आपण विकलेली नाही', हे त्याला माहीत होते. त्याने हे मुलाला सांगीतले. मुलगा पत्रकार होता, तो त्याच्या शेतीच्या तालुकाच्या गांवाला आला. 

तहसीलदार कार्यालय आणि तालुका कोर्ट एकाच आवारांत होती. तेथील माहिती मिळण्याच्या दृष्टीने भरवशाचा म्हणजे 'स्टॅम्प व्हेंडर' ! त्याचे जवळ कोणता माणूस कसा, कोणता वकील कसा आणि कोणता साहेब कसा वगैरे सर्व अनधिकृत माहीती अधिकृतपणे असते. त्या पत्रकार मुलाने त्याला ही सगळी कथा सांगीतली. त्याने तर ऐकून कपाळाला हातच लावला. इतके दुर्लक्ष्य, दिरंगाई आणि आळशीपणा त्याने देखील अद्यापपावेतो पाहीला नव्हता. शेवटी 'एक वकील आहेत, हिंदू कायद्यातील किडा म्हणतात त्यांना ! पण ते कागदपत्रासाठीच  फिरवतात, माणूस कंटाळून जातो. कामाचा नाद सोडतो नाहीतर त्या वकीलाला सोडतो. पण त्याने जर कागद हातात घेतले तर समजावे काही तरी तथ्य आहे.' स्टॅम्प व्हेंडर म्हणाला. 'भरपूर वर्षे झालेली असल्याने तुमचे सर्वच मुदतीबाहेर गेलेले आहे, काहीही अर्थ नाही.' हे सांगणारे बहुतेक होतेच. यावर 'शेती कायमची जाण्यापेक्षा, कागदपत्र काढून काय आहे नेमके ते तरी पाहिलेले बरे' हा विचार त्याने केला आणि त्यांच्याकडे जातो म्हणून सांगीतले. 'नुसता जाऊ नको तर सर्व कागद घेऊन जा, म्हणजे उत्तर लगेच मिळेल,' असे त्या पत्रकाराला व्हेंडरने सांगितले आणि त्यांनी गांव सोडल्यापासून म्हणजे १९३०-३२ पासून ते आजपर्यंतचे ७/१२ चे उतारे आणि हक्कपत्रकाच्या नोंदी काढण्यास सांगीतल्या. हे ऐकल्यावर मात्र त्या पत्रकाराला 'शोध पत्रकारिता' ही संकल्पना आठवली. फेऱ्या मारून त्याने सर्व कागद काढले. 

माझा कारकून श्री. पंढरीनाथ श्रावक याला मला भेटण्याबद्दल विचारले, 'बाररूममध्ये आहे. भेटा पण कागदपत्र आणलेत का ? नाहीतर पुन्हा यावे लागेल. ते सांगतील काय आणायचे ते.' त्याने विचारले. 'हो, आणलीत,' पत्रकार म्हणाला. मला भेटला, मी कागद ठेवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी ऑफीसला येण्यास सांगीतले. सकाळी पत्रकार आल्यावर, काय शंका विचारावयाचे होत्या त्या विचारल्या आणि समाधान झाल्यावर, 'दोन दावे करावे लागतील वेगवेगळे. दुसरा थोडा नंतर केला तरी चालेल.' हे सांगीतले. फी ठरली, अपेक्षेपेक्षा जास्त देण्यास तयार झाला. बरं वाटलं. ज्याच्याशी शेती विकण्याचा व्यवहार केला आणि ज्याने केला त्याचे विरुद्ध पत्रकाराच्या वडीलांचे नावाने मनाईहुकूमाचा दावा केला. त्यांत भरपूर जुनी माहीती लिहिली आणि वाटणी संबंधाने दुसरा दावा संपूर्ण माहिती मिळाल्यावर दाखल करावयाचा आहे, हे पण लिहीले. तात्पुरता मनाईहुकूम त्यांत मागितला. समन्स निघाले, सर्व हजर झाले, चांगले जुने-जाणकार वकील लावून. पण खुलासा कोणी देईना. 

दोन आठवड्यानंतर मला सामनेवाल्याकडून निरोप आला. दरम्यानच्या काळांत दाव्यातील माहितीला संयुक्तिक काय उत्तर देता येईल हे त्याच्या वकीलाला त्याने विचारले. 'यातील माहीती जर खरी असेल तर आपसांत करणे योग्य राहील' हे त्यांनी सांगीतले. 'मी माहीती काढली आहे, सर्व खरे आहे. त्याचे उत्तर ! 'आपल्याला फक्त मुदतीचा आधार घेता येईल. पण कठीणच आहे. त्यांचा हिस्सा आहे हे सध्या तरी दिसत आहे.' हे त्याच्या वकिलांचे उत्तर ! शेवटी मला त्यांचेकडून विचारले गेले की 'आपसात काही करता येईल का?' मी हा निरोप पक्षकाराला दिला, त्याला आश्चर्याचा धक्का ! त्याने त्याच्या वडीलांना सांगीतले, त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. 'गावातील शेतातून साठ-सत्तर वर्षांत पहिल्यांदाच पैसे मिळणार!' तो म्हातारा माणूस ऑफिसवर गाडी करून ओंकारेश्वरहून आला. 'शेवटचे येथे येणे आहे. ते जर मला या शेताचे पैसे देत असतील तर आपल्याला काही अडवायचे नाही, अगोदरची शेती काय होती आणि काय नाही यांत आता मला जायचे नाही, जे काही गेले असतील तर शंकराला दिले!' जवळपास ऐंशी-पंच्यांशी वर्षाचा म्हातारा बोलत होता. दुपारी बैठक झाली, कोर्टातच !

शेत खरेदी करणाऱ्याने सर्व पैसे आणले होते. खरेदीखत व्हेंडरने लिहीले. त्यावर या म्हाताऱ्याने मालक म्हणून स्वाक्षरी केली. म्हाताऱ्याच्या डोळ्यांत पाणी होते. 'शेताचे पहिले आणि आता शेवटचे पैसे! ठीक आहे. जाऊ द्या, देवाला डोळे आहेत.' म्हाताऱ्याने डोळे पुसले आणि स्वाक्षरी केली. पत्रकाराने साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. मूळ करार करणारा सामनेवाल्याने म्हाताऱ्याकडे रागाने पाहत स्वाक्षरी केली. शेताचा खरेदीचा व्यवहार झाला, १९३०-३२ सालांत गांव सोडून गेलेल्यास सन १९९८ सालांत मालक म्हणून मान्यता मिळाली. माझ्या आजोबाच्या वयाचा तो म्हातारा माणूस मला नमस्कार करण्यासाठी वाकू लागला, मी वरच्यावर उठवले. 'लेकरा, एवढेच मिळाले आजपर्यंत !' त्याच्याने पुढे बोलवेना.                

