Thursday, June 27, 2019

’पवार नांवाचा करिष्मा आणि महिमा’

’पवार नांवाचा करिष्मा आणि महिमा’ हा मा. शरद पवार यांच्यावर सुंदर लेख जेष्ठ पत्रकार व लेखक श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी लिहीलेला आहे. तो वाचला.
राजकारणी लोकांबद्दल एक वैशिष्ट्य असते, ते म्हणजे प्रतिस्पर्धी पक्ष वा सहकारी पक्ष, नोकरशाही, व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग आणि कोणतीही जात नसलेली ही सर्वसामान्य जनतेला यांचा येणारा अनुभव आणि त्यामुळे निर्माण झालेली, त्यांच्याबद्दलची प्रतिमा ही वेगळी असू शकते; परस्पर विरोधी असू शकते. त्यातून त्याने आपल्या राजकीय वर्चस्वासाठी दिलेली साद, आणि त्याला मिळणारा प्रतिसाद व प्रतिसाद देणारा गट, ही त्याची एकंदरीत प्रतिमा ठरवत असते. शक्य आहे, की काहींना यापेक्षा वेगळा व चांगला अनुभव आलेला असू शकतो.
हा अजून एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे वाढत जाणारा जातीयवाद ! यांचा परिणाम एकमेकांविरूद्ध कडवट द्वेषात होत आहे, हे जाणवायला लागले आहे. सर्वसमावेशक राजकारणाच्या गप्पा करणाऱ्या राजकारण्यांच्या बोलण्यात आणि वर्तनात, परस्पर विरोध, आता अंधूक राहीलेला नसून, तो सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट झाला आहे.
कदाचित असे पण म्हटले जावू शकते, की याला सर्व राजकीय पक्षांनी कमीजास्त प्रमाणात हातभार लावला असू शकतो. असे जरी असले, मात्र ज्यांची सत्ता आहे, त्यांची जबाबदारी ही नेहमीच जास्त असते. काही अपवाद सोडला, तर बहुसंख्यवेळा हा सत्तेत असलेला पक्ष व त्या पक्षाचा नेता आहे.
काहीही असले तरी, राजकीय पक्षाची अथवा त्याच्या नेत्यांची प्रतिमा ही त्यांची तत्वे, धोरण यांवर जशी असावयास हवी, हे अपेक्षित असते; त्यापेक्षा जास्त त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनावर अवलंबून असते.

