Saturday, March 16, 2019

नववर्ष व कॅलेंडर

नववर्ष व कॅलेंडर
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या शाळेला ‘नाताळची सुटी’ लागायची, ती जवळपास बारा दिवस असायची. अर्थात त्या सुटीचा आम्हा मुलांना, आमचे शिक्षक ‘अभ्यासक्रम मागे राहिला आहे’ या कारणाने शाळेतच त्या विषयांचे जास्तीचे तास घेवून, आनंद घेवू द्यायचे नाही, हा भाग वेगळा !
त्या नाताळच्या सुटीत मात्र अभ्यासाठीचे वातावरण थोडे निवांत असल्याने, त्या निमित्ताने आम्हा मुलांत चर्चा सुरू व्हायची, ती ‘कोणत्या दुकानदाराने या वर्षाचे कॅलेंडर छापले आहेत’ याची ! सर्वांनाच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पुढील नवीन येणाऱ्या वर्षाचे वेध लागत असत. मग त्या निमित्ताने गाजावाजा सुरू होई, त्यांत विषय डायऱ्या, संक्रांतीचे वाण, कॅलेंडर, नवीन संकल्प हे असत. नवीन संकल्प, डायऱ्या आणि संक्रांतीचे वाण हे विषय, आम्हा मुलांच्या दृष्टीने काही कामाचे नसत. मात्र ‘कॅलेंडर’ हा विषय फार जिव्हाळ्याचा व महत्वाचा असे.
‘कॅलेंडर’ यांवर आमच्यात सांगोपांग चर्चा पण होत असे. कॅलेंडर या वर्षी तरी कसे असावेत, त्यांवर चित्रे कोणाची असावीत, कोणत्या कागदावर असावीत, ती कशी असावीत येथपासून ते यंदा ‘कॅलेंडर’ कोणी छापावयास हवी, हे पण असे. चित्रकलेत माझ्यासारखे अनेक जण गती नसतांना पण चित्रातील चुका काढून दाखवायचे. पण खरी मजा यायची, ती गांवात कोणी, कोणत्या दुकानदाराने कॅलेंडर्स छापली, हे नक्की समजलं की ! मग आमची मोर्चेबांधणी सुरू होई; आपल्याला सर्वात प्रथम ते कसे प्राप्त होईल ते याची. ज्यांना अगोदरच कोणाकडून मिळालेलं असेल, त्यांना तज्ञ व अनुभवी सल्ला येथे आमच्या कामांस यायचा. अडचण असायची, त्यासाठी दुकानातून काहीतरी खरेदी करायला लागे कारण कॅलेंडर मिळावं, यासाठी त्याच्या दुकानातून काही तरी वस्तू घेतल्याशिवाय मिळणार नाही हे नक्की असायचं ! मग शेजारपाजाऱ्यांना पण काही खरेदी करावयाची असेल तर, ‘शामची आई’ या पुस्तकातील धड्याप्रमाणे ‘शेजाऱ्यांना मदत करावी’ ही शिकवण कामास येई.
‘मुलं शहाणी आहेत, अगदी दुकानातून काही हवं का, हे विचारून आणून देतात पहा वस्तू !’ शेजारच्या काकूंच्या कौतुकाची थाप, कॅलेंडरवरील चित्र डोळ्यांसमोर दिसत असल्याने, जाणवत नसे. पण मग त्यांना हवी असलेली वस्तू त्यांच्याकडे आणि त्यासोबत मिळवलेले कॅलेंडर आपल्याकडे, अशी वाटणी असे.
अहो, त्यावेळी रूपयांत खर्च हाच कमी प्रमाणात होई, पैशांमधेच वस्तूंच्या खरेदी होत, रूपया क्वचितच हाती मिळे. दूध सव्वा रूपया लिटर, साखर दोन रुपयाचे दरम्यान, गोडेतेल सहा रुपयाचे दरम्यान ! भाज्या दहा ते चाळीस-पन्नास पैसे ! घोळ-चिवळ वगैरेचे तर भाजीवाली पैसे पण घेत नसत. खर्च या प्रमाणात, तर स्वाभाविक उत्पन्न पण याच प्रमाणात ! या अशा सगळ्या काटकसरीच्या प्रयोगात आणि तुटपुंज्या व कमी रकमेच्या बजेट काळांत, काय कोणत्या खरेदीवर कॅलेंडर मिळणार ? मग कोणाची तरी अदपाव-पावशेर सुपारी घेतली तरी, त्या दुकानदाराला कॅलेंडर मागण्याचा हक्कआपल्याला प्राप्त होतो, हा आमचा समज ! दुकानदार पण हसून कॅलेंडर देत असे, त्याची पण जाहीरात होई. काही वेळा शेजारच्याला कॅलेंडर देतांना, ‘कॅलेंडर संपली’ असे पण ऐकून घ्यावे लागे. कोणताही माल व वस्तू मिळायची, पण कॅलेंडर कसे संपायचे, हे आश्चर्यकारक होते. पण बहुतेक तो द्यायचाच, त्यासाठीच तर त्याने पण छापलेले असत. त्यांच्या दुकानांतला कोणीतरी सूक्ष्मदर्शी कामाला असलेला, मात्र ‘याला परवा दिलं होतं’ हे त्याच्या मालकाच्या लक्षात आणून देवून, प्रामाणिकपणे नोकराचे आपल्या मालकाप्रती कर्तव्य बजावी. चमत्कारिक अवस्थेतून बाहेर पडायला मार्ग शोधावाच लागे.
‘परवाचे दिलेले नटीचे होते, आता देवाचे द्या.’ मी. बिचाऱ्या दुकानदाराला निष्कारण धर्मसंकटात पाडून, आम्ही ते देवाचे कॅलेंडर घेवून दुकानाबाहेर पडत असू.
त्यावेळी कॅलेंडर छापणारे दुकानदार म्हणजे लोहार स्टोअर्स, मे. आर. जी. लोहार, श्रीराम कन्हैयालाल अग्रवाल, मे. अवधूत मगन वाणी वगैरे ! काही ठिकाणी कॅलेंडर्स असायची, पण तेथील वस्तू आम्हाला विकत आणता येत नसत. खतविक्री करणाऱ्यांकडे मस्त कॅलेंडर्स असत, पण खते विकत घ्यायला आम्हाला कोण पाठवणार ? मग वडिलांसोबत त्यांच्या दुकानांत जायचे आणि निघतांना, ‘भाऊ कॅलेंडर घ्यायचे राहिले.’ म्हणत त्यांना आठवण करून द्यायची. दुकानातील माणूस निमूटपणे मग बांधलेलेच असल्याने देत असे. काही वेळा पुन्हा बसावे लागून, ‘अण्णा, बसा हो.’ म्हणत ते चहा सांगत. त्यांच्या चहा पिण्याचा वेळात आपले कॅलेंडर कोणी विसरून जायला नको, म्हणून मनाची जी घालमेल होई ती सांगता येत नाही आणि आज पण विसरतां येत नाही.
कॅलेंडरवर आता अजूनही आठवतात त्या ननट्यांच्या विविध पोझेस मधील चित्रे ! ती वैजयंतीमाला, नूतन, मुमताज, आशा पारेख, हेमामालिनी, रेखा, शर्मिला टागोर या तत्कालीन चित्रपटसृष्टीतील गाजत असलेल्या नट्यांची आणि धर्मेंद्र, राजकुमार, राजेंद्रकुमार, जितेंद्र, अमिताभ, मिथुन वगैरे नटांची चित्रे ! काही वेळा एखाद्या चित्रपटातील प्रसंगांचे पण चित्र असायचे ते ! योगायोगाने आपण जर तो सिनेमा बघीतला असेल, तर निष्कारणच काॅलर ताठ झाल्यासारखे वाटायचं. अर्थात तशी वेळ अपवादानेच यायची. रावेरसारख्या गांवात, नवा चित्रपट लागून, तो आम्हाला पहायला मिळून, मग त्याचे कॅलेंडर त्याच वर्षी आम्हाला मिळणं, हे कठीणच ! मग रस्ताने लावलेल्या पोस्टरवरून नट-नट्यांना ओळखून त्यांत समाधान मानावं लागे. विजय माल्याची कॅलेंडर्सचे नांवच आता ऐकतोय, पण कधी हातात मिळाले नाही बघायला, आता तर ती पण शक्यता नाही.
काही वेळा सुनील गावसकर, विश्वनाथ, बेदी, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर वगैरे सारख्या क्रिकेटपटूंची पण कॅलेंडर्स असत. परदेशी खेळाडू पण अवतरत काही वेळा यांवर ! वह्या तर हमखास यांच्या चित्रांनी सजलेल्या असत.
देवादिकांची चित्रे, संत मंडळींची चित्रे जास्तीत जास्त असत ! त्यांतील एखाद-दुसरं चित्र जर खरोखर चांगले, आकर्षक असेल, तर ही अशी चित्रे कापून, त्याला फोटोग्राफरकडून नीट मढवून, ते फोटो म्हणून बैठकीत लावली जात. गणपती, बालाजी, लक्ष्मी, हनुमान, रामपंचायतन, दत्तगुरू, देवी यांना मागणी जास्त असे. संतमंडळीत मला आज पण आठवतात, ते म्हणजे संत सावता माळी यांच्या ह्रदयातील पांडुरंग आणि समोर भाजीपाल्याचा मळा, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज, गोरा कुंभार हात जोडलेल्या अवस्थेत आणि त्याच्या मडक्यांच्या आव्यातील मांजरीची पिल्ले ! किती सांगावीत ? आमची संस्कृती, धर्मवैशिष्ठ्ये, संतपरंपरा या कॅलेंडरच्या रूपात घरोघरी जिवंत होती, प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर होती. वेड्यावाकड्या चित्रांची पण कॅलेंडर्स असतील, पण ती आमच्या दृष्टीस पडत नसत, फक्त ऐकीवात येत.
मला आठवते, मी जळगांवला शिकत असतांना, तर भाजीवाले, कांदे-बटाट्यांचे व्यापारी पण कॅलेंडर छापायचे आणि भाजी घेतल्यावर आवर्जून द्यायचे. एका वर्षी तर घरांत इतकी कॅलेंडर्स झालीत, की ‘हे तर कसे रसवंती, गुऱ्हाळासारखे वाटतेय’ असे एक म्हणाले.
कॅलेंडर छापण्यासाठी दसऱ्यापासून तयारी होई. त्या कंपनींचे प्रतिनिधी त्यांच्याकडे असलेल्या चित्रांचा भलामोठा कॅटलाॅग घेवून प्रत्येक महत्त्वाच्या दुकानांत जात. ती सर्व चित्रे दाखवायची, त्याचे दर, त्यांवर छापला जाणारा मजकूर, कॅलेडरची पाने, त्याचा पोत वगैरे सर्वांवर कॅलेंडरची किंमत ठरे. ही सर्व छपाई बहुतेक दक्षिण भारतातील प्रांतात होई. तेथून साधारणत: डिंसेबर पर्यंत ही कॅलेंडर्स येत. नाही आली तर दुकानदार मग त्या प्रतिनिधीला पैसे देण्यात हात आखडत. पैसे कॅलेंडर आल्यानंतरच पूर्ण दिले जात. मात्र ते आले नाही. तर दुकानदारांपेक्षा, आमच्याच जीवाची घालमेल सुरू होई.
आता कॅलेंडर म्हणजे चित्रे गेली, त्याची ओढ कमी झाली. का कमी झाली ? त्यातील वैफल्य समजले का पोकळपणा समजला, कोण जाणे. तशी आता दुकानांत जास्त देतांना पण दुकानदार दिसत नाही. जाहीरातीचे प्रकार वाढलेत. आर्जवी पद्धतीची जाहिरात, समजावून सांगण्याची जाहिरात, आपल्या विवेकाला व सद्सद्विवेक बुद्धीला साद घालणारी जाहिरात गेली. आता आपल्यावर आक्रमकपणे कोसळणारी, आपल्याला फसवणारी, मूर्ख बनविणारी असे तिचे स्वरूप झाले. लहानपण संपून मोठं झाल्यावर जाणवलं, लक्षात आलं ते हे ! या फसव्या जगात महत्व येणार ते फसव्या नात्यांना, फसव्या जाहिरातींना, हे स्वाभाविक; त्यांत विशेष काही नाही.
आता पण मला कॅलेंडर मिळते, ते मी कॅलेंडर घेतो, मात्र काही खरेदी केल्यावर मिळत नाही ते, तर विकत घेतो ! कारण चित्र काही वर्षभर बघणे होत नाही, दिनांक मात्र वर्षभर बघाव्या लागतात. मग फक्त दिनांक समजण्यासाठी ‘कालनिर्णय’ घ्यावे. काही बॅंका, मोठ्या कंपन्या छापतात. ‘कालनिर्णय’ मधे तिथी वगैरे सर्व माहिती असतेच. अडचण पडत नाही. अर्थात गुढीपाडव्याला नववर्षाचे पंचांग असतेच, त्यांत खंड नाही.
आपल्या स्वप्नातलं आयुष्य प्रत्यक्षात उतरेल तेव्हा उतरेल, पण कॅलेंडरच्या रूपात तरी आपण अनुभवून घ्यावे, हा पण विचार असलेली मंडळी, याची जाहीरात करत ! तुम्हाआम्हा सर्वांना ती त्यांची स्वप्न या रूपांत देत असत. आपण पण ती घेत असू ! आपली तरी स्वप्न कोणती वेगळी असायची ? आमचं तर स्वप्न बघायचंच वय ! परमेश्वराने त्याची सर्व शक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता वापरावी, ही आपली इच्छा ! आपण काही त्याचे इतके लाडके नाही, की दुकानदाराकडून आणून कॅलेंडर आपल्या घरात ठेवले, तरी आपली स्वप्ने पूर्ण होतील. चालताचालता स्वप्न बघायचं वय सरलं, चित्रांची कॅलेंडर्स ज्यांच्या कामाची असतील त्यांनी घ्यावी; आपल्या कामाची नाही, याची जाणीव झाली. आणि आपल्याला फक्त बसल्याबसल्या सहज दिसेल अशा बारा महिन्यांच्या दिनांकाचे कॅलेंडर आणि ज्यात शनिवार-रविवारचे पण स्वतंत्र पान आहे, अशी डायरी गरजेची आहे, हे समजलं ! शनिवार रविवार सुटीचा दिवस मानतात, पण आम्ही कामांत असतो, करावंच लागतं. आता अशी चित्रांची कॅलेंडर्स जास्त कोणी छापत पण नसावीत, दुकानांत त्यावेळच्या आमच्या वयातील मुलं दिसत नाही मागतांना. स्वप्नसृष्टीतून बाहेर येवून सत्याची जाणीव झाली की मग असे चित्रांचे कॅलेंडर मागे पडते.

