Sunday, December 28, 2014

शिक्षकांचा अभ्यासक्रम

शिक्षकांसाठी पांच वर्षांचा अभ्यासक्रम ठेवणार आहे, हेतू हा की शिक्षक चांगले मिळावेत. विचार अतिशय स्तुत्य आणि आजची आपल्या बहुतांश शिक्षकांची शिकवण्याची पध्दत पाहता आवश्यक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. यामध्ये आजच्या शिक्षकांना कमी लेखणे अथवा त्याच्या कामाबाबत, त्यांनी मिळवलेल्या पात्रतेबाबत असलेले प्रश्नचिन्ह हा अजिबात हेतू नाही मात्र त्याबाबत मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की मी 'जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये' ४ थी पर्यंत होतो, त्यातील काही शिक्षक हे कदाचित त्याकाळचे matric देखील नव्हते, ते होते 'व्ह. फा.' म्हणजे 'व्हर्नाक्युलर फायनल' ही परीक्षा ७ वी नंतर असायची, त्यांचे हे शिक्षण आजच्या मानाने काहीही नसेल कदाचित आजच्या असलेल्या शिक्षकांच्या हव्या असलेल्या पात्रतेच्या दृष्टीने ते अपात्र असतील, आज जर ते शिक्षकांसाठी अर्ज करतील तर त्यांचे अर्जदेखील योग्य म्हणून स्विकारले जाणार नाही आणि त्या पात्रतेवर त्यांना आज शिक्षकांची नोकरी मिळणे तर अशक्य कोटीतील बाब ! इतके असले तरी मला येथे आवर्जून सांगावेसे वाटते कि सन १९६७ ते १९७० या काळात आम्हास ज्यांनी शिकवले त्यास आज इतकी वर्षे झाली आहेत मात्र मला आजही पहिलीला असणारे 'बोरोले गुरुजी, दुसरीला असणाऱ्या डेरेकर बाई, तिसरीला असणारे गुरव गुरुजी आणि चौथीला असणारे पठाण गुरुजी' यांनी शिकविलेले धडे आणि धडे शिकवताना ज्या त्यांच्या लकबीसह शिकवले त्यासह आठवतात, आजच्या किती विद्यार्थांना की आज जे कॉलेजमध्ये आहेत त्यांना आपले 'गुरुजी आणि त्यांनी शिकवले धडे' आठवतात?

मित्रानो, शिकवण्याची कायदेशीर असलेल्या पात्रतेपेक्षा त्याची शिकवण्याची इच्छा आणि कळकळ किती आहे हे महत्वाचे आणि विद्यार्थ्यावर कायमचे परिणाम करणारे असते आणि आहे. इंजिनीरिंगला प्रवेश मिळत असतांना, त्या काळातील 'तहसीलदार, डे. कलेक्टर' ही नोकरी मिळत असतांना देखील या व्यक्ती 'शिक्षक' बनल्या होत्या आणि त्यांनी आम्हास हायस्कूल मध्ये शिकवले होते. म्हणूनच हा जो शिक्षकांसाठी पात्रतेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरु करण्याची घोषणा केलेली आहे ही ज्यांची शिक्षक होण्याची खरच इच्छा आहे त्यांना प्रोत्साहन देण्यास उपयुक्त ठरू शकेल असे वाटते.         

Thursday, December 25, 2014

भारतमातेची रत्ने - 'भारत रत्ने' भाग - 2

मित्रानो, या 'भारत रत्नांमध्ये', म्हणजे 'भारत रत्न' पुरस्कारांमध्ये आज अजून दोन नांवे समाविष्ट झालीत.  पहिले म्हणजे -  आपल्या पारतंत्र्यात १९०९, १९१३, १९१९ आणि १९३२ साली कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिलेले, नंतर 'हिंदू महासभेचे' पुरस्कर्ते झालेले, तसेच 'बनारस हिंदू विद्यापीठाचे' संस्थापक 'पंडित मदन मोहन मालवीय' आणि दुसरे म्हणजे 'मा. अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी' नाव समाविष्ट झाले आहे,  'मा. अटलबिहारी वाजपेयी' यांचा आज वाढदिवस, या निमित्ताने देशाने त्याच्या देशकार्याची आठवणीने पावती दिली हे फार चांगले झाले. ते दिनांक २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वालियर येथे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात सौ. कृष्णादेविच्या पोटी जन्माला आले. शिक्षक वडिलांची काव्यवृत्ती घेऊन जन्माला आलेले अटलजी हे 'सरस्वती शिशु मंदिरातून' शिक्षण घेऊन आपले महाविद्यालयीन शिक्षण ग्वालियर येथील 'विक्टोरिया कॉलेज' - आताचे ' राणी लक्ष्मीबाई कॉलेज' येथे घेऊन विशेष श्रेणीत इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत पदवीधर झाले. त्यानंतर आपले पदव्युत्तर शिक्षण कानपूरला 'दयानंद अंग्लो कॉलेज' येथे घेतले आणि ते एम ए प्रथम श्रेणीत झाले. 'आर्य समाज्याच्या' युवक कार्यकर्त्यांमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी १९४४ मध्ये जबाबदारी पार पाडली. १९३९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्यावर १९४७ ला प्रचारकाचे काम केले.

त्यांनी सन १९५१ मध्ये 'भारतीय जनसंघ' या राजकीय हिंदुत्ववादी पक्षाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे सोबत जबाबदारी सांभाळली.  त्यानंतर ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेसोबत काश्मीर येथे त्यांचे 'आमरण उपोषण' सुरु असताना होते, दुर्दैवाने 'श्यामाप्रसाद मुखर्जी' हे तुरुंगात असताना १९५७ मध्ये वारले. 'मा. अटलजी १९५७ मध्ये लोकसभेत 'बलरामपुर' मतदार संघातून निवडून आले. आपल्या अमोघ वक्तृत्वाची तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचेवर पडलेली छाप ही 'पंडित नेहरूंनी' त्यांना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून भविष्यवाणी करती झाली. आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने, कमालीच्या संघटन कौशल्याने ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचेनंतर 'भारतीय जनसंघाचे' नेता झाले. सन १९६८ साली ते 'भारतीय जनसंघाचे' राष्ट्रीय अध्यक्ष झाले, त्यांचे सोबत तेवढेच समर्थ असे नानाजी देशमुख, बलराज मधोक आणि लालकृष्ण अडवाणी होते.

सन १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात ते तुरुंगात होते. जयप्रकाश नारायण यांच्या हाकेला प्रतिसाद देवून सामाजिक बदलासाठी, कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी 'भारतीय जनसंघ' आणि इतर विरोधी पक्षांचा ''जनता पक्ष' बनला. सन १९७७ च्या 'जनता पक्षाच्या' विजयानंतर ते 'पंतप्रधान मोरारजी देसाई' यांच्या मंत्रिमंडळात 'परराष्ट्र मंत्री' झाले आणि त्यांनी 'युनो' मध्ये प्रथमच 'हिंदीत' भाषण केले. 'जनता पक्षाच्या' पतनानंतर सन १९८० मध्ये जुन्या एका विचाराच्या लोकांनी जसे, लाल कृष्ण अडवाणी, भैरो सिंग शेखावत वगैरे, पुन्हा एकत्र येवून 'भारतीय जनता पक्ष' नावाने राजकीय पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे ते प्रथम अध्यक्ष झाले. मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमिबाबत सर्व देशभर 'विश्व हिंदू परिषदेने' जनजागृती केली. 'भारतीय जनता पक्षाला' ही भूमिका मान्य होती. मुंबई येथे १९९५ मध्ये भरलेल्या 'भारतीय जनता पक्षाच्या' संमेलनात 'लाल कृष्ण अडवाणी' यांनी १९९६ मध्ये येणाऱ्या निवडणुकात विजयी झाल्यावर 'अटलजी' पंतप्रधान होतील हे जाहीर केले, 'भाजप' विजयी झाला.

राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी 'भाजप' हा सर्वात मोटा पक्ष असल्याने त्यास सरकार बनवण्यासाठी पाचारण केले, पण दुर्दैवाने केवळ १३ दिवसात त्यांना त्यांचेकडे बहुमत नसल्याने राजीनामा द्यावा लागला. तोडफोडीचे राजकारण करण्याचे विरुद्ध त्याची भूमिका असल्याने अशारितीने सत्ता टिकवून धरण्यापेक्षा ती सोदलेली केंव्हाही चांगली हि त्यांची प्रामाणिक भूमिका होती. सन १९९६ ते १९९८ या काळात 'संयुक्त आघाडीचे' सरकार होते, मात्र ते न टिकल्याने लोकसभा बरखास्त झाली. सन १९९८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी' च्या रूपाने 'अटलजी' पुन्हा पंतप्रधान झाले, ते सरकार १३ महिने टिकले आणि १७ एप्रिल १९९९ रोजी विश्वासदर्शक ठरावासाठी एक मत कमी पडून सरकार गडगडले, त्यावेळी देखील सत्ता टिकवण्यासाठी नैतिकतेचा बळी दिला गेला नाही. विरोधी पक्षांना फक्त सरकार पडावयाचे होते, ते त्यांचे कार्य साध्य झाल्याने आणि सत्ता स्थापणेसाठी त्यांचेकडे देखील बहुमत नव्हते, त्यामुळे पुन्हा लोकसभा विसर्जित झाली, 'अटलजींचे' मंत्रिमंडळ पुढील नवीन व्यवस्थेपर्यंत कार्यवाहक मंत्रिमंडळ म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र जनतेने चूक केली नाही आणि 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी' बहुमतात आली, 'मा. अटलबिहारी वाजपेयी' पंतप्रधान झाले, शपथविधी दिनांक १३ ऑक्टोबर १९९९ रोजी झाला, या सरकारने २००४ पावेतो नियमितपणे पूर्ण काम पहिले.

त्याच्या कार्कीर्दीतीन महत्वाच्या घटना -
१. मे १९९८ मध्ये पोखरण येथे भूमिगत अणुस्फोट - भारताची अणु विषयक ताकद जगास दिसली
२. लाहोर शिखर परिषद - वाटाघाटीच्या, शांततेच्या मार्गाने जाण्याची नेहमीची भारताची परंपरा आणि निती  जोपासली
३. कारगिल विजय - पाकीस्थानच्या नेहमीच्या त्रासदायक प्रकारावर पुन्हा भारताचा विजय
४. प्रधान मंत्री ग्रामसडक योजना
५. संसदेवर हल्ला
६. आर्थिक सुधारणा
७. गुजराथ दंगे

मित्रांनो, ही त्याच्या कारकिर्दीची जंत्री एवढ्याने संपत नाही, तर ती मला पडलेल्या खालील प्रश्नांनी थोडीफार पूर्ण होवू शकते -
१. 'अजातशत्रू' असलेले व्यक्तिमत्व आता राजकारणात किती राहिलेले आहे?
२. नैतिक मुल्ये राजकारणाच्या चिखलात जपणारे आणि ती कायम टिकून राहावयास हवी असे मनापासून वाटणारे, तसे आचरण करणारे सध्या किती राजकारणी राहिले आहेत?
३. उत्तम बौध्दिक संपदा असूनही आपले सर्व आयुष्य समाजाच्या सेवेसाठी कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता देणारे आणि विशेषतः आपल्या पक्षाची, विचारांची राजकारणात बऱ्याच काळापावेतो  होत असलेली ओढाताण पाहता पक्ष तसेच विचार न बदलविणारे सद्यस्थितीत किती जन मिळतील?
४. धकाधकीच्या जीवनात काव्यवृत्ती टिकवून ठेवणारे कितीसे राहिलेले आहेत?

प्रश्न खूप आहेत, लिहावे किती हा देखील एक प्रश्न आहे. मला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची राष्ट्राबाबतची कल्पना आठवली, ती त्याच्याच शब्दात -
                         'स्वतंत्रतेची ही मूल्ये आम्ही नीट समजून घेतली पाहिजेत. स्वतंत्रता कधीही एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीसमुहाच्या स्वार्थसिद्दीचे साधन बनू शकत नाही. असेल, तो व्यक्तीसमूह कितीही मोठा असेल, अगदी पन्नास कोटींचा असेल; तरीही त्यांचे स्वार्थसाधन हे काही स्वतंत्रतेचे उद्दिष्ट नव्हे. स्वतंत्रतेला स्वार्थासाठी राबविणे म्हणजे तिला तिच्या उच्चासनावरून खाली ओढून तिची धूळधाण करणे होय. स्वार्थसिद्धीचा दृष्टीकोन स्विकारून जर आपण आपले काम करू लागलो तर मग आपल्याला स्वातंत्र्याची खरी अनुभूतीही मिळू शकणार नाही आणि आपण विश्वाची सेवाही करू शकणार नाही. स्वार्थी आणि अहंकारी वृत्तीने जर आपण देशाची कामे करू लागलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. '      
       
आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना 'शतायुषी करणेबाबत परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.

सरतेशेवटी 'मा. अटलजींची' कविता द्यावीशी वाटते -

आओ फिर से दिया जलाएँ

आओ फिर से दिया जलाएँ
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ

हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आंखों से ओझल
वतर्मान के मोहजाल में-
आने वाला कल न भुलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ।

आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज़्र बनाने-
नव दधीचि हड्डियां गलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ

- भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी  

भारतमातेची रत्ने - 'भारत रत्ने' भाग - १

आपल्या भारतमातेने संपूर्ण जगाला खूप काही दिलेले आहे, ज्ञान, आदर्श, पराक्रम, नीतीमूल्ये, राजकारण, किती क्षेत्रे सांगावीत?  आणि आजही देतच आहे. ते विज्ञान क्षेत्रातील वैद्यानिक असतील, वैद्यकीय क्षेत्रातील वैद्य / शल्यकर्मतज्ञ असतील, पुराणकाळात दुष्टांचे निर्दालन करणारे भगवान परशुराम असतील, आदर्शांचे आदर्श असे मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असतील, 'परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ! धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे !!' असे भगवान कृष्ण असतील, जगतास शांतीचा संदेश आणि त्याची लोकविलक्षण देणगी देणारे 'भगवान गौतम बुध्द', अहिंसेचे तत्वज्ञान समर्थपणे मांडणारे 'भगवान महावीर' असतील. 