हिंदू कायद्यानुसार हिंदू कुटुंबात ज्या क्षणी व्यक्ती जन्माला आली, त्या क्षणाला तिचा त्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीत आपोआप हिस्सा निर्माण होतो. हा हिस्सा, त्या कुटुंबातील त्या नंतर होणाऱ्या जन्ममृत्युवर कमीजास्त होत असतो. जो पावेतो त्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीच्या अंतीम वाटण्या सरसनिरस मानाने होत नाहीत, तो पावेतो त्या कुटुंबातील व्यक्तीचे नांव त्या मिळकतीवर सरकार दप्तरी वा ७/१२ वर असो किंवा नसो, तिचा  हिस्सा मात्र त्या मिळकतीत असतोच असतो. तो आपोआप संपुष्टात येत नाही. सरकार दप्तरी अथवा ७/१२ चे उताऱ्यावरील नांवे याचा उपयोग हा फक्त सरकारी वसूल जर काही असला तर तो कोणाकडून वसूल करावयाचा एवढ्याचपुरता मर्यादीत असतो. दरम्यानच्या काळांत झालेल्या नोंदी आणि त्यांची कायदेशीरता महत्वाची असते. ही महत्वाची बाब बहुसंख्य समाज दृष्टीआड करत असल्याने उताऱ्यावरील नोंदीला निष्कारण अनाठायी महत्व प्राप्त झाले आहे. 

(प्रसिद्धी  लोकमत - दिनांक ८ ऑक्टोबर २०१७ आणि १५ ऑक्टोबर २०१७)   



  

Saturday, October 14, 2017

दादर - ‘शिवाजी मंदीर’

दादरच्या ‘शिवाजी मंदीर’ आणि ‘प्लाझा टॉकीज’ यांनी मला बरंच काही दिले, ते अजूनही आठवते अधूनमधून !
मला बऱ्याच वेळी कोर्टाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालय किंवा महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण येथे जावे लागे. महसूल न्यायाधिकरण त्यावेळी ‘ओल्ड सेक्रेटरिएट’ मधे होते. सध्या कुठे आहे कल्पना नाही कारण अलिकडे मुंबईला जाण्याचे तसे काम तुलनेने कमी पडते. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे सुरू झाले नव्हते. जळगांव जिल्हा पण बराच नंतर जोडला गेला, औरंगाबादच्या खंडपीठाला ! आपल्या भागातील बहुतेक कामे ही त्या त्या भागातील वकिलांकडे जात असतात. ओळख परिचय असतो माहिती असते. येथे औरंगाबादला येऊन तप उलटले.
मुंबईला जाण्यास माझ्या गांवाहून रेल्वेची चांगली सोय आहे. भरपूर गाड्या, त्या वेळी तिकीट पण सहज मिळून जायचे. रात्री घरून बसले की पहाटे मुंबई व मुंबईहून रात्री बसले की पहाटे घरी ! निवांत झोपून प्रवास व्हायचा. कोर्टाचे काम आटोपले आणि एखादा दिवस मुंबईत अजून घालवावा असे वाटले की मग तेथील मुक्कामाचे कार्यक्रम तयार व्हायचे. जेवण हे श्रीकृष्ण बोर्डिंग किंवा एक जवळच ‘दवे यांची खानावळ’ होती. रूचीपालट म्हणून एखादेच वेळी दुसरीकडे पण ती वेळ अगदी क्वचितच !
मी जिथं थांबायचो ती जागा म्हणजे ‘गोखले रोड नॉर्थ’ अमर हिंद मंडळाजवळ ! शिवाजी मंदीर जवळच ! आम्हाला सिनेमे बघायला मिळायचे पण नाटक अजिबात नाही. मी मराठी असल्याने स्वाभाविकच नाट्यवेडा आहे. नाटक जरी बघीतली नसली किंवा बघायला मिळत नसली तरी त्याची भरपाई मी आमच्या गांवच्या लायब्ररीतून नाटकाची पुस्तके आणून वाचून काढायचो. पण संगीत नाटक असेल तर मी कित्येक वेळा गरज नसतांना मुंबईचा मुक्काम वाढविला आहे. त्यामुळे वेळ जायचा व खर्च पण वाढायचा. ते पण स्वाभाविक - मराठी माणसाला धंदा व हिशोब समजत नाही.
अहो, दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे ‘संगीत सौभद्र’ आहे. नाट्य कलाकारांचा संच हा रूख्मिणीच्या भूमिकेत कै. भक्ती बर्वे, कृष्णाच्या भूमिकेत पं. शरद गोखले आणि बलरामाच्या भूमिकेत साक्षात दाजी भाटवडेकर ! इतरही तितकेच सक्षम कलाकार, पण आठवत नाही आता ! तबल्यावर साई बॅंकर होते हो ! सन १९८६-८७ च्या दरम्यान असेल ! हे सगळे सोडून गांवी न्यायालयात जावून ‘वादीने दाव्यांतील कलम ५ मधे उल्लेख केलेला मजकूर हा कबूल नसून, खोटा आहे.’ अशी कैफियत तयार करायची ! सत्वपरिक्षा म्हणजे दुसरे काय यालाच म्हणतात ! मी उत्तीर्ण आहे की नाही ते परमेश्वरालाच माहिती !
त्या दिवशीचा तो प्रयोग फारच रंगला. भक्ती बर्वे नाटकांत काम करतात हे माहिती होते पण गातात कशा ही कल्पना नव्हती. त्यांनी पदे म्हटली नाहीत. पण पं. शरद गोखले यांनी अप्रतिमच पदे म्हटली ! दाजी भाटवडेकर यांच्या स्वच्छ व स्पष्ट शब्दोच्चारातील बलराम माझ्या अजूनही लक्षात आहे.
अजून एक लक्षात राहीलेली आठवण म्हणजे - ‘प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि येत उष:काल हा’ ! हे पद ! काय म्हटले पहा ! मी ‘वन्स मोअर’ त्या वेळी खरे पाहिले. रूख्मिणीला घेऊन गेलेल्या कृष्णाला परत स्टेजवर यावे लागले. ते पद म्हणावे लागले. त्या वेळी पं. शरद गोखले म्हणाले, ‘देवा, आता एकदाच गाईन मात्र !’ संगीताची ताकद मोठी की रसिकांचे त्यांवरील प्रेम जास्त, हा न सुटणारा प्रश्न आहे. रेशीम गाठ भल्याभल्यांना सोडवता येत नाही. ती आपण काय सोडविणार ?
भूप व देशकार राग अप्रतिमपणे रसिकांना दाखवत, दादऱ्यातील लग्ग्यांच्या लडांवर हिंदोळे घेत, त्या कृष्ण-रूख्मिणीचा पुन्हा उष:काल झाला आणि ते विंगेत गेले.

