Thursday, December 31, 2015

नवीन वर्षाच्या निमित्ताने संकल्प - सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ

आज 'ग्रेगोरिअन कॅलेंडर'प्रमाणे वर्षाचा शेवटचा दिवस ! लहानपणापासून ३१ डिसेंबर म्हणजे वर्ष संपले आणि १ जानेवारी म्हणजे नवीन वर्ष लागले ही आपल्या मनातील आंतरिक भावना असते. जसजसे 'वर्ष'म्हणजे काय, शास्त्रीय वर्ष कोणते वगैरेअलिकडे समजू लागले तसे, ३१ डिसेंबरचा उत्साह कमीकमी होत गेला, मात्र तो आजही पूर्ण गेलेला आहे असे म्हणता येत नाही. आज, आता जे काही लिहावेसे वाटले त्याचा उद्देश हा नाही. 

३१ डिसेंबर आला म्हणजे आपण काय ठरविले होते यापेक्षा आपण काय केले नाही हे जास्त आठवते आणि मग पुढील वर्षापासून म्हणजे १ जानेवारी पासून ते करण्याचा आपण संकल्प सोडतो. तो संकल्प कितपत पूर्ण होतो हे आपणांस या वर्षाच्या शेवटी पुन्हा समजतेच, मग पुन्हा संकल्प आणि पुन्हा ३१ डिसेंबर ! हे चक्र अगदी जगत्गुरू शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी, जठरे शयनं ! भज गोविन्दम भज गोविन्दम भज गोविन्दम मूढमते !!' जरी नसले तरी मला यामधील एक साधर्म्य जाणवले आहे त्यासाठी आज लिहायला आवर्जून बसत आहे. 

माणसाच्या अंगी त्याच्या निर्मितीच्या वेळी खरच कोणते गुणावगुण होते हा संशोधनाचा विषय आहे, अजूनही त्याबाबत नक्की सांगता येत नाही. काहीना अवगुण पूर्वीपासूनच होते असे वाटते तर काहींना गुण होते हे वाटते तर काही मध्यममार्गी म्हणजे गुणावगुण दोन्ही होते असे मानणारे आहेत. पण आपण प्रत्येक वेळी आपली कृती, संकल्प आणि विचार बघितले तर आपण नेहमीच काहीतरी चांगलेच करण्याचा संकल्प करतो, तो कितपत सिद्धीस जातो हा भाग वेगळा ! मात्र संकल्प हा नेहमी चांगलेच करण्याचा असतो असे अनुभवावरून तरी दिसते, आपल्यापैकी असे कोणीही ठरविल्याचे ऐकिवात देखील नाही, की एखाद्याने वर्षभर फक्त 'चौर्यकर्म' करायचे ठरविले, एखादीने आपल्या सुनेशी 'वर्षभर भांडायचे' ठरविले, विद्यार्थ्याने 'काही झाले तरी मी वर्षभर अभ्यास न करता या वर्षी नापासच होऊन दाखवतो' असा निश्चय केला असे काही दिसत नाही; जरी प्रत्यक्षात कृती तसली असली तरी ! त्या कृतीला मग त्या व्यक्तीचा स्वभावधर्म म्हणता येईल मात्र संकल्प म्हणता येणार नाही. थोडक्यांत ही आपली छोटीशी कृती देखील 'माणूस हा मुळांत चांगलाच विचार करणारा आहे' याला पुष्टी देतो. हीच आपणा सर्वांसाठी अजूनही समाधानाची गोष्ट आहे. हे विचार जर आपण सर्वांनी खरोखरच मनापासून पुढे नेण्याचे ठरविले तर बरेचसे चांगलेच होवू शकेल, अशी आशा करायला काहींच हरकत नाही.    

तेंव्हा कोणतेही का होईना पण नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी संकल्प करावा, सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहे, फक्त आपली प्रामाणिक, मनापासून इच्छा दिसली पाहिजे आणि त्याला कृतीची जोड मिळाली पाहिजे. 

माझ्यापुरता बोलायचे झाले तर ------ मी आता अवांतर गप्पांसाठी येथे जात असलेला वेळ हा आपल्या जवळील कायद्याचे ज्ञान (जेवढे काही थोडेफार आहे त्यातील) आपणा सर्वांसाठी, माझ्या विचाराने आणि सोयीप्रमाणे, उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे, माझे नियमित कामकाज करत असतांना ज्या गोष्टी लक्षात येतांत त्यांचेही यानिमित्ताने टिपण केले जाईल. हे सर्व विषय स्वतंत्रपणे आणि वेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. यातील विषय बहुतांशपणे इंग्रजीत मांडणार आहे. या विषयांच्या प्राथमिकतेचे, प्राधान्याचे स्वरूप हे माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरून ठरविणार आहे. येथे जरी सार्वजनिक महत्वाचे विषय घेणार असलो, तरी वैयक्तिकपणे येत असलेल्या अडीअडचणींचा विचार अवश्य होईल, तो सार्वजनिकदृष्ट्या महत्वाचा असेल तर नक्कीच ! आणि जरी वैयक्तिक असला तरी वैयक्तिकपणे विचार करण्यास कोणतीच अडचण नाही. यासाठी आपणा सर्वांचे नेहमीप्रमाणे सहकार्य अपेक्षित आहेच.