Sunday, October 20, 2019

बैल गेला अन् झोपा केला —— करू नका !

बैल गेला अन् झोपा केला —— करू नका !
काल संध्याकाळी सात वाजेच्या बातम्या ऐकल्या. त्यावेळी शांतता होती, बातम्या ऐकू आल्या. निवडणुकीचा बाह्य दिसणारा आणि आवाजाने जाणवणारा प्रचार थंडावला, खरा प्रचार सुरू झाला. मग आठवायला लागल्या काही गोष्टी, काही व्यक्ती ! परमेश्वराच्या कृपेने हव्या असलेल्या गोष्टी लक्षात रहाण्याएवढी स्मरणशक्ती मिळाली आहे. त्यामुळे फारसे वय जरी झाले नसले, तरी तुलनेने बऱ्यापैकी आठवणी मन जागे करतात !
आमच्या गांवात काही व्यक्तींचे नांव कुठेही निघाले, की आपोआपच आदराने बोललं जाई. बोलणाऱ्याचा थट्टेचा स्वर असला, तर तो लगेच बदलत असे. आमच्यासारखा पोरगा त्यांचा चेहरा आठवून, जर ‘हॅहॅहॅ’ करायला लागला, तर त्याला जरबेच्या आवाजात दरडावले जाई. या मंडळीत विश्वनाथभाऊ बोचरे, सीतारामभाऊ वाणी, गोविंदभाऊ वैद्य, शारंगधरशेट कासार, डहाळेकाका, भाऊसाहेब देशमुख, वसंतमामा कुलकर्णी, डाॅ. भाऊ आठवले, नारायण डाॅक्टर, काका शिंदे, रूपचंद महाजन ही त्यातील काही आठवणारी नांवे !
आता अलिकडचा मापदंड लावायचा, तर त्यांच्याजवळ कसलीही सत्तास्थाने नव्हती, ना त्यांचे उपद्रवमूल्य काही होते, ना त्यांची झगझगीत श्रीमंती कोणाची डोळे दीपवून टाकत होती. काही तत्कालीन काॅंग्रेसला व तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारे, काही आपण बरे आपले काम बरे, या स्वभावाचे ! घरातील असलेली किंवा नसलेली श्रीमंती, त्यांच्याकडे कोणीही गेला, तरी त्यांना मिळणारी सारखीच वागणूक ! त्यांतील एकदोन अपवाद वगळता, काहींचे आर्थिक सामर्थ्य जेमतेमच किंवा ‘आर्थिक आणि सामर्थ्य’ या शब्दांचा त्यांचा दूरान्वयाने संबंध नव्हता. यांच्यासारख्या मंडळींना त्यावेळी मानाने संबोधले जाई, अगदी त्यांच्या अपरोक्ष देखील, याचे कारण, त्यांची समाजात असलेली प्रतिमा, त्यांनी घालून दिलेला समाज चारित्र्याचा आदर्श ! त्यातील कोणीही आज आपल्यांत नाहीत, पण मला आठवतात त्यांची नांवे !
या नावांसारखी असंख्य नांवे, आपणापैकी प्रत्येकाच्या गांवात असलेली, आपल्यापैकी बहुतेकांना आठवत असतील ! यांचीच आणि यांच्यासारखीच नांवे अजून का आठवतांत ? रोज दिसणाऱ्यापैकी आठवणारी नांवे कमी, मात्र ही नांवे का जास्त ? काही जण मला म्हणतील, आणि म्हणतात पण, ‘तुम्ही कशा लक्षात ठेवतात, या आठवणी ? तुम्ही सांगीतल्या, की आम्हाला पण आठवतात.’ यांचे सोपं उत्तर आहे, यांच्या प्रत्येकांत काहीतरी आठवणीत रहाण्यासारखं आहे, ते आपल्यांत असावं असं आपल्याला वाटतंय, पण तितकं काही अजून जमलं नाही, हे जाणवतं, म्हणून आठवण येते.
या प्रत्येकाचा तेथील समाज उभारण्यात काहीतरी सहभाग होता, कसलीही अपेक्षा न ठेवता. सामाजिक कार्य केल्यामुळे, त्याचा वसा घेतल्याने यांची आर्थिक परिस्थिती भक्कम झाली नव्हती, तर कित्येक वेळा, उलट आर्थिक झळ बसली आहे, त्यांचा मौल्यवान वेळ गेलेला आहे, समाजासाठी ! त्यांनी त्यावेळी कसल्याही अपेक्षेशिवाय केलेले काम, हे त्यांचे मोल आहे, की त्यांची आठवण अजून पण येते. कित्येकांनी तर त्यांना बघीतले देखील नसेल, पण घरातील वडीलधारी मंडळी अवश्य सांगतील.
यांनी समाजासाठी केलं, मग असं काही, आपल्याला करता येणार नाही का ? नक्कीच करता येईल. आपल्यापरीने आपण ते रोज यथाशक्ती करत असतोच. मात्र आपल्याला मदत करण्याचे ज्यांचे, लोकशाही स्विकारलेल्या देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य आहे, त्यांना आपण मदत करायला हवी. त्यांनाच आपण प्रोत्साहन द्यायला हवे. या साठी आपली नकारात्मकता सोडायला हवी. कोणीच काही करू शकणार नाही, अशी अवस्था कधीही होत नाही. आपण यथाशक्ती करू शकतो, ते आपले मतदान करण्याचे कर्तव्य !
निर्लज्ज, असंवेदनशील, ढोंगी, खोटारड्या लोकांना मतदान अजिबात करू नका. तुम्हाआम्हालाच नाही, तर संपूर्ण समाजाला, देशाला सामर्थ्यसंपन्न करण्याची इच्छा असणाऱ्या आणि तशी कृती करणाऱ्या विचारधारेचे पालन करणाऱ्यास मतदान करा. देशाची खऱ्या अर्थाने एकता व संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्याचा वसा घेतलेल्यांना मतदान करा, केवढ तसे ढोंग करणाऱ्यांना कटाक्षाने दूर ठेवा. यासाठी सकारात्मक मतदान हवे, म्हणजे ‘हा हवा’ आणि ‘हा नको’ असे मतदान हवे. तुमच्या अपेक्षेइतके कोणी चांगले नसले, तरी आपल्या सर्वच अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत. जास्तीत जास्त, किंवा कमीतकमी कोण त्या दिशेने जाईल, हे लक्षात ठेऊन मतदान करा ! ——- अन्यथा गावठी भाषेत सांगायचे, तर ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी अवस्था होईल !

शाळेत असतांना उन्हाळ्याची सुटी लागली

शाळेत असतांना उन्हाळ्याची सुटी लागली, की अंगणात रात्री झोपण्याचा एक आनंद असायचा. त्यासाठी पहिली तयारी, म्हणजे जरा उन्हं कलली, की आडाचे पाणी ओढून अंगणात शिंपावे लागायचे, म्हणजे दुपारी तापलेली जमीन जरा थंड व्हायची. त्यावेळी आजच्या इतके उन्ह जरी, तापत नसले, तरी तो शेवटी ‘उन्हाळाच’ काही असलं तरी !
मात्र अंगणात पाणी टाकतांना, नीट प्रमाणात टाकावे लागे, सर्वत्र हलक्या हाताने शिंपडावे लागे, अन्यथा रात्रीपर्यंत अंगण वाळले नाही, जरा जास्त ओल राहिली, तर रात्री त्यांवर अंथरूण टाकल्याने, ते दमट व्हायचे, व बोलणी बसायची. अहो, उन्हाळयात आमची अंथरूणे म्हणजे काय असणार ? फक्त सतरंज्या, आणि अंगणातील खडे पाठीला टोचू नये, म्हणून त्यांवर मऊसर अशा गोधड्या ! पांघरूण नाहीच ! लहान मुलांना उशा पण नाहीत, तरी गाढ झोप लागायची.
अंगणात आपण जेवणापूर्वी अंथरूण टाकले, की आपले जेवण आटोपून झोपायची वेळ येईपर्यत, ते मस्त गार झाले असायचे. त्या अंथरूणावरचा अस्पर्श गारवा, शरीरातील सर्व उष्णता व थकवा नाहीसा करायचा. आपल्या शरीराला जास्तीत जास्त गारवा मिळावा, म्हणून या कुशीवरून, त्या कुशीवर निष्कारणच लवंडायचे ! मग निवांत होत, आकाशाकडे नजर लावत पडले, की आपली टक्क नजर, आपोआपच जायची, तिथं रेंगाळायची आणि नंतर रमायची. मग ते दूरवर दिसणारे, आकाशातील काजव्यासारख्या चमचमणारे तारे, असंख्य टिमटिमत व लुकलुकत तेवणाऱ्या चांदण्या ! मला ओळखता येणाऱे म्हणजे धृवतारा आणि सप्तऋषी ! धृवताऱ्याचे ठिकाण कसे काढायचे, ते अनुभवाने समजायला लागले होते. गुरू आणि शुक्राची चांदणी मला ओळखता यायची. अजून आम्हा सर्व मुलांची बघण्याची धडपड चालायची, ती ‘अरुंधतीची चांदणी’ बघण्याची ! कोणत्याही डाॅक्टरकडे न जाता, आपली दृष्टी चांगली आहे, किंवा नाही हे समजण्याचा सोपा उपाय आहे. नुसत्या डोळ्यांनी तुम्हाला ती चांदणी दिसत असेल, तर तुमची दृष्टी चांगली आहे, हा पारंपरिक चालत आलेला, ठोकताळा आम्हाला पण माहीती झाला होता. ‘सप्तऋषींमधे सती बैसलीसे अरूंधती’ हे आजी, आई म्हणत असलेल्या गीतातील एवढीच आठवणारी ओळ म्हणत आम्ही अरूंधतीची चांदणी शोधायचो.
उन्हाळयात पडल्यापडल्या आता गमतीदार वाटणाऱ्या, पण त्यावेळी उत्सुकता असणाऱ्या गोष्टी ऐकू यायच्या. गांवाच्या मध्यभागी घर असल्याने, लग्नाच्या मिरवणुका आमच्या घराजवळूनच जाणार ! बॅंडवाल्याची गाणे ऐकू येत. त्या बॅंडच्यामध्ये उभा राहून ‘काळी पिंगाणी’ तथा ‘क्लॅरिओनेट’ वाजविणारा त्यांचा मुखिया, मिरवणुकीत कसा जात असेल, हे आम्ही पडल्यापडल्या अंदाज करत असू. दारावरून वरात गेली, आणि जर लग्न जवळपास असेल, तर मग नंतर लाउडस्पिकरवरून मंगलाष्टका ऐकू यायच्या, आणि शुभ लग्न सावधान ऐकू यायचे. लग्न लागल्याबरोबर, सर्वात पहिले, लाउडस्पिकरवरून जर कोणती सूचना ऐकायला येत असेल, तर ‘मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये. ही विनंती.’ नंतर नवरानवरींना आहेर देण्याची झुंबड ! अमूकअमूक याच्याकडून पन्नास पैसे ! अमूक यांचेकडून ‘दोन रूपये’ ! ***यांचेकडून बारा आणे ! यांच्याकडून साडीचोळी ! त्यांना आहेर मिळत असायचा, आणि आम्ही हिशोब करत असायचो. आहेर देणाऱ्यांत काही नांवे ओळखीची निघताय का, याची पण काळजी असायची. याचा विचार व हिशोबाचे विचार करताकरता केव्हातरी झोप लागून जायची.
अजून दुसरी गंमत, म्हणजे उन्हाळयात दिवस मोठा असतो. अंधार उशीरा पडतो. आमच्याकडे ‘लक्ष्मी टुरिंग टाॅकीज’ आठवडे बाजाराकडे होती. संध्याकाळी जरा अंधार पडल्यावर, सिनेमाचे सर्व संभाषण गांवभर ऐकू यायचे. पडल्यापडल्या, आता ‘हा असं बोलेल. हे गाणं होईल.’ ही पण भविष्यवाणी सांगता यायची. ‘जय संतोषी माॅं’ हा चित्रपट तर मला वाटते, संपूर्ण गांवाचा पाठ झाला असावा. बरेच दिवस टिकला होता.
संध्याकाळी लग्न समारंभात, हमखास लोकगीते लागायची. लोकगीतांचे, लावण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, यांत क्लॅरिओनेटचा वापर बऱ्यापैकी असतो. क्लॅरिओनेटवर शास्त्रीय संगीतातील विविध राग वाजविणारी, पण आहेत, मात्र कमी ! काही असो, पण क्लॅरिओनेटचा स्वर मला जवळचा वाटतो, तो मला थेट घरी गांवी घेऊन जातो. त्यांमुळे तो आठवणीची वेदना देतो, पण आनंदाच्या काळाची पण आठवण करून देतो, म्हणून तो हवासा पण वाटतो. त्यामुळे क्लॅरिओनेटचा कुठे आवाज ऐकू आला, की मला आठवते, ती गांवची अंगणात पडल्यापडल्या ऐकू येणारी, ही बरीच गाणी ! त्यांत अगदी - ‘नेहमीच राया तुमची घाई’, हे रोशन सातारकर यांनी गायलेले गीत, ते ‘कावळा पिपाणी वाजवतो, मामा मामीला नाचवतो’ इथपर्यंत !
आता आकाशवाणीवर अशाच लावणी व लोकगीते लागली होती, —- आणि हे आठवलं !

