Tuesday, May 26, 2015

- आणि तिला संस्कृतने वाचविले !


मित्रांनो, amarujala.com यांत मी एक संस्कृतसंबंधाने बातमी या goo.gl/J2eHSH लिंकवर वाचली. बऱ्याच जणांना यांत अतिशय गंमत वाटली, काहीना हेवा वाटला, काहीना संस्कृत शिकून मुर्खासारखे काय करणार आहे? ती कालबाह्य भाषा आहे; असेही वाटले, काहींना हा 'ब्राह्मणी कावा' वाटला कारण आपल्या 'जातीयवादी मूर्ख लोकांनी सर्व बाबी या जातीजातीत वाटून घेतल्या आहेत; अगदी देवदेवता, महापुरुष सुध्दा ! त्यांच्या मूर्खपणापुढे मती गुंग होते आणि समाजविघातक असलेल्या 'अशा बुद्धीवंतांचे' वाईट वाटते. मित्रांनो, आपली संस्कृती कधीही विचारविन्मुख करणारी नव्हती तर ती नेहमीच विचार प्रवर्तक, नवनवीन विचार देणारी राहिलेली आहे. भारताने या जगतास हे न परतफेड करण्याजोगे उपकार केलेले आहे; जगातून दूर-दूरहून पायपीट करून येथील विद्यापीठात शिक्षण घ्यावयास विद्यार्थी येत असत; शिक्षण घेवून आपल्या देशांत या भारतभूमीच्या ज्ञानसंपन्नतेचे नांव घेवून जात असत, 'भारताच्या ज्ञानसंपन्नतेची ही पताका त्यांच्याही देशांत फडकावीत असत. हे आपणांस अभिमानाचे होते आणि आजही आहे. मात्र नंतर 'ज्ञानशत्रू', असलेल्या असंस्कृत, दुष्ट, क्रूर आणि या संपूर्ण जगताचे ज्ञानशत्रू लुटारूंनी आपल्या भारतभूमीवर आक्रमण केले आणि संपत्ती लुटीसोबतच, अंगावर आजही काटा आणणाऱ्या कृत्यांबरोबरच त्यांनी आमच्या ज्ञानसंपादनाची ही केंद्रे त्यांनी भुईसपाट करून फक्त आमचेच नाही तर संपूर्ण जगताचेच कायमचे नुकसान केलेले आहे. ज्ञानसंपादनास विरोध करणारे हे संपूर्ण जगताचेच शत्रू आहेत आणि अशा प्रवृत्तीच्या कोणासही, 'तो कोण आहे' याचा कसलाही विचार न करता, आपण सर्व समाजाने त्याचा कठोरपणे विरोध करून त्याची अशा तऱ्हेची कृत्ये हाणून पाडली पाहिजेत. तो कितीही सबळ असला आणि त्याला कोणाचाही पाठींबा असला तरी आपणा सर्वांना एकत्रितपणे पाउल उचलल्यास काहींही अशक्य नाही. असो.

कर्नाटकांत शिमोगा शहरापासून जवळपास १० किलोमीटर दूर, तुंग नदीच्या किनारी असलेल्या मुत्तुर या गांवी सर्व गांववासी हे अगदी आपसांत देखील संस्कृत भाषाच पूर्वापारपासून बोलत आलेले आहे. यावरून मला एक अतिशय गमतीदार घटनेची आठवण झाली. 

माझी एक नातेवाईक-मुलगी कॉलेजला जाणारी होती, आता ती अर्थशास्त्रात 'Ph. D.' मिळवती झालेली आहे, मात्र तिच्या महाविद्यालयीन काळातील ही घटना असावी. ती कलाशाखेची - अर्थशास्त्र हा विषय घेतलेला ! संस्कृत हा तिचा आवडता विषय पण, ही आवड तिला तिच्या आईकडून मिळाली, ती संस्कृतची जाणकार, पदवी-द्विपदवीधर ! या मुलीला शालेय अभ्यासक्रमांत जेवढे संस्कृत शिकावयास मिळाले असेल तेवढेच ! ती स्वस्थ बसली नाही, 'संस्कृत भारती'च्या माध्यमातून तिने संस्कृतची इतकी उत्तम तयारी केली की ती संस्कृत सहजपणे, ओघवते आणि संभाषणात बोलू लागली, कोणासही समजण्यासारखे बोलू लागली, तिची ही प्रगती पाहून विविध ठिकाणी 'संस्कृत वर्ग' घेण्याची जबाबदारी 'संस्कृतभारती'ने तिचेवर वेळोवेळी सोपविली, तिने ती समर्थपणे पार पाडली आणि आजही यथाशक्ती पार पाडत आहे. आपणा सर्वांना अभिमानाचा विषय आहे. पण येथे आज हा विषय नाही, एकदा मी तिच्याकडे गेलो होतो, ती घरी नव्हती, थोड्या वेळांत बाहेरून आली आणि एकदम हसू लागली. 'काय झाले ?' मी विचारणा केली, 'गम्मत झाली' असे म्हणत पुंन्हा हसू लागली, तिला बोलता येईना. थोड्यावेळाने जरा सावरल्यावर तिने सांगितले. 

ती कॉलेजला जातांना दुचाकी चालवण्याचा परवाना घाईघाईने घरीच विसरून गेली होती. घाई असल्यावर नेहमी कोणत्याही कारणाने जसा उशीर होतो, त्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम रस्त्याने जातांना रस्त्यावर वाहतूकनियंत्रकाने तिला थांबविले, दुचाकी चालविण्याचा परवाना मागितला; तो घरी असल्याने दाखविता येत नव्हता, येणार नव्हता, हे तिला माहीत होते. महाविद्यालयातील मुलगी, तिला एक कल्पना सुचली, सर्व संभाषण संस्कृतमधून करायचे ठरवले, मराठी अजिबात समजत नाही असे धोरण स्विकारले, तिने त्या वाहतूक-नियंत्रकाला संस्कृतमध्ये 'काय म्हणतोस ?' म्हणून विचारले, त्याला समजेना, 'काय म्हणाली' ही पोरगी ? तो बुचकळ्यात पडला, उत्तर दिल्याचा आवाज तर आला पण त्याला काहीच समजले नाही. 'हे पहा पोरी,जास्त गडबड नाही, 'लायसन' दाखव, नाहीतर पावती फाडावी लागेल.' तिने 'तुम्ही काय म्हणत आहे, हे मला समजत नाही, मला समजेल अशा भाषेत बोला' असे संस्कृतमध्ये सांगितले. त्याला काहीच समजले नाही. 'ए पोरी, मला वाटेल ते बोलू नको, चांगल्या-चांगल्यांना सरळ केले आहे. मुकाट्याने 'लायसन' दाखव नाहीतर पैसे भर.' मात्र संभाषण अर्थात एकतर्फी संभाषण हे शांतपणे आणि एकाबाजूने संस्कृतमध्ये आणि दुसऱ्या बाजूने मराठीत होत असल्याने 'आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी' अशी परिस्थिती होती. तिला त्याचे सर्व समजत होते, त्याची मात्र हिच्या उत्तरावर 'फक्त एक आवाज' यापेक्षा जास्त प्रगती नव्हती. असा चमत्कारिक आणि विचित्र अनुभव त्याला त्याच्या आयुष्यांत पहिल्यांदाच येत असावा. कोणाचीही गाडी थांबविल्यावर, कागदपत्रांची मागणी केल्यावर थोड्याच वेळात कागदपत्र दाखविले जायचे आणि ते बरोबर कसे नाहीत, त्यामुळे नियमभंग कसा झालेला आहे, आपणास नियमभंग कसा अजिबात सहन होत नाही, आपणांस नियमाप्रमाणे कसे काम करावे लागते वगैरे सर्व ऐकविल्यावर थोड्यावेळाने समोरच्या समोरच्याच्या खिशातून पैसे बाहेर यायचे नाहीतर तो मोबाईलवरून कोणाला तरी फोन करायचा आणि मग सर्व कागदपत्र बरोबर असल्याचा साक्षात्कार त्याला व्हावयाचा. त्यानंतर 'हे अगोदर का नाही सांगितले?' अशा भरतवाक्याने त्याची सांगता व्हायची. 