दिनांक ८ ऑक्टोबर २०१७

https://www.youtube.com/watch?v=90m4ZDDHz88

माजे रानी माजे मोगा तुजे दोल्यांत सोधता ठाव

माजे रानी माजे मोगा
तुजे दोल्यांत सोधता ठाव
शाळेत असतांना गांवच्या राजे रघुनाथराव देशमुख तालुका मुक्तद्वार वाचनालय येथे बरीच पुस्तके वाचली. वाचण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे एकेक लेखकाचे पुस्तक वाचायचे. यादीतील त्या लेखकाची तेथील पुस्तके संपली की मग दुसरा लेखक !
केव्हातरी वाटले की जयवंत दळवी यांचे वाचावे. त्यांची बरीच पुस्तके वाचली, ठणठणपाळ या नांवाने चालवत असलेले सदर नियमीत वाचायचो. पण असेच एकदा ‘महानंदा’ ही कादंबरी वाचनांत आली, अन् सुन्न झालो. काय आणि कसे आयुष्य जाते माणसाचं ! आपण कल्पना करू शकत नाही. ही कादंबरी व तिचा विषय जो माझ्या मनांत रुतलेला आहे, तो खोलवर !
त्या नंतर असाच योग आला ते दादर येथील शिवाजी मंदीरात ‘गुंतता ह्रदय हे’ नाटक पहाण्याचा ! नाट्यरूपांतर आपल्याला माहिती आहे की समर्थपणे केले होते ते शन्ना उपाख्य शं. ना. नवरे यांनी ! कलाकार होते मराठीतील समर्थ नाट्य कलावंत - आशा काळे, फैयाज आणि साक्षात कै. डॉ. काशिनाथ घाणेकर ! मूळ पाया मजबूतच होता, त्याचे नाट्यरूप तर अप्रतिम ! मनाला गुंतवून ठेवणारे !
‘मुलगी झाली तर हे नांव ठेवेन आणि मुलगा झाला तर हे’ आशा काळेचा कै. काशिनाथ घाणेकर यांचा संवाद अजूनही मनांतून जात नाही. या तारूण्यातील हळव्या भावनांचा चक्काचूर समाज व कुटुंब कसा करते आणि परिणाम मात्र ते निष्पाप जीव आयुष्यभर कसे भोगत रहातात. त्या जीवांना तर बिचारे हे कसले भोग आहे ते पण समजत नाही. खरंय ! आयुष्यात अतर्क्य घटना घडत जातात, आपण त्या भोवऱ्यात सापडतो ! तो भोवरा आहे का खळाळते मोकळे, वहाते पाणी आहे हे पण समजत नाही, त्या जीवांना !
त्या नंतर बनला ‘महानंदा’ हा चित्रपट ! शांता शेळके यांच्या गीतातील भावना स्वरबद्ध केल्या आहेत संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी ! त्याच तोलामोलाने स्वरात व्यक्त केल्या आहेत, स्वरलता अर्थात लता मंगेशकर व सुरेश वाडकर यांनी !
आज औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर गाणे लागले होते. बस - मन मागे मागे गेले !

 दिनांक ७ ऑक्टोबर २०१७

https://www.youtube.com/watch?v=fEHTvA_WD5M

Tuesday, October 3, 2017

आज २ ऑक्टोबर !

आज २ ऑक्टोबर ! 

आज २ ऑक्टोबर ! भारताच्या दोन महान सुपुत्रांचा जन्मदिन ! मोहनदास करमचंद गांधी आणि लाल बहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव !
मोहनदास करमचंद गांधी जे आपल्या अतुलनीय कर्तृत्वाने 'महात्मा गांधी' झाले, सर्व जगतात प्रसिद्ध झाले ते भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामाचे नेते म्हणून !
दुसरे म्हणजे आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान, दुसरे म्हणजे आपल्या विद्वत्तेच्या जोरावर 'शास्त्री' हि पदवी मिळवून 'लाल बहादूर शास्त्री' झालेले ! आपल्याला स्वातंत्र्यानंतर सन १९६५ मध्ये लाहोरपर्यंत धडक मारून पाकिस्थानवर विजय मिळवून देणारे ! 'जय जवान जय किसान' हा मंत्र आपल्या भारतीयांना देणारे !
संत नरसी मेहताचे महात्मा गांधींचे हे आवडते भजन !
वैष्णव जन तो तेने कहिये जे, पीड़ पराई जाने रे |
पर दुख्खे उपकार करे तोये, मन अभिमान न आने रे ||
सकल लोक मान सहने वन्दे, निंदा न करे केनी रे |
वाच काछ मन निश्छल राखे, धन धन जननी तेनी रे ||
सम दृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे |
जिव्हा थकी असत्य न बोले, पर धन नव झाली हाथ रे ||
मोह माया व्यापे नहीं जेने, दृढ वैराग्य जेना मन मा रे |
राम नाम शून ताली लागी, सकल तीरथ तेना तन मान रे ||
वन लोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्य रे |
भने नरसैय्यो तेनुं दर्शन करत, कुल एकोतेर तार्य रे ||

दिनांक २ ऑक्टोबर २०१७

निष्ठा आणि श्रद्धा !

निष्ठा आणि श्रद्धा !