20.10.2019

सोन्याची पाच बिस्किटे !

सोन्याची पाच बिस्किटे !
काल जरा वेळ मिळाला होता, कोर्टात काम निघण्यास थोडा वेळ होता, तर बऱ्याच दिवसांनी एकाशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात फोन आल्याचे, कोटाच्या खिशात जाणवले. हाताने त्यांस थांबण्याची खूण करत, मी कोटातून मोबाईल काढला, आणि तो सुरू करून कानाला लावला.
‘नमस्ते साब !’ फोनवरून.
‘नमस्ते !’ मी. मला हे नेहमीचे असल्याने, कोणी नमस्कार केला, तर मी उत्तरादाखल स्वाभाविकपणे नमस्कार करतो. कोणाचा नमस्कार नाकारणे, किंवा त्याची शिष्टासारखी दखल न घेणे, किंवा नमस्कार कोण करते आहे, यांवर तो स्विकारायचा किंवा नाही, हे ठरवणे; असे माझ्या स्वभावात नाही.
‘बडा अच्छा हो गया, साब, आपका फोन लग गया तो । मैं राजस्थानसे बोल रहा हूॅं । देखो, अपने फायदे की बात हैं ।’ फोनवरून. तो सांगायला उतावीळ झालेला वाटत होता, असे मला उगीचच वाटले.
मला बऱ्याच वेळा, कुठूनकुठून फोन येतात. सर्वच जण कोठून बोलतात, ते खरे सांगत नाही. मोबाईलवर ते समजत पण नाही. त्याकडे मी लक्ष पण देत नाही. असा फोन करणाऱ्या बऱ्याच जणांना, फोनवरून सल्ला हवा असतो, किंवा काही वेळा, त्यांना कोणाची तरी बतावणी करून माहिती काढायची असते. त्याची ओळख वाटली, तर मी बोलतो पण ! मात्र जर तात्काळ लक्षात आले नाही, शंका आली किंवा केसबद्दल विचारत असेल, तर मी स्पष्ट ‘नाही’, म्हणून सांगत, प्रत्यक्ष भेटायला सांगतो. मी स्वत:साठी आखलेला नियम ! आता राजस्थानवरून माझा फायदा व्हावा, ही अपेक्षा करणारा, कोण असावा, हे काही माझ्या लक्षात येईना.
‘अरे भाई, क्या बात हैं ?’ मी.
‘कुछ नहीं साब, सोने की पाॅंच बिस्कीट मिल गये, खुदाई करते करते । आपको सस्तेमें मिल जायेंगे । ले लो । आप बोलो, तो मैं कहा आना, आ जाता हूॅं । बोलो ।’ तो फोनवरून.
मी पूर्वीपासून कर्ज हवे का, क्रेडिट कार्ड हवे का, फ्लॅट विक्रीस आहे वगैरे मजकूराचे गोड आवाजात फोन ऐकले होते. त्यामुळे आपल्याला घरदार देण्यास, पैसे देण्यास समाजातील सर्व स्त्रीपुरूष मंडळी आतुर झाली आहेत, वेळ काय, ती फक्त आपण होकार देण्याचीच ! असे मला वाटल्याने, आपल्याकडून काही कमी नको म्हणून, एकदा तर त्यांना मी, त्या विचारणारीस होकार पण दिला; पण ‘मी काय करतो’ हे तिने विचारल्यावर ‘वकील आहे, इथं हायकोर्टात’ हे नेहमीप्रमाणे, खरे ते सांगीतले. हे ऐकल्यावर, मात्र तिकडून फारसे रूख न मिळवता, संभाषण आटोपते घेतले होते. असा चारपाच वेळा सारखा अनुभव आल्याने, ‘वकील आणि असा अनपेक्षीत मिळणारा फायदा’ यांतून विस्तव जात नाही, हे मला समजले होते. त्यामुळे या अनुभवांतून, मी आता हुशार झालो आहे, असा माझा समज झाला होता. आता मी वकील आहे, हे या कानाचे, त्या कानाला समजू द्यायचे नाही, हे मी क्षणात ठरवले.
आता एवढा फोन आला आहे आणि फोनवरून सोन्याचे व्यवहार, कोणी आपल्याशी करतेय, हा प्रत्यक्ष अनुभव आपण घ्यावा, असे पण वाटून गेले. परवाच्याच रविवारच्या वर्तमानपत्रातील, माझ्या राशीचे काळजीपूर्वक वाचलेले भविष्य डोळ्यापुढे तरळून गेले - ‘धनलाभ होणार पण दक्ष रहा !’ भविष्याची प्रचिती येते आहे आता, असा पण एक भावनिक सकारात्मक विचार मनांत तरळून गेला.
‘अच्छा हो गया, आपका फोन आया तो ।’ मी. यांवर तिकडून पण समाधानाचा हुंकार ऐकू आला, असे मला उगाच आपले वाटून गेले.
‘कहा आना, कौनसे पोलीस स्टेशन आना बोलो । नाम बोलो, आ जाता हूॅं वहा ।’ मी. तिकडून यांवर काही उत्तर येण्याऐवजी, लगेच फोन बंद केल्याचा ‘टूंऽऽग टूंऽऽग’ असा आवाज ! तरी शंका नको, म्हणून मी पुन्हा ‘हॅलो हॅलो’ केले, पण उत्तरादाखल एकदाच ‘टूंऽऽऽग’ असे ऐकू येत फोन डेड झाला.
—- चांगली स्वत:हून दारात चालत आलेली, स्वस्तात मिळणारी सोन्याची पाच बिस्किटे पहातापहाता, हातातून गेली. दुनिया सत्त्याची नाही, हेच खरे !

16.10.2019

आताच एक सुंदर रचना ऐकली, ती आपल्यासाठी !

आताच एक सुंदर रचना ऐकली, ती आपल्यासाठी !
श्री. तेजस विंचूरकर - बासरी आणि सौ. मिताली तेजस विंचूरकर, यांची ही जुगलबंदी ! राग - देस !
तबल्यांत, ते साथीचे वाद्य असल्याने, तंतुवाद्य वा सुषिर वाद्य यांना साथसंगत करतांना, ‘लपेटना’ आणि ‘सवाल जबाब’ हे दोन प्रकार असतात.
‘लपेटना’ म्हणजे मुख्य वाद्याच्या बरोबरीने तबलावादक तसेच बोल वाजवतो, आणि मुख्य वादकाला किंचीत नामोहरम करण्याचा प्रयत्न करतो. ‘लपेटना’ हा प्रकार तुलनेने कठीण आहे, कारण मुख्य वादक काय वाजविणार, याची कल्पना असेल, तरच हे शक्य असते; किंवा तबलावादकाची प्रचंड तयारी असेल, आपल्या हातावर, बुद्धीवर आणि वादनाच्या लयीवर प्रचंड नियंत्रण असेल, तरच हे शक्य असते. नियमीत साथसंगत करणाऱ्या तबलावादकाला, मुख्य वादक एखादी गत, तुकडा, चक्करदार, तिय्या वाजवत असला, की लगेच अंदाज येतो, आणि त्या प्रमाणे तो वाजवतो.
‘सवाल जबाब’ यावरूनच आपल्याला याचा अर्थ समजला असेल. समोरचा मुख्य वादक जसा वाजवेल, तसे किंवा त्याप्रमाणेच वाजवून तबलावादक त्याला उत्तर देतो. यांत देखील प्रचंड तयारी, लयीवर कमालीचे नियंत्रण हवे असते. या कामी मुख्य वादक, काही वेळा जरा विचारपूर्वक अवघड लयकारी, कठीण गत वाजवून समोरच्या तबलावादकाच्या तयारीचा कस बघत असतो.
आपल्या सारख्या प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना काय ? दोघांचाही आनंद ते लुटत असतात !

https://www.facebook.com/mmbhokarikar/videos/2618272441562155/

14.10.2019
कायदा हा समाजाची व समाजात मानली गेलेली, तसेच समाजाने स्विकारलेली नितीमूल्ये यांवर ठरतो.
मात्र तुमचे आमचे, आपणा सर्वांचे अधिकार, हे समाजात सुव्यवस्था व शांतता नांदेल, त्यांत अडथळा येणार नाही, वा अन्य कोणा समाजधटकांवर अन्याय होणार नाही, हे लक्षात घेवून ठरवलेले असतात.
समाजाच्या विकासाचे धोरण आखतांना, शासनास तत्कालीन अंमलात असलेला कायदा आणि जनतेचे, समाजघटकांचे अधिकार, यांचा समन्वय साधावा लागतो. ज्यावेळी जनतेच्या एखाद्या घटकाचे अधिकार, समाजाच्या विकासासंबंधीच्या धोरणाच्या आड येत असतील, तर समाजघटकाचे अधिकार, काहीवेळा संकुचित करावे लागतात. मात्र अधिकार हे नैसर्गिक व मूलभूत असतील, तर त्यांवर नियंत्रण आणता येत नाही, वा ते संकुचित करता येत नाही.

14.10.2019

एक रूपयांत अमूक देऊ,

एक रूपयांत अमूक देऊ, दहा रूपयांत ढमूक देऊ, संपूर्ण वीजमाफी करू, काही कमी पडू दिले जाणार नाही, सातबारा कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी करू वगैरे वगैरे —— खूप सवंग घोषणा ऐकल्यात !
जे आपल्या राज्याची, देशाची आर्थिक क्षमता बघता शक्य आहे का ? माझ्या प्रामाणिक मताप्रमाणे अजिबात नाही. मात्र अशा काहीतरी अंमलात आणणे शक्य नसणाऱ्या घोषणा करून, जनतेला तुम्ही आश्वासनांच्या रूपांत फसवत आहात, हे लक्षात ठेवा.
दुसरी बाब म्हणजे, या घोषणांच्या आणि सवंगपणे मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या नादात, यदाकदाचित निवडून आलात तर, नंतर आम्ही काही तरी करतो आहे, हे दाखवण्यासाठी, जी काही सरकारी तिजोरीत शिल्लक असेल, त्याचा अयोग्य असा वापर करणार; जी रक्कम दुसऱ्या चांगल्या व योग्य कार्यासाठी वापरतां आली असती. अशी काही रक्कम नसेल, तर पुढचा मार्ग म्हणजे सर्वसामान्य जनतेला, करवाढीच्या रुपाने डबघाईस आणणार आहोत, हे नक्की !
याव्यतिरिक्त जनतेला आपण निरोद्योगी, आळशी आणि परिणामी व्यसनी बनवणार आहोत. जनतेच्या हाताला काम द्या. बौद्धिक असो वा शारिरीक असो, ते व्यवस्थितपणे दिले, तर बौद्धिक व शारिरीकदृष्ट्या आपण कार्यक्षम राहू.
ज्यांना जगण्यासाठी देखील अन्न मिळण्याची मारामार आहे, त्यांना काहीही काम द्या आणि त्या बदल्यात, आपल्या शासनाने ठरवलेल्या रोजंदारी दराप्रमाणे दर द्या. त्या रकमेएवढे मुख्यत: धान्य द्या. यांत मला पूर्वीची ‘रोजगार हमी योजना आठवते’.
ज्या योजना जनतेच्या अंतीम हिताच्या आहेत, त्याच जाहीर कराव्यात आणि अंमलात आणाव्यात. ज्या जमणार नाही, आणि जनतेच्या खऱ्या अर्थाने हिताच्या नाहीत, त्या योजना जाहीर कशाला कराव्यात ?
दर निवडणूकीच्या वेळी सर्व सत्ताधारी आणि सत्ता मिळविण्यास उत्सुक असलेल्या पक्षांकडून, तसेच आपल्याला सत्ता कधीही मिळणार नाही, तरीही समोरच्या पक्षास सत्ता मिळू नये व ती मिळविण्यांत अपशकून करण्यासाठी अशा घोषणा करत असतात. लगेच आपण देखील मूर्खपणा करण्यांत कमी नाही, किंवा तेवढेच किंबहुना त्यापेक्षा पण मूर्ख आहेत, हे दाखवण्यासाठी असे काहीतरी, अक्षरश: काहीतरीच जाहीर केले जाते.
यांवर आपण काही न बोलणे, आणि त्या पक्षाची पाठराखण करणे, म्हणजे यांत सरकारलाच जनतेची लूट करण्यासाठी आपण मूक संमती देतोय. एवढेच नाही, तर समाज आणि देशाच्या हितसंबंधींच्या विरूद्ध वर्तनास आपला पाठिंबा आहे, याशिवाय दुसरा अर्थ काय निघणार ?

