Saturday, June 3, 2017

घरमालक आणि भाडेकरू - न्यायालय

घरमालक आणि भाडेकरू - न्यायालय

काही वेळा निष्कारण एखादी गमतीदार घटना आठवते. परवा कॅंटीनमध्ये बसलो होतो, घरमालकाचे व भाडेकऱ्यांच्या निर्णयांबद्दल विषय निघाला. अलिकडील काही वर्षांत घरमालकाचे बाजूने निर्णय लागू लागलेत. एक काळ असा होता की एकदा का घर भाड्याने दिले की घरमालकाने हे घर आपल्या मालकीचे घर होते हे विसरून जायचे आणि 'आता उरलो उपकारापुरता' या तालावर 'आता उरलो घरभाडे घेण्यापुरता' हेच लक्षात ठेवायचे. घरभाडेपण त्या भाडेकऱ्यांच्या मर्जीने, पद्धतीने ! माझे अनुभवाने बनलेले मत म्हणजे - 'कुळकायदा आणि घरमालक-भाडेकरू कायदा' यांनी माणसांना खोटे, लबाड व स्वार्थी बनविले, त्यांच्यातील माणुसकी संपुष्टात आणली ! इतरांची मते वेगळी अवश्य असू शकतात, असो. तो आजचा विषय नाही.
सन १९९० च्या दरम्यानची घटना ! माझेकडे कुलकर्णी नांवाचे घरमालक आले, त्यांना भाडेकऱ्याकडून घर खाली करून हवे होते. भाडेकरू पाटील होता आणि बाजारसमितीत होता, सामना असमान होता. काही असले तरी प्रत्येकांस उपलब्ध कायद्याचा व तरतुदींचाच उपयोग करून मार्ग काढावा लागतो.
कुलकर्णींचे डोके लोकांनी भणाणून सोडले होते - तुमच्या आयुष्यांत तुम्हाला ताबा मिळणार नाही, निदान पन्नास वर्षे केस चालेल, तुम्ही दुसरीकडे ही जागा सोडून रहाण्यास जा, भाडेकरूला जागा विकून टाका व जे काही मिळताहेत ते पैसे पदरात पाडून घ्या, वकिलांचे घर भरू नका, या कोर्टाचा नाद फार वाईट - शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये उगाच म्हणतात का ? त्या कुलकर्णींला आपण कुणीकडून घरमालक झालो व भाड्याने घर दिले असे होवून गेले. बरं, प्रत्येकाचा सांगण्यातील आत्मविश्वास पहाता, त्याचप्रमाणे होवू शकेल असेच त्यावेळी 'कुलकर्णीला' वाटत होते. या सगळ्या गोंधळाचा 'भाडेकरू पाटील' यांना कल्पनाही नव्हती, ते निवांत होते.
शेवटी धीर धरून हे 'घरमालक कुलकर्णी' माझ्याकडे आले. 'आपल्याला तुम्हाला केस द्यायचीय' कुलकर्णी म्हणाले, 'मग द्या, मी कुठे नाही म्हणतोय.' माझे उत्तर !
