Friday, September 15, 2017

कै. ना. भि. वानखेडे सर - सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर


कै. ना. भि. वानखेडे सर - सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर  

आपले रहाते गांव लहान असले की त्याचे आपल्याला फायदे जसे असतात तसे तोटे पण अनुभवायला येतात. आम्ही शाळेत शिकत असतांना आम्हा विद्यार्थ्यांपैकी कोणी कुठे इकडेतिकडे फिरतांना दिसले की कोणीही 'काय रे, इकडे गांधी चौकात काय फिरतोय ? घरी सांगीतले आहे का ? अन् हा कोण तुझ्या बरोबर ?' मग सगळं सांगावेच लागे, न सांगून सांगणार कोणाला ? नाही सांगीतले तर परत संध्याकाळी घरी विचारणा होणार - 'शाळा सोडून गांधी चौकात कोणाबरोबर होता ?' गंमत याची वाटते की त्यावेळी आजच्या सारखी अद्ययावत संदेशवहनाची साधने नव्हती पण तरी देखील संदेशवहन मात्र अद्ययावत व तात्काळ होत असे. अर्थात हा जसा अनुभव एखादे वेळी येई तसा -'अण्णा, आज तुमच्या मुलाने वर्गात कोणाला न येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्याच्याकडे लक्ष ठेवा. हुशार आहे. मुलगा पुढे जाईल.' हे पण सांगणारे भेटत.
गांवातील सर्वांची मुले ही त्यावेळी सर्व गांवाची असायची, त्यांच्या भविष्याची व भल्याबुऱ्याची काळजी गांवाला असायची. ही गांवाचं नांव सर्वदूर काढणारी व्हावी, हा प्रयत्न असायचा त्यांचा. ही मुलं वेगवेगळ्या घरांत रहात फक्त ! त्या सर्वांवर छत्र गांवाचेच असायचे म्हणून सर्वांचे आईवडील व पालक ही मुलं गावाच्या भरवशावर ठेवून निर्धास्त असायचे. ज्याने त्याने ज्याचे त्याचे पहावे इतरांत नाक खुपसू नये हे तत्व मुलांच्या बाबतीत बहुदा अपवाद असावे. बिडी पिणारा पण कोणी बिडी ओढण्याचे चाळे करणारा मुलगा दिसला की त्याच्या भाषेत बिनपाण्याने करायचा. त्यांत फारसे कोणाला वावगे पण वाटत नसे. सर्वांची जात ही बहुदा कागदोपत्रीच लिहीलेली असायची, आचरणांत क्वचितच असायची ! तेच बरे होते.
एकाददुसरा मग क्रांतीकारी विचाराचा निघायचा, की तो या गावकऱ्यांच्या जन्मदत्त अधिकारांना चॅलेंज द्यायचा, 'तुम्हाले काय करनं आहे ? मी माह्य पाहून घीन ?' हे ऐकल्यावर तो गांवकरी कायद्यातील सर्व तरतुदी बाजूला ठेवून त्याच्या खाड्कन मुस्कटात ठेवायचा आणि त्याला सरळ त्याच्या घरी घेवून यायचा. अशा गावकऱ्याच्या तावडीत सापडणे फारच वाईट ! कारण असे काही होऊन कोणी घरी आलं तर त्या मुलाची षोडषोपचार, महाभिषेकासह महाआरती ओवाळून व महानैवेद्य दाखवून दुप्पट पूजा होई. अशातऱ्हेने असे क्रांतीकारक व त्यांची क्रांती दडपली जाई. तरी पण आपल्या गांवाबद्दल कोणी बाहेरगांवी वाईट बोलत नसे, त्याला प्रेमच वाटे. इतकेच नाही तर गावाबद्दल भलेबुरे तो कोणाकडून ऐकूनही घेत नसे.
गांवातील सर्वांचेच एकमेकांच्या वागण्यावर आपोआप लक्ष असते, आपली गांवात उलटसुलट वागण्याची हिंमत होत नाही, कारण गांवात समाजाचे तेवढे वजन व धाक असतो. सर्वांचेच व्यवहार त्या छोट्या क्षेत्रात फिरत असतात त्यामुळे कोणापासून काही फारसे लपून रहात नाही. एखादा कोणाशी उलटसुलट वागत असेल तर परस्पर सरळ करण्याचा अधिकार हा गांवातील जबाबदार व्यक्तींना अवश्य असतो व तो गांवाने बिनतक्रार मान्य केला असतो. मग त्या जबाबदार माणसाची जबाबदारी अजूनच वाढते कारण त्याला बेजबाबदार वागून चालत नाही. बऱ्याच वेळा म्हणून असेही म्हटले जाते जबाबदारीचे महत्व बेजबाबदार माणसाला शिकवायचे असेल तर त्याला जबाबदारी द्यावी, तो आपोआप शिकतो.
