Tuesday, June 30, 2015

आपण विचार करणार आहात काय ? - 'गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या'




अलीकडे मुलींना समान माना, त्यांच्यावर जन्माचे पूर्वीच त्यांना जगातून नष्ट करण्याचा जो अघोरी, निसर्गाचे विरुध्द, क्रूर आणि मानवतेला कलंक असणारे असे कृत्य करून जो अन्याय केला जातो हा केवळ त्यांच्यावरच अन्याय नाही तर आपण 'निसर्गाचे चक्र' उलटे फिरवण्याचा प्रयत्न करीत असतो. 'निसर्गाचे चक्र' उलटे फिरवण्याचा आपल्या अखंडीत प्रयत्नांस 'केदारनाथचा प्रलय', 'अत्यंत अनियमित झालेले पर्जन्यमान आणि वातावरणातील वाढत जाणारे तापमान', 'पाण्याची निरंतर खोल जाणारी पातळी - त्यामुळे पाण्यासाठी धोक्यात येणारी समाजव्यवस्था', वगैरे आपणांस आलेली फळे आपण पाहत आहोत, त्याला 'यश, प्रगती, विकास' म्हणायचे का ? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे मात्र निश्चित की यांच्या विपरीत परिणामामुळे समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे आणि त्याचा परिणाम एकमेकांच्या वर्तनावर होत आहे. या सर्वांमध्ये अजून भर पडत आहे ती 'मुलांचे अवघड होवून बसलेले विवाह कारण मुलींची कमतरता, त्यांचे समाजांत मुलांच्या तुलनेत कमी होत असलेले प्रमाण' !

मला अचानक माझ्या शाळेत मी बहुधा सातवीत असतांना शिकविलेली 'गाई पाण्यावर काय म्हणून आल्या' ही 'नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी' यांची कविता आठवली. अत्यंत अप्रतिमपणे शिकविलेली ही कविता माझ्या आजही लक्षात आहे.

बापाचे दारिद्य मुलांच्या उर्मी, अपेक्षा कशा मारून टाकत असतांत मात्र ही 'देवाघरची फुले' आपल्या अल्प अपेक्षेने आणि त्यावरील सोप्या पण खोट्या उपायाने आपल्या बापास कसे हृदय पिळवटून टाकणारे समाधान देत असतांत. वाचा ---------------


गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजूनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परि आवरि हा प्रलय महाभारी !

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित्‌ पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते,
नये वदतां, अनुभवी जाणती ते !

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !

Monday, June 29, 2015

महाविद्यालयांतील आठवणी -

मी जळगांवच्या 'नूतन मराठा कॉलेज'चा विद्यार्थी ! माझ्या विद्यार्थीदशेत महाविद्यालयाचे प्राचार्य होते, (कै.) डॉ. के. आर. सोनवणे आणि संस्थेचे चेअरमन होते (कै.) नानासाहेब एस. आर. चौधरी, एड्व्होकेट ! महाविद्यालयात त्यावेळी (कै.) पुरुषोत्तम नागेश उपाख्य पु. ना. ओक, (कै.) सेतुमाधवराव पगडी, क्रिकेटमहर्षी (कै.) दि. ब. देवधर, डॉ. गंगाधर पानतावणे, कवी आणि आकाशवाणी अधिकारी श्री. उत्तम कोळगावकर, अभिनेते श्री. अशोक सराफ वगैरे नामवंत व्यक्तींची व्याख्याने मला ऐकावयास मिळाली. 

