Friday, January 30, 2015

न्यायालयातील आठवणी - ५


आपल्या समाजाची फार पूर्वीपासून उच्च विचारसरणी चालत आलेली आहे, त्यानुसार आपले आचरण समाजाकडून अपेक्षित केले जात आहे, त्यालाच आपली सांस्कृतिक परंपरा आणि तदनंतर धार्मिक विचारसरणी म्हटले जावू लागले, सरतेशेवटी त्याला मग 'वैदिक संस्कृती अथवा धर्म' आणि अलिकडील काळात 'हिंदु संस्कृती अथवा धर्म' म्हटले जावू लागले. या विचारसरणीत अथवा संस्कृतीत इतके साम्य खूप अलीकडील काळापावेतो येथे राहणाऱ्यामध्ये होते की त्यात कोणाला कसलाही धार्मिक वास येत नसे, मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असली तरी.

मात्र अलीकडील काळात आणि दुर्दैवाने म्हणावे लागते की स्वातंत्र्यानंतर हा प्रकार विपरीतपणे बराच वाढू लागला आहे, कारण धर्माच्या नांवावर फायदा होणे किंबहुना उकळणे फारच सोपे झाले आहे. काही वेळा तर मानवता आणि धर्म हे परस्पर विरोधी शब्द आहेत किंवा काय अशी शंका यावी असे आपले आणि आपल्या समाज-पुढाऱ्यांचे वर्तन असते. 'धारण करतो तो धर्म आणि धर्म प्रजेस धारण करतो' हे चिरंतन चालत आलेले सत्य आपण, आपले समाजधुरीण विसरत चालले आहेत, ज्याचा परिपाक समाजातील तंटे-बखेडे वाढण्यात झालेला आहे. 'जी बाब आपल्याला चालणार आणि ती आपण दुसऱ्यासाठी करणार नाही' असा स्वच्छ विचार आपणा सर्वांचा असेल तर केंव्हाही दंगे-धोपे, वाद-विवाद, कोर्ट-कचेऱ्या होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. 

सध्या आपल्याला भारतीय संविधानात 'धर्मनिरपेक्ष' (Secular) आणि 'समाजवादी' (Socialist) हे शब्द पूर्वी होते का, नसले तर ते का नव्हते, मग ते केव्हा आले, का आले आणि आता हे शब्द असावेत का नसावेत याचे विचारमंथन सुरु आहे, अश्या स्वरूपाच्या बातम्या ऐकू येत आहेत. ही फार गंभीर स्वरुपाची चर्चा असेल किंवा गंभीर स्वरुपाची आहे असे भासविले जात असेल, कारण आपल्या प्रत्येकास आपण धर्मनिरपेक्ष किती स्वरुपात आहे आणि त्याचे ढोंग आपण किती प्रकारे, किती काळ आणि कोठपावेतो करीत आहोत याची देखील आपणास चांगलीच कल्पना आहे.

--------------------------------------------------------------------------------------

माझ्या न्यायालयीन आठवणीतील दोन घटना सांगतो, त्यातून आपली, आपल्या पुढाऱ्यांची आणि एकंदरीत समाजाची मानसिकता लक्षात येईल. या घटनेकडे आपण एक आपले आरशातील प्रतिबिंब पाहत आहे असे पाहावे त्याच सोबत आपले प्रतिबिंब कोणास मिळते जुळते आहे, ते देखील तपासून बघावे, समाजहिताच्या दृष्टीने ते नक्कीच हितावह ठरेल. दोन्ही घटना या परित्यक्त्या स्त्रियांच्या आहेत मात्र भिन्न धर्माच्या, एक 'हिंदु' आणि दुसरी 'मुस्लिम', त्यामुळे त्यांच्या संबंधित धर्माचा कायदा त्यांना लागू होता. 

ही घटना साधारणतः सन १९९६ - ९७ मधील असावी. एका मुस्लिम स्त्रीला तिच्या पतीने भर न्यायालयात न्यायाधीशांसमोर 'तलाक' दिलेला होता, त्यामुळे त्यावेळी बऱ्यापैकी गाजत असलेल्या 'The Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, १९८६' या कायदयानुसार तो खटला चालणार होता हे स्पष्ट होते. तिला तालुका न्यायालयात फक्त 'इद्दत' काळापुरती खावटी मिळाली. पुढील जीवन कसे काढावे ही विवंचना होतीच, अशा परिस्थितीत स्वाभाविकच ती तिच्या वडिलांकडे रहात होती, तिचे वडील निवृत्त शिक्षक होते, आर्थिक परिस्थिती जेमतेमच, त्यात 'तलाकपीडित' मुलीची विवंचना. त्यांनी तालुका न्यायालयात अशातऱ्हेने निर्णय मिळाल्याने वरील न्यायालयात, जिल्हा न्यायालयात जाण्याचे ठरवले. तालुका न्यायालयातील माझ्या वरिष्ठ मित्रांनी ते काम मला दिले, मी ते सत्र न्यायालयात दाखल केले, नोटीस निघाली, तिचा पूर्वीचा पती त्याकामी हजर झाला, त्याने वकील नेमले आणि काम सुरु झाले. 

प्रथमतः ही बाब पुढे आली की खावटी दयावयाची ती फक्त 'इद्दत काळासाठी' का 'इद्दत काळात' तिला आयुष्यभर पुरेल एवढी. विरुद्ध बाजूचे, तिच्या पूर्वीच्या पतीचे म्हणणे होते की 'फक्त इद्दत काळापुरतीच खावटी' दयावी लागते. मात्र त्या कायद्यातील शब्दरचना पाहिल्यावर अर्थ अगदी स्पष्ट होता की 'खावटी ही आयुष्यभर पुरेल एवढी मात्र इद्दत काळातच' दयायची. याच्याशी मा. सत्र न्यायाधीश सहमत होत नव्हते कारण माझ्या अर्थाचे विरुद्ध इतर उच्च न्यायालयांचे निर्णय होते पण 'मुंबई उच्च न्यायालयाचा' कोणताही निर्णय नव्हता, त्यामुळे ते निर्णय आपल्यावर बंधनकारक नाही' असे मी सांगत होतो. मी शेवटी जिद्दीला पडून 'याचा अर्थ काय लावावयाचा याच्यासाठी हे प्रकरण मा. उच्च न्यायालयात पाठवावे आणि त्यांचे मत मागवावे' असा अर्ज दिला. माझा त्यावेळचा अनुभव, मी चालवत असलेली केस आणि अशा स्वरूपाचा माझा अर्ज पाहून मला बऱ्याच जणांनी मुर्खात काढले असावे आणि त्यांनी मला विशेषतः मुस्लिम कायद्यातील काहीही कळत नसावे याची खूणगाठ बांधली असावी. 

मा. सत्र न्यायाधीशांनी माझा तो 'सदर प्रकरण हे अर्थ लावण्यासाठी मा. उच्च न्यायालयात पाठवावे' यासाठीचा अर्ज रद्द केला आणि स्वाभाविकपणेच माझे तालुका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धाचे 'रिव्हीजन' रद्द केले. मला, मुलीला आणि मुलीच्या वडिलांना हा निर्णय पसंत नव्हता, तो त्यांच्या पचनी पडत नव्हता, कारण इतक्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा परिणाम. मी त्यांना म्हणालो 'हे पहा, हा निर्णय मलाही पटत नाही, आपण याची मा. उच्च न्यायालयात दाद मागू. माझी फी जेंव्हा जमेल तेंव्हा आणि जशी जमेल तेंव्हा द्या.' त्यांचा थोडा होकार दिसला, मलाही बरे वाटले कारण माझी देखील हे पाहून आणि त्याचे भविष्यातील होणारे समाजावरील भीषण परिणाम पाहून घालमेल होत होती. 

मी ते काम उच्च न्यायालयात कसे दाखल करता येईल याचा विचार करू लागलो आणि साधारणतः ८ - १० दिवसांनी त्या मुलीचे वडील माझेकडे आले आणि मला त्यांचे कागदपत्र परत मागू लागले. मला आश्चर्य वाटले, मी म्हणालो 'अहो, आपल्याला हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करायचे आहे ना, मग कागदपत्रे तुम्ही घेवून काय करणार आहात?' ते माझ्या डोळ्याला डोळा भिडवीत नव्हते, फक्त कागदपत्र पुन्हा परत मागत होते, मी ते परत देवून टाकले आणि म्हणालो, 'हे पहा, हे कागद तुमचेच आहे, मला काय करायचे आहे? पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्याच मुलीवर अन्याय करत आहात. पुन्हा वेळ आली, विचार बदलला तर माझ्याकडे येण्यात संकोच करू नका.' त्यांनी कागदपत्र घेतले, घेतांना त्यांचे डोळे पाणावले होते.     

साधारणतः ८ - १० महिने झाले असतील, रेडिओवर बातमी आली आणि त्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या यासंबधातील क्रांतिकारक निर्णयाचा उल्लेख होता, मी मा. सत्र न्यायालयास सांगत असलेला 'The Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, १९८६' मधील तरतुदीचाच अर्थ बरोबर होता, यास मा. उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली होती. मला खूप बरे वाटले, मग मात्र या खटल्याची आठवण झाली. योगायोगाने त्या मुलीचे वडील २-३ महिन्यांनी भेटले, त्यांना ही हकीकत सांगितली. 'वकीलसाहेब, तुम्ही आमच्या समाजाचे पुढारी आहात का की मला तुमचे ऐकणे भाग पडावे?' आणि ते डोळे पुसत माझेसमोरून निघून गेले. मला आता यापेक्षा जास्त सांगण्याची काही आवश्यकता उरलेली नव्हती. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

एका हिंदु स्त्रीचा न्यायालयामार्फत 'विवाहविच्छेद' तिने नवऱ्यासोबत राहण्याचे नाकारले म्हणून झालेला होता. त्या तिच्या नवऱ्याने त्यानंतर दुसरा विवाह केला होता. मात्र या त्याच्या पहिल्या पत्नीने तालुका न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम १२५ प्रमाणे खावटी मिळणेसाठी अर्ज केला होता. यावेळी मी त्या महिलेच्या पूर्वीच्या पतीकडून होतो. मी त्या खटल्यात ही सर्व कागदपत्रे दाखल केली आणि निर्धास्त झालो कारण निर्णय माझ्या बाजूने यावयास हवा होता, अशी माझी अपेक्षा होती. 