आमची मराठी मुलांची शाळा, नं. २ ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा काय आणि सरदार जी. जी. हायस्कूल ही माध्यमिक शाळा काय, यांनी तर आम्हाला आयुष्यभर पुरून उरेल एवढी शिदोरी दिलेली आहे. आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांची नांवे जेव्हा निघतात तेव्हा काहींनी आपल्याला त्यावेळी शिकवले नाही याची मनाला अजूनही चुटपूट लागलेली आहे. आता ते शक्य पण नाही. त्यांत कै. बहादरपूरकर सर, कै. एस्. एस्. देव सर, कै. रावेरकर मॅडम व कै. व्यवहारे सर हे सर्व नंतर गर्ल्स हायस्कूलला गेले. त्यामुळे यांचे शिकवणे अनुभवायला मिळणारच नव्हते. मात्र कै. एस्. आर. कुलकर्णी (मोठे) हे सरदार जी. जी. हायस्कूल येथे असूनही मला त्यांनी शिकवण्याचे भाग्य लाभले नाही. कै. एस्. आर. कुलकर्णी (मोठे) हे लिहीण्याचे कारण आमच्या शाळेत दोन एस्. आर. कुलकर्णी होते. एक छोटे व दुसरे मोठे. दुसऱ्यांनी मला शिकवले आहे. त्यांचे शिकवणे पण उत्तमच ! त्यांनी मराठी, इंग्रजी व भूगोल शिकवलेत !
श्री. एस्. एस्. चौधरी यांचे मराठी व इतिहास, श्री. तिवारी सरांचा इतिहास व हिंदी, श्री. जमादार सरांचा भूगोल, श्री. नंदकुमार बालाजीवाले व श्री. एन्. एस्. पाटील सरांचे मराठी, सौ. के. व्ही. पाटील मॅडमचे गणित, श्री. बोरोले, वाणी व वऱ्हाडे सरांचे रसायनशास्त्र, श्री. एस्. एस्. पाटील सरांचे जीवशास्त्र, श्री. डेरेकर सरांचे संस्कृत, कलेचा इतिहास शिकवावा तो श्री. के. एम्. पाटील यांनी; काय सुंदर चित्र काढायचे ! किती नांवे सांगावीत ! ही सर्वच गुरूवर्य मंडळी कळकळीने शिकवायचे म्हणून ती अजून येथे ह्रदयांत आहे. ही आयुष्यभराची शिदोरी अधूनमधून उघडावी.
काहींचे काही विषय तर हातखंडा समजले जात, जसे कै. डी. टी. कुलकर्णी सरांचे केमिस्ट्री, कै. व्ही. बी. दीक्षित सरांचे गणित-भूमिती व भौतिकशास्त्र, कै. पी. के. भोकरीकर सरांचे 'हायर मॅथेमॅटिक्स' जे जुन्या मॅट्रीकला होते मात्र आम्हाला नव्हते, कै. मो. का. लोहार सरांचे हिंदी, कै. एस्. आर. कुलकर्णी (मोठे), कै. आर. बी. जोशी व कै. न. अ. देशपांडे सरांचे इंग्रजी, कै. पी. व्ही. पुराणिक यांचे इंग्रजी व संस्कृत, कै. पितळे मॅडमचे मराठी ! ही माझी गुरूवर्य मंडळी आता आमच्यांत नाही मात्र त्यांनी मला दिलेलं आयुष्यभर पुरेल इतकं आहे.
त्यांत अजून एक नांव आहे ते माझ्या मित्राचे, डॉ. रविंद्र वानखेडे याचे वडील - कै. ना. भि. वानखेडे ! यांच्या म्हणजे रविच्या घरी म्हणजे भाजीबाजाराजवळ माझे नेहमीच जाणे व्हायचे. पहिली पासून आम्ही बरोबर ते दहावी पर्यंत ! वर्गात बरोबरच असायचो ! त्याच्या ताईचा गळा अत्यंत सुरेल ती आमच्याकडे, माझ्या आईकडे शास्त्रीय संगीत शिकायला यायची. कै. वानखेडे सरांचे घर काही वेगळे आहे ही भावनाच नसायची, मात्र सरांसमोर जायची हिंमत नसायची.
त्यांचा पोषाख म्हणजे पांढरे स्वच्छ धोतर, त्यांवर पांढरा मनिला व त्यांवर शेवाळी रंगांचा काहीशी चमक असलेला कोट ! काही वेळा राखाडी पण असायचा ! त्यांत कोटाच्या खिशाला खोचलेले बहुदा दोन पेन - एक निळा व दुसरा लाल शाईचा ! डोक्यावर काळी टोपी ! त्यांतून कडेने बाहेर आलेले पांढरे केस ! पायांत करकर वाजणाऱ्या वहाणा, नंतरच्या काळात काही वेळा बूट पण घालत. डोळ्यावर काळ्या जाड फ्रेमचा चष्मा ! वर्ण काळसर, गोलसर चेहरा ! ज्ञानाची चमक व बुद्धीचे तेज चेहऱ्यावर दिसायचे.
यांचे अक्षर अतिशय सुंदर ! वळणदार अक्षर म्हणजे काय हे दाखवायचे असेल तर कै. वानखेडे व श्री. तिवारी सरांचे अक्षर दाखवावे. चांगले अक्षर असलेले बरेच आहेत पण वळणदार अक्षर असलेले कमी असतीत. वळणदार अक्षर असलेले माझे अजून दोन मित्र आहेत. आश्चर्य म्हणजे अक्षर वळणदार असूनही दोन्ही डॉक्टर आहेत - एक म्हणजे डॉ. विवेक तडवळकर आणि हा डॉ. रविंद्र वानखेडे ! त्यांनी लिहीलेली 'प्रिस्क्रीपशन्स' त्यांच्या या अशा अक्षरांमुळे लवकर समजत नाही अशी 'औषध विक्रेता संघाची' तक्रार आल्याचे कानावर आले होते. खरेखोटे तो धन्वंतरीच जाणे !