15.3.2019

राग - काफी

राग - काफी
काल फाल्गुन पौर्णिमा’ म्हणजे ‘हुताशिनी पौर्णिमा’ म्हणजे ‘होळी’ झाली आणि आज ‘धुलिवंदन’ ! पंचमीला ‘रंगपंचमी’ ! हे सगळे रंगात बुडवणारे सण ! जीवनांत रंग भरणारे सण, जीवनांत रंग भरा, रंग उडू देवू नका, हे सांगणारे हे सण ! हे सण आपल्या समाजाने जगवले आणि जपले ! वर्षातल्या या शेवटच्या महिन्यात रंगोत्सव करून सरत्या वर्षाला निरोप देत, चैत्रपालवीने नववर्षाचे स्वागत करायला सज्ज अाहोत.
‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ आमच्या संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, ते काही उगाच नाही. लहानपणी आपल्याला ज्या आपल्या निरागसतेत, अज्ञानात, कल्पनेत आनंद असतो, तो मोठेपणी जरा समजायला लागले, जगाचा भलाबुरा अनुभव यायला लागला, की नाहीसा होतो, कमी व्हायला लागतो.
लहानपणापासून शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे रागांची नांवे आणि त्यांचे स्वर माझ्या कानावर पडत आले आहेत. घरात विद्यार्थ्यांना आई गाणं शिकवायची. ते शिकवले जातांना, माझा त्या रागाच्या नांवावरून, त्या रागाबद्दल काही विशिष्ट समज विनाकारणच व्हायचा. त्या रागाचे चित्र मनांत तयार व्हायचे.
एखादा स्वर कोमल असतो म्हणजे काय ? सर्व स्वरांत कोमल, अतिकोमल स्वर असतांना, फक्त मध्यमच फक्त तीव्र का ? बाकी कोणीच नाही, तीव्र नाही ? आद्य स्वर म्हणजे षड्ज आणि या स्वरांच्या सप्तकांतील पंचम हे फक्त एकच का ? यांत का बरे, कोमल आणि तीव्र नसावे ? जरा विचार करता यायला लागले की विचार थांबवता येत नाही. हे सात स्वरांचे कुटुंब आहे. बाकी सर्व स्वर म्हणजे ही पोरंबाळं ! काही वेळा सरळ वागतात, तर काहीवेळ हळवी होतात. बस, हळवी झाली की त्यांना कोमल म्हणायचं आणि अगदी रडवी झाली, की त्यांना अति कोमल म्हणायचं ! मात्र संतापात असेल तर तीव्र म्हणायचे ! त्यामुळे रिषभ, गंधार, धैवत व निषाद ही पोरं कोमल अतिकोमल होत असतील ! मात्र षड्ज आणि पंचम हे त्यांचे आईवडिल ! आईवडील एकच असतात, त्यांना बिचाऱ्यांना कोणताही मुलगा असो वा मुलगी असो, त्यांची जन्मदात्याची भूमिका बदलतां येत नाही. आईशिवाय कोणत्याही कुटुंबाची कल्पनांच तुम्ही करू शकत नाही. मुलांना जन्म देणारी ही माता, आदीशक्ती ! हो, अगदी भविष्यांत कोणताही मुलगा, बाप जरी होणार असला, तरी त्याची जन्मदाती आई असणारच ! मग ही आईची भूमिका आहे, ती षड्ज याची ! कोणताही राग घ्या, त्यात षड्ज असतोच ! मग पित्याची भूमिका आपोआपच येते ती पंचमाकडे ! कारण एखादे वेळेस शक्य आहे, कुटुंबात दुर्दैवाने पिता नसेल ! मात्र मग ते कुटुंब कसे केविलवाणे, पोरके वाटायला लागते. कुटुंबाला भरभक्कम असा, पित्याचा आधार हवाच ! मात्र काही वेळा दैवगतीपुढे इलाज नसतो, पित्याचे नांव पण सांगता येत नाही, अशी अवस्था असते. हे पुढे न्यायशास्त्राचा अभ्यास करतांना, स्पष्ट झाले. माता ही सर्वांना डोळ्याने दिसते. तिला ती माता आहे, हे सिध्द करावे लागत नाही. पित्याचे अस्तित्व हे गृहीत धरावे लागते. Maternity is fact when paternity is presumption ! पित्याचे छत्र जरी नसले, तरी मग या खंबीर मातेला दोघांची कर्तव्ये पार पाडावी लागतात. मातेचे कर्तव्य तर निसर्गाने जन्मजात दिलेले असतेच, मात्र पित्याच्या अनुपस्थितीत पित्याचे पण काम करावे लागते. मला मनांत काहीही यायचे, एकदा विचारांचा ओघ डोक्यांत सुरू झाला की तो आपल्याला कुठल्या कुठे घेवून जातो नाही !
राग भूपाली किंवा भूप म्हटले, की डोळ्यांसमोर शांत पवित्र वातावरण येते. अगदी सकाळच्या वेळी, सर्वांच्या अगोदर उठून, सुस्नात होवून घरातील सासुरवाशीण मर्यादेने वागत, अंगणात सडा-संमार्जन करते आहे. त्यानंतर छान रांगोळी काढते आहे. नंतर तुळशीला पाणी घालून, नमस्कार करत प्रदक्षिणा करते आहे. त्या घराला पावित्र्य देत आहे. भूप ऐकावा तर विदुषी किशोरी आमोणकर आणि पं. कुमार गंधर्व यांचा !
राग दुर्गा म्हटले की, नवरात्रातील रात्री नऊ दिवस जे आरतीच्या वेळी वातावरण असते, ते डोळ्यांसमोरच येत नाही, तर मनांत दिसू लागते. वातावरणांत वेगवेगळ्या सुवासांबरोबर, पावित्र्याबरोबरच, त्या मातेचे सामर्थ्य आपल्याला दैवी आधार देत असते. आपले हात न कळत आपोआप जोडले जातात. हा अनुभव विदुषी गंगूबाई हंगल यांचा दुर्गा ऐकतांना घेतला होता.
राग हिंडोल म्हटले, की मनांतल्या मनांत हिंदोळ्यावर बसून झोके घेत, एकदा या बाजूला आणि एकदा त्या बाजूला जात आहोत, असे वाटते. पं. भीमसेन जोशींचा ‘हिंडोल’ ऐकून असाच हिंदोळ्यावर झुललो होतो.
राग बागेश्री म्हटले की निसर्गाने आपल्या समृद्धीची उधळण केलेली आहे, पण माणसाने त्याला शिस्त लावत त्याचे उपवन, उद्यान, बाग केली आहे. आपण त्या बागेतून फिरतांना जे वाटेल, तसं वाटतं बागेश्री ऐकतांना ! ग्वाल्हेर घराण्याच्या गायक मंडळींचा हा आवडता राग असावा.
काफी म्हटलं की आपोआपच ‘काॅफीपान, चहापान’ आठवते. असे खोडकर वाटावे, हे नांव या रागाचे का असावे बरं ? हा मला नेहमी प्रश्न पडायचा. हा अर्थ मी मराठी असल्याने ! मात्र हिंदीत याचा अर्थ हा ‘खूप जास्त’ होतो. खरंच या रागांत गीतांचे जे विविध प्रकार गायले जातात तेवढे मला वाटत नाही, कुठं गायले जात असतील ! ग्वाल्हेर घराण्यांत जास्त प्रसिद्ध असलेला ‘टप्पा’ हा गानप्रकार ! आपल्याला आपोआप ताल धरायला लावणारा ‘दादरा’, आयुष्यातल्या आठवणी रंगीत व समृद्ध करणारी ‘होरी’ आणि ‘चैती’ ! आपल्याला भक्तीभावांत न्हावू घालणारी ‘भजने’ !
या सोबत तशी अजून आठवायची ती कृष्ण लीला ! ‘होरी’ म्हटलं की भगवान होण्यापूर्वीचा बाळकृष्ण वा खोडकर कुमार कृष्ण आठवतो, तर ‘चैती’ म्हटलं की चैत्र आठवतो, प्रभू रामचंद्र आणि त्यांचा ‘चैत्र’ महिना आठवतो ! वर्षप्रतिपदा आठवते, रामनवमी आठवते ! भगवान राम आणि कृष्ण यांनी आमचे साहित्यच समृद्ध केले नाही, तर हे दोन परमेश्वराचे अवतार आमचे अवघे जीवन व्यापून राहीले आहे. त्याचे प्रतिबिंब आमच्या नित्य आचरणांत, दिनचर्येत दिसले त्यांत नवल ते काय ?
आमच्या स्नेह्यांकडे गोकुळातील कृष्ण व गोपींची होळी चितारलेले ‘राजा रविवर्मा’ यांचे चित्र होते. आई नेहमी शिकवत असलेली, ‘काफी’ या रागातील ‘आज खेलो शाम संग होली, पिचकारी रंगभरी केसरकी’ ही चीज आठवते.
‘काफी’ हा थाट पण आहे आणि राग पण आहे. या थाटातील काफी या रागाशिवाय, धनश्री, धानी, बहार, भीमपलासी, पिलू, मेघ मल्हार, बागेश्री वगैरे पण राग आहेत. काफी रागात गायनाचे ‘उपशास्त्रीय’ मानले जाणारे प्रकार जास्त म्हटले जातात. संपूर्ण जाती असलेला हा राग, यांत सर्व स्वर उपयोगात आणले जातात. गंधार आणि निषाद यांत कोमल तर बाकी सर्व स्वर शुद्ध असतात.
सा रे ग म प ध नि सा - हा आरोह
सा नि ध प म ग रे सा - हा अवरोह
यांत वादी पंचम आणि संवादी षड्ज आहे. वादी म्हणजे रागातील मुख्य स्वर आणि संवादी म्हणजे त्या खालोखाल मुख्य स्वर !
सासा रेरे गग मम प - ही पकड म्हणून पहा, राग काफी डोळ्यांसमोर उभा रहातो. राग गाण्याची याची वेळ संगीत समयचक्राप्रमाणे रात्रीचा दुसरा प्रहर ते मध्यरात्रीची दिली आहे.
या रागाचा शृंगार रस आहे. शृंगारीक वर्णन करतांना कोणते शब्द वापरायचे, हे तर गायकाच्या हातात नसते, मात्र यामुळे त्याची फार काही अडचण होत नाही. दोघांमधील विरह, त्यामुळे येणारी व्याकुळता, भेटीची आस, भेट झाल्यावर होणारे समाधान, येणारी तृप्ती, तिचे माधुर्य ! या विरह-समर्पणातील सर्व भावना, हा राग समर्थपणे दाखवतो. त्यामुळे ठुमरी, होरी, दादरा यांत गायली जातात. रात्रीचा भैरवी म्हणून पण याला मानले जाते. जरी गंधार आणि निषाद हे कोमल स्वर यांत असले, तरी क्वचितच शुद्ध स्वर एखादवेळेस घेतले जातात. कोणत्याही काळांत हा राग गातां येतो. चित्रपट संगीत, भजने-किर्तन यांत देखील याचा मुक्तपणे उपयोग केला गेला आहे.
राग काफीवर आधारलेली आणि त्यातील गीते आपल्याला ऐकता यावी म्हणून देत आहे.
1. ‘पिया तो मानत नाही’ - ही पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली ठुमरी
2. बे परजात - हा पं. राजन मिश्रा आणि पं. साजन मिश्रा यांनी गायलेला ‘टप्पा’
3. पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी गायलेला टप्पा
4. विदुषी शोभा गुर्टू यांनी गायलेली ‘होरी’
5. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकांतील एका प्रसंगात दाखवलेले आणि पु. ल. देशपांडे पेटीवाादक असून ‘उगीच का कांता’ हे मूळ संगीत मूकनायक या नाटकातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे पद
6. ‘विदुषी गिरजा देवी आणि पं. बिरजू महाराज यांचा अविष्कार - तबल्यावर अनुराधा पाल
7. ‘कैसी ये धूम मचायी’ ही गाजलेली ‘होरी’ गायली आहे विदुषी बेगम अख्तर आणि निवेदन साक्षात पं. जसराज
8. पं. छन्नूलाल मिश्रा यांनी गायलेली ‘चैती’
9. होली खेलत नंदलाल - महंमद रफी यांनी गायलेले व अंजान यांचे हे गीत, गोदान या १९६३ सालातील चित्रपटातील आहे. संगीत - पं. रविशंकर
10. ‘अब के सजन सावन मे’ हे ‘चुपके चुपके’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गीत - संगीत - सचीन देव बर्मन
11. ‘काली घोडी द्वार खडी’ हे ‘चष्मेबद्दूर’ या चित्रपटातील येसुदास आणि हेमंती शुक्ला यांनी गायले आहे. संगीत - राजकमल
(आपल्याला वाटले तर अवश्य ‘शेअर’ करा)

