Tuesday, December 26, 2017

चारा घोटाळा

चारा घोटाळा

आज श्री. प्रविण बर्दापूरकर यांनी चारा घोटाळा प्रकरणाबद्दल छान लेख लिहीला आहे. तो वाचल्यावर मनांत आलेले थोडक्यात दिले. ——-
न्यायालयासमोर ज्यावेळी तपासाची सर्व कागदपत्रे आणि पुरावा उपलब्ध असतो, त्याचवेळी न्यायाधीश कोणीही असो, विशेष फरक पडत नाही. सर्वांना अपेक्षित असाच निर्णय येतो. कारण वर्तमानपत्र किंवा विविध मार्गांनी येणाऱ्या बातम्या आणि उपलब्ध पुरावा यांत फार फरक असतो. न्यायालयांत पुरावा मान्य होतो, बातम्या नाही. अलिकडे येणाऱ्या बातम्या या जनहिताचा विषय असेल तर दखल घेण्यापुरत्या महत्त्वाच्या असतात.
दुसरी बाब म्हणजे न्यायालयाचा निर्णय जेव्हा येतो त्यावेळी निर्णयावर टीका होते. असा निर्णय का आला, यांस कारणे कोणती, असा निर्णय येण्यास कोणकोण व कायकाय जबाबदार आहे यांचा विचार अपवादानेच कोणी करतात. असा निर्णय का लागला हे निकालपत्र वाचल्यावरच समजू शकते, ते पण त्यांतील खाचाखोचा माहिती असतील तरच, अन्यथा नाही. त्यामुळे ही आरडाओरड ही वृथा ठरते.
तिसरी बाब म्हणजे शासनाने ठरवले आणि त्यांस समर्थपणे अंमलबजावणी करणारे कर्मचारी मिळाले तर अगदी अपवादात्मक परिस्थितीत गुन्हेगार सुटू शकतील, असे आज देखील कायदे आहेत. शासन किंवा कर्मचारी यापैकी एकाचा जरी तसा सत्यशोधनाचा विचार असेल, तरी शक्य आहे; पण अडचणी वाढतात, त्रास होतो. प्रश्न आहे शासन किंवा कर्मचारी यापैकी कोण ठरवतो याचा !
चौथी बाब म्हणजे न्यायव्यवस्था ! या सर्व मंडळींनी जर व्यवस्थित काम केले तर चित्र स्पष्ट असते, त्यांवर निर्णय द्यायला अडचण तुलनेने कमी असते. मात्र तसे नसेल तर मात्र आकाशातील त्यांच ढगांमधून प्रत्येकाला वेगवेगळे आकार दिसतात, तशी न्यायालयांची अवस्था होते. न्यायालय चालवणारी पण माणसेच आहे, एवढं लक्षात ठेवले तरी पुरे !

२४. १२. २०१७

नाते सांभाळले, अन -------------!

नाते सांभाळले, अन -------------!

पूर्वीच्या काळी, साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी, शेतकरी कुटुंबातील पाचसहा भाऊ आणि त्यांची मुलेबाळे, तीनचार बहिणी आणि या सर्वांचे आईवडील एकत्र रहायचे, अगदी एका ठिकाणी, हे काही नवीन नव्हते ! हा घरातीलच मोठा कबीला, तेवढाच मोठा गोतावळा आणि शेजारपाजार ! ती मंडळीपण नातलगांसारखीच ! घरांतील मंडळींना सर्वाना स्वतःच शेतासाठी कष्ट करावे लागत. मजूर कोण आणि मालक कोण ? म्हटले तर सर्वच मजूर आणि मालक ! कारण सर्वानाच तर शेतांत राबायचे आहे, तेंव्हाच तर पोटाला जरा पोटभर खायला मिळणार. सर्वजण एकत्र रहात असले की प्रत्येकाच्या सुखात जसे वाटे पडायचे तसेच दुःखात पण दुःखीतांस आधार मिळायचा, त्याला सांभाळून घेतले जायचे. पूर्वी नेहमीच खेडेगावांत दिसत असलेली अशी उदाहरणे, आता कमी झालेली आहेत पण तरीही अजूनही थोडी का होईना पण आजही दिसतात, दिवसेंदिवस कमी होत चाललीय हे खरंय. प्रत्येकाला स्वतःची पडलेली आहे असे म्हणा का प्रत्येक स्वार्थी झाला आहे असे म्हणा का आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी या फक्त बोलायच्या कल्पना राहीलेल्या आहेत, अंमलात आणायच्या नाही अशी समजूत झाली आहे कुणास ठाऊक ?

घटना साधारणतः १९६१ सालातील, शेतकऱ्याचा अशाच गजबजलेल्या घरातील ! चारपांच भावंडातील मोठा भाऊ देवाला प्रिय झाला आणि एकत्र कुटुंबाची जबाबदारी ही आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याच्या नंतरच्या भावाकडे आली. मोठया भावाचा एकच मुलगा आणि त्याची आई अगोदरच त्याला सोडून गेली होती. घरांतील आईबापाविना हा पोरगा सांभाळला तो त्याच्या काकाने आणि काकूने ! त्यांनापण मुलेबाळे होतीच पण फक्त एकच मुलगी ! घरात भांड्याला भांडे लागायचे पण मुलाच्या काकाने आपल्या कर्तव्यांत कधी कसूर केली नाही. या भाऊबहीणीच्या नात्यांत काही कधी चुलतपणा डोकावला नाही आणि नातं सख्खच राहिलं ! यथावकाश मुलाचे लग्न झाले, घरी सुनबाईची पावलं लक्ष्मीची पावलं बनून आली. काकाला एका जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे वाटले. इतर भावांना त्यांची मिळकतीतील हिस्से दिलेले होतेच ! पण या आईबापाविना असलेल्या पोराला सांभाळता सांभाळता हे काका त्याच्यातच केंव्हा राहू लागले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. इतके हे काकापुतणे एक विचाराचे झाले होते. त्यानंतर मुलीचे लग्न झाले आणि मुलगी तिच्या घरी सासरी गेली. मुलीच्या लग्नात या भावाने कसली उणीव पडू दिली नाही. 

यापूर्वीच काकाने त्याच्या हिश्यातील काही जमिनी, घरे विकली; थोडी जमीन आणि एकदोन घरे राहीली होती. या पुतण्याचाही हिस्सा याच्याजवळच होता. काका-पुतणे असे वेगळे नातेच माहीत नव्हते. काका कुटुंबाच्या कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आणि सर्व जबाबदारी पुतण्याने सांभाळली. काकाला वेगळे रहाण्याची काही आवश्यकताच नव्हती आणि तसा विचारही कोणाच्या मनांत नव्हता. आईबापाविना असलेल्या या पोराला काकाने स्वतःचा पोरगाच समजून मोठे केले आणि मग हा पुतण्या, काकाला आपला बाप म्हणूनच सांभाळू लागला. त्याचे दुखणे-खुपणे, जेवण-खाण, उठ-बस हे सर्व पुतण्या, त्याची पत्नी पहायची. मुलगीपण कधी अधूनमधून बापाला पहायला म्हणजे भेट घ्यायला यायची आणि त्यांची उस्तवार जावईबापूंच्या पाहुणचारासहीत हा पुतण्या आणि त्याची पत्नी बघायची. काकाला समाधान वाटायचे, आपल्या पश्चात आपल्या मुलीची काही काळजी नाही. म्हातारा मनाशीच खूष व्हायचा आणि देवाचे आभार मानायचा. 'माझ्यानंतर तुझेच आहे सगळे, तूच पाहतो आहे आता कधीचे. आता माझा काही भरवसा नाही. काय कुठे नांव लावण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज वगैरे द्यायचे असतील तर दे, माझे अंगठे घे, मी द्यायला तयार आहे'. म्हातारा काका समाधानाने म्हणायचा. 'शेतीबाडी आणि घरंदारं काय कुठे पळून जाताहेत का. मीच तर पाहतोय सर्व आणि तू काही अजून जात नाही वर, पोराचे लगन पहायचे आहे अजून !' पुतण्या काकाची समजूत काढायचा. असे करता करता अर्जफाटे झालेच नाही, शेतीबाडी आणि घरदार म्हाताऱ्याचेच नांवाने राहीले आणि कोणतीही वाट न पहाता देवाने शेवटी एकदा या काकाला आपल्याकडे बोलावून घेतले. सन १९९२ च्या दरम्यानची ही गोष्ट ! या पुतण्याने काकाचे सर्व अंत्यसंस्कार आपल्या बापाप्रमाणे केले आणि आपले पितृऋण फेडले. त्याला लहानपणीच गेलेला आपला बाप तरी कुठे आठवत होता? मुलीला बापाचे समजले, मुलगी आली, चार दिवस राहीली, बापाचे जाण्याने झालेले दुःख हलके केले आणि निघून गेली. मुलगापण आपल्या कामाला लागला.

वर्ष-दीडवर्ष झाले, दरम्यान बहिणीचे कान कोणी फुकले कोणांस ठावूक पण तिने कसलासा निर्धार केला. आणि एका दिवशी त्या भावाला या बहिणीची तालुका कोर्टामार्फत नोटीस आली ! बहिणीने भावाविरुद्ध दावा केला होता, वर्ष होते १९९३ ! आपल्या बापाची सर्व मिळकत आपल्याला मिळावी कारण आपण त्याचे एकमेव वारस आहोत म्हणून ! लहानपणापासून सख्खे-चुलत माहित नसलेली ही भावंडं, सख्ख्या भावाबहिणीप्रमाणे एकत्र राहीलेले हे भाऊ बहीण आता मिळकतीसाठी कोर्टांत उभे होते.  नेमका हक्क कोणाचा यांवरून वाद सुरु होणार होता, नव्हे सुरु झाला होता. बहिणीला जसे सांगणारे होते तसे भावाला देखील सांगणारे होते. कायदा भलेही थोडा बहिणीच्या बाजूने असेल पण समाज, समाजाचा पाठींबा भावाच्या बाजूने होता. भावाने त्याच्या लहानपणापासून काकाने स्वतःच्या मुलाप्रमाणे कसे सांभाळले हे सांगीतले, त्याचप्रमाणे आपणही काकासोबत वडिलांप्रमाणेच कसा व्यवहार केला हे सांगीतले. या बहिणीच्या लग्नात कायकाय केले हे सांगीतले. काकाला काय केले नाही अगदी सर्व केले हे सांगीतले. काका कित्येक वेळा 'शेतीबाडी, घरे नांवावर करून घे' हे सांगत असतांना देखील मी तसे केले नाही कारण माझ्या मनांत पाप नव्हते, हे सांगीतले. त्याचा आणि त्याच्या वडिलांचा हिस्सापण काकाजवळच होता हे देखील सांगीतले. दोन्ही बाजूने भरपूर कागदपत्रे रंगली, साक्षीपुरावे झालेत. नात्यांबद्दल वाद नव्हताच ! कायदा सरळ होता. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातील तरतुदीनुसार मुलीला वडिलांच्या मिळकतीत हक्क मिळाला. सन २००५ मध्ये दाव्याचा निकाल बहिणीच्या बाजूने लागला. भावाला, समाजाला आणि नातेवाईकांना जरा वाईट वाटले. बहिणीच्या बाजूने निकाल लागला असल्याने त्यांचेकडील मंडळी खूष होती. भावाने तालुका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयांत दाद मागीतली. वरील जिल्हा न्यायालयाने देखील बहिणीची बाजू उचलून धरत तालुका न्यायालयालाच निकाल सन २०११ मध्ये कायम केला. भावाला वाईट जसे वाटले तसा संतापही आला. 'काकाचे मी केले ते मिळकत मिळण्यासाठी नाही हे नक्की ! पण मग त्यावेळी ही बहीण काय करत होती ? फक्त मिळकत हवी, जबाबदाऱ्या नकोत.' मनांतल्या मनांत भाऊ पुटपुटू लागला. ही अवस्था बहिणीच्या हितचिंतकांना समजल्यावर त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.

हे दोन्ही निकाल अनुभवल्यावर भावाला वाईट वाटले. समाजाच्या विचार काहीही न मानता, न्यायालये कसे निकाल देतात आणि कायदापण कसा आहे हे समजतच नाही, भावाचा जीव गत काळातील घटना आठवून तीळतीळ तुटत होता. भावाने शेवटी जिद्द धरली आणि जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नामदार उच्च न्यायालयांत दाद मागण्याचे ठरविले. तो माझ्याकडे आला, संतापलेल्या मनाने पण निराश भावनेने ! 'जवळची माणसे इतकी बदलतात ? पैसा इतका मोठा आहे ? नातीगोती पैशासमोर सर्व खोटी ? हिच्या बापाचे कसलीही अपेक्षा न धरता आयुष्यभर करणारा मी, त्यावेळी ही कुठे गेली होती? ' त्याचा संताप आपल्या समाजाच्या विचारसरणीला साजेसा होता. त्याने सांगीतलेल्या घटनेवरून आणि घडलेल्या परिस्थितीवरून कायकाय करता येईल याचा विचार केला. खालील न्यायालयांत काय लिहावयाचे, सांगावयाचे अथवा पुरावा देण्याचे राहून गेलेले आहे हे पाहीले. जुन्या आणि नवीन हिंदू कायद्याचा विचार करून नामदार उच्च न्यायालयांत अपील दाखल केले.

त्यापूर्वी पक्षकाराला बहिणीला काहीतरी द्यावे लागेल याची स्पष्ट कल्पना दिली. नवराबायकोचे भांडण, भाऊबंदकीचे भांडण, कायमच्या शेजाऱ्याचे भांडण वगैरे केसेस असतील तर मी शक्यतोवर आपसांत होत असेल तर पहातो. संबंध टिकले तर चांगलेच, हे माझे पाहिलेपासूनचे धोरण आहे. त्याने काही वेळा आर्थिक नुकसान होते पण मानसिक फायदा होतो. आजकाल मानसिक फायद्याला कोणी विचारात नाही, पण मला बरे वाटते आणि मी ते करतो. मी त्याला म्हटले 'हे बघ, आजपर्यंत जर तुम्ही बहीणभावाने एकमेकांबद्दल दुजाभाव बाळगला नसेल तर अजूनही काही वेळ गेलेली नाही, गावांत नातेवाईकांसोबत, संबंधितांसोबत बैठक घ्या. हे सर्व सांगा. याचे परिणाम सांगा. आपल्याला समाजातच रहायचे आहे, तुमचे मन स्वच्छ ठेवा. मनांत पाप येऊ देऊ नका आणि जुन्या उखाळ्यापाखाळ्या काढू नका. काहीतरी मार्ग निघेल.' पक्षकार थोडा मनातून हलला. 'पहातो.' म्हणून त्याच्या गावी गेला.

दोन्ही खालील न्यायालये विरुद्ध असल्यावर नामदार उच्च न्यायालयांत अपील दाखलसुद्धा करून घेणे किती अवघड असते आणि त्याची नोटीस काढणे किती कठीण असते, हे यातील जाणकारांनाच माहीती आहे. न्यायालयासमोर हे अपील निघाले. मी युक्तीवाद केला. न्यायालय माझ्या बाजूने जवळपास नव्हतेच मात्र जुना हिंदू कायदा, नवीन हिंदू कायदा, मुलगा आणि त्याचे धर्मशास्त्राप्रमाणे प्रकार, घडलेली घटना आणि त्याचा काळ, याचा निकालावर होणारा संभाव्य परिणाम आणि याबद्दलची पूर्वीची निकालपत्रे वगैरे सांगीतल्यावर न्यायालय थोडे हलले. शेवटी अशा घटना झाल्या तर समाजातील अशा परिस्थितीत अडचणीतील म्हाताऱ्या माणसांसाठी कसा निर्णय घेतला जाईल, हे सांगीतल्यावर थोडे गांभीर्य आले. मात्र तरीही परिस्थिती कठीणच होती. न्यायालयाने 'आपसांत करण्यास तयार आहे का ?' हे विचारल्यावर 'आम्ही सुरुवातीपासूनच तयार आहोत, पण समजावून सांगणारे नाहीत किंवा अडथळे आणणारे आहेत.' हे सांगीतल्यावर 'पुढील दिनांकास बहिणीला हजर ठेवा' असे कोर्टाने सांगीतले. ही बातमी त्या बहिणीपर्यंत गेलेलीच होती.