(कै.) पुरुषोत्तम नागेश उपाख्य पु. ना. ओक यांनी माझ्या आठवणीप्रमाणे तीन दिवस व्याख्यान दिले होते. कोणत्या घटनांमध्ये ऐतिहासिकत्व कसे बघावे, त्यातून आजच्या काळातील आपण काय शिकावे, त्या घटनांचे आज काय महत्व आहे ? कोणत्याही घटनांचा आपण त्रयस्थ वृत्तीने, तत्कालीन परिस्थितीचा विचार करून, त्याची सत्यासत्यता कशी पडताळावी वगैरे ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी सांगितल्या होत्या. आम्हा विद्यार्थ्यांना हे देखील सांगितले होते की याचा उपयोग फक्त इतिहासाची आवड असणाऱ्यांनाच होणार नाही तर तुमच्या जीवनांत एखादी बाब खऱ्याखोट्याच्या कसोटीवर तपासावयाची असेल  तर त्यासाठी हे मार्गदर्शक ठरू शकेल. इतिहास कसा पाहावा - आत्मसात करावा, त्यातून आपण काय घ्यावे, पाल्हाळीक - अनावश्यक बाबी कशा दुर्लक्षित कराव्यात, असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले होते. 'ताजमहाल नसून तेजोमहाल' हा त्यांचा विषयही त्यांनी तेथे 'स्लाईडस' सोबत मांडला होता. आम्हां विद्यार्थ्यांना तो आवडला आणि पटलाही होता. त्यांनी आम्हांस जरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो आम्ही इतिहासाचे विद्यार्थी नसल्याने फारसा मनावर घेतला नाही. मात्र त्यांनी सांगितलेले सत्यासत्य पारखून घेण्याचे मुद्दे हे खरंच कायमच लक्षांत रहाण्यासारखे आहेत. त्यामुळे आजच्या काही 'पोस्टवर' ज्यावेळी अशोभनीय, अर्वाच्य असा त्यांच्या संबंधाने मजकूर येतो त्यावेळी हा त्यांनीच सांगितलेल्या कसोटीवर उतरत नाही.  

(कै.) सेतुमाधवराव पगडी यांच्यासारखा इतिहासाचे मुखोद्गत वर्णन करणारा, विविध भाषा जाणणारा मी प्रत्यक्ष अद्याप ऐकलेला नाही. त्यांचे आमच्या महाविद्यालयांत बहुधा तीन दिवस व्याख्यान होते, नक्की आठवत नाही. 

तेथील 'समता' या नांवाने चालणारे भित्तीपत्रकाच्या संपादक मंडळांत मी होतो. त्यावेळी औरंगाबाद येथील साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांना यानिमित्ताने आम्ही बोलाविले होते, त्यांचे आमंत्रण स्विकारल्याचे स्वहस्ताक्षरांतील पत्र आले होते, त्यांचे अक्षर - अप्रतिम, वळणदार ! समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे गिरविलेले ! असो.        

Tuesday, June 16, 2015

सर्व संकटे पार पडून 'सत्य प्राप्त केले पाहिजे'

काल दिनांक १४ जून २०१५ चा 'Tarun Bharat' मधील Pradeep Rasse यांचा Yogesh Shukla यांनी उल्लेखित केलेला 'रिझल्ट' हा लेख वाचला. लेख चांगला आहे, त्यामुळे मलादेखील काही बाबी सुचल्या आणि सांगाव्याशा वाटत आहे. मी औरंगाबाद येथे असतो, जळगावचे वर्तमानपत्र त्यामुळे वाचायला मिळत नाही. त्यावर लगेच प्रतिक्रिया द्यावी असेही वाटत होते. आपण ठरवले आणि त्याप्रमाणे लगेच झाले हे बहुतांशवेळा आपल्या हातात नसते, तसेच झाले, 