21.3.2019













डाॅ. उल्हास नीळकंठ कडूसकर

डाॅ. उल्हास नीळकंठ कडूसकर
जळगांवमधे स्त्रीरोग तज्ञ म्हणून जी दोन मोठी नांवे माझ्या परिचयाची, म्हणण्यापेक्षा श्रद्धेची होती, त्यातील एक नांव कधीचेच काळाच्या पडद्याआड गेले, ते कै. डाॅ. अविनाश आचार्य ! आज दुसरे नांव पण, तसे अकालीच, आपल्यातून निघून गेले, डाॅ. उल्हास कडूसकर !
डाॅ. उल्हास कडूसकर, हे मी नांव पहिल्यांदा वाचले ते नवी पेठेत, खानदेश मीलच्या मोठ्या दरवाजासमोर, कोणाच्या खाजगी जागेत त्यांचा दवाखाना होता त्यावेळेस ! मी आजोळी जळगांवला जाई, त्यावेळी कोपऱ्यावरच त्त्यांचा दवाखाना होता. त्यावेळी मी शाळेत शिकत होतो, त्यामुळे नांव वाचण्या पलिकडे फार काही नव्हते. नंतर बराच काळ गेला, मी जळगांवी महाविद्यालयांत शिकायला गेलो, सन १९७८-८५ पर्यंत ! त्यावेळी स्वाभाविकच विद्यार्थी परिषदेत माझं जाणं असायचं ! परिषदेचा ‘प्रथम विद्यार्थी सत्कार’ हा एक कार्यक्रम असतो, त्यांत त्यांना बोलावले होते. त्यावेळी थोडा परिचय वाढला. तसं तर, त्यांचे नांव आकाशवाणी जळगांव वरील श्रुतिकांमधून ऐकू यायचे, वर्तमानपत्रातील व मासिकांतील लिखाणामधून दिसायचे.
मात्र त्यांची खरी जवळून गप्पागोष्टींपर्यंत ओळख झाली, ती माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी ! मी वकील असून, दर गुरूवारी रावेरहून जळगांवच्या जिल्हा न्यायालयांत कामासाठी जायचो. सोबत काहीवेळा तब्येत दाखवायची असेल, तर बरोबर सौ. असायची ! तपासून झाल्यावर फी बद्दल विचारले, की त्यांचा नकार ठरलेला. माझ्या आग्रहावर त्यांचे -
‘कित्येक वर्षांपासून गुरूवारी माझी मोफत तपासणी असते.’ डाॅ. कडुसकरांचे उत्तर !
‘मला संकोचल्यासारखे होते. मी नेहमी येतो, तो गुरूवारीच ! आणि तुम्ही पैसे घेत नाही.’ मी आपला सांगण्याचा प्रयत्न करायचो.
‘तुम्ही इथं येण्यासाठी गुरूवार ठरवला आणि मी पण फी घ्यायची नाही म्हणून गुरूवार ठरवला, हा योगायोग आहे. मुद्दाम कोणी ठरवले नाही. मग त्यांत काय वाटायचे.’ त्यांचे समजावणीच्या स्वरात उत्तर !
पूर्वी निर्माण झालेले स्नेहाचे संबंध, माझ्या मुलीच्या जन्माच्या निमित्ताने दृढ झाले. तो प्रसंग पण आजच्या ‘पैसा हे सर्वस्व’ असलेल्या काळात सांगण्यासारखाच ! गरोदर असतांना गर्भाची अवस्था व महिलेची तब्येत कशी आहे यासाठी बहुतेक सोनोग्राफी करावी लागते. एकदा गुरूवारी सौ. ची तब्येत मुलीच्या वेळी दाखवण्यासाठी गेलो होतो. त्यांनी ‘सोनोग्राफी करावी लागेल’ हे सांगीतले. सोनोग्राफी झाली.
‘दोघांची तब्येत चांगली आहे.’ त्यांच्या घाईत बोलण्याच्या पद्धतीत उत्तर !
‘तुम्हाला गर्भ मुलगा का मुलगी, हे समजते का ?’ माझा कुतुहलापोटी प्रश्न !
‘मी सांगत नसतो. बाहेर पाटी लिहीली आहे. वाचली नाही का ?’ डाॅक्टरांच्या शांत स्वभावाच्या विपरीत उत्तर !
‘मला मुलगा का मुलगी सांगू नका, पण सोनेग्राफीत पण तुम्हाला समजते का ? सांगायचे नसेल, तर सांगू नका.’ माझा पण स्वर बदलला होता.
‘हो !’ त्यांचे एका शब्दात उत्तर !
‘डाॅक्टरसाहेब, मुलगा आणि मुलगी यांत मी फरक मानत नाही. मात्र माहिती म्हणून विचारले. कृपया राग मानू नका.’ मी.
‘ठीक आहे.’ डाॅ. कडूसकर ! मात्र त्यानंतर त्यांचे माझ्याशी वागणे थोडे जास्त आपुलकीचे झाले, असे मला वाटते.
माझा मुलाचा जन्म पण तिथलाच ! एकदा केव्हातरी असाच, माझ्या वैयक्तिक अडचणींचा विषय निघाल्यावर ‘दैवयोग असतो’, असे काहीसे बोलल्याने मग ‘माझी पत्रिका बघता येईल का ?’ हे विचारले. पत्रिका घेवून गेलो, संध्याकाळच्या वेळी ! बघताबघता ज्योतिष्यावरील गप्पांत तासभर केव्हा निघून गेला, ते समजलेच नाही.
नंतर मात्र अधूनमधून माझी भेट व्हायला लागली. त्यांत खंड पडला, तर मी औरंगाबादला आल्यावर ! तसं फोनवर बोलणं व्हायचं, पण भेटू म्हणता म्हणता, अलिकडे भेट राहूनच गेली, आणि आज ही बातमी आली. —- आता भेट कधीच शक्य नाही !

25.3.2019

Image may contain: 1 person, sitting

आज फाल्गुन वद्य षष्ठी, म्हणजे नाथ षष्ठी !