याने सर्व नातेवाईकांना ही घटना सांगीतली, बैठक बसली. सर्वांची चर्चा सुरु झाल्यावर, 'संबंध पैशासाठी बिघडू देऊ नका. तुझ्या बापाचे तू सासरी गेल्यावर यानेच केले मग त्याचे काय ? तुला जर बहीण असती आणि ती अडचणीत असती तर काय केले असते ? वगैरे दोन्ही बाजूने भरपूर चर्चा झाली. वातावरण निवळले. कोर्टाचा निरोप त्याने बैठकीत सांगीतला. बहीण पुढील तारखेस उच्च न्यायालयांत आली. तिने एक मुदत मागून, वकील लावले. न्यायालयाने एक मुदत दिली. माझे त्याच्या बहिणीशी बोलणे तिच्या वकिलांसमोर झाले, मी एकच विचारले, 'बाई, आज कायदा तुमच्या बाजूने आहे. खरे आहे. पण या तुमच्या भावाने तुमच्या वडिलांवर त्याच्या वडिलांप्रमाणे विश्वास ठेवला आणि तो त्याच्याशी मुलाप्रमाणे वागला. हे बरोबर आहे ना ?' बाई काही बोलेना. मी सुरु ठेवले, 'हे पहा, ही अशी नंतर जर तुमच्यावर वेळ आली तर तुमच्या पुतण्याने तुमच्याबद्दल काय करावे? तुमच्याशी कसे वागावे ? तुमची मुलगी त्याच्याशी कशी वागेल ? डोळ्यासमोर या गोष्टी आणा. नीट विचार करा. तुमचे जन्मापासूनचे संबंध आहेत. मी काय परका माणूस ! या न्यायालयाची हद्द फक्त याच कायद्यापुरती आणि येथेच चालते. या न्यायालयाचा एकवेळ हिशोब चुकेल पण तो वर जो या सर्व न्यायाधीशांचा न्यायाधीश बसलेला आहे, त्याचा हिशोब कधी चुकत नाही. तो कोणावर अन्याय करत नाही. तो आपल्या कृत्याचे पुरेपूर माप आपल्या पदरांत टाकतो. इथे जमले नाही तर त्याला केस हातांत घ्यावी लागेल. मग तो विचारणारसुद्धा नाही कोणाला !' आता बाई रडवेली झाली होती. 'साहेब, पैका मोठा वाईट ! मले पैक्याशिवाय कोण आहे. हा इतला खर्च येतो आहे जगायले अन दवापाण्याला, कोण देणार ?' बाई बोलली. मग मी माझ्या पक्षकाराकडे वळलो. 'हिची अडचण काय आहे ते गावी जाऊन पहा. ती दूर करा अन मग मला भेटा.' माझा पक्षकार चाट झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. ''बहिणीची अडचण दूर करणे हे भावाचे काम आणि भावाची मदत करणे हे बहिणीचे काम ! ते करा आणि मग मला भेटा. अनायासे कोर्टाने मुदत दिली आहे.' मी म्हणालो.

ही मंडळी गावांत गेल्यावर ही घटना नातेवाईक मंडळींना सांगीतली, 'आता वेळ दवडू नका. जे ठरले आहे किंवा जे ठरेल ते अमलांत आणा.' असे सांगीतले. भावाच्या ताकदीप्रमाणे आणि बहिणीच्या अडचणीप्रमाणे पैसे देण्याचे ठरले, कारण बहीण शेती करायला येणार नव्हती किंवा तेथे रहायला येणार नव्हती. दरवर्षी रितीरिवाजाप्रमाणे दिवाळीला, आखाजीला तिने तिचे माहेर समजून यावे आणि भावाने तिच्याशी भावाप्रमाणे व्यवहार करावा, हे ठरले. हे पहायला ती नातेवाईक मंडळी होतीच ! भावाचे आणि बहिणीचे प्रतिज्ञापत्र तहसीलदार यांच्यासमोर झाले ते नामदार उच्च न्यायालयांत दाखल करण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे निकाल करावा असे ठरले. ठरल्याप्रमाणे सर्वांचे झाले आणि न्यायालयासमोरील प्रकरण यानुसारच निकालात निघाले. त्यावेळी न्यायाधीशांनी काय ठरले हे विचारल्यावर त्या बहिणीने सर्व व्यवस्थीत सांगीतले. न्यायाधीशांनाही समाधान वाटले.

कायद्यानुसार आणि कायद्यांत सांगीतलेला अधिकार, न्याय हा काही वेळा आपल्या समाजात चालत आलेल्या रूढी आणि नैतिकतेनुसार असलेल्या अधिकारापेक्षा आणि न्यायापेक्षा भिन्न असतो.  समाजातील बहुसंख्य घटकांना अजूनही कायद्यापेक्षा समाजात चालत आलेल्या रूढी आणि नैतिकतेनुसार असलेल्या अधिकाराचा आणि न्यायाचा पगडा जास्त असतो. समाजाची नैतिकता, नितीमूल्ये ही जर असलेल्या कायद्याच्या विरुद्ध नसतील तर त्यांच्यात एकमेकांत संघर्ष निर्माण होत नाही. अशावेळी समाजातील पुढारीपण प्राप्त झालेल्या घटकांना ही जबाबदारी पार पाडावी लागते आणि समाजातील शांतता टिकवावी लागते.    

(ही घटना संक्षीप्त स्वरूपात 'जळगांव लोकमत' यांत दिनांक १७. १२. २०१७ आणि २४. १२. २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती )







Wednesday, December 20, 2017

गाता गळा अन् शिंपता मळा !

गाता गळा अन् शिंपता मळा !
घराच्याच मागे असणारी आमची जिल्हा परिषदेची ‘मराठी मुलांची शाळा नं. २’ आमच्याच नातेवाईकांच्या घरात भरायची. मला जवळपास शैक्षणिक आयुष्यभर सकाळी शाळा व कॉलेजला जावे लागल्याने सकाळी भल्या पहाटे उठायची सवय आपोआपच लागली. आता शाळा, कॉलेज संपले तरी ती सवय जात नाही आणि जावू पण नये, मला चांगली आहे.
घरातून टण् टण् टण् ऽऽऽ अशी घंटा ऐकू आली की आम्ही शाळेत पळायचो आणि वाजवणारा हातात वाजवण्याचा गज हातात असलेल्या अवस्थेत असतानाच किंवा फारतर त्याच्या जागेवर जाण्याच्या आंत आम्ही तेथे पोहोचलो असायचो. मुले प्रार्थनेला खाली पटांगणात गोळा होत असायची. प्रार्थना शक्यतोवर एक वाणी नांवाचा अन् अजून एक जण म्हणायचा. प्रार्थना होती, साने गुरूजींचे गीत ! — जगाला प्रेम अर्पावे ! फार छान म्हणायचा तो !
एकदा तेथे दोन मुली उभ्या राहिल्या, प्रार्थना म्हणायला ! ‘तायडे गुरूजी आहे ना, शाळा नं. १ मधले, त्यांची मुलगी आहे ही. पाचवीला आहे.’ शेजारचा तिसरीतल्या मला सांगत होता. ‘तुला कसे काय माहीत ?’ माझा स्वाभाविक प्रश्न ! ‘पाराच्या गणपतीजवळ रहातो मी. तेथेच रहातात तायडे गुरूजी, म्हणून !’ त्याचे उत्तर ! त्या दोन मुली प्रार्थनेला उभ्या राहिल्या अन् खणखणीत, स्वच्छ शब्दांच्या उच्चारात प्रार्थना म्हटली.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे।
जगी जे हीन अतिपतीत, जगी जे दीन पददलीत
तयां जावून उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
बालपणीच्या कोवळ्या मनांवर हे साने गुरूजींचे करूणेने भरलेले, वेदना व्यक्त करणारे शब्द फार परिणाम करून गेले. प्रार्थना म्हटले की सर्वप्रथम आठवते ती ही माझ्या ‘मराठी शाळा नं. २’ मधील ही प्रार्थना !
जसा मी पाचवीला गेलो, तसे मला ‘सरदार जी. जी. हायस्कूल’ येथे टाकले. उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा नुकतीच सुरू झाली होती. मराठी शाळेत जमीनीवर बसणारे आम्ही आता लाकडी बेंचवर बसायला लागलो होतो. वर्षभर सर्व विषय एकच गुरूजी किंवा बाई शिकवणार, हा अनुभव असलेल्या आम्हांस, प्रत्येक विषयाला वेगळे ‘सर’ किंवा मॅडम’ हे विशेषच वाटू लागले होते. शाळा भरल्याची, मधल्या सुटीची, सुटी संपल्याची आणि शाळा सुटल्याची घंटा ऐकण्याची सवय असलेल्या आम्हाला, इथे प्रत्येक तासाला घंटा होते हे पाहून आश्चर्यचा वाटले होते. आणि ती पण, शाळेचा कोणीतरी उत्साही व दांडगट विद्यार्थी पळत जावून कशीतरी चमत्कारिक, वेडीवाकडी घंटा न वाजवता, येथील युनीफॉर्म घातलेला शिपाई वाजवतो, हे बघीतल्यावर तर माझ्या आश्चर्याचा कडेलोट झाला होता. तास हा साठ मिनीटांचा असतो हे गणित मराठी शाळेत शिकलेलो आम्ही, इथला हायस्कूल मधला तास म्हणजे ‘पिरीयड’ हा पस्तीस मिनीटाचा असतो, हे समजल्यावर अवाक झालो होतो. सगळेच नवीन ! हे सगळे पाहून, आम्हाला निष्कारणच मोठे व श्रीमंत झाल्यासारखे वाटू लागले होते.
आम्हा पाचवीतल्या मुलांना व पाचवीच्या वर्गाला येथे हायस्कूलमधे काही किंमत नसते, हे मला मी सहावीला गेल्यावर समजले. प्रत्येक पिरीअडला पिरीअड संपल्याची घंटा झाली, की कोणीतरी नवीन सर यायचे. ते काही वेळा काहीतरी शिकवायचे तर काही वेळा गप्पा मारायचे, प्रत्येकाला त्याचे नांव, गांव, कोठून आला वगैरे विचारायचे. ‘या वर्षाचे नवीन टाईमटेबल आल्याशिवाय नीट वर्ग भरणार नाही’ हे मला माझ्याच वर्गातल्या ‘अनुभवी’ विद्यार्थ्यांनी सांगीतले.
पूर्वी प्रत्येक वर्गात असे वर्ष दोनवर्षांचे ‘अनुभव’ असलेले विद्यार्थी बऱ्यापैकी असायचे, आता तसे अभावानेच आढळतात, असे समजते. अनुभवाची किंमत राहिलेली नाही आता, हेच खरे ! त्यावेळी अभ्यासक्रम कठीण होता का शिकवणारे नीट नव्हते का मुलं अभ्यास करत नव्हते का पालक मुलांना बऱ्यापैकी ‘वाजवत’ असल्याने मुलांचे शिक्षणातील लक्ष उडायचे कोणास ठावूक ? त्यावेळी मार्कस् पण जेमतेम मिळायचे, मुलांचे ध्येय फक्त ‘पास’ होण्याचे असायचे, ते सुध्दा जेमतेम साध्य व्हायचे. आता मात्र फारच प्रगती झालेली दिसतेय. ‘नापास’ झालेले तर कोणी दिसतच नाही म्हणतात. बहुतेकांना डोळे फाटतील इतके मार्कस् आणि काहींना तर शंभर टक्क्यांच्या पण वर मिळतात, असे ऐकले. मी जर आता शाळेत शिकायला असतो, तर मला नाही वाटत माझा काही निभाव लागला असता !
आमच्या शाळेत त्यावेळी आसपासच्या खेड्यांवरून येणाऱ्या विद्यार्थांची पण संख्या बऱ्यापैकी असायची. आसपास म्हणाव्या तितक्या शाळा नव्हत्या आणि ही शाळा म्हणजे नावाजलेली शाळा ! एकेका वर्गाच्या दोन-तीन तुकड्या असायच्या.
रिकाम्या पिरीअडला कोण येईल याचा भरवसा नसायचा. काही वेळा शारिरीक शिक्षणाचे सर यायचे, सरोदे सर किंवा कोल्हे सर ! ते बहुतेक सरळ आम्हाला मैदानावर घेऊन जायचे. सरोदे सरांजवळ बारीक लवलवती अशी हिरवीगार कडुलिंबाची काडी असायची. त्यांना ती काडी सतत लवलवायचा नाद होता. त्यामुळे जवळच्या विद्यार्थ्याला सूंऽसूंऽऽ असा आवाज यायचा. तो आवाज ऐकणे त्यांना आवडायचे का तो आवाज आम्हाला ऐकवायला आवडायचे, देव जाणे ! पण त्यामुळे नंतर सर्व कामे शिस्तीत व्हायची. कोल्हे सर म्हणजे त्यांच्या गळ्याला शिटी असलेली वायर गुंढाळलेली असायची. ती जोरात लागते, असे बऱ्याच अनुभवी विद्यार्थ्यांचे मत होते. सरोदे सर व आम्ही मैदानावर गेल्यावर एकतर कबड्डी किंवा लंगडी खेळायला लावायचे. थोड्या वेळानंतर मग थांबवायचे अन् गप्पा मारायचे आमच्याशी. हिरव्यागार काडीचा सूंऽऽ सूंऽऽ आवाज करणारे हेच, हे आम्ही विसरलेले असायचो. कोल्हे सर मात्र काही वेळा शाळेने बागकामासाठी राखून ठेवलेल्या भागांत न्यायचे व बागकाम करायला लावायचे. काही वेळा मैदानात खेळायला लावायचे. या दोघांच्यातला बहुसंख्य विद्यार्थ्यांना आवडणारा समान गुण म्हणजे हे विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून मैदानावर न्यायचे, हा होय !
पण आम्हा मुलांना आवडायचा तो सैय्यद सरांचा तास ! हे उर्दू शिकवणारे होते. पण यांना पिरीअड तुलनेने कदाचित कमी असावेत, त्यामुळे शाळा नुकतीच उन्हाळ्याच्या सुटीनंतर सुरू झाली की शिक्षक नसलेल्या वर्गावर हे बऱ्याच वेळा यायचे. ‘हं, बच्चों ! अब क्या करना ? बोलो ।’ त्यांचे वाक्य ! ‘सर गाणं, सर गाणं !’ सर्वांचा एकच कल्ला व्हायचा. ‘किसको आता है गाना, कौन गानेवाला हैं’ त्यांची विचारणा. मग काही जण ज्याला जे आवडेल व आठवेल ते गायचा. पाचवीत असतांना असेच एकदा एकाला बाहेरून घेऊन आला, त्याला पाहिल्यावर पुन्हा ‘होऽऽऽऽ’ असा गलका ! त्याला म्हणायचा आग्रह सुरू झाला. ‘नफरत करनेवालोंके सिनेमें प्यार भर दूॅं’ हे गाणं त्याने म्हटले, वर्ग स्तब्ध होता. सर पण खूष दिसत होते. खरंच छान म्हटलं ! कोण म्हणून विचारल्यावर ‘संजय बाळापुरे’ हे नांव सांगीतले. नंतरही बऱ्याच वेळा तो अशा पिरीअडला गाणं म्हणायचा, वेगवेगळ्या वर्गातून म्हणायचा ! त्यावेळी अशा गाण्याचा अर्थ समजण्याचे वय नव्हते, पण चांगलं म्हणतोय हे समजायला वयाची आडकाठी नसते. तुम्ही चांगला स्वर लावा, पाळण्यातले बाळ रडायचे थांबते. संगीताचे सामर्थ्य आहे ते.
नंतर आठवीत पुन्हा एक गाणारा मित्र भेटला, राजेंद्र थोरात ! हा अकरावी पर्यंत वर्गात होता. हा तर खरंच छान गायचा. त्यावेळी नुकताच ‘कभी कभी’ हा चित्रपट आला होता. त्यातील गाणी छानच आहेत. तो जेव्हा ‘मैं पल दो पलका शायर हूॅं, पल दो पल मेरी जवानी हैं’ किंवा ‘इक दिन बिक जायेगा माती के मोल, जगमें रह जायेंगे प्यारे तेरे बोल’ किंवा ‘कभी कभी मेरे दिलमें खयाल आता हैं’ वगैरे गाणी म्हणायचा तेव्हा सारा वर्ग स्तब्ध असायचा. मुकेशची गाणी फारच सुंदर म्हणायचा. त्याचा भाऊ रावेरला स्टेट बॅंकेत नोकरीला होता. माझ्या अकरावी नंतर मी जळगांवला शिकायला गेलो अन् त्यानंतर त्याची भेट नाही.
कॉलेजला आल्यावर बारावीपासून वर्गात एक ‘संत’ नांवाचा होता. त्याचा आवाज पण छान ! हा शास्त्रीय संगीतावर आधारलेली व तशी ठळक बैठक असलेली गाणी म्हणायचा ! महंमद रफीची गाणी तर अफलातूनच ! एकदा त्याला असाच घरी घेवून गेलो होतो. त्यावेळी मी तबला शिकत असल्याने घरी तबला होता. कॉलेजचे वय, त्याला हे सांगीतल्यावर तो त्याच्या जवळची वहीच घेऊन घरी आला. मग काय ? तो गाणं म्हणतोय आणि मी तबला वाजवतोय ! आमचे घरमालक शेजारीच रहायचे. त्या मावशीपण येवून बसल्या. मग विचारले, ‘कोण रे तू ?’ त्याने ‘संत’ म्हणून आडनांव सांगीतल्यावर त्या पण विचारांत पडल्या, पण त्यांना नेमके नाते आहे का हे काही आठवलं नाही. त्यांचेपण आडनांव ‘संत’ होते. हा गाणारा मित्र ‘संत’ हा पण कॉलेज संपल्यावर काही भेटला नाही.
संजय बाळापूरे भेटतो एखादे वेळी गांवी गेलो तर ! त्याने संगीत शिकायचा प्रयत्न केला, माझ्या आईकडे यायचा तो शिकायला ! पण तो प्रयत्न तेवढ्यावरच राहिला, फार पुढे गेला नाही. दुसरे दोन मित्र म्हणजे राजेंद्र थोरात व संत यांची तर नंतर भेट पण झाली नाही. यांनी व या सारख्यांनी माझ्या या संगीताच्या रोपावर शिंपण केले, ती आवड तरारली, टवटवीत झाली कायमची ! आता नाही कोमेजणार ! माणूस दुसऱ्या व्यवसायात गेला की पोटापाण्यासाठी आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. काही वेळा दैवाने मिळालेली प्रतिभा ही पोटापाण्यासाठी उपयोगाला अवश्य येते पण काही वेळा ही देणगी फक्त छंद म्हणून राहून जाते. मला संगीताची जन्मजात आवड माझ्या आईमार्फत देणाऱ्या परमेश्वराने माझ्यावर खूप उपकार केलेले आहेत.
निवांतपणी, आपण आवड म्हणून एखाद्या गायकाचे गायन किंवा वादकाचे वादन ऐकत बसावे. पं. भीमसेन जोशींचा तोडी, पं. जितेंद्र अभिषेकींचा व डॉ. वसंतराव देशपांडे यांचा मारवा, पं. कुमार गंधर्व व विदुषी किशोरी आमोणकर यांचा भूप ! पं. डी. व्ही. पलुस्कर यांनी गायलेले काहीही ! पं. रविशंकर यांची सतार, उस्ताद अलीअकबरखाॅं यांची सरोद, पं. किशन महाराज, पं. सामता प्रसाद, उस्ताद थिरकवा यांचा तबला ! काय सांगावे आणि किती सांगावे ? काहीही ऐकायचे ठरवावे आणि त्या नादब्रह्मात आपला शीण, थकवा घालवून ताजेतवाने व्हावे.
कशामुळे कोणत्या आठवणी जाग्या होवून मनांत गर्दी करतील काही सांगता येत नाही. आता सकाळी औरंगाबादहून जळगांवी जातांना नेहमीप्रमाणे गाडीत रेडिओ लावला होता. आकाशवाणी औरंगाबाद लागले होते. काही मराठी आणि त्यानंतर हिंदी चित्रपटातील गाणी लागली होती. कानावर गाणी पडत होती आणि मन थेट माझ्या मराठी शाळेतील प्रार्थना म्हणणाऱ्या मुलांपर्यंत फिरून आले. मनाचा वेग, मनाची गती खरोखर मनच कुंठीत करून टाकणारी असते, अशी कुठेतरी कोणत्या काळात, कोणत्या विचारांत आपल्याला फिरवून आणते, आपले शरीर एकाच ठिकाणी ठेवून !