संध्याकाळी कोर्टातून आल्यावर पाहतो तो आमच्या शेजारच्यांची मुलगी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेली असल्याने त्यापुढील अभियांत्रिकी वगैरेसाठी आमचेकडे 'Online' तिचे आवेदनपत्र भरत होती, तिला बराच वेळ लागला; इंटरनेट आणि माझ्या मुलीची कृपा ! त्या उत्साहात असलेल्या मुलीला नाराज करून लगेच प्रतिक्रिया देणे जमले नाही, त्यामुळे मी माझे कामही केले नाही. या उद्याच्या पिढीच्या अडचणी खूप आहेत, त्यात आपल्यासारख्यांनी वाढ करणे उचित नाही, करता आली तर मदत करावी, हा माझा स्वभावधर्म मी सांगण्याचे अगोदर परिचितांना माहीत पडतो. (माझ्याकडचे इंटरनेट हे आमच्या ओळखींच्या सर्वाना त्यांचेच असल्यासारखेच वाटते, ते फक्त मी घरी असल्यावर मला वापरायला देतात फक्त लवकर आटपा असे सांगत नाही, ते त्यांच्या डोळ्यांत दिसू शकते. अर्थात त्यावरही माझी काही फारशी तक्रार नसते, पण त्यावर 'त्यांची गरज तुमच्यापेक्षा जास्त असते. तुम्हाला काय तुम्ही पहाटे उठून नेहमीप्रमाणे काम कराल, ते आपल्याकडे पाहते येतात का ? येवू शकत नाही, त्यांचे काम तत्काळ केले नाही तर नुकसान होईल, तुमचे काय होणार आहे ? कोर्टाचे काम ! - माझ्या गृहमंत्र्यांची आदेशवजा प्रतिक्रिया ! यावर मी काहीही बोलत नाही - गेल्या निदान २३ वर्षांचा भरभक्कम अनुभव आहे - काहीही उपयोग न होण्याचा अपवाद कदाचित सुरुवातीच्या काही वर्षांचा असावा, पण ती आठवणही आता धूसर झाल्यासारखी वाटते. असो - 'गेले ते दिन गेले') 

विद्यार्थ्यांची आणि पालकांची अवस्था एकमेकांपेक्षा फारशी वेगळी नसते. ज्यांच्याकडे पैशांच्या थैल्या असतात ते उघडून बसलेलेच असतात आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना कसेही करून उघडावी लागते, अन्यथा त्याचा परिणाम त्याच्या मुलांवर, कुटुंबावर, घरातील वातावरणावर आणि सरते शेवटी समाजावर ! आपले वागणे अलिकडे असे होत चाललेले आहे की आपण समाजात राहतो आहे किंवा नाही ही शंका यावी. समाजाच्या सुख-दुःखाशी आपणास फारसे कर्तव्य राहिलेले नाही. एकत्र कुटुंबपध्दती जवळपास मोडीत निघालेली असल्याने सर्वांचा विचार करणे शिल्लक राहिलेले नाही किंबहुना सर्वांचा एकत्रित विचार निरपेक्षपणे करणे आणि नंतर निर्णय घेणे राहिले नसल्याने, स्वार्थ बोकाळल्याने एकत्र कुटुंबपध्दती संपुष्टात आली.  शब्द हे पाळण्यासाठी असतात हे आजकाल फक्त संत तुलसीदासांनाच माहीत असावे असे वाटते. मी तर आता कोणी असे काही बोलले की 'ध्वनी निर्माण होतो' या पलिकडे त्याला महत्व देत नाही; कारण शब्दांचे पालन झाले हे त्यांनी ते पाळल्यावर मानावे, या मताचा मी झालेलो आहे. 