आज फाल्गुन वद्य षष्ठी, म्हणजे नाथ षष्ठी ! संतांची भूमी मानल्या गेलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या काठी, वसलेले पैठण म्हणजे नाथ भूमी, संत एकनाथ महाराजांची भूमी ! फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ रोजी त्यांनी आपला देह ठेवला.
भागवत धर्माचा पाया घातला, तो ज्ञानेश्वर माऊलीने आणि संत तुकाराम महाराजांनी, त्यांवर कळस चढवला. संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।।
तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।
भागवत महापुराणावरील एकादश स्कंदावरील त्यांची टिका, विवरण हे भक्ती तत्वज्ञानाचा आदर्श ग्रंथ म्हणजे ‘एकनाथी भागवत’ या नांवाने प्रसिद्ध आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रावरील लिहीलेले, भावार्थ रामायण हे नित्य वाचनीय आहे.
संत एकनाथ महाराजांचे अभंग, गवळणी, भारूडे या रचना प्रसिद्ध आहेत. मला व सर्वांनाच आवडत असलेल्या रचना, म्हणजे त्यांनी सर्वसामान्यांच्या भाषेत, त्यांच्या साठी आणि त्यांना समजेल अशा उदाहरणांनी, दृष्टांतांनी जे सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगीतले, त्याला खरोखरच तोड नाही. आपण नेहमी ऐकत असलेले ‘विंचवाचे भारूड’ किती सोपे व सुंदर दृष्टांत देते !
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला। तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥
दुसरे अजून एक भारूड आठवले, ‘भूताचे भारूड’ ! परमेश्वर याच भूताने आपल्याला झपाटले पाहिजे, हे यांत सांगीतले आहे. हे भूत सर्वांना लागो, ही प्रार्थना पण शेवटी केली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥
बहिरा, मुका कोणाला म्हणता येईल, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या भक्तीभाव ह्रदयी ठेवून कळवळून सांगीतले आहे, या अभंगांत !
बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥
मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥
‘गवळण’ म्हटले की डोळ्यांसमोर उभे रहाते ते भगवान श्रीकृष्णाचे गोकुळ आणि कृष्णावर लुब्ध झालेली गोपिका, त्या गोकुळातील गवळणी ! गवळणींच्या ठायी असलेली कृष्णभक्ती भक्ती आणि त्या भक्तीने कृष्णमय झालेल्या त्या गोपी, गवळणी ! यांचा भाव अतिशय समर्थपणे व हळुवारपणे चित्तारलेला आहे, तो संत एकनाथ महाराज यांनी ! ही एक गवळण पहा -
तुझ्या मुरलीची ध्वनी | अकल्पित पडली कानीं |
विव्हळ झालें अंत:करणी | मी घरधंदा विसरलें ||१||
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ||धृ||
मुरली नोहे केवळ बाण | तिनें हरिला माझा प्राण |
संसार केला दाणादीन | येऊनि हृदयी संचरीली ||३||
तुझ्या मुरलीचा सूरतान | मी विसरलें देहभान |
घर सोडोनी धरिलें रान | मी वृंदावना गेलें ||४||
एका जनार्दनीं गोविंदा | पतितपावन परमानंदा |
तुझ्या नामाचा मज धंदा | वृत्ति तंव पदीं निवर्तली ||५||
आपण नेहमी ऐकत आलेली सुमधूर अशी, आर एन पराडकर यांनी गायलेली, भैरवीतील ही गवळण !
नको वाजवू श्री हरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||
घरी करीत होते मी कामधंदा
तेथे मी गडबडली रे || १ ||
घागर घेवूनी पानियाशी जाता
दोही वर घागर पाजरली || २ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गवळण घाबरली || ३ ||

26.3.2019

वर्षभराचे उडदाचे पापड !