17.12.2017

Saturday, December 16, 2017

लोभीपणा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो

लोभीपणा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो

काल नामदार उच्च न्यायालयात ‘लोकन्यायालय’ होते. थोडा वेळ गेलो होतो. लोकांचा लोभीपणा हा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो, हे काही ठिकाणी दिसले. ‘आपला हक्क व हक्काचे लवकर मिळावे म्हणून आपल्याच हक्कापैकी काही नाईलाजाने सोडून द्यावे लागते’ हे उमजलेले दुर्दैवी पक्षकार दिसले; तर त्याच्या असहायतेचा, दुर्बलतेचा गैरफायदा घेत कसलाही हक्क नसतांना लाभ उपटणारे पण दिसले.
‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यं त्यजति पंडित:’ हे सुभाषित अवगत करून वागणारे दिसले. वेळेवर लोकन्यायालयाने मार्ग दाखवला म्हणून आपसांत मार्ग लवकर निघून समाधानाने जाणारे पण दिसले, मात्र ही संख्या कमी होती.
आटोपून घरी येतो तर बाहेरगांवाहून बरीच कागदपत्रे आणून ठेवलेली दिसली. कागद चाळताचाळता बघीतले, वाईट वाटले व संताप देखील आला. न्यायव्यवस्थेचा दुरूपयोग करून समोरच्याला कसे हैराण करता येते याचे अजून एक उदाहरण मिळाले.
विवाहविच्छेद म्हणजे घटस्फोट झाल्यावर देखील पूर्वीच्या पत्नीने सदर घटस्फोट बेकायदेशीर असल्याचे दर्शवत न्यायालयात खावटी मागणे, त्या दरम्यान तिने दुसरा विवाह करून आपला संसार निर्वेधपणे सुरू ठेवणे, मात्र त्याच वेळी या बिचाऱ्या पूर्वीच्या पतीला, जो सरकारी कर्मचारी आहे त्यांस, दुसरे लग्न करण्यापासून येनकेनप्रकारे रोखणे. त्याच्यावर व त्याच्या सर्व नातेवाईकांवर, अगदी जवळच्या वा दूरच्या, संबंध असलेल्या आणि नसलेल्या सर्वांवर विविध प्रकारच्या काल्पनिक केसेस करणे आणि त्यांनी ‘दाती तृण धरून’ शरण यावे यासाठी ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडणे, हे नित्याचे प्रकार झाले आहे.
पूर्वी असाच एक अनुभव आला होता. त्यावेळी हे असे विषय सामोपचाराने मिटावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मला स्त्रीने पैशाच्या लोभामुळे या स्तरावर यावे आणि तिच्या दुर्दैवाने तिला तिच्या वकिलाने पण योग्य, खरा व तिच्या हिताचा सल्ला देवू याचे वाईट वाटले होते. त्यावेळी मुलीकडच्यांनी ऐकले नाही आणि मला ठेवणीतले अस्त्र काढावे लागले. ब्रह्मास्र जसे यशस्वी होवून येते तसा तो उपाय होता, यश आले.
या अशा वृत्तीने व वागण्याने संपूर्ण स्त्री जमात बदनाम होते, तिच्या तक्रारीकडे संशयाने पाहिले जाते. अशा खोट्या तक्रारींचा परिणाम विपरीतपणे खऱ्या तक्रारींवर पण होतो. न्यायशास्त्रातील समाजामन किंवा स्वभाव ही कल्पना लक्षात घेवून आणि मग तक्रार खरी असेल तरी संशयाचा फायदा मिळून गुन्हेगार सुटतात.
अलिकडे आता अशाच स्वरुपाची प्रकरणे वाढत आहेत. कठीण असतात, पक्षकारांना मनस्ताप देणारी असतात पण इलाज नसतो. सत्य टिकले पाहीजे कितीही किंमत देवून !

१० डिसेंबर २०१७

Monday, December 4, 2017

एक व्रतस्थ कार्यकर्ता - श्री. बापूराव मांडे

मा. बापूराव मांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार मा. भैयाजी जोशी यांच्या शुभहस्ते आज भुसावळ येथे झाला.




कार्यक्रमाला मा. गुणवंतराव सरोदे, मा. एकनाथराव खडसे, मा. गिरीषभाऊ महाजन आणि मान्यवर मंडळी हजर होती. संघपरिवारातीलच नाही तर विविध विचारसरणीची, विविध स्तरातील, तत्कालीन आणि नवोदीत मंडळी हजर होती. या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित झाली. त्यातील माझा अनुभववजा लेख -
————————- ————————
एक व्रतस्थ कार्यकर्ता - श्री. बापूराव मांडे
आपणांस कदाचित श्री. प्रभाकर मुरलीधर मांडे या नांवाने थोडा परकेपणा वाटू शकतो; मात्र हा परकेपणा 'बापूराव मांडे' हे नांव ऐकले की या नांवाने क्षणांत नाहीसा होतो. तुम्हा आम्हा सर्वांना ते परिचित आहे, ते 'बापूराव मांडे' या नांवाने ! त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हा लिहीण्याचा योग !
आपल्या कोणा विशेष चिरपरिचिताचा असा काही कार्यक्रम असला, की त्यांचे इतके वय असेल यांवर आपला विश्वास बसत नाही लवकर ! काय सांगता, त्यांचे इतके वय आहे ? याचे कारण तत्कालीन आपल्या तो पावेतोच्या अनुभवातील सर्व घटना, दरम्यानचे विविध साजरे केलेले उत्सव, वेळोवेळी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, महत्त्वपूर्ण बैठकी, त्यातील गप्पागोष्टी, विविध आंदोलने वगैरे या सर्व अगदी आपल्याला अलिकडच्या वाटतात. वेळ जणू पुढे गेलेलाच नाही, तेव्हापासून तो थांबलाच आहे असे वाटते. मग लक्षात येते, अरे आपले वय आज किती आहे ? हे आपण लक्षात घेतले की हळूहळू आपण वर्तमानात येतो, आपल्याला आजच्या परिस्थितीचे भान येते; की केवढा मोठा २५-३० वर्षांचा कालखंड पहातापहाता झरकन आपल्या हातातून, डोळ्यांसमोरून निघून जातो.
पूर्वीपासूनच कै. डॉ. नरहर पुरूषोत्तम जोशी यांचे घर म्हणजे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' जळगांव जिल्ह्यातील रावेरचे कार्यालय समजले जायचे. संघाच्या प्रचारकांचा कायम रहिवास व संघ परिवारातील सर्व मंडळींचे तेथे येणेजाणे, गप्पागोष्टी व बऱ्याच वेळा बैठका ! तिथेच मला ही सर्व मंडळी भेटली. तेथे कोणाकोणाची व माझी भेट झाली ? श्री. भैयाजी जोशी, डॉ. गुणवंतराव सरोदे, श्री. अरूणदादा पाटील, कै. डॉ. अविनाशराव आचार्य, श्री. भार्गवराव सरपोतदार, कै. गोपीनाथ मुंडे, श्री. लालकृष्ण आडवाणी !
त्या काळी मी एल्एल्. बी. चा अभ्यास संपवून १९८५-८६ ला रावेरला आलो नुकताच आलो होतो. अर्थात तो पावेतो मला होता तो रावेर येथील शालेय वयातील संघ हा आम्ही अनुभवला तो आमचे मित्र श्री. भरत अमळकर, श्री. सुनील पाटील यांच्या शाखेवरील उपस्थितीत ! नंतर जळगांव येथील महाविद्यालयीन काळातील विद्यार्थी परिषदेत रमलो ते 'श्री. चंद्रकांतदादा पाटील,'श्री. चंद्रकांत धुळूप' या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या कार्याने व आनंद घेतला तो त्यांच्या सहवासातील 'अभाविप' यांचा अनुभव ! नंतर श्री. शशिकांत घासकडबी होते तिथे विस्तारक म्हणून !
येथे रावेरला आल्यावर अधूनमधून माझ्या भेटीगाठी व्हायच्या त्या तत्कालीन प्रचारक श्री. लालचंद टाटिया, श्री. अप्पा कुलकर्णी, श्री. सौमित्र गोखले, श्री. भाऊराव पाटील वगैरे यांच्या ! यांच्यासोबत वारंवार उल्लेख यायचा तो श्री. बापूराव मांडे यांचा ! हा कालखंड साधारणत: १९८६ ते १९९३ पावेतोचा ! त्यावेळेस अजून एक नांव लक्षात ठेवावे लागेल ते म्हणजे प्रचारक असलेले श्री. विठ्ठलराव नवरे यांचे ! त्यानंतरच्या भेटीगाठी मग बऱ्याच नित्याच्या पण प्रसंगानुरूप व्हायच्यात ! श्री. अनिल वळसंगकर हे नंतर आले, दि. ६ डिसेंबर, १९९२ नंतर !
मलाच लक्षात असलेला नाही तर सर्व जगतालाच लक्षात असलेला विशेषत्वाचा काळ म्हणजे 'विश्व हिंदु परिषदेने' त्यावेळची काढलेली 'गंगामाता भारतमाता यात्रा' आणि 'राम जनमभूमी आंदोलन' ! हा काळ कोण आणि कसा विसरणार ? या अत्यंत महत्त्वाच्या काळात श्री. बापूरावांकडे जबाबदारी होती ती १९९० पर्यंत 'जळगांव जिल्हा कार्यवाह' म्हणून आणि सन १९९१ ते १९९६ या काळात 'विश्व हिंदु परिषदेचे' जिल्हा मंत्री म्हणून ! या काळांत आपल्या समाजाने, समाजातील प्रत्येक गटाने व समाज नेत्याने प्रत्येक माणसाच्या 'राष्ट्रीयत्वाच्या भावनेला' साद घातली. त्यावेळी आपल्या लक्षात आले नाही पण आता लक्षात येते की एवढ्या विपरीत परिस्थितीत, शासनही विरूद्ध असतांना ही माणसं काय काम करून गेली आहेत, काय असेल त्यांच्यात ?
त्यावेळी या रामजन्मभूमी आंदोलनांत कोण नव्हते ? सातपुडा पर्वतात रहाणारे वनवासी होते की ज्यांनी इतकी माणसं आपल्या देशांत आहेत हे कधी आजपर्यंत पाहिलेच नव्हते; एवढेच काय त्यांना ही सगळी माणसे 'आपली माणसं' आहेत हे पण कधी माहिती नव्हते. जी माणसं आजपावेतो आयुष्यभर शेळ्यामेंढ्या घेवून पोटापाण्यासाठी गांवोगांव, रानोंमाळ फिरत होती त्यांनाही समजले की प्रभू रामचंद्र हे आपले आहेत व ही सर्व माणसं आपली आहेत. जसे आपले मठ-मंदीरे सोडून संतमहंत बाहेर पडले; तसेच दूर कुठे रानांवनांत, दऱ्याखोऱ्यात रहाणारी साधू मंडळी बाहेर पडली, ती प्रभू रामचंद्र हा तुमचा पूर्वज आहे हे सांगण्यासाठी !
श्री. बापूराव मांडे यांनी तत्कालीन परिस्थतीत जिल्हाभर वेगवेगळ्या व्यक्तींवर जी जबाबदारी सोपविली होती, त्यातील माझ्यावर पण ही 'रामजन्मभूमी संबंधी' जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी आम्ही म्हणजे २५-३० वर्षांची मुले ! ही त्यांनी सोपविलेली जबाबदारी आम्ही जबाबदारी म्हणून मानत कुठे होतो ? हे तर आपले कर्तव्य आहे, ते आपण करायला पाहिजे. ही अशी मनोभूमिका तयार करणे ही सामान्य बाब नाही. आता या निमित्ताने मागे वळून पहातांना लक्षात येते की ही विविध विचारांची, आचारांची व राजकीय पक्षांची देखील माणसं या माणसाने जिल्हाभर फिरून कशी एकत्र बांधली असतील ? आमच्यासोबत कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा मुलगा नव्हता ? अयोध्येस त्यावेळी जळगांव जिल्ह्यातील संख्या ही लक्षात घेण्याइतपत मोठी होती.
या निमित्ताने आम्ही गांवोगांव जायचो तर गांवातील, घरांघरांतील अन्नपूर्णांनी आम्हाला व आमच्या सोबतच्यांना देखील ममतेने त्यांच्याजवळ जे आहे त्यातून जेवू घालून तृप्त केले. ही सर्व तयारी, ही सर्व काळजी व हे सर्व नियोजन करणे आणि ते यशस्वीपणे पार पाडणे हे सोपे काम नाही. सन १९९६ ते २००६ या काळात त्यांनी परिवाराची जबाबदारी सांभाळली ते 'भारतीय जनता पक्षाचे' कारकत्वाची ! सन २००६ नंतर त्यांचेवर अशी ठरवून कोणती जबाबदारी नाही. मात्र सातपुडा पर्वतात 'हरिपुरा' येथे त्यांनी जे 'गोसेवा केंद्र' सुरू केलेले आहे, ती समाजाप्रती व्यक्त केलेली त्यांची एक श्रद्धाच होय ! त्यापूर्वीपासून गेली पंचवीस वर्षे भुसावळ येथील 'संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची' प्रमुख जबाबदारी ते पार पाडत आहे.
त्यावेळी 'रामजन्मभूमी आंदोलनाचे वेळी' पन्नाशीत असलेल्या या माणसाने त्यावेळी ज्या तडफेने काम केले ते पाहिल्यावर आमचा कसा विश्वास बसणार की श्री. बापूराव मांडे आता पंचाहत्तरीत आले ! माझ्या डोळ्यांसमोर त्याचवेळचे मिळेल त्या वाहनाने फिरणारे श्री. बापूराव येतात ! डोक्याला उन्ह लागू नये म्हणून पांढरा लांब बागायतदार रुमाल बांधून 'राजदूत मोटारसायकल'वर येणारा त्यांचा चेहरा आजही दृष्टीसमोर येतो.
कोणी आजही श्री. बापूरावांना सांगीतले की, 'हे पहा, आता आपल्याला हे काम करायचे आहे, तुमच्याशिवाय कोण करणार ?' तर मला नाही वाटत ते नाही म्हणतील ! --- वयाच्या ऐंशीपंचाऐंशीत प्रत्यक्ष कोंढाणा किल्ल्यावर लढाईला जाणाऱ्या शेलारमामाचे रक्त या माणसांच्या अंगी खेळत असते, तो त्याची पंचाहत्तरी साजरी केली तरी स्वस्थ थोडाच बसणार आहे ?