अलिकडच्या ऐतिहासिक काळातील वीरांचा आणि देशप्रेमाचा मूर्तिमंत पुतळा असे महाराणा प्रताप, छत्रपति शिवाजी महाराज असतील, 'धर्मासाठी मरावे, मरोनि अवघ्यांसी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले' ही 'समर्थ रामदासांची' वाणी प्रत्यक्षात आणणारे 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' यांचे नांव कोण विसरू शकेल? 'आधी मुळावर घाव घाला, मग फांद्या आपोपाप खाली येतील' हे राजकारणातील पराक्रमाचे सत्य सांगणारे त्या काळातील सर्वश्रेष्ठ सेनापती 'बाजीराव पेशवे' असतील, किती जणांची नावे घेणार?

'माझ्या मराठीची बोली कौतुके, अमृतातेही पैजा जिंके' असे सांगून सर्व जगतास आपल्या पसायदानात 'जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात' अशी परमेश्वराची आळवणी करणारे आणि आपल्या समाजाने ज्यांचा कमालीचा छळ केला असतांना देखील स्वतःसाठी काहीही न मागता सर्व प्रनिमात्रांसाठीच मागणारे 'संत ज्ञानेश्वर' आम्ही विसरू शकतो का? 'जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले, देव तेथेचि ओळखावा' हे देवाचे वस्तीचे सोपे ठिकाण सांगणारे 'संत तुकाराम', 'लंगड्या देवाची' आळवणी करणारे आणि गंगेची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखी ओतणारे - शूद्र मानल्या गेलेल्या समाजातील घटकाच्या मुलाला कडेवर घेवून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे 'संत एकनाथ', 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा' म्हणून प्रत्यक्ष 'पांडुरंगाची' खरडपट्टी काढणारे 'संत चोखा मेळा असतील, 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' असे निक्षून सांगणारे आणि संपूर्ण भारतभर 'ज्ञानदीप' लावणारे 'संत नामदेव' ! 'मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई रे' म्हणत विषप्राशन करणारी 'संत मीराबाई' असो. मित्रानो, अजून किती नावे आठवणार? 

'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' म्हणून कीर्तनाने समाज जागृती करणारे 'गाडगेबाबा',  महिलांना शिक्षण द्यावे हा हट्ट करणारे 'महात्मा फुले' असोत किंवा त्यासाटी समाजाचे दगड खाणाऱ्या 'सौ. सावित्रीबाई फुले' असोत. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, त्रिखंडात आपली धर्मसंस्कृतीपताका फडकाविणारे 'स्वामी विवेकानंद आणि ज्यांची उडी त्रिखंडात गाजली ते विनायक दामोदर सावरकर असोत.   

समाजातील पददलितांना सर्वांसोबत आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचणारे 'डॉ. भीमराव आंबेडकर' असोत का 'पददलित समजल्या जाणाऱ्या महिलांना नवी दृष्टी आणि दिशा देणारे 'महर्षी धोंडो केशव कर्वे' असोत, स्वतंत्र भारताचे पहिले गवर्नर जनरल 'श्री सी राजगोपालाचारी', भौतिक शास्त्राचे 'नोबेल पारितोषिक' मिळवणारे 'श्री. सी व्ही रामन', थोर तत्वज्ञ 'सर्वपल्ली राधाकृष्णन', 'डॉ. भगवानदास', आपले पहिले पंतप्रधान 'पंडित जवाहरलाल नेहरू', अभियंत्याचे सर्वार्थाने गुरु 'मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या', 'पंडित गोविंदा वल्लभ पंत', 'बिदनचन्द्र रॉय', 'पुरुषोत्तमदास टंडन', आपले पहिले राष्ट्रपती 'डॉ. राजेन्द्रप्रसाद', आपल्या धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे संस्कृत प्रकांड पंडित, 'डॉ. पांडुरंग वामन काणे', 'डॉ. झाकीर हुसेन', १९६५ मध्ये 'पाकिस्थानला' पराभूत करून आपल्या इतिहासातील 'आठवे सोनेरी पान' लिहिणारे आणि आपल्यास 'जय जवान, जय किसान' ही घोषणा देणारे आपले कणखर पंतप्रधान 'लालबहादूर शास्त्री', आम्हा भारतीयांनी १९७१ पाकिस्थानला हरवून 'बांगला देशास' स्वातंत्र्य  देताना आम्ही 'दुर्गामातेच्या' रुपात पाहिलेल्या आमच्या पंतप्रधान 'श्रीमती इंदिरा गांधी', कामगारांसाठी आपले जीवन व्यतीत करणारे राष्ट्रपती 'व्ही व्ही गिरी', नेते 'के कामराज', समाजसेविका 'सेवाव्रती मदर तेरेसा', समाजात विलक्षण कल्पना आणणारे 'भूदान चळवळीचे जनक' 'आचार्य विनोबा भावे', स्वातंत्र्य सैनिक 'सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान', पंतप्रधान 'मोरारार्जी देसाई' व 'राजीव गांधी', स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले कणखर गृहमंत्री 'लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल', स्वातंत्र्यसैनिक आणि आणीबाणी विरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व करणारे 'जय प्रकाश नारायण', भारतीय उद्योगपती 'जे आर डी टाटा', राष्ट्रपती 'मौलाना अब्दुल कलम आझाद', चित्रपटांचे ज्ञानी 'एम जी रामचंद्रन' आणि 'सत्यजित राय', मिसाइल पुरुष, शास्त्रज्ञ आणि आपले राष्ट्रपती 'डॉ. अब्दुल कलाम', स्वातंत्र्य सैनिक 'अरुणा असफ अली'. 'गुलझारीलाल नंदा', 'सी सुब्रम्हन्यम', गायिका 'एम सुब्बलक्ष्मी' आणि गायक पंडित भीमसेन जोशी', संगीतज्ञ सतारवादक पंडित रविशंकर',  किती नवे घ्यावी, ही रत्नांची खाण आहे, संपणार नाही. 

या सगळ्या रत्नांनी आपल्याला जे काही दिले आहे ते आपण विसरू नये आणि आपणही भारतमातेसाठी काहीतरी केले पाहिजे हे लक्षात ठेवून आपली वाटचाल केली, त्यानुसार कृती केली तरी ते खूप होईल.  

भारतमातेची रत्ने - 'भारत रत्ने' भाग - १ 



महाविद्यालयीन आठवणी

जळगाव येथे मी 'नूतन मराठा कॉलेज मध्ये', त्यानंतर 'एस. एस. मणियार लॉ कॉलेज' मध्ये मी शिकलो. त्यावेळी माझ्या भाग्यात अनेक गोष्टी आल्यात, डॉ. के आर सोनवणे हे 'नूतन मराठा कॉलेज मध्ये प्राचार्य होते. तेथे श्री. लाहोटी सर, श्री. एस वाय पाटील सर, श्री. वाघ सर, श्री. काटदरे सर, श्री. शेखर सोनाळकर सर, श्री. देशमुख सर, सौ. साळुंखे यांनी अतिशय अप्रतिमपणे शिकवले. श्री. बावस्कर सर हे आमच्या 'वादविवाद मंडळाची' जबाबदारी सांभाळायचे. मला असंख्य स्पर्धांमधून, वादविवाद - वक्तृत्व, कथाकथन - काव्यवाचन, नाटकांमधून, अगदी - तबलावादनातही आमच्या कॉलेजचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि हो, श्री. उज्ज्वल निकम सर (प्रसिध्द विधिज्ञ) हे आम्हाला 'नूतन मराठा कॉलेज मध्ये 'व्यापारविषयक कायदे आणि कराराचे कायदे' उत्तमपणे शिकवायचे.  