मात्र निर्णय झाल्यावर माझा अपेक्षाभंग झाला कारण 'विवाहविच्छेद' जरी तिने नवऱ्यासोबत राहण्याचे नाकारले म्हणून झालेला असला तरी आता तिने कोणाच्या भरवश्यावर जगावे, हा जीवनमरणाचा सामाजिक प्रश्न मानवतावादीदृष्टीने विचारात घेवून मा. न्यायाधीशांनी त्या महिलेस दरमहा खावटी मंजूर केली होती. 'यापूर्वीचा तिच्याच संबंधाने असलेला दिवाणी न्यायालयाचा तिने नवऱ्यासोबत राहण्याचे नाकारले म्हणून झालेला संदर्भ फौजदारी न्यायालयाने मानला नव्हता, ही बाब माझ्या वकील मनाला पटत नव्हती, जरी समाजघटक म्हणून पटत असली तरी. 

आश्चर्याची बाब म्हणजे याचे, या निर्णयाचे त्या माझ्या पक्षकारास फारसे नवल अथवा वाईट वाटले नव्हते, मी त्यास याबाबत म्हणालो तर 'वकीलसाहेब, कोर्टाच्या खर्चापेक्षा मला माझ्या पूर्वीच्या बायकोला खावटी दिलेली जास्त परवडेल, माझे काही पुण्य तरी जमा होईल. आपल्याला या निर्णयाविरुद्ध अपील करायचे नाही.' मी मनातून जरी थोडा खट्टू झालो तरी मला थोडे समाधान वाटले. ते कशाचे समाधान होते, ते इतक्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचे संस्कार आपल्यावर असल्याचे होते. 

--------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, January 29, 2015

भारतीय राज्यघटनेतील नंतर आलेले 'धर्मनिरपेक्ष' (सेक्युलर) आणि 'समाजवादी' (सोशालीस्ट) शब्द


सध्या गेल्या काही दिवसांपासून भारतीय संविधानातील 'धर्मनिरपेक्ष' (सेक्युलर) आणि 'समाजवादी' (सोशालीस्ट) या शब्दांबाबत वादविवाद आणि चर्चा सुरु आहे. वास्तविक पाहता चर्चा करण्यास काहीही हरकत नाही. वेळोवेळी भारतीय राज्य घटनेचा अर्थ लावतांना न्यायालयाने कित्येक वेळा स्पष्ट केले आहे की भारतीय राज्य घटनेचे मूळचे स्वरूप न बदलता, व्यापक राष्ट्रीय हित लक्षात घेता योग्य ती घटना दुरुस्ती आपणास करता येते आणि हा आपल्या संसदेचा असलेला अधिकार संसदेने कित्येक वेळा उपयोगात आणलेला आहे, मग तो नागरिकांचे मुलभुत अधिकारांच्या संकोचासाठी असेल जो आपणास आणीबाणीत अनुभव आलेला आहे, जेंव्हा वैयक्तिक कायद्यासंबंधी विषय असेल तर आपल्या संसदेने वैयक्तिक कायद्यास जास्त महत्व दिलेले आहे आणि सर्व समाजासाठी असलेली कायद्यातील तरतूद नाकारून तसेच नामदार सर्वोच्च न्यायालयाने लावलेल्या अर्थाला अर्थहीन करण्यासाठी 'शहाबानो' खटल्यातील निर्णयास दूर करण्यासाठी 'The Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, १९८६' हा मंजूर केलेला आहे, त्यास देखील आपले माजी पंतप्रधान मा. राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत झालेला आहे, यावेळी देखील संसदेत चर्चाच झालेली होती. त्यावेळी किंवा आजही या कायद्याबाबत काही चर्चा करण्याची गरज 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' या शब्दासाठी आज चर्चा करत असलेल्यांना आजही वाटते का?, असा प्रश्न कोणी या कायद्याने ज्यांच्यावर, ज्या संपूर्ण महिलांवर, परिणाम विपरीतपणे होणार होता त्यांना देखील कोणी विचारला नव्हता.  

अशी बरीच उदाहरणे आजपावेतो घडलेली आहेत आणि ती आपण आठवली तर आपल्या लक्षात येवून या विषयाबाबतची दुटप्पी असलेली आपली भूमिका लक्षात येईल. थोडक्यात आपली संसद सर्वोच्च आहे आणि आपण त्यासाठी आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कायदे आणि नियम आहेत, फक्त त्याचा आपण वापर आपल्या फायद्याचे वेळीच करायचा का सर्व समाजाचा फायदा असल्यावरच करायचा हा प्रश्न आहे. याबाबत यापूर्वीदेखील भरपूर चर्चा झालेली आहे, वादविवाद झालेले आहेत, कोर्टकचेऱ्या झालेल्या आहेत, त्याचे फायदे अथवा नुकसानही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना झालेले आहेत, याचे कोणाला फायदे आणि कोणाला तोटे होतात याची आपणा सर्वांना नीट कल्पना आहे, हे विषय केंव्हा काढायचे आणि त्यावर खंबीरपणे केंव्हा निर्णय घेत आहोत असे दाखवायचे मात्र निर्णय समाजहिताचा असला तरी अजिबात घ्यायचा नाही, हे सर्व आम्हा भारतीयांना आजपावेतोच्या अनुभवातून वेळोवेळी आलेला आहे. 

आपणास याचे खरेखुरे उत्तर हवे असल्यास आपण हा प्रश्न आपली सद्सद्विवेकबुद्धी (असल्यास) नीट ठिकाणावर ठेवून आपण आपल्यासच विचारावा आणि उत्तर आपणास जरूर मिळेल, ते कोणासही सांगण्याची देखील आवश्यकता राहील असे वाटत नाही.  आवश्यकता आहे तो ढोंगीपणा थांबवण्याची, त्यास कोणाची तयारी आहे? सांगता येईल, हो अगदी जाहीरपणे, कोणत्याही पक्षाने!

Monday, January 26, 2015

'डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार'

आज दैनिक लोकसत्तामध्ये श्री. रामेश्वर नाईक यांना कै. डॉक्टर अविनाश आचार्य याच्या नांवाने ठेवण्यात आलेला, समाजसेवा क्षेत्रामध्ये नावाजलेला 'डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार' देण्यात येत असलेबद्दल अभिनंदनाची बातमी वाचली, विशेष उल्लेख म्हणून श्री. दिनेश गजाजन जोशी यांचाही उल्लेख आढळला. माझे मन काही जुन्या आठवणीमध्ये गेले. त्या आठवणी या निमित्ताने देणे अजिबात अनुचित होणार नाही कारण एकाच व्यक्तीची कृती, विचार, दिशा वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळे अर्थ देतात, प्रोत्साहन देतात आणि त्याची वाटचाल सुलभ करतात. 

सन १९७० च्या आसपासची गोष्ट असेल, मी अगदी तिसऱ्या अथवा दुसऱ्या इयत्तेत असेल, जळगावला सांप्रदायिक दंगा झाला होता, भेटीसाठी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी देखील तेथे आल्या होत्या, एवढया त्या दंग्याची भीषणता असावी, अर्थात हे समजण्याचे माझे वय नव्हते, पण त्यावेळी प्रथमच मला डॉक्टर अविनाश आचार्य यांचे नांव वारंवार आणि सन्मानाने बरेच जण घेत असलेले आढळले. या नांवाच्या महतीची माहिती झालेला हा माझा पहिला प्रसंग.

त्यानंतर रावेर येथे कै. पुनमचंदशेठ अग्रवाल यांच्या मळ्यात भोईवाड्यात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा' कार्यक्रम होता, दिवस हिवाळ्याचे होते. तेथे शेजारीच रावेरच्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेवड्या तयार करण्याचे काम सुरु होते. त्या कार्यक्रमास कै. डॉक्टर अविनाश आचार्य यांना आवर्जून बोलाविले होते. ज्यांना अगदी म्हातारपणामुळे चालता देखील येत नव्हते, ते आमच्या गावांतील खूप वयस्कर मंडळी देखील त्या कार्यक्रमाला आलेली होती, आपल्या काळातील 'संघाचे अगदी 'स्वातंत्र्यापूर्वीचे' देखील काम करत असलेले स्वयंसेवक आले होते, ते त्यांच्या त्या वेळच्या कार्यक्रमाचे अनुभव सांगत होते, त्यावेळी संघावर असलेल्या बंदीचे त्यांना असलेले अनुभव सांगत होते. त्यांचे अनुभव ऐकल्यावर मला आपल्या केलेल्या कामाचे थिटेपण आजही जाणवते. याची पुष्टी मला मा. नरेंद्रजी मोदी, पंतप्रधान यांनी आपल्या 'स्वातंत्र्यदिनाच्या' दिवशी विनयाने केलेल्या त्यांच्या भाषणातून मिळाली, 'नरेंद्र मोदी आज जो एवढा उंच दिसत आहे, तो या गेल्या पाच पिढीच्या खांद्यावर उभा आहे म्हणून एवढा उंच दिसत आहे.' 