14.10.2019

हेमंत सपकाळे

नूतन मराठा काॅलेजमधले दिवस ! त्यात काॅलेजच्या स्नेहसंमेलनाचे दिवस ! गाणाऱ्या प्रत्येकालाच आपण मोहंमद रफी, मुकेश, किशोरकुमार असल्याची भावना असायची; तर गाणारीला लता, आशा आहोत, ही भावना असायची. या भावी महंमद रफी किंवा आशा, लता वगैरेंना साथ करणाऱ्यांना पण, आपण कोणी भलतेच वाटू लागायचे.
त्यावेळी काॅलेजला गाणी, नृत्य बसवायची तर आमच्या इथं, पेटी वाजवायला, एक नेवे म्हणून होता, कोंगो-बोंगोला जोशी आणि बाऊस्कर म्हणून होते. विशेष म्हणून समुह कथ्थक नृत्य बसविले होते, त्याला या कोंगो-बोंगो सोबतच, मी पण तबला वाजवायचे, असे ठरले. त्यांच्या कोंगो-बोंगोच्या ढणढणामधे माझ्या तबल्याचा आवाज विशेष असा ऐकू येत नसावा, पण मी तबला वाजवत बसलेला आहे, हे दिसायचे. या कार्यक्रमाची प्रॅक्टीस आटोपल्यावर, एक आमच्याच वयाचा विद्यार्थी आला. त्यावेळी प्रॅक्टीस चालायची, ती प्राचार्यांच्या शेजारच्याच खोलीमधे, कडुलिंबाजवळच्या वर्गामधे !
या नवीन आलेल्याचा व माझा परिचय नव्हता. इतर सर्वांचा होता. त्याला आग्रह करायला लागले, पेटी वाजवण्याचा, झालं ! त्याने पेटी हातात घेतली, आणि त्यावेळची तसेच, जुनी देखील गाजलेली हिंदी-मराठी गाणी त्याच्या बोटांवरून त्या हार्मोनिअममधे उमटू लागली ! ‘सांज ढले, खिडकी तले, तुम शिटी बजाना छोड दो’ पासून ते थेट ‘खयके पान बनारसवाला’ पर्यंत ! संगीतातील हात असल्याची खूण, मला पटली ! नंतर मात्र कधी विसर पडणे शक्य नव्हते.
पुन्हा सर्वजण सोबत होतो, ते पुणे विद्यापीठाचा ‘युवकमहोत्सव’ हा संगमनेरला होता. भुसावळहून आमच्याच एका मित्राने कै. सुरेंद्र तळोकार याने भुसावळ नाशिक पॅसेंजरचा डबा जळगांवपर्यंत त्यात कोणी बसू नये, म्हणून आतून बंद करून आणला होता. त्यावेळी ही पॅसेंजर मुंबईपर्यंत होती, ते लक्षात नाही. नाशिकपर्यंत पॅसेंजरने ही सर्व काॅलेजमधील टोळधाड बसली होती. आमच्यासोबत आमच्यातीलच वाटावे, पण वर्तनाला अत्यंत कडक, असे आमचे चिरतरुण प्राध्यापक रमेश लाहोटी सर होते. संगमनेरला पोहोचलो. तिथं पण हा सोबत होता. तिथं ‘स्वल्पविराम’ नांवाच्या हाॅटेलमधे दुसऱ्या दिवशी गेलो होतो.
महाविद्यालयीन जीवन संपले. कोण कुठे, कोण कुठे पोटापाण्यासाठी पांगले. पोटासाठी मनासारखे काम मिळाले असेल याला, असे नेहमी मला वाटायचे ! बरेच दिवसांनी त्याची जळगांवी भेट झाली. तशा बातम्या समजायच्या, पण त्या बातम्याच ! त्यांत भेटीची मजा नाही. मग जळगांव आकाशवाणीला आल्यावर मुद्दाम कामाच्या दिवशी भेटायला गेलो. ‘स्वल्पविराम’ या हाॅटेल त्याला आठवत होते. ही आठवण पण, त्यानेच मध्यंतरी जळगांवला आल्यावर, आकाशवाणीत आवर्जून सांगीतली. जरा त्यावेळच्या वातावरणातील गप्पा झाल्या. सोबत बैठकीत दुसरे त्यावेळचे आमचे दोघांचे मित्र श्री. विजय सपकाळे पण होते. मी वकीली व्यवसायातील कटकटी सांगीतल्या, त्याने त्याच्याकडच्या कटकटी सांगीतल्या. एकंदरीत ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण सनर्पक आहे, याची खात्री पटली. आपले काॅलेज जीवन चांगले होते, हा निष्कर्ष काढून मी निघालो. नंतर त्याची बदली होऊन मुंबई आकाशवाणीवर गेल्याचे समजले. इथं फेसबुकवर जे दर्शन होई तेवढेच ! व्यवसाय भिन्न झाले, की वारंवार भेटीगाठी होणे कठीण होऊन जाते.
आणि अचानकच —- मध्यंतरी गेल्या आठवड्यात, सौ. संगीता म्हसकर यांची पोस्ट बघीतली. माझे महाविदयालयीन मित्र, सध्या आकाशवाणी अधिकारी असिस्टंट डायरेक्टर, म्हणून मुंबई आकाशवाणी येथे असलेले, हेमंत सपकाळे आपल्यात नाहीत, आपल्याला कायमचे सोडून गेले. अतिशय धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी ! विश्वास बसेना, पुन्हा दुसरे मित्र, श्री. विजय सपकाळे यांना विचारले. वाईट बातम्या या खोट्या ठरत नाही, हे पुन्हा खरं ठरलं ! परमेश्वर पण कोणत्याही कामाची घाई करतो, अन् रंगलेल्या मैफिलीचा बेरंग करतो !

12.10.2019

Image may contain: Hemant Sapkale, smiling, sitting

श्री. पी. डी. तडवी उपाख्य जमादार सर !

श्री. पी. डी. तडवी उपाख्य जमादार सर !
सरदार जी. जी. हायस्कूल मधे, आम्हाला दहावीत असतांना, भूगोल शिकवायला, श्री. पी. डी. तडवी सर होते. त्यांना सर्व जण ‘जमादार सर’ म्हणून ओळखीत.
गोरेपान, बेताची उंची, केस चापूनचोपून मागे वळवलेले ! अंगात साधेच पण व्यवस्थित असलेले कपडे. त्यांच्या अंगात बहुतेक वेळा पांढरट किंवा गुलाबीसर शर्ट आणि राखाडी किंवा शेवाळी रंगाची पॅंट असायची, त्यांना आवडत असावी. शर्टचा खिसा नेहमी फुगलेला, कारण खिशाला दोन-तीन पेन, त्यातील एक पेन नक्की तांबड्या शाईचा आणि चष्म्यासहीत चष्म्याचे घर !
तसे ते इंग्रजी पण छान शिकवायचे. मात्र त्यांचा खास विषय म्हणजे भूगोल समजला जाई. वर्गात शिकवायला जायचे, तर हातात नकाशाची लांबच लांब पुंगळी घेऊन, त्यांचे हळूहळू व्हरांड्यातून वर्गावर जाणे दिसायचे. एखादवेळेस पृथ्वीच्या गोलाची गरज असेल, तर सोबत झेंडू महाजन किंवा हरिभाऊ पाटील मागे तो पृथ्वीचा गोल घेऊन वर्गात प्रवेश करत. आपल्या अतिशय हळू व मृदू आवाजात त्यांचे विद्यार्थ्यांना भूगोल शिकवणे, अप्रतिम असे. मुलांवर संतापलेले मी त्यांना कधी बघीतलेले नाही. न संतापता, आरडाओरड न करता, इतके सुंदर आणि विद्यार्थ्यांना लगेच समजेल, असे शिकवणारे बहुसंख्य शिक्षक आमच्या शाळेत होते, त्यातील एक म्हणजे जमादार सर !
आमचे गांव रावेर, हे सातपुड्याच्या कुशीतील गांव ! त्यांचे गांव, लोहारा हे तर प्रत्यक्ष सातपुड्यात ! सातपुडा पर्वत म्हणजे याला सात पर्वत रांगा, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांची हद्द आणि त्यामुळे यांना विभागणारा हा पर्वत ! पूर्वीची शिक्षक मंडळी शिकवतांना सांगायची, ‘आपले गांव अतिशय भाग्यशाली आहे. सातपुड्यात उगम पावणारी जीवनदायी तापी नदी आणि तिच्या खोऱ्यातला हा सुपीक प्रदेश ! पाण्याची मुबलकता आणि घनदाट जंगलाच्या रूपात असलेली, निसर्गसंपदा !’ सातपुड्यातून रसलपूरला वाघ आल्याचे लोकांना आठवत होते. मात्र त्यांच्या शिकवण्यातून सातपुड्याची झालेली दुरावस्थेबद्दल बोलले जाई. ते सांगत,
‘तिकडच्या मध्यप्रदेशातील असलेल्या भागाबद्दल तर सांगता येत नाही, पण आपल्या महाराष्ट्रात मात्र सातपुड्याच्या जवळपास दोन रांगा उजाड झाल्या आहेत. दिवसा जायला भीत होतो, अशा जंगलात रात्री पण गाडी घेऊन फिरता येते. काय करणार ? ‘मानवाचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल !’ या त्यांच्या वेदनादायक पण आवडत्या वाक्यावर ते गप्प व्हायचे, आणि पुन्हा शिकवायला सुरूवात करायचे.
दहावी, अकरावी नंतर तसा शाळेतील बहुसंख्य शिक्षकांचा संबंध येईनासा झाला. मात्र त्यांनी शिकवलेली, वाक्ये अजून आठवतात ! त्यांनी त्यावेळी शिकवलेल्यांचे अर्थ आज समजतात, अनुभवण्यास येतात.
पूर्वी शेतावर गेल्यावर मुक्कामाला कै. बाबूकाका पाटील यांच्याकडे थांबलो, तर उन्हाळयात सकाळी अंगावर गोधडी घ्यायला लागायची, एवढा गारवा असायचा तापीकाठी ! ‘पाल’ हे गांव सातपुडा पर्वतातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. आता तापीला पण ओहोटी लागली आहे, गारवा गेला ! आता उन्हाळयात तिच्या पात्रातली वाळू चमकते, डोळ्याला त्रास होतो, तिचे पायाला चटके बसतात. उन्हाळयात पण अनवाणी पायाला ओलसर गार वाटणारी तिची वाळू, आता तिच्या लेकरांच्या पायाला चटके द्यायला लागली आहे.
‘सातपुडा पर्वतातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘पाल’ - हे शाळेत दुसरी-तिसरीपासून घोकून पाठ केलेले वाक्य, आता फक्त पुस्तकात राहीलेले आहे. त्याचा अनुभव येत नाही. झाडांशिवाय उघडेबोडके झालेले, हे डोंगर आणि त्यांचे काळेशार दगड, उन्हाळयात कडक तापतात, वातावरणांत गरम वाफा सोडतात. आता वस्तुस्थितीप्रमाणे ‘पाल हे आता थंड हवेचे ठिकाण राहीले नाही’ असे उत्तरपत्रिकेत लिहीले, तर पेपर तपासणारे शिक्षक, मार्क देतील का नाहीत याची कल्पना नाही. वादविवाद नको, म्हणून पुस्तकातील हे वाक्य गाळलेले पण असू शकते. वादविवाद नको, सामाजिक शांतता बिघडायला नको, आपली मतपेटी सुरक्षित व भक्कम करायची, म्हणून आजपावेतो किती निर्णय घेतले गेले आणि अजून पुढे किती घेतले जाणार, हे परमेश्वरालाच माहीत !
काही वर्षांपूर्वी रावेरलाच असतांना, मी ‘पाल’ येथे महाराष्ट्रातील वनअधिकारी यांचा ट्रेनिंग कॅंप होता. तिथं त्यांना नियमीत लागणाऱ्या कायद्यातील तरतुदींवर भाषण देण्यासाठी तीन दिवस तिथं मुक्कामास होतो. त्यानंतर काही योग आला नाही. हा विषय त्यांच्याजवळ काढल्यावर सह्रदयी माणसाला जी वेदना होते, ती त्यांना झाली.
सध्या ‘आरे’ आणि तेथील वृक्षतोड, हा विषय गाजतो आहे. हा विषय तर आपणा सर्वांच्या, आजपावेतोच्या वागणुकीपुढे मोहरीएवढा पण नाही ! रस्ते रुंदीकरण करतांना उध्वस्त होणारी निसर्गसंपदा, औद्योगिक क्षेत्र विकसीत करतांना आपण लावत असलेली निसर्गाची वाट, प्लॅस्टीकच्या अतिवापरामुळे आपली निसर्गाच्या जीवावर उठण्याची स्पष्ट झालेली मानसिकता, आदीवासी यांना देण्यात येणाऱ्या वनजमीनींबद्दलची वस्तुस्थिती ! किती प्रचंड प्रमाणात वृक्षतोड व निसर्ग संपदेचा नाश झाला आहे ! त्यांनाच विचारा, जे जंगलात रहात आहे, तेच आपले दु:ख सांगतील. आपल्या स्वार्थाने आपण निसर्गावर नाही, तर आपल्यावर कुऱ्हाड चालविली आहे, या पापाची कबूली, ही सर्व पाप करणारीच मंडळी देतील.
कोणताही सरकारीच निर्णय नाही, तर आपले दिनक्रम बघा ! आपल्याला प्रगती करायची आहे, या नांवाखाली दररोज निसर्गाला आपण कशाप्रकारे ओरबाडत आहोत, हे लक्षात घ्या ! खरंच इतकी आवश्यकता आहे का ? आपण सर्वांनी, मानवाने, हा जो काही प्रगतीचा मार्ग स्विकारलेला आहे, त्यातून निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, असा कोणताही मार्ग नाही का ?
प्रगती करतांना, कोणताही निसर्गऱ्हास वाचवण्याचा मार्ग शिल्लक नसेल, तर हे सर्व मार्ग आपणांस वाळवंटाकडे, आपल्या विनाशाकडे घेऊन जातात, हे निश्चित झाले आहे. आता स्वार्थाचे कापडाने आणि धनलालसेच्या हातांनी, आम्ही आमचे ज्ञानचक्षू घट्ट बांधले आहे, आम्ही अंध झालो आहेत. सवयीप्रमाणे आणि सोयीने, आपल्यास हवी ती भूमिका घेता येते. तिचे जनतेची दिशाभूल करता येईल, इतपत समर्थन करता येते. आजपावेतो तेच करत आलो आहोत.
जाऊ द्या ! आमच्या जमादार सरांनी, आम्हाला शिकवतांना म्हटलेले - ‘मानवाचं पाऊल आणि वाळवंटाची चाहूल !’ हे विदारक असलं, तरी हेच खरं !