वर्षभराचे उडदाचे पापड !
गेले काही वर्ष, होळीपर्यंत कशीबशी टिकून असलेली थंडी, एकदा का ती जळाली, की धूम पळायची ! ‘होळी जळाली, अन् थंडी पळाली’ हे तर मी लहानपणापासून ऐकत आलोय. आता थंडी, दूर पळण्याइतपत मुक्कामच करत नाही, किंवा तिला पळवायला होळीचा मोठा जाळ पण करावा लागत नाही. आता थंडी अधूनमधून डोकावते, उगीच जरा आठवडा-पंधरवाडा टेकल्यासारखी करते आणि गुपचूप निघून जाते. हिवाळा आणि पावसाळा हे कॅलेंडरच्या महिन्यांवरून सांगावे लागतात, येणाऱ्या अनुभवावरून नाही, इतपत प्रगती झाली आहे आपली ! मात्र सध्या होळी जरी थंडी पळवण्यासाठी राहिलेली नसली, तरी होळी म्हटलं की जशी ‘पुरणपोळी’ आठवते, तसंच वर्षभराची बेगमी म्हणून घरांत केले जात असलेले, ‘पापड, कुर्डया, शेवया, लोणची वगैरे’ पदार्थ आठवतात. आपल्याकडे कोणतेही पदार्थ करायचे तर कौशल्य, शक्ती व सुगरणपणा लागतोच ! आळशीपणा, निष्काळजीपणाने कोणतीही गृहिणी सुगरण म्हणून वाखाणली जात नाही.
होळीनंतर बहुतेक वार्षिक परिक्षांचे वेध विद्यार्थ्यांनाच काय, पण सर्वांनाच लागलेले असतात, आणि त्याच काळात बहुतेक पहिला दणका पडतो, तो म्हणजे घरचे ‘उडीदाचे पापड’ ! हे पापड करायचे, आणि विशेष म्हणजे घरी करायचे, हे म्हणजे नुसते खायचे काम नाही. उडीदाची डाळ भिजवून तिची साले काढावी लागतात. ती स्वच्छ पुसून घ्यावी लागते. मग ती चांगली पांढरीस्वच्छ दिसायला लागते, मग ती चांगली खणखणीत वाळवली, की किंचीत पिंगट झाक असलेली दिसते. पुढचा कार्यक्रम म्हणजे ती चक्कीतून दळून आणणे. अलिकडे या छोट्या चक्क्या निघाल्या आहेत. पूर्वी नेहेमीच्या मोठ्या चक्कीतूनच उडीदाची डाळ दळून आणावी लागे. उडीदाचे पीठ हाताला फार गुळगुळीत लागते, अगदी सिंतरासची पावडर ! पीठ आले की मग त्याचा मसाला आणण्याचे काम ! पापडखार, मीरे, हिंग, मीठ हे मुख्यत: लागते. दुकानातून मसाला आणायला आम्ही दुकानात गेलो, की हमखास एखादी वस्तू विसरायचे किंवा वेगळेच नांव आठवायचे. हा गोंधळ पाहून सुरेशशेट आम्हाला विचारायचे -
‘घरी काय करताय ? उडदाचे पापड का ?’ त्यांचा प्रश्न.
‘हो.’ आम्ही नकळत होकार द्यायचो. त्या होकारात आपल्या घरची बातमी यांना कशी समजली याचं पण आश्चर्य असायचं.
‘पापडखार, हिंग, मीरे आणि ते दळलेले मीठ आण.’ हे सांगणे दुकानातील माणसाला असायचे. तो ते आणून ठेवायचा. ते पाहून,
‘अरे, बोलण्याकडे लक्ष असावे. पापड करायचे, तर भारी पापडखार हवा. हिंगाची डबी नको, ‘हिरा हिंग’ हवा आणि मीरे पाणीदार हवे. मग पापड चांगले होतात.’ सुरेशशेटला असंख्य गृहिणींनी आजवर दिलेले ज्ञान, आमच्या विसरभोळेपणाच्या वेळी कामास यायचे. तो सर्व मसाला घरी घेवून आले, की आई म्हणायची -
‘काय आणलंय पाहू ? भलतंच तर नाही ना. तुला ‘हिरा हिंग’ सांगायचे राहून गेले.’ असे बोलतबोलत ती पुड्या उघडायची, त्या अगोदरच हिंगाचा वास आलेला असायचा. पुडी उघडल्यावर, ‘हो, हाच हिंग’ ! म्हणत समाधान व्यक्त करायची.
त्यावेळी पदोपदी निरोप देण्यासाठी, प्रत्येकाजवळ भ्रमणध्वनी नसायचे. बऱ्याच वेळा, तर आणलेला सामान परत पण करावा लागायचा आणि ‘एकदा दिलेला माल कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही’ अशा मजकूराच्या दुकानातील पाटीच्या साक्षीने, तो माल परत घेवून, दुसरी वस्तू दिली जायची. त्यावेळी इतके तंतोतंत व काटेकोरपणे नियम पाळण्याचा कोणाचा आग्रह नसल्याने, व हक्कांबाबत कमालीची जागरूकता नसून देखील, कर्तव्ये बऱ्यापैकी आठवत असल्याने, तारतम्य ठेवत व्यवहार चालायचे. त्यामुळे एकंदरीत समाजात तशी बऱ्यापैकी शांतता असायची.
सर्व गृहिणींचा विशेष भर असायचा, तो म्हणजे ‘पापड भाजल्यावर तो लाल व्हायला नको’ ! लाल झाला की काहीतरी भट्टी बिघडली ! तो कशामुळे लाल होतो, याबद्दल प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते, नव्हे असायचे आणि ते सोदाहरण आठवून सांगीतले जायचे. हे आणलेले सर्व मसाल्याचे पदार्थ छोट्या खलात कुटले जायचे. वस्त्रगाळ केले जायचे. ते पाण्यात टाकून, ते पाणी मसाल्याचे केले जायचे. मीरे, हिंग पोळपाटावर लाटून पुन्हा बारीक करून भिजवून ठेवला जायचा. जर पुन्हा लावायची वेळ आली तर, हे पाणी लावले जायचे. चक्कीतून आणलेले उडदाचे पीठ, अगदी थोडेथोडे मसाल्याचे व साधे पाणी टाकत, घट्ट भिजवले जायचे. मीरे जाडसर रहायला नको, लाटतांना पापड फुटतो.
सर्व पीठ भिजवून, त्याचा जरा ओलसर गोळा झाला की त्याचे छोटे गोळे व्हायचे. त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या दगडी पाट्यावर, गोड्या तेलाचा घळघळीत हात पसरला जाई. पाटा अगदी काळ्याभोर कातळासारखा चमकायला लागे. ही पाट्याची पूर्व तयारी झाली, की ते उडीदाचे छोटे गोळे, एक एक करून, मग पाट्यावर ठेवून उलट्या लोखंडी बत्तीने चांगले ठोकून मळले जात. यासाठी बत्ती चांगली वजनदार असावी लागे, तेव्हा पीठ लवकर तयार होत असे.
यावेळी तेलाची काटकसर करायची नसते, हे घरातील बाईला माहित असले, तरी ती तेल कमी लावून मदतीला आलेल्या इतर बायांचा पिट्टा पाडेल या धास्तीपायी, मुळातच हुशार व धोरणी असलेल्या बायका, या आवर्जून गोळा कुटायचे काम अगोदरच ठरवलेल्या बाईला देत असत. एकंदरीत चांगला सढळ हात असलेली बाई गोळा कुटत असे. पाट्यावर लावायला, गोळा कुटायच्या बत्तीला किंवा गोळ्याला तेल कमी पडले, की गोळा, लोखंडी बत्ती आणि पाटा, यांची इतकी काही ‘युती’ होई की, काही केल्या ती तुटत नसे. सगळा गोळा पाट्याला चिकटून बसे. उडदाचे पीठ एरवीच चिकट असते, त्यामुळे तेल सढळपणे वापरावे लागे. गोळा चांगला कुटून, नरम झाला की तो पण चमकू लागे. मग त्याच्या छोट्याछोट्या बोराएवढ्या, सुपारीएवढ्या आकाराच्या लाट्या केल्या जात. पुढचा प्रश्न येई की चव कशी झाली आहे, याचा ! मग जवळच असलेल्या छोट्या वाटीत असलेल्या तेलात, ती छोटी लाटी बुडवली जाई आणि मग ‘चव कशी झाली’ हे बघायला आम्ही तयारच असत. तेलात बुडवलेली लाटी तोंडात टाकत आणि थोडा जोर लावून दांत वर उचलत, आम्ही सांगत -
‘तिखट वाटतंय !’ मग बाजूला साधे पीठ एकत्र करून पुन्हा कुटले जाई. त्यापूर्वी त्या सर्व जणी पण चव घेत. सर्वमताने जसे ठरेल तसे होई. फिके असेल, तर मीरे हिंगाचे पाणी लावून गोळा पुन्हा कुटला जाई.
या लाट्यांचे पापड करून, ते वाळवून, मग वर्षभर साठवणूक करत, सणावाराला किंवा विशेष प्रसंगी, गरमागरम खिचडीच्या वेळी काढायचे आणि तोपर्यंत वाट बघायची, हा आम्हाला त्यावेळी खूप अन्याय वाटे. जास्तीत जास्त लाट्या खावून आपण जर, गोळा संपवला, तर पापड लाटायचे त्या सर्वांचेच श्रम कमी होतील, हा आमचा सूज्ञ विचार कोणालाच पटत नसे. मग त्याचा वचपा आम्ही, ज्यांचे दांत पडले आहेत किंवा हलत आहेत किंवा तोंडाचे पूर्ण बोळके झाले आहे, अशांना लाटी खायला देवून काढत असू. झाकून आणलेल्या वाटीतील लाटी बघीतली, आणि ती खावू नये असे वाटले, तरी तिचा येणारा घमघमाट त्यांना ती खायला भाग पाडे, मग पट्कन लाटी तोंडात जावून बसे. नंतर येणारी मजा, बघायला आणि संकटातून सुटका झाल्यावर ऐकायला, अनुभवायला आवडायची.
दांत हलत असले व लाटी खाल्ली, तर ती लाटी नीट खाल्ल्याने पोटांत जाण्याऐवजी, नेमकी हलणाऱ्या दाताला चिकटायची ! ते मोकळे करायला जावे, तर लाटीसोबत दांत बाहेर येण्याची भिती ! जिभेने लाटी बाजूस सारण्यासाठी जोर दिला, तरी बत्तीचे घाव सोसून मजबूत बनलेली लाटी, या मऊसूत जिभेला काय दाद देणार ? जीभ दुखायला लागायची, पण लाटी तिथेच ! नंतर शंका यायची की ‘दांत’ तर निघाला नाही ? मग बोटाने चाचपून खात्री केली, तर अजून गोंधळ ! आरशात बघीतले, तर सर्व जबडा दिसायचा पण लाटी नाही. मग पाणी पिवून गुळण्या केल्या जायच्या ! पाणी पिवून पोट टम्म व्हायचे. गुळण्या करूनही तोंड दुखायला लागायचे, आणि दांत तर पडला नसेल ? या शंकेने गुळण्या थांबायच्या ! चांगली चव असलेली लाटी, तोंडाची चव घालवून टाकायची.
‘सूनबाई, किती चिकट केलेय पीठ ? तेल तरी लावून द्यायची लाटी !’ सासूबाईचा अधिकार असलेली, तेथील सूनांना म्हणायची !
‘तुम्हाला कोणी आणून दिली ? सांगीतले असते, तर तेल लावून नरम दिली असती !’ त्यांच्यातील कोणीतरी विचारायची, पण त्याला काही अर्थ नसायचा.
‘चव चांगली आहे.’ म्हणत बिचारी तेथून निघून जायची.
ज्यांच्या तोंडात अजिबात दांत नाही, त्यांची चावण्याची शक्ती जवळपास संपुष्टात आलेली असते, पण जिव्हालौल्य काही कमी झालेले नसते. उलट पदार्थाचा आस्वाद दातांमुळे नीट घेता येत नसल्याने, ‘हे खावे, का ते ?’ अशी अवस्था त्यांची झाली असते. अशा स्थितीत जर, ही लाटी तोंडात गेली, तर दोन्ही जबड्यांच्या हिरड्या, जीभ आणि लाटी यांचा असा काही ‘फेव्हिकाॅल जोड’ होतो, की त्यांना तोंडच उघडतां येईनासे होते.
‘उॅं, उॅं’ करत जेव्हा ते माजघरात येतात, तेव्हा मग खाणाखुणा सुरू होतात. कोणाला समजेनासे झाले की -
‘आजोबा, तोंडात लाटी चिकटली आहे का ? खावू नका, म्हणून मी म्हणालो होतो. पण, तुम्ही म्हणे चवीपुरता दे ! मग काय करू ?’ एक आगावू कारटा !
तेवढ्यात इतक्या प्रयत्नाने तोंड उघडल्याने, एखादा कल्हईवाला तापलेल्या भांड्यातून कथिलावर कल्हई चांगली बसावी, म्हणून ज्या चपळाईने आणि घाईघाईने कापसाचा बोळा जसा, फिरवतो आणि भांडे मोकळे व चकचकीत करतो, त्याप्रमाणे त्यांनी तोंडात आपले बोट फिरवून आणि तोंड मोकळे करून, खळखळून गुळण्या केल्या जायच्या.
‘हुश्श ! यंदा लाट्या फारच चिकट केल्या आहेत. भट्टी जमली नाही का नीट ?’ अवघडलेल्याने दुखत असलेल्या गालाचा अनुभव घेत व झालेल्या फजितीचा वचपा आजोबा काढतात !
‘काका, तोंडात अजिबात दांत नाही का ?’ एक नवोढा !
‘तुम्ही पोरी, वर्षभराचे करता, आणि अनुभव पण वर्षभर लक्षात राहील असा देतात !’ म्हणत आजोबा बैठकीत निघून जातात.
या गंमतीतून एकमेकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी ऐकत, बोलत माजघरांत रेघांच्या लाटण्याने हे पापड लाटले जायचे. एकमेकांना चिकटू नयेत, म्हणून सारखे हलवत ते वाळवले जायचे. दुपारी उन्हाच्या वेळी सुरू झालेला, चौथ्याचा तो गोळा यांच्या गप्पांत संध्याकाळ व्हायच्या आंत संपवला जायचा. मध्यंतरी त्यातीलच जरा वयाने लहान असलेलीला कोणी, चहापाण्याचे सांगायचे. मग ती चहा-सरबत काहीतरी करायची. सर्वांचे आटोपल्यावर, न सांगता ती भांडी घासून विसळून पण ठेवायची. संध्याकाळी दिवे लागणीची वेळ समोर दिसू लागायची. मग काही वेळा जाडसर का होईना, पण लाटत ते सर्व पापड संपवले जायचे. दिवे लागणीला या सर्वांच्या लक्ष्म्या त्यांच्या त्यांच्या घरात हव्या असायच्या. काम आटोपून या लक्ष्म्या आपापल्या घरी रवाना व्हायच्या. आठवडा-पंधरवाडा आळीपाळीने गल्लीतील सर्व घरांत हा कार्यक्रम सुरू असायचा !
—- आता पापड हवे असले, की कोणाला होळीपर्यंत वाट बघावी लागत नाही. किराणा दुकानांत गेले, पैसे दिले आणि पापड मागीतले की प्लॅस्टीकच्या पिशवीतील पापड हातात येतात. पापड मिळतात, पण त्या मागच्या या सर्व कुरकुरीत गोष्टी त्या पापडासोबत येत नाही.