कै. वानखेडे सरांनी मला बहुतेक आठवीत काही काळ संस्कृत शिकवले. त्यावेळेस त्यांत भगवद्गीतेतील एका अध्यायावर धडा होता. संस्कृत आम्हाला आठवीला संयुक्त होते, म्हणजे पन्नास मार्कांचे व पन्नास मार्कांचे हिंदी ! संस्कृत या विषयाची उत्तरे कशी लिहावीत, हे कोणाला समजणार ? सहामाहीत संस्कृतचा पेपर झाला. मी उत्तरे भरपूर लिहील्याने खुशीत ! पेपर तपासून आल्यावर पाहिले तर लाल शाईत शेरा ! 'आवश्यक तेवढेच लिहावे', मार्क पण काही विशेष समाधानकारक नव्हते. मी सरांना त्याबद्दल विचारले, त्यांवर - आपला धडा व त्यांतील मजकूर जेवढा असतो त्याच्या फार बाहेर जावून लिहीणे तुम्हाला आता अपेक्षित नाही. उत्तर तंतोतंत असावे. भोंगळ नसावे. त्यांचे हे सांगणे आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही प्रश्नावर लागू होईल.
नंतर मी दहावीत असतांना काही दिवस त्यांनी मराठी शिकवले होते. त्यांत 'ग्रंथ हेच गुरू' हा न. चिं. केळकर यांचा, सेतुमाधवराव पगडी यांचा एक धडा होता आणि शिवकालीन बखरीमधील धडा होता. त्यांत त्यांनी मला आयुष्यभर लक्षात राहील असा शिकवलेला धडा म्हणजे - 'शिवाजीची आज्ञापत्रे !' शिवाजी महाराजांचे प्रजेवर असलेले प्रेम, त्यांनी आपल्या रयतेला म्हणजे जनतेला त्रास देवू नये म्हणून सैन्याला दिलेल्या तपशीलवार आज्ञा ! त्यांनी त्यासाठी योजलेला एकेक शब्द त्यामागील महाराजांची भावना, जर ही आज्ञा पाळली नाही तर दिलेली ताकीद ! सैनिकांच्या गलथानपणाने काय व कसे नुकसान होऊ शकते याची दिलेली उदाहरणे ! उंदराने जळती वात रात्री नेली तर सर्व भस्मसात होऊन जाईल, याची दिलेली काळजीयुक्त सूचना ! काय आणि किती सांगावे ? राज्यकर्त्यांची कर्तव्ये, जनतेच्या अपेक्षा, राज्याबद्दल व राजाबद्दल भावना, त्या वेळची परिस्थिती, मोघलाईतील रयतेवरील अन्याय, त्यापेक्षा शिवरायांचे हे राज्य 'स्वराज्य' वाटले पाहिजे असे राजांना का वाटले, त्या मागे त्या समाजाच्या भावनेचा विचार करता 'हे राज्य व्हावे हे तो श्रीची इच्छा' म्हणजे काय ? कै. वानखेडे सर इतिहास शिकवत होते, मराठी शिकवत होते, भारतीय राज्य घटनेची तत्वे सांगत होते का आपल्या समोर रामराज्य कसे असेल याचे चित्र रंगवत होते कोण जाणे ? समाजाच्या सुखदु:खाशी तुमची नाळ जुळलेली असेल तर त्या आपुलकीचा स्नेह, जीवनरस आपल्या बोलण्यातून दिसत असतो. त्यावेळेस रंगून शिकवत असलेले वानखेडे सर आज पण डोळ्यापुढे उभे आहेत.
दहावीला मी रावेर केंद्रात पहिला आल्यावर त्यांनी व एस्. आर. कुलकर्णी (छोटे) यांनी माझी अगदी प्रत्यक्ष पाठ थोपटून केलेल्या अभिनंदनाचा स्पर्श मला आज देखील जाणवतो. त्या स्पर्शाचा मला आज पण अडीअडचणीच्या वेळेला खूप आधार व धीर वाटतो. दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी अकरावी कॉमर्सला प्रवेश घेण्यासाठी गेलो असता त्यांनी मला लगेच प्रवेश दिला नाही. 'तुझ्या वडिलांना मी भेटतो.' म्हणून सांगून मला रवाना केले. नंतर वडीलांना भेटून 'याला सायन्सला घाला. खूप पुढे जाईल. तुमचे व शाळेचे नांव काढेल.' असे सांगत समजावले. यांत माझा प्रवेश रखडला होता. विद्यार्थ्याचे भविष्य हे आपले भविष्य, आपल्या मुलाचे भविष्य मानणारे शिक्षक या शाळेने दिले.
ज्यावेळी आपण त्रयस्थासारखा विचार करायला लागतो त्याचवेळी यांचे हे वागणं आठवते, असे परक्यासारखे वागणे बरं नाही, याची जाणीव होते. आपली गाडी रूळावरून घसरू नये म्हणून आजही आपल्याला त्यांच्या शिकवणीच्या रूपात सावरणारी ही गुरू मंडळी आपल्या आयुष्यातील कितीतरी संभाव्य अपघात टाळत असतात. प्रत्यक्ष परमेश्वराला वंदन केल्यावर गुरूला वंदन करावे हे सांगणारी आपली संस्कृती, आपल्याला गुरूचे महत्व सांगतांना शेवटी हेच सांगते - परमेश्वराची भेट घडवून आणणारा पण गुरूच असतो.
मध्यंतरी डॉ. रविंद्र औरंगाबादला सपत्नीक आला होता. त्याच्या मुलाची पण भेट झाली. आमच्या अशाच गप्पा पाहून त्याला गंमत वाटत होती. त्याचे काम आटोपल्यावर तो रावेरला निघून गेला. मला त्यावेळी त्याला व सौ. वहिनींना पुन्हा भेटता आले नाही. पण त्यामुळे तो या एवढ्या सगळ्या आठवणी ढवळून गेला.
(माझे जवळ असलेला सरांचा एकुलता एक फोटो ! मी उजवीकडे कोपऱ्यात !)