आम्ही त्यावेळी शालेय शिक्षणच घेत असू, त्यावेळची वेळ मला अजूनही आठवते. साधारणतः हिवाळ्याचा काळ असेल कारण त्यावेळी मळ्याजवळच तयार होत असलेल्या रेवड्या तयार होत होत्या. रावेरच्या रेवड्या प्रसिध्द आहेत, रावेर येथील दत्तजयंतीच्या उत्सवानिमित्ताने जी रथयात्रा निघते त्यावेळी रेवड्यांची उधळण रथावर सर्व भाविक करतात, त्याकाळात गुळाच्या पाकापासून रेवड्या तयार करणे हे बऱ्याच ठिकाणी सूरु असते, तसे ते भोईवाड्यात सुरु होते. 'हं, काय रे काय म्हणतो?' एका स्वयंसेवकाला मा. दादांनी विचारले. 'काय न्हाई, रेवड्याचा कारखाना काय रोजचाच हाय, एक दिवस थोडा येळ कमी देला तरी चालेल, पण म्हनले एवढा मोठा आपला कार्यक्रम आहे, आपण जायला पायजे. नंतर रेवड्या थोड्या जास्त वेळ तयार करू.' त्याने उत्तर दिले. संघाबद्दलची तेथील त्या अतिशय सामान्य कुटुंबातील, मजूर परिस्थितीतील, जेमतेम शिक्षण घेत असलेल्यांची ही भावना एकूण मा. दादा त्यावेळी काही बोलले नाही. सर्वजण जेवावयास बसले होते, योगायोगाने मी मा. दादांच्या (कै. डॉक्टर अविनाश आचार्य यांना सर्वजण दादा म्हणत) अगदी समोरच बसलेलो होतो. त्यांची जेवत असतानाही बोलण्याची, सर्वांशी संवाद साधण्याची सवय असावी. जेवणे झाली, नंतर गप्पा सुरु झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले 'हे पहा, आपला कारखाना कायम चालावा अशी आपली मनापासूनची भावना असेल तर मग आपल्या रोजच्या पोटापाण्याच्या कारखान्याचा थोडा वेळ आपण आपल्या या संघाला दिला पाहिजे. संघ टिकावा, वाढावा असे जर आपणास वाटत असेल तर मग दैनंदिन शाखा हा 'स्वयंसेवक पुरविण्याचा कारखाना' आहे. स्वयंसेवक भरपूर असल्याशिवाय संघ टिकणार नाही, मला या 'रेवड्या तयार करणाऱ्या कारखानदाराने' उत्तम दृष्टांताने संघ कसा टिकेल आणि टिकवला पाहिजे हे सोप्या भाषेत समजावले. समाज्याच्या ज्या तळागाळात देखील इतका तंतोतंत विचार करणारे संघाचे स्वयंसेवक असतील तर मग संघाचे हे काम खरोखरच समाजाचेच काम आहे, त्याची आपण सर्व जणच काळजी करत आहोत. ते निरंतर वाढणार याची शंका नाही' वातावरण खरोखरच फार उच्च पातळीवर गेले होते, हे अत्यंत छोट्या बाबीतून महत्वाचे तत्व लक्षात आणून देण्याचे त्यांचे कसब आपल्या लक्षात येते.

 मी रावेरला होतो. ही घटना मी नुकताच वकील झालेलो होतो. आमचेकडे श्री. कुलकर्णी म्हणून प्रचारक होते. एकदा त्यांना आणि मलादेखील जळगावला जायचे होते, आम्ही दोन्ही सोबतच सकाळी जळगावला निघालो, तेथे १२ वाजेदरम्यान पोहचलो. मला कोर्टात जायचे होते तर श्री कुलकर्णी यांना डॉक्टर अविनाश आचार्य यांचेकडे संघाचे कामानिमित्त जायचे होते. माझ्या नेहमीच्या पध्दतीनुसार जेवण करून मग कामाला लागायचे, मी श्री. कुलकर्णी यांना म्हटले 'प्रथम आपण जेवण करू, मग तुम्हाला डॉक्टर अविनाश आचार्य यांच्याकडे आणि मला तेथून कोर्टात जाता येईल.' त्यांनी फारशी अनुकुलता दाखवली नाही पण त्याकडे लक्ष न देता आम्ही जेवण केले, तेथून डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या कडे गेलो. तेथे मा. श्रीपती शास्त्री आणि काही मंडळी आलेली होती. डॉक्टर अविनाश आचार्य तेथेच होते, त्यांनी आम्हास बघितले, 'हं, अप्पा चला जेवायला.' म्हणाले. 'जेवण झाले.' श्री. कुलकर्णी, प्रचारक म्हणाले. 'कोठे?', त्यांचा प्रश्न. 'हॉटेलमध्ये',माझे उत्तर. ते क्षणात प. पू.  गोळवलकर गुरुजींच्या फोटोकडे बोट दाखवून आम्हांस म्हणाले 'अहो अप्पा, संघाचे प्रचारक जर हॉटेलमध्ये जेवू लागले, तर हे आम्हाला स्वर्गातून काय म्हणतील? अहो माझे देखील राहिले आहे.' 'ते तयार नव्हते, पण मी आग्रह केला.' मी घडले ते सांगितले. 'अहो, प्रचारकाने वेगवेगळ्या कार्यकर्त्याच्या घरी जेवले नाही, तर ते प्रत्येक घर संघाशी कसे जोडले जाईल, संपर्क कसा होणार, कार्यकर्त्यास ते घर आणि त्या घरास तो कार्यकर्ता म्हणजे संघ आपला कसा वाटेल? संघासाठी आपण एका माणसाचे तरी जेवण द्यायला पाहिजे. मी तुम्हास सांगायचे का?' ते म्हणाले. माझ्याकडे फारसे नीट उत्तर नव्हते, 'नाही मला घाई होती, कोर्टात जायचे आहे, म्हणून मी म्हणालो.' मी स्पष्टीकरण दिले. 'नाही दादा, वकीलसाहेबांनी  तर त्यांच्या घरी ते असो किंवा नसो, संघ प्रचाराकास हे घर आपले वाटले पाहिजे हे सांगून ठेवले' असल्याचे श्री कुलकर्णी यांनी वस्तुस्थिती सांगितली आणि माझी बाजू सावरून धरली. पण हे त्यांचे बोल ऐकल्यावर मा. दादांची, डॉक्टर अविनाश आचार्य यांची उंची आणि संघ कार्यात त्यांच्या असलेल्या योगदानाची मला केवळ कल्पनाच आली नाही, तर त्यांची उंची एवढी का आणि कशी झाली याची देखील कल्पना या एका वाक्याने क्षणांत आली.

घटना पुष्कळ आहेत, त्याचे कर्तृत्व मोठे आहे, ते येथे मी सांगावे याची आवश्यकता नाही, आणीबाणीत आपल्या स्वातंत्र्यासाठी झालेला तुरुंगवास, त्यांच्या पुढाकाराने जळगाव मधील सर्वमान्य झाले 'केशव स्मृती प्रतिष्ठान' त्याच्या माध्यमाने उभ्या राहिलेल्या अनेक मोठ्या संस्था, जळगाव जनता बँक, त्यांचे सहकारी आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव आणि कसलीही अपेक्षा न ठेवता केलेले प्रचंड काम आणि ते काम नंतर समर्थपणे सांभाळता यावे यासाठी तयार केलेली माणसे पाहिल्यावर लक्षात येते, अर्थात हे सांगण्याचे येथे प्रयोजन नाही. मात्र या 'डॉक्टर आचार्य अविनाश सेवा पुरस्कार' ही बातमी वाचली आणि हे मागील काही अनुभव आठवले, म्हणून लिहिले झाले.   

Thursday, January 22, 2015

'भारतीय राज्य घटनेचे कलम ३७० आणि भारताची सार्वभौमकता'

सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यात 'आम आदमी पक्ष' आणि 'भारतीय जनता पक्ष' हे प्रमुख दिसत आहेत, मात्र 'भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (इंदिरा) हा पक्ष देखील निवडणुकीत असला तरी त्याचा सध्याच्या परिस्थितीत कोणी फारसा विचार करताना दिसत नाही. यापूर्वी नुकत्याच जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात 'भारतीय जनता पक्षाला' जनतेने भरभरून साथ दिली, आता याचे बऱ्याच जणांना निष्कारण खूप वाईट वाटते, कारण यात 'संघविचारसरणीचा' विजय होतो आहे ही खंत आहे, वास्तविक आपण सर्वांनी हा या निवडणुकीपुरता जनतेचा निर्णय म्हणून स्विकारावयास हवा आणि ज्यांना हा निर्णय पटला नसेल त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावयास हवी. मात्र प्रत्येक निवडणुकीच्या निर्णयाचे विश्लेषण करतांना प्रत्येकाने हे अगदी न विसरता कटाक्षाने लक्षात ठेवावयास हवे की हा निर्णय त्या कोणत्याही पक्षाच्या, विचारसरणीच्या मागील कृतीचा आणि जनतेस आलेल्या अनुभवाचा परिपाक आहे. यात अर्थात इतरही तात्कालिक घटक असतातच मात्र त्याचा कायम आणि निर्णायक परिणाम निकालावर फारसा होत नाही, जनतेने निवडणुकीच्या आधीच यावेळी कोणास निवडून द्यायचे हे ठरविले असते. 

मात्र या लेखाचा विषय कोणत्याही राज्यातील निवडणुका हा नसून 'भारतीय राज्य घटनेचे कलम ३७० आणि भारताची सार्वभौमकता' असा आहे. विषय व्यापक आणि तपशीलवारपणे लिहिण्याचा आहे, ज्यायोगे 'भारतीय राज्यघटना, तिची सार्वभौमिकता आणि देशावासियांप्रतीचे कर्तव्य' याबाबत आपणास कल्पना येवू शकेल आणि बुध्दीभेद होण्याची शक्यता कमी होईल. 