7.10.2019

थोर गुरुपरंपरा असणारा - मातंग समाज !


थोर गुरुपरंपरा असणारा - मातंग समाज !
 सकल जगताला आपल्या भगवद्गीतेतील तत्वज्ञानाने दिपवून टाकणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाचे गुरु कोण ? हा प्रश्न आपल्यापैकी कोणाला पडत नसेल. त्यावेळी गुरुगृही जायचे, ते गुरुची ज्ञानसाधना किती आहे हे पाहून, हीच आपली संस्कृती आणि परंपरा आहे. उज्जैनी वनात एक सांदीपनि नावाचे मातंग ऋषी परिवारासह राहत असत, चार वेद ग्रहण केलेले,पचविलेले, अहंकारविरहित असे हे ऋषी. अरण्यात शिन्दीची झाडावरील पनाळ्या ते आपल्या मंत्र उपचाराने झाडावर न  चढता तोडत असत, त्यामुळे त्यांचे नाव  शिंदी पाल पडले होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे थोरले बंधू बलराम तसेच त्यांचा मित्र सुदामा यांना सांदिपनी ऋषीकडून अनुग्रह प्राप्त झाला आहे, ते त्यांचे गुरु आहेत ही भावना !  श्रीकृष्ण,बलराम ,सुदामा हे सांदीपनी ऋषीकडे आश्रमात चौसष्ट दिवस होते . या काळात त्यांनी सर्व विद्या आपल्या गुरूंकडून अवगत केल्या. 'तुला रे भगवंता काय शिकवायचे ?' असे म्हणणारे सांदिपनी ऋषी, हे आपले गुरुचे कर्तव्य मात्र चोख बजावत होते. शिवशक्तीच्या दहावा अवतार पैकी नववा अवतार, शंकर पार्वतीने मातंग-मातंगी म्हणून घेतला . मातंगी महादेवाची कश्ती असून सर्व देवदेवताची वरदायिनी  आहे. मातंगी देवीला संतती व संपती राखणारी देवी म्हणून पुजीले जाते . दक्षिण भारतात मातंगीस  मांगम्मा असेही म्हणतात .तिरुपति ,बालाजी ,चेन्नई येथे देवीची मंदिरे आहेत . आंध्र ,गुजरात ,तामिळनाडू या प्रांतामध्ये मातंगी मंदिरे आहेत. महालक्ष्मी तुळजापुरची देवी ही मातांगाचीच आई आहे, ही भावना आहे.
आपल्या कोणाच्याही मनांत जातींबद्दलच्या श्रेष्ठत्वाबद्दल अथवा कनिष्ठतेबद्दल प्रश्न निर्माण झाले, किंवा केले गेले, तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे, 'परमेश्वराने कोणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ म्हणून जन्माला घातले नाही. जो तो आपल्या कर्माने 'श्रेष्ठ अथवा कनिष्ठ' होतो आणि ठरतो. आपल्याला श्रेष्ठ व्हायचे का कनिष्ठ व्हायचे, हे आपण आपलेच ठरवावे आणि त्याप्रमाणे आपले कर्म करावे.' आपले वाडवडील चिरंतन सत्य सांगून गेले आहेत की, ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये. सुरुवातील अत्यंत छोटी, क्षुद्र वाटणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने अत्यंत श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचते, त्यावेळी तिचे पूर्वीचे, जन्मजात असलेले लघु रूप आपल्याला विसरावे लागते, ते तिच्या कर्तृत्वाने ! आपल्या समाजाचा एक भाग असलेला, प्राचीन गुरुकुलाची परंपरा असलेला, हा मातंग समाज, या अवस्थेत का, कसा आणि कोणामुळे, कोणत्या चुकीमुळे आला, याचा विचार केवळ त्याच समाजाने नाही, तर आपण सर्वानीच करायला हवा. ती करणे समजली, म्हणजे आपल्या कर्तृत्वाला पायबंद कशामुळे बसू शकतो, आपली प्रगतीची घसरण का होते हे आपल्याला समजू शकेल, त्यावर उपाययोजना करता येईल. समाजाची जशी गरज असते, त्यानुसार समाज ती गरज भागवत असतो. बारा बलुतेदार आणि बारा अलुतेदार, हा त्याचाच परिपाक ! समाजाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी, जी विविध कर्तव्ये तत्कालीन समाजधुरीणांनी नेमून दिली, त्यांच्या व्यवसायावरून व कर्तव्यावरून, ही गेल्या काही काळांत दिसत असलेली जातीव्यवस्था निर्माण झाली. आज याचे पूर्वीइतके स्वरूप उरले नाही, हे आपल्या शिक्षणाने, समजुतीने !
गावाचे रक्षण करणाऱ्या जमातीतील जी मंडळी होती, त्यातील हा 'मातंग समाज' ! हिंदू धर्मातील मूळचा रांगडा, आक्रमक, प्रामाणिक असलेला हा समाज, गावचा संरक्षणकर्ता होता. गावाचे संरक्षण करायचे तर स्वाभाविकपणे, गावांत शिरण्याच्या वाटेवर यांचा पहारा तथा वस्ती असायची. यांच्यातील परंपरेने आलेला हा गुण शिवाजी महाराजांनी ओळखला, म्हणून त्यांच्या काळांत त्यांनी काही ठिकाणी गडांचे, घरांचे, चौक्यांचे पहारे ताठ किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, ही या समाजाकडे सोपविली होती. महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या शिलेदाराची घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या, मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले, बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळांत, इंग्रजांनी त्यांना अडचणीच्या ठरलेल्या लोकांना, समाजाला वैयक्तिकपणे अथवा सामूहिकपणे कोणत्यातरी मार्गाने त्रास देण्याची योजना केली होती. त्यांत त्यांनी रामोशी, मातंग अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरविले, त्यांना गावातून तडीपार केले, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, तेंव्हा या समाजातील लोकांनी इंग्रजांच्या विरोधांत गांवागांवातून संघर्ष केला, या समाजातील उस्ताद लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीत अनेक क्रांतीकारकांना आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. अनेक शूरवीर या तालमीतून तयार झाले होते. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हे यांच्याच तालमीतले !
(पूर्वार्ध)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा थोर साहित्यिक देणारा - मातंग समाज !
आपल्या काही काळापासूनच्या चुकीच्या वागण्याने, तत्कालीन समाजाने अथवा राज्यकर्त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे, जे काही दोष निर्माण झाले होते, त्यामुळे समाजाच्या ऐक्याला धोका पोहोचविणारी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यातून मार्ग काढण्यासाठी जे विविध मार्ग सुचविले, विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी केली गेली, त्यांत 'सामाजिकदृष्टया, सामाजिक परिस्थितीने जे मागासलेले आहेत, त्यांना सामाजिकदृष्ट्या बरोबरीला आणण्यासाठी विशेष संरक्षण दिले गेले, त्याच्या विविध याद्या बनविल्या गेल्या, त्या याद्यांनाच आपण 'अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त जाती' वगैरे म्हणतो. त्यांच्या उत्थानासाठी आपल्या भारताने जी राज्यघटना स्विकारलेली आहे, त्यांत यांचा समावेश करून, समाजन्यायाच्यादृष्टीने विशेष सवलती दिलेल्या आहेत. मातंग हे 'अनुसूचित जातीत' समाविष्ट केलेली जात आहे.
यांचे मूळस्थान नर्मदेच्या खोऱ्यातील असल्याचे मानले जाते, मात्र सध्या बहुसंख्येने महाराष्ट्रात रहिवासी आहेत, तरी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा, दीव, दमण, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथेही हे आढळतात. यांचा मूळ व्यवसाय केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे, झाडू बनविणे, बांबूच्या टोपल्या आणि इतर वस्तू, जसे -  परडी, सूप, तसेच शुभप्रसंगी आपल्या घराला बांधावयाची तोरणे बनविणे आणि हलगी वाजविणे तसेच गुरांचे खच्चीकरण, चामडे कमविणे, सुईणीकाम, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा, सोपविलेले काम करणारा, असे यांचे मूळ, पारंपरिक व्यवसाय होते. या शिवाय काळाच्या ओघात हे पारंपरिक व्यवसाय जाऊन त्याचे रूपांतर रोजगारात झाले. आता आपल्या परंपरागत व्यवसायापासून अलिप्त होऊन आपली पारंपरिक शेती करणे, शिक्षण घेऊन विविध उद्योगांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये हा समाज आपले अस्तित्व दाखवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या 'अस्पृश्यताविरोधी चळवळीत' यांनी सहभाग घेतला होता. मातंग हे मांग, माडिगा, महाडिगा या नावाने पण ओळखले जातात. या जातीत १५ पोटजाती मानल्या आहेत, त्या मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे अशा सांगता येतील. भारताच्या प्रगतीत भरीव कार्य करणारे लहुजी वस्ताद साळवे, थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, एकनाथ आवाड, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांची शिष्या मुक्ताबाई साळवे याच समाजातील ! संगीत नाटक अकादमी्चा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेल्या तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावंकर, शाहीर विठ्ठल उमप, याच समाजातील ! आचार्य हरिकेशी, तीर्थंकर महावीरांचे शिष्य असलेले, दोघे बंधू मुनी चित्त संभूती विजय, यमपाल मातंग हे पण याच समाजातील. मात्र राजकीयदृष्टया म्हणावे तसे नेतृत्व, हे बहुसंख्येने या समाजातून आलेले दिसत नाही.
शासनाने हा समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी, याच्या आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय उत्थानासाठी भरीव कार्य केले आहे, अजूनही करीत आहे. त्यांत साहित्याचार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करून, त्यामार्फत दोरखंड तयार करण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, घायपात या वनस्पतींपासूनच्या विविध वस्तू बनविणे, निर्यात करणे यासाठी मदत करणे, उद्योगासाठी आर्थिक मदत आणि कर्ज उपलब्ध करून देणे हि कामे केली जातात.     
मातंग ऋषीचे वंशज मानले जाणारे असल्याने आपल्याला मातंग म्हणवून घेतात. सूर्यचंद्राचे ग्रहण हे राहूकेतूने त्यांना गिळण्याचा प्रयत्न केल्याने होते, ही भावना आणि म्हणून, सूर्यचंद्राला मुक्त करण्यासाठी मातंग समाजाला दानधर्म केला जातो, ही पूर्वीची समाजातील भावना. या समाजातील मुलाचे वडील, हे मुलीच्या वडिलांकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातात. काहीवेळा लग्नात मुलीला मुलाकडून रक्कम द्यायची पद्धत आहे. लग्नांत गहू, तांदूळ एकत्रित बांबूच्या टोपलीत कुटण्याचा विधी असतो. सप्तपदी, आंबापूजन हा विधी लग्नांत असतो. शंकर, विष्णू, खंडोबा, बहिरोबा आदि दैवते असतात. पंढरपूरच्या यात्रेचे विशेष महत्व हे जाणतात.
अलिकडे मात्र आपल्या धर्मातील हे बांधव, मधल्या काळांत पूर्वीच्या चुकीच्या कल्पनांनी काहीसे दूर लोटले गेल्यासारखे झाले होते, ते जवळ आणण्याचा मनापासून, जाणीवपूर्वक आणि अभिनंदनीय प्रयत्न आपण सर्वांकडून होतांना दिसत आहे. याला प्रतिसाद, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, राजकीय पक्ष आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याआमच्यासारखे सामान्य लोक देत आहेत.