येथे आता फारच विचित्र परिस्थिती झालेली होती कारण या दोन्हीपैकी काहीही होत नव्हते, तर काय होत आहे हेच त्याला समजत नव्हते. गर्दी जमायला लागली होती, अर्थात ती आपल्याकडे सर्वात लवकर जमते. त्याच्या बोलण्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही हे पाहिल्यावर, गर्दीतील जनता हसू लागली कारण असे नाटक अथवा अशा 'संस्कृत-मराठी' नाटकाचा हा  अभिनव प्रयोग ज्यातील संभाषण त्या नाटकांतील पात्रांनाच एकमेकांना समजत नाही' हे ते देखील प्रथमच पहात असावे. अर्थात त्यांनाही समजत होते अशातील भाग नाही मात्र हा वाहतूक-नियंत्रक चमत्कारिक पध्दतीने आणि विचित्ररितीने अडचणीत आला आहे, यातच ते सर्व खुषीत होते. तिने एक काळजी मात्र घेतली होती, तिचा स्वर अत्यंत नम्र होता, वडिलधाऱ्या माणसाशी बोलावे असाच होता, पण संभाषण संस्कृतमध्येच, की ज्याचा त्या वाहतूक-नियंत्रकाचा संताप वाढविण्यापेक्षा, हतबलता वाढविण्यापलिकडे दुसरा कोणताही उपयोग नव्हता. यामुळे हळूहळू त्याचा आवाज अजून वाढू लागला, जसा आवाज वाढू लागला तशी गर्दी अजून वाढू लागली, जशी गर्दी अजून वाढू लागली तशी इतरत्र जे निवांतपणे गम्मत पाहत होते त्यांनाही 'हे केंव्हाचे काय सुरु आहे ? एका मुलीशी हा ' Traffic Police' केंव्हाचा काय डोके लावून राहिला आहे ? याचा खुलासा व्हावा म्हणून ते देखील तेथे जमले, गर्दी अजून वाढली कमी होण्याचे नांव नाही. 

गर्दीतील जनता आता गमतीने संभाषणात भाग घेवू लागली, म्हणजे 'वाहतूक-नियंत्रक' आणि 'जनता' असे संभाषण सुरु झाले; कारण सुरुवातीला तिच्याशी त्यांनीही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्यावेळी संस्कृतशिवाय कोणतीही भाषा येत नसल्याने, तिचे आणि जनतेचेही संभाषण फार काळ चालू शकले नाही. गर्दीतील जनतेचीही परिस्थिती ही बरीचशी त्या 'वाहतूक-नियंत्रकासारखी' झाली मग त्यांना त्याची अडचण लक्षात आली. 'अहो, काय झाले ?' लोकांनी विचारले, 'पोरगी लायसन दाखवत नाही, अहो आमची काय ड्यूटी-बिटी आहे की नाही ? च्या मारी, तिला काहीबी विचारा, ती काय बोलते ते समजत नाही. बर, पोरगी गरिबावानी बोलते आहे तर आपण केस कशी काय करा ? पोरगी चांगल्या घरची वाटते, तिला त्रास देण्यात आपल्याला काय मजा वाटते काय ? पण हे निष्कारण त्रांगडे झाले, मी काय बोलतो ते तिला समजत नाही अन ती काय बोलते ते मला समजत नाही. साल्या, या भारतामध्ये किती भाषा आहेत कोणांस ठाऊक ? कोन कोणत्या भाषेत बोलेल याचा नेम नाही आणि आम्हाला अशा लोकांशी बोलत ड्युटी करावी लागतेय. दिवस कठीण आलेय. ' वगैरे वगैरे ---

शेवटी काहींच्या लक्षांत आले, ती संस्कृतमध्ये बोलत आहे. मग त्यांनी वाहतूक-नियंत्रकास 'पोरगी संस्कृतमध्ये बोलत आहे.' हे सांगितले. त्यावर त्याचा स्वर थोडा बदलला, 'पोरी, तू शिकलेली दिसते, चांगल्या घरची आहे. तुझ्याजवळ लायसन नाही हे मला माहीत आहे, पोरी, आमचे हे केस विनाकारण पांढरे झालेले नाहीत. पण तू देवाची भाषा बोलते आहे, अगदी मराठीसारखी बोलते आहे, मला कौतुक आहे. आम्ही आमची मराठीपण नीट बोलू शकत नाही आणि तू देवाची भाषा बोलते ! आम्हाला मात्र साहेबांची भाषा हवी आणि तू आपल्या मराठीच्या मायची, तिच्या आजीची भाषा बोलते, शाब्बास ! मी का तुह्यावर केस करणार होतो ? पण पोरी लक्षात ठेव, सर्व दिवस सारखे नसतात, प्रत्येक वेळी माझ्यासारखेच भेटतील असे नाही, तू निष्कारण अडचणीत येशील. येथे गरिबाला मदत करण्यांस कोणी तयार होत नाही, त्याला अडचणीत आणतात. आता जा, यापुढे मात्र गाडी चालवितांना लायसन ठेवत जा, ते दुसऱ्याबी कामांत येते. घाई हलगर्जीपणा कामाचा नाही. जा निवांतपणे कामाला जा !'       

Saturday, May 23, 2015

केवढे हे क्रौर्य


आता मी नुकतेच  'Shri. Uday Joshi' यांचे विचार पाहिलेत. मला लहानपणी शिकवण्यात आलेली 'रे. ना. वा. टिळक' यांची 'केवढे हे क्रौर्य' ही कविता आठवली. बहुतेक ही शालेय अभ्यासक्रमात नव्हती; तर ती अशीच माझ्या कै. कुसुमकाकू कडून शिकण्यात आली, ती नेहमी ही कविता गुणगुणायची ! तिला सर्व जण वहिनी म्हणावयाचे - अगदी तिच्या मुलांसहीत, म्हणजे माझ्या भाऊ-बहिणींसहीत आणि नुकतेच बोलता येणाऱ्या चिमुरड्यापासून ते काठी टेकत-टेकत तोंडात दांत नसल्याने बोलता येत नाही अशा म्हातारी मंडळी पर्यंत !