आपण विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांकडे लक्ष देण्याऐवजी भविष्यातील त्यास फक्त आर्थिक फायदा देवू शकतील अशा योजना आखत असतो आणि त्याची अंमलबजावणी करायच्या कामाला लागतो. मग फक्त पैसे मिळवून देणारे कोणते शिक्षण आहे तेच बघितले जाते; मग त्या शिक्षणाला आणि पर्यायाने शिक्षणसंस्थांना महत्व येते. अलीकडच्या बहुतांश शिक्षणसंस्था या व्यापार करणारी कार्यालये झालेली आहे, पिढी घडवणारी नाही, त्यांच्या उद्देशांत तसे दाखविले असल्यास, ते शासनाची परवानगी मिळवण्यासाठी दाखवावे लागते म्हणून असते. या धबडक्यात जुन्या-जाणत्या शिक्षणसंस्थांना त्यांच्याशी स्पर्धा करायची असते. मग तुलना सुरु होते - टोलेजंग इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत वाचनालय, त्यासाठी लागणारा खर्च भरून काढण्यासाठी भरपूर शिक्षण-शुल्क घेण्याची संबंधित क्षेत्राकडून परवानगी, त्यासाठी किंवा नियमाप्रमाणे अपेक्षित काही गोष्टी नसल्या तर कराव्या लागणाऱ्या असंख्य खटपटी-लटपटी, मधूनच कर्मचारीवर्ग दाखवत असलेले कायद्याचे  ज्ञान त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर समस्या ! बहुतांश कर्मचाऱ्यांना कर्तव्यापेक्षा असलेल्या हक्कांची जाणीव, त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्दैवी कुचंबना ! या सगळ्यांतून शिक्षण-संस्था चालवावी लागते, विद्यार्थी मिळवावे लागतात, ते दरवर्षी सतत टिकवावे लागतात, 

पैसे मिळवणारेच शिक्षण घ्यायचे या अमलांत आणणाऱ्या आपल्या धोरणामुळे आपण कोणकोणत्या गोष्टींना मुकत चालले आहोत - 
१. पटकन नांव घेण्यासारखे नवीन साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक, समाज-मदतनीस तयार होत नाहीत की जे समाजाला नवीन विचार देवू शकतील, मार्गदर्शन करू शकतील, मदत करू शकतील. सर्वांचे वर्तन हे मिळणाऱ्या पैशावर अथवा फायद्यावर अवलंबून असल्याने समाजातील प्रामाणिक वर्ग दुष्प्राप्य होत चालला असून, नवीन तयार होणे जवळपास थांबल्यासारखे झाले आहे. ढोंगी व्यक्तींची संख्या मात्र वाढलेली आहे.  
२. मुलभूत संशोधन व्हावे, त्यातून नवनवीन शोध लागावेत, आपणांस आणि समाजास ज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा राहिलेली नाही. ते महत्वाचे क्षेत्र मागे पडत चाललेले आहे. ज्या थोड्याफार जाणकारांना हे महत्वाचे आहे आपण करावे असे वाटते ते प्रयत्न करतात; त्यांचे प्रयत्न बऱ्याचवेळा विफल होतील असा आर्थिक-बाबींना महत्व देणारा आपला करत असतो. यांत आपले जातीपातीचे राजकारण, त्यांच्या सोयी-सवलती, हजारो वर्षांपासूनचे झालेले अथवा न झालेले - खरेखोटे अन्याय हे देखील परिणाम करत असतात. हे विद्यार्थी जर कमालीचे बुध्दीमान असतील तर ते कंटाळून परदेशाचा रस्ता धरतात आणि नाद सोडतात, किंबहुना अगोदरपासूनच धोरण आखून ठेवतात. ही बाब तर एवढी भीषण आणि गंभीर आहे की आपल्या समाजांत काही दिवसांनी फक्त 'कचरा-कुंड्याच' दिसतील की काय, असे वाटू लागले आहे.
३.   आपले आणि समाजाचे अंतिम हित हे देखील पैशाच्या स्वरुपात मोजले जावू लागलेले आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे प्रामाणिकपणा हा देखील आर्थिक व्यवहारावर मोजला जावू लागला आहे. पैसे नसणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता राहिलेली नाही फक्त मतलबासाठी काही वेळ-काही वेळा लक्ष दिल्यासारखे करावे, झाले. याचा अत्यंत वाईट, हृदयास घरे पडणारा अनुभव आपणा सर्वाना आजचे 'राजकीय पक्ष' देत आहेत. पक्षाची विचारधारा, आदर्श, योग्य नेतृत्व, संस्कार, परंपरा इत्यादी बाबी बोलणे म्हणजे ते सुध्दा आपला वेळ वाया घालवणे आहे, असे वाटू लागले आहे.      
४. कर्तव्यपालन ही समोरच्याची जबाबदारी असते, आपण फक्त हक्काचे वाटेकरी आहोत अशी समाजभावना बनत चाललेली आहे. त्यासाठी मग सर्व क्षेत्रांत भेदभाव केला तरी चालतो त्याने आपले काहीही होत नाही असे अनुभव येवू लागले आहेत. विद्यार्थ्यांची कर्तव्ये, पालकांची कर्तव्ये आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण समाज ज्यांना नियंत्रित करतो त्याची, राज्यकर्त्यांची कर्तव्ये याचा विसर पडायला लागला आहे.     