(उत्तरार्ध)

7.10.2019

Image may contain: 8 people, including Dnyaneshwar Desai Patil and Prashant Kodnikar


Image may contain: 2 people, including Dnyaneshwar Desai Patil
इसबगोल नीट भिजवून ते चांगले भिजून टम्म फुगले, की त्यांत चवीपुरता जमालगोटा टाकायचा, याची पेस्ट करून ती कांद्याच्या रसात कालवून, त्यांवर लाल मिरच्यांचे घट्ट पाणी मारावे. शेवटी चरचरीत हिंगाची फोडणी द्यावी. मग हा पदार्थ आवडीप्रमाणे खावा. याचा आपल्याला आलेला अनुभव अवश्य सांगावा.
—- हा पदार्थ कसा लागतो, या पदार्थाचे किंवा आपले, हा खाल्यावर पुढे काय होईल, हे आज सांगता येणार नाही. याच्या परिणामांचा डाटा गोळा करणे सुरू आहे. नांवसुद्धा अजून निश्चित केले नाही. प्राथमिक अवस्थेत असून, संशोधन सुरू आहे. 😀😀

‘गुपचूपच्या पुड्या’

इथं संभाव्य मित्रांच्या विनंत्या येतात. काहींचा परिचय निघतो, काहींच्या मित्रांचा परिचय निघतो, काहींचे विचार परिचयाचे असतात, काहींचे लिखाण सुंदर असते, काही छान कलाकार व संगीतप्रेमी असतात, काही निर्मळ मनाचे वाटतात आणि काही तर आपल्या परिवारातीलच निघतात. यापैकी कोणी असले, की यांची फार काही अडचण पडत नाही, विनंती स्विकारायला.
ही मात्र अडचणीची मंडळी असतात.
१. परिचयाचे काय घेऊन बसलात, उपद्रवी म्हणून चांगलीच परिचयाची असतात. हा परिचय पूर्वपरिचय असतो, किंवा त्यांची ‘भिंतच’ इतकी काही बरबटली असते, की ती भिंत बघीतली, तरी कायम लक्षात रहाते.
२. काहींचे नांव इतके, काही विचित्र असते, की वाचतांना त्रेधातिरपीट उडते. संस्कृत आणि तबल्याचे बोल, म्हणता येत असून पण, याचा काय उच्चार करावा किंवा काय होऊ शकेल, हा विचार करत पुढे जावे लागते.
३. काहींचे नांव वाचता येते, मात्र त्यांचा फोटो असा काही असतो, की चारचौघात जाऊ द्या, पण आपले आपल्यालाच बघतांना, अपराधीपणाचे वाटते. डोळे गच्च मिटून ती विनंती, पुढे ढकलतो.
४. काहींचे भिंतीवर फोटोच फोटो ! मग विविध नेत्यांचे, अर्थात त्यांना आवडणाऱ्यांचे फोटो, त्यांची भाषणे, त्यांचे विचार तथा सुविचार ! यांतील नेते मंडळी जर समविचारी असेल आणि भिंत जर निवडक विचार सांगणारी असेल, तरी हरकत नसते; पण अति असेल तर मी टाळतो.
५. काही भिंतीवर बऱ्याच वेळा इतरांवर टीका किंवा टीकेच्या नांवाखाली बेफाम शिवराळ भाषा आणि शिव्यांची बौछार ! आपला जन्म हा जगातील इतर सर्वांनी आपल्यावर कसा अन्याय केला आहे, त्यामुळे त्या समस्त जनतेला, त्यांच्या जातीधर्मावरून, आयाबहीणींवरून शिवीगाळ करण्याचा, आपल्याला कायदेशीर हक्क प्राप्त झाला आहे, अशी त्यांची धारणा असते. अशी भिंत असेल, तर तिच्यावर डोकं आपटण्याचा मी धोका पत्करत नाही.
६. काहींच्या भिंतीवर तर इतक्या काही देवदेवता दिसतात, की हे खाते आणि त्याचा खातेदार, हा या भूलोकीचा नसून, स्वर्गातील असावा आणि त्यांनी हे खाते तिथूनच उघडले आहे, ही पक्की भावना होते. अशा स्वर्गस्थ खात्यांच्या वाटेला जायची, माझी हिंमत होत नाही.
७. काही जण ‘देखण्या व सुंदर भिंतीवर’ अत्यंत मार्मिक, चटपटीतपणे प्रतिक्रिया देत असतात. काही प्रतिक्रिया तर एकापेक्षा जास्त अर्थ सुचविणाऱ्या असतात. शब्दार्थ, भावार्थ आणि ध्वन्यार्थ यांचा चांगला अभ्यास आहे, असे वाटत असलेली ही मंडळी, इतर मित्रांच्या भिंतीवर फिरकत पण नाहीत. इथं पण मी शांत बसतो, कारण आपली भिंत तशी ‘सुंदर व देखणी’ नाही, याची मला कल्पना आहे.
असे अजून पण प्रकार आहेत, पण मला आज सांगायचे आहे, ते ‘गुपचूपची पुडी बाळगत असलेले’ यांची भिंत ! यांची विनंती आली, की त्यांच्या भिंतीवर जावे. तिथं काय दिसते ? त्यांचे नांव, गांव, वय, पत्ता, शिक्षण वगैरे काहीही नसते. पोस्ट पण दिसत नाही. आपल्याला वाटते, यांनी फक्त ‘मित्रांसाठीच’ लिहीलेल्या असल्याने आपल्याला दिसत नसतील. स्वाभाविक आहे. फोटो सेशन करून काढलेले, त्यांचे बरेच फोटो, आपले लक्ष व चित्त वेधून घेतात. मात्र त्यांना पण ‘शेअर’ आणि काॅमेंट, लाईक काहीही करता येत नाही. त्यांच्या बंदोबस्ताचे आपल्याला कौतुक वाटते.
एवढ्या बंदोबस्तात व गुप्ततेने आपले सर्व साहित्य ठेवणाऱ्याची ही विनंती आपल्याला आली आहे, तर आपण बघावे तरी स्विकारून, म्हणजे समजेल काय आहे ते ! आपण विनंती स्विकारतो, आणि ती ‘गुपचूपची पुडी’ उघडतो, तो काय ? —— आंत पण काहीही नसते. आपण फक्त मित्र झालेले असतो. असं करून, त्यांना काय मिळते, ते माहीत नाही, मात्र मी असं झालं तरी, त्यांना दूर लोटत नाही. आपण लिहीलेलं जरा काही बरं वाटत असेल, म्हणून आले असतील, असा सोयीचा समज करून घेत, ते उपद्रव देत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसतो.
—- पण संभाव्य मित्रांनो, तुम्हाला जर माझे किंवा कोणाचेही खरोखर मित्र जर व्हावेसे वाटते, तर अशा ‘गुपचूपच्या पुड्या’ मित्रांसमोर कशाला बाळगता ?

6.10.2019

लंगडी एकादशी !