आज मागच्या रविवारी लिहीता लिहीता अपूर्ण राहिलेल्या कल्याण थाटातील ‘यमन कल्याण’ यांवर काही अजून लिहावे असा विचार होता; पण या आठवड्यांत वकील मित्रांशी असेच बोलणे झाले. विषय निष्कारणच गंभीर झाला, असे वाटले ! कारण यानंतर लोकांनी न्यायालयात यावे का ? ते येतील का ? मी म्हणालो ‘लोकांचे जाऊ द्या, आपली मुलं, ज्यांना इतरत्र खूप चांगली संधी आहे ती, तरी इकडे येण्यास तयार आहे का ? विषय थोडा भावनिक झाला कारण त्यातले गांभीर्य व भीषणता तशीच आहे, इतरांच्या लक्षात आली नाही तरी ! मला काही घटना आठवल्या त्यावेळेस, कारण त्या घटनांशी संबंधीत माणसं त्याच दिवशी कोर्टातच भेटली होती.
—�—�—�— —�—�—�—�- —�—�—�—
मी जळगांवच्या ‘नूतन मराठा कॉलेज’चा विद्यार्थी ! सन १९७९ ते १९८२ पर्यंत येथे होतो. या कॉलेजने मला जगाचे खूप अनुभव दिले, जवळून दर्शन दिले, अगदी माझ्या कमी वयांत व कमी वेळेत ! त्यावेळी कॉलेजचे प्राचार्य होते डॉ. के. आर. सोनवणे ! माझ्यावर यांचा खूप लोभ ! नूतन मराठा कॉलेजच्या कोणी माझ्यावर प्रेम केले नाही ? अगदी पिरीयड संपल्यावर घंटा वाजवणाऱ्या शिपायापासून ते आमच्या प्राचार्यांपर्यंत, थेट संस्थेचे त्यावेळचे चेअरमन कै. ॲड. नानासाहेब चौधरी यांनी ! कोणत्याही प्राध्यापकांच्या नांवावर अभ्यासाची कोणतीही व कितीही पुस्तके आणण्याची मला मुभा होती. ना मी त्यांच्यापैकी कोणाच्या नात्यातला ना त्यांच्या जातीतील ! अलिकडे दुर्दैवाने मुद्दाम सांगावे लागते, स्वातंत्र्यानंतर आपण खूप प्रगती केली आहे.
आजपावेतो मला माझ्या इथवरच्या प्रवासात माझ्यावर कसलीही अपेक्षा न करता लोभ करणारी माणसं भेटली, म्हणून मी इथपर्यंत आलो अन्यथा काय झाले असते याचा विचार जरी आज केला, तरी आजही माझ्या जावू द्या, पण इतर माहितगारांच्या अंगावर देखील काटा येतो आणि त्यांची झोप उडते. असो.
परवा मला नुकतेच कोर्टात भेटले होते, श्री. अजय महाडीक ! त्यांचे मोठे भाऊ त्यावेळी नॉन टिचींग स्टॉफमधे होते. बोलणेचालणे तर त्यांच्याशी असायचेच ! कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांत तो शिकत असतांना जे गुण होते किंवा दुर्गुण होते, ते माझ्यामधेही होते. प्राचार्यांनी किंवा वादविवाद मंडळ प्रमुख असलेले श्री. प्रा. रमेश बाऊस्कर यांनी ‘मी एखाद्या वादविवाद किंवा वक्तृत्व किंवा कोणत्याही स्पर्धेसाठी जाऊ का ?’ हे विचारल्यावर कधीही नकार दिलेला नाही. बहुतेक मी व प्रमोद हे कॉलेजतर्फे जायचो, तसेच कोळी व एक शिरसाट म्हणून मुलगी पण होती. आता इतक्या वर्षांत कोण कुठे तर कोण कुठे ! ‘काय जो खर्चबिर्च लागेल तो पोरांना द्या. सॅक्शन वगैरे नंतर पाहू.’ अशी सूचना बहुतेक प्राचार्यांची असावी, आमचे वागणे तसेच होते.
एकदा नोटीस बोर्डावर स्पर्धेची नोटीस लागली. रात्रीच निघायचे होते. प्रा. रमेश बाऊस्कर सरांना सांगीतले. त्यांनी मला नॉन टिचींग स्टॉफला भेट व त्यांचेकडून तसे कॉलेजचे पत्र घेण्यास सांगीतले. तेथे श्री. जयप्रकाश महाडीक होते. मी हे सांगीतल्यावर त्यांनी कॉलेजतर्फे टीम पाठवीत आहेत, भाग घेऊ द्यावा हे पत्र स्पर्धा संयोजकांना देण्यासाठी माझ्याजवळ दिले. प्रश्न आला पैशाचा, जाण्यासाठी पैसे तर लागणार ! प्राचार्य नव्हते, त्यांची मंजूरी लागणार, ती मिळण्याचा प्रश्नच नव्हता ! आम्हा विद्यार्थ्याजवळ कसले आले आहे पैसे ? मी बाहेर गांवाहून येथे शिकायला आलेलो.
मग श्री. महाडीकांनी खिशातून काही पैसे काढले, शेजारचे श्री. देशमुख होते त्यांना ‘पैसे काढण्यास सांगीतले’, अजून दोन-तीन जणांकडून घेऊन तीनेकशे रूपये पूर्ण केले ? ‘महाडीक, पैसे काय मागतोय ?’ हे इतरांनी विचारल्यावर त्यावेळी ते उत्तर व कृती महत्वाची वाटली नाही. पण आज मात्र आजच्या वातावरणांत खु महत्वाची वाटतेय ! ‘अरे, पोरं काय बिनापैशाने जातील ? आपण मंजूरी वगैरे नंतर घेवू ! पोरांना परक्या ठिकाणी अडचण नको ! पैसे द्या पहिले !’ महाडीकांचे उत्तर !
त्यावेळी आम्हाला स्पर्धेसाठी पाठवायला परवानगी व पैसे मंजूरीसाठी प्राचार्य नव्हते ! ते नाही म्हणणार नाही ही खात्री होती. पण सन १९८०-८२ सालातील असलेल्या पगारात बसत नसतांना त्या सर्वांनी आमच्या प्रवासखर्चासाठी पैसे का गोळा करावे ? पैसे गोळा करून आम्हाला पाठवावे असे आम्ही नूतन मराठा कॉलेजचे कोण लागत होतो ? या तुटपुंज्या पगारातील माणसांना हे रिकामे उद्योग करायला कोणी सांगीतले होते ? नियमानुसार प्राचार्य नव्हते, ते आम्हाला नियमाप्रमाणे स्वच्छ नकार देवू शकत होते, त्यांनी तसे केले नाही. का केले नाही ?
म्हणून आजही नूतन मराठा कॉलेज हा शब्द आला की माझ्या मनांत यासारख्या असंख्य आठवणी येतात, ह्रदयात रूतल्या आहे त्या ! काढायच्या म्हटले तर ह्रदय रक्तबंबाळ होते !
—�—�—� —�—�— —�—�—� —�—�- —�—�- —�—