मित्रांनो, असंख्य बाबी आहेत ! मी निराशावादी कधीही नव्हतो मात्र दिवसेंदिवस संकटे वाढत चाललेली आहेत आणि त्यातूनच आपणांस मार्ग काढावयाचा आहे आणि यशोशिखरावर पोहोचवायचे आहे, याचा आपणांस कधीही विसर पडता कामा नये. आपले चिरंतन मार्गदर्शक म्हणूनच 'रामायण आणि महाभारत' आहेत. 'सर्व धर्मानपरित्यज्य मामेकं शरणं व्रज' - आपण भगवद्गीतेला शरण जायचे आणि त्यात सांगितलेला कर्मयोग अंमलात आणायचा. म्हणूनच आपण वनवासात असलो तरी ते कर्तव्यबुध्दीने, कष्टाने, सर्व संकटे पार पडून 'सत्य प्राप्त केले पाहिजे'.  

Saturday, June 13, 2015

आज १३ जून ! - होय ! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे !


आज १३ जून ! ही दिनांक दरवर्षी येते, मात्र सेहेचाळीस वर्षांपूर्वी, १३ जून १९६९ रोजी नियतीने आपल्यातून ज्या माणसाला आपल्यातून ओढून नेले, 'असा माणूस गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुन्हा होईल का नाही ते सांगता येणार नाही' - होय ! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे !

अष्टपैलू, धुरंधर, व्यक्तिमत्व ! प्रभावी वक्ते, लेखक आणि 'केशवकुमार' या टोपण नांवाने लिहिणारे उत्तम गीतकार-कवी, विडंबनकार, नट आणि एक काळ जवळजवळ आपल्या एकट्याच्या बळावर रंगभूमी जीवंत ठेवणारे समर्थ नाटककार तसेच संगीत नाटककार, सर्वोत्तम चित्रपट निर्मितीत 'श्यामची आई' सारखा आदर्शवत मराठी चित्रपट निर्माण करून समाजास आणि उगवत्या पिढीस चिरंतन तसेच उपयोगी नीतीमूल्यांची जाणीव करून देवून 'साने गुरुजींचे चरित्र' समाजात तळागाळात नेणारे आणि संपूर्ण भारतात 'पहिले सुवर्णकमळ' मिळवणारे मराठी चित्रपटनिर्माते, धडाडीचे आणि पत्रकारितेचे नवनवीन मापदंड देणारे तसेच नवीन पत्रकारांना प्रोत्साहन देवून शिक्षकाची भूमिका उत्तमप्रकारे पार पाडून चांगले पत्रकार-लेखक तयार करणारे आणि 'मराठा' सारखे वर्तमानपत्र चालविणारे उद्योजक !