मला अवांतर वाचनाची अतिशय हौस, त्यामुळे मी शाळेचा अभ्यास अजिबात करीत नाही, दिवसभर 'लायब्ररीत' असतो अशी माझ्या सौ. आईची धारणा असायची, ती त्यावरून रागवायची, 'अभ्यास कर' म्हणायची; 'हे सोबत येणार नाही' हे कळकळीने सांगायची. मला हे अजिबात पटत नसे. मी साधारणतः परीक्षा जवळ आली की अभ्यास करावयाचा असतो, या पारंपारिक मताचा होतो. माझी ही सवय आणि दृष्टीकोन महाविद्यालयात देखील फारसा बदलला नाही; कारण पाठोपाठ येणाऱ्या 'वादविवाद स्पर्धा', 'वक्तृत्व स्पर्धा' 'कथाकथन स्पर्धा' इत्यादि मला नेहमी मोह घालत असावयाच्या, तो मला शेवटपर्यंत आवरता आला नाही. त्याने माझा फायदा झाला का तोटा झाला, हे मला अद्यापही इतके वर्षांत समजले नाही आणि आता मी त्याचा नाद सोडून दिलेला आहे. (कदाचित त्याचा निष्कर्ष हा तिच्या मतानुसार येवू शकतो, असेही असेल, असे मला अलीकडे वाटू लागले आहे. असो !) असे असले तरी अवांतर वाचनाने अभ्यासावर परिणाम होतो ही तिची ही समजूत चुकीची असल्याचे मी वारंवार वार्षिक परीक्षेत सिध्द करायचो, तरी देखील तिचा माझ्या बाबतचा हा समज गेलेला आहे असे तिने कधीही म्हटले नाही; त्यावेळी मला राग यायचा, आता येत नाही.

आता माझी मुलगी अवांतर वाचन खूप करत असते, मी तिला 'रिकाम्या गोष्टी वाचू नको, वेळ वाया घालवू नको, हे तुझ्या अजिबात कामास येणार नाही.'  हे वारंवार बजावून समजुतीने सांगत असतो (याला ती 'बाबा, माझ्याशी नेहमी दरडावून बोलतात' असे म्हणते. ) ती अजिबात अभ्यास करत नाही म्हणून भरपूर बोलत असतो आणि ती बहुतांश वेळा माझे बोलणे विनाकारण असते, हे परीक्षेत बऱ्यापैकी गुण मिळवून सिध्द करून देत असते, तरीदेखील माझा 'अवांतर वाचनाने शालेय / महाविद्यालयीन अभ्यास होत नाही' हा नवीन समाज दृढ झालेला आहे. असो.  

या सर्व निमित्ताने मला ती कविता आठवली, ती मुद्दामहून आपणा सर्वांसाठी देत आहे. पृथ्वी आणि वसंततिलका या वृत्तात ही कविता आहे. (अलीकडे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सोपा झाला आहे का अभ्यासक्रमच राहिलेला नाही अशी शंका त्यांची पुस्तके पाहून येते. 'कालाय तस्मै नमः' )

केवढे हे क्रौर्य

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

- रे. ना.वा.टिळक 

Friday, May 22, 2015

फक्त छोटी गोष्ट लक्षात ठेवा

या अगोदरच्या सरकारांनी समाजासाठी खूपच भरभरून कार्य करून आपणांस भरपूर प्रगतीने कृतकृत्य केलेले आहे, असा साधारतः सध्याच्या काही लोकांचा रोख आहे, त्यामुळे मनस्थिती निष्कारण द्विधा होत असते. हे एक उत्तम आहे की 'भारताच्या प्रत्येक नागरिकांस आपल्या राज्यघटनेने आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे', त्याचा ते वापर करीत आहे. यांत कोणासही काहीही वावगे वाटण्याचे कारण नाही. त्यांनी आपले मत व्यक्त केले, तो त्यांचा अधिकार होता आणि आहे. ते त्यांचे मत खरेच आहे, असे मानण्याचे अजिबात कारण नाही; कारण आपले मत व्यक्त करतांना ते खरेच असले पाहिजे असे त्यांचेवर बंधन 'निदान राज्य घटनेचे नाही', हं, कदाचित हा राज्यघटनेतील कर्तव्याचा भाग येईल, अथवा होवू शकतो. मात्र नागरिकाने अथवा सरकारने कर्तव्य पाळण्याचे कायद्याने बंधन नाही, तसा प्रयत्न केल्याचे दाखविले किंवा प्रयत्न करत आहोत अशी दिशाभूल केली तरी चालू शकते, आजपावेतो यापेक्षा काही वेगळे झाले आहे का ? थोडक्यात आपण आपल्या कर्तव्याबाबत आपण कितीही स्खलनशील असले तरी चालू शकते, अगदी 'राज्यघटनेला' देखील चालू शकते, मात्र हक्कांबाबत आपण अतिशय जागरूकतेने रहावयास हवे आणि बघा आपल्या घटनेची देखील हीच अपेक्षा दिसते; कारण आजपावेतो तर असाच अर्थ काढला गेलेला दिसतो, त्यात आज पावेतो कोणासही काहीही वावगे वाटलेले दिसत नाही, आपणांस तेच अभिप्रेत दिसते. यांत अडचणीचे, नुकसान होईल असे अजिबात नाही तर हा दोन्ही बाजूने अतिशय फायद्याचा व्यवहार आहे.

आता एवढा गदारोळ सुरु झाला आहे तर आपणा कोणांस अशी तर शंका आली नाही ना, की सध्याचे सरकार 'कर्तव्ये पाळणे बंधनकारक आणि हक्क मात्र पर्यायी' असे काही चमत्कारिक करेल आणि ते निष्कारण आपल्याला अडचणीचे ठरून बसेल, हं तसे असेल अथवा तशी आपणांस शंका जरी येत असेल तर 'विषाची परीक्षा अजिबात पाहू नये' हे आपले धोरण अतिशय बरोबर, सूज्ञपणाचे आणि आपल्या पूर्वीच्या धोरणाशी सुसंगत असेच आहे, कारण 'हक्कांबाबतचे रक्षण करून ते निरंतर, आयुष्यभर उपभोगत राहणे आणि त्यासोबतच आपल्या कर्तव्यांकडे निरंतर काणाडोळा करणे, आयुष्यभर टाळाटाळ करत राहणे आणि तसेच इतरांनाही करणेस भाग पाडणे, त्यावर वादविवाद, शब्दच्छल करीत राहणे' हेच आपले धोरण असल्यास त्यांत काही बाधा येणार आहे का, अथवा तशी आपणांस शंका  येत आहे का ? हं, तसे असेल तर मग, आपले आकांडतांडव कदाचित बरोबर असू शकेल, पण काळजी करण्यासारखे तरीही नाही, कारण 'राज्य घटनेची चौकट बदलेल' असे कोणतेही कायदे, नियम कोणीही केले तर ते 'राज्यघटनेची चौकट' बदलवून टाकत आहे या कारणाने आपली न्यायालये ते 'घटनाबाह्य' आहेत असे ठरवू शकतात आणि तसे ठरवून मागण्यासाठी आपणास 'न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा घटनादत्त अधिकार आहे, तो कोणासही काढून घेत येत नाही' यांतही काही गोंधळ होईल अशीतर आपणांस शंका आलेली नाही ना ?