१० सप्टेंबर २०१७

'मरणान्ति वैराणि'

'मरणान्ति वैराणि' 

आपण नेहमी गल्लत करत आलेलो आहे ती 'मरणान्ति वैराणि' या संज्ञेची ! हे प्रभू रामचंद्रांनी सांगीतले ते लंकेचा राजा रावणाच्या अंत्यसंस्काराचे वेळी बिभीषणाला ! त्या वेळी हे आता आपण सोईस्करपणे विसरतो की प्रभू रामचंद्रांनी लंकेशाबरोबर त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त द्यायचे या हेतूनेच तोपावेतो वर्तन केले होते.
मेलेल्या बद्दल वाईट बोलू नये हे जितके खरे आहे तितकेच त्याचेसंबंधाने खोटे बोलू नये हे पण आवश्यक आहे.
जिवंतपणी त्याने जी काही कृत्य भलीबुरी केलेली असतात ती आणि त्याचे परिणाम ती व्यक्ती मेल्यावर आपोआप संपून जात नाहीत तर त्याच्या कृत्याचे चांगलेवाईट परिणाम राहिलेल्यांना भोगावेच लागतात, याबद्दल काय करायचे हे स्पष्टीकरण कोण देणार ? ते कोणी दिले किंवा अगदी कायद्यात वा आपल्या संस्कृतीच्या सामाजिक संकल्पनेत असले तर ते सहन व मान्य करण्याची आपली हिंमत आहे का ?

१० सप्टेंबर २०१७

'गौरी लंकेश' हत्या

'गौरी लंकेश' हत्या 

आताच Praveen Bardapurkar यांचे 'गौरी लंकेश' या विषयाने त्यांच्या मनांत निर्माण झालेले व त्यांनी येथे व्यक्त केलेले विचार विचार वाचलेत.
अगदी खरं सांगायचे तर मला कै. गौरी लंकेश, कै. कलबुर्गी किंवा कै. गोविंद पानसरे यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हती, आणि नाही. माझे याबाबतचे अज्ञान असेल. सर्वच विषयाची सर्वांना माहिती असली पाहिजे असे पण नाही. कै. दाभोळकर मात्र माहीत होते कारण मी 'साधना' नियतकालिकाचा पूर्वी माझ्या शालेय व महाविदयालयीन काळात नियमीत वाचक होतो. त्या वेळी मी विविध विषयांवरील विविध वाचन केले अगदी ज्योतिष वगैरे वरील पण ! मात्र अलिकडे सर्वच अवांतर वाचन कमी झाले आहे, कारण व्यवसायावरील वाचायलाच वेळ पुरत नाही. वाचण्यासारखं काही दिसत नाही, असे माझे म्हणणं नाही.
कोणत्याही विचारसरणीच्या लोकांची हत्या असो, प्रत्यक्ष जीव घेणे असो किंवा त्याची कारकिर्द संपवणे मग कशाही भल्याबुऱ्या मार्गाने असो. दोन्ही पण हत्याच !
आता याबद्दल आपल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना काहीही असली तरी त्याच्याशी राज्यकर्त्यांना, समाजातील पुढारी म्हणून ओळखले जाणाऱ्यांना किंवा आपण पुढारी म्हणून ओळखले जावे असे वाटणाऱ्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते. या घडलेल्या घटनेचा आपल्याला लाभ कसा घेता येईल किंवा आपल्याला लाभ घेता येईल अशा घटना कशा घडतील यांकडे यांतील संधीसाधू लोकांचे लक्ष असते. या पासून मला वाटत नाही की कोणतेही क्षेत्र मुक्त असेल ! मग सामाजिक, आर्थिक वा राजकीय असो. सांस्कृतिक क्षेत्रातील घटना पण आपल्याला ऐकू येतातच !
आपली प्रगती होण्याऐवजी आसपास घडणाऱ्या घटनांमुळे सर्वांना सोपा मार्ग सापडला आहे की आवाज कायमचा बंद करणे व दहशत पसरवणे. जग दिवसेंदिवस लहान होत असल्याने जगांत विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना हे इथली उदाहरणे बनतात. या उदाहरणांचा कित्ता दोन्हीकडील मंडळी गिरवतात. आपण कित्ता गिरवला ते चांगले पण इतरांनी तसे वागू नये हे मानणे पण चुकीचेच ! आपल्या वागण्याने आपण इतरांना 'कसे वागावे' याचं उदाहरण घालून देत असतो.
न्यायशास्त्रात घटनेच्या क्रमातून, कृतीच्या पद्धतीतून, घटना किंवा कृतीमागचा हेतू काय असावा यांचा शोध घेतल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. ते एक शास्त्र आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पुढारी, राज्यकर्ते, 'समाजधुरीण' यांच्या 'कार्याची फळे' आता दिसू लागली आहे कारण तो रस्ता आता खूपच वापरतां झाल्याने गुळगुळीत व वाहता झालेला आहे. त्यामुळे अशा घटना आता वारंवार दिसतात व त्याचे मनातून कोणाला फारसे वाटत नाही व वाटून उपयोग नसतो. एखाद्यास फारतर हळहळ वाटते पण वाटूनही उपयोग काय हे पण समजते.
मग अशा घटना पाहिल्यावर बऱ्याच वेळा वाटते की यांचे निकालपत्र लिहून तयार असते फक्त घटना घडायचा अवकाश की त्यांवर स्वाक्षरी होवून जाहीर केले जाते. आपल्यासारखे वाचून त्यांवर चर्चा करतात.