22. 11.2017

आज मार्गशीर्ष शुद्ध ११ ! गीता जयंती !


आज मार्गशीर्ष शुद्ध ११ ! गीता जयंती !
भगवान श्रीकृष्णाने आपल्या सख्याला, शिष्याला म्हणजे अर्जुनाला जे समजावून सांगीतले, ते अगदी जगन्मान्य ठरले, काळाच्या कसोटीवर ! तीच ही भगवदगीता ! यातील हे गीता ध्यान वाचले तरी आपले मन त्या भावनेशी तद्रूप होऊन जाते.
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्येमहाभारतम्।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम्
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥१॥
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः॥२॥
प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये।
ज्ञानमुद्र्याय कृष्णाय गीतामृतदुहे नमः॥३॥
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥ ४॥
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ ५॥
भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला ।
अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ॥ ६॥
पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा- सम्बोधनाबोधितम् ।
लोके सज्जनषट्पदैरहरहः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल- प्रध्वंसिनः श्रेयसे ॥ ७॥
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥ ८॥
यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ।
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः ॥ ९॥

३०. ११. २०१७

वेगवेगळी राज्ये

वेगवेगळी राज्ये निर्माण करण्यासाठी न थकता किंवा वेळप्रसंग पाहून कमी-जास्त प्रभावी वातावरण निर्माण करणे, ते जर अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर खरे-खोटे विषय निर्माण करून त्याला भावनिक खतपाणी घालणे, त्यावेळी आपल्यावर मोठे राज्य असल्याने भयंकर अन्याय होतो आहे, याची खरी-खोटी बोंब ठोकणे आणि त्या सर्वांवर एकमेव, खात्रीशीर व भरवशाचा उपाय म्हणजे फक्त वेगवेगळी, छोटीछोटी राज्ये निर्माण करणे हाच होय !
हे म्हणजे आपल्या घरातील कर्तेपण जाणीवपूर्वक नालायक, संधीसाधू आणि पक्षपाती व्यक्तीला द्यायचे, तो घरातील सदस्यांशी पक्षपाताने वागला की त्यांवर उपाय म्हणजे त्याला बदलून टाकणेपर्यंतचा मार्ग, शोधण्याऐवजी घरातील सदस्यांनाच दुसऱ्याच्या स्वाधीन करायचे किंवा वेगळे व्हायला सांगायचे, असे झाले आहे ! 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हे मानणाऱ्यांना हे पटणे शक्य नाही. या विचारांची कर्तृत्ववान माणसें ज्यांना दिसत नसतील तर अशी जबाबदारी देतांना आणि निवडतांना आपली दृष्टी स्वच्छ ठेवा, भरपूर माणसे दिसतील. अगदी अशी आणि हीच दृष्टी ठेवली तर, सध्या असलेली हीच माणसे पण व्यवस्थीत वागतील, अगदी 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हेच डोळ्यांसमोर ठेवून !
स्वतंत्र विदर्भ हवा, आता स्वतंत्र मराठवाडा हवा, मग स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र किंवा कोंकण किंवा पश्चिम महाराष्ट्र का नको ?

२. १२. २०१७

आज मार्गशीर्ष पौर्णिमा ! दत्त जयंती !



आज मार्गशीर्ष पौर्णिमा ! दत्त जयंती !
लहानपणी सायंकाळी देवासमोर विविध स्तोत्रे जी म्हणायचो, त्यांतील गुरुवारच्या दिवशी आवर्जून म्हटले जाणारे हे गुरु दत्तात्रयाचे स्तोत्र ! संस्कृतच्या बहुसंख्य स्तोत्राप्रमाणे अत्यंत प्रभावी करणाऱ्या चालीत म्हणता येणारे स्तोत्र, हे याचे देखील वैशिष्ट्य आहे. मनांत सात्त्विक आणि समर्पणाचा भाव निर्माण करण्याचे सामर्थ्य असणारे, हे स्तोत्र ! परमेश्वरापुढे, गुरु दत्तात्रेयापुढे नम्र होवून आपल्यावर कृपादृष्टी व्हावी ही विनंती, प्रार्थना या स्तोत्राचे जनक श्री सरस्वती गंगाधर स्वामी यांनी किती आर्ततेने केली आहे, हे आपल्याला एकदा ते प्रत्यक्ष म्हटल्यावरच येऊ शकेल.
१५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. गुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायातील श्लोक १२० ते १२८ या फक्त आठ श्लोकांचे हे स्तोत्र, आपल्यासाठी देत आहे.
इंदुकोटितेज करुण-सिंधु भक्तवत्सले ।
नंदनात्रिसूनु दत्त, इंदिराक्ष श्रीगुरुम् ।
गंधमाल्याक्षतादि-वृंददेववंदितम् ।
वन्दयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम ॥
मायपाश-अंधकारछायदूरभास्करं ।
आयताक्ष पाहि श्रियावल्लभेश-नायकम् ।
सेव्य भक्तवृदं वरद, भूय भूय नमाम्यहं ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
चित्तजादिवर्गषट्क-मत्तवारणांकुशम् ।
तत्त्वसारशोभितात्मदत्त श्रियावल्लभम् ।
उत्तमावतार भूत-कर्तृ भक्तवतसलं ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
व्योमरापवायुतेज-भूमिकर्तुमीश्र्रम् ।
कामक्रोधमोहरहित सोमसूर्यलोचनम् ।
कामितार्थदातृ भक्त-कामधेनु श्रीगुरुम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
पुंडरिक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् ।
चंडदुरितखंडनार्थ दंडधारि श्रीगुरुम् ।
मंडलीकमौलिमार्तंडभासिताननम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् ।
नादबिंदुकलातीत, कल्पपादसेव्ययम् ।
सेव्यभक्तवृंदवरद भूय भूय नमाम्यहम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्ट ज्ञानवारिधिम् ।
कृष्णावेणितीरवास-पंचनदीसंगमम् ।
कष्टदैन्यदूरिभक्त-तुष्टकाम्यदायकम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
नारसिंहसरस्वती-नाम अष्टमौक्तिकम् ।
हारकृत शारदेन गंगाधर-आत्मजम् ।
धारणीक-देवदीक्ष गुरुमूर्तितोषितम् ।
परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥
नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत् ।
घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् ।
सारज्ञानदीर्घआयुरोग्यादिसंपदम् ।
चारुवर्गकाम्यलाभ वारंवार यज्जपेत् ॥

२.१२. २०१७

आरक्षण -------------- पण किती ?

आरक्षण -------------- पण किती ?

'आरक्षण' हा अत्यंत संवेदनशील शब्द बनत चाललेला आहे दिवसेंदिवस ! असलेले आरक्षण मग सामाजिक निकषांवर असेल तर जास्तच ! जे आरक्षणाच्या कक्षेत येत नाहीत किंवा ज्यांना आरक्षणाचे लाभ मिळत नाहीत, त्यांची मानसिकता ज्यांना आरक्षण मिळत आहे त्याच्या विरोधी बनत आहे, बनविली जात आहे. याला काही पर्याय उभा करून सामाजिकदृष्टया असलेले आरक्षण हे संपुष्टात आणण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न किंवा तसे विचार मांडण्याचा प्रयत्न हा नेहमीच होत आलेला आहे. आर्थिकदृष्टया आरक्षण द्यावे ही मागणी पण अलिकडे जोर धरत आहे. सामाजिकदृष्टया समानता यावी म्हणून अजून एक आरक्षण दिले गेलेले आहे, ते म्हणजे राजकीय आरक्षण ! लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे वेळी विविध ठिकाणच्या जागी सामाजिकदृष्टया दुर्लक्षित गेलेल्या जातीजमातींसाठी, गटांसाठी काही जागा राखून ठेवल्या जातात. या जागा सर्वच ठिकाणी असतात, म्हणजे अगदी सोसायट्यांपासून ते लोकसभेच्या जागेपर्यंत !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार या सामाजिक आरक्षणाची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. त्यांत वेळोवेळी विविध दुरुस्त्यादेखील तत्कालीन सरकारने केलेल्या आहेत. आरक्षण असावे का नाही ? असल्यास ते कोणत्या प्रकारचे असावे ? आरक्षणाचे किती प्रकार आहेत ? किती वर्षे आरक्षण सुरु ठेवावे किंवा ठेवले पहिजेत ? इतकी वर्षे म्हणजे साधारणतः ६७ वर्षे तरी आरक्षण ठेवलेले आहे, त्यामुळे ज्यांना आरक्षणाचा लाभ आजपावेतो मिळत आलेला आहे त्यांचा पुरेसा विकास झालेला आहे का ? झालेला असल्यास तो कसा समजून येईल ? त्याची समजण्याची काही व्यवस्था आहे का ? पुरेसा विकास जर झाला असेल आणि त्या आरक्षणांमागील हेतू जर साध्य झाला असेल तर हे सध्या मिळणारे आरक्षण बंद करावे का ? आरक्षण हे सामाजिक दृष्टीने खरोखरच ठेवले गेले होते का ? त्याचा सध्याचा वापर हा मूळ उद्देशाप्रमाणेच आहे की त्यांत काही बदल झालेला आहे ? त्याचा समाजस्वास्थ्यावर कसा, ,हणजे चांगला अथवा वाईट, परिणाम होत आहे ? या सर्व बाबी या आजच्या विषयाशी जरी संबंधित असल्या तरी त्या विषयावर आजची घटना नाही. तर ही घटना आहे, सद्य परिस्थितीतील असणारे आरक्षणासंबंधाने नियम आणि धोरण लक्षांत घेऊन कसा गोंधळ होतो, त्यामुळे आरक्षणाच्या बाहेर असलेल्या समाजावर कसा अन्याय होतो. सध्या आरक्षण हा अतिशय संवेदनशील विषय बनलेला असल्याने, त्यासंबंधाने काही बोलले गेले आणि त्याचा काही वेगळाच अर्थ निघाला किंवा जाणीवपूर्वक काढला गेला तर होणारा संभाव्य त्रास डोळ्यांसमोर जो खऱ्याखोट्या प्रकारे मांडला गेलेला आहे, ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, त्यामुळे त्यांवर न्याय्य बाजूसुध्दा मांडण्यास कसे पुढारी लोक, सरकार आणि सर्वसाधारण मनुष्य घाबरत आहे, हे दर्शविणारी ही घटना ! राजकीय लाभासाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी किती ओढाताण आणि घोडेबाजार चालतो हे आपण नित्य पहातो, असे असतांना देखील या बद्दल बऱ्याच काळ कोणी आवाज उठवत नाही. ही  बाब याचे गांभीर्यया अधोरेखीत करते.

मी तसा मूळचा पूर्वी खान्देश म्हणून समजल्या जाणाऱ्या भागातील ! वकिलीच्या व्यवसायाने मराठवाड्यातील औरंगाबाद येथे उच्च न्यायालयांत म्हणजे औरंगाबाद खंडपीठात वकिली करण्यास आलो. खान्देश म्हणून ओळखला जाणारा भाग हा सातपुड्याला लगतच आहे. काही तालुके किंवा गांवे तर इतकी त्याच्या लगत आहेत की सातपुड्यावरून उतरले की त्या तालुक्यांत किंवा गावातच येतो. सातपुड्यांत उगम पावणारी नदी म्हणजे 'तापी नदी' !  जिची ओळख 'सूर्यतनया', म्हणजे 'सूर्याची मुलगी' अशी आहे. तापी नदीच्या पाण्याने खान्देश बऱ्याच प्रमाणांत सुजलाम सुफलाम, समृद्ध केला आहे. अर्थात खान्देशवासीय हे तसे मुळातच कष्टाळू आणि शिक्षणाची आवड असलेले ! कष्टाला आणि अभ्यासाला फळ केंव्हातरी येणारच ! पूर्वी हा खान्देश या नावाचाच जिल्हा होता. खान्देश म्हटले की त्यांत हल्लीचे महाराष्ट्रातील जळगांव, धुळे आणि नंदुरबार हे पूर्ण जिल्हे आणि नासिक जिल्ह्यातील देखील काही भाग येतो. तसे अगदी काटेकोरपणे पाहिले तर खान्देशमधे सध्या मध्यप्रदेशांत असलेला, पण पूर्वीच्या खान्देशचाच भाग असलेला बुऱ्हाणपूर हा जिल्हा पण येतो. माझा माहितीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रातील बेळगांव हा भाग जसा कर्नाटकांत आहे तसाच बुऱ्हाणपूर हा भाग सुद्धा मध्यप्रदेशात आहे, पण यांकडे फारसे आम्हा खान्देशवासियांचे किंवा कोणाचे लक्ष नसावे. खान्देश या भागाचे दोन जिल्हे झालेत. एक म्हणजे पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश ! पूर्व खान्देश हा नंतर धुळे जिल्हा झाला तर पश्चिम खान्देश हा जळगाव जिल्हा झाला. धुळे जिल्ह्याचे नंतर अलिकडे पुन्हा विभाजन होवून दोन जिल्हे झाले - धुळे आणि नंदुरबार ! 

आज आपणांला सांगणार आहे ती गोष्ट खान्देशमधील, अलीकडच्या नंदुरबार जिल्ह्यातील ! सातपुड्यातून उगम पावलेली 'सूर्यतनया' तापी नदीने या भागांतील नागरी जीवनाला जसे समृद्ध केले आहे तसेच पर्वतीय वस्तीला देखील जीवन दिलेले आहे, कारण सातपुड्यांत विविध समाजाचे लोक जसे रहातात तसेच आदिवासी लोक पण बरेच आहेत. नंदुरबार जिल्ह्यांत तर आदिवासी समाजाचे लोक बऱ्याच संख्येने ! भारत सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील बराचसा म्हणण्यापेक्षा बहुसंख्य भाग हा 'अनुसूचित जमाती'साठी म्हणून जाहीर केलेला आहे. भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे 'अनुसूचित जमाती' यांची प्रगती व्हावी, त्यांनी प्रगत समाजाबरोबर यावे म्हणून इतर सर्वसामान्य समाजाला उपलब्ध असलेल्या सोयी-सवलतींपेक्षा जास्तीच्या सोयी-सवलती देत असते. 