१५ ऑगस्ट १९४७ नंतर आपल्या वाटेस आलेला 'खंडीत भारत' काहीना आजही शल्यासारखा बोचत जरी असला तरी सर्व भारतीय नागरिक म्हणवून घेणाऱ्यांचे हे आद्य कर्तव्य आहे की हा 'खंडीत भारत' का होईना पण त्याचे जीवापाड रक्षण करायचे, निष्कारण चर्चेचे गुऱ्हाळ लावत आणि सर्वसामान्य नागरिकांचा बुध्दीभेद करून देशविघातक कृत्य करणाऱ्यांना कोणतीही मदत करण्याचे पातक करायचे नसते, असे करणे म्हणजे केवळ राष्ट्राप्रती राष्ट्रद्रोहच नाही तर भारतीय राज्य घटनेशी विसंगत वर्तन असल्याने तिची प्रतारणा करणे होय. आता ज्या कोणासही कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यावयाचा असतो, त्याची एक प्राथमिक आणि न टाळता येण्यासारखी जबाबदारी असते की त्यास त्याचा भारतीय राज्य घटनेवर विश्वास असल्याचे मान्य करून त्याप्रमाणे वागण्याची शपथ घ्यावी लागते, तसे शपथपत्र द्यावे लागते. मात्र लोकशाहीचा आणि त्यामार्गे होणाऱ्या सर्व निवडणुकीचा सर्व प्रकारचा फायदा घ्यायचा, लाभ उठवायचा मात्र सोबत येणारी राज्यघटनेप्रमाणे कर्त्यव्ये पाळावयाची नाहीत, मग त्यासाठी सर्वधर्मसमभाव, अल्पसंख्याकांच्या भावना, आरक्षणाची आरडाओरड, बहुजन समाजास प्रतिनिधित्व, मनुवादी विचारसरणी इ. लोकांचा बुध्दीभेद करणारे विषय घ्यायचे आणि तात्कालिक भावना भडकावून त्याचा 'व्यभिचारी लाभ' घ्यायचा, ही बहुतांश वेळा दिसत असलेली वृत्ती ही राष्ट्रविरोधी आहे, याची देखील आता जनतेस जाणीव व्हावयास लागलेली आहे आणि म्हणूनच त्याचे परिणाम हे 'हिंदुत्वविचारसरणी' पुरस्कृत करण्याइतपत सध्या होऊ लागलेली आहे. 

'ज्यामुळे भारतास लाभ होणार असेल ते धोरण देशहिताचे आणि ज्यामुळे देशाचे कोणत्याही स्वरूपाचे आणि केंव्हाही नुकसान होणार असेल ते विचार, वक्तव्य, कृती वा त्यासाठी होत असलेली कशाही स्वरुपाची आणि कोणत्याही प्रकारची मदत म्हणजे देशद्रोह' हा अगदी साधा, कोणासही पटणारा आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या मनातील विचार आहे. मात्र यासारखे त्यांना जर आढळून आले नाही तर त्याचा भ्रमनिरास होतो आणि मग ते त्यामागची कारणे शोधू लागतात तसेच त्यावरचा उपाय देखील शोधू लागतात. आता यांना हा उपाय आणि त्यावरील मार्ग सापडला आहे तो म्हणजे 'सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः' जी आपली पूर्वापारपासून शिकवण आहे, जी आपली परंपरा आहे आणि जे आपले आजपावेतो या 'देशाच्या धर्माप्रमाणे आचरण' आहे, म्हणूनच त्याच्याशी सुसंगत अशी विचारधारा ज्या पक्षाची आहे त्यास बहुतांश जनता स्विकारू लागली आहे आणि आता त्याचा लाभ उचलण्याचे दृष्टीने मग आपणास माहीत असलेली बरीच संधीसाधू मंडळी 'आम्ही देखील याच विचारसरणीत पूर्वीपासून वाढलेलो असून याच विचारसरणीचा पुरस्कार करीत आहोत' हे सांगण्यात अशी मागे रहातील? 

(अपूर्ण)                

Tuesday, January 20, 2015

एक वेगळा प्रवासानुभव

प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यात निरंतर धकाधकीचे, कष्टप्रद कामाचे, अपमानाचे, वैफल्याचे - निराशपणाचे, मनस्तापाचे, विश्वासघात अनुभवण्याचे, फसवणुकीचे, थोडक्यात आपले मनस्वास्थ्य ज्यामुळे बिघडू शकेल असे प्रसंग वारंवार येत असतात. आपण जर त्याच प्रसंगाने हबकून गेलो, त्रस्त झालो तर जीवनातील मिळणाऱ्या अमोल आनंदास आपण मुकू, निराशेच्या अवस्थेत कंटाळवाणे जिणे आपण जगू लागले तर आपले आयुष्य कमी होण्याव्यतिरिक्त आपणास काहीही मिळणार नाही, आपण आपले आरोग्य बिघडवून ठेवून खर्च मात्र वाढवून ठेवू, कुटुंबाची काळजी निष्कारण वाढवू. 'ठेवीले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हे आपल्या संत पूर्वजांनी सांगितलेले आहे ते विनाकारण नाही. यातून जो मार्ग काढायचा असतो तो चिडचिड करून अथवा कोणावर संतापून नाही तर अत्यंत शांततेने, विचारपूर्वक आणि यांत आपण काही करू शकतो का? याचा भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे 'स्थितप्रज्ञाप्रमाणे', सांगोपांग आणि साकल्याने विचार करून त्यावर निर्णय घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्याची समर्थपणे अंमलबजावणी करायची असते. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीतून जातांना खूप त्रास होतो कारण गाड्यांची स्थिती, रस्त्यांवरील खड्डे, चालवणारे चालक आणि सोबत असणारे वाहक! त्यात भर म्हणून की काय गाडीला असलेली गर्दी, होणारी रेटारेटी वगैरे. त्यामुळे इतका  त्रास होतो की पुन्हा बसने जावेसे वाटत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते, अर्थात ती खोटी आहे असे माझे म्हणणे नाही, पण अशाही परिस्थितीत जर आपण घडण्याऱ्या घटनांकडे थोडया वेगळ्या, खेळकर दृष्टीने पाहिल्यास आपल्याला प्रवासाचा आनंदही अगदी त्रास होत असतानाही घेता येतो, म्हणूनच मला आलेला अनुभव मी येथे देत आहे, तो माझ्या दृष्टीने. 

एकदा जळगाव ते औरंगाबाद या गाडीने मी सहकुटुंब सायंकाळी निघालो. माझा प्रयत्न मी दुपारी निघावे असा होता, पण तो कठोरपणे आणि समर्थपणे हाणून पाडण्याचे काम सौ. ने कौशल्याने केले आणि 'नेहमीच तुमच्यामुळेच कसा उशीर होतो' हे मला पटवून दिले. अर्थात त्याबाबत मी शक्यतो प्रतिवाद करीत नाही, कारण त्याचा फारसा उपयोग होत नाही; मात्र आपला त्रास दुप्पट होतो (म्हणजे प्रवासाचा त्रास आणि प्रवासातील त्रास) हे मला आता अनुभवावरून लक्षात आले आहे. असो. बऱ्याच वेळेपासून गाडी लागलेली नसल्याने गाडीला फारच गर्दी होती, मात्र सुदैवाने आम्हास अगदी वाहकाच्या मागील जागा मिळाली, गाडी निघाली. वाहक तिकिटे देऊ लागला. गर्दी असल्याने तिकिटे देण्यास त्याला उशीर होत होता. मात्र सुट्या नाण्यांचा गोंधळ, फाटक्या नोटा, सज्ञान मुले अज्ञान दाखवण्याचा प्रवाश्यांचा प्रयत्न आणि तो हाणून पाडण्याचे वाहकाचे कसब हे एकाच वेळी अनुभवास येण्यामागील गम्मत, एकमेकांचे कमीजास्त पैसे लक्षात ठेवत, कसेबसे सर्वांना तिकिटे देवून वाहक आपल्या जागेवर बसला.

साधारणपणे १५ - २० मिनिटे गाडी पुढे गेली असेल किंवा नाही तोच गाडीत 'खळळळ' असा बाटली फुटल्याचा आवाज आला आणि लगेचच दारूचा वास आला. 'अरे, अरे गाडीतून दारूच्या बाटल्या नेत आहात?' मोठयाने आरडाओरडा झाला. वाहक आरडाओरडा ऐकून मागे आला, प्रवाश्याच्या गर्दीतून तेथे गेला, 'भाऊ, तुम्ही कमाल करता. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, दारूच्या बाटल्या महामंडळाच्या गाडीतून नेणे बेकायदेशीर आहे. बाटली कोणाची आहे?' यावर कोणीही उत्तर देण्यास तयार नव्हते. 'अरे, पहिले ती बाटली पहिले फेका, नंतर कोणी आणली याचा शोध लावा. कोणी कबुल करणार आहे का माझी बाटली आहे म्हणून, का हे सत्ययुग आहे?' अर्थात दोन्ही प्रश्नांचे उत्तर नाही हे होते, एकाने परस्पर वस्तुस्थिती स्पष्ट केली. 'अरे, आता काय फेकता? ती फुटली, तिच्या काचा फेका, पायाला लागतील.' एक प्रवासी ओरडला. 'पण मला हे समजत नाही, गाडीतून दारूच्या बाटल्या नेवूच कश्या देतात?' एका सात्विक संतप्त प्रवाशाचा संभावित प्रश्न. 'आता, प्रत्येक प्रवाश्याचे सर्व सामान तपासून पाहणार आहे का? आता येथे तुमचे सामान  तपासले तर ते तुम्हास चालेल का?' एका प्रवाश्याने बाटलीवाल्याची बाजू घेतली का समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, याचा थांगपत्ता लागू दिला नाही. वाहक पुन्हा आपल्या जागेवर बसला. 