माझ्या 'एस. एस. मणियार लॉ कॉलेज' मध्ये श्री. माथुर वैश्य सर, श्री. अत्रे सर, श्री. सरोदे सर, श्री. एच ए चौधरी सर, श्री. फालक सर, श्री. प्रकाश पाटील सर आणि कै. बेंडाळे सर तसेच पै. इस्माईल सर यां नामवंत वकील मंडळीनी आम्हाला फारच कळकळीने आणि मनापासून शिकवले, ही त्यांनी दिलेली शिदोरी मला आजही पुरत आहे. आज माझ्या सारख्याला समजते की यांचा आपल्याला शिकवण्यात किती वेळ वाया जात असेल की ज्यापासून त्यांना काहीही आर्थिक फायदा होणार नव्हता, मात्र जळगाव येथे 'लॉ कॉलेज' टिकले पाहिजे या भावनेने यांनी आम्हाला शिकवले होते. माझ्या महाविद्यालयीन काळाने, त्यावेळच्या शिक्षकांनी, मित्रांनी , कै. आचार्य डॉक्टर यांच्यासारख्या मोठ्या सामाजिक व्यक्तिमत्वाकडून मला बरेच शिकावयास मिळाले. या सर्वांचा उल्लेख येथे करणे अशक्य आहे.  

त्याचवेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या उत्साहाने मी आकाशवाणीमधील नाटकाची आवाजाची चाचणी दिली की जी प्रत्यक्ष श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी घेतली आणि मी उत्तीर्ण झालो. त्यावेळी आकाशवाणी हे अतिशय समर्थ, लोकप्रिय आणि जवळजवळ एकमेव असे सर्वमान्य माध्यम होते, त्यानंतर आकाशवाणीच्या खूप नभोनाट्यात मी सहभागी झालो, ज्यावेळी कै. भैय्या उपासनी, कै. मोहिनी पंडित या होत्या. श्री. अशोक बढे, श्री. भगवान भटकर, श्री. विजयसिंग गावित, श्री. नीळकंठ कोठेकर, श्री. भगवंत इंगळे, श्री. गोपाल औटी, श्री. दत्ता सरदेशमुख, सौ. उषा शर्मा  वगैरे मंडळी तेथे होती. वातावरण उत्तम आणि निरोगी होते. अनेक उत्तमोत्तम नाटकांत मला सहभागी होण्याची संधी मिळाली. 

जळगावच्या 'विद्यार्थी परिषदेत' नेहमी जाणे येणे असे, त्याची काही जबाबदारीदेखील असे. त्यावेळी जळगाव येथे आज आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्री असलेले, श्री. चंद्रकांत पाटील हे 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे' पूर्णवेळ कार्यकर्ते होते आणि त्यानंतर ते 'महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशनात' 'प्रांत मंत्री' झाले, त्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ / पायाभरणी ही 'जळगावी'च झाली, ही भावना आहे. 

जळगावी 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' श्री. शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्यात नामवंत साहित्यिकांची भाषणे ऐकता आली, त्याचे दर्शन झाले, कै. माधव मनोहर, कै. ग वा बेहरे, कै. शिवाजी सावंत किती नांवे सांगावीत?   

आज अचानक हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे त्यावेळी मी नुकताच वकील झालेलो होतो, नवीन असल्याने फारसे काम असल्याचा प्रश्नच नव्हता आणि तेथे मला 'वक्ता दशसहस्त्रेषु' असे मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण प्रथमतः प्रत्यक्ष ऐकावयास मिळाले, जिल्हा न्यायालयाजवळ 'जी एस ग्राउंड' आहे तेथे त्यांचे दुपारी भाषण झाले, स्वाभाविकपणे न्यायालयाचे जवळपास सर्व कामकाज 'वकिलाच्या अभावी' ठप्प झाले होते, त्याबाबत कोणीही तक्रार केल्याचे ऐकिवात नाही कारण जवळपास सर्वच पक्षकारही तेथेच होते. फक्त काही न्यायालयीन कर्मचारी आणि (नाईलाजाने ) न्यायाधीश हे न्यायालयात होते, बहुतांश कर्मचाऱ्यांनी देहधर्म या नावाने आणि झेपेल त्या कारणाने पळ काढला होता आणि बराच वेळ त्यांचा देहधर्म सुरु होता असे कळाले. महत्वाचे म्हणजे त्या काळात कोणत्याही न्यायाधीशांनी कोणाचेही काम ते गैरहजर असल्याने रद्द केले नाही. मात्र वकील मंडळी आल्यानंतर त्यांच्यासमोर त्यांनी  'ते अडकून पडल्यासारखी भावना व्यक्त केली', त्यांना हेवा वाटणे हे स्वाभाविकच होते एवढे भाषण अप्रतिम होते, मात्र 'अटलजींचे अप्रतिम भाषण' या वाक्यात भाषाशास्त्रानुसार पुनरुक्तीचा दोष आहे, या माझ्या विधानाशी बहुधा बरेच जण सहमत होतील अशी खात्री आहे, त्यानंतरही वेगवेगळ्या कारणांनी 'मा. अटलजींचे' भाषण ऐकण्याचा माझ्या भाग्याने योग आला. आता 'भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी' हे म्हणावयास फारच आनंद होत आहे. 