संपूर्ण तालुका, काही गांवे किंवा संपूर्ण जिल्हा हा 'अनुसूचित भाग' म्हणून जाहीर करावा किंवा काही भाग जाहीर करावा हे तेथे 'आदिवासी' म्हणून शासनाने जाहीर केलेला समाज किती प्रमाणांत आहे यावर अवलंबून असते. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र हे असे जरी असले तरी तर दहा वर्षांनी 'अनुसूचित भाग' कोणता असावा याचा विचार नव्याने होत नाही. त्यामुळे जो भाग अनुसूचित जमातीची लोकसंख्या कमी झालेला आहे, तरी तो भाग शासनाच्या दृष्टीने 'अनुसूचित भाग' म्हणूनच असल्याने त्याला अनुसूचित भागात असल्याबद्दल मिळणारे फायदे जास्तीचे मिळतात. जी मंडळी अनुसूचित जमातीत येत नाही त्यांची त्यामुळे बऱ्याच वेळा अडचण होते, त्यांना ना अनुसूचित जमातीचे फायदे मिळतात ना सर्वसाधारण म्हणून विचार केला जातो. सर्वसाधारण समाजाचे समजले गेलेले लोक, गांव किंवा तालुका येथे अनुसूचित जमातीचे लोक बहुसंख्य नसतात, मात्र हे लोक रहात असलेला भाग हा अनुसूचित भागात येत असल्याने त्यांचे अस्तित्व जवळपास झाकोळले जाते. महाराष्ट्रात या संबंधीची सूचना भारत सरकारने The Scheduled Areas (Maharashtra) Order, 1985 यानुसार जाहीर केलेली आहे. याचा हेतू अतिशय चांगला आहे. दुर्लक्षिलेल्या भागाचा, लोकांचा विकास अग्रक्रमाने, विशेष काळजी घेऊन व्हावा हा हेतू !

ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यावर त्यांत उतरणारे उत्सुक पुढारी हे प्रत्येक वॉर्डासाठी फारच काटेकोर असतात. आपल्याला सोयीचा म्हणजे निवडून येण्यास सोपा असा वॉर्ड ते निवडतात. त्याची तयारी ही वरची रचना जेंव्हा होते त्यावेळेपासूनच सुरु होते. नंतर पुन्हा उत्सुक उमेदवार हा कोणत्या समाजातील आहे, तेथे त्यांचा समाज किती आहे, त्यातील कोणी निवडणुकीला उभे तर राहणार नाही ही पण भिती असते. त्यामुळे स्पर्धा वाढते. वेगवेगळे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहीले की अनपेक्षितपणे तिसराच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. हे कोणालाच नको असते. उत्सुक उमेदवाराला राखीव मतदार वॉर्ड, संघ हवा का तो सर्वसाधारण उमेदवार आहे यावर पण गणित अवलंबून असते. काही वेळा सर्वसाधारण उमेदवाराला अत्यंत सोयीच्या असलेल्या वॉर्डाला राखीव वॉर्ड म्हणून घोषित केले जाते किंवा याच्या उलट होते. पुन्हा सर्व गणित बदलते. ग्रामपंचायतीच्या वेळी असलेले उमेदवार हे तुलनेने प्राथमिक समजले जातात. यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकीतील उमेदवार हे क्रमाक्रमाने राजकीयदृष्टया महत्वाकांक्षी आणि या विषयातील तज्ञ समजले जातात.

ही घटना साधारण सन २०११ मधील ! अशीच वेळेनुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याच्या बेतात होती. तेथील विविध गट आणि गण यांची रचना झाली. नेहमीची पंचाईत म्हणजे प्रत्येकालाच त्या जागेवर निवडून येवून जनतेची सेवा करायची असते पण जागाच कमी असतात ! त्यातच पुन्हा हवे असलेले सोयीस्कर गट, गण जर आरक्षित झाले तर होणार गोंधळ आणि त्यात होणारे एकमेकांवरचे भलेबुरे डाव-प्रतिडाव मग विचारूच नका ! काही डाव उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तर काही पाडण्यासाठी असतात. या सगळ्यांचे डाव जनता वेगळ्याच प्रकारे हाणून पडत असते हे वेगळेच ! निवडणूक जाहीर होण्याच्या बेतात असल्याने तेथील ग्रामपंचायतीतील सदस्य पाटील यांनी या रचनेच्या संबंधाने तक्रार उपस्थित केली. निवडणुका जाहीर झाल्या की त्या वेळेत घेण्याची काळजी निवडणूक आयोग घेत असतो. त्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर हरकती घेणारे असतातच, त्यांच्या हरकती अपवादात्मक परिस्थितीतच मंजूर होतात, बहुतेक सर्वच रद्द होतात. मग उरते ते उच्च न्यायालय आणि जमले तर सर्वोच्च न्यायालय ! बहुतेक उच्च न्यायालयापर्यंत उत्सुक उमेदवार येतात, त्यांची तक्रार खरी आणि कायद्यात बसणारी असेल तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना न्याय पण मिळतो. या मुळेच न्यायव्यवस्थेचे महत्व टिकून आहे.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या संभाव्य निवडणुकीची तयारी सुरु होती. निवडणूक जाहीर झाली, तशी वेगवेगळ्या टप्प्यावर हरकती घेतल्या पण त्या रद्द झाल्या. शेवटी निवडणुकीला उत्सुक असलेले पाटील उच्च न्यायालयांत माझ्याकडे पोहोचले. त्यातील महत्वाचा मुद्दा होता तो तेथील लोकसंख्येचा विचार न करता वॉर्ड केले आणि ते आरक्षित केले. जेथे आदिवासींची संख्या कमी तेथे आरक्षीत आणि जेथे जास्त ते सर्वसाधारण म्हणून जाहीर ! लोकसंख्येच्या प्रमाणांत प्रतिनिधित्व दिलेले नाही. उच्च न्यायालयाने याबाबत ऐकून घेतल्यावर या संबंधीचा निर्णय हा शासनाने ग्यावायचा असल्याने तक्रारकर्त्याला याबद्दल शासनाकडे आणि संबंधित व्यवस्थेकडे दाद मागावी अशी परवानगी दिली. सदर तक्रारींचे निवेदन शासनाला आणि संबंधित व्यवस्थेकडे सहा आठवड्यात द्यावे आणि ते दिल्यावर त्यांनी त्यावर चार महिन्यांत निर्णय घ्यावा. असा आदेश दिला.


दरम्यानचे काळांत याबद्दल विचार न करता आणि याचिकाकर्त्याच्या तक्रारीला न जुमानता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने पंच्यात समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आदेश काढला. गट आणि गण याची रचना, त्यांचे आरक्षण याबद्दल प्रक्रिया पार पाडून निवडणूक कार्यक्रम पुढे सरकत होता. याचिकाकर्त्याला या बद्दलचे आदेश, नियम आणि शासनाचे धोरण हे घटनेच्या आरक्षण धोरणाचे विपरीत आणि इतर तरतुदींच्या विरोधी, घटनाविरोधी असलेबद्दल वेगवेगळ्या याचिका केल्या.

'वकीलसाहेब, आपण शेवटपर्यंत अगदी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत जावू पण याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहीजे. हे अर्धवट काम असे येथे होऊ द्यायचे नाही.' माझे पक्षकार पाटीलांनी मला सांगीतले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आणि शासनाने याचिकाकर्त्याच्या तक्रार निवेदनासाठी थांबणार नाही याची चुणूक निवडणूक प्रक्रियेचा आदेश काढून केली. लगेच त्यावर नवीन याचिका दाखल करून ही सर्व वस्तुस्थिती सांगीतली, गेल्या तीन निवडणूकांची कशी स्थिती होती, ते दाखविले. त्या क्षणाला आमचेकडे महत्वाचे मुद्दे म्हणजे - लोकसंख्येच्या प्रमाणांत सर्वांना जागा मिळालेल्या दिसत नव्हत्या, निवडणूक आयोगाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचे प्रमाण सांभाळले नव्हते. जिल्हा परिषदांमध्ये तर चक्क १००% आरक्षण होते. या बाबी न्यायालयासमोर दाखविल्यावर, प्रथमदर्शनी आमचे म्हणणे योग्य असे असे वाटले आणि मग पहिल्याच दिवशी न्यायालयाने 'यापुढील निवडणुकांचे काम या याचिकेच्या निर्णयावर अवलंबून राहील' हा आदेश दिला. येथे आम्ही बरीचशी लढाई जिंकली.      

त्यानंतर न्यायालयाच्या पूर्वीच्या याचिकेतील आदेशाप्रमाणे, याचिकाकर्त्याने मग भारत सरकार आणि त्यांचे संबंधित विभाग, महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे संबंधित विभाग तसेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे पण हे तक्रारींचे निवेदन दिले. या निवेदनांत ग्रामपंचायतीपासून ते नंदुरबार जिल्ह्याविषयी देखील याबाबत तक्रारी होत्या. आमच्या तक्रार निवेदनाकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते, 'आमच्या खात्याचा संबंध नाही' असे आवर्जून ज्यांचा संबंध नाही त्यांचे उत्तर आले. ज्यांचा संबंध आहे ते बहुतेक गप्प होते अपवाद 'भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, दिल्ली' ! तेथील सचिव अत्यंत कार्यदक्ष आणि हुशार दिसले. त्यांनी फोन करून मला वेळ सांगीतली, त्यावेळी काही काम असल्याचे लक्षांत आल्यावर दुसरा फोन करून एक तासाने उशिरा यावे असा निरोप दिला. अलिकडे काम करण्याचा नक्की दिवसही न सांगणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये हे त्यांचे वागणे अजूनही माझ्या लक्षांत आहे. मी तेथे गेल्यावर, टेबलवर माझी फाईल उघडलेली होती. त्यांनी माझे म्हणणे नीट एकूण घेतले, ते त्या विभागाचे असल्याने आणि कदाचित पूर्वीच वाचून ठेवलेले असल्याने, काय गोंधळ झालेला आहे हे त्यांचे लगेच लक्षांत आले. युक्तीवाद संपला आणि पुढील दिनांक मिळाली. पुढच्या दिनांकाला मी गेल्यावर त्याने मला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी यापूर्वीच माझा तक्रार अर्ज मान्य केला होता आणि महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारतर्फे त्या संबंधाने आदेश पाठविले होते. त्याची साधी प्रत त्यांनी हसून मला दिली. एक अत्यंत चांगला, अलिकडच्या वागण्याने सरकारी कर्मचाऱ्याचा न अपेक्षिलेला अनुभव ! त्यानंतर या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाकडे चौकशी व्हावयास हवी होती. त्यानुसार एकदा महाराष्ट्र शासनाकडे चौकशी झाली. मात्र माझ्या पक्षकाराचे म्हणणे खरे आहे, ते मान्य केले तर आपल्याला अडचणीचे ठरेल हे लक्षांत आल्यावर मग पुढील तारीख दिली गेली आणि नंतर टोलवाटोलवी सुरु झाली.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची निवडणूक लागली. निवडणूक झाली, निकाल जाहीर झाले. मात्र माझा पक्षकाराचा तक्रार अर्ज अजूनही प्रलंबित होता. त्यांवर भारत सरकारने निर्णय घेतला होता आणि महाराष्ट्र सरकारकडून त्याबद्दल खुलासा, अहवाल मागीतला होता. त्यावर पुढील निर्णय अवलंबून होते. न्यायालयातील याचिका अजूनही प्रलंबित होती. नंतरच्या घडलेल्या घटनांच्या दुरुस्तीचा अर्ज मी याचिकेत केला, तो मंजूर झाला, त्याप्रमाणे याचिकेत दुरुस्ती केली. अंतिम निकालाच्या दृष्टीने भारत सरकारचा निर्णय आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेला आदेश आम्हाला महत्वाचा होता. निवडणूक झाली असल्याने निवडून आलेले उमेदवार आणि शासन निर्धास्त, शांत होते. मात्र आमचा पक्षकार शांत नव्हता.

याचिका चौकशीला आली. नंतर घडलेल्या घटना आणि पहिलाच आदेश मी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. लोकसंख्येच्या प्रमाणांत प्रतिनिधित्व हवे ते या निवडणुकीतही मिळालेले नव्हते. पंचायत समितीच्या जागांमधील आरक्षणाचे प्रमाण बरोबर नव्हते. जिल्हा परिषदेच्या संपूर्ण जागांवर आरक्षण होते म्हणजे सर्व जागा आरक्षित होत्या. कोणत्याही परिस्थितीत १००% आरक्षण हे चालणार नाही, हे घटनादत्त अधिकार इतरांना होते. या परिस्थितीत याचिका मंजूर करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. सामनेवाले मुदतीवर मुदती मागत होते. शेवटी एकदा मी किती मुदती मागितल्या हाच युक्तीवाद नाईलाजाने केला. न्यायालयाने शासनाला आणि निवडणूक आयोगाला याबद्दल सूचना घ्या अन्यथा अंतीम निर्णय देण्यात येईल असे सांगीतले. त्या दिवशी मी काही थोडे सांगीतले आणि मागील दिनांकास सामनेवाल्यांना सूचना घेण्यास सांगितल्याची आठवण करून दिली . निवडणूक आयोगाचे वकील यांनी न्यायालयांत अगदी स्वच्छ मनाने सांगीतले - याचिकाकर्त्याचे म्हणणे बरोबर आहे. आमची झालेली चूक पुढील निवडणुकीत दुरुस्त करू. मात्र आता हे करणे अवघड आहे. न्यायालयाने ते म्हणणे स्विकारुन याचिका निकालात काढली.

साधारणपणे कोर्टांत जाणारा मूर्ख ठरला पाहीजे असेच धोरण हे सामनेवाल्याचे असते. त्यामुळे सामनेवाला हा नेहमी कालापव्यय करून आपले काम सुरूच ठेवतो. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे हे न्यायाचे महत्वाचे तत्व असल्याने, म्हणणे मांडण्यासाठी बऱ्याच वेळा मुदत दिली जाते. आपण हे न्यायसंस्थेसमोर प्रामाणिक नसल्याने आपल्या 'मनांत एक आणि ओठात एक' असे असते. म्हणणे मांडायला मुदत मागतांना, आपल्याला काहीही अधिकार नाही हे माहित असतांना देखील आपण मुदत  काम मात्र सुरूच ठेवतो. शेवटी एक वेळ अशी येते की मग त्या दाव्याचा किंवा याचिकेचा काहीही उपयोग होत नाही, तिच्यावर निर्णय देणे हे न्यायालयाचा वेळ घालविणे किंवा निरर्थक अभ्यासाची चर्चा हे होऊन बसते. एवढा वेळ आणि पैसा घालवून त्या याचिकाकर्त्याला काहीही मिळत नाही. विनाकारण वेळ आणि पैसे घालविला अशी त्याची भावना होते. त्याचे उदाहरण इतरत्र दिले जाते किंवा दिसते. मग त्याच्या पासून धडा घेत नंतरही कोणी आपल्या हक्करक्षणासाठी न्यायालयाचे दार ठोठावत नाही. यामुळे जे अन्याय करणारे असतात, चुकीचे वागणारे असतात त्यांना मोकळे रान मिळते. ही कल्पना मी नेहमीप्रमाणे पक्षकाराला दिलेली होती. पक्षकाराला वकिलावरील विश्वास आणि धरावा लागणारा धीर हे पक्षकाराला न्याय मिळवून देण्यास मोठीच मदत करतात.