'------------- यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' असे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अक्षरशः हजारो सभा घेवून जनजागृती करणारे महाराष्ट्र राज्य निर्मितीचे अर्ध्वयू ! ज्यांच्या नांवावर आजही असंख्य खरे-खोटे विनोद खपविले जातात असे विनोदी कथालेखक, कादंबरीकार ! महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे साहित्यिक-राजकारणी ! आमच्या संतांवर प्रेम करणारा आणि वेळप्रसंगी त्यांचे विचार प्रवचनरूपाने समाजासमोर मांडणारा 'प्रवचनकार' ! शिक्षणक्षेत्रात आपल्या प्रतिभेने नवीन यशस्वी प्रयोग करणारा 'शिक्षणतज्ञ - शिक्षक' ! सर्वांत महत्वाचे म्हणजे मराठी मातीवर आणि माणसांवर प्रेम करणारे आणि त्यांच्याशी कृतघ्न नसणारा हा बलदंड मराठी माणूस ! यांच्याबद्दल काय लिहिणार आणि किती लिहिणार ? त्यांच्या एकेका क्षेत्रातील कर्तृत्वाबाबत कोणीही लिहिल्यास त्यावर असंख्य विद्यार्थी 'डॉक्टरेट - Ph. D. ' मिळवतील एवढे त्यांचे कर्तृत्व ! काही काळानंतर 'आचार्य अत्रे' या नावांच्या एकापेक्षा जास्त वक्ती होवून गेल्या असाही समज निर्माण होईल असे आणि एवढे यांचे कर्तृत्व ! असा माणूस मराठी होता आणि महाराष्ट्रांत जन्मला याचा आम्हा प्रत्येकांस अभिमान वाटला पाहिजे ! महाराष्ट्र ही अशा कर्तृत्वसंपन्न पुरुषांची जननी आहे, याचा यथार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि ते वेळोवेळी आपण दाखवून दिले पाहिजे - ही आपली जबाबदारी आहे !

त्यावेळी मी दुसरीत होतो. जळगावहून उन्हाळ्याची सुटी संपली म्हणून माझ्या आजोळहून घरी रावेरला यायला निघालो होतो; गाडीतसुध्दा 'आचार्य अत्रे' गेल्याचीच चर्चा होती. माझ्या बालमनाला हे समजेना सर्वच लोक या कोणत्या माणसाची चर्चा करत आहेत की एवढे दु:ख सर्वांना व्हावे ? प्रवास सुरु होता, मी न राहून गाडीतच माझ्या आईला प्रश्न विचारला, 'शेजारचे अत्रे वारल्याचे एवढे लोकांना कसे काय माहीत झाले ?' हा प्रश्न किती मूर्खपणाचा होता, मात्र त्यापेक्षा किती अज्ञानाचा होता, हे मला आजही जाणवते. मित्रांनो, तिने मला प्रवासांत दिलेले उत्तर माझ्या अजूनही लक्षात आहे, ती म्हणाली 'तू जे समजतो, ते हे अत्रे नाहीत. मात्र हे अत्रे किती मोठे होते हे तुला माहीत होईल, तेंव्हा तू मोठा झालेला असेल.' दुसरीच्या मुलाला जेवढे समजणे शक्य होते ते मला समजले, म्हणजे काहीही समझले नाही, मात्र 'आचार्य अत्रे' हे नांव कायमचे डोक्यात राहीले. 

त्यानंतर मी चौथीत असतांना माझ्या काकांनी, त्यांना आम्ही नानाकाका म्हणत असू ! त्यांनी माझी वाचनाची आवड पाहून माझ्या नांवाने 'राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयात' माझे नांव नोंदवून मला सभासद केले. ग्रंथपाल होते 'सोनू बुलाखी वाणी', हे आम्हा मुलांत अत्यंत कडक म्हणून प्रसिध्द होते ! मला पाहिल्यावर 'याला काय सभासद करतात? काय वाचणार आहे हा ?' या त्यांच्या माझ्याबद्दलच्या प्रतिक्रियेवर माझा त्यांच्या बद्दलच ग्रह अजूनच पक्का झाला' एवढेच नाही तर त्यांना पुस्तकाबाबत काहीही समजत नाही याची भर पडली. मात्र तरीही नानाकाकांनी दरमहा ५० पैसे अशी सहा महिन्यांची एकूण वर्गणी ३ रुपये भरली आणि मी सभासद झालो. (दरमहा ५० पैसे यावर जावू नका - त्यावेळी आमच्या गांवाला झणझणीत मिसळ १५ पैशांला मिळत होती. हिशोब करा - 'एका डॉलरचे किती रुपये होतील' या चालीवर)