९ सप्टेंबर २०१७

Tuesday, September 5, 2017

भाद्रपद महिना - भुलाबाई आणि भुलोजी

भाद्रपद महिना  - भुलाबाई आणि भुलोजी

गणेशोत्सव आता संपत आला, गणरायाला परतीचे वेध लागले. 'पुढच्या वर्षी लवकर या', हे शब्द आता आपल्या अगदी ओठापर्यंत आले आहे. परवा मंगळवारची आहे अनंत चतुर्दशी ! गणराया पुढील वर्षी येण्यासाठी जाणार ! त्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा, ती आली की मुलींचा उत्सव येतो, अगदी महिनाभर ! 'भुलाबाई भुलोजी' येतात, भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत म्हणजे 'कोजागिरी' पौर्णिमेपर्यंत !
'आमचे गणपती फक्त दहा दिवस असतात. जो असेल तो प्रसाद ! हे ओळखा ते ओळखा ही नाटकं नाहीत. बिचारे सरळ ! बुद्धीची देवता आहे ना, म्हणून ! आणि तुमच्या 'भुलाबाया' ! त्या एकदा आल्या की महिनाभर हलायचं नांव घेत नाही. पुन्हा त्यांना इतके सगळे रोज वेगवेगळे खाऊ, नुसत्या खादाड !' लहानपणचा हा आम्हा मुलांचा आमच्या बहिणींशी म्हणजे घऱातल्या व गल्लीतल्या, हा संवाद कायम ठरलेला. हे असे ऐकल्यावर कोणा बहिणींना मग राग येणार नाही. यांवर 'अहाहा काय ते उंदरावर बसणं आणि मोदक खाणे ! नुसते खाऊन खाऊन स्वत:चे केवढे मोठं पोट करून ठेवले आहे ?' हे म्हणत आमच्या या बहिणाया त्यांच्या मैत्रिणींना सोबत घेवून अगदी तालात वेडावत म्हणायच्या -
केवढे मोठे पोट, मांडीचे हे लोट ।
उंदराची गाडी कशी तुरूतुरू चाले ।।
'आमचे पहा, भुलोजीचा हा पांढरा शुभ्र धिप्पाड नंदी आहे वाहन ! तर आमच्या भुलाबाईचा वाहन तर सिंह आहे सिंह !' येथे समस्त बहिणाबाई वर्ग सिंहाच्या आवाजात 'सिंऽऽह' असे म्हणून, 'कोठे सिंह अन् कोठे उंदीर' ? असे सिंह म्हणतांना एकदा आकाशाकडे व उंदीर म्हणतांना जमिनीकडे बोट दाखवत म्हणत ! यांवर कडी करत शेवटी - 'अन् पहा, तुमचा हा गणपती आमच्या भुलाबाईच्या मांडीवर बसला आहे; उठायला तयार नाही. म्हणे बुद्धीची देवता !' या समस्त बहिणाबाई इतक्या तडाख्यात आम्हा गणेशभक्तांना चूप करत की मग लक्षात येई, 'फक्त बुद्धीच्या देवतेचे उपासक असून चालत नाही तर अशातऱ्हेने भांडून समोरच्याला नामोहरम करण्याची बुद्धी उपजत असावी लागते. ती समस्त बहिणायांजवळ, महिलावर्गाजवळ उपजतच असते. अर्थात हे त्यावेळी समजण्याचे वय नव्हते, हे जरा आताशी कुठे समजायला लागले आहे.
आमच्या बहिणायांकडून इतके जमिनीवर आदळल्यावर पण धीर न सोडतां 'मग परिक्षेच्या वेळी कसे मुकाटयाने येतात गणपतीकडे आमच्या की 'आम्हाला पास कर' म्हणून सांगायला ?' हा दम नसलेल्या आवाजातील आमचा शेवटचा मौखिक वार ! 'हॅं, गणपतीलाच आम्हाला सांगावे लागते, 'तुझ्या आईवडिलांचे ऐक. मग तो न ऐकून सांगेल कोणाला ?' यांवर आमचा सपशेल पराभव ! 'मारे एवढे सांगता तर किती मार्क पडले परिक्षेत ?' आमच्याकडून निष्कारणच मधाच्या पोळ्यावर दगड ! मग काय विचारतां ? एकदोन जणांचा अपवाद वगळता, मार्कांच्या बाबतीत पण गणपती त्यांनाच सामील ?
'अरे, आम्ही आपली बुद्धीची देवता म्हणून तुझी भक्ती करतोय, दहा दहा दिवस दारोदार फिरून तुझी आरती करतोय, मिळणाऱ्या प्रसादाकडे लक्ष न देता ! आणि तू खुशाल त्यांना मार्क जास्त देतोय ! काय म्हणावे तुला ?' आमच्या मनांतील प्रश्न चेहऱ्यावर दिसायला लागतात. आम्हाला या बुद्धीच्या देवतेचीच शंका यायला लागते. हा आमचे ऐकतो की त्याच्या आईबाबांचे ? या याच्याबद्दल इतकं बोलतात, पण हा त्यांना धडा शिकवत नाही.
शेवटी आम्हालाच मग 'तू मला दळण आणायला सांग, मग पहा मी आणतो का ?' असे म्हणायचे तर 'तुला धुणे धुवायच्या वेळेला आडाचे पाणी ओढून देतो का पहा ? तर 'बाजारातून मला भाजी किंवा काही आणायला तर सांग, मग पहा ?' असे सर्व बंधू अस्त्रे उगारून सज्ज झाले अन् या रोजच्या व्यवहाराच्या पातळीवर उतरले की मग स्वर एकदम खाली यायचा या बहिणायांचा ! मग आम्ही ऐटीत तेथून निघायचो, बुद्धीच्या उपासकाला नमवायला निघाल्या होत्या या !
खान्देशात भुलाबायांचा हा उत्सव मुलींसाठी म्हणजे अगदी पर्वणी ! भाद्रपद पौर्णिमेला या भुलाबाया बसल्या की सर्वांच्या घरातील वातावरण कसे सायंकाळी गजबजून जात असे. कारण घरातील, शेजारपाजारच्या छोट्या, किशोरवयीन मुली एकमेकांकडे जाणे ! टिपऱ्या घेवून, एकमेकींना गोळा करत जाणे ! काही वेळा एखादी जवळ टिपरीचा जोड नसायचा, पण तरी ती यायची की गाण्याच्या वेळी टाळ्या वाजवतां येतील, त्यांत काय मोठेसं ! मग कोणाच्यातरी लक्षात आले की हिच्याजवळ टिपऱ्या नाहीत मग शेजारची तिला तिच्या जवळची एक टिपरी देई आणि सर्वांना आपापसांत एकत्रित टिपऱ्या खेळता येई ! किंवा मग तिने अगोदरच तसे सांगीतले तर मग कोणीतरी टिपरीचा दुसरा घरातील जुना पडलेला जोड देई आणि वेळ भागवून नेई. टिपरीचा जोड त्यावेळेस फारतर