लंगडी एकादशी !
पूर्वी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती ही सर्वसाधारण यथातथाच, म्हणजे खाऊन-पिऊन जेमतेम असायची. त्यांच्या लेखी उपवास म्हणजे, हे जास्तीचे, न परवडणारे ओझे. त्यामुळे यासाठी वेगळे खाण्यासाठी जेवणाइतकेच, किंवा ‘एकादशी दुप्पट खाशी’ इतके बनविणे, हे फक्त बोलण्यापुरताच असायचे. शक्यतो उपवास करायचा, म्हणजे दिवसभर काहीही खायचे नाही, अशीच प्रत्यक्ष अवस्था असायची. उपवासाला सुकामेवा, खजूर, फळे वगैरे आणणे, ही मोठ्या घरच्या माणसांची मक्तेदारी, हा आपणा सर्वांचाच नाही, तर दुकानदाराचा पण समज ! उपवासाच्या दिवशी दुकानदाराला एखादवेळेस, आपण हट्ट करून आणायचा म्हणून, खजूर आणायला गेलो, अन् ‘खजूर’ मागीतला, तर ‘कारे, उपवासाला खजूर मागतोय ?’ हे तो आपल्याला अविश्वासाने विचारणार. नंतर कालौघात परिस्थिती सुधारली, आता त्याचे काही फारसे वाटत नाही. पूर्वी उपवासाला चालतात, असे फक्त ऐकलेले पदार्थ पण, आता प्रत्यक्ष खायला मिळायला लागले आणि आपण खाऊ लागले आहोत. असो.
आपल्या जेवण्यातील नेहेमीच्या खाण्याच्या पदार्थांपेक्षा, आपण उपवासाला जे पदार्थ खाण्यासाठी करतो, ते बहुतांशपणे वेगळे असतात. यांतील साबुदाण्याची खिचडी, भगर व आमटी, बटाट्याचे पापड, कीस व चकल्या, पाकातील रताळी, खजूर, शिंगाड्याची खीर व शिरा, विविध फळे वगैरे पदार्थ जरी, आपल्याला आठवले, तरी तोंडाला पाणी सुटते. अगदी पोटभर जेवल्यावर देखील, या पदार्थाचा नुसता करतांना वास आला, तरी तिकडे आपले लक्ष जाते, आणि शेवटी ते उपवासाचे केलेले, निदान घासभर तरी, खाऊन व चव बघीतल्याशिवाय, आपले समाधान होत नाही. ही मोठ्या माणसांची कथा ! लहान मुलांचे मग तर विचारूच नका ! त्यांचे तर घरी कोणाचा उपवास आहे, याकडे काटेकोर लक्ष असते. ज्यावेळी घरातील वडीलधारी मंडळी उपवास करतात, त्यांच्या घरी जर बाळगोपाळ मंडळी असली, की मग गमतीदार प्रसंग घडतात.
माझी आई बरेच उपवास करायची. सोमवार, मंगळवार, एकादशी हे तर वर्षभर, आणि या व्यतिरिक्त इतर नेहमीचे यशस्वी उपवास ! रामनवमी, हरितालिका, नवरात्र, महाशिवरात्र, दत्तजयंती वगैरे असायचेच ! त्याचा तिच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम व्हायचा, पण इतक्या वर्षांचे तिच्या मनाला व शरीराला लागलेले वळण, तिला सोडवत नसायचे. शेवटी कसेतरी मंगळवार तिला सोडायला लावले. सोमवार सोडायला तर, ती निक्षून नाही म्हणायची.
‘अरे, मी त्यावेळेस परळीला होते. तुझ्या जन्मापासूनच धरले आहेत. ते नाही सोडणार.’ शेवटी तिला व वडीलांना, दक्षिण भारत दर्शनास नेले असता, रामेश्वरमला नेले होते, तिथून सोमवार सोडायला लावले.
माझी मुलगी, तिच्या लहानपणी कायम माझ्या आईजवळ, म्हणजे तिच्या आजीजवळ असायची. रोज त्यांची दोघींची देवपूजा, देवाला हळदकुंकू वहाणे व नंतर एकमेकींना लावणे, तुळशीची पूजा - ‘तुळशी तुळशी एकादशी’ वगैरे म्हणणे, मग नैवेद्य, आरत्या, प्रदक्षिणा वगैरे, सर्व करणे तिच्या लक्षात असे. तिच्याकडून मनाचे श्लोक, रामरक्षा, शुभं करोति म्हणून घेणे. दिवसभर वेगवेगळ्या धार्मिक, ऐतिहासिक गोष्टी सांगणे. हे तिचेच काम ! मुलगी तर दिवसभर तिची पाठ सोडत नसे. आजीच्या अंथरूणावर पण, तिच्याशिवाय कोणालाही झोपायची परवानगी नसायची. मग तिचा उपवास असला, म्हणजे मुलीचे लक्ष त्यांवर ! तिला तिची आई लवकर जेवू घालायची, म्हणजे मुलगी खेळायला मोकळी. आईचा उपवास असला, की मग काही साबुदाणा खिचडी, पापड वगैरे जीभ चाळवणारे पदार्थ केले जायचे. तिच्यासमोर हे पदार्थ खाल्ले, की ती मागणार हे नक्की !
एकदा असेच झाले. आईचा उपवास होता, असावी बहुतेक एकादशी ! मुलगी जेवण करून खेळायला बाहेर गेली होती. फराळाचे पदार्थ केले होते. खेळून घरी आली, तो तिच्या आजीचा फराळ चाललेला.
‘आई, मला पण दे !’ मुलगी.
‘अग, तुझं जेवण झालं, आता कसली खिचडी मागतेय !’ तिची आई.
‘मला पाहिजे, नाहीतर मी रडते.’ मुलगी. ती अगदी सांगून सवरून रडायची, लोळायची, पाय आपटायची !
‘अग, त्या पोरीला कशाला रडवतेय ? घेऊ दे माझ्यातली थोडी !’ तिची आजी, म्हणजे माझी आई.
‘अहो, तुमचा उपवास आहे. तिचे जेवण झालंय ! तिच्या पोटात जागा नसेल, उगीच मागते आहे. चाळा म्हणून ! तुमची कशाला कमी करताय ? सौ.
‘मी पण उपास करते, आजीसारखा ! आता मला खिचडी दे.’ मुलगी पिच्छा सोडायला तयार नव्हती.
‘मला का इतकी जाणार आहे ? हं, हे घे ! आता माझ्या सारखा उपवास करावा लागेल बरं ! संध्याकाळीही उपवासाचे खाऊ ! आईला म्हणावं, ‘माझा उपवास आहे, आजीसारखा !’ मुलीची आजी. तिने खिचडी वाटीत घेतली, खाल्ली आणि पळाली ! तिला काय समजणार ?
संध्याकाळी असंच काही झालं, का पाहुणे आले, पण तळण करावं लागलं ! तळलेले पदार्थ अपायकारक जरी असले, तरी खायला सगळ्यांनाच आवडतात. मुलीने बघीतले, मुकाटयाने वाटीत घेतले आणि खाल्ले. संध्याकाळीही उपवासाचे केले, तर पुन्हा हाच सकाळचाच गोंधळ ! तिला पुन्हा हवे होते.
‘तुला सकाळीच सांगीतले होते ना, संध्याकाळीही आपण खावू म्हणून !’ तिची आजी, नातीला समजावीत होती.
‘काही देऊ नका तिला ! तिने आताच केले होते, ते भजी, पापड खाल्लेय ! तिचा कसला उपास आणि कसली एकादशी ! अशी कुठं एकादशी असते ? मोडली एकादशी तिची !’ सौ.
झालं ! मुलीने भोंगाच काढला ! अजिबात ऐकेना ! तिची आजी समजावतेय, पण नाही ! एकादशी मोडली, हे सहन झालं नसावे. मग आईच्या काय डोक्यात आले, कुणास ठाऊक ?
‘तुझ्या आईला म्हणा, माझी ‘लंगडी एकादशी’ आहे. लहान मुलांना चालते.’ आई.
माझी मुलगी कितीही मोठ्याने रडत असली, तरी आसपास कोण काय बोलते आहे, इकडं तिचे नीट लक्ष असायचं ! अगदी सावध ! तिने ‘लंगडी एकादशी’ हा शब्द ऐकला, आणि रडणं जरा थांबवले.
‘लंगडी एकादशी, म्हणजे काय ?’ मुलगी.
‘अग, लंगडी एकादशी म्हणजे ‘लंगड्या बाळकृष्णाची’ लंगडी एकादशी !’ आई तिच्या नातीला.
‘लंगडा बाळकृष्ण ? कुठं आहे ?’ मुलगी.
‘देवघरात बघून ये बाळकृष्णाला ! कसा आहे तो ?’ आजीने बाळकृष्ण बघायला सांगीतलं. ती बघून आली.
‘तो उभा नाहीये आणि मांडी घालून बसला पण नाही. त्याच्या हातात काहीतरी आहे.’ मुलगी.
‘अग त्याच्या हातात लाडू आहे.’ आजी. हातात लाडू आहे, म्हटल्यावर तिला हसू आलं. तिला लाडू भयंकर आवडतात. वातावरण निवळलं !
‘या बाळकृष्णाला उभं रहाता येत नाही, म्हणून हा ‘लंगडा बाळकृष्ण’ आणि याने केलेली एकादशी, ती कोणाची आणि कशी ?’ आई.
‘लंगड्या बाळकृष्णाची एकादशी !’ मुलगी.
‘अग, पण आपल्याला उपवासाला लाडू चालतो का ? नाही चालत ! पण या लंगड्या बाळकृष्णाला चालतो. मग लाडू खाऊन केलेली एकादशी, ती लंगडी एकादशी !’ आई.
पापड, कुर्डया, भजे आणि लाडूसारखे पदार्थ उपवासाला चालत नाही, हा तर मुलीच्या दृष्टीने अन्यायच होता. त्यामुळे उपवासाला हे सर्व चालते, फक्त नंतर आजीबरोबर साबुदाण्याची खिचडी खाल्ली, की पुन्हा उपवास सुरू ! ही ‘लंगड्या बाळकृष्णाच्या लंगड्या एकादशीची’ कल्पना तिला एकदम आवडली.
‘माझी ‘लंगडी एकादशी’ आहे. मी आता ‘लंगडी एकादशीच’ करत जाईन.’ मुलीने जाहीर केले.
‘लहान मुलांसाठीच ‘लंगडी एकादशी’ असते. मोठ्या माणसांसाठी नुसती एकादशी. तिला काही अर्थ नसतो.’ तिची आजी तिच्या नातीला.
‘आण गं, तिला थोडी खिचडी वाटीत !’ मुलीची आजी, तिच्या सूनेला ! मुलीला इतकं काही बरं वाटलं !
त्यानंतर बरीच वर्षे गेली. तिला लंगडी एकादशी अजून आठवते. घटना आणि गोष्टी छोट्या असतात, त्यातून मनाला होणारा आनंद किंवा पडणारे चरे, वेदना, आयुष्यभर पुरणाऱ्या असू शकतात. आपल्या मागची एक पिढी यासाठीच असते, आपल्या पुढच्या पिढीचा सांधा, आपल्याला नीट जोडून द्यायला. सांधा सुटायला नको, त्यांच्या अगोदरच्या पिढीने पण हेच काम केलं असतं ! निरागस जिवाला, अशी अचानक होणारी फसवणूक, पेलवणारी नसते, उन्मळून पडू शकतात ती ! किरकोळ कर्मकांडाच्या मागे लागून, ही उमलती बालमने उध्वस्त करणं बरोबर नाही ! हे मागच्या पिढीला बरोबर समजतं, त्यांचा एका पिढीचा अनुभव असतो.
मध्यंतरी मी ‘लंगडी एकादशी’ शब्द इथं कुठं लिहीला. काहींची या शब्दावर भिवई उंचावली, आणि मग ही जुनी घटना आठवली.

4.10.2019
लहानपणी काहीही प्रश्न विचारतात मोठी माणसं (वयाने मोठी), मला पण विचारला.
‘सांग, ‘अक्कल बडी, क्या भैस बडी?’
आता कोणाचीही अक्कल दिसण्यासारखी नव्हतीच ! दिसण्यासारखी होती ती म्हैसच ! आणि ती दिसत पण होती. उगाच खोटं कशाला सांगू ?
तेव्हा उतावीळपणे उत्तर देण्याऐवजी, क्षणभर थांबलो, अन म्हटले -‘दोन्ही दाखवा !’ यांत काय चुकीचे आहे ? पण काय बोलणे पडले म्हणून सांगू ?
—- अहो, नसेल तर दाखवता येणार नाही, हे समजते. भले तर, नका दाखवू ! पण पाणउतारा कशाला ?
तात्पर्य - कोणालाही वरवर सोपे वाटणारे प्रश्न विचारू नये, भलतेच अडचणीचे उत्तर येते.