14.1.2019
आपल्याला भारतातील महादेवाची बारा ज्योतिर्लिंग ठिकाणे आणि त्यांची नांवे असलेला श्लोक पण माहिती आहे. अपेक्षा असते, की एकूण ही संख्या बारा भरावी. मात्र त्यापेक्षा जास्त ठिकाणी, सांगीतले जाते की इथं पण ज्योतिर्लिंग आहे. एकाच नांवाचे ज्योतिर्लिंग हे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे लोक मानतात, त्यावेळी !
गुजरातमधे सौराष्टातील ‘सोरटी सोमनाथ’ या नांवाने प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंग आपणा सर्वांना ज्ञात आहे. या मंदीरावर किती वेळा आक्रमण होवून, याची तोडफोड झाली, कशी लूटमार झाली, येथील रहिवाशांवर, आया-बहीणींवर आक्रमकांनी कसे अत्याचार केले, ते अत्याचारी आक्रमक कोण होते, त्यांची मानसिकता काय होती वगैरे या इतिहासाची पण आपल्याला कल्पना आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही. त्यातून आपण काही शिकलो, त्यातील मर्म आचरणांत आणले, तर काही उपयोग !
त्या दुर्दैवी घटनांनंतर, स्वतंत्र भारतात, भारताचे पोलादी पुरूष म्हणून यथार्थ ओळख असलेले, कै. सरदार वल्लभभाई पटेल यांना या सोमनाथ मंदीराचा जिर्णोध्दार केला. सुंदर मंदीर उभे राहिले आणि सर्व जनतेला, जुनं जावून नवीन आपलं राज्य आल्याचा दिलासा दिला.
मागे एकदा इथं सोमनाथला आलो होतो. यंदा त्या महादेवाने पुन्हा दर्शनाचा योग आणला. अत्यंत सुंदर मंदीर, उत्तम व चोख व्यवस्था ! सोबतीला असलेला सिंधुसागर निसर्गाची विरटता, भव्यता, रौद्रता मनावर ठसवतो. हा तांडव करून, संहारक म्हणून कार्य करीत असलेला भोळा सांब महादेवरूपी म्हणून असला, तरी या भगवान महादेवाच्या मंदीरात बसलं की अत्यंत शांत वाटतं, हा माझा अनुभव ! येथील स्वच्छता वाखाणण्याजोगी ! सोरटी सोमनाथाचे दर्शन घेवून प्रसन्न वाटले.
गुजरातमधे अजून एक ज्योतिर्लिंग आहे, असे तिथली मंडळी मानते, ते म्हणजे द्वारकाधीशाच्या द्वारकेतील ‘नागेश्वर’ हे ज्यातिर्लिंग ! द्वारकेपासून जवळच असलेले हे पुरातन मंदीर, ‘नागेशं दारूकावने’ म्हणून उल्लेखलेले ज्योतिर्लिंग आहे, ही भावना ! मंदीर अतिशय स्वच्छ व टापटीप ! संध्याकाळी येथे गेलो तर महादेवावर अभिषेक सुरू होता. त्या नादमय मंत्रोच्चाराने येथील वातावरण नादमधुर, पावन झाले होते. इथं मंदीराच्या आवारातच, भगवान महादेवाची एक प्रचंड मूर्ती आहे. ती पण बघण्यासारखी आहे. त्या मूर्तीसमोर आपण किती छोटे दिसतो, ते लक्षात येवू शकते.
आता आपणा महाराष्ट्रात ज्ञात असलेले ज्योतिर्लिंग म्हणजे ‘औंढ्या नागनाथ’ हे परभणीहून हिंगोलीकडे जातांना वाटेवर आहे ते ! मात्र त्याचे आणि हे द्वारकेतील दोघांचे नांव ‘नागेश्वर’ हे आहे.
एक मात्र नक्की आपल्या पूर्वजांनी ही जी विविध ठिकाणं दाखवलेली आहेत तिथं आपण जावून पहा. मनाला नक्की शांतता लाभते. आपण ही आयुष्यात धडपड करतो, कष्ट करून धन कमावतो, ते आपणांस शांतता मिळावी, आपण समाधानी व्हावे यासाठीच ! या अशा ठिकाणी आपल्याला मन:शांती मिळते, आपले विचार मात्र सात्विक हवे.
द्वादश ज्योतिर्लिंग स्तुति
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्‌।
उज्जयिन्यां महाकालमोंकारं ममलेश्वरम्‌ ॥1॥
परल्यां वैजनाथं च डाकियन्यां भीमशंकरम्‌।
सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥2॥
वारणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे।
हिमालये तु केदारं ध्रुष्णेशं च शिवालये ॥3॥
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः।
सप्तजन्मकृतं पापं स्मरेण विनश्यति ॥4॥
॥ इति द्वादश ज्योतिर्लिंग स्तुति संपूर्णम्‌ ॥

15.1.2019

कठीण गणित सोपे करून शिकवणारे - दीक्षित सर !