त्यानंतर आचार्य अत्र्यांची वाचनालयात असणारी जवळजवळ सर्वच पुस्तके मी वाचली. मग नाटके - 'साष्टांग नमस्कार', 'घराबाहेर', 'भ्रमाचा भोपळा', 'उद्याचा संसार', 'लग्नाची बेडी', 'मोरूची मावशी' आणि 'तो मी नव्हेच' हे वाचण्यासोबतच रंगभूमीवर पहाण्यास मिळाले ! 'मी कसा झालो' 'हशा आणि टाळ्या' त्यांचे 'कऱ्हेचे पाणी' यांचे सर्व खंड वाचले. 'समाधीवरील अश्रू' वाचले. 'मराठी माणसे - मराठी मने' हे त्यांचे पुस्तक आम्हांस, महाविद्यालयात पहिल्या वर्षाला अभ्यासाला होते. असे समृध्द, विचारप्रवर्तक, कसदार साहित्य आपणास वाचावयास मिळाले पाहिजे आणि ते आपण 'कोणत्या जातीच्या माणसाने लिहीले आहे ?' याचा विचार न करता वाचले पाहिजे - अर्थात आपणांस आपली प्रगती व्हावी असे वाटत असेल तरच !

तत्कालीन समाजाचा समर्थपणे मुकाबला करून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 'अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत' सहकार्य करणारा हा जन्माने 'ब्राह्मण माणूस' यांचे भान आपण आजच्या समाजाच्या जातीविषयक अत्यंत प्रदूषित वातावरणांत अवश्य ठेवले पाहिजे आणि अशा कर्तृत्ववान माणसांच्या भूमीत राहणाऱ्या आपण दिवसेंदिवस जाणीवपूर्वक वाढवत नेणारी ही जातीयता आणि ढोंगी सहिष्णुता संपविली पाहिजे - आपल्या, समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी !  आज हे आठवले कारण ती आहे एक माझ्या शालेय जीवनातील, न समजणाऱ्या काळातील पण माझ्या कायमच्या स्मरणांत राहून गेलेली ही १३ जून १९६९ ची आठवण !

आपणासाठी त्यांच्या 'संगीत प्रीतीसंगम' या नाटकातील एक पद -
किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार ?
लक्ष चौर्‍याऐंशींची ही नको आता येरझार

लोखंडाचे गुणदोष बघे का परीस
लेकराची कासावीस माहीत आईस !

पाण्यामाजी तूच देवा तारीले पाषाण
ब्रीद तुझे दीनानाथा, पतितपावन !

कठीण तो मायापाश सुटेना कोणास
कपाळीचा टळेनाही कोणा वनवास !

अनाथांचा नाथ तुला बोलतात संत
काकुळती आलो आता नको बघु अंत

कोठे गुंतलासी राया, कोणाला ताराया ?
पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया !

Tuesday, June 2, 2015

'सत्यवान आणि सावित्री'

आपल्या भारतांत कमालीची पतीनिष्ठा दाखविणाऱ्या पतिव्रता या 'अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी' मानल्या जातात. पतीला अनुकूल वागणाऱ्या या पतिव्रता ! मात्र 'सावित्री'चे कथानक हे महाभारतातील उपकथानक आहे. महर्षी व्यासांच्या प्रतिभेबद्दल काय सांगावे ? 'जगतात जे काही आहे ते व्यासांनी मांडलेले आहे म्हणजे उष्टे केलेले आहे' असे म्हटले जाते; आणि खरोखर कित्येक कल्पना विचार हे आपण पाहिल्यास त्याची बीजे आपणांस महर्षी व्यासांच्या या अवाढव्य, प्रचंड वाङ्ग्मयात सापडतात; मग कदाचित त्यांचे वाङ्ग्मय वाचले असले अथवा नसले, माहित असले अथवा नसले तरी त्याने फारसा फरक पडत नाही. 