असे तर झाले नाही की आपल्या पूर्वीच्या सरकारने भरभक्कमपणे केलेल्या प्रगतीची सध्याचे सरकार धूळधाण करून टाकेल, अशी आपणांस धास्ती आहे, पण मला वाटत नाही की सध्याचे सरकार इतके कार्यक्षम असेल ! साधी गोष्ट आहे का साधारणतः ६५ वर्षे सतत करत आणलेल्या प्रगतीची (?) विल्हेवाट हे फक्त ५ वर्षांत लावतील ! काय बोलताय, इतकी या सरकारची कार्यक्षमता आहे अशी आपणांस खात्री आहे ? असे असेल, तर मग गेल्या ६५ वर्षांची केलेली प्रगती तशीच कायम राहावी, त्यात अजून भर पडावी असे वाटत असेल तर मग हे सरकार आपणास 'घटनादत्त मार्गाने' घालवावे लागेल, दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. हे शक्य नसेल तर आणि त्यासाठी आपली अडाणी जनता आपल्या सोबत नसेल तर, आपण कितीही खोटे-नाटे बोललो तरी ती जनता त्याला दाद देणार नसेल तर ? मोठी समस्या आहे, आपल्यासारख्या 'नीतिमत्तेच्या रक्षकांवर' अशी वेळ यावी, दैवदुर्विलास !

पहा छोटा मार्ग मला सुचला - 'एक तर पांच वर्षे शांततेने न बोलता येथेच थांबा, त्यांना जागे करू नका, म्हणजे ते जास्त आणि भरपूर चुका करतील; मग त्याचा वचपा त्यानंतर येणाऱ्या 'निवडणुकांत' घ्या आणि त्यांचे सरकार पाडा, तुम्ही निवडून या. काय म्हणता, 'निवडणुकाच झाल्या नाही तर ?' तुमची शंका रास्त आहे, अगोदरचा अनुभव आहे - बरोबर 'खाई त्याला खवखवे', '----------च्या मनांत चांदणे', नाही त्यावेळी नाही त्या म्हणी आठवतात. काय म्हणतां - 'तेवढे देखील थांबणे शक्य नाही मग त्वरित देश सोडून दुसऱ्या देशांत निघून जा, खूप देश तुमचे स्वागत करावयास तयार आहेत, अगदी लांबच्या देशांत देखील जाण्याची आवश्यकता नाही, जवळचे देश तुमची वाटच पाहत आहे, तेथे जा, त्यांची मदत घ्या, ते उत्साहाने करतील.  मग त्यासाठी तुम्हाला कदाचित त्यांची विचारसरणी स्विकारावी लागेल; ती काही फार मोठी गोष्ट असल्याचे तुम्हास जाणवणार नाही; उलट तुमच्या येथील विचारसरणीत आणि त्यांच्या तेथील विचारसरणीत तुम्हांस कमालीचे साम्य जाणवेल. तुम्ही मनोमन म्हणाल 'आपण तेथे राहून यापेक्षा काय वेगळे करत होतो ?' बस, त्यांच्या मार्फत येथे परत यायचे, ते सांगतील तसे त्यासाठी कार्य करायचे. तुम्ही येथे राहून जे करतांत तेच करायचे, कार्यात काहीही फरक नाही' आपणांस आपल्या कार्यासाठी 'शुभेच्छा' !

-------------- फक्त छोटी गोष्ट लक्षात ठेवा, 'या जनतेने बाहेरून येणाऱ्यांची थडगी येथे बांधलेली आहे, ते परत जावू शकलेले नाही'. -----------------------ती तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट वाटते का ?     

Thursday, May 21, 2015

आपणास सत्त्याची काही चाड उरली आहे का ?

नुकतीच माझ्या एक बातमी वाचण्यात आली; ती खरी अथवा खोटी याच्या तपशीलात मी जात नाही, ते या विषयासाठी आवश्यक आहे; असे मला वाटत नाही. अशा तऱ्हेच्या नोकरीबाबतच्या बातम्या असल्यानंतर त्यावर खालील मुद्दे लक्षात घेवून जर शास्त्रीयपणे विचार केला आणि भावनांना थोडे दूर सारले तर ते ज्यांना नोकरी मिळवायची आहे आणि ज्यांना नोकरी द्यावयाची आहे या दोघांच्या दृष्टीने हितकारक ठरू शकेल; पर्यायाने समाजाच्या, देशाच्या हिताचे ठरू शकेल. 

आता आपण एखाद्या व्यक्तीच्या धर्माचा, त्याच्या जातीचा विचार नोकरी देतांना करणार आहोत का त्याच्या समाजास, देशास होणाऱ्या सेवेचा विचार करणार आहोत हा प्रश्न आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे जर अशा व्यक्तीला नोकरी देण्याचा प्रसंग आपल्यावर स्वतःवर आला तर आपण त्यास ती नोकरी देवू का, तशी आपल्या मनात इच्छा तरी निर्माण होईल का ? हा देखील अत्यंत महत्वाचा आणि आपले अंतरंग दर्शविणारा प्रश्न आहे. 

येथे 'केवळ परदुखः शीतळ' किंवा 'दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण' अशीच बाब आहे की आपण हे प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आपणास व्यक्त करीत आहोत अथवा ढोंगीपणाने, दांभिकतेने सांगत आहोत, हे ठरवावे.  वाचा आणि विचार करा, उत्तर दिले अथवा नाही दिले तरी चालेल, प्रत्यक्ष कृती करून अंमलात आणले तरी चालेल. 

१. मालकाला कोणताही नोकर नेमण्याचा अधिकार आहे किंवा नाही ? विश्वासार्ह नसलेल्या नोकरावरचा विश्वास संपुष्टात आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकणे योग्य आहे किंवा नाही ? का मालक दिवाळखोर होईपावेतो त्याने अशा नोकरास त्याचे नियमीत वेतन देवून आपला सर्वस्वी सत्यानाश करून घेणे योग्य ठरेल? 
२. मालक व्यवसाय, उद्योग-धंदा करतो तो त्याचा, समाजाचा, देशाचा उत्कर्ष व्हावा, प्रगती, उन्नती व्हावी यासाठी करतो का निरोद्योगी, उपद्रवी, ऐतखाऊ समाज निर्माण व्हावा किंवा आपला सर्वधर्म समभाव, सहिष्णु वृत्ती दाखविण्यासाठी करतो ? 