(ही आठवण लोकमत जळगांव' मध्ये संक्षिप्त स्वरूपांत दि. २६ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती.)

http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_JLLK_20171126_6_5&arted=Jalgaon%20Main&width=141px

http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/2017-12-02/4#Article/LOK_JLLK_20171202_4_5/204px



Tuesday, November 14, 2017

आईची माया आणि शिस्त

आईची माया आणि शिस्त 

सुमारे तीसेक वर्षांपूर्वीची ऐकलेली गोष्ट ! नेमकी कोणाच्या बाबतीत घडली होती, ते नांव आठवत नाही. मात्र घडली होती आणि त्यावेळी समाजात खूप गाजली होती.
मुलीचे लग्न होते, मुलगी सासरी येते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती घरातील जवळपास कोणत्याही कामाला हात लावत नाही. सांगीतलेच तर केल्यासारखे करायची, पण त्यांत दम नसायचा ! नव्या नवरीचे सुरूवातीचे दिवस संपतात. पाहुणे मंडळी निघून जाते. घरी दोघेच रहातात.
तो तिला विचारतो - मी गेल्या काही दिवसांपासून बघतोय आणि मला सांगीतले पण की ‘तुझ्या बायकोला काही कामांची सवय दिसत नाही. सांभाळ बाबा !’
ती - मला आवडत नाही आणि मी करणार पण नाही.
तो काही बोलत नाही. विषय तिथेच संपतो. एखादा आठवडा जातो तर तिची आई येते. तिला आनंद वाटतो.
दुसऱ्या दिवसापासून ती बघत असलेला आईचा अवतार तिला नवीन असतो. सकाळी वेळेवर उठून झाडलोट झालीच पाहीजे. चहापाणी त्यानंतर ! नंतर आंघोळ वेळेवर करून स्वयंपाक केला गेलाच पाहीजे. तिला येत नसल्याने तिची आई तिथे बसून सांगायची, पण तिलाच करायला लावायची. स्वयंपाक होत नाही तर धुणे भांडी करून घ्यायला सांगायची. तिला रिकामी बसू देई ना आणि मग हे होईपर्यंत तिला कडाडून भूक लागलेली असे. दोन्ही गप्पा मारत पोटभर जेवत. त्याचवेळी तिला थोडी पूर्वीची आई दिसे. असा साधारण पंधरवाडा गेला.
नंतर तिला स्वत:हून जाग यायला लागली. काम काय करायचे हे दिसायला लागले. ती काम करायला लागली. आई पहात असे. मदत क्वचितच करी ! पुढचा पंधरवाडा गेला. अजूनच सफाई आली कामात. आता आई तिच्याकडे कमी लक्ष देई पण लक्ष असे. पुढचा पंधरवाडा असा गेला. नंतरचा पंधरवाडा तर आई अंथरूणातून उठतच नसे. उठली तरी, थोडेफार बघून पुन्हा आराम ! हे आठवडाभर चाललं मग नंतरच्या आठवड्यात तर तिचे पोटच दुखतंय असं सांगे. हा पदार्थ कर, तो कर, पथ्याचं कर हे सांगून वेगवेगळे आजारी असतांनाचे पदार्थ करायला लागत. शेवटी जवळपास दोन महिने झाले आणि आई एके दिवशी सकाळी उठली. तिच्या जावायाला तिच्यासमोर म्हणाली - विद्यार्थी माझ्या दृष्टीने पास आहे. मी घरी निघते. घर उघड्यावर टाकून आले आहे.
तिला म्हणजे मुलीला हे समजेना, की हे काय ? मग आईने सांगीतले, ‘जावाईबापूंचे पत्र आले. विद्यार्थ्याला शिकवले नाही. त्याचे शिक्षण पूर्ण करा. इथं येवून शिकवले तरी चालेल. मला कल्पना आली, हे तुझ्याबद्दलच आहे. मी तडक निघाले. पोरीच्या संसारात गैरसमज निर्माण होण्याच्या आंत मिटवा, नाहीतर पुढच्या गंभीर समस्या होतील. तुझे जास्त लाड आम्हीच केले, तुला काही कामांची सवय लावली नाही, त्याचे हे परिणाम ! सुखी, शांत व समाधानी संसाराचा मार्ग चांगल्या पाककौशल्यातून व गृहीणीपद सांभाळण्यातून जातो हे लक्षात ठेव. नंतर आपल्या हातातून पहिले आपली माणसं जातात व संसार परका होतो.’ मुलीला रडू आवरेना. आई थोपटत सांगत होती. ‘माणसं चांगली म्हणून चांगल्या भाषेत सांगीतलं, नाहीतर भलतंसलतं काही झालं असतं तर गोष्टी वाढत जातात. अहंकार आडवा येतो व संसाराचा विचका होतो.
कालपासून मला दोन-तीन जुन्या मित्रासारख्या संबंधीतांचे फोन आले. मुलीकडून व मुलाकडून ! वेगवेगळ्या व्यक्ती आणि कुटुंबांतून ! घटना पण वेगळ्या, दोघांनाही घटस्फोट हवा होता. लग्नाला जेमतेम दोनेक वर्ष झाली होती. समाज कुठे चाललाय ? मी काय सांगायचे ते त्यांचा संसार मोडणार नाही असे सांगीतले. त्यावेळी ही जुनी घटना एकदम आठवली.

Monday, November 13, 2017

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी !

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी !

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आमचे गांव ! खान्देश म्हणून ओळखला जाणारा भाग हा सातपुड्याला लगतच आहे. काही तालुके किंवा गांव तर इतकी लगत आहेत की सातपुड्यावरून उतरले की त्या तालुक्यांत किंवा गावातच येतो. सातपुड्यांत उगम पावणारी 'तापी नदी',  जिची ओळख 'सूर्यतनया' म्हणजे 'सूर्याची मुलगी' अशी ! तापी नदीच्या पाण्याने खान्देश बऱ्याच प्रमाणांत सुजलाम सुफलाम, समृद्ध केला आहे. अर्थात खान्देशवासीय हे मुळातच कष्टाळू ! कष्टाला फळ केंव्हातरी येणारच ! हा पूर्वी खान्देश या नावाचाच जिल्हा होता. खान्देश म्हटले की त्यांत हल्लीचे महाराष्ट्रातील जळगांव, धुळे आणि नंदुरबार हे पूर्ण जिल्हे आणि नासिक जिल्ह्यातील देखील काही भाग येतो. तसे काटेकोरपणे पाहिले तर खान्देशमधे सध्या मध्यप्रदेशांत असलेला पण खान्देशचा भाग असलेला बुऱ्हाणपूर हा जिल्हा पण येतो. माझा माहितीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रातील बेळगांव हा भाग जसा कर्नाटकांत आहे तसाच बुऱ्हाणपूर हा भाग सुद्धा मध्यप्रदेशात आहे, पण यांकडे फारसे आम्हा खान्देशवासियांचे किंवा कोणाचे लक्ष नसावे. पूर्व खान्देश हा नंतर धुळे जिल्हा झाला आणि पश्चिम खान्देश हा जळगाव जिल्हा झाला. धुळे जिल्ह्याचे नंतर पुन्हा विभाजन होवून दोन जिल्हे झाले - धुळे आणि नंदुरबार ! 

आज आपणांला सांगणार आहे ती गोष्ट खान्देशमधील, अलीकडच्या नंदुरबार जिल्ह्यातील ! सातपुड्यातून उगम पावलेली 'सूर्यतनया' तापी नदीने या भागांतील नागरी जीवनाला जसे समृद्ध केले आहे तसेच पर्वतीय वस्तीला देखील जीवन दिलेले आहे, कारण सातपुड्यांत विविध समाजाचे लोक जसे रहातात तसेच आदिवासी लोक पण बरेच आहेत. नंदुरबार जिल्ह्यांत तर आदिवासी समाजाचे लोक बऱ्याच संख्येने ! भारत सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील बराचसा म्हणण्यापेक्षा बहुसंख्य भाग हा 'अनुसूचित जमाती'साठी म्हणून जाहीर केलेला आहे. भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे 'अनुसूचित जमाती' यांची प्रगती व्हावी, त्यांनी प्रगत समाजाबरोबर यावे म्हणून इतर सर्वसामान्य समाजाला उपलब्ध असलेल्या सोयी-सवलतींपेक्षा जास्तीच्या सोयी-सवलती देत असते. त्यांतील भूमिका आणि उद्देश चांगलाच आहे, मात्र या घाईगडबडीत 'दोन्ही घरचा पाहुणा उपाशी' कसा रहातो त्या 'दोन्ही घरच्या पाहुण्याच्या उपासाची' ही कथा !

ही घटना साधारणतः २०१० मधील ! नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका त्यातील एक छोटेसे गांव, तेथील ग्रामपंचायत ! तिची अवस्था 'दोन्ही घरचा पाहुणा उपाशी' अशी झाली होती. त्यांनी काही वर्षे उपासमार सहन केली, शासनाकडून मिळणारे अनुदान मिळत नव्हते. काही वेळा शासनाच्या निर्णयाचा तंतोतंत अर्थ लावण्याच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अतिउत्साहांत आणि नादांत, ग्रामपंचायतीला किंवा इतर लाभार्थींना बरेच वर्षे उपाशी रहावे लागते. त्यांत ही ग्रामपंचायत पण अडकली, तिला शासनाचे अनुदान काही काळ मिळत नव्हते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बरीचशी गांवे शासनाने 'अनुसूचित भाग' म्हणून जाहीर केलेली आहेत आणि काही तालुके तर पूर्णपणे अनुसूचित म्हणून आहेत. 

संपूर्ण तालुका, काही गांवे किंवा संपूर्ण जिल्हा हा 'अनुसूचित भाग' म्हणून जाहीर करावा किंवा काही भाग जाहीर करावा हे तेथे 'आदिवासी' म्हणून शासनाने जाहीर केलेला समाज किती प्रमाणांत आहे यावर अवलंबून असते. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र हे असे जरी असले तरी तर दहा वर्षांनी 'अनुसूचित भाग' कोणता असावा याचा विचार नव्याने होत नाही. त्यामुळे जो भाग अनुसूचित जमातीची लोकसंख्या कमी झालेला आहे, तरी तो भाग शासनाच्या दृष्टीने 'अनुसूचित भाग' म्हणूनच असल्याने त्याला अनुसूचित भागात असल्याबद्दल मिळणारे फायदे जास्तीचे मिळतात. जी मंडळी अनुसूचित जमातीत येत नाही त्यांची त्यामुळे बऱ्याच वेळा अडचण होते, त्यांना ना अनुसूचित जमातीचे फायदे मिळतात ना सर्वसाधारण म्हणून विचार केला जातो. सर्वसाधारण समाजाचे समजले गेलेले लोक, गांव किंवा तालुका येथे अनुसूचित जमातीचे लोक बहुसंख्य नसतात, मात्र हे लोक रहात असलेला भाग हा अनुसूचित भागात येत असल्याने त्यांचे अस्तित्व जवळपास झाकोळले जाते. महाराष्ट्रात या संबंधीची सूचना भारत सरकारने The Scheduled Areas (Maharashtra) Order, 1985 यानुसार जाहीर केलेली आहे. याचा हेतू अतिशय चांगला आहे. दुर्लक्षिलेल्या भागाचा, लोकांचा विकास अग्रक्रमाने, विशेष काळजी घेऊन व्हावा हा हेतू ! यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने 'ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम' ही विकास योजना जाहीर केली. 

अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर हे या आदिवासी भागातील समाजसेवक ! दिनांक २९ नोव्हेंबर, १८६९ ते २० जानेवारी, १९५१ हा यांचा जीवनकाळ ! त्यांना 'ठक्कर बाप्पा' म्हणूनच बहुसंख्य समाज ओळखायचा. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या 'भारत सेवक समाज' यांचे हे सदस्य होते. त्यांनी सन १९२२ मध्ये 'भील सेवा मंडळ' स्थापन केले. यानंतर ते महात्मा घांदी यांनी स्थापन केलेल्या 'हरिजन सेवक संघाचे' सचिव बनले. त्यांच्या पुढाकाराने सन १९४८ सालांत 'भारतीय आदीमजाती सेवक संघ' स्थापन झाला. भारतीय राज्यघटना' तयार होण्याची प्रक्रिया सुरु होती, त्यावेळी ठक्कर बाप्पा हे भारतातील अत्यंत दुर्गम भागांत जावून तेथील हरिजन आणि आदिवासींच्या परिस्थितीची पहाणी करून ती माहीती घटनाकारांना दिली, त्याचा घटनेतील याबाबत तरतुदी करतांना विचार झाला. त्यानुसार हे यांचे राज्यघटनेत मोठे योगदान आहे. याची जाण ठेवून कृतज्ञतेच्या भावनेने या विकास योजनेचे नांव महाराष्ट्र शासनाने 'ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना' असे ठेवले. 

'ठक्कर बाप्पा योजना' ही आदिवासी बहुल भागासाठी प्रगतीच्या दृष्टीने उपयुक्त आहे. ज्या भागात आदिवासी ५०% पेक्षा जास्त आहेत त्यांस 'आदिवासी बहुल भाग' म्हणता येऊ शकते. या योजने प्रमाणे निदान ४०% जरी आदिवासी तेथे रहिवासी करत असले तरी या योजनेचा फायदा मिळू शकतो. हे छोटेसे गांव नंदुरबार जिल्ह्यातील जरी असले तरी 'या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची आदिवासींची लोकसंख्या ही ५०% पेक्षा बरीच कमी आणि ४०% पण नसल्याने आदिवासींसाठी असलेल्या 'ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना' ही देखील त्यांना लागू होत नसल्याचे' संबंधित कार्यालयाने कळविले. लोकसंख्येच्या दृष्टीने आदिवासींसाठीचे अनुदान येथे मिळणार नाही हे नक्की झाले. 

त्या ग्रामपंचायतीने निदान आपल्याला सर्वसाधारण विकास योजनेचे तरी अनुदान मिळेल या भावनेने तसा शासनाकडेच पण दुसऱ्या संबंधीत विभागांत अर्ज केला. तिने जिथे अर्ज केला त्या शासनाच्याच दुसऱ्या विभागाने लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्र हे नंदुरबार जिल्ह्यातील गांव असल्याने, आणि नंदुरबार जिल्हा हा 'अनुसूचित क्षेत्रातील' असलेमुळे सर्वसाधारण क्षेत्राचे नियम येथे लागणार नाहीत ही शासकीय कर्मचाऱ्यांची भावना मनांत ठेवून त्याप्रमाणे सर्वसाधारण क्षेत्रासाठी असलेल्या विकास योजनेचे अनुदान या ग्रामपंचायतीला मिळणार नाही' हे गृहीत धरून तसे कळविले. 

यामुळे दोन्ही वेगवेगळ्या शासनाच्या विभागाकडून या ग्रामपंचायतीला कळविले गेले. आदिवासी विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी या ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या कारणाने नाकारले तर सर्वसाधारण विकास अनुदान जेथे मिळते त्या विभागाने हे क्षेत्र अनुसूचित क्षेत्रातील धरल्याने यांना सर्वसाधारण क्षेत्रासाठी असलेले अनुदान नाकारले. ग्रामपंचायतीला दोन्हीकडूनही नकारघंटा ऐकायला मिळाली - दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहू लागला. सदस्य वेगवेगळ्या पुढाऱ्यांना हाती धरून थकले. त्यांना एकदा वाटायचे आपली ग्रामपंचायत ही विरोधी पक्षाची आहे म्हणून ही वागणूक आहे, त्यावेळी ती 'भारतीय जनता पक्षाची' मानली जायची. काहींनी 'सत्ताधारी कांग्रेसच्या पुढाऱ्यांना पकडल्याशिवाय अनुदान मिळणार नाही' हे ठासून सांगीतले. लोकाग्रहास्तव सदस्यांनी तो पण प्रयोग केला, पण तो पण फसला ! अनुदान मिळेना, नुसतेच हेलपाटे आणि पायपीट ! 

'यांना कायद्याचा धडा शिकवला पाहीजे. अरे, कोणी तरी, काही तरी तर द्या ! हा काय प्रकार आहे ? आमची ग्रामपंचायत काय पाकिस्थानातील आहे काय ? हा पण नाही म्हणतो आणि तो पण नाही म्हणतो ?' सदस्य एकमेकांना म्हणू लागले आणि गावांतील लोक त्यांच्या फजितीकडे बघून 'फिदीफिदी' हंसत - 'मग काय पाटीलबुवा, कोण अनुदान देतेय ? सरकार तर विकासाच्या योजनांवर योजना जाहीर करतेय ! आणि तुम्ही इतकी मातब्बर शिकलेली मंडळी असल्यावर काही नाही ! हे काहीतरीच !' सदस्याला म्हणत, त्यांच्या तावडीतून कोणी सुटत नसे. 'बिनपाण्याची' ग्रामीण भागातील लोक फारच सफाईने करतात, पुन्हा 'आम्ही काय बुवा, अडाणी मानसं  ! असे म्हणून नामानिराळे होतात.