पुन्हा साधारणतः १० - १५ मिनिटे झाली असतील की नाही, तोच मागून मोठ्यामोठ्याने आरडाओरडा ऐकू आला. 'अहो, कंडक्टरसाहेब, हा माणूस पहा मोठ्यामोठ्याने दारू पिवून गाणे म्हणतो आहे.' आता बाटली कोणी आणली होती, याचा आपोआप तपास लागला होता. त्या प्रवाश्याला अधेमध्ये उतरावे का त्याच्याच  ठिकाणावर उतरावे, याची चर्चा सुरु झाली. वाहक पुन्हा त्याचेपावेतो गेला. 'याला आत्ताच्या आत्ता खाली उतरावा' हे एकाचे मत, तर 'याला अधेमध्ये उतरवल्यावर, त्याचे नंतर काही भलेबुरे झाले तर आपल्यावर येईल.' हे सडेतोड उद्गार ऐकल्यावर थोडी शांतता पसरली, तेवढ्यात गाडीच्या चालकाने गाडी थांबविली. पहूर आले होते, 'पहूर' असा पुकारा झाल्यावर तो गाणे म्हणणारा डुलतडुलत उतरला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

पण तेवढयाने भागणार नव्हते कारण बस सुरु होते न होते तोच, एक कॉलेजकुमार ओरडला 'अरे मला उतरायचे आहे पण माझा मोबाईल सापडत नाही.' गाडीत हलकल्लोळ माजला. 'कोणी घेतला' हे वेगवेगळ्या स्वरात आणि वेगवेगळ्या व्यक्तींकडून बोलले जात होते. तेवढयात बाकीचे प्रवासी बस सुरु करणेसाठी गर्दी करावयास लागले. कॉलेजकुमारची अडचणीची परिस्थिती ही होती की त्याचे शेजारी एक कॉलेजकुमारी बसली होती आणि त्यांच्या जळगावपासून गुलुगुलु गप्पा सुरु होत्या. त्याने आणि इतरांनी त्या मुलीला मोबाईलबाबत विचारल्याबरोबर बसमध्ये तिने मोठा स्फोट केला, 'कमाल करताय, मी कशाला मोबाईल घेऊ?' 'मग इतका वेळ कसल्या गप्पा सुरु होत्या, आणि मोबाईलमध्ये पाहणे चालले होते?' एकाने मोठयाने शंका बोलून दाखवली. तो अजूनही 'लेकी बोले सुने लागे' या तत्वाने बोलत होता. शेवटी मुलीच्या नादी कोण लागेल हा गंभीर प्रश्न आणि 'पहूर' येथे उतरायचे असल्याने तो कॉलेजकुमार उतरला, मात्र त्याने 'मी मोबाईल हरवल्याची पोलीसात तक्रार नोंदणार आहे' हे उतरता उतरता सांगितले. भरपूर प्रवासी नेहमीप्रमाणे पहुरला बसमध्ये चढले आणि बस सुरु झाली. प्रवासी पुन्हा आपल्या विश्वात रममाण झाले.

बसचा वाहक पुन्हा नवीन चढलेल्या प्रवाशांसाठी तिकिटे  काढू लागला, दोन- तीन तिकिटे काढून झाली  किंवा नाही तोच मघाच्याच कॉलेजकुमारीने मोबाईल सापडल्याची आरोळी ठोकली, त्याबरोबर 'हा मोबाईल नंतरच का सापडला, अगोदर का नाही?' 'आता हा कसा द्यायचा? हं, या निमित्ताने भेटता येईल.' 'पोलिसांकडे जमा करा, नसत्या भानगडीत पडू नका. हल्ली मोबाईल आहे का  काही संशयास्पद आहे हे काही सांगता येणार नाही.' वगैरे मनस्थिती बिघडविणारे आणि डोक्याचे खोबरे करणारे आणि तशा परिस्थितीतही मनोरंजन करणारे संवाद ऐकू येवू लागले. बसचा वाहक त्रस्त होऊन गेला. त्याच्या मनात 'हा मोबाईल आपण घेतला आणि त्याचा मध्येच काही स्फोट झाला तर काय करायचे?' येथपासून ते 'मला या मोबाईलच्या भानगडीपाई बहुतेक पोलिस स्टेशनच्या  फेऱ्या कराव्या लागतील आणि माझी सर्व रजा या कोर्टकचेऱ्यात संपेल आणि बायकोला काय संशय येईल ते सांगता येणार नाही.' अथवा 'मला बहुतेक चोरीचा आरोप ठेवून सस्पेंड  करण्याचा डाव दिसत आहे.' हे विचार सुरु असल्याचे स्पष्टपणे त्याचे चेहऱ्यावर दिसत होते आणि  मनांत येत होते. शेवटी मी त्याला म्हणालो 'मोबाईल ताब्यात घ्या आणि डेपोत जमा करा, मी सांगायला येईन.' मग त्याला  आला, त्याने कॉलेजकुमारीकडून मोबाईल घेतला आणि 'आजकालच्या पोरांचे काही समजत नाही.' हा शेरा मारला. बस पुन्हा सुरु झाली, तो तिकिटे देवू लागला.

थोडा वेळ गेला, कदाचित १० - १५ मिनिटे असतील, तेवढयात त्याच्या खिशातून मोबाईलचा आवाज येऊ लागला, त्याचे लक्ष नव्हते, सारखा आवाज येत असल्याने त्याला तिकिटे देणे उमजेना, तो करवादून ओरडला, 'अरे, कोणाचा मोबाईल आहे? उचला आणि बोला काय ते.' त्यावर मी म्हणालो 'मोबाईल तुमच्याच खिशात वाजत आहे.' 'आं', त्याचा आश्चर्योद्गार. 'त्या कॉलेजकुमाराचा मोबाईल आहे.' मी स्पष्टीकरण दिले. 'हं' असे म्हणत त्याने मोबाईल घेतला आणि तो बोलू लागला. कॉलेजकुमार बोलत होता, चौकशी करत होता, मोबाईल परत मागत होता, वाहकाचे तिकिटे देण्याचे  खोळंबले होते, प्रवासी गलका करू लागले कारण त्यांचे उतरण्याचे ठिकाण जवळ येत होते. शेवटी वाहकाने 'टन' अशी घंटा वाजवली आणि बस थांबली. त्याच्या खिशातून पुनःपुनः मोबाईलचा आवाज येतच होता. गाडीच्या चालकाला समजेना कोणतेही ठिकाण आले नसतांना बस थांबण्याची घंटा का वाजली? 'काय झाले शर्माजी?' चालकाचा प्रश्न. 'पाटील, काय लोक झाले आहे, साली मला माझी ड्युटीसुध्दा करू देत नाही. नोकरी जाण्याचे लक्षण आहे. आता या मोबाईलवाल्याशी मी सारखे काय बोलू?' वाहक शर्माजी संतापून त्रस्तपणे म्हणाले. चालक पाटील याला यातील कोणतीही घटना माहित नव्हती त्यामुळे तो चक्रावून गेला की शर्माजीची नोकरी जाण्यासारखी आता बस सुरु असतांना कोणती घटना घडली आणि ती आपण गाडी चालवत असतांना देखील आपल्यास माहीत पडू नये, हे म्हणजे फारच झाले. अशामुळे आपल्यादेखील नोकरीवर गदा यायची की गाडी चालवत असताना गाडीत काय घडते आहे याची आपणास कल्पना  नको? चालक पाटील त्याच्या केबीनमधून खाली उतरला आणि वळसा घेवून गाडीत प्रवाश्यांच्या बाजूने चढला.

आता गाडी केंव्हा सुरु होईल यापेक्षा 'या मोबाईलच्या आवाजाचे काय करायचे?' हा प्रश्न त्या वाहक-शर्माजी आणि चालक-पाटील यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा होता. ही कोंडी काही केल्या फुटेना, लोकांचा आरडाओरडा फारच वाढला, 'पैसे परत करा' असे देखील काही प्रवासी म्हणू लागले. शेवटी मला राहवेना मी काही बोलणार तेवढ्यात पुन्हा मोबाईलची घंटा वाजली, 'हात तिच्या मारी. फेक तो मोबाईल.' वाहक आणि चालक एकदमच बोलले. 'त्याने पोलिसात तक्रार नोंदली आहे.' हे कोणीतरी म्हणाल्यावर त्यांनी तो विचार सोडून दिला, त्यांना सोडवा लागला. मी म्हणालो 'तो मोबाईल माझ्याजवळ द्या, मी बोलतो.' वाहकाला तेच हवे होते, त्याने तत्काळ मोबाईल माझ्याजवळ दिला, 'हे पहा, सारखी रिंग करू नका. हा मोबाईल आता मी बंद करत आहे, उद्या औरंगाबाद डेपोतून घेवून जावा.' असे म्हणून मी मोबाईल बंद केला आणि वाहक शर्माजीजवळ दिला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला, चालक-पाटील त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याने गाडी सुरु केली, वाहकाने दोन वेळा 'टण टन' अशी घंटा वाजविली आणि गाडी सुरु झाली.  लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाहक पुढच्या प्रवाशांची तिकिटे देवू लागला.