३. अशा तऱ्हेची चमत्कारिक चर्चा सुरु ठेवून आपण कोणता आदर्श मालकासमोर तसेच कामगारासमोर ठेवत आहोत याचे आपल्याला भान असते का ? नसल्यास त्याचा कोणता परिणाम कोणावर, अगदी देशाच्या प्रतिमेवर देखील, होऊ शकतो याचा आपण विचार करतो का ?

४. मालकास हव्या असलेल्या कार्यक्षम कामगारांची, कर्मचारी अथवा अधिकारी यांची खरीखुरी निकड अशाने भागविली जाते का ? याची आपण कधी चर्चा करतो का ? अशा तऱ्हेच्या रिकाम्या चर्चेमुळे गुणवान, कामसू, चारित्र्यसंपन्न अशा कर्मचाऱ्यांवर आपण अन्याय करीत आहोत आणि समाजविघातक, देशविघातक कृत्य करून देशाच्या प्रगतीस बाधा पोहोचविण्याचे काम करीत आहोत याची आपणास कल्पना आहे का ? 

५. आपणास सत्त्याची काही चाड उरली आहे का ?

Wednesday, May 20, 2015

चिऊ-काऊ, चिऊ-काऊ ! का हो मला मागतात खाऊ

         

मी पूर्वी कविता करायचो, सध्या (कदाचित) बुध्दी चालत नसल्याने हा योग अलिकडे बऱ्याच दिवसात आला नसावा. मला लहानपणापासून सकाळी लवकर उठण्याची सवय आहे, चांगली अथवा वाईट, मी ठरवत नाही; आपण ठरवावे. मात्र माझ्या या सवयीचा त्रास काहींना होत असावा, अशी मला रास्त शंका आहे आणि ती आजही कायम आहे. असो.

माझी मुलगी 'सानिका' साधारणतः ४ / ५ वर्षांची असेल, मी तिला पण सकाळी लवकर उठवायचो, ती उठण्यास तयार नसायची. त्यावर मी एक तोडगा शोधून काढला की तिने सकाळी लवकर उठून दांत घासायचे, त्याचा 'चिवचिव' आवाज तिच्या चिऊ-काऊ' यांना ऐकवायचा आणि त्यांना मग खाऊ द्यायचा ! आता, त्यांना तिने खाऊ द्यायचा म्हटल्यावर तो तिला मिळणारच असायचा. तिच्या आवडीचे 'चिऊ काऊ' लवकर उठतात, त्यांना हा दांत घासतांना होणारा आवाज ऐकवायचा म्हटल्यावर तिला देखील लवकर उठावे लागणार, नाहीतर मग तो आवाज तिच्या 'चिऊ-काऊ' यांना ऐकता येणार नाही, त्यांना खाऊ देता येणार नाही, पर्यायाने तिलापण मिळणार नाही. हे फारच त्रांगडे होऊन बसले, आणि मग तिच्या मनातील भावना तिने त्यावेळी मांडल्या ! त्या मी फक्त शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला, दिनांक १९ जुलै १९९९ रोजी !

चिऊ-काऊ, चिऊ-काऊ ! का हो मला मागतात खाऊ

रोज रोज सकाळी, लवकर लवकर उठतात
माझे मात्र सकाळी, रोज डोके उठवतात
लगेच आई म्हणते, 'उठले बघ चिऊ-काऊ'
तरी बघा तुम्ही, काहो मला मागतात खाऊ ?

चिऊ-काऊ तुमचे, दांत मला दिसत नाही
झाडावरच खाऊ तुम्ही, खातात कसे समजत नाही
चिऊच्या दातांने, आई मागते मला खाऊ
तरी बघा तुम्ही, काहो मला मागतात खाऊ ?

दांत माझे घासल्यावर, चिव-चिव करतात
तुमचे दांत तुम्ही, असे कधी घासतात ?
तुमची आई तुम्हाला, देते रोज नवीन खाऊ
तरी बघा तुम्ही, काहो मला मागतात खाऊ ?

Tuesday, May 12, 2015

डॉ. वसंतराव देशपांडे यांचे गायन - 'आकाशवाणीच्या जळगाव' केंद्रामार्फत 'संगीत सभा'

'आकाशवाणीच्या जळगाव' केंद्रामार्फत 'संगीत सभा' होती, 'नवजीवन मंगल कार्यालयात', कलाकार होते डॉ. वसंतराव देशपांडे ! शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार होते, कदाचित आकाशवाणी जळगावच्या इतिहासात असा कार्यक्रम पहिल्यांदाच असावा, कारण माझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात यापूर्वी आले नव्हते. कार्यक्रम त्वरित सुरु व्हावा असे तेथे असलेल्या श्रोत्यांसारखेच तेथील घड्याळास सुद्धा वाटत असावे. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन आकाशवाणीच्या निवेदिका सौ. मोहिनी पंडित करीत होत्या. साथीला तबल्यावर 'श्री. शशीकांत मुळे' आणि हार्मोनिअमला कोण होते आठवत नाही. हो, श्री. गोविंदराव पटवर्धन होते. मागे तानपुऱ्यावर साथीला श्री. हेमंत पेंडसे ( नंतर माझे जुने मित्र श्री. हेमंत पेंडसे यांनी आठवण करून दिली, थोडी दुरुस्ती केली. धन्यवाद) आणि त्यावेळी आकाशवाणीचे संगीत विभाग सांभाळणारे श्री. पातंजली मादुस्कर होते. कार्यक्रम रात्री ९ - ३० वाजता सुरु झाला आणि तो संपूच नये असे वाटले पण हुरहूर लावून संपला. त्याचे संपादित ध्वनीमुद्रण जळगाव आकाशवाणीवर आहे, अधूनमधून लावतात. कार्यक्रम अप्रतिम झाला, गर्दीचा कहर झाला. ही आठवण माझ्या मनांत अजूनही ताजी आहे. 