मी कदाचित सातवी-आठवीत असेल, सरदार जी. जी. हायस्कूल रावेर येथे शिकत ! सन बहुतेक १९७४-७५ असावे ! डिंसेबर महिन्याचा तिसरा आठवडा ! तिवारी सरांचा पिरीअड होता, इतिहासाचा ! त्यांचा पिरीअड म्हणजे आपण शिक्षण घेतो आहे का गोष्टी ऐकतो आहे, हे पण समजत नसे ! अप्रतिम शिकवणे ! शिकवलेलेले हे अभ्यासक्रमातील आहे का अभ्यासक्रमाच्या बाहेरचे आहे ? याची काटेकोर तपासणी करणारे पालकपण त्या वेळी नव्हते. जे काही शाळेत शिकवतांय म्हणजे अभ्यासक्रमातीलच आहे, हीच भावना विद्यार्थ्यांची व पालकांची होती.
त्यावेळी अजून एक वाईट प्रथा होती, आजच्या दृष्टीने विचार केला तर, ती म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम खरोखरच शिकविण्याची ! अलिकडे अभ्यासक्रम शिकवून संपला हे जाहीर केले की समजायचे की अभ्यासक्रम शिकवलेला आहे ! तो खरंच प्रत्यक्षात शिकवला आहे किंवा नाही, हे तपासायचे नसते ! कारण त्यातून मनस्ताप व भांडण यापेक्षा वेगळे काही हातांत लागणार नसते.
तर तिवारी सरांचा पिरीअड होता, डिसेंबरचा तिसरा आठवडा होता तो ! आणि हरिभाऊ पाटील, शाळेचा शिपाई डुलतडुलत नोटीस घेऊन वर्गात आला. नोटीस-बुक सरांच्या हातात दिले व खाली ओट्यावर बसला. ही त्याची नेहमीची सवय ! तिवारी सरांनी वर्गाला नोटीस वाचून दाखवली, ती नाताळच्या दहा दिवसांच्या सुटीची नोटीस होती. नोटीस वाचून झाल्याबरोबर ‘हॅंऽऽऽऽऽऽ ! ‘ आणि आम्हा विद्यार्थ्यांचा दप्तर ठोकण्याचा आवाज ! हरिभाऊ पाटील पण ओट्यावर बसून हसत होते. सरांनी नोटीसीवर वहीत सही केली, हरिभाऊजवळ वही दिली. हरिभाऊ नोटीस-वही घेवून दुसऱ्या वर्गात नोटीस घेवून गेला.
‘हं, सुटी कधीपासून लागते आहे नाताळची ?’ तिवारी सरांचा प्रश्न ! ‘सर, बावीस डिसेंबर पासून !’ आमच्यातील उत्साही विद्यार्थी ! ‘मग बावीस डिसेंबरपासून ते सुटी संपेपर्यंत रोज सकाळी ८ ते ९ पर्यंत इतिहास व नंतर अर्धा तास हिंदी असे घेतले जाईल. त्यानंतर तुमचे गणिताचे सर आहे ना, त्यांचा तास राहील मग १० ते ११ पर्यंत ! अभ्यास मागे आहे आपला ! पूर्ण करायचा आहे तो ! आता वाजवा बे दप्तर !’ तिवारी सरांचे हे खास बोलणे, आता हा सुटीतील पूर्ण कार्यक्रम ऐकल्यावर कोणाच्या हातात दप्तर वाजवायची आणि घशात 'हॅंऽऽऽऽ' करून ओरडण्याची ताकद होती ?
सन १९७४-७५ सालात प्राथमिक वा माध्यमिक शिक्षकांना मिळणारा पगार लक्षात घेता, सुटीच्या काळात आपल्याला कायदेशीरपणे मिळणारी सुटी बुडवून, त्यांत इतर वैयक्तिक कामे करता येतील पण ती करायची नाहीत ! तर न करता आपण विद्यार्थ्यांचा अभ्यास घेवून त्यांचा अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केला पाहीजे, याची जाणीव असणारे शिक्षक होते. ते याच समाजातील होते. याच भारतातील होते ! सूर्यचंद्रावरून वा परक्या देशातून आले नव्हते. ते मग कशाला हा रिकामा उद्योग करत होते ? त्यांना याबद्दल सरकार काही जास्त पगार देणार नव्हते वा संस्था काही वेगळा फायदा देणार नव्हती ! वेळ संपला तर कसातरी अभ्यास पूर्ण करता येणार होता किंवा जाहीर करून द्यायचे आतासारखे - ‘अभ्यासक्रम संपला !’ यांवर कोठेच अपील नसते. —�- पण तसे होत नव्हते कारण त्यांना तसे होवू देणे पटत नव्हते.
म्हणून सरदार जी जी हायस्कूल म्हटल्यावर साठीतलेच काय पण सत्तर-पंचाहत्तरीतले म्हातारे आमच्याशी म्हणजे त्यांच्या तुलनेने आमच्यासारख्या पोरांशी देखील अगदी घरच्यासारखे बोलायला लागतात, अगदी त्यांच्या हातातले महत्वाचे काम बाजूला ठेवून शाळेची आपुलकीने चौकशी करतात ! त्यांना कल्पना असते, आपल्याला ज्यांनी शिकवले ते आता स्वर्गात असतील आणि जर खरोखरच शाळा असतील तर 'ही कसलाही ज्यादा पगार न घेता सुटीत पण आपली घराची कामे सोडून देऊन शिकविणारी आमची शिक्षक मंडळी' तिथे शिकवत असतील ! पण तरी त्यांना साठीतलेच काय पण सत्तर-पंचाहत्तरीतले म्हातारे यांना राहवत नाही, ते विचारतात आणि ते असे विचारणार याची आम्हाला पण कल्पना असते.
—�—�—�—�- —�—�—�—� —�—�—�—� —�—�—�-
मग ही दोन उदाहरणे म्हणा आठवणी म्हणा, पण सांगीतल्यावर; मग आमच्या या वकील मित्रांना विचारले - ही अशी निष्ठा असलेली किती माणसे आपल्या व्यवसायांत आहेत की ज्यामुळे जनतेत आपल्याबद्दल श्रद्धा निर्माण होईल व टिकून वाढेल ? मला कल्पना आहे जुनी उदाहरणे जास्त आहेत नवी मात्र कमी होत आहेत. काही दिवसांनी नमुना म्हणून तरी दाखवायला रहातील का ? हा पण प्रश्नच आहे. मग आपली मुलं कशाला येतील हो इथं ? त्यांना कर्तृत्व दाखवायला अजून दुसरी चांगली क्षेत्रं आहेत.
हा अनुभव प्रत्येक क्षेत्रात येत आहे. जोपर्यंत अशी आपल्या कामाची निष्ठा आपल्या क्षेत्रात दिसणार नाही ना, तो पर्यंत जनतेची आपल्या त्या व्यवसायाबद्दलची श्रद्धा वाढणार नाही तर कमीच होत जाईल ! यांवर चहा पिण्याची वेळ असतांनासुद्धा चहा प्यावासा वाटेना. आम्ही बाररूमकडे वळलो.