रूपया-सव्वा रूपयाला मिळे पण तेवढेही पैसे खर्च करून टिपरीचा जोड मुलीसाठी घेऊन देणे काही वेळा कठीण असे. एखादी मुलगी मग बिचारी रडवेली होत हट्ट करायची, 'माझ्याजवळ टिपऱ्या नाही. सर्वांजवळ असतात. मी खेळायला जाणार नाही.' तिची अगतिक माता काय करणार यांवर ? मुली बोलवावयास आल्यावर, तिला नाही म्हणणे जिवावर येई. टिपऱ्यांच्या जोडाअभावी त्या लहान, निरागस, जगातील दु:ख व अडीअडचणींची झळ न पोहोचलेल्या, त्या चिमुरडीला नाराज करणे ! त्या मातेला वाईट वाटे. मग ती म्हणे, 'मुलींनो, तुम्ही आल्या आहे नं, मग आमच्याच कडे करा सुरूवात. मी खाऊ करते तोपर्यंत !' मग ही आईला खाऊ काय हवा हे सांगायला घरात जाई व मुलींचे भुलाबाईचे पहिले गाणे सुरू होई -
भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला
यानंतर मग एका पाठोपाठ गाणी सुरू होत --
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
सासूबाई गेल्या समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला
नंतर
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू
नंतर
आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा
नंतर
अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या
नंतर
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
नंतर
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ताम्हन
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा वामन
नंतर
पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी
अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्याने वेळवीला भात
जेविता कंठ राणा भुलाबाईचा.
रोज सर्वच गाणी म्हटली जात नसत कारण सर्वांची घरे झाली पाहिजेत. गाण्यामधे मात्र काटछाट नाही. सर्व आटोपले की शेवटचे गाणे मला आठवते -
माझे काम संपले आता आणा खाऊ
खारणी का गोडणी, आंबट तिखणी ?
मग खाऊ ओळखणे हे सुरू होई, प्रत्येकालाच आपण आजचा खाऊ ओळखावा असे वाटे. मग कोणी काही सांगे, तर कोणी काही ! काही तर आपल्याला काय खाऊ हवा ते नांव सांगत. ओळखतां आला नाही तर खाऊची वाटी, तरसाळे, डबा मुलींसमोर हलवून दाखवावा लागे मग त्या आवाजाने मुलींकडून पुन्हा वेगवेगळी नांवे पुढे येत पण त्यातूनही ओळखतां आले नाही तर मग 'हिंट' मागीतली जाई - 'खारणी, गोडणी का काय ?' पण हे जिच्या घरचा खाऊ असे तिला अभिमानाचे तर इतर मुलींना कमीपणाचे असे. मग हिंट दिली जाई, ती खाऊच्या चवीप्रमाणे 'गोड म्हणजे गोडणी, तिखट म्हणजे तिखणी वगैरे ' अन् पुन्हा ओळखण्याचे सुरू होई. हा प्रकार जोपर्यंत खाऊ ओळखला जात नाही तोपर्यंत चाले, अन्यथा हार कबूल करावी लागे.
खाऊ ओळखला जावू नये म्हणून मग त्यांवर फडके टाकून हलवले जाई म्हणजे नीट आवाज येत नसे किंवा दोन-तीन चवीचा खाऊ केला जाई म्हणजे नेमके समजायला कठीण ! त्यावेळी आम्हा 'बंधूमंडळींना' तिथं उभं रहाण्यास बंदी असे कारण आम्ही सह्रदयतेने किंवा मुद्दाम खाऊ कोणता ते नांव फोडू, म्हणून काळजी घेतलेली असे. पण कसे कोण जाणे खाऊ ओळखला गेला आणि आम्ही तेथे असलो तर पहिला संशय आमच्यावर म्हणजे सर्व बंधूंवर येई. त्यानंतरचा गोंधळ व रडारड काय विचारतां ? शेवटी उद्या दोन खाऊ आणि भावाला घराबाहेर, या अटींवर तडजोड होई आणि ही बहिणाई दुसऱ्या घरी गाणे म्हणायला जाण्यास सज्ज होई.
एखादीचा भाऊ खूपच लहान असेल तर मग तो दुसऱ्या घरी 'मी येतो' म्हणून मागे लागे. ती मातोश्री काय करणार ? 'याला पण घेऊन जा तुझ्याबरोबर', म्हणून सांगे पण त्या बहीणीला ते कबूल नसे, अपमानास्पद वाटे. 'कोणाचे भाऊ येतात का कोणाबरोबर, हाच का येतो ? बायकांत पुरूष लांबोडा !' बहिणाईची 'बायका व पुरूष' हे शब्द समजत नसतांना तणतण ! मग गल्लीतील एखादी कनवाळू बहिण त्या भाऊरायाच्या पाठीशी येई आणि मग 'चल माझ्याबरोबर ! नीट हळू चल !' असे म्हणत तिच्या जवळच्या टिपऱ्या त्याच्या बहीणीजवळ देई व त्या भाऊरायाला बोट धरून, कडेवर, जशी परिस्थिती असे तशी घेऊन जाई.
रूपया-सव्वा रूपयाचा टिपरीचा नवीन जोड स्वत:च्या मुलीला दरवर्षी घेता येत नसणारे घर आम्ही जसे पाहिले तसेच आपल्या जवळचा जोड त्या रडणाऱ्या मुलीस देवून किंवा आपण सर्व एकाच टिपरीने एकमेकांशी खेळू किंवा टाळ्या वाजवत खेळू म्हणणाऱ्या बहिणी आम्ही येथे पाहिल्या ! सख्खेचुलत याची काही कल्पना नसणारे आम्ही शेजारची पण बहीण आपल्याला खेळायला घेऊन जाते हे पाहिले. कोजागिरीच्या रात्री दूध चंद्रप्रकाशात ठेवून ते प्यायले तर त्याच्यात ही अशी औषधी गुणधर्म उतरतात व मनांवर, शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, हे ऐकले आहे. अलिकडे अशा होणाऱ्या भुलाबाया व कोजागिरी पौर्णिमा बंद झाल्या की काय म्हणून हे सर्व बदलले आहे देव जाणे.