मला ही 'सत्यवान आणि सावित्री' यांची कथा आणि त्यातील भाव थोडा वेगळा वाटतो, येथे मी कथा सांगणार नाही, ती आपणा सर्वांना माहित आहे. नेहमी पतीस अनुकूल असणे, मग त्याचे बरोबर आहे किंवा नाही याचा विचार न करता त्याला साथ देणे, ही बाब वेगळी आहे. मात्र आपण निवडलेल्या जोडीदाराचे भविष्य प्रत्यक्ष देवर्षी नारदांनी सांगितल्यावरही, आपल्या निवडलेल्या जोडीदाराला न डावलता, दुसरा जोडीदार न निवडता, त्या जोडीदाराला नंतर सोडून न देता; त्याच्यावर आलेल्या संकटात अगदी दैवी संकटांत देखील खंबीरपणे साथ देवून, आपल्या समयसूचकतेची, बुध्दीची, धीराची, पातिव्रत्याची, नितीमत्तेची परीक्षा देणारी ही, 'धर्मराज यमाच्या' सर्व परीक्षांत उत्तीर्ण होते. त्यास प्रत्यक्ष मरणाच्या दाढेतून सोडवून आणणारी ही 'सावित्री' मला या पांचही पतीव्रतांपेक्षा कांकणभर सरसच वाटते. लौकिकार्थाने जरी सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमधर्माकडून परत आणून त्यास जिवंत केले असले तरी आपल्या या अलौकिक कर्तृत्वाने सावित्री या जगतात अजरामर झालेली आहे.

 या निमित्ताने अजून एक बाब ठळकपणे सांगाविशी वाटते की आपल्या चित्रपट सृष्टीचे जनक 'दादासाहेब फाळके' यांनी सन १९१४ मध्ये 'सत्यवान सावित्री' या नांवाने मूकपट तयार आणि दिग्दर्शित केला होता, हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. त्यानंतरही विविध भाषांमध्ये या कथेवर चित्रपट निघाले आहेत. यातून समाजावर या कथामृताचा असलेला प्रभाव दिसतो. पतीसाठी पर्यायाने कौटुंबिक सहजीवनासाठी प्रत्यक्ष पतीचे प्राण हे त्यास मृत करणाऱ्या यमराजाकडून परत आणणे ही अजिबात सामान्य गोष्ट नाही, हे आमच्या स्त्रीशक्तीचे सामर्थ्य आहे, हे या कथेने ठळकपणे दाखवून दिलेले आहे आणि हे चिरंतन मूल्य आपल्या संस्कृतीस देणारी सावित्री ही आपल्या समाजाची सांस्कृतिक प्रतिनिधी आहे, समाजाचा भक्कम आधार आहे.

रामायण, महाभारत प्रत्यक्षात झाले किंवा नाही ? त्यामुळे समाजात धार्मिक तेढ वाढते का ? त्यातून सर्वधर्मभावास, सहिष्णु वृत्तीस हानी पोहचते का ? वगैरे निरोद्योगी प्रश्न निर्माण करून आणि अनावश्यक कर्मकांडाकडे दुर्लक्ष केले आणि आपण आपल्या संस्कृतीतील अशी चांगली तत्वे घेतली तर ती निश्तितच आपल्या सुवर्ण-युगाची नांदी ठरेल.   

(सोबत महान चित्रकार 'राजा रविवर्मा' याची या विषयावरचे चित्र देत आहे.)