मी मुंबईला गेलो होतो, साधारणतः १९८० च्या दरम्यानची गोष्ट असेल, दादरला 'श्री शिवाजी मंदीर' येथे 'कटयार काळजात घुसली' हा 'पुरुषोत्तम दारव्हेकर' लिखित आणि दिग्दर्शित नाट्यप्रयोग लागला होता. संगीत दिग्दर्शन 'पं. जितेंद्र अभिषेकी' यांचे ! कलाकार श्री. सावकार, श्री. घांग्रेकर, श्रीमती फैय्याज, सौ. पणशीकर आणि महत्वाचे म्हणजे डॉ. वसंतराव देशपांडे. त्यातील एक एक गाणे अंगावर रोमांच उठवीत होते, नाट्यलेखन परिणामकारक म्हणावे का संगीत उत्तम म्हणावे का कलाकार अप्रतिम आहेत हे समजावे ? मनस्थिती अशी झाली होती, काही झाले तरी नाटकाचा निवांतपणे आस्वाद घेत होतो, 

त्यातील पदे ऐकतांना म्हणजे - 'घेई छंद मकरंद' हा संथ लयीतील 'सालगवराळी ' रागामधील तर तळपत्या तेजाने विद्युत गतीतील द्रुतलयीचे 'धानी' रागामधील, 'तेजोनिधी लोहगोल' हे 'ललत पंचम ' रागातील, 'दिन गेले भजनाविण' हे बिलावल रागातील, 'मुरलीधर श्याम हे नंदलाल' हे 'पूर्वा कल्याण' रागातील, 'या भवनातील गीत पुराणे' हे 'बिहागडा' मधील पद, 'पहाडी' च्या सुरातील 'लागी कलेजवा कट्यार' हे पद आणि रागमाला दर्शन देणारे 'सुरत पिया की' हे अप्रतिम पद, आसपासचे भान विसरून गेलो होतो, नाटक संपल्यावर मी धुंदीतच घरी आलो. त्यानंतर असे नाटक पाहण्याचा असा योग पुन्हा आला नाही.   

डॉ. वसंतराव देशपांडे यांचे गायन त्या नंतर त्यांच्या अकाली, दुर्दैवी जाण्याने पुन्हा ऐकता आले नाही. 

Saturday, May 9, 2015

'आपली कायदा आणि सुव्यवस्था'


झाले एकदाचे ! सलमानखानने झालेल्या शिक्षेविरुद्ध मा. उच्च न्यायालयात दाद मागितली, मा. जिल्हा न्यायालयाने दिलेली शिक्षा निलंबित केली, त्याला जामीन मिळाला. यात विशेष काही नाही कारण ती न्याय प्रक्रिया आहे आणि हे नियम आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या संसदेत अथवा विधानमंडळात मंजूर करून घेतलेले आहेत, त्या नुसारच निर्णय द्यावे लागतात. बहुतांश वेळा ते दिले जातात आणि काही वेळा ते दिले गेले नाहीत असे आपणांस वाटते कारण त्यात अडकलेल्या, त्याचेशी संबंधित असलेल्या व्यक्ती या आपणास खूप परिचित असतात, गाजलेल्या असतात आणि बऱ्याच वेळा पैशांनी किंवा / आणि अधिकाराने मजबूत असतात, म्हणून जास्त कुतूहल असते. 

आपली इच्छा असते की अशा प्रकारच्या व्यक्तींना शिक्षा व्हायलाच हवी! ही आपली आंतरिक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण कायद्याचा आधार घेत असतो. आपल्या इच्छेप्रमाणे घडले म्हणजे मग 'सत्यमेव जयते', उशिरा घडले म्हणजे 'भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही है' आणि आपल्या इछेच्या विपरीत घडले की 'बळी तो कान पिळी', 'सर्वे गुणः कांचनम आश्रायन्ति', 'विकत घेतला न्याय', 'जगात गरिबांना न्याय मिळणार नाही, हे सर्व श्रीमंतासाठी आहे', 'जनता म्हणजे - मुकी बिचारी कुणीही हाका' वगैरे सारख्या वाक्यांनी, प्रतिक्रियांनी आपले संभाषण सुरु करतो आणि संपवितो. मात्र आपण असे का होते? या मागील कारण अपवादानेच लक्षात घेतो आणि त्यावर 'रामबाण' उपाय शोधून काढून त्याची अंमलबजावणी करण्याची तर आपली मानसिकताही नसते, तयारी नसते, त्यामागे वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आपला स्वार्थ आड येत असतो, येवू शकतो, त्यामुळे आपण बोलू शकत नाही अथवा आपली बोलण्याची इच्छा नसते. ही  'सलमान खान प्रकरण' घटनादेखील अगदी अशीच आहे, 

या घटनेबाबतही काही दिवस या गोष्टी चालतील आणि मग सर्व शांत होईल. याची यादी करावयाची म्हणजे खूप मोठी होईल, विषय विस्तार होईल. त्या दरम्यान जर सनसनाटी नवी घटना घडली तर मग याची चर्चा देखील बाजूला पडेल. यापूर्वीच्या विविध घटना देखील अशाच बाजूला पडलेल्या आहेत, त्यातील बऱ्याच तर आपणांस आठवत देखील नाहीत. 'समाजाची स्मरणशक्ती कमी असते' असे म्हणून आपण आपली सुटका करून घेतो अथवा ज्याच्यावर यातून मार्ग काढण्यासाठी जबाबदारी असते तो समाजाने हे सर्व विसरावे यासाठी वाट पहात  असतो, हे निरंतरपणे सुरु असते, त्यामध्ये आपणास नंतर काहीही वावगे वाटत नाही. मात्र आपण विसरून जातो, त्याकडे नंतर लक्ष दिले जात नाही येथे समस्या ही नाही तर असे का होते आणि त्यावर काही उपाय आहे का, असल्यास ते आपण अत्यंत कठोर निर्णय घेवून पार पडणार आहोत का? ही समस्या आहे. 

माझ्यासारख्यास  येथील 'आपली कायदा आणि सुव्यवस्था' याबाबतीत काही प्रश्न पडलेले आहेत, तसे आपणास सर्वांना पडतात का? माझ्या काही प्रश्नांची, समस्यांची उत्तरे काही अंशी मला माहित असू शकतात, आपणा सर्वांची याबाबत काय भावना आहे, आपणास असे काही प्रश्न पडतात का? आपल्यापैकी कित्येक जण यावर निर्णयक्षमता असलेला असू शकतो, त्यावेळी निर्णय घेतला जातो का, का घेतला जात नाही? याचा आपण मनांत कोणताही अभिनिवेश न ठेवता, शास्त्रीयपणे, तर्कनिष्ठ, वस्तुस्थितीनुसार आणि सत्यावर आधारित विचार करायचा आहे आणि तदनंतर आपण आचरण करू शकतो का हे ठरवायचे आहे. 'खायचे दांत आणि दाखवायचे दांत' येथे एकच हवे आणि तसे होत नसल्याने या समस्या निर्माण होत असतात.   