29.3.2019
आमच्या गांवचे किर्तनकार, कै. मुकीमबुवा आपल्या किर्तनातून सर्वसामान्यांना, आपल्या अगदी निर्विष विनोदाने खळखळून हसवत. त्यांचे सुरू होई -
सीताकांत स्मरण जयजय राम । महाराज, समजा गुढीपाडव्याच्या दिवशी नागपंचमी आली, आणि तो दिवस दिवाळीचा असला, तर काय कराल ? बुवासाहेबांचा समस्त श्रोतृवर्गाला प्रश्न !
श्रोतेमंडळी या अशा चमत्कारिक प्रश्नाचा विचार करून व तशी शक्यता डोळ्यापुढे आणून चक्रावून जायची !
हॅं, बुवासाहेब, कसं शक्य आहे ? काहीतरी काय ? — एखादा श्रोता उत्स्फूर्तपणे म्हणायचाच ! 
अहो शक्य नाही, हे बरोबर आहे. मला पण समजतंय ! पण जरा समजा. फक्त समजा, गुढीपाडव्याच्या दिवशी नागपंचमी आली, आणि तो दिवस दिवाळीचा असला, तर काय कराल ? दिवाळी आवडत नसेल तर, दसरा घ्या ! अगदी होळी घ्या ! पण सांगा, असं झालं तर काय कराल ? — बुवासाहेब पिच्छा सोडत नसत !
बुवासाहेब, कसं काय शक्य आहे ? लोक वेडे समजतील आम्हाला ! — हसूनहसून एक श्रोता !
हे मला पण माहिती आहे, की शक्य नाही. आपण किर्तन तर करतोय, पण कोणासमोर करतोय ? शहाण्या मंडळींसमोर का —- ?’ बुवासाहेब पुढचा शब्द श्रोत्यांकडे बघून हात जोडत सोडून द्यायचे आणि श्रोत्यांत हसण्याचा खकाणा उठायचा !
‘सीताकांत स्मरण जयजय राम, होऽऽऽ हाऽऽरि विठ्ठल’ हे बुवासाहेब चिपळ्यांच्या तालात म्हणत ! मग एकदमच सोबतचा पेटीवाला चारपाच सूर एकत्र दाबून, पेटीचा मोठा स्वर काढत, तबलजी वाजवत असलेल्या ‘धडपड धडपड ध्राऽऽऽ’ सोबत बरोबर येई !
—— ‘निवडणुकीतील शक्याशक्यता’ काही जण वर्तवताय, मला आपलं हे आठवलं !