गाडी सुरु होती, साधारणपणे सिल्लोड जवळ येत होते. एका महिलेने तिकीट काढलेले नव्हते, 'कोठे जायचे आहे?' म्हणून वाहकाने विचारले तिने निर्विकारपणे 'सिल्लोडला' म्हणून सांगितले आणि १०० रुपयाची नोट काढली, वाहकाला देवू लागली. त्याने 'कोठून बसली?' म्हणून विचारले तर ती महिला मुत्सद्दीपणे लवकर उत्तर देईना. शेवटी वाहकाने विचारले 'अजंठ्याहून का?' तिने मान हलविली, त्यातून कसलाही अर्थबोध होत नव्हता, मात्र वाहकाने तिकीट फाडले. वाहक-शर्माजीमध्ये आता फारसे त्राण उरले नव्हते. त्याने तिकीट आणि सुटे पैसे त्या महिलेला दिले आणि सांगितले 'हं, हे तिकीट आणि हे उरलेले पैसे नीट मोजून घ्या.' आता त्या महिलेनेदेखील वाहकाची सत्वपरीक्षा पाहण्याचे ठरवले होते असे दिसते. तिने पुन्हा पहिल्यासारखी मान हलविली आणि सांगितले 'भाऊ, मले पैसे मोजता येत नाही, तूच मोजून दे आणि कमी भरले तर मी काय करू?' आता वाहक-शर्माजीचा कडेलोट झाला, 'माऊली, मी आता तुझ्या पाया पडतो, हे पैसे कोणाकडूनही मोजून घे. आज कोणाचे तोंड पहिले होते काही समजत नाही, जो तो माझ्या नोकरीवरच उठला आहे.' हे ऐकल्यावर त्या मुत्सद्दी म्हातारीने जास्त ताणून धरले नाही. तेवढयात सिल्लोड आले. म्हातारी गाडीतून उतरली. बस-स्थानक येण्याअगोदरच वाहक-शर्माजीने चालक-पाटीलला सांगितले 'आता, फक्त सिल्लोड बस-स्थानकावर बस न्यायची आणि लगेच थेट सुरु करून फक्त  औरंगाबादलाच थांबवायची, कोणी काहीही म्हणो अधेमध्ये अजिबात थांबवायची नाही. साले, आपल्या नोकरीवर डोळा आहे, उद्या आपली नोकरी गेली तर  काय वेळ येईल आणि असे अनुभव आणि असे प्रवासी म्हणजे 'असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ गाठ.'

सिल्लोड आले, बस थांबली आणि मग  लगेच निघाली, ती फक्त औरंगाबाद आल्यावरच थांबली, आमचा आमचा जळगाव औरंगाबाद प्रवास पूर्ण झाला.   

Sunday, January 18, 2015

'अति सर्वत्र वर्जयेत' - न्यायालयातील आठवणी - ४

'अति सर्वत्र वर्जयेत' - न्यायालयातील आठवणी - ४

माणसाच्या लबाडीची, लोभीपणाची आणि ती लबाडी, लोभीपणा आपल्यावर विपरीतपणे शेकते आहे, त्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे आणि हे पाहिले, की मग कसलाही विधिनिषेध, न ठेवता 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यं त्यजति पंडितः' या उक्तीचा ढोंगीपणे वापर करून, तात्काळ माघार घेवून पुन्हा आपलाच लोभीपणा सिध्द करणारी एक घटना आठवली.
घटना साधारणपणे सन १९८७ मधील आहे. आपल्या 'हिंदु कायद्यावर', पण त्यातील विषय लक्षात घेता, जुन्या हिंदू धर्मशास्त्रावर आधारलेली आहे. एक श्रीमंत गृहस्थ होते, त्यास मुलगा नव्हता, तर दोन मुलीच होत्या. मुलींचे विवाह त्याने आपल्या हातानेच करून दिलेले होते, आणि मुली सासरी संपन्न घराण्यात नांदत होत्या. दोन्ही मुलींचे विवाह झाल्यावर, स्वाभाविकपणे हे गृहस्थ आपल्या भावावर जास्त अवलंबून राहू लागले, आणि त्याची प्रत्यक्षात देखभाल ही, त्याचा पुतण्या करू लागला, यात कसलेही वावगे नव्हते. या गृहस्थाचा भाऊ देखील श्रीमंत होता, आणि त्याला आपल्या भावाच्या पैशाची काहीही गरज नव्हती. तो आपल्या भावाचे एक कर्तव्य म्हणून करत होता, त्यात त्यातून काही लाभ व्हावा ही फारशी अपेक्षा नव्हती. एके दिवशी हे गृहस्थ वयोमानानुसार त्यांचा देह सोडता झाले, अनंतात विलीन झाले. त्यांचे सर्व अंत्यविधी, क्रियाकर्म हे त्याच्याच पुतण्याने केले, त्यावेळी या गृहस्थाच्या दोन्ही मुली हजर होत्या. हे सर्व बिनबोभाट झाले, येथपर्यंत सर्व ठीक होते, मात्र त्यानंतर या मुलींच्या हावरटपणाची, लबाडीची आणि सर्व एकट्या आपल्यालाच मिळावे यासाठी डाव-प्रतिडाव सुरु झाले, आणि त्याचे पर्यवसान शेवटी न्यायालयात, त्यांच्या वडिलांच्या मिळकतीसंबंधाने दावा दाखल करून, एकमेकांच्या विरुध्द मनाईहुकुम मागणेत झाले. येथे ही घटना सुरु झाली.
दोन्ही मुलींना त्यांच्या काकाने समजून सांगितले 'भांडू नका, मला याचा लोभ नाही, हे सर्व तुमचेच आहे. माझा भाऊ तर गेला, होता तोवर मी त्याला सांभाळला, ते माझे कर्तव्यच होते, पण त्याच्या पश्चात तुमचे भांडणे बरोबर नाही.' हे त्यांना सांगितले, त्यांच्या नवऱ्याला सांगितले, त्यांनी संभावितपणे 'ही त्यांची माहेरची बाब आहे, आम्ही यात पडणार नाही' हे सांगितले, पण यातून त्यांचा लोभीपणा दिसत होता. मुलींच्या सासरची वडीलधारी माणसे बोलाविली, त्यांना 'हे दावे-फाटे करणे चांगले नाही, तुम्ही तुमच्या सुनांना समजवा, आणि हे दावे काढून टाका. याचा अजिबात चांगला परिणाम होणार नाही, मात्र दोन्ही बहिणीत तेढ वाढेल. वडील गेल्याबरोबर बहिणी भांडत आहे, आणि त्यांचा काका काय करीत आहे, हे गावातील लोक मला विचारीत आहे. माझे ऎका, आणि आपसात काहीतरी कमीजास्त करून संपवून टाका.' पण फारसा फरक पडला नाही, मात्र मुलीनी काकाला सुनावले, की 'संपत्ती आमच्या वडिलांची आहे, तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही, आम्हाला निष्कारण तत्वज्ञान सांगू नका, तुम्ही तुमच्या घरात लक्ष द्या. तुमचा येथे बोलण्याचा संबंधच कुठे येतो?' हे ऐकल्यावर काका चकित झाला. 'अरे, मुलींनो तुमच्या बापाला तुम्ही सांभाळले नाही, तर मी सांभाळले, त्यावेळी कुठे गेल्या होत्या तुम्ही?' काकाने अखेरचा प्रयत्न भांडण विकोपास जावू नये म्हणून करून पहिला. मुलींनी टोकदार उत्तर दिले 'आमच्या वडिलांचे पैसे तुम्ही कसे वापरले, हे आम्ही अजूनही विचारीत नाही, हे तुमचे नशीब समजा, आणि आता गप्प बसा.' मुलींचे काका हतबल झाले, त्यांना वाईट वाटले, राग आला, तो अपमानाचा जसा होता, तसाच मुलीना आपण आवरू शकत नाही, या असहायतेचा देखील होता. आता मुलींना कोणताही विरोध राहिला नसल्याने, मुलींचे दाव्याचे कामकाज जोरात सुरूच होते, आणि आता तर त्यात जोर आणि जिद्द वाढलेली होती.
जेंव्हा मुलींच्या काकाच्या हे लक्षात आले, की मुली ऐकण्यात नाहीत, तेंव्हा त्याने अखेरचा मार्ग म्हणून तो माझ्याकडे आला, 'वकीलसाहेब काहीही मार्ग काढा, आणि मुलींना त्यांच्या लोभीपणाचा कायमचा धडा शिकवा.' माझ्यापुढे मोठी समस्या उभी राहिली. मुलीच त्याच्या वडिलांच्या मिळकतीच्या वारस होत्या, आणि त्यांच्या शिवाय दुसरे कोणीही नव्हते, हे स्पष्ट दिसत होते, पण हिंमत सोडायची नसते, हे माहीत होते. मग मी विचारले, 'मुलींच्या वडिलांचे अंत्यसंस्कार कोणी केले?', त्या गृहस्थाने लगेच उत्तर दिले 'माझ्या मुलाने.' मी म्हणालो 'मग त्याचे काम पडेल.' त्यांनी उत्तर दिले 'काही हरकत नाही.'
त्या दिवशीपासून मी हिंदु कायदा अगदी तपशीलवारपणे वाचण्यास सुरुवात केली, मला 'हिंदु वारसा कायदा' यात फारसे काही मिळेना, मग 'धर्मशास्त्र' वाचण्याचे ठरवले. डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांचे 'History of Dharmashastras' या नावाचे एक अप्रतिम पुस्तक आहे, आणि हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील मानलेले आहे. याचे संक्षिप्तपणे महाराष्ट्र शासनाने 'धर्मशास्त्राचा इतिहास' या नावाने पुस्तक तीन खंडात काढलेले आहे, याचा मला खूप उपयोग झाला. मुलांची कर्तव्ये आणि मुलांचे अधिकार कोणास, केंव्हा प्राप्त होतात, हे विविध स्मृतींचा आधार देवून सांगितलेले होते. त्यात ज्याने पुत्राची कर्तव्ये पार पडलेली असतील, तो देखील पुत्राच्या अधिकारास कायद्याने पात्र ठरतो, असे स्पष्टपणे होते. मला मार्ग सापडला, मी त्या बहिणींच्या दाव्यात, माझा हितसंबंध असल्याने, मला सामील करून घ्यावे म्हणून अर्ज दिला, त्यात सर्व घटना तपशीलवारपणे लिहिल्या. हा एक नवीनच प्रकार होता जो 'धर्मशास्त्रावरील नियमांवर' आधारलेला होता. 'हिंदु वारसा कायदा, १९५६' मध्ये ज्या तरतुदी नसतील, त्यास पूर्वीचा धर्मशास्त्रावरील हिंदु कायदा लागू होईल, हे स्पष्टपणे होते. याचा मला उपयोग झाला, माझा मुलींच्या दाव्यात मला सामील करून घ्यावे आणि माझे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, हा अर्ज मंजूर झाला. या निर्णयाने त्या बहिणी हादरल्या, त्यांनी वरील न्यायालयात या निर्णयाविरूध्द दाद मागितली, मात्र तेथे देखील न्यायालयाने त्याचे अपील रद्द केले, कारण केवळ पक्षकार म्हणून सामील झाल्याने काही बिघडत नाही, मात्र सर्व पक्षकारांचे अधिकार आणि त्याबाबतचे प्रश्न हे एकाच दाव्यात संपावयास हवेत, हे कायद्याचे तत्व असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बहिणींना आता काही सुचेनासे झाले, आता गावात चर्चा सुरु झाली की 'वडिलांच्या संपत्तीत मुलींचा काय संबंध? त्यात मुलांचाच हिस्सा असतो, आता ज्याने 'क्रियापाणी' केले आहे तो पोरगा नाहीतर कोण?' मुली मग त्यांच्या काकांकडे आल्या, विनवणी करू लागल्या, कारण आता त्यांना अशीदेखील शंका यावयास लागली, की 'अंत्यसंस्कार करणारा हा मुलगा आहे' असे ठरले तर मग वडिलांच्या संपत्तीतून काहीही मिळण्याची शक्यता राहणार नाही, तेंव्हा जे मिळत आहे, ते पदरात पाडून घ्या, जास्त लोभात गेले, तर काय मिळेल, किंवा काहीही मिळणार नाही, हे सांगता येत नाही. त्यांनी काकांची क्षमा मागितली, शेवटी त्यांची काकांच्या म्हणण्याप्रमाणे तडजोड झाली आणि त्यांनी न्यायालयातून आपापले दावे काढून घेतले.
माणसास विनासायास संपत्ती मिळावयास लागली, की ती जास्तीत जास्त कशी मिळवता येईल, याचा माणूस विचार आणि त्यानुसार कृती करू लागतो. त्यात तो इतका वाहवत जातो की त्याच्या केवळ पूर्वीच्या इच्छेचे रुपांतर हावरटपणात, लोभीपणात कसे आणि केंव्हा होते हे त्याचे त्यालाच समजत नाही. मग त्याला मिळणाऱ्या पैशाचा लोभ, हा त्याचेवर अवलंबून असण्याऱ्या सर्वाना होवू लागतो, आणि ते देखील त्याला मग प्रोत्साहन देवू लागतात. याचा परिणाम असा होतो की तो शुध्दीवर येण्याची शक्यता कमीकमी होत जाते, आणि आपण वागतो आहे तेच बरोबर आहे, असे त्याला वाटू लागते. त्यास सुभाषिताचा मुलामा देण्याचे काम, अर्धशिक्षित-लोभी करतच असतात, आणि 'सर्वे गुणः कांचनम आश्रायन्ति' म्हणून त्याचे समाधानच करीत नाही, तर त्याच्या कृतीला एक अधिष्ठान मिळवून देतात. हे सर्व इतके चमत्कारिकपणे घडते, की याचे आपल्या कुटुंबातील संबंधावर, समाजस्वास्थ्यावर काय परिणाम होतील याची फिकीर देखील कोणास नसते. आपले समाधान, ते 'उद्याचे कोणी पहिले आहे? आज आहे तर प्राप्त करा.' ही धारणा बनते, आणि मग या व्यक्ती अशा काही टोकाला जातात, की मग तेथून त्यांना परत फिरणे जवळ जवळ अशक्य होवून बसते. नंतर तडजोड जरी झाली तरी त्यांचे संबंध क्वचितच पूर्ववत होतात, कारण यातून सर्वांचे खरे स्वभाव प्रकट झाले असतात, मग या घटने नंतर त्यांच्याशी कोणीही वागताना त्यांच्या या पूर्वीच्या कृतीच्या अनुभवानेच वागत असतात. हे न्यायिक - सामाजिक विवेचन न्याय देतांना महत्वाचे असते, हे अशी हावरट, लोभी माणसे जरी विसरत असली तरी आपली 'न्यायव्यवस्था' आणि 'समाजव्यवस्था' ते विसरत नाहीत. आपल्याला जे टिकवून ठेवावयाचे आहे ते हे आहे, एवढे लक्षात ठेवले, आणि त्याप्रमाणे आचरण केले की समाजातील समस्या खरोखरच कमी होतील.