Tuesday, December 23, 2014

मनातील इच्छा

मित्रांनो, मला गेल्या अनेक वर्षांत माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने माणुसकीचे, धडाडीचे - लढाऊ वृत्तीचे, लबाडीचे - फसवणुकीचे, उदारतेचे आणि हो, पराभवाचे, हताशपणाचे वगैरे असंख्य अनुभव आले, ते मी शब्दबद्ध करावे, याचे एक पुस्तक होईल, असा मला माझा महाविद्यालयीन मित्र श्री हिंगोणेकर नेहमी म्हणतो. तो आता शिक्षणाधिकारी आहे आणि विशेष म्हणजे मुळातून तो 'कवी' आहे, 'अरे लोकांना समजले पहिजे, आपल्यापेक्षा जगात खूप दुःखी आहेत, ते जीवनाशी लढत असतात आणि परिस्थितीला टक्कर देत असतात - कोणत्याही साधनसामुग्रीशिवाय, फक्त 'त्याच्या न्यायावर म्हणजे समाज्याच्या न्यायबुद्धीवर' विश्वास ठेवून, हा विश्वास टिकला पाहिजे तरच समाज टिकेल. आपल्याला समाज टिकवायचा आहे.' त्याचे नेहमीचे म्हणणे. माझी मुलगी तर नेहमी म्हणते 'बाबा, तुम्ही 'तापीचे पाणी' या नावाने लिहाच ! (तिने आचार्य अत्र्यांचे 'कऱ्हेचे पाणी' हे वाचलेले नाही म्हणूनच ती ही असे बोलण्याची हिम्मत करीत आहे)
माझी सर्वात मोठी अडचण म्हणजे 'वेळेची', हे लिहायचे म्हणजे वेळ द्यावा लागणार. थोड्याफार फरकाने परिचितही हेच सांगत असतात - अर्थात माझी इच्छा नाही असे नाही, माझी पण इच्छा आहे, पण मला माझा व्यवसाय तर करायला हवा - पोटासाठी ! आता न्यायालयास 'हिवाळी सुटीचे' वेध लागलेले, थोडी सवड काढता येत आहे, पण सुटीतीलही कामे खूप आहेत कारण ती निवांतपणे आणि काळजीपूर्वक करावी लागतात - त्याचा विषय खूप गुंतागुंतीचा आणि वेळ घेणारा असतो. बघूया, काय शक्य होते ते. तुम्हा सर्वांची काय इच्छा आहे हे देखील फारच महत्वाचे आहे कारण आपली प्रत्यक्ष भेट जरी झालेली नसली, होत नसली तरी तुम्ही सर्वजण हजारोंच्या संख्येने माझ्यासोबत नेहमीच असतात ही मला जाणीव असते. 

न्यायालयातील आठवणी - २

ही घटना साधारणतः २० - २२ वर्षांपूर्वीची असावी. जेमतेम शिकलेला, ड्रायव्हर असलेला मुलगा आणि थोडीफार शिकलेली मुलगी यांचे लग्न झाले, कोळी समाजातील हे जोडपे ! लग्नाची नवलाई संपली आणि मग एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम हळूहळू सुरु झाले. आपणा सर्वाना अनुभवाने कल्पना आहे की नवरा-बायकोत जर व्यवस्थित पटत असले तर ते घरातील लोकांना फारसे आवडत नाही, 'मग मुलगा बायली झाला', 'वडीलधारी मंडळीना आता काही किंमत राहिली नाही', 'आमच्यावेळी असे नव्हते' इत्यादि बोलणे सुरु होते, स्वयंपाकातील असलेल्या आणि नसलेल्या खोड्या काढल्या जातात, मुलीला धूर्तपणे उपाशी ठेवले जाते मात्र उपाशी ठेवले जात आहे हे जाणवू नये याची काळजी घेतली जाते, पती-पत्नीला एकमेकांपासून शक्यतो सर्वार्थाने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा स्वाभाविक परिणाम हा पती-पत्नीतील वादविवाद नसले तरी सुरु होण्यात होतो. हे कौशल्य सुशिक्षित तसेच अशिक्षित अशा प्रत्येक कुटुंबाकडे सारख्याच प्रमाणात असते जरी प्रत्येकाचे कौशल्य वेगवेगळे असले तरी त्याचे परिणाम मात्र सारखेच होत असतात.

येथेही अशीच परिस्थिती झाली, मुलगा ड्रायव्हर असलेने जास्त काळ घराबाहेर असावयाचा, पती-पत्नीचा सहवास कमी, त्याला आल्यावर वाटायाचे की पत्नीने फक्त आपल्याच भोवती असावे मात्र ही त्याची अपेक्षा घरातील मंडळी समर्थपणे परतवून लावायची आणि बिचारी पत्नी त्याचे वाटेस येते न येते तोच त्याची पुढील कामाची वेळ आलेली असायची. तो गेल्यावर घरातील मंडळी त्याच्या पत्नीलाच बोलायची 'नवरा थकून भागून येतो, त्याचे जवळ जायला सुद्धा तुला वेळ नाही' आणि हे पुढच्या वेळेला त्याच्या कानावर पडेल अशी व्यवस्था केली जायची, परिणाम भांडणे वाढावयास लागली, एकमेकांच्या घरच्या - माहेरच्या - सासरच्या - नातेवाईकांचे उद्धार व्हावयास लागले. एके दिवशी मुलगी माहेरी रवाना झाली.

माहेरच्यांनी त्यात भर टाकली की 'आता कायदे सर्व बायकांच्या बाजूने असतात, तुझ्या नवरा आणि तुझ्या सासरची माणसे आत्त्ता नाक घासत येतील. तू फक्त खावटीची केस टाक.' त्याप्रमाणे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १२५ नुसार खावटीची केस पत्नीने टाकली, नोटीस निघाली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली. (त्यावेळी नुकताच आलेला महिला अत्याचार विषयक कायदा नव्हता हे नशीब). सासरच्या माणसांना नाक घासायला लावण्याचा आग्रह हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे, ती माहेरच्या माणसांची फारच मनापासून इच्छा असते.  

हे झाल्यावर सासरचे काही मागे नव्हते त्यांनी, 'हिच्यासारख्या छप्पन्न पोरी मिळतील माझ्या पोराला' असे म्हणून तो निरोप मुलीच्या माहेरी व्यवस्थित पोहोचेल अशी व्यवस्था केली. अशा वेळी असे निरोप अत्यंत तातडीने, अगदी आपले महत्वाचे काम असले तरी ते बाजूला ठेवून हा निरोप जीवन-मरणाचा समजून देणारे लोक पूर्वीही होते आणि आताही आहेत. हा निरोप व्यवस्थित पोहोचविला गेला. मग पत्नीकडील माणसांनी 'तुमच्या सारख्या भिकारी लोकांना मुलगी द्यायचीच नव्हती पण द्यावी लागली, अजूनही वेळ गेलेली नाही, देवाने लक्षात आणून दिले - बरे झाले' वगैरे वगैरे. झाले. पतीने घटस्फोट  मिळावा म्हणून न्यायालयात मागणी केली, त्याची नोटीस निघाली आणि मग पतीकडूनही न्यायालयात येरझारा सुरु झाल्या.

तारखेच्या दिवशी पती-पत्नी समोरासमोर असावयाचे, मात्र कोणीही कोणाशी बोलू नये याची खबरदारी घेतली जायची. बऱ्याच तारखा झाल्यात, दोन्ही  रडकुंडीला आले, करणार काय? घटस्फोटाची तारीख जिल्ह्याच्या गावी आणि खावटीची तारीख तालुक्याच्या ठिकाणी, पती बिचारा काम-धाम सोडून न्यायालयाच्या चकरा मारतोय आणि पत्नी नवऱ्याला आज न उद्या पाझर फुटेल या आशेवर येते आहे आणि जाते आहे, पैसे खर्च होत आहे आणि नियमित जाणाऱ्या वेळेबरोबर पैसादेखील जाऊ लागला. पूर्वी त्यांच्या बाजूने बोलून त्यांना भरीस पडणारे आता हळूहळू त्यांच्याच विरुद्ध बोलू लागले. हा त्या लोकांचा पवित्रा या दोघांना नवीनच आणि अनपेक्षित होता.