31.3.2019
रावेरचे न्यायालय म्हणजे तहशीलदार कार्यालयातील काही भागांत सामावलेले ! सरकारच्या सर्व विभागांना स्वतंत्र इमारती मिळणं इतकं सोपं नसायचं पूर्वी ! सरकारकडे साधनसामुग्रीची कमतरता असली, तरी कर्मचाऱ्यांकडे काम करण्याची मानसिकता ही बऱ्यापैकी असल्याने, तुलनेने पुष्कळ चांगलं आणि मन लावून काम केलं जायचं त्यावेळी !
रावेर वकिलसंघाची बाररूम म्हणजे इनमीन दोन चौक्यांची जागा ! एका बाजूला तालुका ट्रेझरीचे आॅफिस तर दुसऱ्या बाजूला फाॅरेस्टचे आॅफिस ! बाजूला सिटी सर्व्हे, त्याच्या बाजूला तुरुंग व त्या समोर पोलीस स्टेशन, त्याच्या शेजारी सब रजिस्ट्रार आणि मग ज्यांची ही इमारत होती, ते तहसीलदार कार्यालय ! अशी सगळी गंमत असायची.
एकदा दुपारी एक जाकिट वगैरे घातलेले, स्वच्छ कपड्यातील, चष्मा लावलेले, साधारण चौकोनी पसरट चेहरा, सावळ्या रंगाचे पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज, असे गृहस्थ आले. सोबत गांवातील काही मंडळी होती. बाररूममधे आल्यावर त्या छोट्याशा जागेत, लगबगीने वकील मंडळी बाजूला सरकली. त्यांना जागा करून दिली. ते बसले, गांवातील मंडळी बहुतेक दरवाज्यातच होती, कारण सर्वांना बसायला मिळेल एवढी बाररूम मोठी नव्हतीच !
‘मी प्रा. फरांदे ! आपल्याकडे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून भेटायला आलोय ! ही अशी सुरूवात प्रा. ना. स. फरांदे यांची !
पदवीधर मतदारसंघ का हवा, त्यांत आपण सर्वांनी मतदान का करायला हवे, समाजातील शिक्षण घेतलेल्या लोकांची जबाबदारी काय वगैरे गप्पा सुरू होत्या. वकिल मंडळींचे समाजासाठी पूर्वीपासून कसे योगदान आहे. त्यांची व आपणा सर्वांचीच जबाबदारी स्वातंत्र्यानंतर कशी वेगळी झाली आणि वाढलेली आहे.
गप्पांत रमले असतांनाच, लालचंद पाटील यांनी चहा आणला. सर्वांनी चहा घेतला. मग ते सर्वांना नमस्कार करून निघून गेले. नंतर यथावकाश निवडणुक झाली. आम्ही मतदान केले. मी पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्यांदाच केले. ते निवडून आले. विधान परिषदेचे अध्यक्ष झाले. लक्षात राहिला, तो त्यांचा साधेपणा, बोलण्यातील साधेपणा आणि सात्विकता, तसेच प्रत्यक्ष न दिसणारी पण वागण्यात जाणवणारी अध्यात्मिक पार्श्वभूमी ! मध्यंतरी ते गेल्याची बातमी आली. साधी माणसं राजकारणातून दिसेनासी होत आहेत.
—— काही नाही, काल आपल्या औरंगाबादचे लोकसभेसाठीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड वकिलमंडळींच्या भेटीगाठी घेण्यासाठी मुंबई उच्चन्यायालायच्या औरंगाबाद खंडपीठात आले होते, म्हणून आठवलं !

4.4.2019

Image may contain: 1 person, eyeglasses
आदर्श आचारसंहिता काहीच नागरिकांना अपेक्षित आहे, सर्वांना अजिबात नाही. राजकीय पक्षांना आदर्श आचारसंहिता आणि तिची कठोर काय, पण कामापुरती पण अंमलबजावणी अपेक्षित नाही, मग पक्ष कोणताही असो. त्यांना निवडून यायचे असते. निवडणुका, हे त्यांना युद्ध वाटते. यांत सर्व क्षम्य असावे आणि असते, ही त्यांची भावना असते.
मी जे करतो, ते बरोबर आणि इतर जे करतात, ते माझ्या हिताचे असेल तरच बरोबर, अन्यथा नाही, ही साधी, सुटसुटीत व सोपी भूमिका केवळ नागरिकांचीच नाही, तर राजकीय पक्षांची पण असते. आपणा सर्वांना हेच आपल्या विविध पक्षांच्या वागणुकीतून व त्यांनी वेळोवेळी आपणांस दिलेल्या आश्वासनांच्या जाहीरनाम्यातून दिसते.
आचारसंहितेचा बडगा काय असतो, हे माझ्या पहाण्यात सर्वप्रथम दाखवला, तो कै. टी. एन्. शेषन या निवडणूक आयुक्त यांनी ! घटनादत्त पद व त्याचे अधिकार म्हणजे काय हे राजकीय पक्षांना त्यामुळे उमजले आणि जाणवले. त्यांच्यावर सरकारला बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता यावे, यासाठीच निवडणुक आयुक्त या ऐवजी, ‘निवडणुक आयोग’ केला गेला. त्यापूर्वी सरकार आणि निवडणुक आयुक्त हे वेगळे असतात, असे कधी जाणवले नाही वा तसे ऐकीवात पण आले नाही.
सध्या गाजत असलेला ‘नोटा’ म्हणजे ‘None Of The Above’ या अधिकाराबद्दल बोलायचे झाले, तर यामुळे माणसे पडू शकतात आणि त्यामुळे काही आपोआप निवडून येतात. या प्रकारचा ‘मते वाया घालवण्याचा प्रयोग’ हा पूर्वीपासून होत आहे. एखाद्या व्यक्तीला आपण निवडून येणार नाही, हे माहीत असतांना देखील, स्वत:ची कोणतीही स्वतंत्र विचारधारा वा धोरण किंवा भूमिका आणि कारण नसतांना देखील, स्वत:जवळचे पैसे खर्च करून ही मंडळी का उभी रहातात ? यांना आतून मदत करणारे कोण असतात, हे उघड गुपीत आहे. यांच्यासाठी या निवडणुका या उत्पन्नाचे साधन ठरू शकतात.
‘नोटा’ या भूमिकेमुळे ‘दगडापेक्षा वीट मऊ’ ही आपली जी म्हण आहे, याला छेद देत ‘वीटेऐवजी’ आपण आपला कपाळमोक्ष करणारा ‘दगड’ निवडून आणतो, आणि नंतर पश्चात्ताप करत बसतो, की ज्याचा उपयोग नसतो.
निवडणूक काळातील पक्षांच्या आश्वासनांवर किंवा जाहीरनाम्यावर जाण्यापेक्षा, त्यांचे आजपावेतोचे वर्तन बघीतले पाहीजे. अशक्यप्राय आश्वासने देणे, हे जनतेला फसविण्यासारखेच आहे. आपण काय करू शकू किंवा कोणताही पक्ष काय करू शकेल, हे प्रत्येक नागरिकाला मनातून समजत असते.
सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे, चार्वाकाने सांगितल्याप्रमाणे, ‘ऋणं कृत्वा, घृतं पिबेत्’ हे काही अपवादात्मक परिस्थतीत आपद्धर्म म्हणून योग्य असले, तरी सर्व काळात योग्य नाही. या वृत्तीने आपण देशोधडीला लागतो, आणि देश दिवाळखोर बनतो. देशासाठी जसे तात्कालिक धोरण ठरवावे लागते, त्याचप्रमाणे दीर्घकालीन पण धोरण ठरवावे लागते. तुमचे दीर्घकालीन धोरण जितके योग्य व प्रभावी ठरेल, तितके अल्पकालीन धोरण ठरविण्याची वेळ कमी येत जाईल.