'नाही, म्हणजे आमचा भाडेकरू घर खाली करत नाही, त्याला काही गरज नाही, पण भरवस्तीतले व कमी भाड्याचे कसले फुकटातले घर, तो कसला सोडतोय ?' त्याचा त्रागा ! 'बरं, मग ? नसेल सोडत तर जावू द्या.' माझा प्रतिसाद ! मला या अशा संवादाची सवय झाली आहे. 'बरं, आपल्या कोर्टात किती वर्षांपूर्वीच्या केसेस सध्या चौकशीला लागलेल्या आहे?' कुलकर्णी यांचा धूर्तपणे अंदाज घेणारा प्रश्न ! 'दहा वर्षांपूर्वीच्या केसेस सुरू आहेत.' माझे निर्वीकार उत्तर ! कुलकर्णी यांचा चेहरा पडला. 'हे कोर्ट झाल्यावर मग जिल्हा कोर्ट, तिथे काय परिस्थिती ?' त्यांनी धीर धरून विचारले. 'काही नाही, साधारणत: तिथे ७-८ वर्षांपूर्वीची अपीले सुरू आहेत आणि त्यानंतर हायकोर्ट तिथे निदान १५ वर्षांपूर्वीची कामे सुरू आहेत', मी न विचारता स्पष्टीकरण दिले. 'म्हणजे निदान ३५ वर्षे ! काही खरे नाही !' कुलकर्णी रडवेले झाले होते, आलेल्या चहाकडेही त्यांचे लक्ष नव्हते. 'चहा घ्या', म्हणत मी त्यांना भानावर आणले. त्यांनी चहाची कपबशी उचलली व चहा पिवू लागले, पण त्यांचे चहा पिण्यात लक्ष लागे ना ! चहा झाला. 'बरं, मी येतो.' कुलकर्णी उदास आवाजात म्हणाले. आल्यावर 'तुम्हाला केस द्यायची आहे' हे म्हणतांनाचा त्यांचा जोश व उत्साह कुठल्याकुठे पळाला होता. ते जाण्यासाठी उठले व मी म्हणालो, 'मला कोणती केस देणार होता ?' 'काही नाही, काही खरे नाही - ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान' त्यांनी अभंग माझ्या तोंडावर फेकला.
'बसा, तुम्हाला घर खाली करून हवे आहे ना ?' मी विचारले. कुलकर्णी तत्परतेने 'हो' म्हणाले. 'मग, तुम्हाला मी सांगतो तसे करावे लागेल व निदान तीन वर्षे शांत बसावे लागेल. 'पण तीन वर्षे' त्यांनी विरोध करण्याचा क्षीण प्रयत्न केला. 'तुमच्या पस्तीस वर्षाच्या मानाने तीन वर्षे फारच कमी आहेत नाही !' मी बोललो. ते काही बोलले नाही, मी मला हवी ती माहिती विचारली, ती त्यांनी सांगीतली. जागेचा कच्चा नकाशा काढून दाखवला आणि दस्तऐवज तयार करून दिला. हा सब-रजिस्ट्रारकडे नोंदवा व सिटीसर्व्हेला त्याप्रमाणे नोंद करा, असे म्हणून तो कागद त्यांच्या हातात दिला. 'हे तर वाटणीपत्र आहे, मला वाटण्या करायच्या नसून भाडेकरूकडून जागा खाली करून घ्यायची आहे, आणि हे भलतेच काय ?' त्यांनी आश्चर्यचकीत होत विचारले. 'आपले काय ठरले आहे ?' मी म्हणालो। आणि 'यांत सर्वांचाच हिस्सा आहे' असे म्हणत माघार घेतली. पंधरवाड्याने माझे म्हणणेप्रमाणे केल्याचा निरोप आला. असे दोन तीन महिने गेले. रस्त्यात भेटल्यावर 'रामराम' करण्याच्या निमित्ताने मला आठवण करून देणे सुरूच होते, मी लक्ष देत नव्हतो कारण अपेक्षेप्रमाणे एक बातमी येत नव्हती.
एके दिवशी आठ महिन्यांनंतर मला अपेक्षित बातमी आली, मी त्यांना निरोप दिला. ते आले. 'आपल्याला भाडेकरूला घर खाली करण्याची नोटीस द्यायची आहे व नंतर घर खाली केले नाही तर दावा करायचा आहे.' ते माझ्याकडे भूत पाहिल्यासारखे पहात राहिले. त्यांच्या डोळ्यांसमोर बहुतेक 'पस्तीस वर्षे' उभी राहिली असावीत. 'दावा करायचा ?' त्यांचा प्रश्न आणि 'हो'हे माझे उत्तर !
दरम्यान 'डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्याच्या योजने' प्रमाणे यांचा पूर्वीचा संडास वापरणे बंद करावे अशी नगरपालिकेची यांना नोटीस आली, यांनी मी सांगीतलेल्या जागेत दुसरा संडास बांधला. हे मला सांगीतले. मी भाडेकरूला घर खाली करण्याची नोटीस तयार केली, पाठविली. भाडेकरू घर खाली करणारच नव्हता, त्यामुळे दावा केला. कोर्टाने नोटीसेस पाठविल्या. दरम्यान नगरपालिकेने पंचनामे करून यांचा संडास बंद केला. यांच्या नविन बांघलेल्या संडासला कुलूप लावले.