माझ्या कारकुनाशी मी बोलत होतो, त्याने त्या मुलाची माझी ओळख करून दिली, थोडा वेळ मी त्याच्याशी बोललो, ऑफिसला भेटावयास सांगितले, तो आला. त्याला सर्वात पहिला प्रश्न केला 'तुझ्यात आणि तुझ्या बायकोत काही भांडण आहे का?' त्याने निर्मळपणे 'नाही' म्हणून सांगितले. 'तुला बायकोस वागवायचे आहे का?' म्हणून विचारले - त्याने 'हो' म्हणून सांगितले. त्यास फी जमा करण्यास सांगितले आणि 'पुढच्या तारखेस निर्णय होईल' असे सांगितले. त्याला आश्चर्य वाटले. पुढील तारीख आली, न्यायालयासमोर काम निघाल्यावर 'आम्ही आपसात करणेस तयार आहोत' असे सांगितले, विरुद्धबाजूचे वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला, 'यांनी जळगावला घटस्फोट मागितला आहे' हे सांगितले. 'आम्ही अर्जदारास आजही घेवून जाण्यास तयार आहोत' हे सांगितले, विरुद्धबाजूचे वकिलांनी 'अर्जदाराने कपडेदेखील आणले नाही, कसे जाणार?' म्हणून सांगितले. मी फक्त एवढेच म्हणालो, 'अर्जादाराला तर विचारा, ती यायला तयार असेल तर आताच पक्षकाराला बाजारातून कपडे वगैरे घ्यायला सांगतो, त्याची बायकोच आहे.' न्यायाधीशांनी अर्जदार - पत्नीस विचारले, दैव बलवत्तर होते. तिने होकार दिला, दोघेही सोबत निघून गेले, त्यानंतर ते दोघेही तारखेवर आलेच नाही.

त्यानंतर साधारणपणे ३ / ४ वर्षानंतरची घटना, मी माझ्या वकील मित्रांशी तालुका न्यायालयात बोलत उभा होतो. न्यायालयाची इमारत ही स्वतंत्र नव्हती तर तेथे पोलीस स्टेशन, सिटी सर्व्हे ऑफिस, वनसंरक्षक कार्यालय इत्यादी कार्यालये होती. अचानक माझ्या समोर एका व्यक्तीने येउन मला अक्षरशः 'साष्टांग नमस्कार' केला, या अचानक घडलेल्या घटनेने मी आणि आसपासचे सर्व जन अचंबित झालो आणि दचकलोही. ती व्यक्ती उठून उभी राहिली आणि मग माझ्या लक्षात आले की हा पत्नीला न्यायालयातून परस्पर घेऊन गेलेला आणि त्यानंतर माझेकडे अथवा न्यायालयाकडे न फिरकलेला माझा पक्षकार आहे. मला हसू आले, 'असे आहे?' मी विचारले. 'त्या दिवशी तुम्ही होता म्हणून आमचा संसार सुखाचा झाला, माझी बायको तर गाडीमध्ये संपूर्ण प्रवासात रडत होती, तुमच्या मनोमन पाया पडत होती. कधीची तीच मागे लागली आहे की त्या देव माणसाला भेटा  आणि भेटल्यावर 'साष्टांग नमस्कार' करा, म्हणून मी आपणास 'साष्टांग नमस्कार' केला. मला हसू आले, त्या अर्धशिक्षित माणसाची प्रामाणिक भावना माझ्या लक्षात आली. 'अरे, बायकोचे असे पहिल्यापासून ऐकले असते तर बरे झाले असते.' 'मग साहेब, आपली भेट कशी झाली असती?' त्याचे हे उत्तर मला निरुत्तर करणारे होते.  

आपल्या संस्कृतीत, समाजात असे मानले जाते की - लग्नाच्या गाठी ब्रह्मदेव स्वर्गात बांधतो आणि लग्ने पृथ्वीवर लावली जातात, पती - पत्नीचे नाते हे एका जन्माचे नसते तर ते सात जन्माचे असते, विवाह हा संस्कार आहे तो नष्ट करता येत नाही किंवा तो करार नाही कि आपल्या मनास  वाटेल तेंव्हा मोडता येईल, लग्न हे पवित्र बंधन असते, पती-पत्नीने एकमेकांशी एकनिष्ठ असावे वगैरे. या सर्वांचा मी काढलेला मतितार्थ एवढाच की आपल्या समाजाने एकंदर मानवी स्वभावाचा विचार करून, आपली समाजव्यवस्था कायम रहावी, नातेसंबंध टिकून रहावे, मुलांचे  आई - वडिलांविना हाल होऊ नयेत, व्यभिचार वाढू नये, यातून गुन्हेगारी वाढू नये, विविध समस्या निर्माण होऊन आपल्या समाजाची शांतता बिघडू नये, समाजस्वास्थ्य धोक्यात येऊ नये यासाठी तत्कालीन व्यवस्थेनुसार व्यवस्था लावलेली आहे. आजच्या काळात आपल्या पती-पत्नीतील असलेल्या नातेसंबधातील विरळ होत चाललेला ओलावा, दृढता, पक्केपणा आणि आर्थिक बाबींना येत असलेले कमालीचे महत्व, किंबहुना त्यात आलेले एक प्रकारचे व्यावसायिकपण हे लक्षात घेता आपल्या समाजातील आजपावेतो घट्टपणे टिकून राहिलेले बंध विसविशीत होत असल्याचे जाणवत आहे, हे समाजाची प्रकृती बिघडल्याचे लक्षण आहे, हे लक्षण दूर करून आपण सर्वांनी आपल्या समाजाचे स्वास्थ्य दुरुस्त करावे हे आपण सर्वांची जबाबदारी आहे किंबहुना ते आपले एक पवित्र कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवून आपले वर्तन असावे ही अपेक्षा!    

Monday, December 22, 2014

शालेय जीवनातील आठवणी - १

घटना मी सहावीत होतो त्यावेळची आहे. पहिले मराठीचा तास होता त्यावेळी श्री एस आर कुलकर्णी सर यांनी 'संताजीची घोडदौड' ही कविता अतिशय अप्रतिमपणे शिकविली. आम्ही मुले देशभक्तीने अगदी भावविभोर होऊन गेलो होतो. त्यानंतर आमचा इतिहासाचा तास होता. तो शिकवायचे श्री तिवारी सर! यांचे वैशिष्ठ्य म्हणजे हे कधीही पुस्तक वर्गात आणत नसत आणि पुस्तकाशिवायच शिकवीत; अगदी अप्रतिमपणे पण त्यात विनोदाचा शिडकावा देखील असायचा. श्री तिवारी सर आले. त्यांना आमच्या वर्गातील वेगळे वातावरण लक्षात आले. त्यांनी तास कोणता होता हे विचारले आम्ही मराठीचा होता हे सांगीतले. काय शिकवले हे सांगितले, कवितेचे नाव आणि टिपणे फळ्यावर दिसताच होती. त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी 'संभाजी महाराजांच्या' मृत्युपश्चात महाराष्ट्राची कशी अवस्था झाली आणि त्या काळात अगदी समर्थपणे 'धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे' यांनी स्वराज्याची राखण कशी केली हे आमच्या इतिहासाच्या तासात सांगीतले, अगदी त्यांच्या भाषेत. आम्हा मुलांची अवस्था तर वर्णन करण्यापलीकडे झालेली होती, आम्ही या जगात राहिलेलेच नव्हतो, तो काळ आमच्या समोर आमच्या दोन्ही शिक्षकांनी अगदी जिवंत उभा केला होता आणि आम्ही तो काळ, त्या काळात वावरत होतो. तास संपल्याची घंटा झाली आणि श्री तिवारी सरांनी आम्हाला आपल्या विनोदी शैलीत भानावर आणले - 'हं, मुकीमबुवांचे किर्तन संपले, पण प्रसाद मिळणार नाही. आपला 'संभाजी महाराजांच्या पश्चात महाराष्ट्र' हा धडा झाला', आम्हाला तर काही शिकवले हे जाणवतच नव्हते, आम्ही त्या काळातून बाहेरच यायला तयार नव्हतो. मित्रांनो, अशातऱ्हेने शिकवल्यावर परीक्षेत आम्ही उत्तरे घटना डोळ्यासमोर ठेवूनच लिहायचो, अर्थात मार्क्स उत्तम मिळणारच असायचे.