दिनांक १ ऑक्टोबर २०१७

अश्विन शुद्ध १० ! विजयादशमी !

अश्विन शुद्ध १० ! विजयादशमी !

आज अश्विन शुद्ध १० ! विजयादशमी ! आपण सर्वांना या आपल्या संस्कृतीत महत्वाच्या मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तातील एक महत्वाच्या मुहूर्तासाठी मनापासून शुभेच्छा !
आपल्या सर्व हितकारक आणि शुद्ध बुद्धीच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजचा मुहूर्त खरोखरच चांगला आहे ! विजया दशमी आहे, आपण यशस्वी व्हाल ! तुम्हाला यशचं हवे आहे ना ? असत्याचा पराभव आणि सत्याचा विजय ! दुर्गुणांचा पराभव आणि सदगुणांचा विजय ! याच्या आठवणींचा आणि आठवणीसाठीचा हा दिवस ! म्हणूनच करायचे असते सत्कृत्य, म्हणूनच करायचे असते चांगले काम आणि म्हणूनच मागायचे असते सत्याचे बळ ! ---- कशासाठी यशासाठीच !
आज अंबामाता सीमोल्लंघनाला निघते, पराक्रम करायला निघते ! दुस्तानचे निर्दालन करायला निघते. शुभ आणि निशुंभाचा वध करून त्या अंबामातेने त्यांच्या, त्या दुष्ट शुंभ-निशुंभांच्या दहशतीच्या भीतीने जीवन जगात असलेल्या सर्वसामान्य भयभितांना भयमुक्त केले !
आजच्या दिवशीच प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा वध केला आणि जगात निरंतर वाढणारे, सत्ताधुंध झालेले, दुर्वर्तनी एक पाप नष्ट केले ! ते रावण दहन आपण आजही साजरे करतो, प्रतीकात्मक रूपाने ! त्यापासून बोध घ्यायचा असेल तर हाच आणि एवढाच !
आपल्या दक्षिण भारतातील 'म्हैसूर' मधील दसरा हा फारच प्रसिद्ध ! विजयनगरचे चौदाव्या शतकातील साम्राज्य ज्यावेळी भरभराटीस होते त्यावेळचा दशहरा आपण आता अनुभवू शकणार नाही मात्र त्यावेळेपासूनची ही प्रथा आपण आजही पाळत आहोत. बरीच ठिकाणी आज भगवान बालाजीची पूजा करतात, दशहरा हा बालाजीच्या पूजेचा मानतात.
आम्ही मात्र लहानपणापासून देवाजवळ 'सरस्वतीचे' आपले पारंपरिक चित्र काढून आपल्याला ज्ञान मिळावे, म्हणून पूजा करतो ती आमच्या जवळील पुस्तकांची ! 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति' हे भगवान श्रीकृष्णांनी आपण सर्वांना सांगितलेच आहे.

दिनांक ३० सप्टेंबर २०१७

धार्मिक बाबतीतले वेगळेपण !

धार्मिक बाबतीतले वेगळेपण !

धार्मिक बाबतीत मी थोडा कायमसाठी वेगळा विचार केला आहे. हे पूर्वी मी फसल्यानंतर मला समजले. अनुभवाने शहाणा झालो. त्यानंतर मी फसलो नाही.
परमेश्वराची स्वत: भक्ती करणे हेच सर्वश्रेष्ठ आहे. दुसऱ्याकडून करवून घेणे कनिष्ठ ! तुम्हाला येत नसेल, अन्य कारणाने तुम्ही करू शकत नसाल पण करण्याची इच्छा असेल तर ही परवानगी, सूट आहे.
कोणतेही स्त्रोत्र कोणी म्हणू नये असे मी बंधन मानत नाही. तुम्हाला ते स्वत:ला म्हणण्याची इच्छा हवी, मार्ग दिसतो. एकदा अनुभव आला त्यानंतर मी स्वत: कोल्हापूर येथे महालक्ष्मीला, सप्तश्रृंगी येथे देवीला श्रीसूक्ताभिषेक, उज्जैन येथे महांकालेश्वराला, काठमांडूत पशुपतीनाथाला रूद्राभिषेक केला. एकही पैसा न देता !

दिनांक २९ सप्टेंबर २०१७

‘वैष्णोदेवी’ !

‘वैष्णोदेवी’ !

आज अश्विन शुद्ध नवमी ! या वर्षीच्या शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांचे पारणे ! आपण या नवरात्रीत केलेल्या जगन्मातेच्या आराधनेचे पारणे, त्याची सांगता ! सप्तशती, नवार्ण मंत्राचा जप, होमहवन हे भक्तीपूर्वक करून त्या जगन्मातेला मागणार काय तर सर्वांना सुखी ठेव, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांची भरभराट होऊ दे आणि मग माझी, या तुझ्या पुत्राची पण होवू दे !
संपूर्ण आर्यावर्तात असलेल्या विविध ठिकाणी असलेल्या शक्तिपीठांपैकी एक म्हणजे ‘वैष्णोदेवी’ ! आपल्या हिमालयाच्या कुशीत वसवेले, आजच्या जम्मूकाश्मिरमधील वैष्णोदेवी ! प्रत्यक्ष पित्याच्या कुशीत पहुडलेली ही पार्वतीमाता ! एकदा दर्शन अवश्य घ्यावे ते या महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती स्वरूपातील देवीचे ! देवीने तिच्या दर्शनाला आम्हा सर्व कुटुंबियांना, अगदी मुलाबाळांसहीत बोलावले होते.
कल्याण्यै प्रणतां वृद्धयै सिद्धयै कुर्मो नमो नमः ।
नैर्ऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः ॥
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै |
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥
सर्वाधिष्ठानरूपायै कूटस्थायै नमो नमः ।
अर्धमात्रार्थभूतायै हृल्लेखायै नमो नमः ॥
नमो देव्यै प्रकृत्यै च विधात्र्यै सततं नमः ।
कल्याण्यै कामदायै च वृद्धयै सिद्धयै नमो नमः ॥
सच्चिदानन्दरूपिण्यै संसारारणये नमः ।
पञ्चकृत्यविधात्र्यै ते भुवनेश्यै नमो नमः ॥
नमो देवी महाविद्ये नमामि चरणौ तव ।
सदा ज्ञानप्रकाशं में देहि सर्वार्थदे शिवे ॥

दिनांक २९ सप्टेंबर २०१७

भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल

भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल

वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आतापर्यंत आजच्या भारताच्या आर्थिक स्थितीबद्दलचे जे मत व्यक्त केले आहे आणि अजूनही करत आहेत, ते पाहून मला एका नाट्यप्रवेशातील आठवण झाली. 