ही सर्व मंडळी माझ्याकडे आली, कोर्टात जायचे जायचे या उद्देशाने ! त्यांचे पुढारी म्हणजे त्या ग्रामपंचायतीचे उप सरपंच पाटील ! ही मंडळी इतकी फिरलेली असल्याने आणि पुन्हा राजकारणात मुरलेली असल्याने त्यांच्याकडे बहुतेक सर्व मला लागणारी कागदपत्रे होती. मी त्यांनी आणलेली कागतपत्रे  बघतो आणि 'काय झाले' हे तोंडी पण विचारून घेतो. घटना तोंडी व्यवस्थित सांगता आली तर मग कागदपत्रे लवकर पाहून होतात. त्यांनी त्यांची कथा पहिले ऐकविली. मला आश्चर्य वाटले. 'कसे शक्य आहे ?' मी म्हटल्यावर त्यांनी आणलेली कागदपत्रे दाखविली. ती बघीतली. मग मला पण गंमत वाटली. त्यांचे खरे होते. गोंधळ असतो शासनाच्या दोन विभागांत, पण येथे त्यामुळे ग्रामपंचायतीला उपाशी राहण्याची वेळ आली होती. कोणत्याही योजनेचा फायदा मिळत नव्हता, पुढेही मिळणार नव्हता. सर्व कागदपत्रे पाहून, घडलेली घटना संगतवार लिहून नामदार उच्च न्यायालयात ते दाखल करण्यासाठी याचिका तयार केली. त्यांचे शपथपत्र तयार केले आणि याचिका उच्च न्यायालयांत दाखल केली. न्यायालयाने शासनाला नोटीस काढली आणि याबद्दल माहिती घेवून शपथपत्र सादर करण्यास सांगीतले. 

शासनाने आपले म्हणणे सादर केले. त्यांत सांगीतले हे गाव सन १९८५ च्या जाहीर केलेल्या राजपत्रानुसार आणि सन १९९० मधील ठरावानुसार 'अनुसूचित क्षेत्रात' येते. याबद्दल काही तक्रार असेल तर त्यांना दुसरा मार्ग उपलब्ध आहे. त्यांनी त्यांची तक्रार शासनाकडे मांडावी, थेट न्यायालयांत येण्याची काही गरज नाही. यांची याचिका रद्द करावी. यांवर मी न्यायाधीशांना याचिकेत दाखल असलेले आणि शासनानेच आम्ही आदिवासी क्षेत्रांत येत असल्याने सर्वसाधारण क्षेत्राचे अनुदान मिळणार नाही हे एक शासनाच्याच विभागाचे पत्र दाखविले. आणि पुन्हा दुसऱ्या विभागाचे याच्याच विरुद्ध असलेले दुसरे पत्र दाखविले की ज्यांत म्हटले होते - आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्या ही ४०% पेक्षा कमी असल्याने ही ग्रामपंचायत आदिवासी क्षेत्रात येत नाही त्यामुळे 'ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम' हा या ग्रामपंचायतीला लागू होत नाही' हे पण शासनानेच दुसरे पत्र दाखविले. 
'आम्ही शासनाच्या दृष्टीने कोण आहे ? हे तरी सांगा. ' असे न्यायालयाला सांगीतले.  
'नाही, पण यांना हे शासनाकडे मांडता येईल.' सरकारी वकिलांना याचिका निकालात निघावी असे वाटत होते तर 'हा घोळ इथेच संपला पाहीजे' असे माझे मत होते. माझी अडचण लक्षांत घेऊन मग न्यायमूर्तीच म्हणाले - 'त्यांचे काहीही म्हणणे नाही. तुम्ही एकतर 'आदिवासी आहे' हे म्हणा किंवा 'आदिवासी नाही' हे म्हणा. तुम्ही दोन्ही म्हणताहेत. हे कसे चालेल ? त्यांना कोणाचेही का होईना पण विकासासाठी अनुदान तर मिळाले पाहीजे. त्यांत हे तांत्रिक कारण आणण्याची त्यांना काही आवश्यकता वाटत नाही.  
सरकारी वकिलांनी शासनाच्या भूमिकेसाठी मुदत मागून घेतली. न्यायालयाने 'याबद्दल स्पष्ट सूचना घ्या' हे सांगीतले आणि पुढची तारीख दिली. 
पुढच्या तारखेला काम निघाल्यावर, काही सुरु होण्याचे आंत सरकारी वकील म्हणाले यांना शासनाकडे तक्रार मांडता येते. याचिका निकालात काढावी. मला पुन्हा 'आम्ही आदिवासी आहोत का नाही हे एकदा सांगा. म्हणजे सोपे होईल. गेली काही वर्षे आम्ही शासनाच्या दृष्टीने कोण आहे हेच समाजात नाही' हे सांगावे लागले. न्यायालयाच्या मग घटना लक्षांत आली, त्यांना हसू आले. त्यांनी दोन्ही बाजूचे ऐकून शेवटी निर्णय दिला. सरकारने या कामी सरपंच, उपसरपंच किंवा त्या खेड्यातील कोणीही जबाबदार व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि अंतिम आदेश सहा महिन्यांत द्यावा. शासनाच्या धोरणाचे सक्त पालन करून त्यांना योग्य ते अनुदान देण्यांत यावे.

एवढे सर्व झाल्यावर पुन्हा यांच्या शासनाकडे फेऱ्या झाल्याच, काम काही होईना ! नाईलाजाने मग शासनाविरुद्ध म्हणजे संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करावी लागली. त्यांतील आदेश झाल्यावरही शासनाचे, अधिकाऱ्यांचे औदासिन्य पाहिल्यावर न्यायालयाने त्यांना अवमान याचिकेत नोटीस काढली. त्याला शासनाने उत्तर दिले आणि ही अवमान याचिका चौकशीला येण्याचे अगोदरच, न्यायालयाच्या आदेशाची त्या वर्षाच्या अनुदानाची बऱ्यापैकी रक्कम देऊन पूर्तता केली आणि पुढे पण नियमितपणे अनुदान देत राहू असे न्यायालयाला विनंतीपूर्वक सांगीतले. शासनातर्फे सांगितलेले विधान न्यायालयाने स्विकारले आणि अवमान याचिका निकालात काढली. या उपर जर याचिका कर्त्यांची काही तक्रार असेल तर त्याला याचिकेत दाद मागता येईल अशी परवानगी दिली. 'साहेब, गांवात आम्हाला पाहून फिदीफिदी हसणारे, आता तोंड पडून गप्प आहेत,' हे मला सांगायला त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच पाटील विसरले नाही.               

शासनाच्या एका विभागाचा दुसऱ्याशी ताळमेळ नसणे आणि त्यातून परस्पर विरोधी निर्णय घेतले जाणे, हे सर्वसामान्य जनतेला काही नवीन नाही. त्यांत जनतेला बऱ्याच वेळा हाल पण सोसावे लागतात. त्याने डगमगून न जाता पुढे चालत राहावयास हवे. कारण धीर न सोडता त्याचा शेवटपर्यंत जर खरोखर मनापासून पाठपुरावा केला, वेळप्रसंगी न्यायालयाचा आधार घ्यावा लागला तरी घेतला तर कायदा हा मदतीलाच आहे, हे स्पष्ट होते.

(ही आठवण लोकमत जळगांव' मध्ये संक्षिप्त स्वरूपांत दि. ४ आणि ११ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती.)

http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_JLLK_20171104_8_4&arted=Jalgaon%20Main&width=412px

http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/2017-11-11/8#Article/LOK_JLLK_20171111_8_4/317px












     

Friday, November 10, 2017

काल पाहीले मी स्वप्न गडे

काल पाहीले मी स्वप्न गडे
भारतीय संगीताचा हा महासागर ! त्यातील भागसंगीत म्हणून ओळखला जाणारा एक भाग ! या भागातील, भावसंगीतातील दीपस्तंभ असलेले मंगेशकर कुटुंब आणि त्यातील ही भावंड म्हणजे त्यावरील वेगवेगळे दीप ! कोणता महत्वाचा आणि कोणता चांगला, काय सांगणार ? सर्वच दीप प्रकाश देणारे, मार्ग दर्शविणारे व उजळविणार !
काल संध्याकाळी जळगांवहून येतांना अचानक एक गीत आठवले, मनांत गुणगुणू लागलो. योगेश्वर अभ्यंकर यांचे हे गीत ! अत्यंत सोप्या शब्दात आपल्या भावना, स्वप्नांत पाहिलेल्या प्रसंगातील अपेक्षा, व्यक्त करणारी तरूणी ! प्रत्यक्ष गाण्यास कठीण, पण ऐकतांना गायला अत्यंत सोपे आहे असे वाटेल, असे संगीत देणारे श्रीनिवास खळे ! आणि आवाजाला कसलीही मर्यादा नसलेली किंवा जिचा आवाज कसलीही मर्यादा मानत नाही, असे स्वरांची जन्मजात आणि अमर्याद देणगी मिळालेली गायिका, मंगेशकर कुटुंबातील एक दीप - आशा भोसले !
गौड सारंग हा राग ! नांवाप्रमाणेच कानाला गोड वाटणारा, ह्रदयाला साद घालणारा ! कल्याण थाटातील ! सर्व स्वर यांत उपयोगात आणतात. दोन्ही मध्यमांचा अप्रतिम उपयोग आणि वापर ! विशिष्ट स्वर म्हणजे गंधार वादी व धैवत संवादी यांचा जो सुरेख वापर केला जातो त्याने आपल्याला गौड सारंग पटकन ओळखता येतो.
काल पाहीले मी स्वप्न गडे
नयनी मोहरली ग आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
मी ही हसले हसली आशा
काल पाहीले मी स्वप्न गडे
भाग्यवतीचे भाग्य उजळले
कोणीतरी ग मला चिडविले
आणि लाजले, हळूच वदले
रंग सावळा तो कृष्ण गडे
इवली जिवणी इवले डोळे
भुरूभुरू उडती केसही कुरळे
रूणुझुणू रूणुझुणू वाजती वाळे
स्वप्नी ऐकते तो नाद गडे

https://www.youtube.com/watch?v=SzdWZ1c4s3o&feature=share

हे माझे काम नाही ----- तरी मी करणार !

हे माझे काम नाही ----- तरी मी करणार !

आपले ज्ञान अद्ययावत रहावे म्हणून वकिलांना कायद्यासंबंधाने विविध उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे निर्णय वाचावे लागतात. आवड आणि ज्ञानतृष्णा असेल तर आपल्या भारतीय कायद्यांच्या संबंधीत विषयांवर विविध राष्ट्रांमधील न्यायालयांत, आंतरराष्ट्रीय न्यायालयात काय कल आहे हे पण पाहू शकतो. प्रत्येक निर्णय हा तपशीलवार वाचणे कठीण असते. तो वाचावा लागतो, ते त्या स्वरूपाचे काम न्यायालयासमोर चालवायचे असेल तर ! मात्र आपल्याकडे सारख्या स्वरूपाची कामे असतील तर पूर्वीचे लक्षात असते.
अलिकडे हे संगणक, न्यायालयांची संकेतस्थळं वगैरे असल्याने असे निर्णय उपलब्ध होण्याचा बराचसा त्रास कमी झाला आहे. तरीही येथे वाचणे कठीण जाते म्हणून, किंवा असे वाचण्याची सवय नसल्याने म्हणून विविध प्रसिद्ध होणारी कायदेविषयक नियतकालिके लावावी लागतात. त्यांत अजून एक फायदा असतो की त्या न्यायनिर्णयांत कोणते मुद्दे महत्वाचे चर्चिले गेले आहेत, हे थोडक्यात वर लिहीलेले असते त्याला ‘हेड नोटस्’ म्हणतात. त्याखाली मग खाली पूर्ण निकाल दिलेला असतो. या हेड नोटस् तयार करणारी कायद्यातील तज्ञ मंडळी त्या नियतकालिकांत असतात. यासाठी पूर्ण निकाल काळजीपूर्वक वाचावा लागतो. निर्णयात उल्लेख केलेले सर्व संदर्भ पहावे लागतात. हे वेळखाऊ व किचकट काम असते. मात्र यामुळे आपल्यास कायद्यातील बारकावे समजतात. या हेड नोटस् जेवढ्या अचूक तेवढे ते नियतकालिक जास्त ‘गुडवील’ असलेले ठरते. हेड नोटस् ही बौद्धीक संपदा आहे. मी पण हे काम केले एका नामवंत कायदेविषयक नियतकालिकांत केले असल्याने याची कल्पना आहे. असे असले तरी न्यायालय ‘हेड नोटस्’ ला निर्णय देतांना महत्व देत नाही तर मूळ न्यायनिर्णयालाच महत्व देते.
पण कागदावर छापलेली नियतकालिक ठेवण्यास जागा खूप लागते. यासाठी या नियतकालिकांनी सीडी स्वरूपात हे द्यायला सुरूवात केली. त्याच्या पुढची पायरी म्हणजे ‘वेब एडीशन’ ! आपल्याला दरवर्षी वर्गणी भरून ‘ऑन लाईन’ बघता येईल अशी आवृत्ती काढायला सुरूवात केली. मी सुरूवातीला कागदावर छापलेली नियतकालिके घेत असे, मात्र आता सीडी असलेली काही आणि ‘ऑन लाईन’ असलेली काही अशी नियतकालिके घेतो.
माझेकडे एक ‘ऑन लाईन’ बघता येईल असे नियतकालिक आहे. त्यांत खूप माहिती आहे. त्या प्रतिनिधी श्री. माने ! पोरगेलेसे आहेत, त्यांचा अनुभव ! ते फॉर्मसीचे पदवीधर व एम्. बी. ए. आहेत. पूर्वी औरंगाबाद येथे अधूनमधून यायचे, बहुतेक आल्यावर सायंकाळी घरी यायचे. गप्पा व्हायच्या.
‘इकडे आल्यावर मला वकिलाकडे आल्यासारखे वाटत नाही, कोणा घरच्याकडे आल्यासारखं वाटते.’ एकदा माने म्हणाले.
‘तुम्ही वर्गणी वकिलांकडूनच घेता का घरच्यांकडून पण !’ मी विचारल्यावर ‘अशा गप्पा होतात, म्हणूनच मला असे वाटते.’ माने !
‘माने, तुमची लाईन चुकली का ? तुम्ही फॉर्मसीचे आणि इकडे कायद्याकडे कसे ?’ एकदा त्यांना मी विचारले. चहा पितापिता गप्पा मारतांना.
‘मी एम्. बी. ए. आहे. मला कशाचेही मार्केटींग करता आले पाहिजे.’ त्याचे कोल्हापुरी स्टाईलने उत्तर !
काल शनिवारी, एक केस वाचत होतो. या कायद्यावर विविध निर्णय बघावे म्हणून ती वेब साईट सुरू केली. ती होईना. तेथे पासवर्ड मागत होते. हा माझा नेहमीचा गोंधळ आहे, हे अनुभवाने श्री. मानेंच्या पण लक्षात आले आहे. त्यांना फोन लावला. ते पुण्याला असतात. त्यांना बहुतेक झोपेतून उठावे लागले असावे, असे आवाजावरून मला वाटले.
‘झोपेतून विनाकारण उठवले पहा. पण ८-९ वाजेपर्यंत कसे काय झोपता बुवा !’ मी सहज म्हणालो.
‘तुम्ही लवकर उठता म्हणून सगळे जग उठले असे वाटते तुम्हाला. इतक्या सकाळी कोणालाही फोन करत जाऊ नका, नेहमी सांगते मी.’ हा घरातून आलेला अग्निबाण ! कोणी पाठवला असेल सांगण्याची गरज नाही, अनुभवाची आहे. मी नेहमीप्रमाणे मुकाट राहीलो.
‘सर, नाही उठलोय. सांगा. काय म्हणता ?’ माने !
‘आपले नेहमीचेच !’ माझे उत्तर.
‘तुम्ही असं करा, मग असं करा.’ माने यांच्या सूचना. त्याप्रमाणे केले पण उपयोग झाला नाही, हे सांगीतले.
‘सर, दोन मिनिटे द्या. मी करतो अन् सांगतो.’ माने. दोन मिनीटांत मानेंचा फोन आला. ‘सर, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. मला पण तसेच उत्तर येतेय. मी तुम्हाला SMS करतो, त्या नंबरवर साडेनऊनंतर फोन करा. तुमची अडचण सांगा. तरी झालं नाही तर सांगा. मी व्यवस्था करेन.’ माने म्हणाले.
‘त्या दुसऱ्याकडे कशाला ?’ मी विचारले.
‘मी xxx कंपनी सोडली आहे.’ माने. मी अवाक !
‘केव्हापासून ?’ मी.
‘दोन महिने झाले !’ माने म्हणाले. मला कसेतरी झाले. संबंध नसलेल्याला विनाकारण त्रास ! मी तसे बोललो मानेंना. ‘असू द्या. काही हरकत नाही. मी कंपनीत नाही. पण आपले संबंध कुठे संपलेय !’ माने म्हणाले.
‘सध्या काय चाललंय तुमचं मग ?’ मी विचारले. त्यांनी काही सॉफ्टवेअरबद्दल सांगीतले. मला ते काही फार समजले नाही पण मी म्हणालो, ‘माझ्या काही कामाचे आहे का, ते सांगा.’
‘तुमच्या फार काही कामाचे नाही, थोडे आहे. औरंगाबाद आहे माझ्याकडे, मी येईल घरी. मग सांगेन.’ माने. मानेंचा सरळपणा मला नवीन नव्हता.
‘तुमच्यासाठी मी काही करू शकत असेल तर सांगा. पुण्यात आहे काही मंडळी आपली.’ मी बोललो.
‘नक्कीच सर !’ माने.
विविध ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची शक्ती काम करण्यापेक्षा ‘हे माझे काम नाही. त्याचे आहे किंवा कोणाचे आहे, हे माहिती नाही. असलेल्या कामात शोधशोधून काहीतरी खोड्या वा त्रुटी काढून काम टाळणारी आमची नोकरशाही ! या अशा नोकरशाहीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर श्री. मानेंचा हा अनुभव !