ती कविता आपणास येथे देण्याचा मोह मात्र मला आवरता येत नाही - कविता 'श्री दु. आ. तिवारी यांची होती, ते कवि जळगावचेच.

संताजींची घोडदौड

तळहाती शिर घेवूनीया दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगल सेना ना नानाही मोहरम जाहली.
पडली मिठी रायगडला सोडविता नाही सुटली.
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेवून.
परते सर सेनापतीची घोडदौड संताजीची ||  ||

मिरजेवर पातशाहीची शहाजणे वाजत होती
हाणील्या तायांवर टापा फाडून टाकिली पुरती
मारिली टाच तेथून घेतला पन्हाळा हाती
तो कळले त्या विराला
जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
चौखूर निघे त्वेषाची घोडदौड संताजीची || २ ||

झुल्फिकारखां लढवय्या कातरली झुल्फे त्याची
धूळधाण केली तेथे किती अमीर उमरावांची
उसळली तेथुनी मांड मग त्या कर्दन काळाची
जिंजीचा धुरळा मिटला
जालना प्रांती तो उठला
चोळीतो शत्रू नेत्राला
गेली हां हां म्हणतांची घोडदौड संताजीची || ३ ||

वाजल्या कुठे जरी टापा धुराळ्याची दिसली छापा
छावणीत गोंधळ व्हावा “ संताजी आया ! आया ! ”
शस्त्राची शुद्धी नाही धडापती ढाला घ्याया
रक़्तने शरीरे लाल
झोपेने डोळे लाल
जीवाचे होती हाल
शत्रूला ऐशी जाची घोडदौड संताजीची || ४ ||

गिर सपा वाहे ‘ धो धो ’ प्रतीसारील त्याला कोण ?
शिशिराचा वारा ‘ सो सो ’ रति रोधतील त्याला कोण ?
हिमशैल खंड कोसळता रीतीरोधील त्याला कोण ?
होता जो गंगथडीला
आला तो भीमथडीला
एकाच दिसात उडाला
करी दैना परसेनेची घोडदौड संताजीची || ५ ||

पुरताच बांधिला चंग घोड्यास चढविला तंग
सोडी न ह्यांचे अंग भाला बरचीचा संग
औरंगाचा नवरंग उतरला जाहला दंग
तुरगावर जेवण जेवी
तुरगावर निद्र घेई
अंग न धरेला लावी
भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची || ६ ||

संचरले होते न कळे तुरुंगास हि कैसे स्फुरण
उफळावा बघती वेगे रिकविती ठेविती चरण
जणू त्यांसहि ठावे होते युद्धी “ जय कि मरण ”
शत्रूचे पढता वेढे
पाण्याचे भरता ओढे
अडती न उधळती घोडे
चालली अशी शर्थीची घोडदौड संताजीची || ७ ||

नेमाने रसद लुटाची ‘ नेमाजी शिंदे ’ यांनी
सापडती हय गज तितुके न्यावे ‘ हैबतरावानी ’
वाटोळे सर्व करावे ‘ आटोळे ’ सरदारांनी
‘ खाड खाड उठवा टापा ’
झेपांवर घालिती झेपा
गोटावर पडला छापा
आलीच म्हणती काळाचा घोडदौड संताजीची || ८ ||

चढत्या घोड्या निशी गेला बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलाणात ओळी नि पुशी समशेर
बसवितो जरब यवनांना बेजरब रीसालेदार
वेगवान उडवीत वाजी
तोंडावर लढतो गाजी
धावून येई संताजी
पळती मोघल बघताची घोडदौड संताजीची || ९ ||

नावाचा होता ‘ संत ’ जातीचा होता शूर !
शीलाचा होता साधू संग्रामी होता धीर !
हृदयाचा ‘ सज्जन ’ होता रण कंदनि होता होता क्रूर !
दुर्गति ति संभाजीची
दैना रामराजाची
अंतरी सर्वदा जाची
उसळे रणशार्दुलाची घोडदौड संताजीची || १० ||

मर्दानी लढवय्यानी केलेल्या मर्दुमकीची
मर्दानी गीते गातां मर्दानी चालीवरची
फडफडे डफावर थाप मर्दानी शाहिराची
देशाच्या आपत्काली
शर्तीची युद्धे झाली
गा शाहिरा ! या काली
ऐकूदे विजयश्रीची घोडदौड संताजीची || ११ ||