‘आजारी रोग्याचा’ आजार कसा बरा होईल हे सांगणारे ॲलोपथीचे डॉक्टर, त्याच्या नेमके विरूद्ध सांगणारे धन्वंतरीचे वंशज म्हणवून घेणारे वैद्यराज आणि दोघांच्या म्हणण्याला छेद देत जालीम उपाय सांगणारा वैदू ! यांच्या वादविवादात कोण श्रेष्ठ यांवरच चर्चा सुरू असतो, ‘रोग्याच्या’ प्रकृतीची कोणालाही काळजी नसते.
इथे तर अर्थव्यवस्था महासत्तेकडे वाटचाल करत आहे येथपासून ते अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहे, हे सांगणारे अर्थतज्ञ हे भारतातीलच आहे ही गंमतच ! देशासंबंधाने गंभीर व जिव्हाळ्याच्या विषयाचा आपल्या पक्षाच्या अभिनिवेशापायी असा बळी देवू नका !
विद्वानाकडून आपली संस्कृती हे अपेक्षित करत नाही, तर कटू असले तरी सत्याचीच अपेक्षा करते; याची तरी चाड ठेवा ! जर देशहितासाठी आवश्यक असेल तर खरोखरच काही योग्य मार्ग सांगा तर लोक तुमच्यावर विद्वान व अर्थतज्ञ म्हणून विश्वास ठेवतील. नाही तर तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे हे जनतेला माहिती आहे, त्यासाठी असे काही सांगण्याची आवश्यकता नाही.

दिनांक २८ सप्टेंबर २०१७

तुळजापूरची भवानी देवी !

तुळजापूरची भवानी देवी ! 

आज अश्विन शुद्ध अष्टमी ! नवरात्रातील आठवी रात्र ! महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक - तुळजापूरची भवानी देवी ! तुळजापूर आपल्या महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील गांव ! येथील हे तुळजा भवानीचे प्राचीन मंदीर !
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या घराण्याची, भोसले घराण्याची तसेच यादव घराण्याची देवता ! महाराष्ट्रातील असंख्य घराण्याची ही कुलदैवत ! आमच्या सारख्यां असंख्यांकडे पाहुणी येऊन त्यांना उपकृत केले.
शिवाजी महाराजांना आपल्या जवळची तलवार देवून या शस्त्राने दुष्टांचा संहार करून हे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करण्याचा आशीर्वाद देणारी ही ‘तुळजा भवानी’ ! महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी छत्रपतींच्या रुपाने कालीमातेच्या रूपात दुष्टांचा, दुर्जनांचा संहार करणारी आणि आपल्या पुत्रांचे रक्षण करणारी ही तुळजामाता ! दुर्जनांचा संहार करून सज्जनांचा प्रतिपाळ करण्याचा आदर्श घालून देणारी ही महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण जगाची जगन्माता !
जगाला सांभाळणाऱ्या या जगन्मातेची प्रार्थना तरी काय करणार ? स्कंदपुराणातील ‘सप्तशती’ यांतील प्रत्यक्ष देवतांनी देवीची स्तुती केली त्यातील काही श्लोक !
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

दिनांक २८ सप्टेंबर २०१७

माहूरची 'रेणुका माता' !

माहूरची 'रेणुका माता' ! 

आज अश्विन शुद्ध ७ ! नवरात्रातील सातवा दिवस ! आज देवीच्या शक्तिपिठ मंदिरात जप, होम, देवी पाठ, होम, हवन हे तर होणारच !
या महाराष्ट्रातील शक्तीपीठातील एक पीठ म्हणज़े 'माहूर', माहूरची 'रेणुका माता' ! भगवान परशुरामाची जणांनी म्हणून हिची ख्याती आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर रहात असलेली ही फक्त परशुरामाचीच नाही तर सर्व जगाची माता, जगन्माता !
येथे गुरु दत्तात्रेयाचे जन्मस्थान ! भगवान अत्री ऋषींचा आणि त्यांची पत्नी सती अनसूया यांचा आश्रम येथे आहे. प्रत्यक्ष विश्वाचा निर्माता भगवान ब्रह्मदेव, विश्वाचा पालनकर्ता भगवान विष्णू आणि जगताचा संहारकर्ता भगवान शिव, यांना सती अनुसयेची परीक्षा घ्यायची इच्छा झाली आणि मग त्यातून जन्म झाला 'गुरु दत्तात्रेयांचा' ! गुरुदेव दत्ताचे निद्रास्थान आणि जन्माता रेणुकेचे निवास्थान असलेले माहूरगड !