कठीण गणित सोपे करून शिकवणारे - दीक्षित सर !
सन १९७६ साली, इयत्ता ९ मधून पास होवून, इयत्ता १० वी ला आलो. जुनी मॅट्रीक, म्हणजे ११ वी, त्यावेळी बंद होवून दोन वर्षे झाली होती. नवीन पद्धतीने व अभ्यासक्रमानुसार होणारी ‘एस् एस् सी’ ची म्हणजे ही १० ची परिक्षा ! नवीन मॅट्रीक ही पूर्वीच्या मॅट्रीकपेक्षा सोपी आहे, का कठीण आहे, यांबद्दल परस्पर विरूद्ध मते होती. काहीबाही ऐकू यायचे.
‘काय यंदापासून सर्वांना पुढे ढकलून पास करणार आहे म्हणे ! — या नव्या मॅट्रीकला ! अहो, साधी गोष्ट, ११ वी मॅट्रीक, ही १० वी मॅट्रीकच्या कशी बरोबर असेल ? ११ बरोबर १० ? कसं काय ?’ एक जुने नाॅन-मॅट्रीक !
‘वाटेल ते सांगू नका. सध्या मराठीत पण नापास होताय पोरं ! एक वेळ इंग्रजी-गणितात समजलं ! अरे, पण मराठीत !’ मॅट्रीकच्या परिक्षेचाच भयंकर धसका घेतलेले आणि इंग्रजी व गणित हे विषय नापास होण्यासाठीच मॅट्रीकच्या परिक्षेला असतात, असा समज असलेले अजून एक !
‘मराठीत नापास होणार नाही तर काय ? त्यांची भाषा ऐका ! ‘अबे काय ? तुबे काय ?’ कोण मराठीत पास करेल यांना ?’ तो पूर्वीचा नाॅन-मॅट्रीक !
‘विषय येत नाही म्हणून मॅट्रीकला इंग्रजी-गणिताची शिकवणी लावावी लागते, हे ठीक आहे; पण आता नव्या मॅट्रीकची परिक्षा द्यायची, तर मराठीची पण शिकवणी लावायची वेळ आली, म्हणजे कठीणच !’ मॅट्रीकचा धसका घेतलेला.
‘जुन्या मॅट्रीकला पण इतिहास-भूगोलात नापास होत. वाटेल ते लिहील्यावर होणारच, पण मराठीत होताय म्हणजे काहीतरीच दिसतंय ! पेपर तपासत नसतील ! नुसते — ! बस !’ हाताने पैसे घेण्याची खूण करीत, तो नाॅन-मॅट्रीक !
या अशा गोंधळाच्या, दमट वातावरणांत, मी या नवीन मॅट्रीकला आलो. नवीन मॅट्रीकला असलेली, माझी तिसरी बॅच ! पूर्वीच्या दोन बॅचचे रिझल्ट काही फार आशादायक नव्हते. हा एक अजून धोकादायक सिग्नल ! या सर्व मतमतांच्या गलबल्यांत, बिचाऱ्या पालकांना एकच समजले, की आपल्या मॅट्रीकला असलेल्या मुलांना, किमान इंग्रजी-गणिताची तरी शिकवणी लावावीच लागणार आहे.
मी शिकायला होतो आमच्या सरदार जी. जी. हायस्कूलला ! मला गणित व भूमितीची शिकवणी लावावी, हा रेटा सर्व बाजूने यायला लागल्यावर, माझ्या वडिलांनी साधारणत: गौरी-गणपती झाल्यावर, शिकवणीचे विचारले, ते दीक्षित सरांना !
‘माझा आणि अण्णांचा मुलगा आता मॅट्रीकला आहे. इंग्रजीची शिकवणी आपल्या भोईवाड्यातील मुजुमदारांकडे लावली आहे. गणिताची काही लावली नाही अजून ! त्यांची शिकवणी घेत जा. त्यांचे मॅट्रीकचे वर्ष आहे. वाया जायला नको.’ माझे वडील !
दीक्षित सरांचा, घरी शिकवण्या घेण्यावर अजिबात विश्वास नसायचा. कदाचित ‘आपल्या विद्यार्थ्याला शिकवणी लावावी लागतेय’, हे अपमानास्पद पण वाटत असेल.
‘दिवाळी नंतर पाहू, काय करायचे ते ! आणि मुलांचे वर्ष कशाला वाया जाईल ? आणि तसं काही अभ्यासात अडले, तर केव्हाही पाठवत जा पोरांना ! त्यांना का घर माहीत नाही ? का मी माहीत नाही ? त्यासाठी शिकवणी कशाला ?’ दीक्षित सर !
असे म्हणून शिकवणी हा विषय त्यांनी दिवाळीपर्यंत टाळला.
आमच्या शाळेतले दीक्षित सर, म्हणजे विष्णु बळवंत दीक्षित ! सडसडीत बांधा, उभट व तरतरीत वाटणारा चेहरा, गव्हाळ वर्ण, सरळ कपाळातून पेन्सीलीसारखे आलेले छोटेसे धारदार नाक, डोळ्याला पुढील बाजूने काळ्या किंवा गडद तांबड्या रंगाची फ्रेम आणि काड्या बहुतेक सोनेरी असलेल्या, असा चष्मा ! केस नीट व्यवस्थित बसवलेले. बहुतेक अर्ध्या बाह्याचा सोबर वाटणारा, हलक्याशा रंगांचा शर्ट आणि काळी किंवा करड्या, राखाडी रंगाची पॅंट ! काही वेळ फूल बाह्यांचा पण शर्ट ! मात्र शर्ट पॅंटमधे नीट खोचलेला आणि पॅंटला चामडी पट्टा ! पायात काळे बूट ! अव्यवस्थितपणा अजिबात नाही. व्यक्तीमत्व टापटीप ! — आणि चेहऱ्यावर बुद्धीमत्तेचे तेज ! एकेक पाऊल दमदारपणे टाकत, जरा हळू चालण्याची सवय !
त्यांचा आणि आमचा संबंध तसा नवीन नाहीच, निदान तीन-चार पिठ्यांचा ! गांव छोटं असलं की संबंध हे छोटे रहात नाही, ते नातेसंबंधापलिकडे व्यापून रहातात. ते माझ्या वडिलांपेक्षा मोठे ! लहानपणी त्यांचेकडे आणि भाऊंकडे नेहमीच जाणे व्हायचे ! भाऊ म्हणजे डाॅ. भाऊ आठवले ! डाॅ. भाऊ आठवले हे संध्याकाळची वेळ असली तर, निवांतपणी रस्त्याच्या कडेलगत असणाऱ्या त्यांच्या शहाबादी फरशीच्या ओट्यावर सतरंजी टाकून बसलेले असायचे आणि त्यांच्या आसपास घरातील व बाहेरची नातवंडे असायची ! यांच्या घरासमोरच दीक्षितांचे घर ! तिथं त्यांच्या ओट्यावर एक लांब, दोन्ही बाजूने हात असलेला, लाकडी बाक होता, त्यांवर बऱ्याच वेळा बाळूकाका किंवा क्वचित अन्नपूर्णा काकू असायच्या ! बाळूकाका म्हणजे दीक्षित सरांचे वडील आणि अन्नपूर्णा काकू, म्हणजे त्यांची आई ! माझे वडील त्यांना काका व काकू म्हणत, त्यामुळे कानावर हाच शब्द पडे ! माझे वडील हे डाॅ. आठवले यांच्याकडे आले, की त्यांचे दीक्षितांकडे हमखास जाणे होई. माझे वडील, दीक्षित सर यांच्या कसल्या कसल्या गप्पा सुरू असत. रेडिओवर बातम्या ऐकणे, हा त्यावेळी बहुतेक सर्व घरांतील मुख्य कार्यक्रम असे. त्या मधल्या खोलीत ऐकल्या जात. त्यानंतर त्या बातम्यांवर चर्चा, मतप्रदर्शन ! त्यावेळी या गप्पांत काहीवेळा सौ. उषाकाकू पण भाग घेत ! दीक्षित सरांना खरं तर पूर्वी मी ‘बापू काका’ म्हणायचो, हायस्कूलला गेल्यानंतर ‘सर’ म्हणावे लागे. लहानपणी शाळेत न जाण्याच्या वयातील आपले संबंध, शिक्षण घेत जातो तसतसे किंचित दूरचे होत जातात की काय, देव जाणे ?
आम्हाला तसे हे सहावीला सायन्स शिकवायला होते. मी ‘ब’ वर्गात होतो. ते बहुतेक नुकतेच ‘सुपरवायझर’ झाले होते. मुलांवर त्यांचा दरारा असायचा. पण खरं तर, त्यावेळी त्यांनी जास्त शिकवले नाही, का आम्ही अभ्यास केला नाही, सांगता येत नाही. ते चांगले शिकवायचे, हे मात्र नक्की ! नंतर सातवी संपल्यावर, आठवीला सर्व वर्गातील मुली या ‘गर्ल्स हायस्कूल’ला जायच्या. एकाच संस्थेची शाळा होती. आठवीनंतर, मग ‘अ’ वर्गातील काही जागा रिकाम्या व्हायच्या, मग त्या ‘ब’ मधील काही विद्यार्थी घेवून भरून काढल्या जात. दहावीला आम्हाला गणित-भूमिती व भौतिकशास्त्र शिकवायला दीक्षित सर आले. त्यांच्या उत्तम शिकवण्याबद्दलची किर्ती तोवर आम्ही भरपूर ऐकली होती, पण शिकवायला मात्र ते येत नव्हते. आमची शाळा नववीपर्यंत ही सकाळची आणि ते तर दुपारी शिकवायचे ! मॅट्रीकला ‘हायर मॅथेमॅटीक्स’ शिकवणारी ही शिक्षक मंडळी, त्यातील एक हे ! मात्र जसं जुनी मॅट्रीक बंद होवून नवीन मॅट्रीक’ सुरू झाली, तसे ‘उच्च माध्यमिक’ वर्ग म्हणजे ११ वी आणि १२ वी सायन्सला पण दुपारी त्यांना शिकवावे लागत असावे.
ते आम्हाला १० वी ला आल्यानंतर, ‘अनुभवी’ विद्यार्थ्यांनी ‘यांच्या पिरीअडचे काही खरं नसते’ हे सांगीतल्यावर, त्याचा नेमका अर्थ लगेच समजला नाही. पण मग काही दिवसांतच, ते त्यांच्या पिरीअडला शिकवायला येतीलच, याचा भरवसा नसायचा. मग त्यांचा तास दुसरे कोणते तरी शिक्षक आनंदाने घ्यायचे, कारण त्यांच्या विषयाचा अभ्यासक्रम पुढे जायचा. मात्र असा एखाद-दुसरा आठवडा गेला, की एखादे दिवशी पहिल्याच तासाला दीक्षित सर वर्गावर गणित किंवा भूमितीचे पुस्तक आणि मुठीत पाच-सहा खडू घेवून हजर ! काही वेळा आमच्याजवळ पुस्तक असायचे, तर काही वेळा नाही ! त्यांना शिकवण्यासाठी पुस्तक नांवालाच लागे. गणित किंवा भूमितीतील कोणता भाग शिकवायचा हे सांगीतल्यावर त्याची उदाहरणे, ही वैशिष्ट्यांसह समजावून देत. तो भाग शिकवल्यानंतर गणित हा इतका सोपा विषय असू शकतो, हीच भावना होई. भूमितीचे एखादे प्रमेय ही किती विविध पद्धतीने सिद्ध करता येवू शकते, हे पुस्तकात दिले नसले आणि आम्हाला अभ्यासक्रमात अपेक्षित नसले, तरी ते शिकवत. फक्त अभ्यासक्रमातीलच नाही, तर त्यासाठी आवश्यक ते सर्व शिकवावे, ही बहुतेक सर्वच शिक्षकांची सवय !
एखाद्या गणितावरील आलेल्या अडचणीच्या वाटणाऱ्या निमीत्ताने, त्या गणिताच्या मागील मूलतत्त्व काय, हे शिकवणे त्यांना आवश्यक वाटे. लाॅगरिथमच्या प्रत्येक अंकाची तीच किंमत का, वेगळी का नाही आणि ती कशी येते, हे त्यांनी आम्हाला तपशीलवार शिकवले होते. कोणत्याही संख्येला एक या संख्येने गुणल्यास उत्तर तीच संख्या येते आणि शून्याने गुणल्यास उत्तर शून्य येते, हा सर्वांना माहीती असलेला नियम कसा तयार झाला, हे त्यांनी शिकवले. गुणाकार वा भागाकार करतांना तो तोंडी कसा करता येवू शकतो, हे त्यांनी शिकवले. वर्ग व वर्गमूळ हे तोंडी कसे काढता येते, हे दाखवले. त्रिकोणमिती ही कठीण नसून सोपी कशी आहे, तिचा आपल्या सर्वांच्या जीवनांत कसा उपयोग होतो, हे त्यांनी सांगीतले. भौतिकशास्त्रातील किरण, प्रकाश, त्वरण वगैरे विविध कल्पना, आपल्या रोजच्या आयुष्यात कशा येतात, पण आपले कसे लक्ष नसते, हे सांगीतले.
विविध प्रकारांनी शिकवलेली गणिते आणि भूमितीतील सिद्धता, या त्यांच्याकडून शिकून घेणे, ही एक खरोखर ज्ञानप्राप्ती असे. फळ्यावरील त्यांनी सोडविलेले उदाहरण किंवा प्रमेय, हे आम्हा विद्यार्थ्यांना वहीवर उतरवून घेण्यासाठी फारच धडपड करावी लागे; कारण ते पुस्तकांत मिळेल याची शाश्वती नसे. विविध पद्धतीने त्या गणित आणि प्रमेय सोडवले गेल्याने, ते विसरणे कठीण असे. तेवढ्यात जर ‘टण्ण टण्ण टण्ण’ अशी हरिभाऊने दिलेली, तास संपल्याची घंटा वाजली, तर आम्ही काही वेळा एकदम दचकत असू, मात्र दीक्षित सरांच्या कानांवर ती घंटा गेलेली नसे. खडूने फळ्यावर वळणदार अक्षरे व अंक लिहून उजव्या हाताची बोटे खडूने भरलेली असत, त्यांची चाळवाचाळव करत त्यांवर फुंक मारत, खडूची भुकटी अशी हातावरून उडवण्याची त्यांची लकब ! या शिकवण्याच्या नादात, पुढच्या तासाचे त्या विषयाचे शिक्षक दरवाज्यापाशी उभे राहून चुळबूळ करत, ते दिसले तर मग त्यांच्या लक्षात येई, की तास संपला म्हणून !
‘अरे, संपला का तास ?’ हे आम्हाला विचारत, ‘हा तुमचा तास मी घेतो’ असे त्या दरवाजापाशी उभे असलेल्या शिक्षकांस सांगत, आणि ते शिकवायला लगेच सुरूवात करत. सलग चार-चार तास त्यांनी एकाचवेळी गणित-भूमितीसारखे विषय शिकवले आहे, आणि आम्ही पण आमची बैठक न हलवतां शिकलो आहे.
अशा शिक्षकांना शिकवणीचे विचारणे, हे त्यांच्या शिकवण्यावर अविश्वास दाखवण्यासारखे, किंवा वर्गात नीट शिकवत नाही, हा संशय घेण्यासारखेच त्यांना वाटले, तर त्यांत नवल ते काय ? दिवाळीनंतर ज्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना पुन्हा शिकवणीचे विचारले, त्यावेळी तर त्यांनी क्लायमॅक्स केला.
‘ही काय शिकवणी लावायची वेळ आहे ? आता मार्चमध्ये परिक्षा होतील ! अरे, ते शिकवणीचे जावू दे, पण पोरांना काय समजले नाही, ते तर सांग !’ इति दीक्षित सर ! मी त्यांच्या सोबत होतोच.
‘सर्व समजते, सर !’ मी मनापासून सांगीतले.
‘त्याला सर्व समजते आणि तू कशाला शिकवणीचा आग्रह धरतो आहे ?’ दीक्षित सर !
‘त्याला काय समजते ? मॅट्रीकचे वर्ष आहे ! विषय रहायला नको.’ त्यांच्यामधील पालक आणि बाहेरची गणिताबद्दलची भिती बोलली.
‘काही होत नाही तसं ! मी आहे काही झालं तर !’ दीक्षित सर !
शेवटी नोव्हेंबर - डिंसेबरच्या दरम्यान मॅट्रीकचे वर्ष असल्याने मी आमच्या घराजवळच असणारे वाणी सर, यांच्याकडे शिकवणी लावली. मात्र तोपर्यंत बराचसा गणित-भूमिती व भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम आटोपत आणला होता. त्यांनी मात्र वेळ तसा कमी असतांना सर्व पुन्हा शिकवत आणले. वार्षिक परिक्षेच्या अगोदर पूर्व परिक्षा व्हायची ! त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पेपर अत्यंत कठीण तर काढले जायचेच, पण त्यापेक्षा कडक तपासले जायचे. ते तपासून मिळालेले मार्क आणि आमचे चेहरे पाहून, पुराणिक सरांसारखे धीर द्यायचे.
‘आता तुम्हाला जितके टक्के असतील, त्यापेक्षा दहा टक्के तुम्हाला वार्षिक परिक्षेत जास्त मिळतील. —- अजून अभ्यास केला तर !’ हे पुराणिक सरांचे म्हणजे धीर पण देणारे असायचे आणि घाबरवून पण सोडणारे असायचे. ते इंग्रजी व संस्कृत शिकवत.
मी पूर्व परिक्षेचा भौतिकशास्त्राचा पेपर दिला. पेपर चाळीस मार्कांचा होता. मला छत्तीस मार्क होते. दोन प्रश्नांना तपासल्यावर पण मार्क दिलेले दिसत नव्हते. मी सरांकडे गेलो.
‘सर, या दोन प्रश्नांना मार्क दिलेले नाही.’ मी !
त्यांनी पेपर बघीतला. किती मार्क मिळाले, ते बघीतले. इतके मार्क कसे दिले गेले, याची काळजी असावी. त्यांत दोन प्रश्नांना मार्क दिले नाही, हे दिसतंय ! हे मार्क दिले तर — बेचाळीस होतील !
‘चाळीसपैकी बेचाळीस मार्क हवे आहेत ? कधी ऐकले होते ? हे जास्तीचे प्रश्न सोडवले आहेत. इतके मिळाले माझ्याकडून, हेच खूप झाले.’ इति दीक्षित सर ! माझ्या मॅट्रीकच्या परिक्षेचा निकाल लागला, मी सेंटरला इंग्रजीत दुसरा, तर इतर सर्व विषयांत पहिला होतो. सर्वांनाच आनंद झाला, दीक्षित सरांना तर होणारच होता.
त्यानंतर तसा त्यांचा आणि माझा शिकवण्यासंबंधाने संबंध आला नाही. मी काॅमर्स घेतले. आणि मला सरांचे गणित-भूमिती व विज्ञान शिकवणे कायमचे थांबले. नंतर मी बारावीला तर जळगांवी शिकायला गेलो. सरांची भेट होणे पण कठीण होवू लागली, कारण आता आपली शाळांच सोडली. ही वेळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात केव्हातरी येतेच, आणि तोपावेतो त्याने गोळा केलेली शाळेतील शिदोरी, त्याला आयुष्यभर पुरवायची असते. दीक्षित सर नंतर शाळेचे मुख्याध्यापक झाले. आपली करडी शिस्त त्यांनी शाळेला लावण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप ते निवृत्त झाले.
शाळेच्या जबाबदारीत असेपावेतो, ज्या कारणांसाठी त्यांना वेळ मिळत नव्हता, किंवा कमी मिळायचा आणि भाग घेण्यात काही बंधन यायचे, त्या सामाजिक क्षेत्रात मग ते आवडीने भाग घेवू लागले. विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम वा संघाच्या कार्यक्रमांत ते आवर्जून अग्रभागी असायचे, नवोदितांना मार्गदर्शन करत ! मी जशी वकिली सुरू केली, तसा काही काळानंतर गांवी आलो. त्यांच्या मनाने घेतले, आता आपण किती दिवस काम करणार ? नवीन पिढीच्या हातात हे काम द्यायला हवे. गांवातील शंभरी पार करण्याच्या बेतात असलेले, ‘सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव मंडळ’ याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला घ्यायला लावली. सोबत तसेच हुरहुन्नरी तरूण एकनाथ महाजन, अशोक शिंदे, जयंत कुलकर्णी, प्रल्हाद महाजन मंडळी होती. असे एकंदरीत सुरू होते.
मुलगा पुण्याला असल्याने, त्यांना पुण्याला जावून रहाणे तर क्रमप्राप्त होतेच. पुण्याला गेल्यावरसुद्धा ते स्वस्थ बसणे शक्य नव्हते. मग ऐकू यायचे त्यांना पुण्यातील प्रसिद्ध खाजगी क्लासने गणित-भूमिती व भौतिकशास्त्र शिकवायला नेहमीसाठी बोलावले. काही वेळा ऐकू यायचे, यावर्षी त्यांना उन्हाळयात पाचगणीच्या शाळेत उन्हाळी कोर्ससाठी बोलावले. अगदी स्वाभाविक होते, चांगली शिकवणारी मंडळी, अशी मिळतात कुठं हो ? रावेरच्या राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयांत एकदा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. यू. म. पठाण व्याख्यानांस आले होते. त्यांच्या भाषणांत पण त्यांच्या रावेर येथील शालेय काळातील आठवणीत, दीक्षित सरांचे, डी. टी. कुलकर्णी सर, लोहार सर, जोशी सर, मोकाशी सर, एस् आर कुलकर्णी सर यांचे नांव आवर्जून निघाले. शाळेतील कोणताही विद्यार्थी कधी कुठं भेटला तर ही नांवे त्यांच्या काळानुरूप निघतातच !
नंतर जसा औरंगाबादला आलो, तसा गांवाचा प्रत्यक्ष संपर्क बऱ्यापैकी तुटला. जो काही होता, तो फक्त बातम्या ऐकण्यापुरताच ! सर अधूनमधून रावेरला असायचे. त्या वर्षी दिवाळीसाठी सर आणि सौ. उषाकाकू रावेरलाच रहाणार असल्याचे समजले. योगायोगाने त्यावर्षी माझी मुलगी दहावीला होती. आणि मग पुन्हा माझ्या मनाने जबरदस्त उचल खाल्ली, की तिला सरांनी शिकवायलाच हवे. एरवी मुलांना शाळेतील सरांचे ‘ते कसे शिकवत असतील’ याचे कुतूहल होतेच, पण अनुभव नव्हता. मी सरांना भेटायला येतो, म्हणून कळवले. मुलीला शिकवा, म्हणूनही विनंती केली.
‘भेटायला ये. त्यासाठी परवानगी कशाला ? मग पाहू !’ दीक्षित सर !
मी गांवी गेलो. घरी काकांना मी हे सर्व सांगीतल्यावर ‘सर शिकवणी घेतील का ?’ ही पहिली शंका व्यक्त केली. मी त्यांच्याकडे गेलो.
‘सर, ही माझी मुलगी. यंदा दहावीला आहे. दिवाळीच्या सुटीत मुद्दाम इथं ठेवतोय. तुम्ही गणित-भूमिती शिकवावे म्हणून !’ मी.
‘अरे, आता वेळच वेळ असतो. पण तशी खूप इच्छा होत नाही. तसं तर, तिच्या आजोबाला पण शिकवलंय ! आता हिला शिकवायचे, म्हणजे तिसऱ्या पिढीला शिकवायचे !’ सरांचे उद्गार !
‘तुम्ही आता शिकवले तरच तिसरी पिढी होईल !’ मी.
सर हसले. ‘तू हायकोर्टात असतो. माहीत आहे. तुझी मुलगी आहे, हे पुरेसं आहे. मी शिकवेल. नाहीतरी आता कोणा नातेवाईकांकडे कोणी दहावी-बारावीला असलं, की मला आवर्जून बोलावणं असतं, ‘मुलाला शिकवायला या’ ! आयुष्यात आपण दुसरं काय केलंय, शिकवण्याशिवाय ?’ दीक्षित सर !
मुलगी शिकायला जावू लागली. सरांची हातोटी तिला लक्षात यायला लागली. बघता-बघता दिवाळीची सुटी संपली. मुलीला घ्यायला गांवी गेलो. सरांना भेटायला गेलो.
‘मुलीला मुद्दाम शिकवण्यासाठी पाठवायची काही गरज नव्हती. तिची तयारी चांगली आहे. तुझीच पोरगी ! बघ, नीट लक्ष दे, जगांत नांव कमवेल ती !’ सर.
मनांशी ठरवलेच होते, तसे अगोदरच काही पैसे घालून असलेले, बंद पाकीट सरांच्या हातात दिलं आणि मी व मुलीने नमस्कार केला.
‘किती आहेत रे पाकिटात ?’ सर !
‘तुम्ही शिकवलेल्या इतके अजिबात नाही. मी देवू पण शकत नाही.’ मी म्हणालो !
‘मग कशाला देतो आहे ?’ सर !
मुकाट्याने पाकीट परत घेतले व न बोलता निघालो. घशांतून शब्दाऐवजी आवंढा आला. शिकवणीचे पैसे अगोदर ठरवून, नंतर विद्यार्थ्याची शिकवणी सुरू केली जाते, हे बघीतलेल्या व अनुभवलेल्या या जगांत, शिकवल्यानंतरही ते शिकवण्याचे पैसे न घेणारे श्रीमंत शिक्षक असतात, हे पण पुढच्या पिढीला समजायला हवं ! त्यांची व समाजाची श्रीमंती वाढवायची असेल तर ! मुलगी दहावीला उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाली, तिच्या शाळेत पहिलीच होती.
मग कधीतरी गांवी जाणं व्हायचं. सर असले आणि जमलं तर भेटणे व्हायचे. सौ. उषाकाकू गेल्याचं समजलं आणि आम्ही दोघं, म्हणजे मी आणि माझी पत्नी, सरांना भेटायला गेलो. आठवणीतील एकेक माणसं आपल्याला सोडून जातात, टाळता येत नाही. आम्ही घराच्या पायऱ्या चढून वर गेलो. सर बंगळीवर बसले होते. शेजारी छोटा लोड ! बंगळी उगीचच पुढेमागे झुलत होती. समोर दोन-तीन लाकडी खुर्च्या !
‘ये बैस ! तुझं कसं काय चाललंय ?’ सरांचा प्रश्न ! ‘याच्याकडे लक्ष देत जा. हा नुसता कामांत रहातो.’ हे पत्नीला उद्देशून !
‘माझं ठीक आहे सर ! उषाकाकू गेल्याचं समजलं आणि आलो.’ मी !
‘हं ! ती गेली. बरं नव्हतं तिला, गेली. येणारा एक दिवस जाणार !’ सर ! त्यांच्या डोळ्यात खळकन् पाणी आले. चष्मा काढला डोळे पुसले, आणि थोडावेळ ते स्वस्थ बसले. आम्हाला पण काय बोलावे सुचेना.
‘बाकी काय !’ काही तरी संभाषण सुरू ठेवावं म्हणून त्यांची विचारणा.
मी यांवर काय बोलणार ? मला समजत होतं, त्यांना खूप बोलायचे आहे, पण बोलता येत नव्हतं. मग थोड्या शांततेनंतर - ‘पण आता इथं एकटं वाटतं ! कोणीतरी येतात तसे. पण !’ सरांना नेमके काही सुचेना !
‘तुमचे विद्यार्थी तर सर्व गांवात आहे.’ मी !
‘हो, दरवाजा उघडला, तर रस्त्याने जाणाऱ्या दहा माणसांतील निदान आठ माणसं मला ओळखत असतात. निदान त्यातील तीस टक्के माझे विद्यार्थी असतील. केव्हाही बोलावले तर नक्की येतील. अजून काय हवं माझ्यासारख्याला ?’ सरांतील गणिताचा शिक्षक जागा होत होता.
‘सर, पुण्याला जातांना तरी एकदा मुद्दाम औरंगाबादला या.’ मी आपले सांगण्याचा प्रयत्न केला.
‘येईन रे. न यायला काय झाले ? तुम्ही विद्यार्थी आणि माझा नंदू, काय फरक आहे ? पण तुझं जरा व्यवस्थित होवू दे.’ नंदू म्हणजे, त्यांचा मुलगा, आनंद ! त्यांना हे बोलतांना माझ्यावरील अडचणी व संकटे आठवत असावी. त्यांच्यातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणारा शिक्षक जागा होता.
‘येत जा, कधी रावेरला आला तर ! पुण्याला आला तरी घरीच ये ! अरे, जुने संबंध का असे संपतात. माझा फोन नंबर आहे ना. हा पत्ता पण लिहून घे.’ त्यांचा आग्रह !
‘आहे माझ्याजवळ !’ मी.
‘लिहून घे. ऐनवेळेस हरवतो आणि सापडत नाही मग ! भेट राहून जाते. अरे बघ, तुझी काकू नाही आता चहा करायला !’ मग मी जास्त बोललो नाही. त्यांनी दिलेला पत्ता पुन्हा घेवून मी त्यांच्याकडून निघालो.
त्यांच्या आयुष्यातल्या जवळपास पन्नास वर्षांवर तरी सौ. उषाकाकूंच्या असंख्य सांगता येण्यासारख्या, न सांगण्यासारख्या, सुखदु:खाच्या आठवणी असतील. माणसाने आठवायच्या तरी किती, आणि मोजायच्या तरी किती ? अत्यंत कठीण गणिते व भूमितीतील क्लिष्ट प्रमेय चुटकीसरशे आणि विविधप्रकारे, वेगवेगळ्या पध्दतीने सोडविणाऱ्या गणिताच्या या शिक्षकाला, आपल्या आयुष्यातल्या साथीदाराने कायमची साथ सोडल्यावर येणारी समस्या सोडवता येणार नव्हती. परमेश्वर पण काय ओळख नसलेले दोन जीव कधीतरी एकत्र आणतो, त्यांच्यातील संबंध असे काही जुळवतो, जोपासतो की त्यांना नंतर वेगळेच करता येत नाही. बस ! हेच दाखविण्यासाठी भगवान शंकराने, जगताच्या संहार देवतेने ‘अर्धनारीनटेश्वराचे’ रूप घेतलेले आहे.
असेच काही दिवस गेले, त्यांची ख्यालीखुशाली म्हणजे ते रावेरला आहे का पुण्याला आहे, हे समजत होतं. जास्त काही समजत नव्हतं. आणि एका दिवशी रावेरहून फोन आला —-‘दीक्षित सर गेले !’ ही बातमीच अशी होती, की मला काही बोलणं सुचेना. माझा चेहरा पडलेला बघीतला आणि बायकोने विचारले ‘काय झाले ?’
‘दीक्षित सर गेले !’ मी उत्तरलो. आणि माझ्याबरोबरच माझ्या मुलीच्या पण डोळ्यात पाणी उभे राहीले.