भाडेकरू पोलीसांकडे गेला आणि अत्यावश्यक सेवा बंद केल्याची तक्रार केली. पोलिसांनी घरमालकांना बोलाविले. ते बोलावतील याची कल्पना होतीच, त्यांना शासनाचे धोरणाप्रमाणे नगरपालिकेने संडास बंद करण्याची कारवाई केल्याचा कागद दाखविला आणि कोर्टात केस सुरू असल्याचे सांगीतले. पोलिसांनीही असा चमत्कारिक प्रकार पाहिला नव्हता. त्यांनी भाडेकरूला सांगीतले, शासनाच्या धोरणाप्रमाणे संडास बंद झाला आणि ही बाब न्यायप्रविष्ठ आणि दिवाणी आहे, यांत आम्हाला काही करता येत नाही. तुम्ही न्यायालयांत गेलेलेच आहात तर तेथेच हा विषय मांडा.' एवढे सांगून पोलिसांनी त्याला रवाना केले. संडासासारखी अत्यावश्यक सेवा शासनाचे धोरण म्हणून नगरपालिकेने बंद करावी, हे त्यांना काही उमजेना !
भाडेकरूने कोर्टात संडास ही अत्यावश्यक सेवा असून घरमालकाने बंद केली असा अर्ज व शपथपत्र देवून एकतर्फी हुकूम मिळविला. दुसऱ्या दिवशी स्पेशल बेलीफभत्ता भरून भाडेकरू संडासचे कुलूप उघडण्यासाठी त्याला घरी घेवून आला. यांत असे होईल ही कल्पना होतीच म्हणून घरमालकाने पोलीसस्टेशनात जे सांगीतले तेच सांगीतले. वादग्रस्त संडास नगरपालिकेने बंद केला असून ज्या संडासला कुलूप आहे, त्याचा आणि दाव्यातील संडासचा काहीही संबंध नाही. हे दोन्ही वेगवेगळे संडास असून दाव्यातील संडास व कुलूप लावलेला संडास हे दोन भिन्न आहेत, त्यांचे मालकपण वेगळे आहेत, संडास उघडायला हरकत झाली असा रिपोर्ट बेलीफाने कोर्टात दिला. जी व्यक्ती व तिची मिळकत दाव्यांचा भाग नाही त्यांच्याविरूद्ध हुकूम कसा मागीतला हे भाडेकरूच्या वकिलांना विचारले. ते हे ऐकून दिग्मूढ झाले.
दरम्यान या भाडेकरूने 'यासाठी' आपली व्यवस्था गल्लीत दुसरीकडे केली होती, त्यांना लगेच ऑर्डर घेतो तोपर्यंत संडासचा वापर करू द्या अशी त्यांची परवानगी घेतली होती आणि यॅंव करू, तॅंव करू अशा गमजा केल्या होत्या, तसेच ही केस निदान पंचवीस-तीस वर्षे चालेल तरी आपण मालकाला त्याच्या घराचा ताबा मिळू देणार नाही अशा गोष्टी आमच्या पक्षकाराच्या कानावर येतील अशी व्यवस्थापण केली होती. या गोंधळांत एक महिना निघून गेला होता. त्या गल्लीतील माणसाचे आमच्या भाडेकरूची व त्याच्या कुटुंबातील माणसाची 'याची' व्यवस्था करताकरता दमछाक झाली होती. त्याच्या घरातील माणसांच्या आपसात बोचाबोली, वाद होवू लागले होते. तो या निष्कारण संडासची व्यवस्था केल्याने हैराण झाला होता आणि पोलीसाकडून हा भाडेकरू हात हलवत परत आला आणि कोर्टाची अॉर्डर असूनही बेलीफ संडास न उघड़ता परत गेला होता. त्यामुळे त्या गल्लीतील माणसाचा धीर सुटत चालला होता तरी नेमका काय गोंधळ आहे याची त्याला कमालीची उत्सुकता होती. तर इकडे त्या भाडेकरूच्या घरातील लोक हे 'तुमची संडास मोकळा करण्याची अॉर्डर कोर्ट कधी करणार आहे ? मेल्या, त्यांच्या नजरेने होतसुद्धा नाही, तब्येती बिघडायच्या अशाने आमच्या !' असे बोलून त्याचे डोके पकवू लागले होते. भाडेकरू त्रस्त झाला होता. या संडासचा विषय संपूर्ण गल्लीत आणि कोर्टात निष्कारण गाजू लागला होता, याचा पण भाडेकरूला त्रास होवू लागला होता.