2.10.2019

राग - दुर्गा

राग - दुर्गा
आपल्याकडील काही सणवार असे असतात, की ते एकटे येत नाही, तर येतांना, हा भलामोठा आपल्या आठवणींचा गोतावळा, आपल्यासोबत घेऊन येतात. या आठवणी आपली पाठ सोडत नाही. वास्तविक आपण कुठेही परगावी गेलो, कोणत्याही वेळी गेलो, तरी ज्या दिवशी जो सण यायचा, तो येणारच ! त्यांत कसला बदल होणार ? खरंय ! त्यांत कसला बदल होणार ? पण असे असले तरी, झालेला बदल, आपणा सर्वांना नक्कीच जाणवतो. हा बदल होतो, तो सण साजरा करणाऱ्या माणसांत, त्याच्या वेगळ्या पद्धतीत, आणि म्हणून पद्धत बदलली, की त्यांच्या होणाऱ्या आठवणींत, त्यातून मिळणाऱ्या आनंदात किंवा वेदनेत, दुःखात आणि उणीव जाणवते, ती याचीच !
आमच्या गांवात गोतावळा जमायचा, तो दोन कारणांमुळे ! तो म्हणजे पुरूषांसाठी तीर्थप्रसाद पानसुपारी आणि स्त्रियांसाठी हळदीकुंकू ! स्त्रियांना एकत्र जमायला, आपल्याकडे हळदीकुंकवाचे कार्यक्रम, इतक्या काही विविध कारणांमुळे होतात, आणि त्याचे इतके काही विविध प्रकार असतात, की विचारू नका. या शिवाय इतर पण खूप सण-उत्सव-समारंभ असत. यांत कोणाचे बारसे, कोणाचे डोहाळजेवण, मंगळागौर, हरतालिकेचे जागरण, कोजागिरी पौर्णिमेच्या भुलाबाई, तसेच रामनवमी उत्सवात होणारे सीतादेवीचे डोहाळजेवण, नवरात्रोत्सव ! या निमीताने, महिलावर्ग घराबाहेर पडतो, बाहेर मोकळ्या वातावरणांत, मोकळेपणी गप्पागोष्टी होतात, मनांतील काही घुसमट असेल, तर कोणाजवळ बोलता येते. मन हलके होते, उत्साहाने भरून जाते. त्यांच्यातील कलागुणांना जर काही क्वचित वाव मिळत असेल, तर तो इथं या घरगुती कार्यक्रमांत.
मी असे काही कार्यक्रम असले, की लहानपणी आईबरोबर जायचो, तशी प्रत्येकी बरोबरच तिच्या हाताशी माझ्या वयाचे, त्यावेळी कोणीतरी असायचेच. मग तेव्हा काहीबाही गप्पा कानावर पडायच्या. त्यावेळी त्याचा अर्थ समजत नसे, आणि मुख्य म्हणजे त्याकडे लक्षपण नसे. एक मात्र ठळकपणे लक्षात आहे, की आईला प्रत्येक ठिकाणी गाणे म्हणायचा, हमखास आग्रह व्हायचा. तिथे उपस्थित असलेले सर्व महिलामंडळ असल्याने, तिला तसा संकोच नसायचा. दोन-चार गाणी मात्र वेळप्रसंग पाहून, ती नेहमी म्हणायची. हरितालिकेचे रात्रीचे जागरण असले, की ‘शंकर बोले पार्वतीशी सारीपाट मांडू या’ हे गाणं असायचं. कुठं डोहाळजेवण असलं तर, ‘काल पाहिले मी स्वप्न गडे’ हे गौडसारंग रागातील गीत, रामनवमीच्या उत्सवात दर्शनाला गेल्यावर मंडपात, पहाडी रागातील ‘रामनाम जप’ ही चीज, तर महालक्ष्मी किंवा नवरात्रीच्या वेळी हळदीकुंकवाचे वेळी, शंकरा रागातील, ‘जय देवी अंबिका’ ही चीज असायची. तिचा शास्त्रीय संगीताचा व्यासंग होताच. ती कला अशा काही प्रमाणांत, त्या आमच्या छोट्या गावांत सादर करायची.
केव्हातरी मी विचारायचो तिला, की ‘या तुझ्याकडे गाणं शिकायला येणाऱ्या मुलींना, तुझ्या सारखेच का म्हणता येत नाही ? तू त्यांना असे सोपे सोपे राग का शिकवते ? जरा चांगले राग शिकवायचे ?’ ती फक्त हसायची, ते माझ्या प्रश्नावर, का माझ्या अज्ञानाला, का मला, कोणास ठाऊक ? पण मुलाला हसणारी नसेल ती ! आपल्या विद्यर्थिदशेत कमालीचे कष्ट सहन करत, विद्या मिळविणारी, कोणी अज्ञानी राहू नये म्हणून झटणारी, माझ्या अज्ञानाला कशी हसणार ?
‘अरे, सर्व राग चांगले असतात. कोणता राग भारी नाही, आणि कोणता हलका नाही. आपण तो राग, गातो कसा, सर्व यांवर अवलंबून आहे. तू विद्यार्थ्याला सर्वप्रथम शिकवला जाणारा ‘भूप’ ऐक ! त्या नंतर शिकवला जाणारा ‘दुर्गा’ ऐक, सारंग एक ! खमाज, काफी, देस, भीमपलास किती सांगू रे ? बघ, चांगला गाणारा असेल, तर भूप ऐक, ऐकतांना बैठक मोडणार नाही तू, एकदा बसला की !’ ती सांगायची.
खरं आहे. परमेश्वराने निर्माण केलेले, हे सप्तसूर वाईट कसे असतील ? आपल्याला गाता येणार नाही, म्हणून त्यांना कसे नांव ठेवणार ?
सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे ! माता दुर्गेचे उत्सवाचे हे दिवस, सर्व वातावरण भागवतीमय झालेले. मराठी, हिंदी भाषेतील विविध गाणी आपल्या कानावर पडत असतात. तालस्वरात म्हणनारे गुरुजी असतील तर, आपली पूजासुद्धा छान तालात म्हणतात, ऐकायला छान वाटते, आपल्या मनांत मुळातच स्वरताल भिनलेला असतो, आपल्याला त्याची कल्पना नसते. आता नवरात्रात दुर्गापूजा, सप्तशतीचे पाठ सुरू असतात. आता मुद्दाम सांगायचे तर, आपल्या देवीच्या अनेक नांवांपैकी, एका नांवाचा राग आहे - दुर्गा ! नवरात्र सुरु झाल्यापासून हा राग आपोआप डोक्यात येत आहे, स्वर गुणगुणले जात आहेत. सध्याचे नवरात्रीचे दिवस पाहून वाटते, आपल्याला पण या स्वरसाधनेतील दुर्गा देवीच्या पूजेत सामील करून घ्यावे.
या रागाची आपल्याला तांत्रिक माहीती असावी, यासाठी सांगतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ‘दुर्गा’ हा राग, ‘बिलावल’ थाटातून निघतो. बिलावल थाटाचे पूर्वीचे ग्रंथातील नांव, ‘धीरशंकराभरण’ हेआहे. या थाटातून बावीस रागांची निर्मिती होते, असे ग्रंथकार सांगतात. 'गावत दुर्गा रागिनी’ हे पं. शंकरराव व्यास, यांनी रचलेले लक्षणगीत !
रात्री गायल्या जाणाऱ्या रागातील लोकांना आवडणारा, मधुर वाटणारा हा राग आहे. या रागाची प्रकृती गंभीर म्हणता येणार नाही, किंवा चंचल म्हणता येणार नाही. कर्नाटक संगीतातील ‘शुद्ध सावेरी’ या रागाशी साधर्म्य सांगणारा हा राग, मात्र दोन्ही रागांचे चलनवेगळे आहे. कर्नाटक संगीतातून जरी हा राग आला असला, तरी उत्तर हिंदुस्थानी संगीतात चांगलाच लोकप्रिय झालेला हा राग आहे. ओढव जातीचा हा राग, म्हणजे या रागात पाच स्वर उपयोगात आणतात. सर्व स्वर शुद्ध लागतात. याच्या गायनाची वेळ सायंकाळीउशीरा ते रात्रीचा पहिला प्रहर ! पूर्वांगप्रधान असलेला हा राग आहे.
आरोह - सा रे म प ध सा
अवरोह - सा ध प म रे सा
पकड - रे म प घ, म रे
वादी - धैवत आणि संवादी - रिषभ
वर्ज्य - गंधार आणि निषाद
हा खूप वर्षांपूर्वी विदुषी गंगूबाई हंगल, यांचा ऐकायला मिळाला होता मुंबईला ! नंतर पुण्याला पं. जसराज यांचा ऐकला होता. अत्यंत सोप्या रागातून काय अप्रतिम चित्र उभे करतात, ही कलाकार मंडळी ! हा राग गायल्याने, ऐकल्याने आपली आत्मविश्वासवृद्धी करणारा आहे, ही भावना आहे. स्वाभाविक आहे, माता दुर्गेच्या नांवाने असलेला हा राग, आत्मविश्वास देणाराच असणार, यांत शंका नाही. भगवतीची कृपा झाल्यावर, या जगतात अशक्य काय आहे ? भगवतीची आपण निसर्गात असंख्य रूपे पाहतो. खळखळ वाहणारी नदी, हे देवीचेच रूप आहे. आपल्या पाडसाला दुग्धपान करणारी कामधेनू, आणि आपल्या कृपेची आयुष्यभर आपल्याला छाया देणारी ही शैलपुत्री, यांत काय फरक आहे ? जगताचे मातृत्व स्विकारणारी, जगातील सर्व प्रजा पुत्रवत मानणारी, ही जगदंबा, या स्वरसाधनेने अवश्य प्रसन्न होईल. संगीताचे स्वर निर्माण करणारी, देवी सरस्वतीच्या रूपात आपल्याला साक्षात्कार देणारी, ही स्वरदायिनी माता दुर्गेचेच रूप आहे.
आज आपल्या समोर शास्त्रीय संगीतातील गायकांनी गायलेला, तसेच वाद्यावर वाजविलेला 'दुर्गा' राग आणि या रागावर आधारलेली काही गीते आपल्यासमोर ठेवत आहे.
(आपल्याला पोस्ट आवडली असल्यास शेअर करायला हरकत नाही. )

















1.10.2019
आता नुकतीच माझ्या वाचण्यात, श्री. बिपीन राजन कुलकर्णी यांची डाॅ. काफील खान, या उत्तर प्रदेशातील डाॅक्टरच्या निर्दोषत्वाचे जे वृत्त येत आहे, त्याबद्दलची पोस्ट आली. डाॅक्टर काफील खान, यांच्या चौकशीची कोणतीही कागदपत्रे मी बघीतली नाही, अथवा त्यांच्या आजपर्यंतच्या सेवेचे रेकाॅर्ड बघीतले नाही. त्यांचे काम प्रत्यक्ष पण बघीतले नाही, त्यामुळे त्यांच्या संबंधाने काही मत व्यक्त करणे, ही कायद्याच्यादृष्टीने घाईचे ठरेल.
आज निवडणुका लढवून, लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले, आपल्या अवतीभोवती कितीतरी दिसतात. वारंवार पक्ष बदलून देखील, ते जनसेवा करायला तयारच असतात. त्यांतील अंतस्थ हेतू अगदी कोणासही समजेल इतका स्पष्ट असतो.
इथं मला, दुसरा पण महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता जनतेला लुटणाऱ्या टोळ्या झाल्या आहेत. याला वरदहस्त असतो, तो त्यांचे वरिष्ठ आणि सर्वोच्च म्हणजे शासन ! ही सर्व मंडळी एकमेकांच्या आधाराने समाजाला, जनतेला नागवत असते. यांच्यात पण काही अपवाद असलेली तुरळक मंडळी आहेत, त्यांना खड्यासारखे या यंत्रणेमधून वगळले जाते. त्यांना महत्वाचे काम दिले जात नाही. तरी नाईलाजाने एखादी व्यक्ती असलीच, तर त्याच्याविरूद्ध खोटीनाटी कुभांडे रचली जातात. त्याला सळो का पळो करून सोडले जाते, कालांतराने तो पण यांच्यात सामील होतो.
अशा सरळमार्गी, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बऱ्याच जणांना समस्या निर्माण होतात. यांच्याविरोधात सर्व जण जातपात, धर्म, पंथ, पक्षीय भेद वगैरे सर्व विसरून एक होतात. कोणाविरूद्धही अशा कायदेशीर चौकशा लावल्या जातात. अगदी कट्टर हिंदू वाटणाऱ्यांच्याविरूद्ध पण विभागीय चौकशा लावल्या जात होत्या, लावल्या जातात आणि कदाचित असंच चालू राहिले तर पुढे पण लावल्या जातील. इथं सरकारचा संबंध कमीच असतो, संबंध असतो, तो सरकारचे नाक, कान व डोळे असलेल्या यंत्रणेचा ! तिला जो माणूस अडचणीचा ठरेल, तिच्याविरूद्ध हे शस्त्र उचलले जाते. मात्र शस्त्र उचलल्याचा उच्चार सरकारकडून होतो. सरकार बदनाम होते, किंवा प्रसिद्ध होते.
——- प्रशासन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अहवालाची पर्वा, न करता सत्य शोधून शिक्षा करणारा शासक विरळा ! माझ्याजवळ कित्येक उदाहरणे आहेत. अडचण ही, की आपल्याकडे न्यायालयांत सिद्ध झाल्यावरच, त्याला सत्य समजले जाते, तोपर्यंत ते काय असते, परमेश्वरच जाणो. मात्र त्या बिचाऱ्याचे आयुष्य जवळपास संपून जाते, त्या जिवंतपणीच्या मरणयातना भोगता भोगता !

28.9.2019


आज पुणे विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डाॅ. शं. ना. नवलगुंदकर यांचा जन्मदिन ! त्यांना नमस्कार आणि त्यांच्या दीर्घारूरोग्याची परमेश्वराजवळ प्रार्थना ! अत्यंत निगर्वी, प्रेमळ आणि त्यांच्या विषयासोबत, ज्योतिषशास्त्रात पण गती, असलेले व्यक्तीमत्व ! मी पुण्याला बऱ्यापैकी अधूनमधून जात असे, त्यावेळी त्यांच्याकडे शक्यतोवर एक फेरी असे. अलिकडे तसे जाणे कमी, आणि गेले तर धावपळीचे ! त्यामुळे विशेष असे कुठे जाणे होत नाही.
ते एकदा व्याख्यानानिमीत्ताने रावेर भागांत आले होते. त्यांना घरी बोलावले. जेवायच्या वेळी, माझी मुलगी हटली. ‘त्यांना मी जेवायला वाढणार !’ अडीच-तीन वर्षाच्या मुलीचे वाढणे ! डोळ्यांसमोर काय होईल, ते उभे राहिले. आम्ही तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. ती ऐकेना. मग तेच म्हणाले - ‘माझी नात पण अशीच करते. वाढू द्या. मी खातो.’ मग तिच्या हाती एकेक पदार्थ थोडाथोडा सोपवत, ती वाढत होती, आणि सर जेवत होते.
आज इथं त्यांच्याबद्दल श्री. उपेंद्र चिंचोरे यांनी लिहीलेली पोस्ट वाचली, आणि सरकन त्यांच्या वीस-बावीस वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यांसमोर सरकून गेल्या. एक अगदी घरगुती, त्यांच्यातील प्रेमळपणा दाखवणारी आठवण !