Sunday, December 21, 2014

न्यायालयातील काही आठवणी - १

माझ्या वकिलीच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला मानवी स्वभावाचे बरेच नमुने पाहायला मिळाले; मग त्यात माणूस किती उदार होऊ शकतो, क्रूर होवू शकतो, स्वार्थी बनतो, घरातील लोकांवर विश्वास ठेवून कसे मुर्खासारखे वागतो मग पश्चाताप करतो कि ज्याचा क्वचितच उपयोग होतो वगैरे. मी मात्र माझ्या स्वभावानुसार त्याच्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याच्यावरील होणारा अन्याय काही प्रमाणात दूर करता येतो का याचा प्रयत्न करायचो. परमेश्वर मला बहुतेक वेळा साथ देत असे आणि हो अगदी आजही देतो. मला तर खूप वेळा वाटते की - 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरोनिया' याचा प्रत्यय देण्यासाठी असे अनुभव मला येत असावेत. असो. आज मला साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वीची घटना आठवली, ती नावांचा उल्लेख टाळून सांगतो                              
            ********************************************************
आपल्या समाजात स्त्रियांना किती स्थान आहे हे आपणास माहीतच आहे, ही घटना घडलेली आहे साधारणतः १९५७ - ६० दरम्यानची. एका कुटुंबात २ / ३ मुले होती, मोठा मुलगा शेती करायचा आणि घरातील सर्व व्यवहार पाहायचा. शेती कोरडीची होती, त्यातून काय उत्पन्न येणार आणि महत्वाचे म्हणजे त्या जमिनीचा हा कूळ होता. त्यावेळच्या परिस्थितीने हा त्या शेतीचा मालक बनला, त्याचे पीकपेरे सदरी नाव देखील लागले. त्याचे लग्न नुकतेच झाले होते आणि त्याला एक मुलगी देखील झाली होती, असे एकंदरीत ठीक चालले होते. मात्र त्याचे किंवा त्याच्या पत्नीचे दुर्दैव येथेच संपले नव्हते तर ते त्याच्या मुलीलाही भोगावे लागणार होते, हे भविष्य होते. मोठ्या मुलाचे निधन झाले, कुळ कायद्याने तो मालक झाला होताच, मात्र त्याच्या मृत्युनंतर परिस्थिती बदलली. मोठ्या मुलाच्या पत्नीला तात्काळ तिच्या मुलीसाहित माहेरी पाठविण्यात आले, 'हो, मुलगी म्हणजे वंशाचा दिवा थोडीच असतो? तिच्या पालन पोषणावर खर्च करणे यासारखा मूर्खपणा आणि आतबट्ट्याचा व्यवहार कोणता आणि ते देखील तिचे वडील वारले असतांना? म्हणजे अशांची रवानगी वेड्याच्या दवाखान्यातच व्हावयास हवी. त्या मोठ्या मुलाच्या पत्नीस आणि मुलीस विनाविलंब तिच्या सासरच्यांनी माहेरी पाठवून दिले, ती आणि तिची मुलगी माहेरी राहू लागली, त्यांचे पालन पोषण आणि सर्व जबाबदारी माहेरच्यांनी घेणे स्वाभाविक होते, त्यांनी ती जबाबदरी पार पाडली आणि मुलीचे, म्हणजे त्या मोठ्या मुलाच्या मुलीचे लग्नही लावून दिले, खर्चही माहेरच्या लोकांनीच केला, सासरचे लोक कदाचित लग्नाला हजर असतील.
दरम्यानच्या काळात सासरच्या लोकांनी कुळ कायद्यातील तरतुदींचा यथास्थित वापर करून मालकीचा दाखला मिळविला आणि हुशारीने नोंदी देखील इतर भावांच्या नावाने करून घेतल्या आणि मोठ्या मुलाचे, त्याच्या पत्नीचे आणि त्याच्या मुलीचे नाव सर्व दप्तरावरून अगदी नाहीसे करून टाकले आणि निवांतपणे शेताचे उत्पन्न घेवू लागले, सून आणि नातीचा काही संबंध असण्याचा प्रश्नच नव्हता, जणू काही हा मोठा मुलगा अस्तित्वातच नव्हता तेंव्हा त्याची पत्नी आणि मुलगी यांचा विचार तर फारच दूरची गोष्ट.
मोठ्या मुलाच्या मुलीचे लग्न झाले, जावाई समजूतदार होता, शिकलेला होता मात्र त्याची सासू म्हणजे मोठ्या मुलाची पत्नी ही निरक्षर होती. तिला आयुष्यभर माहेरी रहावे लागले याचे तर दुःख होतेच, मात्र त्यापेक्षा जास्त दुःख होते ते 'आपल्या नवऱ्याने घरासाठी एवढे केले, शेती मिळवली मात्र आपल्याला माहेरी राहावे लागले आणि सोबत मुलीलाही राहावे लागले.' जावई सासूची समजूत घालायचा, पण त्या मातेच्या मनातला सल काही केल्या जात नव्हता. सासरच्या लोकांनी ते शेत विकावयास काढल्याचे तिला समजले, मग मात्र तिला राहवले नाही. तिने 'वकिलाकडे घेवून चल' म्हणून घोषाच धरला. तिचा जावई तिला माझ्याकडे घेवून आला.

तिने सर्व हकीकत सांगितली आणि तिचे एक वाक्य माझ्या कायम हृदयात कोरले गेले, 'भाऊ, अरे माझा बाप होता तर त्याने मला पोसली आणि भर म्हणून की काय माझ्या पोरीलाही पोसली, मी रांडमुंड बाई काय करणार, माझा इलाज नव्हता. मलाही खूप सोसावे लागले, पोरीसाठी मी सोसले. पण आता पोरीने तिच्या सासरी का सोसावे? तिच्या बापाची शेती आहे, ती शेताची मालकीण आहे, माझे आता काय राहिले आहे? पण तिच्या बापाची शेती तिला मिळाली पाहिजे नाहीतर खऱ्यावर कोण विश्वास ठेवणार?' तिचा प्रश्न बिनतोड होता, उत्तर देणे खूप कठीण होते. माझा न्यायावर विश्वास आहे पण वेळ किती लागेल हा प्रश्न होता. मी त्या बाईच्या वतीने दावा दाखल केला. सामनेवाल्यांना नोटीसा लागल्या. मग चर्चा, वावड्या आणि अफवांना ऊत आला. सामनेवाल्याना समजले, तिच्यावर नाही नाही ते आरोप सुरुवातीला झालेत, तिला सुरुवातीला दुःख झाले मग संताप आला. 'सत्याचा वाली परमेश्वर असतो, त्याचा न्याय बरोबर असतो, त्याला अन्याय सहन होत नाही '.

सामनेवाल्याकडून त्यांना निरोप येऊ लागले, कोर्टाचे काही खरे नाही, तुम्हाला कधीही काहीही मिळणार नाही वगैरे. मी धीर देत होतो. मात्र एका दिवशी कोर्टात बसलो असता, त्या बाईचा जावई आला आणि हताशपणे 'ते शेत विकणारच आहे' असे सांगू लागला. माझ्या कारकुनाजवळ मी उभा होतो, तेथे सामनेवाले देखील होते, मला काही त्याची कल्पना नव्हती. मी बोलून गेलो, 'जगात चांगुलपणावरचा विश्वास टिकावयास हवा, तरच जग चालेल. आज नातेसंबंध संपून जातात कि काय अशी परिस्थिती झालेली आहे. असो, आपण आपले काम करत रहावे, फळाची अपेक्षा करू नये 'गीता तेच सांगते'.
दुसरे दिवशी त्या बाईचा जावई मला भेटायला आला आणि माझ्या हातावर पेढे ठेवले, मला समजेना, 'काय झाले?' मी विचारले. 'गावातील लोकांनी फजित केले आणि त्या खरेदी करणाऱ्याला सांगितले, 'शेताची मालकीण वेगळी आहे, ७/१२ च्या उताऱ्यावर जाऊ नको. या गावात शेती करायची असेल तर शेताच्या मालकीणीलाच पैसे द्यावे लागतील', झाले, सामनेवाले १० आणे पैसे द्यायला तयार झाले. आता मलाही जास्त भांडायचे नाही'.

शालेय जीवनातील आठवणी - 2

मित्रांनो मला माझ्या शालेय अभ्यासक्रमात ही कुसुमाग्रजांची कविता होती आणि श्री एस आर कुलकर्णी सरांनी ती अतिशय तन्मयतेने आणि छान शिकविली होती. ती माझ्या आजही स्मरणात आहे. (श्री एस आर कुलकर्णी सर सध्या भुसावळला असतात - मी सरदार जी जी हायस्कूलचा विद्यार्थी आहे )

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्‍तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

प्रश्न हा आहे कि अशा शिक्षकांना आजच्या समाजात आणि शाळेत काही किंमत राहील का किंवा आजच्या शाळेत असे शिक्षक घेतले जातील का आणि पुढे ते टिकू शकतील का?