20.1.2019
काल पुण्यात श्री. किशोर जोशी यांच्याकडे, म्हणजे गांवच्या माणसाकडे गेलो होतो. निदान तीन तपे होवून गेली असतील त्यांना गांव सोडायला, पण त्यांच्या मनांत तिकडील आठवणी जिवंत आहेत, त्या जपल्या आहेत. इतकेच नाही तर, मध्यंतरी एक-दोन वेळा गांवी येवून, त्यांत भर पण घातली आहे. सायंकाळी सहकुटुंब गेल्यावर बघताबघता गांवाकडील गप्पांतून घरगुती गप्पांत येत चार तास कसे निघून गेले समजलेच नाही. आमच्या गप्पांत दोघांच्याही आठवणींत भर पडली !
शेवटी मला पुन्हा यावे लागावे, म्हणून जेवतांना शेवटचा भात घ्यावा लागला. गप्पांचे भरतवाक्य दोघांच्या गृहमंत्र्यांनी एकमेकांना सक्रांतीचे वाण देण्यात झाले. ‘आता इकडे (पुण्यात) किंवा तिकडे (औरंगाबादला) आले तर भेटल्याशिवाय जायचे नाही’ यांत झाले.

23.1.2019
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपण म्हणजे आपल्या भारतांस स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकार म्हणून काम करत असलेल्या, स्वतंत्र भारतातील शासनाने, त्यांनी आपल्या देशाप्रती केलेल्या त्यागाची कृतज्ञता म्हणून का होईना, पण भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ द्यायलाच हवा, यांत शंका नाही.
सोबत हे पण लक्षात ठेवावयांस हवे, की त्यांनी देशाप्रती जे कार्य केले, हे देशसेवा म्हणून केले. त्याचा आपणांस कोणी काही मोबदला द्यावा किंवा भविष्यात मोबदला मिळू शकेल, या भावनेने तर त्यांनी अजिबात काम केले नाही. वास्तविक त्या वेळी देशकार्य काही केले, तर आपले सर्वस्व जाईल, आपणांस तत्कालीन इंग्रज सरकार जीवनांतून उठवेल किंवा जीवे मारेल, अशी स्थिती होती.
स्वातंत्र्यवीरांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आणि स्वातंत्र्यानंतरची कितीतरी सरकारे ही परस्परांच्या विरूद्ध होती, याबद्दल दुमत नाही. ‘असे असले, तरी त्यांनी स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान करावयास हवा’ हा झाला आदर्शवाद ! याप्रमाणे कोणीही वागले नाही, वागणार नाही ! आजच्या घडीला देखील स्वातंत्र्यवीरांबद्दल कशा पद्धतीने काही मंडळी उघडपणे किंवा त्यांच्या गोटात बोलतात: हे आपणांस माहिती आहे, आपण ऐकले आहे आणि बघीतले आहे.
आज पण ‘स्वातंत्र्यवीरांना भारत रत्न मिळावयास हवे’, हा आवाज उठविणारे बहुसंख्य प्रामाणिकपणे आवाज उठवत आहेत, हे क्षणभर गृहीत धरले तर लगेच सद्य सरकारबद्दल किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेबद्दल, त्यांची मते ज्या उमाळ्याने बाहेर येतात, हे पाहून त्यांच्या भावनेबद्दल शंकेची पाल चुकचुकते, की यांना नेमके काय हवे आहे ?
बाकी काही असो, स्वातंत्र्यवीर सावरकर हे अशा कित्येक पुरस्कारांच्या पलिकडे निघून गेले आहे. त्यांचे विचार प्रत्यक्षात आणणारे सरकार निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे. वितंडवाद करून त्यांच्या विचारांच्या विपरीत सरकार आणल्यावर किंवा असल्यावर आपणांस आलेले अनुभव नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

26.1.2019
दिवसभरांत फेसबुकवर, वर्तमानपत्रांवर नजर टाकली, रेडिओ व टीव्ही वरील, काही बातम्या कानांवर व पहाण्यांत आल्या, की त्यांत या तीन-चार गोष्टी हमखास असतात. सद्य सरकारचा नाकर्तेपणा व बेअकलपणाचे धोरण मात्र तुलनेने विरोधी पक्षांना जनतेच्या हिताबद्दल असलेली कळकळ, शेतकरी तसेच गरिबांचे व वंचितांची भीषण परिस्थिती, व्यापारी तसेच सरकारी नोकरदार यांचा मस्तवालपणा, राजकारण्यांचा निगरगट्टपणा आणि माणुसकीशून्य वर्तन वगैरे वगैरे ! त्या खोट्या असतात किंवा खऱ्या नसतांत, यांवर काही मतप्रदर्शन करणे किंवा ते सांगणे अवास्तव, अनाठायी हे पण माझे म्हणणे नाही.
माझ्यासारख्या माणसाचे साधेसरळ म्हणणे आहे, की मंडळी किती खरं बोलतात किंवा खोटं बोलतात, याचा अंदाज आपल्याला आला असतोच. बराच वेळ लक्ष वेधणाचा अयशस्वी प्रयत्न केल्यावरही, आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे बघीतल्यावर एखादे लहान मूल कसे काहीही कारण नसतांना मोठ्याने भोकाड पसरते, आणि आपल्याकडे लक्ष वेधून घेते, त्याप्रमाणे बऱ्याच अंशी या मंडळींचे वागणे असते. जे काही करायचे ते लहान मूल करत नाही, तर मोठ्या मंडळींनाच करायचे असते. इथं फरक एवढाच आहे, की लहान मुलाने काही करायचे ठरवले, तरी त्याला करता येणार नसते; मात्र या मोठ्या मंडळींची अशी परिस्थिती नसते. त्यांनी काही करायचे ठरवले, तर त्यांना करता येवू शकते, पण ते अभावानेच काही करतात.
नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आपली जबाबदारी ! नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण सर्व जण हे विश्वस्त आहोत. तिचा योग्य वापर करून, किंबहुना संवर्धन करून, ती आपण आपल्या पुढच्या पिढीच्या हातात द्यायची, आपली जबाबदारी आहे. हे आपण न करता, नियर्गास हवे तसे ओरबाडून आणि कल्पनाहीनतेचे प्रदर्शन करून साधनसंपत्तीचा ऱ्हास करतो.
एका देशांत जमीन फारच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने, तिथं काही बांधकाम रहिवासासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी करायचे असेल, तर किमान सतरा मजली इमारत बांधावी लागते. त्यापेक्षा कमी मजल्यांची इमारत बांधायला परवानगीच मिळत नाही. कारण तसे जर केले नाही, तर त्या देशातील अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असलेली जमीन ही विनाकारण बांधकामात वाया जाईल. कमीतकमी जमिनीचा वापर करून त्यात जास्तीत जास्त लोकांची सोय करण्याचे हे धोरण आहे. उपलब्ध असलेली जमीन, आपल्याला वाढवतां येणार नाही, हे निश्चित असल्याने तिचा काटकसरीने वापर करणेच आपल्या हातात आहे. यामुळे रहिवासासाठी, वापरासाठीची जागा कमी पैशात जास्त उपलब्ध होईल.
दुसरा एक मुद्दा असाच, प्रत्येक गांवातील रहिवाशांनीच ठरवायला हवे की आपल्या गांवातील शेतकऱ्यांनी कोणकोणती पीके घ्यायलाच हवी. एखाद्या पीकाचे भाव मागील वर्षी चांगले होते, म्हणून पुढील वर्षी सर्वांनी शेतात तेच पीक लावून, एकूण उत्पन्न वाढवायचे आणि त्या पीकाचे सरासरी भाव पाडायचे. यांत कोणता शहाणपणा आहे, हे समजत नाही. ज्या पीकाचे भाव कायमच चढे रहातात, अशा पीकांचे बाबतीत हा प्रयोग केला, तर हरकत नाही. मात्र ज्यांचा भाव बाजारात आलेल्या उत्पादनावर ठरला जातो, तिथं नेमके व आवश्यक एवढेच उत्पादन यायला हवे, ही काळजी त्या उत्पादकाने घ्यायला हवी. ती इथं घेतली जात नाही, मग या समस्या निर्माण होतात.
वर उल्लेख केलेली मंडळी ज्यावेळी सुधरतील, त्याचवेळी सुधरतील किंवा सुधरणार पण नाहीत. आपल्या अंगी ती क्षमता आहे किंवा नाही याची आपल्याला कल्पना नाही. मात्र ही मंडळी अशीच राहिली, तरी आपण आपल्याला बदलू शकतो. आपण नेमके तेच टाळत असतो, मग निर्माण होणाऱ्या समस्या या स्वाभाविकपणे येणारच !
आपल्या अशा अडाणीपणाच्या किंवा बेबंद वागण्याने नैसर्गिक साधन संपत्ती आपण वाया घालवत आहोत, हे आपल्या लक्षात येत नाही. ही येणाऱ्या भीषण समस्यांची नांदी आहे. यासाठी संप, मोर्चे, जाळपोळ, रास्ता रोको वगैरेचा काही उपयोग नाही.
आज श्री. प्रवीण बर्दापूरकर यांचा ‘वेतनवाढीची खंडणी आणि बळीराजाची मातीमोल जिंदगी’ हा लेख वाचला, त्यावरून आठवले व सुचलं !

27.1.2019

‘छाया सरकार’ किंवा ‘शॅडो कॅबिनेट’

शालेय वयांत शाळेत इतिहास-नागरिकशास्त्र शिकतांना, लोकशाही म्हणजे काय ? राजेशाही, हुकूमशाही म्हणजे कशी ? लोकशाहीचे प्रकार - संसदीय, अध्यक्षीय आणि त्यातील गुणदोष वगैरे संक्षेपाने शिकायला मिळाले होते. त्या शालेय शिक्षणानंतर जो नागरिकशास्त्र किंवा राज्यघटनेचा संबंध आला, तो कायद्याचा अभ्यास करतांना महाविदयालयांतच ! तिथं मग कायद्याचा इतिहास आणि राज्यघटनेचा इतिहास असा विषय होता.
यावेळी त्यांत एक शब्द नेहमी ऐकू यायचा - ‘छाया सरकार’ म्हणजे ‘शॅडो कॅबिनेट’ ! ही पद्धत इंग्रजांकडे अजूनही सुरू आहे. भारतातील लोकशाही जर आपण मुख्यत: त्यांच्याकडून तसेच आणि इतर विविध देशांच्या लोकशाही, राजेशाही व हुकूमशाही व्यवस्थेतील तरतुदींकडे बघून जर घेतली आहे, आणि त्याचा विचार करून, जर ही आजची आदर्शवत लिखीत राज्यघटना तयार केलेली आहे, तर हा विचार पण आपण स्विकारायला काही हरकत नाही.
‘छाया सरकार’ किंवा ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणजे सत्ताधारी पक्ष आपले सरकार चालवतांना, जी काही ध्येयधोरणे आखत असतो आणि दरवर्षीच्या अंदाजपत्रकांत त्याचे प्रतिबिंब दाखवतो, त्याला उत्तर म्हणून विरोधी पक्षातर्फे त्यांचेपण ध्येयधोरण आखले जाते, जाहीर केले जाते, अंदाजपत्रक पण तयार केले जावू शकते. विरोधीपक्ष पण आपल्या कॅबिनेट मधील विविध खात्यांचे मंत्री कोण असतील हे ठरवतात. त्यांच्याकडे त्या खात्याचा कारभार ते जर मंत्री असते, तर त्यांनी कसा केला असता, यांची त्यांना कल्पना दिलेली असते. त्यामुळे सद्य सरकारचे धोरण आणि त्यातील भल्याबुऱ्या बाजू, या विरोधी पक्ष आपल्या प्रत्युत्तराने सांगतो. विशेष म्हणजे त्यातील चुका, कमतरता व त्रुटी या आपल्या पर्यायी योजनेने सांगत असतो. यांतून सत्ताधारी पक्ष पण त्यांना हवे ते, अनुकूल असेल ते, जनतेच्या दृष्टीने सोयीचे असेल ते स्विकारू शकतो. पर्यायाने देशाला, जनतेला आणि सत्ताधारी पक्षाला, देशहिताचे कामी व समाजहिताचे कामी, विरोधीपक्षाचा अडथळा न होता, मदतच होते. ही खरीखुरी मदत असते, नुसती बोलघेवडी पोपटपंची नसते, की ‘आमच्या हाती सत्ता द्या. आम्ही असे करू, तसे करू ! सूर्यावर जावू, चंद्र खाली आणू वगैरे वगैरे !’ लोकशाहीत सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून अपेक्षा असते, असावयांस पाहीजे, ती अशी.
सत्ताधारी पक्षाने पण, विरोधी पक्षाचा जरी सल्ला असला, तरी जर तो देशहिताच्या दृष्टीने योग्य असेल, तर तो सल्ला स्विकारायला अजिबात हरकत नाही. विरोधी पक्षाने पण एक बंधन स्वत:हून पाळावयास हवे, की सल्ले द्यायचे, ते समाजहिताचे व देशहिताचेच ! समाजाला व देशाला दिवाळखोरीत लोटणारे सल्ले द्यायला नको. राज्य घटनेची हीच अपेक्षा आहे.
मला जर कोणी, काहीही कष्ट न करू देता भरपूर, कोणत्याही मार्गाने मिळवून देणार असेल, तर माझ्यासाठी तो चांगलाच असेल ! समाजाचे देशाचे काहीही होवो ! असे मानणाऱ्यांची संख्या ही प्रत्येक देशांत जास्त असते. आपल्याकडे कदाचित अजूनच जास्त असेल. मात्र या मागणीला, इच्छेला प्रतिबंध घालणारे जर त्यांचे म्हणजे जनतेचे प्रतिनिधी असतील, ते जनतेला समजावून, या लोभी वृत्तीपासून परावृत्त करत असतील, तर तो देश व समाज पुढे जायला वेळ लागत नाही. मग आपल्याला राखेतून, फिनिक्स पक्षाप्रमाणे, उभे रहाणाऱ्या जपानचे उदाहरण देण्याची गरज पडणार नाही. आपले उदाहरणसुद्धा जग देईल.
आतापर्यंत आपल्याकडे अनुभव मात्र असा येत आहे की, कोणत्याही सत्ताधारी पक्षाचे धोरण हे, विरोधकांच्या दृष्टीने अपवादानेच बरोबर असते किंबहुना ते नेहमीच चुकीचे असते. मात्र त्याच वेळी या विरोधकांचे स्वत:चे धोरण पूर्वी काय होते ? आणि नेहमी कसे असते ? त्याचे आजपावेतो परिणाम काय झाले ? किंवा पूर्वी ते सत्ताधारी असतांना, त्यांचे तेच धोरण होते, का अजून काही वेगळे होते ? आजचे व पूर्वीचे, ही दोन्ही धोरणे एकच असल्यास ही अशी अवस्था का झाली ? वेगळे असल्यास, त्यातील फोलपणा लक्षात आल्याने बदलले ? बदलत्या हवेप्रमाणे, सत्ता हवी म्हणून बदलले ? वगैरे असंख्य बाबी या विरोधकांचा खोटेपणा उघड करणाऱ्या असतात.
पण दरवर्षी होणाऱ्या या अंदाजपत्रकाच्या सोहळ्यात विरोधीपक्षाने आपले पण अंदाजपत्रक दरवर्षी सादर करायला हरकत नाही. बघू या ! जनतेच्या काय हिताचे आहे ते ?

2.2.2019

पं. रामस्वरूप रतौनिया !