३ सप्टेंबर २०१७

लहानपणचे गणपती आणि रोजची आरती

लहानपणचे गणपती आणि रोजची आरती

गौरी-गणपतीचे दिवस आले की बालगोपाळांची लगबग पहाण्यासारखी असते. त्यांना मोठ्या माणसांची लुडबूड चालत नाही, फक्त काही मदतीसाठी ते त्यांचा 'आर्थिक' हस्तक्षेप खपवून घेतात. गणपतीची मूर्ती आपल्याला आपल्या लहानपणी, मोठ्यातमोठी का आणली पाहिजे हे लहानपणीच समजते, ते जन्मजात ज्ञान मोठेपणी डोक्यातून निघून जाते व आपण मोठी माणसे बनून मुलांना रागविण्यासाठी तयार असतो. गणपतीची मोठी मूर्ती का हवी हे समजण्यासाठी तरी 'लहानपण दे गा देवा' ! मला वाटते आमच्या तुकाराम महाराजांनी 'लहानपण दे गा देवा' हा अभंग लहानपणीच लिहीला असावा, भलेही जरा मोठे झाल्यावर लोकांच्या ऐकण्यात आला असेल.
मूर्ती कुठून आणायची, कोणत्या दुकानांत कोणती मूर्ती चांगली आहे, ती आपल्याला उपलब्ध आहे का इतर कोणी घेतली हे गणपतीच्या सोंडेत दुकानदाराने घालून ठेवलेली चिठ्ठी बघीतली की समजणे वगैरे गोष्टी लहान असल्याशिवाय समजत नाही. जन्मजात असलेले हे ज्ञान हळूहळू जसजसे आपण मोठे होत जातो तसे कमी होत जात असावे. वयोमानाप्रमाणे आपला अनुभव व ज्ञान वाढते असे मोठी माणसं म्हणतात खरं, पण मी याला लहानपणापासूनच सहमत नाही. आता केवळ वयाने मोठे झाल्याने तो विचार बदलणे हे काही मला पटत नाही.
गणपतीसाठी आरास करण्याची तयारी सुरू होते. गणपती डोंगरावर बसवायचा तर मग धान्याचे पोते मातीच्या पाण्यात चांगले थबथबीत भिजवून ते जमिनीत गाडलेल्या लहानमोठ्या काठ्यांवर टाकायचे. आपोआप डोंगर तयार होतो. काही वेळा त्या ओल्या मातीने थबथबलेल्या पोत्याचे वजन सहन न होवून, त्या ओल्या पोत्यास डोंगरासारख्या विविध सुळक्यांचे आकार देणाऱ्या काड्या, धरणीवर लोळण घेतात, मग संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत होतो. पहातापहाता उभा असलेला डोंगर नेस्तनाबूत करण्याचा चमत्कार देव व निसर्गच घडवतो असे नाही, तर लहान मुले पण हे चमत्कार घडवतात. लहान बालकांना देवाचे रूप उगीच नाही म्हणत !
हे कसेबसे डोंगर पक्के बसले की मग त्यांवर 'आळींग' शिंपडावे लागायचे. डोंगर हिरवागार दिसायला हवा ! आळींग लवकर उगवते. पहिल्या दिवशी शिंपडले की तीनचार दिवसांनी डोंगर जरा हिरवा दिसायला लागतो. आळिंगाची रोपे उगवून वर आलेली असतात. जर हिरवागार डोंगर नको असेल व गणपती ढगांत विराजमान हवा असेल तर मग त्या डोंगरावर कापूसच कापूस पुंजक्यांच्या रूपात पसरवून ठेवावा लागतो. पण त्या अगोदर डोंगरात सर्वात मागील भागांत न विसरतां एखादा स्टूल ठेवून गणरायाच्या मूर्ती स्थापनेसाठी जागा तयार करावी लागायची. मात्र खालचा स्टूल दिसायला नको, गणपती डोंगरातच बसलेला दिसायला हवा.
रोज संध्याकाळी गल्लीतील मुले येवून प्रत्येकाचा घरी आरती म्हणणार. त्या अगोदर 'एक दोऽन तीन चाऽऽर, करा बऽसूनी विचार' ही तसेच 'गण्या गण्या गणपती, चाळीस कमळे झळकती', वगैरे गाणे म्हणायची. मात्र विचार बसूनच का करायचा, उभं राहून किंवा पडल्यापडल्या करता येत नाही का ? हा जिज्ञासू विचार त्या वेळी मनाला शिवत नाही. तसेच प्रत्यक्ष गणाधीश असलेल्याला 'गण्या गण्या' या नांवाने हाक मारणे हे उद्धटपणाचे दिसेल, त्यामुळे प्रत्यक्ष विघ्नहर्त्याचा आपण अपमान करू, देवादिकांना भलत्याच नांवाने संबोधणे वगैरे हे आपल्या संस्कृतीला धरून होईल का ? किंवा 'चाळीसच कमळं का झळकती, कमी किंवा जास्त का नाही ? तसेच 'कमळंच का, गुलाब किंवा झेंडू का नाही ? निदानपक्षी चमेली काय हरकत आहे किंवा गेल्याबाजारी मोगरा पण चालला असता, वगैरे शंका कोणाच्याही मनांत येत नाहीत. मनं नि:शंक असतात, अशा प्रत्येक विषयांत शंका उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षाचे मन त्यावेळेस आपल्या लहानपणी तयार झाले नसते, ते मोठेपणी परिपक्व होते व नाही त्या गोष्टीत शंका काढते.
गणपतीची सर्व गाणी म्हणून झाल्यावर मग आरतीची वेळ होते. वेगवेगळ्या आवाजातील, वेगवेगळ्या स्वरांत व विविध तालांत एकाचवेळी आरती म्हणून झाली की ती गणरायाला पावत असावी हा सर्वांचा पक्का समज असावा आणि त्याला गणरायाची पण फूस असावी अशी मला जबरदस्त शंका नव्हे खात्री आहे. 'अरे, नीट म्हणा. एका सुरात व तालात म्हणा. कसे म्हणताय ? टाळ्या कुठं चालल्याय ?' अशा स्वरूपाच्या या त्या घरातील वडिलधाऱ्याच्या सूचनेकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नसायची. आरती होवून प्रसाद घेतला की दुसरीकडच्या आरतीचे वेध लागलेले असायचे. 'अजून गाणी म्हणा. प्रसाद तयार होतोय.' अशी घरातून त्या मातोश्रीची सूचना आली की काही विशेष प्रसाद आहे, ही खूणगाठ बांधली जायची. मग उत्साहात वेगवेगळी गाणी आठवून आठवून म्हटली जायची. डोळा तयार होवून येणाऱ्या प्रसादावर असायचा ! मग प्रसाद यायचा, अपेक्षापूर्ती करणारा ! पण तो 'प्रसादा एवढाच' असायचा. मग तोंडात त्याची चव घोळवत दुसरीकडे आरतीला जायचे.
हे असे नऊ दिवस चालायचे. बदल व्हायचा थोडा तो 'महालक्ष्मींचे दिवशी' ! त्या दिवशी गणपती म्हणजे महालक्ष्म्यांजवळ ठेवला जायचा. तो सोवळ्यातला म्हणजे देव्हाऱ्यातला असायचा ! आमचा बालगोपाळांचा हा ओवळ्यातल्या ! प्रशस्तपणे बैठकीत असायचा, सर्वांच्या गराड्यात ! हे असं सर्वांपासून लांब सोवळ्यात बसणे गणपतीला, त्या गणांच्या नायकाला कसे आवडायचे देव जाणे किंवा तोच जाणे. दोन गणपती असायचे, त्यात काही वावगे नाही असे आजी म्हणायची. एकदा माझ्या मोठ्या काकांना, आम्ही त्यांना अण्णाकाका म्हणायचो, हुक्की आली. 'पोरांनो, दोनदोन गणपती काय मांडताय ? आपला देवातला गणपती असतो. तोच महालक्ष्मी जवळ ठेवायचा. असे म्हणाल्यावर आमच्या सारख्यांनी आजीला पुढे घालून दंगा न केला तरच नवल ! आपल्या ओवळ्यातील गणपतीवरील हक्क सोडायचा आणि त्या सोवळ्यातील गणपतीला आपले म्हणायचे ? 'अब्रह्मण्यम् !' शेवटी आजीच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, 'अरे, त्या पोरांच्या काय नादी लागतो. सणवार, उत्सव पोरांसाठीच असतात, आपल्या मोठ्यांसाठी असतात का ते ? त्यांना मजा वाटते, करू दे !' हा निर्णय आल्यावर अण्णाकाका आम्हाला घेऊन गणपती आणायला बाजारात गेले होते.
नऊ दिवसांच्या या नियमीत होणाऱ्या आरती नंतर, दहाव्या दिवशी आम्हा मुलांचा 'गण्या गण्या गणपती' पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी त्याच्या घरी जायचा आणि आम्ही बालगोपाळ सुन्न मनाने त्या आरतीच्या आठवणी मिरवणूकीत काढत फिरायचो. दुसऱ्या दिवशी शाळेत जायचे ते हरवलेल्या नजरेने आणि विसरलेल्या मनाने !