श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सर !

श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सर !




मी त्यावेळी बहुतेक आठवीत असेल ! सरदार जी. जी. हायस्कूल मधे ! दिवाळीची शाळेची सुटी संपली होती. तसे पाहीले तर शाळेत माझी सर्व विषयांत बऱ्यापैकी परिस्थिती होती. वर्गात माझ्यापेक्षा जास्त मार्क्स कोणाला नसत. पण इंग्रजी व गणिताची शिकवणी लावावयास हवी, कारण ते विषय कठीण असतात हा त्यावेळचा समज. इंग्रजी ही परकीय भाषा म्हणून कठीण तर गणित हा विषय ‘दांडी उडण्यासाठी’च असतो, अशी ही त्यावेळची वस्तुस्थिती असायची ! माझी गणिताची अजिबात काळजी नव्हती. असलीच तर थोडी अडचण असायची, इंग्रजीची ! अर्थात माझा इंग्रजी हा विषय मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या, सर्वसामान्य विद्यार्थ्याचा जेवढा चांगला असेल किंवा असावयास पाहीजे तितका माझा पण होता. पण जरा जास्त मेहनत घेऊन इंग्रजी चांगले व्हायला हवे, पुढे सर्व विषय हे इंग्रजीत असतात, याची कल्पना होती.

एके दिवशी वडील संध्याकाळी घरी आले अन् मला व माझ्या चुलत भावाला म्हणाले, ‘अरे, तुम्ही उद्यापासून इंग्रजीच्या शिकवणीला जात जा, प्रकाश मुजुमदारांकडे ! मी सांगून आलोय, माझी दोन मुलं पाठवतो म्हणून ! भोईवाड्यात घर आहे.’ मला वाटलं ‘चला, काही जास्तीचे शिकायला मिळेल.’ आईने विचारले, ‘आता दिवाळीनंतर मधेच शिकवणीचे कसे काय डोक्यात आले ? निम्मे वर्ष तर संपलंय !’
‘भोईवाड्यात भेट झाली, लक्ष्मण मुजुमदारांकडे गेलो होतो. त्यांचा पुतण्या होता तिथं, म्हटलं सध्या काय सुरू आहे ? तर म्हणाला ‘सध्या काही नाही, एम्. ए. झालोय, इंग्रजीत ! नोकरीचे बघतोय !’ म्हटलं वाट काय बघायची, शिकवण्या सुरू कर.’ तशा नुकत्याच सुरू केल्या आहेत हे सांगीतल्यावर, ‘माझी दोन मुलं पाठवतो’ म्हणून सांगीतलं. पोरं जातील उद्यापासून ! जाऊ दे.’ दुसऱ्या दिवसापासून मी आणि दत्ता म्हणजे माझा चुलतभाऊ, आम्ही दोघं शिकवणीला जायला लागलो. श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सरांकडे !

भोईवाड्यातील त्यांचे बैठे जुने घर ! आसपास सर्व भोई लोकांची घरे, त्या लोकांच्या घराबाहेरच भट्ट्या लागलेल्या असायच्या ! भट्ट्यांशेजारी काट्याचा मोठा भारा ! हळद लावून काही वेळा डाळ्या व मीठ लावून ओले करून खारे शेंगदाणे वाळत टाकलेल्या, भट्टीखाली काटे सारत कडक जाळावर लोखंडी कढईतील वाळूत तडतडून कढईबाहेर येणाऱ्या पांढऱ्या स्वच्छ लाह्या ! त्यांच्या मोठ्या लोखंडी लांब दांड्याच्या झाऱ्यावर झपकन उचलले जाणारे काळे फुटाणे ! शाळेच्या वयांतील हे आसपासचे जाणवलेले वातावरण कितपत अभ्यास करू देईल, हा प्रश्न त्या वेळी कधी डोक्यातही आला नाही, आता येतोय !

दुसरे दिवशी वही व पुस्तक घेऊन गेलो. तो तिथं मला वर्गातील दोन तीन मुले आलेली दिसली. ‘तू पण यायला लागला का ?’ या पहिल्या प्रश्नाला ‘आजपासून’ हे उत्तर दिले. त्यांच्या घरातील पुढच्या खोलीत आम्हाला बसण्यासाठी जाड सतरंजी टाकलेली होती, आम्ही शिकवणीला येणारे सात-आठ जण होते. सर आले. आम्ही सर्व बसलो. सर मध्यभागी बसले, म्हणाले ‘आता आपण पहिले ‘ग्रामर’ शिकणार आहोत. हे व्यवस्थित आले की तुम्हाला इंग्रजीत काही तरी लिहीता येईल. बरोबर कसे लिहावे, लिहीलेले बरोबर आहे का, हे समजेल ! बाकी पुस्तकातील धडे नंतर पाहू.’ पुस्तकातील धड्यांव्यतिरिक्त काही शिकतो आहे यांचे कुतूहल, तर आपला अभ्यास मागे पडेल ही चिंता !

सरांनी एकाची वही घेतली व लिहीले - ‘Tenses’ ! एकूण तीन ‘टेन्स’ आणि त्यांत प्रत्येक ‘टेन्स’ मधे चार प्रकार ! रोज एक ‘काळाचा’ प्रकार, त्याचे उपप्रकार ! मग तपशीलवार सांगणे - याचा वापर केव्हा करायचा, याची क्रियापदे कशी तयार होतात, त्याने अर्थात काय बदल होतो, विशिष्ट अर्थ ध्वनीत करायचा असेल तर वाक्य कसे लिहायचे ! काळ आणि काळांचे विविध प्रकार संपले ! सुरू झाले मग ‘Clauses’ ! त्यांचे प्रकार व उपप्रकार ! रोज घरी जातांना आपण काही तरी शिकतो आहे हे जाणवायचे. शिकवणे आणि बोलणे इंग्रजीत पण बऱ्याच वेळा स्वच्छ मराठीत देखील ! शिकवण्याचे शास्त्रात भाषा कशी शिकवावी या बद्दल काय सांगीतले याची मला कल्पना नाही, पण त्यांनी शिकवलेलं डोक्यात शिरत होतं, मनांत साठत होतं ! शिकवणीला जाऊन दोन-तीन महिने झाले असतील. पुस्तकातील धड्याला विशेष हात लागलेला नव्हता, पण आता वाटायला लागले की आपण आता काहीतरी इंग्रजी लिहू शकू. आपण लिहीलेलं दुसऱ्याला पण समजेल ! आपल्याला जे वाटतंय तेच त्याला पण जाणवेल !

व्याकरणाची थोडी प्राथमिक, आवश्यकतेपुरता तयारी झाल्यावर त्यांनी पुस्तकातील धडे शिकवायला घेतले. आम्हाला या प्रत्येक धड्याचे स्वरूप बदललेले वाटत होते. तसे पाहिले तर हे सर्व धडे अगोदर पण वाचले होते, पण त्यांचे हे रूप जाणवले नव्हते. हे आम्हाला नवीन रूप होते. हा शिकलेल्या व्याकरणाचा परिणाम होता, हे इंग्रजीचे नवे स्वरूप दाखवले ते मुजुमदार सरांनी !
‘इंग्रजी वर्तमानपत्र वाचत जा. नाही समजलं तरी वाचत जा. इंग्रजी सुधारेल.’ सर सांगत. ते त्यावेळी आम्ही काही फार मनावर घेतले नाही. आम्ही यांवरच खूष होतो की आपल्याला इंग्रजी समजतंय, आपलं वाटतंय ! इंग्रजीचा परकेपणा थोडा कमी झाला होता. त्या वर्षी समाधानाने इंग्रजीचा पेपर दिला.

आठवी झाली. नववी झाली आणि दहावी आली. मुजुमदार सरांची त्यांच्या विद्यार्थ्यांची बहुतेक ‘शालांत परिक्षेची’ पहिलीच बॅच ! सरांनी शिकवण्यांत यापूर्वी पण कधी हातचे राखून शिकवले नाही, ते आता या शालांत परिक्षेच्या घडीला कृपण होणारच नव्हते, सर्व विद्यार्थ्यांना सढळ हातानेच देणार होते यांत शंकाच नव्हती. परिक्षा आली. आम्ही पेपर दिले. चांगले गेले. शालांत परिक्षेचा निकाल लागला. सन १९७७ च्या शालांत परिक्षेत केंद्रात सर्वप्रथम पण त्यांचाच विद्यार्थी होता - मी ! — आणि इंग्रजीत पण सर्वप्रथम व दुसरा त्यांचाच विद्यार्थी होता - मुकुंद मुजुमदार आणि मी !

निकाल जाहीर झाला त्यावेळी मी आजोळी होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलो. तो पावेतो गांवात ही बातमी समजली होती. रावेर सारख्या तालुक्यांतील रावेर गांवात बातमी पसरायला वेळ तो काय लागणार ? सकाळी आल्यावर शाळेत गेलो, गुणपत्रक घेतले. घरी आलो. त्याच दिवशी सकाळीच मुजुमदार सर घरी आले होते - माझे अभिनंदन करायला ! ‘प्रत्यक्ष शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी येऊन अभिनंदन करणे’ विद्यार्थ्याला यापेक्षा मोठे कोणते बक्षीस आहे ? विद्यार्थ्याच्या आईवडिलांना यापेक्षा मोठा आनंद कशात असणार ?

आठवीपासून ते अकरावीपर्यंत मी श्री. मुजुमदार सरांकडेच इंग्रजीची शिकवणी लावली होती. आठवीला जसा मी शिकवणीला जायला लागलो तेव्हा सर दहा रूपये महिन्याला घ्यायचे शिकवणीचे ! मी अकरावीला गेलो तरी सरांचा दहा रूपये महिनाच होता शिकवणीचा ! कधीही चार वर्षांत फी वाढवली नाही, त्यांचे कसे भागत असावे, देव जाणे ? हा प्रश्न आता सुचतोय ! शिकवणी अगदी नियमीत, खाड्याची तर गोष्टच नाही. फक्त सरांना बहुतेक टायफॉईड झाला होता, त्याच वेळी काही दिवस शिकवणी बंद होती.

अजून एक सांगायचे म्हणजे, आमच्या पैकी काही विद्यार्थ्यांनी, बहुतेक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची' इंग्रजीची काही परीक्षा असावी, ती देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सांगीतलेले एक पुस्तक आणि विख्यात इंग्रजी नाटककार शेक्सपियर याचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे नाटक होते. शेक्सपियरच्या नाटकात काय महत्वाचे असते, तो का महान नाटककार आहे, हे शिकविले. त्या धंद्यांच्या पात्रातील परिचयासोबतच आपल्या आयुष्यांत पण अशी पात्र अशी पात्र कशी भेटतात हे पण त्यामुळे अनुभवता आले. या दहा रुपये महीना फी घेणाऱ्या आमच्या शिक्षकाने तो संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला, कोणतीही वेगळी फी न घेता. आजच्या प्रत्येक गोष्टीत वेगळा पैसे द्यावा लागतो या 'पंजाबी डिशेश' अनुभवणाऱ्या काळांत आम्ही 'पोटभर जेवणाची थाळी' घेऊन बसलो होतो, त्याचा कोणताही वेगळा चार्ज द्यावा लागला नाही आम्हाला ! या गोष्टी आता कोणाला पटतील नाही पटतील, पण आम्ही अनुभवल्या आहेत !

या दहा रूपये फी असतांनाच्या काळांत पण आर्थिक अडचणी असणारे असायचे. मग नियमीत फी देणे व्हायचे नाही. त्यांना कोणी सांगीतले, ‘सर, वडिलांनी सांगीतले आहे, या महिन्याची फी पुढच्या महिन्यांत देवू. सध्या अडचण आहे.’ तर सर त्याचे ‘सध्या अडचण आहे.’ हे वाक्य म्हणायच्या आंत ‘बरं’ म्हणायचे, त्याच्यावर अविश्वास न दाखवता, काहीही न बोलता. त्या विद्यार्थ्याला जी अडचण त्याच्या घरी असायची ती अडचण तर खरोखर सरांच्या पण घरी असायची ! पण सर कधी ते त्याच्याशी वागण्यात जाणवू देत नसत, आम्हा कोणालाही !

अकरावीनंतर गांव सुटले, शिक्षणासाठी बाहेरगांवी गेलो. कायद्याचे शिक्षण घेतांना माध्यम इंग्रजी असायचे. त्यावेळेस थोडे जाणवायचे मुजुमदार सरांनी आपल्याला काय शिकवले आहे ? कायद्याच्या विविध कलमातील मजकूर कसा वाचल्यावर, कुठल्या शब्दावर थांबल्याने काय अर्थ होतो ? आता समजते आहे दहा रूपया महिना घेऊन सरांनी आपल्याला काय शिकवले आहे ! मी या बाबतीत भाग्यवान, फार भाग्यवान ! मला केवळ उत्तम शिकवणारेच शिक्षक मिळाले नाही तर मला माझ्या बहुसंख्य शिक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ते अगदी आजही त्यांची भेट झाल्यावर जाणवते.

आपल्या प्रत्येकाच्या या जीवनाच्या वाटचालीत किती लोकांनी आपल्याला मदत केली असते ! कोणी आपल्यासाठी उजेड दाखवत असते, काही वेळा ते दिसतात तर काही वेळा दिसत पण नाही, पण त्यांनी दाखवलेला उजेड आपली वाट प्रकाशमय करतो. चालतांना असंख्य वेळा धडपडलो, खाली पडलो तर उठवून मार्गावर लावणारे भेटतात. भुकेने जीव कासावीस झाल्यावर कळवळून पोट धरून खाली बसलेल्या आपणांस कोणी आपल्या जवळची शिदोरी उघडून, स्वत:च्या घासातील घास काढून देतात, आपल्या पोटाला आधार वाटल्यावर आपण तरतरीत होऊन उठतो व मार्गस्थ होतो. अपयशाच्या गर्तेत काही वेळा पडल्यावर किती वेळ येथे रहावे लागेल याची कल्पना नसतांना, ही देवाने पाठवल्याप्रमाणे माणसं येतात आणि हात धरून आपल्याला बाहेर काढतात; मग कपडे झटकत आपण सावरतो अन् पुढे चालायला लागतो. आपल्या मार्गातील यांचा सहभाग लक्षात घेतला तर आपल्या यशांत कोणाकोणाचा किती सहभाग असतो नाही !

मध्यंतरी मुजुमदार सरांनी बहुतेक प्रकृतीच्या कारणाने, सकाळी सहा-साडेसहापासून ते संध्याकाळपर्यंत असलेल्या शिकवण्या, एकदम बंद केल्या. आता कधीपासूनच सर कोणालाही इंग्रजी शिकवत नाही. अलिकडे तर ज्यांना हे सर्व माहिती नसेल त्यांना ‘सर’ म्हणत असावे ते ‘रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर’ यांचे चेअरमन आहेत म्हणून असावे, असेच वाटत असेल. पण काहीही असो आता रावेरला मुजुमदार सर म्हणजे नेमके कोण हे सांगावे लागत नाही, कोणीही त्यांच्या घरांपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांची ‘माधवाऽऽ’ ही हाक आठवली, अन् सोबत हे सर्व !