पं. रामस्वरूप रतौनिया !
आज रविवार ! नेहमीप्रमाणे लवकर उठलो. पहाटे संगणक सुरू केला. शनिवार-रविवारी कोर्टाचा आठवड्याचा बोर्ड येतो. तो वेबसाईटवरून बघीतला. एकेक दिवसाचा बोर्ड मग डायरीत लिहीला. सप्लीमेंटरी बोर्ड आदल्या दिवशी रात्री येतो. रोज या दोन्ही बोर्डांची कामे ठेवलेली असतात. मी नियमीत बोर्ड लिहीतो, कारण मग मला आठवड्याचा कामाचा अंदाज करायला सोपे जाते, पक्षकारांना महत्वाचे असेल तर कळवतां येते, म्हणून मी नेटवरून जरी बोर्ड रोज काढता येत असला, तरी तो इथं आल्यापासून डायरीत लिहीतो. खालील कोर्टात पुढील तारीख ही त्याच दिवशी देत असल्याने, तिथं प्रत्येक तारखेचा आपला बोर्ड आपोआप तयार होतो. हायकोर्टात पुढील नेमकी तारीख अपवादाने देतात. कामे कोर्टाच्या सोयीप्रमाणे, आपल्या सर्क्युल्शनप्रमाणे लागतात. असो. पण गेल्या कित्येक वर्षांच्या डायऱ्या माझ्याकडे आज पण आहेत.
नंतर मग काम आटोपल्यावर चाळा म्हक्णून फेसबुक उघडले. त्यांत नेहमीप्रमाणे उजव्या बाजूला आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत, याची आठवण म्हणून यादी होती. त्यांत एक नांव होतं, पं. रामस्वरूप रतौनिया ! ते आज आपल्यात नाहीत. पण फेसबुकला काय कल्पना ? त्याने यांत्रिकपणे पंडितजींचा जन्मदिनांक तिथं अगोदरच भरलेला असल्याने, आपल्या तंतोतंत कार्यक्षमतेला जागून आठवण करून दिली. — आणि माझी एक जुनी आठवण जिवंत केली.
मी काॅलेजला शिकत होतो जळगांवला ! तिथं हाउसिंग सोसायटीत, प्रा. फडके रहायचे. त्यांचे नातेवाईक हे चांगले सतारिये ! ते ग्वाल्हेरला रहायचे. काही घरगुती किंवा अन्य कारणांनी ते जळगांवी आले असतील. ते अनायसे आल्याने, स्वाभाविकच या रसिक मंडळींनी त्यांचा घरगुती कार्यक्रम ठेवला, त्यांच्या सतारवादनाचा ! सोबत पोरगेलेसे तबलजी होते, त्यामुळे कार्यक्रमासाठी, जळगांवी वेगळे तबलजी त्यांना पहावे लागले नाही. सर्व परिचितांना या कार्यक्रमाची निमंत्रणे गेली. कार्यक्रम रात्री होता. मी पण गेलो होतो. मघ्यंतरांत काॅफीपान झाले. एक मात्र नक्की, जळगांवला संगीत रसिकांनी व आकाशवाणीने मला संगीत खूप ऐकवले.
कार्यक्रम अप्रतिम झाला. सुषिरवाद्य, तंतवाद्य याची साथ करतांना, तबलावादकाने कशी साथ करावी, हे बघायला व ऐकायला मिळाले. नेमके लपेटना आणि सवाल-जबाब हे काय असतात ? ते दोन्ही बघायला मिळाले. त्यावेळी मी कै. बबनराव भावसार यांचेकडे तबला शिकत होतो, त्यामुळे तबल्यात थोडी जास्त रूची ! त्या सतारिये श्री. फडके यांच्या साथीला तबलजी होते, रामस्वरूप रतौनिया ! त्या वेळी प्रथम त्यांचा तबला ऐकला. मध्यंतरांत ग्वाल्हेर गायकी, पं. कृष्णराव पंडीत, त्यांचे चिरंजीव पं. लक्ष्मणराव पंडीत आणि त्यांचे जळगांव येथील गुरूबंधू कै. गोविंदराव कुलकर्णी वगैरे, बऱ्याच गोष्टी मोठ्या माणसांच्या गप्पांतून समजल्या. ग्वाल्हेरचे जळगांवशी कसे नाते आहे, हे जळगांवच्या श्रोत्यांनी पण सांगीतले. आपुलकी निर्माण व्हावी, ही भावना !
तिथं कार्यक्रमांत वल्लभदास वालजी वाचनालयाचे पदाधिकारी आले होते. नंतर त्यांनी अगत्याने त्यांचा कार्यक्रम वाचनालयांत ठेवला. माझे घराजवळच त्यावेळी श्री. विनायक फाटक, हे जळगांव आकाशवाणीचे तबलावादक रहायचे. त्यांचेकडे बऱ्यापैकी जाणेयेणे असायचे. या वाचनालयांतील कार्यक्रमाचा निरोप त्यांना स्वाभाविकच पोहोचविला.
अशी ती आठवण मनांत होती. मग इथं फेसबुकवर आल्यावर, ही अशी आठवणीतील माणसं इथं फेसबुकवर शोधली. त्यांना संकोच न करता, मैत्रीची विनंती पाठवली. त्यांच्या मी लक्षात असण्याचे काही कारण नव्हते, पण विनंती स्विकारली. पंडीतजींना पण विनंती पाठवली. ते आकाशवाणीवर डायरेक्टर होते. त्यांची कधीतरी पुन्हा भेट होईल असे वाटले, पण तो योग नव्हता. दोनतीन वर्षांपूर्वीच ते गेले.
फेसबुकवर अशी कधी भेटलेली वा न भेटलेली माणसं पण मित्र आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली, म्हणजे आपला ज्या क्षेत्राशी संबंध येतो, तिथली माणसं स्वाभाविकच भेटतात. काहींचा प्रत्यक्ष भेटायचा योग येतो, बऱ्याच जणांचा येत नाही, तर ते अप्रत्यक्षपणे कामांतून, संपर्कातून भेटतात. काही मोठ्या माणसांची तर भेटीची पण शक्यता नसते; तरी आपल्या मित्रांच्या यादीत आहे, यामुळे मनाला बरं वाटतं. त्यांच्याकडून काही ऐकायला मिळतं, त्यांनी लिहीलेलं नवीन वाचायला मिळतं आणि त्यातून शिकायला पण मिळतं. आज पंडीतजींचा वाढदिवस मला निदान १९७८-७९ मधे काॅलेजच्या वयांत घेवून गेला ! पंडीतजींना प्रणाम !

3.3.2019
कुठं बाहेगांवी, जरा आडवळणाला म्हणजे, जिकडं नेहमी जाणं जमणार नाही तिकडं गेलं, की त्या भागांत आवर्जून जाण्यासारखं काय आहे, हे मी लक्षात ठेवलेलं असतं. आपलं ठरलेले काम झालं, की मग पुढचा टप्पा येतो, तो या भागांत आपल्याला भेटायला हवं असे कोण आहे ? बऱ्याच वेळा जमत नाही, तर काही वेळा जमतं ! जमत नाही, कारण आपलं जमून उपयोग नसतो, तर समोरच्याला वेळ हवा.
असाच मागील महिन्यात गुजरात, सौराष्ट्रात जाण्याचा योग आला. बडोद्याला जाणं, तर आवश्यक होतं. बडोदा दर्शनासोबत, अजून एका व्यक्तीला भेटायचे ठरवले होते, नितीन हातवळणे ! मूळचा भुसावळचा, पण काही वर्षे शिक्षण रावेरला सरदार जी. जी. हायस्कूल येथे झालं ! तसा माझ्या पुढील वर्गात, म्हणजे दोन वर्षे पुढे !
तसं माझं अधूनमधून फोनवर बोलणं होते. बडोद्याला गेल्यावर आवर्जून मी फोन केला. कमी वेळेत कसंतरी भेटीचं गणित जमवलं ! सकाळी सर्वांचे आटोपेपर्यंत वेळ होता. जिथं आम्ही थांबलो होतो, तिथेच त्यांना बोलावले. गप्पा सुरू झाल्या. मधलं निदान चाळीस वर्षांचे, सन १९७७ ते २०१८, हे अंतर क्षणात संपलं आणि गप्पा रंगल्या ! काही आठवणींवर रेंगाळावसं वाटलं, काही व्यक्ती गेल्याच्या आठवणी क्लेशदायक होत्या ! बघताबघता आलेला पहिला चहा संपला. दुसरा चहा पण संपला ! जवळपास दीडतास गप्पांत उडाला !
त्या गप्पांत काय नव्हतं ? त्यांच्या रावेरच्या आठवणी इतक्या दूर गेल्यावर पण ताज्या होत्या. आपली शाळा, भाजी मार्केट, पाराचा गणपती, रामस्वामी मठ, थड्यावरील मारोती, लंगडा मारोती, बैठकवरील बारा गाड्या सगळं आठवत होतं ! दीक्षित सर, जोशी सर, एस् आर कुलकर्णी सर, वानखेडे सर, तांबे बाई, पितळे बाई सर्व लक्षात होते. विटवेकर, आठवले, भागवत, देशमुख, पासे, रावेरकर, प्रचंड, गिनोत्रा, अग्रवाल अगदी सर्वांचे फोटो असल्यासारखे वर्णन सुरू होते !
शेवटी जमलं तर संध्याकाळीही भेटू, हे आश्वासन देवून भेट संपली. संध्याकाळी जमणं कठीणच होतं. बघू, पुन्हा केव्हा योग येतो ते !

3.2.2019
गेल्या शनिवारी, प्रसिद्ध पत्रकार, लेखक श्री. प्रवीण बर्दापूरकर लिखीत ‘डायरी’ व ‘क्लोज अप’ आणि त्यांनी संपादन केलेले ‘माध्यमातील ती’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होता, महात्मा गांधी मिशन औरंगाबाद येथील ‘व्ही. शांताराम सभागृह’ येथे ! या सभागृहात जाण्याचा प्रथमच योग आला. सभागृह छान !
श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्तविक करून, आपले मनोगत व्यक्त केले. ‘आपल्याला लिहीण्याशिवाय काही जमत नसल्याने, लिहीत गेलो’ ही त्यांची भावना ! ‘पण चांगलं लिहीत असल्याने जास्त लिहीता आलं’ ही आपली भावना. त्यानंतर पुस्तक प्रकाशन झालं. सूत्रसंचालन श्री. उमरीकर यांनी केले.
या समारंभाचे अध्यक्ष, प्रसिद्ध समीक्षक डाॅ. सुधीर रसाळ यांनी आपल्या भाषणात, या अशा पुस्तकांचे सामाजिक इतिहासातील महत्व असल्याने, या लिखाणाचे महत्व आहे, हे आवर्जून सांगीतले. आपल्या लिखाणांत मूल्यात्मक भूमिका घेवून तटस्थपणे राजकीय लिखाण करणारे अलिकडे दुर्मिळ झाले आहेत. वर्तमानपत्र व पत्रकारिता, हे सत्ता मिळविण्याच्या मार्गातील एक सोपान समजला जात असल्याने, स्वाभाविकच त्याचा वापर हा सत्ताकेंद्र म्हणून होवू लागला. वापर होवू लागल्यावर स्वार्थासाठी गैरवापर होणे, त्यांत भ्रष्टाचार होणे हे ओघाने येतेच, याचे चित्रण प्रांजळ आहे, म्हणून या अशा लिखाणाला मूल्य आहे. त्याचे या दृष्टीने मूल्यमापन करणे आवश्यक आहे. श्री. बर्दापूरकर यांच्या लिखाणाबद्दल बोलतांना, यांच्यात पत्रकारांत नसलेला गुण आहे, तो म्हणजे अहंकार नसणे ! ही बाब खरंच दुर्मिळ ! अशी काही दुर्मिळ बाब, गुण आपल्याजवळ असले, की याचे फायदे स्वाभाविकच आपल्या लिखाणाला मिळतांत, आपल्या या अशा लिखाणात आपले व्यक्तिमत्व उमटते. लेखकाचे दर्शन घ्यायचे, तर ते त्याच्या लालित्यपूर्ण लिखाणातून ! त्याने कथाकार असावं, माणसातलं माणूसपण शोधावं. ही पुस्तके वाचल्यावर एक होतं, आपल्याला जे राजकारण कळत नाही, ते हे वाचल्यावर तो माणूस व त्याचं राजकारण समजायला लागते. बोलण्याच्या ओघात नितीन गडकरींबद्दल उल्लेख झाला, असे दुवे कळायला लागतात.
महात्मा गांधी मिशन औरंगाबाद यांचे सचिव, श्री. अंकुशराव कदम यांनी ‘तीन ग्रंथ छापून घेणे, ते पण सौ.च्या हस्ते हे उल्लेखनीय आहे’ हे आवर्जून सांगत त्यांना दीर्घायुष्य चिंतले.
उच्च न्यायालय मुंबई याचे माजी न्यायमूर्ती श्री. नरेंद्र चपळगांवकर यांनी आपल्या भावना वडीलधाऱ्याप्रमाणे व्यक्त केल्या. ‘पतीने आपण लिहीलेली पुस्तकं पत्नीच्या हस्ते प्रकाशित करावी व प्रेम व्यक्त करावं’ यांतील अबोल प्रेम बोलून जाते. लेखकाचा चांगुलपणा व्यक्त करतांना, त्याला समाजातील व्यंग लक्षात येते. त्यांची भूमिका ही महाभारतातील अर्जुनाची आहे. राजकारणी माणसांतील चांगले गुण दाखवायला हवेत. त्यांचा लौकीक परिचय करताकरता, आईवडिलांचे व्यक्तीचित्र उभं रहातं. दारिद्र्य हे माणसाला खऱ्या रूपात उभं करतं. दरारा वाटावा म्हणून लेखन करतात, असं लेखन करतात. त्यांच्या लिखाणांत ओलावा दिसतो. पत्रकारांना काही कर्तव्य लोकांना माहिती नसतांना पण करावी लागतात. आपल्याला काही नको असतं तेव्हा लिहीलं जातं. हा पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम मित्रांबरोबर प्रसंग साजरे करणे, हा विचारच मोठा वाटतो. तो परिवार खूप मोठा असल्यानेच शक्य असतं. अशी ही माणसं ठिकठिकाणी भेटत गेली. आपले प्रेम सेवेतून प्रगट होतं. प्राण मंगलात आहे.
त्यांच्या मुलीने, सायलीने तिच्या आईच्या वतीने, सौ. मंगला बर्दापूरकर यांच्यावतीने मनोगत वाचून दाखवले.
सुप्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवार यांनी कोणालाही वस्तुनिष्ठ चित्रण कितपत शक्य आहे ? असे चित्रण, लिखाण करण्यामागील हेतू काय ? हे सांगतांना, व्यक्तीचित्रण करतांना, त्याचे लेखक व साहित्य म्हणून असलेले अपुरेपण सांगीतले. कोणाला लिखाण करायचे असेल, तर तात्कालिक संकेत टाळून पहाता आलं तर शक्य आहे का ? तर ते कठीण आहे. असं काही लिहायला गेलो, तर बऱ्याच वेळा त्या व्यक्तीचे चारित्र्यभंजन किंवा चारित्र्यपूजन होण्याची शक्यता असते. हे लिखाण राजकीय असल्याने, यांतील संदर्भ बदलले, माणसं नाहीत, म्हणून हे आज ऐतिहासिक आहे.
हे झालं थोडं कृत्रिम पद्धतीने कार्यक्रमाचे वर्णन ! मात्र कित्येक गोष्टी अशा असतात, याचा ठसा एकंदरीत कार्यक्रमातून आपल्या मनांवर उमटतो, प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या मनावर उमटतो. सर्वांच्या मनांत तो सारखाच आणि तितकाच ठळक असेल, असे नाही, वेगळा असू शकतो. श्री. बर्दापूरकर यांनी ‘संपूर्ण कार्यक्रमांत आपण स्वत: व्यासपीठावर असणार नाही, तर आपली पत्नी ही असेल. हा कार्यक्रम तिचा आहे’ ! हे असं जेव्हा सांगीतलं, त्याचवेळी यांतील वेगळपण लक्षात आलं.
खरंच, आपल्या कोणाच्याही प्रगतीच्या उंचावणाऱ्या आलेखाला कितीतरी लोकांचा टेकू असतो, खूप अदृश्य हात हा आपला आलेख उंचावण्याला कारणीभूत ठरलेले असतात. प्रयत्न केला, तर हे हात दिसू शकतात, मात्र ती दृष्टी हवी ! दृष्टी असेल, तर त्या हातांचे उपकार मानण्याची कृतज्ञबुद्धी हवी ! माणुसकी, देवत्व, चांगुलपणा म्हणजे यापेक्षा काय वेगळं आहे.
कोणाचाही या जगांत त्याच्या अस्तित्व निर्माण होण्यापासून संबंध येतो, तो स्त्री शी ! सुरूवातीला ती आईच्या रूपात असते. आपल्या लहानपणापासून आपल्याला वाढवते, ते आपल्याला मोठं करून ! नंतर आपल्या आयुष्यात दुसरी स्त्री येते, ती पत्नीच्या रूपात ! आपल्या संपूर्ण उमेदीचा काळ, कर्तृत्वाने फुलवते ती पत्नी ! आपले कर्तृत्व झळाळून निघावं यासाठी, दिव्यातले तेल व्हावं लागते, ते आईला आणि नंतर पत्नीला ! कित्येक वेळा स्वत:मधील गुणांकडे दुर्लक्ष करत, आपल्यातील कर्तृत्वाला बंदीस्त करत, काही वेळा तर संपवून टाकत ही नारी आपल्या अपत्याच्या व पतीच्या पाठीशी उभी रहाते. आपण उन्हात असलो, तर आपली सावली सर्वांना दिसते. कर्तव्यभावनेने या जेव्हा आपल्यावरील उन्ह झेलत असतात, त्यावेळी ना आपली सावली पडते, ना त्या त्यांची सावली पडू देत ! आपल्या सावलीत, याचे कर्तृत्व झाकोळून गेले तर ? नकोच ते ! परमेश्वराने या स्त्री ला जन्माला घालून, आपल्या सर्वांवर फार उपकार करून ठेवले आहे. आपलं उंचावणारं कर्तृत्व समोर दिसत असतांना पण, सौ. मंगलाताई बर्दापूरकर यांनी त्याला अर्ध्यातच पूर्णविराम दिला ! या पण यांच मांदीयाळीतील !