२७ ऑगस्ट २०१७

गणपती उत्सव

गणपती उत्सव

सुखकर्ता दुखहर्ता गणाधिराज गणेश आता आपल्यात वाजतगाजत यायला, फार तर चारपाच दिवसांचा अवधी आहे. विनायकाच्या आगमनाचे वेध तर आपल्याला फार पूर्वीच लागलेले असतात, निदान राखीपौर्णिमेपासून ! तसे पाहिले तर गणनायकाला आम्ही विसर्जनाचेच दिवशी 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणून आमंत्रण देवून ठेवतो. तो पण बिचारा या प्रेमळ भक्तांचे तीन वर्षे ऐकतो आणि चौथ्या वर्षी आपल्या मूळ पदावर येतो, आधिकमासाचा आधार घेत !
मध्यंतरी आम्ही सर्वजण चेन्नईला गेलो होतो. जवळच कांचिपुरम्, महाबलीपुरम् असल्याने येथे पण गेलो. कांचीपुरम येथे सहकुटुंब गेले तर खिशाला फटका नक्की बसतो, आपले वजन पण कमी होते; याची पुरूषमंडळींनी नोंद घ्यावी. केवळ सरकारचेच बजेट कोलमडते असे नाही तर कोणाचेही बजेट कोलमडवण्यास प्रत्येकाचे गृहस्थाश्रमी पुरुषाचे गृहखाते सज्ज व सक्षम असते. कांचिपुरमच्या साड्या निष्कारणच प्रसिद्ध झाल्यात. आम्ही तर सहकुटुंब व सहपरिवार होतो; त्यामुळे मी एकटा 'मन:शांती प्रकृतीस चांगली असते' या वाक्याचा जप करत कितीही खिसा हलका झाला तरी तिकडे लक्ष देत नव्हतो. सोबत मुलं असली, तर या बाबतीत ती 'मातृसत्ताक पद्धती' मानणारी असतात. तशी एरवी आपल्यासाठी आयुष्यभर 'पत्नीसत्ताक पद्धती' असते, पण ती सर्वदूरच असल्याने, त्याचे कोणाला विशेष वाटत नसावे.
महाबलीपुरम् येथे दगडापासून खूप सुंदर, अगदी छोट्याछोट्या मूर्त्या बनवतात. आपल्या डोळ्यांना आकर्षक वाटतात. मला पुस्तक खरेदी करण्यातलेच काय ते समजते, अशी घरच्यांची भावना आहे. 'एक दुकान चालेल इतकी पुस्तके आहेत, पुस्तक दिसायचाच अवकाश की घेतलेच ' आपले कौतुक करताहेत का टोमणे मारताहेत हे न समजू देता, दोन्ही कार्ये एकाचवेळी कौशल्याने करण्याचे सामर्थ्य विधात्याने स्त्री जातीला देवून पुरुषमंडळींवर घोर अन्याय केला आहे.
महाबलीपुरमला पल्लव राजवंशाचे राज्य होते. सातव्या आठव्या शतकांत बांधलेली ही सुंदर मंदीरे, शिल्पे बघीतली, तर आपल्याला आपल्या सांस्कृतिक समृद्धतेची कल्पना येते. भारतातील प्रत्येक भागाचे, राज्याचे आपले स्वतंत्र वैशिष्टय आहे. तामिळनाडू तसाच ! भारतातील दक्षिणभागातील तामिळनाडू राज्यातील, बंगालच्या उपसागरादरम्यान हा सुंदर समुद्रकिनारा ! येथील विविध मंदीरे, शिल्पे पहाण्यासारखीच ! स्वाभाविकच दगडातील काम करणारे शिल्पकार, लाकडातील काम करणारे काष्ठकार, धातूंचे ओतीवकाम करणारे कलाकार तेथे खूप आहेत.
राज्यांत शांतता असली की उद्योगधंदे व्यवस्थित चालतात व जनतेत समृद्धी येते, जनतेत समद्धी आली की कलेला आश्रय मिळतो व कलाकार सुखी होतात. जनता व कलाकार सुखी झाले की तेथील संस्कृतीचा उत्कर्ष होतो, तिचा उत्कर्ष झाला की संस्कृतीबद्दल चार परक्या ठिकाणी चर्चा होते. आपल्याकडे लक्ष वेधले जाते. आपल्याजवळ असलेली संपन्नता प्रत्येक परकीयांस मिळावी असे वाटू लागते. परचक्र येते. राजा, राज्यकर्ते व प्रजा खंबीर, सूज्ञ, देशहिताचा विचार करणारी व सक्षम असेल तर हे परचक्र दूर सारता येते, अन्यथा ---- आपण अनुभव घेतलाय !
महाबलीपुरम् म्हणजे ममल्लापुरम येथे या सांस्कृतिक समृद्धीच्या खुणा आपल्याला आज पण जाणवतात. तेथील तीनचार मंदीरे आईने बघीतली, बाकी मुले व आम्हीच होतो. आईला जास्त चालता येत नसल्याने गाडीत बसून रहावे लागे.
महाबलीपुरमला बघत होतो तेथे एक माणूस हातात एकाबाजूने पारदर्शक असलेले लांब पट्टीसारखे छोटे खोके दाखवत होता. मूर्तीविक्रेता होता तो ! तेथे तयार होणाऱ्या छोट्याछोट्या मूर्त्या छोटा एकाबाजूने पारदर्शक खोक्यातून विकत होता. गणेशमूर्ती, विनाऽयका ! दशावतार ! लक्ष्मी ! स्टोन स्टॅच्यू ! वेरी ब्युटीफूल, वेरी चीप !' मी बघीतले, तर छोट्या पारदर्शक खोक्यात गणपतीच्या, देवीच्या, दशावतार वगैरे देवतांच्या मूर्ती होत्या. मी बघतोय म्हटल्यावर त्याची रसवंती वहायला लागली. मधूनच हिंदी, इंग्रजी, तामिळ वगैरे शब्द ! हिंदी व इंग्रजी समजत होते. इतर शब्द नाही समजले तरी भाव समजला होता की 'या छोट्या मूर्त्या खूप छान आहे. खास दगडाच्या आहेत. इथलं हे वैशिष्टय आहे. या माझ्याजवळ असलेल्या सर्वप्रकारच्या मी अगदी स्वस्तात देतो आहे. इतके स्वस्त कुठे मिळणार नाही.' मी दोन खोके घेतले. थोडा पुढे आलो तर दुसऱ्याने आम्हाला म्हणजे मला गाठले. त्याच्या गयावया पाहून मी त्याच्याकडूनही एक खोका घेतला, निम्म्या किंमतीत ! माझ्या व्यवहारज्ञानाची पावती वेळीअवेळी परक्या ठिकाणी पण मिळाली. 'नाही ते भरमसाठ घेतात. काय करणार आहेत, इतक्या मूर्त्या ?' हा टोमणा कोणी मारला असेल हे अनुभवी व्यक्तींना सांगायलाच नको. 'अग, मूर्ती सुंदरच आहेत. तुला वस्तू वाटण्याची हौस आहे ना ? औरंगाबादला गेल्यावर दे एकेकाला.' हे सौभाग्यवतींना ऐकवल्यानंतर तिने पण संभाषण पुढे वाढले नाही. त्यांचे काय करायचे हे तिनं ठरवले असणार काय ठरवलेच होते. येथे आल्यावर ते जाणवले.
काल गणपती उत्सवाची लक्षणे जाणवायला लागली, अन् एवढे सर्व आठवलं !

२० ऑगस्ट २०१७

शहरातील आणि गावातील आमंत्रण

शहरातील आणि गावातील आमंत्रण 

हा नुकताच तालुक्याच्या गांवातून म्हणजे खेडेवजा गांवातून, जिल्ह्याच्या गांवाला कॉलेजात शिकायला गेलेला ! या नविनच कॉलेजला गेलेल्या कॉलेजकुमारला व्यवहारांत काय समजते ? गांव सोडून, घर सोडून एकटे शिकण्यासाठी रहावे लागत असल्याने उगीचच त्याला आपण मोठे झालेलो आहे, असे त्याला वाटते; पण इतर मोठी माणसे त्याला लहानच समजत असतात, कारण एरवी त्यांच्यादृष्टीने तो लहानच !
मग चुकूनमाकून त्याला गांवातील ओळखीपाळखीचा, नात्यागोत्याचा तेथे कोणीतरी, केव्हातरी त्याला भेटला की या कॉलेजकुमारला बोलावतात, अगदी लाजेकाजेस्तव का होईना ! अर्थात अलिकडे ते पण प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेय ! जो तो आपापल्या कामात असतो.
मग आता त्याला नुसतंच कसं काय बोलावणार, म्हणावं लागते मग 'या रविवारी जेवायलाच ये' ! ते जरा बरं, भारदस्त व संस्कृती पाळल्यासारखं दिसतं ! बोलावल्यावर नाही कसं म्हणणार ? गांवातले संस्कार, सरळपणाचे किंबहुना भोळेपणाचे ! हा भोळा कॉलेजकुमार बिचारा रविवारी जातो, जेवायच्या वेळेला ! गप्पा मारूनमारून किती मारणार ? त्यांना पण भूकेची जाणीव व्हायला लागलेली असते. 'बरं, आता आला आहेस जेवायच्या वेळेला, तर जेवूनच जा !' जेवायला बोलावणाऱ्याचे उद्गार ! पोटात कावळे कोकलत असल्याने या वाक्याचा अर्थच समजत नाही. थोड्यावेळाने जेवण होते. हा घरी परत येतो.
गांववाल्यांस जिल्ह्याचे ठिकाणी शिकायला गेल्यावर तेथे कोणी जेवायला बोलावले तर खरंच जायचे नसते.

१७ ऑगस्ट २०१७