27.9.2019

Image may contain: 1 person

काल व आजचा दिवस नागपूरला होतो.

काल व आजचा दिवस नागपूरला होतो. काम आटोपल्यावर जरा वेळ आहे, तर काही जणांना भेटायचे ठरवले होते. हा माझा नेहमीचा शिरस्ता ! काहींना आवडतो, काहींना आवडत नाही, काहींना विनाकारण वाटतो, तर काहींना आवश्यक वाटतो. मात्र कोणाला काही वाटले, तरी पूर्वीपासूनची माझी माणसं जमवण्याची, आणि ती टिकवून ठेवण्याचा, निदान आपल्याकडून प्रयत्न करण्याची सवय जडली आहे. असो.
काल मला इथं, फेसबुकवर भेटलेले, माझ्या व्यवसायातीलच व्यवसाय बंधू, श्री. अतुल सोनक यांना मी नागपूरला असल्याचे कळवले. त्यांनी ‘घरीच या’ म्हणून निमंत्रण दिले. कोणत्याही वकीलाला, दुसऱ्या वकीलाकडे गप्पागोष्टी करायला, जायचे असेल तर कसला संकोच वाटत नाही. त्यांच्याकडे गेलो, त्यांची भेट झाली. बऱ्यापैकी मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यांना माझे घरी औरंगाबादला येण्याचे निमंत्रण देऊन परत आलो.
‘फोटो काढायचाच का ?’ या त्यांच्या प्रश्नावर ‘काही काळजी करू नका, आपण जसे असतो, तसाच फोटो येतो’ हे उत्तर देत, फोटो काढला.

27.9.2019

Image may contain: 2 people, people sitting and beard
बनारस घराण्याचे, विख्यात तबलावादक, पद्मविभूषण कै. पं. किशन महाराज, यांचा जन्म गोकुळ अष्टमीचा, म्हणून त्यांचे नांव ‘किशन’ ठेवले.
घरांत साक्षात नादब्रह्म अहोरात्र वास्तव्यास असलेले. ज्या वयात लिखाणाचा श्रीगणेशा करायचा, मुळाक्षर गिरवायचे, त्या वयांत ते, विषम संख्येच्या मात्रांच्या तालाची मेहनत तबल्यावर घेत असायचे; तालाचे गणित पक्के होण्यासाठी ! या तालांची तयारी असली, की सम संख्येच्या मात्रांचे ताल वाजवायला सोपे वाटतात. आपण तिप्पट, दीडपट वगैरे लयींचा रियाज केला, की दुप्पट, चौपट वाजवतांना समेचे गणित चुकत नाही. डोक्यात लय पक्की भिनते.
लयकारीतील अद्वितीय मराठी नांव म्हणजे, कै. खाप्रुमामा उपाख्य लक्ष्मणराव पर्वतकर ! यांना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. १९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' हि पदवी दिली. लयीच्या ज्ञानामुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत.
आपणास तंतवाद्य, सुषिर वाद्य, तसेच नृत्याची साथ करायची असेल, तर तबलावादनाची लयीवर हुकूमत हवी. कोणत्याही मात्रेपासून तिहाई उचलायची, तर जशी वादन तयार हवे, तसेच लय डोक्यात पक्की भिनलेली हवी, त्यावेळी आपल्याला आपण त्या तालाच्या कोणत्याही मात्रेवर असले, तरी सम डोळ्याला समोर दिसत असते, आणि आपल्याला दिसत असली, तरच श्रोत्यांना वा प्रेक्षकांना दाखवता येते.
आज तबल्याची आणि तालाची आठवण केली, ते येथील मित्र श्री. सुधन्वा कुलकर्णी यांनी ! त्यांच्या भाजी निवडण्याच्या पोस्टवरून मला, चिवळ निवडायला घ्यावी, म्हणजे सर्वच भाज्या निवडणे सोपं वाटायला लागेल, हे सुचलं ! —- आणि आठवले पं. किशन महाराज आणि लयभास्कर खाप्रुमामा उपाख्य लक्ष्मणराव पर्वतकर !

https://www.youtube.com/watch?v=esoEFSDFfeM&feature=share&fbclid=IwAR1f_JwPG-CecsfE9x3C7sXocEdd5_ct633CfyhoHTiQBvXiV7dIXxFuQqE

22.9.2019

कोर्टातील साक्ष आणि विंचवाची टेकडी !

कोर्टातील साक्ष आणि विंचवाची टेकडी !
रावेर हे तालुक्याचे गांव, इथं पूर्वी न्यायालय नव्हते, नंतर बहुतेक १९६२-६३ च्या दरम्यान केव्हातरी आले. मात्र न्यायलय जरी आले, तरी सर्व सोयीसुविधा नव्हत्या. स्वतंत्र इमारत नव्हती, तर तहसीलदार यांच्या इमारतीत न्यायालय आणि तालुक्यांतील जवळपास सर्व खात्यांची कार्यालये होती. अर्थात ही परिस्थिती सर्वदूर असल्याने, कोणाला त्यात काही विशेष वाटत नसे; किंबहुना ते जनतेच्या दृष्टीने सोयीचे असे.
अलिकडे प्रत्येक न्यायाधिशासाठी एक किंवा दोन, स्वतंत्र लघुलिपीक असतो आणि इतरही बऱ्यापैकी कर्मचारीवृंद असतो. मात्र तिथं न्यायालय सुरू झाले, तेव्हा काही काळ, तर तेथील न्यायाधीश, पुरावा व युक्तीवाद संपल्यानंतर देण्यात येणारे, न्यायनिर्णय हे आपल्या हाताने लिहीत असत. अशा विपरीत परिस्थितीत न्यायव्यवस्था त्यावेळच्या न्यायाधीशांनी सांभाळली आहे, तिची विश्वासार्हता जपली आहे.
मी ज्यावेळी, म्हणजे सन १९८५ साली वकिली सुरू केली, त्यावेळी तिथं एकच न्यायाधीश होते. काम प्रचंड प्रलंबित होते. दिवाणी दावे तर जवळपास दहा वर्षांचे प्रलंबित, तर फौजदारी काम जवळपास पाच-सात वर्षांचे पडून होते. एकटा माणूस काम किती करणार, हे जसे कारण होते; तसेच न्यायालयात तक्रार घेऊन गेले, तर आपल्याला न्याय मिळेल, ही भावना होती. त्यामुळे न्यायनिर्णयास वेळ लागला, तरी लोक थांबत असत. चांगूलपणावर आजपेक्षा जास्त विश्वास होता.
वकिलसंघ म्हणजे ‘बार रूम’ ही एका खोलीची, दोन चौक्याची ! दोन वकिलांनी काम चालविण्यास सुरूवात केली, की बाकीच्यांना आराम असे. कोणा वकिलांचा शिपायाने पुकारा केला, की लक्षात येई, सध्या सुरू असलेले काम संपले. मग ज्याचे पुढील काम असे, ती वकिलांची जोडी जाई. कोणी पक्षकार आला, की ते काम संपल्याशिवाय त्याला भेटता येत नसे. एखाद्या पुढचे काम असलेल्या वकिलांना, काम चालविण्याचा कंटाळा आला, की तो हमखास म्हणे, ‘आता मधल्या सुटीपर्यंत बाहेर येऊ नका.’ दुपारून दुसरी कामे लागायची. आमची जेष्ठ मंडळी तर नेहमी म्हणायची, ‘आपल्याला जी फी मिळते, त्यातील निम्यापेक्षा जास्त फी, ही कोर्टात पक्षकारांसाठी बसून रहाण्याबद्दल असते. मात्र ते काही असले, तरी एकदा का साक्षीदाराची साक्ष सुरू झाली, की कसलेल्या वकीलाला चेव येतो. स्वत: अत्यंत शांत राहून, मात्र साक्षीदाराला संताप आणून, बावचळून टाकत, उलटतपासणीत उलटापालटा करत, वेडीवाकडी उत्तरे मिळवली, की आपल्याला यश मिळण्याची खात्री वाढायची. हे बोलायला किंवा लिहायला, जरी सोपे वाटत असले, तरी त्यासाठी आपल्या केसचा व अनुषंगिक कायद्याचा सखोल अभ्यास, सत्य घटना काय आहे याची माहिती, साक्षीदाराची मानसिकता व तो कितपत सत्य जाणून आहे, आणि सर्वात महत्वाचे आपले तारतम्य !
एकदा अशीच न्यायालयात साक्षीदाराची साक्ष सुरू होती. साक्षीदार हा पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ मधील साक्षीदारासारखा होता. त्याला त्या दाव्याबद्दल प्रश्न विचारला, की ‘दाव्यांत केलेल्या विविध विधानांबद्दल तुमचे काय म्हणणं आहे ?’ त्याने तीन-चार प्रश्नांची सरळ उत्तरे दिली, नंतर मात्र त्याचा संयम सुटला असावा. पुन्हा पुढचा प्रश्न विचारल्यावर मात्र, त्यांवर त्याने मोठे मासलेवाईक उत्तर दिले.
‘साहेब, आम्ही गरीब माणसं ! आम्हाला ही कायद्याची भाषा काही समजत नाही, पण याच्या दाव्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारताय, तर हा दावा म्हणजे, आमच्या गांवच्या विंचवाच्या टेकडीसारखा आहे.’
‘विंचवाची टेकडी ?’ माझ्या तोंडून आपोआप विचारले गेले. त्याला ते अपेक्षितच होते.
‘काय आहे साहेब, आमच्या गांवाला नदीकाठी एक टेकडी आहे. तिथं तुम्हाला असे बघीतले, तर विंचू दिसणार नाही. मात्र तुम्ही एखादा दगड उचला, त्याखाली विंचू दिसेल. दुसरा उचला, तिथं विंचू ! अजून तिसरा उचला, पुन्हा विंचू ! कोणताही दगड उचला, बहुतेक विंचू दिसतोच ! आता नदीकाठी आहे, जनजनावर, विंचूकाटा असायचाच ! मग गांवातले लोक, त्या टेकडीला विंचवाची टेकडीच म्हणायला लागले.’ त्याने स्पष्टीकरण दिले.
‘पण त्याचा इथं काय संबंध ?’ मी विचारले. हे पण त्याला अपेक्षितच होते.
‘काय साहेब, तुम्ही मला इतकं विचारताय, या सामनेवाल्याने केलेल्या दाव्याबद्दल, की मला ती ‘विंचवाचीच टेकडी’ आठवली. तुम्ही त्या दाव्यातले काहीही विचारा, दावाच इतका खोटा लिहीलाय, की आता काय सांगू, कायकाय खोटं आहे म्हणून ? जे वाक्य विचारताय ते खोटं आहे. दोन-चार उत्तरे दिली. पण किती सांगणार ?’ त्याने निर्विकार चेहरा करत उत्तर दिले.
न्यायालयांत हसण्याचा खकाणा उडाला.
काल इथं कोर्टात बसलो होते. एक दुसरे काम सुरू होते, त्यांना जामीन हवा होता. बरीच अफरातफर होती, आणि बरीच मंडळी अडकलेली दिसत होती. ते काम संपल्यावर माझे काम निघणार होते. त्यामुळे ते काम संपेपर्यंत थांबणे भाग होते. त्या कामातील विविध घटना, तपशील बराच होता. आरोपींनी बऱ्यापैकी, वेगवेगळ्या पद्धतींनी फसवले होते. आरोपींच्या वकीलांनी त्यांच्यादृष्टीनी सोयीचा युक्तीवाद केला. सरकारी वकील उठले. त्यांनी युक्तीवाद केला. न्यायाधीशांस काही शंका आली, की ते विचारायचे, तर त्या उत्तरातून आरोपीने कशा पद्धतीने फसवले ते पुढे यायचे. दुसरी शंका आली, तर दुसऱ्या पद्धतीने फसविल्याचे समोर यायचे. असे तीनचार वेळा झाल्यावर, मात्र न्यायाधीशांना पण हसू आले, आणि तिथं बसलेल्या वकीलांना पण ! तिथं बसलेल्या वकिलांना मी बोलून गेलो, ‘विंचवांच्या टेकडीची कथा दिसतेय !’ त्यांनी आश्चर्याने विचारल्यावर ही आठवण सांगीतली.
(पोस्ट आवडली असेल, तर ‘शेअर’ करण्यास हरकत नाही)

20.9.2019