12.2.2019
परवापासून पुण्यात आहे. काल मला, मूळचे औरंगाबाद येथील पण सध्या पुण्याचे रहिवासी असलेल्या वडिलधारी मंडळींना भेटायचा योग आला. त्यांना फोन केला, भेटता येईल का, हे विचारल्यावर आणि आम्ही दोघं पुण्यात आलोय, म्हटल्यावर ‘दोघं जेवायलाच या !’ हे निमंत्रण मिळालं ! मात्र ते जमणार नसल्याने, दुपारी भेटायचे नक्की ठरले.
त्यांना म्हणायचं आपलं, माझे फेसबुक मित्र ! पण ते खरंच मानाने, अनुभवाने आणि वयाने वडीलधारी ! वडीलधाऱ्यांकडे गेलं की आमच्यासारख्या लहानग्यांना काहीतरी मिळतंच ! फेसबुक मित्र म्हणून भेटायची कधीची इच्छा होती !
काल भेटलो, श्री. जयंतराव दिवाण, निवृत्त अधिकारी, स्टेट बॅंक आॅफ हैद्राबाद आणि सुप्रसिद्ध लेखिका सौ. वृंदा दिवाण यांना !
त्या उत्साही दांपत्याच्या आमच्याशी झालेल्या गप्पांमधे काय नव्हतं ? बॅंकेचा अधिकारी असला तरी सर्व नियम पाळून सर्वसामान्यांसाठी काय करता येवू शकते ! आपल्या उमेदीच्या काळात नाट्यकलेशी कसे संबंध ठेवून होतो ! औरंगाबाद मधील सर्व मंडळींच्या जुन्या काळातील आठवणी ! संसार करतांना साहित्याची सेवा कशी करता येईल ! गप्पांत जवळपास अडीच-तीन तास कसे निघून गेले समजलेच नाही.
दरम्यान त्यांच्या सुविद्य स्नुषेने आपल्या गृहस्थाश्रमास जागून आणलेले मस्त गरमागरम पोहे ! त्यांच्यापैकी कोणीही चहा पीत नसतांना, आमच्यासाठी मुद्दाम करून आणलेला वाफाळणारा चहा ! त्यांच्या आस्वादासोबत गप्पा होत असतांनाच, त्यांच्या सुनेशी गप्पा मारतांना, ती करत असलेले मनोविकार समुपदेशक म्हणूनचे काम हे, अलिकडच्या पिढीच्या अडचणी व समस्या लक्षात घेता, कसे आवश्यक आणि आव्हानास्पद आहे, याची पण जाणीव झाली.
निघतांना दोघांनीही आम्हांस अमूल्य भेट दिली, ती त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांची ! मात्र त्यांच्या चिरंजीवाची भेट राहून गेली.
अजून सोबतीला होते, दुसरे दोघांचेही फेसबुक मित्र श्री. पुरुषोत्तम गोखले ! भारतीय शास्त्रीय संगीताचे दर्दी आणि गायक ! त्यांनी ‘काटा रूते कुणाला’ हे गीत तब्येतीने, पण कसलीही वाद्यांची साथसंगत नसतांना गायले. त्यांच्या ‘हे बंध रेशमाचे’ या ‘शांता शेळके’ यांनी लिहिलेल्या आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या आणि मूळ नाट्यगीत गायलेल्या, नाट्यगीताने पं. जितेंद्र अभिषेकींची जुनी आठवण चाळवली. काॅंग्रेस भवन जळगांव मधील बैठक आठवली. त्या वेळी तानपुऱ्यावर त्याचे शिष्य श्री. अजित कडकडे हे होते.

21.2.2019

बालाजीवाले सर !

बालाजीवाले सर !
नंदकुमार काशीनाथ बालाजीवाले ! तसे ते मूळचे बुरहानपूरचे, म्हणजे सध्याच्या मध्यप्रदेशचे ! कधीकाळी बुरहानपूर हे खान्देशमधे असेल, पण भाषावार प्रांतरचनेच्या वेळी, त्याचा ‘बेळगांव, कारवार, धारवाड वगैरे’ इतका गाजावाजा झाला नाही. आमच्या गांवापासून दहा-अकरा किलोमीटरवर सध्याच्या मध्यप्रदेशची हद्द सुरू होते. त्यामुळे नातीगोती, शेतीबाडी यासाठी येथील रहिवाशांना महाराष्ट्र वेगळा वाटत नाही. गोंधळ होतो, तो काही वेळा आरक्षणाच्या बाबतीत ! इकडील काही मुली तिकडे दिल्या किंवा तिकडील इकडे आल्या, तर तिकडील काही जाती इकडे आरक्षणाच्या यादीत नाहीत. त्याचवेळी हा सगळा इतिहास न्यायालयांत सांगावा लागतो. नोकरी व्यवसायानिमीत्त इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे येणे, हे अत्यंत स्वाभाविक आणि नित्य सुरू असते.
बुरहानपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव मोठा असतो. तेथील ‘नवरात्र व्याख्यानमाला’ तर नामवंत वक्त्यांसाठी एक पर्वणीच असायची, एकदा इथं कै. अटलबिहारी वाजपेयी हे पण वक्ते होते. इथं भगवान बालाजीचे मंदीर आहे. भगवान बालाजीचा मोठा उत्सव होतो, विजयादशमीला ‘भगवान बालाजीचा रथ’ निघतो. या मंदीरात बालाजीची पिढ्यानपिढ्या सेवा करणारे, म्हणून हे बालाजीवाले ! परमेश्वर कोणाला काही देतो, तर कोणाला काही ! इथं तर त्या बालाजीने आपले नांवच दिले यांना, ओळख म्हणून !
त्यांना आमच्या शाळेत, सरदार जी. जी. हायस्कूलमधे, यावे लागले ते नोकरीनिमीत्ताने आणि मग ते रावेरनिवासी झाले. ते मला मी शाळेत गेल्यावर विद्यार्थी म्हणून होण्याअगोदरच माहिती ! बऱ्याचवेळा गुरूवारी ते आमच्या गल्लीत यायचे, ते कै. ना. रा. भावे यांच्या घरी ! कै. ना. रा. भावे यांना आम्ही सगळे लहानथोरांपासून ‘आबा’ म्हणायचो ! त्यांचे घर हे आमच्या घरासमोरच ! त्यांच्या पत्नी या सर्वांना अक्का म्हणून परिचित ! त्यावेळी त्यांना, म्हणजे आबांना, पुणे आकाशवाणी केंद्रावरून ‘किर्तनाचे’ बोलावणे येई. ते जात त्यासाठी ! तिकडून आल्यावर मग त्यांचे किर्तन रेडिओवर कधी लागणार, हे सांगायचे ! त्या दिवशी मग रेडिओवर त्यांचे किर्तन ऐकायचे. त्यांच्याकडे तो व्हाल्व्हचा रेडिओ होता. तो तापायला वेळ लागायचा. त्यामुळे त्यावेळेच्या अगोदरच तो लावावा लागे. किर्तनातले आम्हाला काही समजण्याच्या वयाचे आम्ही नव्हतोच, मराठी शाळेतले आम्ही.
आबांकडे बहुतेक दर गुरूवारी भजन असायचे. या निमित्ताने गांवातील संगीतात रूची असणारी आणि धार्मिक अशी निवडक मंडळी जमायची त्यांच्याकडे ! मग जिल्हा सहकारी बॅंकेतील गोरेपान श्री. पाटील हे तबल्याला असायचे. कै. कान्हा महाराज हे आपली भलीमोठी बासरी घेवून यायचे. हातात कापडी नळकांड्यात मोठी बासरी, पांढरा स्वच्छ पायजमा व सदरा आणि खांद्यावर स्वच्छ छोटा रुमाल टाकून यायचे. आम्ही बाजारातील वित-दिडवितीची बासरीच बघीतलेली असायची, तेव्हा ही भली मोठी बासरी ऐकण्यापेक्षा देखील पहाणे पण मोठे कुतुहलाचेच असे. तिथं तबल्यासाठी श्री. बालाजीवाले सर यायचे. माझ्या आईला पण स्वाभाविकपणे बोलावणे असायचे. मी जायचो आईबरोबर ! तिथं यांची पहिली ओळख झाली. बऱ्याच वेळा आईला घरी अगोदरच जावे लागे, कामे करायची असायची. मला तिथं थांबायचं असायचं ! तबल्यावर बोटे फिरवल्यावर वेगवेगळे, कानाला आवडणारे आवाज येतात आणि त्या लाकडी नळीत फूंकल्यावर, छिद्रांवर बोटांची उघडझाप करून अगदी आपल्याला गाणं म्हटल्यासारखे वाटते, हे माझ्या आकलनाच्या पलिकडचे ! सर्व आटोपल्यावर मग या ओट्यावरून समोरच्या ओट्यावर मी आलो की घरांत प्रवेश !
माझी तबल्यातील रूची बघून आईने मला बहुधा सातवीत बालाजीवाले सरांकडे तबला शिकायला पाठवले. माझी शाळा सकाळी तर त्यांची दुपारी ! या सगळ्या सव्यापसव्यातून काही शिकायला मिळावे ही इच्छा ! मला बहुतेक ताल वाजवतां येवू लागले. गाण्याबरोबर ठेका धरतां येवू लागला. मात्र त्यावेळी मी फारसा रमलो नाही. शाळेचा अभ्यास, दिवसभराच्या उनाडक्या आणि मग एकदम दहावीच आली !
दहावीला आम्ही आल्यावर, मग आम्हाला तत्कालीन नावाजलेली शिक्षक मंडळी शिकवायला आली. त्यांत दीक्षित सर, वाणी सर, एस् एस् पाटील सर, बोरोले सर, जोशी सर, पुराणिक सर, वानखेडे सर, पितळे बाई हे होते ! मराठीला आम्हाला बालाजीवाले सर आले. राखाडी किंवा काळ्या रंगाची पॅंट आणि अर्ध्या बाह्यांचा शर्ट ! डोळ्याला वाचायच्या वेळी लागणारा काळ्या फ्रेमचा चष्मा ! नोकरीला लागल्यानंतर बालाजीवाले सरांनी ‘एम् ए’ केलं !
वर्गावर सर शिकवायला आले, की सरांचे शिकवण्यातील अत्यंत प्रभावी असायचे, ते त्या धड्याचे वाचन ! एकदा त्यांनी धडा वाचून दाखवला, की त्यात फारसे शिकवायचे काही राहिले आहे, असे आम्हास वाटत नसे. पाठ्यपुस्तकातील नाट्यउतारा वाचावा, तर बालाजीवाले सरांनीच ! त्यांच्यातील उपजत नाट्यकलावंताची ती तडफड असावी !
आम्हाला पाठ्यक्रमांत कै. वसंत कानेटकर यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील उतारा होता. कै. वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकातील उतारा होता ! शिक्षक शिकवतांना विद्यार्थ्यांना नेहमी सांगतात, ‘पुस्तकात पहा’ ! मात्र हे सर तसे कधी सांगत नसत आणि सांगीतले, तरी आम्ही विद्यार्थी त्यांचे बऱ्याच वेळी ऐकत नसू ! आम्हाला तोपर्यंत त्यांच्या शिकवण्याची कल्पना आली होती. सर शिकवत असतांना पुस्तकात पाहून जे काही, आणि जेवढे समजते त्यापेक्षा सरांकडे ते वाचत असतांना बघीतलं तर जास्त समजतं, त्यामुळे शिकवतांना, सर वाचत असले, तरी आमचे लक्ष पुस्तकांत कधीच नसे. त्यांच्याकडे असे. याची त्यांना पण कल्पना असायची.
त्यांनी आम्हाला शिकवलेली कवि कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांची ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कविता ! कविच्या मनांत काय आहे हे यांना कसे काय समजते, हा प्रश्न जर कोणाला पडला असेल तर ते जाणून घेण्यासाठी त्याने बालाजीवाले सरांना अवश्य भेटावे. बरोबर उत्तर मिळेल व समस्या सुटेल. मला आजही त्यांनी 'पृथ्वीचे प्रेमगीत' ही कविता शिकविण्याची केलेली सुरूवात आठवते, मंदारमाला या वृत्तातील ही कविता -
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना ।
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करावी प्रीतिची याचना ।
त्यांनी त्यावेळी कविता वाचनांस असा काही स्वर लावला की त्या स्वराच्या सामर्थ्याने वर्गात एकदम शांतता पसरली आणि वातावरण गंभीर झाले. सर शिकवत होते, पुढीलपुढील ओळी ऐकू येत होत्या, त्या कानाला का मनाला का ह्रदयाला हे मात्र समजत नव्हते. आमचे चेहरे हिरमुसले होते. सरांचा स्वर लागला तो करूण होता का विरही होता का निर्धाराचा होता हे आजही नक्की सांगता येणार नाही, इतक्या संमिश्र भावना त्यांत होत्या. त्या स्वरांत ते वाचत होते -
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे ।
काय भव्य कल्पना ! आम्हाला आम्ही अंतराळात फिरत आहोत आणि तेथे हे संवाद ऐकत आहोत असे वाटत होते. शेवटी -
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलीकण ।
अलंकारण्याला परि पाय तुझे
धुलीचेच आहे मला भूषण ।
सर कविता वाचून खुर्चीवर बसले, आता कवितेत विद्यार्थ्यांना समजाविण्यासारखे काहीच राहिले नव्हते, कविता पूर्ण समजली होती: असे म्हणण्यापेक्षा कवितेचे पूर्ण आकलन झाले होते. आणि मला उगीचच भास झाला की आमचे ढोळे पाणावले का आमच्या वर्गाच्या भिंतीतून हुंदक्याचा स्वर आला !
थोड्या ओळींमधे काय आणि केवढा आशय दडलेला आहे, हे दाखवावे तर सरांनीच ! सर कोऱ्या कागदावरील त्या लिहीलेल्या काव्यरूपी शब्दांत कोणता आशय दडलेला आहे, हे ज्यावेळी एकेक उदाहरणे देवून सांगत त्यावेळी पांढऱ्या शुभ्र कागदावर आपल्या नादात चितारत असलेला चित्रकार डोळ्यांसमोर उभा रहातो.
तात्यासाहेब शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ यांतील आम्हाला अभ्यासक्रमाला असलेला उतारा वाचतांना, तात्यासाहेबांना दिसणारा वृद्ध नटसम्राट यांनी पण बघीतला असावा, ही खात्री पटायची ! ‘कुणीही कुणाचं नसतं’ यांतील भाव हे ऐकण्यासारखा !
त्यांनी वाचलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’ म्हणा का ‘नटसम्राट’ या नाटकातील उताऱ्यांचे वाचन म्हणा, त्यातील वाक्ये आणि ते वाचतांना, सरांचे भाव, आवाजातील चढउतार, वाचतांना लागलेला किंवा लावलेला स्वर, त्यांचे वाक्यांनंतर किंवा एखाद्या शब्दावर थांबणे, एखाद्या शब्दावर जोर देणे किंवा एखादा शब्द निसटता तसाच सोडून देणे ! ही वाचण्यातील विविध सामर्थ्यस्थळे माझ्या अजून डोळ्यांसमोर आहेत आणि त्यांचे स्वर कानांत आहे. सरांचे ठेक्यांत सुरू असलेले धड्याचे तालबद्ध वाचन, हे आपल्याला एखाद्या रंगलेल्या संगीत सभेतील, गाण्यात तल्लीन झालेला व भान हरपून गात असलेला, गायक आपल्या ख्यालगायकीने त्या रागातील भाव आपल्या स्वराने व त्यांच्या रचनेने श्रोत्यांना उलगडून दाखवत असल्याप्रमाणे असे ! त्यांचे नाट्यवाचन म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीतसभाच !
‘अश्रूंची झाली फुले’ मधील बाईचे पारिजातकाची फुले देतांनाचे लाल्याला उद्देशून वाक्य, ‘या फुलांसारखा हो’ ! ती फुले जपून ठेवणारा इन्सपेक्टर लाल्या ! मग त्या विमानतळावरील प्रवेशातील सांगीतलेले वाक्य, लाल्याची ‘सर, हात पुढे करा’ हे विद्यानंदांना म्हणतानांची अगतिक कर्तव्यकठोरता सर आपल्या शब्दांतून जशी ऐकवता न ऐकवतात आणि आपल्याला दु:खी करतात, तोच पुढचे वाक्य आपल्या कानावर आदळून ह्रदयावर आघात करायचे ! ‘पाहू दे त्या विद्यानंदाच्या शिष्याची हिंमत’ हे विद्यानंदाचे वाक्य ! या चार-पाच शब्दांच्या वाक्यांत काय नसायचे ? जीवनांत जबरदस्तीने त्याच्या इच्छेविरूद्ध चुकीच्या रस्त्याला लागलेल्या, एका आदर्श जपणाऱ्या सज्जन शिक्षकाची होणारी तगमग, त्याचबरोबर जुन्या वैभवाच्या खुणा दाखवत असलेली, स्मारके म्हणून मिरवता येतील असे हे विद्यार्थी ! आपण पराभूत होतोय, पण आपले शिकवलेले, आपल्या विद्यार्थ्याला दिलेले ज्ञान पराभूत झाले नाही, ही ‘शिष्यात इच्छेत पराजयम्’ या वचनाची चालत अालेली आणि पुढच्या पिढीत आलेली संस्कृती ! आपण शिक्षक म्हणून केलेल्या कामाची इतिकर्तव्यता समोर दिसत असतांना, कोणत्या शिक्षकांस वाटणार नाही, की इथं आपलं आयुष्य संपले तरी चालेल ?
बऱ्याच दिवसांत सरांची भेट नाही. काल रात्री आकाशवाणीवर संगीतसभेतील शास्त्रीय गायन ऐकत होतो. त्यांत भूप आणि मालकंस नंतर, परज कलिंगडा गायला आणि कै. आबा उपाख्य भावे सरांची आठवण झाली ! बालाजीवाले सर लख्ख डोळ्यांपुढे आले. सकाळी उठलो, तर डोक्यातही तेच ! मनांतून आलेले लिहीले, बस !