१. आपल्या समाजाची वर्तणूक लक्षात घेता त्याला काबूत ठेवण्यासाठी / येथे सुव्यवस्था ठेवण्यासाठी जेवढे , ज्या दर्जाचे 'पोलीसदळ' आपणाजवळ हवे तेवढे आहे का ? तेवढे नसेल तर तेवढे आणि त्या दर्जाचे आपण आपली आर्थिक कुवत लक्षात घेता नेमू शकतो का? त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि तशी आर्थिक कुवत आपणापाशी उपलब्ध आहे का ? सध्या जेवढे 'पोलीसदळ' आहे त्याचा तरी आपण पुरेपूर, योग्य उपयोग करतो का अथवा त्यांना त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम देवून त्यांची शारिरीक आणि मानसिक कार्यक्षमता नष्ट करीत आहोत? त्यांना समाजास अपेक्षित कार्यालयीन काम, प्रामाणिकपणे, कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय सक्षमपणे काम करण्यासारखी परिस्थिती आहे का ? नसल्यास अशी परिस्थिती का निर्माण झाली ? त्यात काही बदल करता येवू शकतो का, तशी आपली मानसिकता आणि मनापासून अंमलबजावणीची इच्छा आहे का? त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यास किती वेळ लागेल तो आपण सहन करण्यास तयार आहोत का ? असे 'पोलिसदळ' आपण समाजस्वास्थ्यासाठी तयार करणार असू, उभे करणार असू तर त्यांची निवड करतांना आपण उमेदवार हा त्यासाठी सुयोग्य आहे का, एवढाच विचार करणार आहोत की भरती करतांना इतर बाबींचाही परिणाम आणि विचार होणार आहे ? तसा विचार करून जर भरती झाली तर आपण आपले 'सक्षम प्रामाणिक पोलिसदळ' उभे करण्याचे उद्दिष्ट कितपत साध्य करू शकू ? तेवढे आपणास चालणार आहे का आणि आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का? त्यांनी त्यांचे कार्यालयीन काम प्रामाणिकपणे केले आणि ते जर त्यांच्या वरिष्ठांच्या, काही समाजाच्या हितसंबंधाआड आले, तर त्याचे परिणाम काय होतात, ते कोणास भोगावे लागतात, त्यावेळी त्यांचे खाते, राज्यकर्ते आणि समाज कोणाच्या बाजूने असतो? तसेच त्यांनी त्यांचे कार्यालयीन काम अप्रामाणिकपणे केले आणि ते जर त्यांच्या वरिष्ठांच्या, काही समाजाचे  हित जोपासणारे असेल, तर त्याचे परिणाम काय होतात, त्याची 'गोड फळे' कोणास मिळतात, त्यावेळी त्यांचे खाते, राज्यकर्ते आणि समाज कोणाच्या बाजूने असतो?       

२. आपल्या समाजाची वर्तणूक लक्षात घेता त्यातून निर्माण होणारे वादविवाद निराकरण करण्यासाठी पुरेसे न्यायाधीश आणि त्या अनुषंगिक न्याययंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे का, आज पावेतो कधीतरी होती का? नसेल तर आपण आपली आर्थिक कुवत लक्षात घेता ती उभी करू शकतो का? त्यासाठी लागणारे पुरेसे शिक्षित, तज्ञ मनुष्यबळ आपणापाशी उपलब्ध आहे का? सध्या जी न्याय-यंत्रणा आहे त्याचा आपण पुरेपूर, योग्य उपयोग करतो, का त्यांचा समाजास काही अंशी अनावश्यक असलेल्या खटल्यांमध्ये वेळ जातो आणि त्याचा परिणाम इतर कामकाज लांबण्यामध्ये होतो? त्यांना समाजास अपेक्षित असे प्रामाणिकपणे, कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय सक्षमपणे काम करण्यासारखी परिस्थिती आहे का? असल्यास नायालयाने दिलेले निर्णय हे, ते आपल्याविरुध्द जरी गेले तरी, प्रामाणिकपणे अंमलात आणले जातात का, तशी आपली मनापासून इच्छा असते का? नसल्यास त्यासाठी आपण कोणत्या युक्त्या लढवतो, हे आपले वर्तन जेथे सामाजिक चारित्र्य निरपवादपणे स्वच्छ असावे अशी अपेक्षा केली जाते, त्यानुसार योग्य आहे का? अशी परिस्थिती का निर्माण झाली? त्यात काही बदल करता येवू शकतो का, तशी आपली मानसिकता आणि मनापासून अंमलबजावणीची इच्छा आहे का ? त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यास किती वेळ लागेल तो आपण सहन करण्यास तयार आहोत का ? अशी पुरेशी न्याययंत्रणा आपण न्यायदानासाठी, समाजस्वास्थ्यासाठी तयार करणार असू, उभे करणार असू तर त्यांची निवड करतांना आपण उमेदवार हा त्यासाठी सुयोग्य आहे का, एवढाच विचार करणार आहोत की नेमणूक करतांना इतर बाबींचाही परिणाम आणि विचार होणार आहे ? तसा विचार करून जर नेमणूक झाली तर आपण आपले 'सक्षम प्रामाणिक न्याययंत्रणा' उभे करण्याचे उद्दिष्ट कितपत साध्य करू शकू ? तेवढे आपणास चालणार आहे का आणि आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का? एखाद्या विषयावर निर्णय सत्ताधीशांच्या विरूध्द जावू लागले तरी ते निर्णय काटेकोरपणे, त्वरित, सरळपणे पाळले जातात का ते निर्णय अथवा तो खटला विफल कसा होईल याचा प्रयत्न केला जातो?   

मित्रांनो, तूर्त एवढेच ! 

Friday, May 1, 2015

फेसबुकवरील मित्रमंडळी बाबतचे निरीक्षण !

माझे फेसबुकवरील मित्रमंडळी बाबतचे साधारणतः आज केलेले निरीक्षण !

मित्रानो, मनांत आले, आज थोडे लिहावेसे वाटले म्हणून लिहिले. यातून कोणास काही बोध झाला अथवा नाही झाला तरी माझे त्याबाबत कसलेही म्हणणे नाही, अथवा कोणाबाबत कसलाही आक्षेप नाही, तक्रार नाही.

१. काही मंडळी येथे फक्त उपस्थित असतात, त्यांना शोधून पाहिल्याशिवाय ते सापडत नाहीत. आपल्याला शंका येते की हे आपले फेसबुक-मित्र होते ते सध्या मित्रांच्या यादीत आहेत का नाही? आपण शोधून पाहावे, ते असतात - 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती चंदनापरी' या उक्तीस जागून असंख्य 'tag' केलेली चित्रे घेऊन उभे असतात. बऱ्याच दिवसांत त्यांनी त्यांच्या स्थळावर स्वतः काही हालचाल केलेली नसते आणि त्यांची तशी काही इच्छा असल्याचे देखील दिसत नाही. (कदाचित त्यांना वेळही मिळत नसेल किंवा त्यांची उपस्थिती त्यांच्या समजुतीनुसार फेसबुकवर प्रार्थनीय असेल)