मकर संक्रांत आणि मकर संक्रमण

नुकतीच 'मकर संक्रांत' झालेली आहे. आपण आपल्या परंपरेप्रमाणे आणि सांस्कृतिक पध्दतीप्रमाणे हा सन 'तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला' हे बोलत थेट 'रथ सप्तमी' पावेतो साजरा करीत असतो. या दोन्ही सणांचे महत्व केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक, खगोलशास्त्रीय, ज्योतिष्यविषयक आणि सांस्कृतिक देखील आहे, म्हणून आपल्या या सणांकडे आपण केवळ उत्सव म्हणून न पाहता त्यातील तत्व समजावून घेतले पाहिजे आणि ते अंगिकारले पाहिजे.

आपल्या मराठी विश्वकोशामध्ये 'मकर संक्रमण आणि मकर संक्रांत' याबाबत महत्वाची माहिती थोडक्यात दिलेली आहे ती येथे देणे अयोग्य ठरणार नाही -

'सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात. २२ डिसेंबरच्या सुमारास अवष्टंभ बिंदूवर वसंतसंपात बिंदूपासून २७० अंशांवर सूर्य येतो त्या वेळी सूर्याची दक्षिण क्रांती (खगोलीय विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर) सर्वांत अधिक म्हणजे २३° २७' असते. या वेळी सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त दक्षिणेस दिसतो, त्यानंतर तो उत्तरेकडे सरकू लागतो म्हणजे ⇨उत्तरायण सुरू होते. या वेळी सूर्य सायन मकर राशीत [निरयन-सायन] प्रवेश करीत असतो म्हणून यास सायन मकर संक्रमण म्हणतात.

स्थिर राशिचक्राच्या कल्पनेत क्रांतिवृत्तावरील (सूर्याच्या भासमान वार्षिक गतिमार्गावरील) एका ताऱ्यापासून क्रांतिवृत्ताचे १२ समान भाग म्हणजे राशी केलेल्या असतात. या राशी आकाशात तारकांसापेक्ष स्थिर (निरयन) असतात. सध्या या चक्राच्या आरंभबिंदूपासून वसंतसंपात बिंदू प्रतिवर्षी सु. ५०'' याप्रमाणे सु. २३° ३६' पश्चिमेकडे सरकलेला आहे. या दोहोंमधील कोनात्मक अंतरास अयनांश म्हणतात. यामुळे निरयन मेष राशीचा आरंभबिंदू सायन मेष राशीच्या आरंभबिंदूच्या पूर्वेस २३° ३६' आहे व सूर्याच्या सायन मेष संक्रमणानंतर सु. २३ दिवसांनी निरयन मेष संक्रमण घडते. त्याचप्रमाणे सायन धनू राशीतून मकर राशीत सूर्य २२ डिसेंबरच्या सुमारास प्रवेश करतो, तर निरयन धनू राशीतून निरयन मकर राशीत त्यानंतर सु. २३ दिवसांनी म्हणजे १४ जानेवारीच्या सुमारास प्रवेश करतो. यासच निरयन मकर संक्रमण म्हणतात (शुद्ध निरयन पंचांगाचे अयनांश सु. १९° ३६' असल्यामुळे या पंचागानुसार निरयन मकर संक्रमण २२ डिसेंबरनंतर १९ दिवसांनी म्हणजे १० जानेवारीस घडते).

लागोपाठच्या दोन वर्षांतील सूर्याचा मकर प्रवेशातील कालखंड हा नाक्षत्र वर्षाच्या अवधीइतका म्हणजे ३६५ दि. ६ ता. ९ मि. ९.७ सेकंद आहे (प्रत्यक्षात हा ११ मिनिटांपर्यंत कमीजास्त होत असतो). यामुळे मकर संक्रमणाचा क्षण दर वर्षी सु. ६ तासांनी पुढे सरकतो; पण दर चार वर्षांनी धरल्या जाणाऱ्या लीप वर्षामुळे निरयन मकर संक्रमणाच्या तारखेत बदल होत नाही. मात्र मकर संक्रमणाचा क्षण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळात येत असेल, तर पुण्यकाल त्याच दिवशी धरावयाचा व सूर्यास्तानंतर येत असेल, तर पुढचा दिवस संक्रांती म्हणून मानावयाचा अशी पद्धत असल्यामुळे मकर संक्रांत क्वचित एका दिवसाने पुढे जाऊ शकते.