24.2.2019
छत्रपती शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची बोटे लालमहालात रात्रीच्या वेळी कापून, ताबडतोब पुण्यातून स्वराज्यावरील संकटाचा वेढा उठवला होता.
नरवीर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी शत्रूच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापून आणले होते. त्यावेळी शत्रूची पाचावर धारण बसली होती.
लढाई फक्त समोरासमोर खेळली जात नाही. जय किंवा पराजय हे समोरासमोरच्या लढाईतच ठरतात असे नाही. या आपल्या पूर्वजांच्या न खेळलेल्या पण विजयी लढाया आणि त्यातले तंत्र परकीय शिकून आत्मसात करतात आणि त्याप्रमाणे वागतात. आम्ही फक्त आमच्या शूरवीरांचा आणि कणखर राज्यकर्त्यांचा, या ना त्या कारणाने, महाभारतातील मद्रराज शल्याप्रमाणे आपल्याच सेनापतीचा तेजोभंग करून ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’ करत समोर मिळणाऱ्या विजयरूपी सुग्रास भोजनांत माती कालवतो.

24.2.2019

अ - आ आणि उ = अभिमान, आनंद आणि उन्माद !

अ - आ आणि उ = अभिमान, आनंद आणि उन्माद !
नुकताच पुलवामा येथे भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलावर, आपला शेजारी पाकिस्तानने ‘जैश-ए-महम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या मार्फत, निर्घृण हल्ला केला. आपले कित्येक पोलीस त्यांत मृत्युमुखी पडले. काही जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी उघडपणे ‘जैश-ए-महम्मद’ने घेतली. या आणि अशा कित्येक दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांचे आश्रयस्थान पाकिस्तान आहे, हे जगातील उघड गुपीत आहे.
आजपावेतोचा अनुभव जमेस धरला तर, पाकिस्तान कायमच, आपल्या भारताची शांतता, आपल्यावर वेळोवेळी हल्ले करून, आक्रमण करून, लूटमार करून, नागरिकांवर व निरपराध माणसांवर अत्याचार करून धोक्यात आणण्याचे काम केवळ त्याच्या जन्मापासूनच करत नाही; तर या विचाराची मंडळी ही पाकिस्तानच्या जन्मापूर्वीपासून करत आहे. त्यातील सर्वच पाकिस्तानांत आहेत असे नाही, तर काही त्यांची समर्थक मंडळी, ही आज पण, आपल्या भारतात सुखेनैव नांदून, आपल्याला त्रास देण्याचे कार्य करीत आहे. काही तर मोक्याच्या ठिकाणी आहेत. हा काळ कधीपासून मोजायचा, तर तो तुम्ही कितीही मागे नेवू शकता, थेट या विचारांच्या व धर्माच्या लोकांची आक्रमणे भारतावर सुरू झाली तोपावेतो !
विविध काळात झालेली विविध क्रूर आक्रमकांनी आणि त्यांच्या आक्रमणांनी आपल्या संस्कृतीवर, समाजजीवनावर कठोर आघात केले. त्यातून आपला एकेक भाग आपल्यापासून अलग होत होत, शेवटी आजचा भारत सध्या शिल्लक आहे. आपल्याला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यासर्वांचीच एक विभागणी झाली. मुस्लीमबहुल भाग हा पाकिस्तान म्हणून अस्तित्वात आला; तर राहिलेला खंडीत भाग हा भारत म्हणून शिल्लक राहीला. बरीच संस्थानिक पण होती, पण हा प्रश्न खंबीरपणे बहुतांशी सोडवला गेला. घोळ सध्या आहे, तो काश्मिरचा ! यांची कारणमिमांसा हा इथं विषय नाही. सध्या यांत पण काश्मिरचा काही भाग पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यात आहे. एक मात्र नक्की, की आपल्याला जास्त उपद्रव दिला व आपल्यावर जास्त आक्रमणे, ही मुस्लीमांनी केलेली आहेत. त्यामुळे येथील आपणा कोणाच्याही मनांत मुस्लीमांबद्दल, आक्रमक व हल्लेखोर अशी विशिष्ट भावना तयार होणे, हा आजपावेतोच्या पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाचा भाग आहे, त्यांत लपविण्यासारखे अथवा कोणालाही गैर वाटण्यासारखे काहीही नाही, कारण हा इतिहास आहे. त्यापासून कोणी पळ काढू नये, ते स्वत:लाच फसविण्यासारखे ठरेल.
अपेक्षा होती आणि अजूनही आहे, की १९४७ ला जी धर्माच्या आधारावर जी फाळणी झाली किंवा स्विकारली गेली किंवा करावी लागली, त्यावेळी भारताने स्वातंत्र्य मिळवले ते हिंदुबहुल प्रदेशाचे, कारण तुकडे होता होता, हा एवढाच प्रदेश शिल्लक होता. त्यातून मुस्लीमबहुल प्रदेश वेगळे राष्ट्र म्हणून निर्माण झाले होते. ज्यांना कोणास तिकडे जायचे असेल किंवा इकडे यायचे असेल त्यांना मुभा होती. आपल्या संस्कृतीच्या चांगुलपणावर, निरूपद्रवीपणावर, भित्रेपणावर, मूर्खपणावर, आदर्शवादीपणावर विश्वास असल्याने म्हणा किंवा ‘आम्ही इथले जेते आहोत’ या भावनेमुळे म्हणा किंवा या भागाला आपली भूमी मानून, बरीच मुस्लीम मंडळी इथं थांबली. इथं थांबल्याने त्यांचे काही नुकसान झाले, असे म्हणता येत नाही, कारण त्यांचे येथील लोकसंख्येतील प्रमाण वाढलेले आहे. भारतीय राज्यघटनेने ‘सर्व भारतीय समान’ हे तत्व स्विकारल्यामुळे, ते योग्य पण आहे, विविध महत्त्वाच्या पदांवर मुस्लीम मंडळी पोहोचली. त्यांनी ती पदे सांभाळली आणि काहींनी भूषविली, तसेच काहींनी दुरूपयोग पण केला.
या सर्व गदारोळात, या बऱ्याच सव्यापसवव्याचा आणि विविध भल्याबुऱ्या अनुभवांतर, येथील मूळ संस्कृती आपली मानणाऱ्या, सर्वसामान्य माणसाची अपेक्षा ही होती, की ज्याप्रमाणे भारतात मुस्लीमांना वेगळे न मानता, भारतीय म्हणून सामावून घेतले, त्याचप्रमाणे पूर्वीच्या या हिंदुस्तानातील भागाने, म्हणजे नंतर झालेल्या पाकिस्तानने पण हिंदुंना सामावून घ्यावे. ही अपेक्षा अवाजवी अथवा गैर किंवा बेकायदेशीर म्हणता येणार नाही. मात्र अनुभव जो आला आणि प्रत्यक्षात परिणाम जे दिसत आहेत, ते म्हणजे पाकिस्तानातील किंवा नंतर झालेल्या बांगला देशातील हिंदुंच्या लोकसंख्येचे प्रमाण कमालीचे घटले आणि दिवसेंदिवस घटत आहे. हा परिणाम सर्वांना तिथं समान वागणूक नाही, तर तेथील हिंदुंचे पद्धतशीरपणे, जुलूमजबरदस्तीने खच्चीकरण करून, नायनाट केला जात आहे, हे स्पष्ट करणारा आहे. यासाठी अवास्तव पुराव्याची आवश्यकता नाही. हा सल येथील, हिंदुधर्मबांधवांना किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून वाटला, किंवा आजच्या परिचित भाषेत बोलावयाचे झाले, तर मानवाधिकारानुसार वाटला, तर त्यांत वावगे काय ? अपेक्षा तर आहे, येथील मुस्लीमांना पण वाटावयास हवा. क्षणभर समजू या, की परक्या देशांच्या वर्तनांत वा धोरणांत आपण लक्ष घालणे बरोबर नाही. त्यांनी त्या देशात रहायचे ठरवले, मग त्या मागे कोणतेही कारण असो, त्याचे भलेबुरे परिणाम हे त्यांनी भोगावयास तयार असावयास हवे. इथपर्यंत ठीक आहे.
भारतीय राज्यघटनेप्रमाणे अपेक्षा ही आहे, की सर्व भारतीय समान आहेत, कोणीही परका नाही आणि तसे मानणे किंवा दाखवणे पण बरोबर नाही. असे जर कोणी वागत असेल, असे वागण्याला प्रोत्साहन देत असेल, मग ते प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, ते होकारार्थी असो किंवा नकारार्थी, ती कृती मदतीची असो किंवा विरोधाची, तर ती कृती व वर्तन हे स्पष्टपणे घटनाबाह्य आहे. मात्र हा आदर्श नेहमी बोलायला किंवा पुस्तकांत शोभून दिसतो, प्रत्यक्ष आचरणांत आणणे हे सोपे नाही. त्यामुळे स्वार्थ व हितसंबंध धोक्यात येतात, आपल्याला नुकसान होवू शकते. त्यातून मग घटनाबाह्य कृतींकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करणे सुरू होते. कोणी लक्षात जरी आणून दिले, तरी त्याप्रमाणे वर्तन टाळता कसे येईल याकडेच आपला कल रहातो; परिणामी घटनेप्रमाणे वर्तन होईल, हा सर्वसामान्यांचा विश्वास उडतो. त्यांत आपल्या लोभापायी व आसुरी महत्वाकांक्षेपायी त्याला थांबविण्यास कोणी तयार होत नाही. जो थांबविण्याचा प्रयत्न करेल, त्याला संपविले जाते, हे लक्षात आल्यावर, त्या फंदात फारसे कोणी पडत नाही आणि ही घटनाविरोधी मंडळी मजबूत होत जातात. यांवर उपाय करण्याचे म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम, हे सरकारने करावे, हे अपेक्षित असते. ते करत नाही, कारण त्यांना पुन:पुन: सत्ता हवी असते, त्यासाठी निवडून यावे लागते. या गुंडगिरीला हाताशी ठेवले, तर निवडून येणे तुलनेने सोपे जाते. मात्र हे जास्त काळ सहन करण्यासारखे नसल्याने याविरूद्ध व्यक्त होण्याचा मार्ग स्विकारला जातो, तो निवडणुकांचा ! यांतून सरकार बदलविता येते.
कोणाला सापत्नभावाची वागणूक मिळते, तर कोणाला लाडाकोडाची; यांतूनच मग संघर्ष सुरू होतो. स्वातंत्र्यापासून निवडून येण्यासाठी जी गणिते मांडली जातात, त्यांत मुस्लीम समाज परिणाम करणारा घटक आहे. त्याला गोंजारणे आले, हेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या कटू आठवणींच्या पार्श्वभूमीवर इतरांना सहन करणे सोपे नसते, मनांत सल रहातो. हा सल कायम राहील असे वर्तन टाळण्याऐवजी, जर त्यांत वाढ झाली तर समाजांत तेढ निर्माण होते; हेच काम आजपावेतो बहुतेक सरकारे करीत आलेली आहे.
आपल्या समाजातील कोणत्याही गटाची, ‘आपण काहीही केले, तरी आपले कोणीही, काही वाकडे करू शकणार नाही’ किंवा ‘आपल्यावर कितीही अन्याय झाला, तरी आपला कोणीही वाली नाही’ अशी भावना होणे अत्यंत वाईट ! असे झाले की ‘लाडक्यांत’ आडमुठेपणा येतो, पूर्वीचाच असेल तर तो अजून वाढतो आणि हा त्यांचा ‘घटनादत्त अधिकार’ आहे हा समज होतो. त्याला प्रतिबंध केला जात नाही, मग ‘आपलेच बरोबर’ ही भावना होते. ही भावना झाली, की लाडक्यांना ‘उन्माद’ होतो, परिणामी नावडत्यांचा रोष वाढतो.
नावडत्यांनी हे लाडक्यांचे अन्याय्य वागणे सहन करावे, म्हणून त्यांना चुचकारलं जातं, समजवले जाते. ‘काही काळ सहन करा, नंतर पाहू.’ ते ऐकतात, पण ती नंतरची वेळ कधीच येत नाही. ‘हे कुठं तरी संपवले पाहीजे’ या भावनेतून एकत्र आपोआप येतात, हक्कांच्या रक्षणासाठी ! मग त्यांना आठवण येते, ती त्यांच्या स्फूर्तीदेवतांची ! मग ते प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, दुर्गाभवानी असेल, भगवान शंकर असतील, विद्येची देवता सरस्वती वा गणपती असतील ! अगदी महाराणा प्रताप असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील ! संत ज्ञानेश्वर असतील, संत रामदास असतील, संत चोखा मेळा, संत सावता माळी, संत सेना महाराज, संत नामदेव, गुरू नानकदेव, संत कबीर, संत मीराबाई कोणीही असतील ! अगदी अलिकडचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र, पं. नेहरू, वल्लभभाई पटेल असतील ! वासुदेव बळवंत फडके, सरदार भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस कोणीही असतील ! यांना विरोध मग सहन होत नाही, ‘कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असला तरी’ !
मग पुढचा टप्पा येतो, तो या देशाची श्रद्धास्थाने कोणती आहे, याचा ! या मातीत जी जन्माला आली, इथल्या संस्कृतीला ज्यांनी आपले मानले, त्यांच्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, अगदी सोपी आणि स्वाभाविक आणि याला जाणीवपूर्वक धक्का लावला, तर त्याबद्दल काय ?
हे सगळं आदर्शाप्रमाणे, अगदी कोणाच्याही आदर्शाप्रमाणे, प्रत्यक्षात शक्य नसल्याने प्रश्न निर्माण होतात आणि नाईलाजाने ते वैयक्तिकरित्या, समाजाला वा राज्यकर्त्यांना सोडवावे लागतात, समाज स्वास्थ्यासाठी, समाजसुरक्षेसाठी आणि समाजव्यवस्था नीट टिकून रहावी यासाठी ! मग त्यांत या कोणाच्याही भावनांना अर्थ रहात नाही.
मात्र येथील संस्कृतीला, जीवनपद्धतीला आणि येथील माणसांना आपले समजून आपले स्वत:चे आचरण ठेवले, मग तुमची उपासनापद्धती कोणतीही असो, तर ते नक्कीच अभिमानास्पद आहे. असे अभिमानास्पद वर्तन जर आपले नित्याचरण समजत असेल, तर खरंच हा आनंदाचा भाग आहे. मात्र हे असे न करता, त्याच्या विपरीत वर्तन करणे, आणि त्याचे जाहीर प्रदर्शन करणे हा उन्मादाचा भाग आहे. अभिमान आणि आनंद हे शब्द चांगली भावना, कृती, वर्तन दर्शवितात, तर उन्माद हा शब्द वाईट भावना, कृती व वर्तन दर्शविते. समाजाला, देशाला मदत करणाऱ्या बाबी या चांगल्या आणि नुकसान पोहोचविणाऱ्या बाबी या वाईट, याबद्दल कोणाचे दुमत असणार नाही.
भारताच्या विजयांत ज्यांना आनंद दिसतो आणि तो जर त्यांनी व्यक्त केला, तर त्यात उन्मादाचा प्रश्न कुठं येतो. भारताचा विजय खरोखरच झाला आहे किंवा नाही, सरकारतर्फे जे सांगण्यात येते, त्यांवर आपण विश्वास न ठेवता, संशय व्यक्त करतो; इतकेच नाही तर ते स्पष्टपणे नाकारत खोटे आहे म्हणून सांगतो. त्यावेळी दोन बाबींची शक्यता असते, ती म्हणजे सरकारच्यातर्फे काहीही सांगीतले गेले, तर सरकार हे आपल्या विचाराचे किंवा पक्षाचे नसल्याने, त्याला विरोध करणे आवश्यक असते, अन्यथा जनतेत याचा त्यादृष्टीने चुकीचा संदेश जाईल, तो आपल्या पक्षाच्या विरूद्ध जाईल. दुसरी बाब म्हणजे, आपल्या पक्षाचे वर्तन आणि धोरण, हे जर या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे झालेल्या परिणामांच्या विरूद्ध असेल, तर मग याला कोणत्याही पद्धतीने विरोध करणे आवश्यक होवून बसते. आपण या विरोध करण्याच्या भूमिकेत, इतके वहावत जातो की आपल्या सेनेने दिलेली माहिती पण आपण खोटी आहे, असे सांगत त्यांवर अविश्वास दाखवतो. हे वर्तन आपल्या सेनेच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करणारे असल्याने, सेनेला कमकुवत करणारे आहे, पर्यायाने देशविघातक कृती आहे आणि म्हणून उन्मादाची कृती आहे.