२. काही मंडळी येथे उपस्थित असतात, ते फक्त लक्ष ठेवीन की त्यांना काही समोर हल्ला करण्यासारखे दिसते आहे का? याची ते वाट पाहतात आणि तसे काही असू शकते असे त्यांना वाटले की तत्काळ त्या लिखाणावर, चित्रावर, प्रतिक्रियेवर ते हल्ला करतात. त्यांचा उत्साह काही वेळा तर इतका काही वाखाणण्यासारखा असतो की आपल्या चर्मचक्षुंना जे अजिबात दिसत नाही अथवा कितीही वेळा त्या लिखाणाचे वाचन अथवा चित्राचे अवलोकन केले तरी आपणाला आहे त्यापेक्षा वेगळा असा कोणताही अर्थ लागत नाही; पण त्या लिखाणातून, चित्रातून त्यांच्या दिव्यचक्षुला भलभलत्या बाबी दिसतात, भयंकर जातीयवाद झालेला दिसतो, हजारो वर्षांचा अन्याय दिसतो आणि त्यामुळे त्यांना नाईलाजाने अन्याय निवारणार्थ भाग घ्यावा लागत आहे, अशी त्यांची भूमिका असते. या बाबतीत ते विचार-प्रचाराकाशी, विचार-प्रकाशकाशी स्नेहपूर्ण संबंध राखून असतात. काही वेळा अशी चर्चा ही निष्फळ, निरर्थक आणि निष्कारण आहे असे जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र ती चर्चा बऱ्याच जणांना फलदायी ठरत असल्याचे समजते, त्यातून त्यांच्या बऱ्याच बाबी साध्य होतात. 'आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी' ही म्हण त्यातूनच तर निर्माण झाली नसावी? 

३. काही मंडळी येथे उपस्थित असतात ती 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान' या भावनेने त्यांना, त्यांच्या मनाला वाटेल ते लिहित असतात आणि समाधान मिळवीत असतात. कोणी काही प्रतिक्रिया दिली, नाही दिली तरी ते त्यांच्या मनाला लावून घेत नाही आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तव्यात ते कसलीही कसूर करीत नाही.

४. काही मंडळी येथे उपस्थित असतात ती यासाठी की आपल्या समाजात शिक्षणामुळे, संस्कारामुळे, त्यांना आलेल्या अनुभवामुळे जर काही एकोप्याची भावना निर्माण होत असेल, एकमेकांचे झालेले काही विनाकारणचे गैरसमज दूर होत असतील अथवा तशी काही शक्यता निर्माण होत असेल तर या महाभागांना ते अजिबात सहन होत नाही, पण त्यांची अडचण अशी असते की 'हे त्यांना सहन होत नाही असे त्यांना सांगता येत नाही', त्यामुळे ही मंडळी जे बिचारे पूर्वीचे झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत असतील, ते हाणून पडण्याचा जीव तोडून प्रयत्न करीत असतात. काही वेळा तर या पेक्षाही भयानक परिस्थिती असते, ज्यांचे त्यांचे गैरसमज, द्वेषभावना ही जर आपोआप शिक्षणामुळे, त्यांच्या अनुभवामुळे कदाचित दूर होणार असते ते देखील यांना अजिबात सहन होत नाही. अशी भावना देखील निर्माण होणे हे कसे चुकीचे आहे अथवा त्यांची त्यामुळे कशी फसवणूक होत आहे, हे अटीतटीने पटविण्याचा प्रयत्न करतात आणि दोघांमधील दरी मिटत असेल तर मिटू देत नाही, दरी नसेल तर निर्माण करतात, थोडी दरी असेल तर रुंदावतात आणि समाजप्रबोधन करतात. गेल्या काही वर्षात या व्यक्तींना बऱ्यापैकी भाव आला असल्याने त्यांची मागणी वाढलेली आहे. विशेषतः आता 'फेसबुक' सारखे माध्यम त्यांना उपलब्ध झाल्याने त्यांचा प्रभाव बऱ्यापैकी वाढलेला दिसतो. मी असेही ऐकलेले आहे की सध्या हा अत्यंत फायद्याचा आणि महत्वाचे म्हणजे बिनभांडवली धंदा आहे. मला मात्र यातून अद्याप काहीही समजले नाही. मला व्यवहाराचे काहीही समजत नाही, याबाबत आमच्या घरात एकमत आहे किंवा 'एकमत' आहे, ते अत्यंत प्रभावशाली आहे. (ते 'एकमत' निर्णायक असून नेहमीच बहुमताची बरोबरी करते; हा आपल्यापैकी बहुतेकांना अनुभव असेल आणि ते माझ्याशी निदान या बाबतीत तरी तत्काळ सहमत होतील, ही मला खात्री आहे. याबाबत त्यांनी मला अगदी गुपचूप कळविले तरी चालेल, त्यांच्या सहमतीबाबत पूर्ण गुप्तता पाळली जाईल याची त्यांनी खात्री बाळगावी.)

५. काही मंडळी येथे आवर्जून उपस्थित असतात ती का उपस्थित असतात हे मलाही अद्याप समजलेले नाही पण कदाचित 'आपली उपस्थिती येथे प्रार्थनीय आहे', म्हणून 'हे आग्रहाचे निमंत्रण' त्यांना असल्याने, 'आता या आग्रहाचा अनमान कसा करणार?' या भावनेने येथे 'अगत्याने उपस्थित असलेले' बरेच जण पाहिलेले आहेत.

६. काही मंडळी येथे उपस्थित असतात, निरंतर सक्रियपणे उपस्थित असतात, आपल्या मित्रांच्या यादीत देखील असतात पण त्यांच्या कार्यतत्परतेची, कार्यबाहुल्याची आणि कार्यक्रमाची आपणास कसलाही सुगावा लागू देत नाही. आपल्यास त्यांची कालांतराने आठवण आल्यावर वाटते की  'सध्या ते सक्रिय नसावेत' पण त्यांचे फेसबुक वरील खाते पहिले की  ते अत्यंत भरभराटीस आलेले असून, जोमात चाललेले असल्याचे दिसते. यास जादूटोणा का हातचलाखी का दृष्टीभ्रम म्हणावे याबाबत माझा अजूनही संभ्रम आहे. आता 'जादूटोणा' वगैरे शब्दांचा आधार घेतल्यास विनाकारण कायद्याचा बडगा उगारला जाईल अशी भिती वाटते, पण त्यामुळे असे का होते अथवा होत असावे याचा मात्र खुलासा होत नाही आणि माझी समस्या तशीच राहते.  मी माझ्यापुरता सोपा अर्थ कडून मोकळा होतो की त्यांच्या भरभराटीत त्यांना आपला सहभाग नको असेल किंवा आपल्या सहभागामुळे त्यांच्या भरभराटीत काही व्यत्यय येत असेल. जावू द्या, कोणाचे कशाला वाईट चिंतावे? मी फक्त एवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो की या गोंधळात आपले काही नुकसान तर होत नाही ना? त्याची काळजी घ्यावी आणि ती शक्यता दूर करावी, नष्ट करावी. 

सध्या मला माझ्या आजच्या अवलोकनामधून एवढेच समजलेले आहे, ते लिहिले, राग मानू नये आणि गैरसमज तर अजिबात करू नये. (यातील सर्व व्यक्ती आणि प्रसंग जरी अनुभवावर आधारलेले वाटत असले आणि ते आपल्यास पक्के बसले तरी तो योगायोग समजावा आणि 'तो मी नव्हेच' असे मानून 'अगा जे घडलेच नाही' असे म्हणत स्वस्थ बसावे.