वसंतसंपात बिंदू सु. ७०-७२ वर्षांनी एका अंशाने आणखी पश्चिमेकडे सरकणार असल्यामुळे अयनांश सु. एका अंशाने वाढतील व निरयन मकर संक्रमण एका दिवसाने पुढे सरकेल. ७२ वर्षांपूर्वी मकर संक्रमण १३ जानेवारीस येत असे.

मकर संक्रांत : सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतीय सण. वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळेच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटते. आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते तेव्हा त्यांना हे संक्रमण अधिकच आनंददायक वाटत असले पाहिजे. पूर्वी उत्तरायणाचा प्रारंभ हाच वर्षारंभ असावा इ. प्रकारची मते आढळतात.

सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार,भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्या वेळी तिसऱ्या दिशेकडे पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळेच संक्रात येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्ये करीत नाहीत.

भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात त्या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला ’खिचडी संक्रांती’ असे म्हणतात. बंगालमध्ये त्या दिवशी काकवीत तीळ घालून बनलेला ’तिळुआ’ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूपसाखर घालून केलेला ’पिष्टक’ नावाचा पदार्थ खातात व वाटतात म्हणून तेथे संक्रांतीला ‘तिळुआ संक्रांती’ व ‘पिष्टक संक्रांती’ असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी ⇨पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगळ वा इंद्रपोंगळ, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगळ आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगळ साजरा केला जातो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती या देवीने किंकर नावाचा दैत्य मारला, अशी कथा असून तो दिवस अशुभ मानला जातो.

संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानले आहे. त्या दिवशी प्रयाग, गंगासागर इ. ठिकाणी प्रचंड मेळे भरतात. या दिवशी पितृश्राद्ध करावे असे सांगितले आहे. गंगा सागरात स्नान करून पिंड अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात स्त्रिया मृत्तिका घटाचे दान देतात व देवाला तीळ-तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यवाण लुटतात. सुनाग नामक ऋषींनी जाबाली ऋषींना संक्रांतीचे माहात्म्य सांगितल्याची कथा आढळते. या दिवशी तिळगूळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी वहिवाट आहे.

हा सण माणसांच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत, विविध वस्तूंचे दान देण्याचा आग्रह, दूरच्या संबंधितांना शुभेच्छापत्रे व तिळगूळ वगैरे पाठविण्याची पद्धत, सुवासिनींनी आपल्या घरचे तांदुळ दुसऱ्यांच्या घरच्या आधणात शिजविण्याची व दुसऱ्यांच्या घरात असोला नारळ सोडण्याची कोकणातील प्रथा इ. गोष्टी सामाजिक अभिसरणाच्या द्योतक आहेत.'

Saturday, January 3, 2015

न्यायालयातील आठवणी - ३

मित्रांनो, हा अनुभव उच्च न्यायालय - खंडपीठ औरंगाबाद येथील आहे, मा. न्यायाधीशांच्या मनात असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवणारा आहे.  एवढेच नाही तर नैतिकता, समाजातील असलेल्या अडचणींप्रती असलेली जाणीव आणि कायदा यांचा सुरेख सांगड घालणारी आहे. मला नाही वाटत कि या निर्णयामुळे अगदी विरुध्द बाजूला देखील आपल्याविरुध्द निर्णय झाला अशी वाटले नसेल. मला अगदी की हीच शक्यता खूप असेल कि 'भगवानके घरमे दर है, लेकिन अंधेर नहि' अशीच त्यांची देखील भावना झालेली असेल. असो, आता घटना सांगतो.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा एक ड्रायव्हर होता. आपणास चारचाकी वाहन आणि विशेषतः 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची' बस जर चालवायची असेल तर ड्रायव्हरच्या दृष्टीने दोन्ही पायांचे महत्व किती असते याची कल्पना असेल. दुर्दैवाने त्यास दिनांक १५ / ७ / १९९४ रोजी अपघात झाला आणि त्याचा एक पाय त्यमुळे कापावा लागला, त्याने लाकडाचा 'जयपुर फूट' बसवला. त्याची हि परिस्थिती पाहून अगदी स्वाभाविकपणे 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ' यांनी त्यास 'वैद्यकीय तपासणी' करीता पाठविले कारण उधड होते, आता तो कोणतेही वाहन चालवू शकत नव्हता आणि अशी व्यक्ती ही ड्रायव्हर म्हणून काही कामाची राहिलेली नव्हती, ज्याचा अगदी स्वाभाविक परिणाम त्याला ही नोकरी केंव्हातरी गमवावी लागणार होती. 'वैद्यकीय अहवाल' आला की हा ड्रायव्हर म्हणून कामास योग्य नाही. त्याला कामावरून काढणे अपरिहार्य होते, तो दिनांक २१/६/१९९५ रोजी कामावरून काढला गेला आणि सरतेशेवटी निरोद्योगी झाला, उद्योग नसल्याने पगार नाही, जी काही थोडीफार पुंजी होती ती तोपावेतो औषधपाण्यात संपून गेली होती. नवीन नोकरी मिळणे याची शक्यता मृगजलामुळे तहान भागते एवढीच होती. येथे धडधाकट व्यक्तीला नोकरी मिळण्याची मारामार आणि अशा अपंग व्यक्तीला तेथे कोण विचारणार? हा कामगार न्यायालयात गेला, तेथे देखील कायदेशीर बाबींमुळे त्याचा अर्ज दिनांक १२ / ८ / १९९९ रोजी फेटाळला गेला. त्याने 'तो पडेल ते काम करण्यास तयार असून काहीतरी काम द्या' असे विनंती अर्ज 'महामंडळाकडे' केले, उपयोग झाला नाही.

तो निराश अवस्थेत असताना त्याला माझा रस्ता दाखविला गेला, तो माझ्याकडे तशाच अवस्थेत २०१० मध्ये आला, मला वाईट वाटले. 'सत्याचा वाली परमेश्वर' असतो यावर माझी पूर्वीपासून नितांत श्रध्दा आहे आणि समाज ती त्याच्या वर्तवणूकीने दिवसेंदिवस वाढवीत आहे. मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, याचिका दाखल करण्यास झालेला विलंब अक्ष्यम्य वाटत होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास नोटीस निघाली, त्यांचे वकील हजार झाले, त्यांनी त्यांच्या कायदेशीर बाबी मांडल्या आणि ही याचिका कायद्याने रद्द करावी हि विनंती केली. प्रत्येकवेळी सर्व कथा एकूण झाल्यावर घटनेनंतर १६ वर्षांनंतर न्यायालयात दाद मागणे हे कसे बसेल हेच सांगितले, यावर माझ्याकडे कसलेही उत्तर नव्हते. मी मात्र The Persons with Disabilities (Equal opportunities, Protection of Rights and Full Participation) Act, 1995 and Government Resolutions, Notifications and Order of the Government of India वगैरे सांगत होतो आणि पुन्हा काही मिळते का यासाठी वेळ मागत होतो, माझी आणि माझ्या पक्षकाराची अवस्था पाहून मला वेळ मिळत होता, पण असे किती वेळ करणार आणि त्यातून काय साध्य होणार हा प्रश्नच होता.

एकदा अशी वेळ आली की न्यायालय मुदत देणार नव्हते, मग 'हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा व भोक्ष्यसे महिं' आठवले, मी बोलून गेलो, 'त्याला येथे नाही न्याय मिळाला तर कुठे मिळणार? उशीर झाला हे नक्की पण त्यामुळे अशा परिस्थितीतील व्यक्तीला न्याय नाकारणे कसे बरोबर होईल, हे नितीतत्वांच्या विरुद्ध आहे. माझे आणि पक्षकाराचे भाग्य हे की हे मा. न्यायाधीशांना पटत होते, त्यांनी 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ' यांच्या वकिलांना 'तुम्ही अधिकाऱ्यांना विचारून सांगा' असे सांगून काम पुढे ठेवले. मला हायसे वाटले, नंतर काम निघाले आणि  'सत्याचा वाली परमेश्वर' याची मला पुन्हा एकदा प्रचिती आली, महामंडळाच्या वकिलांनी सांगितले की 'त्याला कामावर घेवू मात्र नवीन नेमणूक दाखवू'. आता जास्त ताणण्यात अर्थ नव्हता, मा. न्यायालयाने त्यानुसार दोघांचे एकूण घेऊन आदेश केला आणि त्या माझ्या पक्षकाराला नंतर कामावरही घेतले.

येथे न्यायालयात दाद मागण्यास उशीर केला होता या तांत्रिक बाबींवर याचिका रद्द करायची की त्याच्या परिस्थितीकडे, असहायतेकडे पाहता त्याला 'न्यायमूल्यांना' धक्का न लावता न्याय देण्याचा प्रयत्न करायचा एवढाच प्रश्न होता. मात्र येथे न्यायदानाचे कमी सहभाग हा जसा 'मा. न्यायाधीशांचा' असतो तसाच तो आमच्यासारख्या अधिवक्त्यांचा देखील असतो ही बाबा देखील तेवढीच महत्वाची आहे. ना. सर्वोच्च न्यायालयाने कित्येक प्रकरणात जी अपेक्षा व्यक्त केली आहे की 'सर्वसाधारण पक्षकार जसा वागतो तसे 'राज्य' या संकल्पनेत येणाऱ्याने वागायचे नसते तर त्याने 'आदर्श मूल्ये' मनात ठेवून तसे वर्तन करावयाचे असते'. मित्रानो, ही बाब आपल्यासाठी नवीन नाही, ती आपल्याकडे अगदी चिरंतनपणे चालत आलेली आहे, पश्न फक्त 'ती आपण टिकवून ठेवतो का तिचा आपल्याहातून आपल्या स्वार्थापोटी आणि तात्कालिक फायद्याकरिता ऱ्हास होतो' एवढाच आहे.