3.3.2019

ओंकारेश्वर

आपण एकटं असलं, प्रवासात असलं किंवा असंच काही कुठं पण जरा निवांत असलं, डोक्यात नेहेमीच्या कामाचा विषय नसला, की कसल्या कसल्या आठवणी मनांत येतात नाही ? काही चांगल्या असतात, काही वाईट असतात, तर काही नुसत्याच घटना असतात. आपल्यावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम झालेला नसतो, पण आठवतात आपल्याला ! या आठवणी असतात, त्या मागील घटना आपल्याला, काही ना काही शिकवून गेलेल्या असतात, त्याच्या असतात. मनाचा वेग कोणाला मोजता आलाय ?
शाळेला कशाचीही सुटी असली, की आम्हाला आनंद व्हायचा. ‘महाशिवरात्र’ हा पण सुटीचा दिवस ! त्या दिवशी आमच्या गल्लीतील आणि वर्गातील मुलांचा, कार्यक्रम बहुतेक ठरलेला असायचा, तो म्हणजे आमच्या गावांपासून साधारण चार-पाच किलोमीटरवर असलेल्या छोट्या ओंकारेश्वरला जाण्याचा ! हं, अजून एक सांगायचं म्हणजे, आमच्या गांवापासून नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेले मध्यप्रदेशातील ‘ओंकार ममलेश्वर’ या नांवाने प्रसिद्ध असलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, असे ओंकारेशवर आहे. ते पण तसे जवळ म्हणजे शंभरेक किलोमीटरवर आहे. मध्यप्रदेश जवळ असल्याने तिकडे नातेगोते, व्यापारउदीम, येणेजाणे बरेच असते. त्यामुळे गांवाजवळच्या ओंकारेश्वरला जातांना आमच्या गांवात सांगणारा सहज सांगतो, ‘छोट्या ओंकारेश्वरला चाललोय !’ नदीच्या काठावर असलेले, हे अत्यंत जुने दगडातील महादेवाचे मंदीर ! मोठ्या ओंकारेश्वरला इतक्या सहजी जाणे व्हायचे नाही.
इथं जायचे म्हणजे घरून सक्काळी निघायचे, उत्तरेला गांवाच्या बाहेरच्या बाजूला ‘स्वस्तिक टाॅकीज’ लागायची. थोडं पुढील उतारावरून गेले, की मग दोन रस्ते लागायचे. डावीकडील रस्ता हा नवा, म्हणजे चांगला डांबरी रोड ‘बुरहानपुर अंकलेश्वर महामार्ग’ आणि उजवीकडील मार्ग हा जुना, कच्चा रस्ता ! त्याला ‘तामसवाडी रोड’ म्हणायचे, पुढे तामसवाडी खेड्याकडे जायचा हा रस्ता. तिकडे ओंकारेश्वरला जातांना बहुतेक उजवीकडून, जुन्या रस्त्याने जायचे. जुना रस्त्याने जरा जवळ पडायचे. सोबत रोजचे कपडे घेतलेले असायचे. जातांना इकडील दोन्हीबाजूंना असलेली पिवळसर मुरमाड जमीन दिसायची, शेतात पीके असायची. शेतात पाण्याची व्यवस्था असेल तर मात्र हिरवीगार केळीची बाग ऐटीत असायची. केळीचे वजनदार घड तोलत, केळीचे खोड उभे असायचे, क्वचित त्याला बांबूचा आधार पण दिला असायचा. साधारणपणे मध्यावर आले की रस्त्या उजव्या बाजूला साधारण पन्नासेक फुटांवर बेटासारखा भाग तयार झाला होता. तिथं एक वडाचे झाड लागायचे. सर्वबाजूने मोठा गड्डा आणि मध्यभागी असलेल्या छोट्या नेमक्या भागांत हे झाड होते, भारदस्तपणे आपल्या पारंब्यांसहीत ! हे झाड दिसलं, की मग निम्मे अंतर झालं, ही कल्पना यायची. मग पुढे मुरूमाच्या खदानी लागायच्या ! तसं तर या भागातील बहुतेक जमीन ही मुरमाड ! मग इकडेतिकडे पहातपहात चालताचालता, दिसायचे ते एकदम नदीचे पात्र ! वळणदार पात्रातील वाळू आणि उपसत असलेले ट्रॅक्टर ! कित्येक वेळा गाढवेसुद्धा दिसत, कारण विटावाळू वगैरे वाहून आणण्यासाठी गाढवांचा आणि बैलगाडीचा उपयोग सर्रास केला जायचा. ट्रॅक्टर्स इतके नसायचे. नदीचे पात्र दिसले, की पायांची गती आपोआप वाढायची ! ओंकारेश्वर आले असायचे.
नदीच्या पात्रात उतरून थेट पुढे जायचे, तिकडे धबधब्याकडे जातांना नदीच्या पात्रातून जावे लागे. जातांना आपल्या पायाला होत असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्याच्या ओहोळाचा आणि वाळूचा आळीपाळीने होणारा थंडगार, कुरकुरीत स्पर्श ! पात्रातील खडकांवरून उड्या मारत, ढांगा टाकत जात असायचो. नंतर विलक्षण, संथ आवाज ऐकू यायचा आणि मग एकदम दिसायचा तो नदीच्या वरच्या भागावर असलेला छोटा धबधबा ! आम्हा सर्वांना तिथं आंघोळ करायची असायची, कारण स्नान करूनच महादेवाचे दर्शन घ्यायचे ! तिथं पाणी बऱ्यापैकी असायचं ! मनसोक्त डुंबल्यावर, बाहेर येवून अंग पुसून ओले कपडे पिळून, तिथल्याच कातीव दगडांवर वाळत घालायचे. मग सोबत आणलेले कपडे घालायचे. काही अजूनही डुंबत असायचे, त्यांना कसेतरी हायहुय करत बाहेर काढून सर्व तयार व्हायचे आणि ओल्या डोक्या, अंगानेच मंदीराकडे चालू लागायचे.
महादेवाच्या मंदीराजवळ बाहेर, आसपासच्या गांवातील काहींनी महाशिवरात्र असल्याने आपली छोटीछोटी दुकाने लावलेली असायची. कित्येक तर रस्त्यातच वस्तू घेवून बसलेले असायचे. बहुतेक दुकाने ही फुलांची, बेलाची, पूजेच्या साहित्याचीच असायची ! एखादा हाॅटेलवाला पण असायचा साबूदाण्याची खिचडी, पेढे, वेफर्स घेवून ! आम्हाला काही घ्यायचे नसायचे व खायचे पण नसायचे, त्यामुळे मंदीरात सरळ दर्शनाला !
महाशिवरात्र असल्याने तिथं गर्दी बऱ्यापैकी असायची, रांगेत उभे रहावे लागायचे काही वेळा ! ‘शंभोऽऽऽ हर हर शंभो’ कोणी म्हणायचे, तर कोणी ‘कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणिंद्रमाथा भृकुटी झळाळी’ म्हणायचं ! सभामंडपात काही भावीक निवांतपणे महादेवाच्या गाभाऱ्याकडे पहात हात जोडून बसलेले असायचे, डोळ्यांत त्यांना होत असलेल्या समस्यांच्या वेदनांचे पाणी घेवून ! नवीन जोडपी नक्की दिसायची, गांवापासून दर्शनाच्या निमित्ताने दूर, निसर्गात यायला मिळायचे. नुकतीच चालायला शिकलेली आणि शिकत असलेली लहानमुले सभामंडपात दोन्ही हात फैलावून, तोंडाचा ‘आऽऽ आऽऽ’ करत, आपल्या आईला आपले कर्तृत्व दाखवत असायची.
सभामंडपातील भल्यामोठ्या दगडी नंदीचे दर्शन घेवून, समोरच असलेल्या गाभाऱ्यात उतरायचे ! दगडी मजबूत उंबरा ओलांडून गाभाऱ्यात आले, की महादेवाच्या पिंडीवर अभिषेक सुरू असलेला दिसायचा. पुष्पदंताचे शिखरिणी वृत्तातील, काळजाला हात घालणारे, ‘महिम्न’ तालात ऐकू यायचं ! काही वेळा महादेवावर नवीन जोडपं अभिषेक करत असायचं ! महादेवाच्या पूजेत तल्लीन होवून पार्वतीमय रूपात गेलेली, त्या जोडप्यातील पार्वती हात जोडून बसलेली असायची. तिच्या महादेवाच्या हाताला हात लावत, या दगडाच्या महादेवाची पूजा करत असायची. मग आमचा हा मंदीरातील भोळा महादेव, केवळ पाण्याच्या अभिषेकाने आणि त्यांनी वाहिलेल्या बेलाच्या पानाने प्रसन्न होत, त्यांच्या पोटी पुढील वर्षी वंशाचा दिवा द्यायचा ! असं नंतर ऐकू यायचं !
तिथं लगतच महादेवांच्या दोन्ही मुलांची मंदीरे ! बुद्धीची देवता भगवान गणेश आणि कार्तिकस्वामी ! गणपतीचे दर्शन तर सर्वांनाच घेता यायचं, मात्र त्याचा बंधूचे, कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यायला महिलांना परवानगी नसायची ! महिला बिचाऱ्या या कधीही न बघीतलेल्या कार्तिकस्वामीने, महिलांवर घातलेले हे प्रतिबंध आपल्या पतीचे काही वाईट व्हायला नको, या भावनेने निमूटपणे पाळत असत. परमेश्वराच्या दर्शनापेक्षा आपले, आपल्या जिवसख्याचे अहित व्हायला नको, ही माणसाची भावना किती प्रबळ असते नाही ? परक्या जीवांबद्दल ही भावना जपावी, तर आमच्या माताभगिनींनीच ! मग आम्हीच पोरंसोरं आणि माणसं, खाली त्या छोट्याशा गाभीऱ्यात जावून दर्शन घ्यायचो आणि कार्तिकस्वामीला पाठ न दाखवता, उलट्याने पायऱ्या चढत वर यायचो.
मागच्या बाजूला असलेले पाण्याचे दोन कुंड ! एक मोठे आणि दुसरे छोटे ! गोमुखातून सतत वहात असणारे पाणी छोट्या कुंडात पडत असायचे, वहातवहात नदीच्या पात्राला जावून मिळायचे. वरच्या बाजूला एका साधूची छोटी समाधी ! तिथं बाजूलाच थोड्या अंतरावर रस्त्याला लागून, मंदीराच्या मागच्या भागाला, एक पायविहीरीसारखे कुंड अाहे. प्रभू रामचंद्र या वाटेने गेले, त्यांना तहान लागल्यानंतर त्यांनी बाण मारून इथं जमिनीतून पाणी वर आणले, अशी समजूत !
आणि हो, महादेवाच्या मंदीरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला छोट्या टेकडीवर काही पायऱ्या चढून गेल्यावर प्रभू रामचंद्रांचे मंदीर आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पांढऱ्याशुभ्र संगमरवरी मूर्ती ! समोर हात जोडून असलेला महाप्रतापी रूद्राचा अवतार असलेला, हनुमान ! ‘मनोजवं मारुततुल्यवेगं — म्हणत, मारूतीला नमस्कार करायचा. इथं राम मंदीरात मी यायचोच, कारण माझी आजी ! तिने कधीतरी सांगीतलेले -
‘ओंकारेश्वरला गेला की फक्त महादेवाचेच दर्शन घेवू नको, तर रामाच्या मंदीरात पण जावून दर्शन घे ! तुझ्या आजोबांनी मोठा कार्यक्रम केला होता, जिर्णोध्दाराच्या वेळी ! मी बसली होती पूजेला सोबत !’ आजीने हे सांगीतलेले, तिथं ओंकारेश्वरला पाय ठेवला की आठवायचे आणि मग आपोआपच त्या राम मंदीराच्या पायऱ्या चढत मी त्या टेकडीवरील मंदीरात चढायचो. कधीकाळी आपल्या आजीआजोबांनी पूजलेला हा राम, त्याच्या नातवाला पाहून काय म्हणेल ? ‘ध्यायेध्याजानु बाहु —‘ म्हणत मी रामाला नमस्कार करत प्रदक्षिणा घालायचो.
जरा उंचीवरून आसपास बघायचे असल्याने, राम मंदीराच्या गच्चीवर तर मुद्दाम जायचो, कारण तेथील कोपऱ्यातील कडुलिंबाची पाने मला खायची असायची. ऐकले आहे - वनवासात या भागांत असतांना, प्रभू रामचंद्रांना जेवतांना चटणी हवी होती. सीतामाईं त्या वनांत चटणी तरी कशाची करणार ? समोर कडुलिंब होता, म्हणून त्या कडूलिंबाच्या पानांचीच चटणी केली. प्रत्यक्ष सीतामाई आपल्या रामरायासाठी आपल्या पानांची चटणी करताय, म्हटल्यावर त्या कडुलिंबाने आपल्यातील कडुपणा टाकला आणि गोडवा धारण केला. ‘चटणी कशाची’, हे रामरायांनी सीतामाईंना विचारल्यावर, त्यांनी खरं काय ते सांगीतले. प्रभू रामचंद्रांना आपल्या पोटासाठी, आपला जन्मजात कडूपणा सोडणाऱ्या त्या कडुलिंबाबद्दल माया दाटून आली आणि ‘तुझा हा कडुपणा, आता यापुढे तुला पुन्हा येणार नाही’, हा वर दिला. काय असेल ते असो, तो तिथला कडुलिंब थोडा कमी कडू आहे.
तिथून उतरून निघायचे नव्या रस्त्याने, कारण त्या रस्त्याने असंख्य चिंचांची आणि कवठांची झाडे असायची. चिंचा लागण्याच्या बेतात असायच्या, मात्र कवठं बऱ्यापैकी असायची ! घरी घेवून जाता यायची ! घरी पोहोचल्यावर महाशिवरात्र पोटात जाणवायची !
महाशिवरात्रीचा उत्सव हा माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला असतो. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शिवरात्री असते. असे असले तरी, या दिवशी शैव पंथीयांबरोबरच सामान्य जनही उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीचे महत्व वर्णन करण्यात आले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे.
उद्या ‘महाशिवरात्र’ आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा वार ! उद्या सोमवार तर आहेच, पण ‘महाशिवरात्र’ देखील आहे. आता तिकडं महाशिवरात्रीला केव्हा जाणं होईल, काही सांगता येत नाही. असं काहीतरी आठवलं आणि लिहीलं !

3.3.2019