॥ रेणुकास्तोत्रं श्रीवायुपुराणे श्रीपरशुरामकृतम् ॥
श्रीगणेशाय नमः ।
श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीगुरुभ्यो नमः ।
श्रीरेणुकाम्बायै नमः ।
ॐ नमः परमानन्दे सर्वदेवमयी शुभे ।
अकारादि-क्षकारान्तं मातृका मन्त्रमालिनी ॥ १॥
एकवीरे एकरूपे महारूपे अरूपिणि ।
अव्यक्ते व्यक्तिमापन्ने गुणातीते गुणात्मिके ॥ २॥
कमले कमलाभासे हृत्सच्चित्तरणिकालये ।
नाभिचक्रस्थिते देवि कुण्डली तन्तुरूपिणि ॥ ३॥
वीरमाता वीरबन्धा योगिनी समरप्रिये ।
वेदमाता वेदगर्भे विश्वगर्भे नमोऽस्तु ते ॥ ४ ॥
राममातर्नमस्तुभ्यं नमस्त्रैलोक्यरूपिणि ।
मह्यादिके पञ्चभूता जमदग्निप्रिये शुभे ॥ ५ ॥
यैस्तु भक्त्या स्तुता ध्याता अर्चयित्वाऽर्पिते शुभे ।
भोगमोक्षप्रदे देवि कामेश्वरि नमोऽस्तु ते ॥ ६॥
नमोऽस्तु ते निरालम्बे परमानन्दविग्रहे ।
पञ्चभूतात्मिके देवि भूतभाविवर्जिते ॥ ७॥
महारौद्रे महाकाये सृष्टिसंहारकारिणि ।
ब्रह्माण्डगोलकाकारे विश्वरूपे नमोऽस्तु ते ॥ ८॥
चतुर्भुजे खड्गहस्ते महाडमरुधारिणि ।
शिरःपात्रधरे देवि एकवीरे नमोऽस्तु ते ॥ ९॥
नीलाम्बरे नीलवर्णे मयूरपिच्छधारिणि ।
वनभिल्लधनुर्वामे दक्षिणे बाणधारिणि ॥ १०॥
रौद्रकाये महाकाये सहस्रार्जुनभञ्जनि ।
एकं शिरः पुरा स्थित्वा रक्तपात्रे च पूरितम् ॥ ११॥
मृतधारा पिबन्देवि रुधिरं दैत्यदेहजम् ।
रक्तवर्णे रक्तदन्ते खड्गलाङ्गलधारिणि ॥ १२॥
वामहस्ते च खट्वाङ्गं डमरुं चैव दक्षिणे ।
प्रेतवाहनके देवि-ऋषिपत्नी च देवते ॥ १३॥
एकवीरे महारौद्रे मालिनी विश्वभैरवि ।
योगिनी योगयुक्ता च महादेवी महेश्वरी ॥ १४॥
कामाक्षी भद्रकाली च हुङ्कारी त्रिपुरेश्वरी ।
रक्तवस्त्रे रक्तनेत्रे महात्रिपुरसुन्दरि ॥ १५॥
रेणुका सूनुयोगी च भक्तानामभयङ्करी ।
भोगलक्ष्मीर्योगलक्ष्मीर्दिव्यलक्ष्मीश्च सर्वदा ॥ १६॥
कालरात्रि महारात्रि मद्यमांसशिवप्रिये ।
भक्तानां श्रीपदे देवि लोकत्रयविमोहिनि ॥ १७॥
क्लीङ्कारी कामपीठे च ह्रीङ्कारी च प्रबोध्यता ।
श्रीङ्कारी च श्रिया देवि सिद्धलक्ष्मीश्च सुप्रभा ॥ १८॥
महालक्ष्मीश्च कौमारी कौबेरी सिंहवाहिनी ।
सिंहप्रेतासने देवि रौद्रि क्रूरावतारिणि ॥ १९॥
दैत्या नारी कुमारी च रौद्रदैत्यनिपातिनी ।
त्रिनेत्रा श्वेतरूपा च सूर्यकोटिसमप्रभा ॥ २०॥
खड्गिनी बाणहस्ता चारूढा महिषवाहिनी ।
महाकुण्डलिनी साक्षात् कङ्काली भुवनेश्वरी ॥ २१॥
कृत्तिवासा विष्णुरूपा हृदया देवतामया ।
देवमारुतमाता च भक्तमाता च शङ्करी ॥ २२॥
चतुर्भुजे चतुर्वक्त्रे स्वस्तिपद्मासनस्थिते ।
पञ्चवक्त्रा महागङ्गा गौरी शङ्करवल्लभा ॥ २३॥
कपालिनी देवमाता कामधेनुस्त्रयोगुणी ।
विद्या एकमहाविद्या श्मशानप्रेतवासिनी ॥ २४॥
देवत्रिगुणत्रैलोक्या जगत्त्रयविलोकिनी ।
रौद्रा वैतालि कङ्काली भवानी भववल्लभा ॥ २५॥
काली कपालिनी क्रोधा मातङ्गी वेणुधारिणी ।
रुद्रस्य न पराभूता रुद्रदेहार्द्धधारिणी ॥ २६॥
जया च विजया चैव अजया चापराजिता ।
रेणुकायै नमस्तेऽस्तु सिद्धदेव्यै नमो नमः ॥ २७॥
श्रियै देव्यै नमस्तेऽस्तु दीननाथे नमो नमः ।
जय त्वं देवदेवेशि सर्वदेवि नमोऽस्तु ते ॥ २८॥
देवदेवस्य जननि पञ्चप्राणप्रपूरिते ।
त्वत्प्रसादाय देवेशि देवाः क्रन्दन्ति विष्णवे ॥ २९॥
महाबले महारौद्रे सर्वदैत्यनिपातिनि ।
आधारा बुद्धिदा शक्तिः कुण्डली तन्तुरूपिणी ॥ ३०॥
षट्चक्रमणे देवि योगिनि दिव्यरूपिणि ।
कामिका कामरक्ता च लोकत्रयविलोकिनी ॥ ३१॥
महानिद्रा मद्यनिद्रा मधुकैटभभञ्जिनी ।
भद्रकाली त्रिसन्ध्या च महाकाली कपालिनी ॥ ३२॥
रक्षिता सर्वभूतानां दैत्यानां च क्षयङ्करी ।
शरण्यं सर्वसत्त्वानां रक्ष त्वं परमेश्वरि ॥ ३३॥
त्वामाराधयते लोके तेषां राज्यं च भूतले ।
आषाढे कार्तिके चैव पूर्णे पूर्णचतुर्दशी ॥ ३४॥
आश्विने पौषमासे च कृत्वा पूजां प्रयत्नतः ।
गन्धपुष्पैश्च नैवेद्यैस्तोषितां पञ्चभिः सह ॥ ३५॥
यं यं प्रार्थयते नित्यं तं तं प्राप्नोति निश्चितम् ।
तत्त्वं मे वरदे देवि रक्ष मां परमेश्वरि ॥ ३६॥
तव वामाङ्कितं देवि रक्ष मे सकलेश्वरि ।
सर्वभूतोदये देवि प्रसाद वरदे शिवे ॥ ३७॥
श्रीदेव्युवाच
वरं ब्रूहि महाभाग राज्यं कुरु महीतले ।
मामाराध्यते लोके भयं क्वापि न विद्यते ॥ ३८॥
मम मार्गे च आयान्ती भीर्देवी मम सन्निधौ ।
अभार्यो लभते भार्यां निर्धनो लभते धनम् ॥ ३९॥
विद्यां पुत्रमवाप्नोति शत्रुनाशं च विन्दति ।
अपुत्रो लभते पुत्रान् बद्धो मुच्येत बन्धनात् ॥ ४०॥
कामार्थी लभते कामं रोगी आरोग्यमाप्नुयात् ।
मम आराधनं नित्यं राज्यं प्राप्नोति भूतले ॥ ४१॥
सर्वकार्याणि सिध्यन्ति प्रसादान्मे न संशयः ।
सर्वकार्याण्यवाप्नोति दीर्घायुश्च लभेत्सुखी ॥ ४२॥
श्रीपरशुराम उवाच
अत्र स्थानेषु भवतां अभयं कुरु सर्वदा ।
यं यं प्रार्थयते नित्यं तं तं प्राप्नोति निश्चितम् ॥ ४३॥
प्रयागे पुष्करे चैव गङ्गासागरसङ्गमे ।
स्नानं च कुरुते नित्यं नित्यं च चरणोदके ॥ ४४॥
इदं स्तोत्रं पठेन्नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः ।
सर्वान् कामानवाप्नोति प्राप्यते परमं पदम् ॥ ४५॥
इति श्रीवायुपुराणे परशुरामकृतं श्रीरेणुकास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीरेणुकार्पणमस्तु ॥

दिनांक २७ सप्टेंबर २०१७