अशात त्या गल्लीतील माणसाचा आमच्या माणसाला निरोप आला. या भाडेकरूला रसद पुरविणाऱ्याचा निरोप आपल्याला येईल याचा मला अंदाज होताच आणि म्हणून तेथे काय बोलायचे हे मी सांगीतले होते. आमच्या माणसाला चहापानही झाले आणि त्यांच्या अपेक्षित प्रश्नाचे आगमन झाले - 'काहो, हे संडासचे नेमके काय प्रकरण आहे ? निकाल कधी लागणार आहे ?' त्यांनी विचारले. 'शहाण्या माणसाने कधी कोर्टाची पायरी चढू नये. पंचवीस-तीस वर्षे निकाल लागत नाही.' आमच्या माणसाच्या आतापर्यंतच्या ऐकीव माहितीने त्याचा धीर सुटत चालला होताच पण हे ऐकल्यावर त्याची कंबरच खचली. तेवढ्यात स्वयंपाकघरात कपबशी फुटल्याचा आवाज आला, बहुतेक ज्यातून मी चहा प्यायलो तीच फुटली असावी. आंतून वहिनी तरातरा बाहेर आल्या आणि 'धर्मराज, संडासचा घोळ मिटवा.' हे शेलके शब्द बोलून परत गेल्या ! आमचा माणूस तेथून लगेच उठला.
कोर्टाच्या हे लक्षात आले होते की ही केस लवकर तात्पुरती अॉर्डर देण्यासारखी नाही. शेवटी तात्पुरत्या अर्जाच्या चौकशीच्या दिवशी मी सर्व कागदपत्रे दाखवून सांगीतले. या घरमालकांच्या कुटुंबीयांच्या तोंडी वाटण्या सुमारे पाच वर्षांपूर्वी झाल्या, त्याची नोंदणी नंतर झाली, नगरपालिकेने यांच्या घरमालकांच्या हिश्श्याच्या जागेतील संडास शासनाच्या धोरणाप्रमाणे बंद केला. त्या जागेत यांनी नविन संडास बांधला नाही, हे त्यासाठी बाहेर सार्वजनिक संडासात जातात कारण यांच्याजवळ नवीन संडास बांधायला पैसे नाही, दरमहा ४०/- मिळणारे भाडे हेच यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यातून नवीन संडास बांधणे शक्य नाही. भाडेकरू ज्या संडासचा गाजावाजा करत आहे तो संडास माझ्या आईच्या मालकीच्या मिळकतीत आहे, ती घरमालक नसल्याने या दाव्यांत नाही. तिच्या मिळकतीसंबंधाने तिला या दाव्यांत सामील करता येणार नाही आणि मे. कोर्टाला तिच्याविरूद्ध व तिच्या मिळकतीसंबंधाने कोणतेही आदेश देता येणार नाही. न्यायाधीशांनी ऐकून घेतले, त्यांना हसू आले. भाडेकरूचा संडास उघडून देण्याचा अर्ज रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही निर्णय देता येणे शक्य नव्हते.
दुसऱ्याच दिवशी भाडेकरूने त्याच्या कधीच्याच घेतलेल्या प्लॉटमधे नविन बांधकाम करण्यासाठी पाया खोदण्याची सुरूवात केली व ही जागा सोडून तो वर्षाच्या आंत नविन जागेत रहायला गेला. घरमालकांना त्यावेळी माझे धोरण समजले !

४ सप्टेंबर २०१६

No comments:

Post a Comment