10.4.2019

एका अशाच कार्यक्रमाच्या मागील कथा !

एका अशाच कार्यक्रमाच्या मागील कथा !
आपण एखादा कार्यक्रम करायचं ठरवलं की तो होतो, मग तो यशस्वी होतो, किंवा अयशस्वी होतो. त्यामागे मग कितीतरी गमतीजमती, कित्येकांची ओढाताण, ऐनवेळेस येणाऱ्या अडचणी, आपण ठरवलेले काही असते आणि होते, किंवा करावं लागते वेगळेच ! अर्थात ही मागील कथा, आपणांस खूप वेळा समजत नाही. त्याची बहुतेकांना आवश्यकता पण वाटत नाही. मात्र काही वेळा, अशी उत्सुकता काहींना असते, पुढच्यास ठेच मागचा शहाणा ! अशाच एका कार्यक्रमाच्या मागील कथा ! ज्यांना उत्सुकता असेल, त्यांनी जरूर वाचावी !
‘अरे, आता, काही होत नाही बघ माझ्याकडून या शिकवण्या ! तशी मुलं येतात गाणं शिकायला, पहिल्या इतके येत नाही, पण येतात. गाण्याच्या परिक्षेचे केंद्र बंद केल्यापासून, तशी आता माझ्यावर काही जबाबदारी पण राहिली नाही. मात्र एकेक मागचं आठवलं, की मन पण लागत नाही आता पहा !’ असाच एकदा सहा-सात वर्षांपूर्वी रावेरला थोड्या वेळासाठी गेलो होतो, त्यावेळी आई मला सांगत होती.
‘तुला कोणी जबरदस्ती केली आहे का शिकवण्या करण्याची ? वाटलं तर शिकव कोणाला, नाही तर शिकवू नको.’ मी.
‘वेळ पण जात नाही रे ! टक्क बसावं नुसतं, समोर पहात ! नाही करमलं, तर मग काही तरी ऐकावं रेडिओवर ! तिथं पण शास्त्रीय गाणं कमी लागतं आता. लागतात ते सर्व धांगडधिंगा ! तुझे भाऊ तर दिवसभर बातम्या ऐकतात आणि काॅलनीभर विनाकारण फिरून येतात. प्रत्येक वेळी तीच बातमी असते, पंधरा मिनीटांत काय आणि तासा-दोन तासांनी काय, काय बदल होणार आहे त्या बातम्यांमधे ? पण ऐकतात, हिंदी, मराठी, इंग्रजी ! पुन्हापुन्हा त्याच ऐकतात. मला कुठं काय ऐकायला मिळतेय ? मी आपली कुठं घर सोडून जात नाही. जाणार तरी कुठं ?’ आई मला सांगत होती. वडिलांना मी भाऊ म्हणायचो.
‘तुला वेगळा रेडिओ आणून देवू का ? त्यांना त्यांच्या बातम्या ऐकू दे, तू तुझं गाणं ऐकत जा !’ मी.
‘दोन दोन रेडिओ काय करायचे आहे विनाकारण ?’ आई !
‘जाऊ दे. आता असंच चालायचे. पहिले हिंमत होती, ताकद होती पण पैसे नव्हते. तसे पैसे आपल्यासाठी कधीच नव्हते. मात्र त्यावेळी बिनापैशाने असलं, की इकडेतिकडे जाता यायचं, दोन घटका कुठं बसतां यायचं ! आता कुठं काही जाता येत नाही, काही ऐकता येत नाही, म्हणता पण येत नाही.’ आईची व्यथा !
कित्येकवेळा आपल्याला प्रत्यक्ष सांगीतल्यापेक्षा, बोलल्यापेक्षा पण, न सांगता, न बोलता खूप काही सांगीतलं जातं. महत्वाचे सांगीतलं जातं. आपल्याला मात्र ते उमजायला हवं, समजायला हवं ! लहानपणी घटना आपल्यासमोर घडत असतात, आपल्याला त्याचा अर्थ काही समजत नाही. त्यावेळी, ना आपल्याला तेवढी बुद्धी असते, ना वयोपरत्वे आलेला अनुभव आणि त्यातून आलेली समज ! त्या घटनांचे अर्थ समजायला लागले, की आपल्या मनांत व्यर्थ कालवाकालव सुरू होते. काही झाले तरी, आपण घडून गेलेल्या घटना आणि त्याचे झालेले भलेबुरे परिणाम उलटे फिरवू शकत नाही. काहीवेळा त्या घटनांना आणि त्याच्या परिणामांना अप्रत्यक्षपणे आपण देखील जबाबदार असतो.
एकत्र कुटुंबातील ‘कर्ता’ म्हणून गरिबीतून प्रामाणिकपणे निभावत असलेले ‘कर्तेपण’ इतरांना दुरून कितीही चांगलं दिसत असलं, तरी ते त्या कर्त्याचा जीवनरस अमानुषपणे शोषत असतं. कधीतरी आपण त्या ‘कर्ता’ म्हणून भूमिकेत गेलो, की हा अर्थ समजायला लागतो. हा अर्थ थोडा तरी समजायला, आपल्याला आपल्या आयुष्याची निदान चार तपे घालवावी लागतात ! ‘दुरून डोंगर साजरे, म्हणी विनाकारण नाही तयार झाल्या !
इतरांना झगमगीत दिसत असलेल्या, आपल्या आयुष्याचा इमारतीचा पाया, हा कित्येक वेळा नव्हे, तर बहुतेक वेळा आपल्या आईवडिलांच्या किंवा आपले पालक झालेल्यांच्या इच्छाआकांक्षांच्या उडालेल्या तुकड्यांवर आधारलेला असतो. त्यांच्या आकांक्षांचे हे तुकडे खडी, दगडासारखे या आपल्या आयुष्याच्या इमारतीच्या पायात वापरले जातात. त्यांच्याजवळचे पैसे हे सिमेंटचे काम करतात, तर हे त्यांच्या इच्छाआकांक्षांचे तुकडे उडतांना येणारे आणि इतर कोणालाही न दिसणारे, मात्र फक्त त्यांनाच दिसणारे अश्रू, हे त्यासाठी पाण्याचे काम करतात. पाण्याने बांधकाम पक्के होते, जितके पाणी माराल तितके, ते काॅंक्रीट घट्ट रहाते. तडे जात नाही त्याला ! या अशा बनलेल्या काॅंक्रिटने आपला पाया बनतो, दिसत नाही तो कोणाला ! पण आपल्याला कळायला हवं की आपला पाया कसा बनला आहे, कशाचा बनला आहे.
बघा, हा विषय तसाच राहून गेला. आपल्या ताकदीच्या बाहेर काही कामं आपण करू शकत नाही. पण मग मी मनाशी ठरवलं की एखादा गाण्याचा कार्यक्रम फक्त हिच्यासाठी करायचा ! आयुष्यभर घरी बसल्याबसल्या, भलेबुरे ऐकत संगीताची केलेली तिने सेवा ! हो सेवाच, गांवच्या मानाने आणि शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीच्या मानाने, तिला त्यातून समाधाना व्यतिरिक्त फार काही आर्थिक मिळालं नसावे ! गांवात कोणी शास्त्रीय संगीताची जाणकार व्यक्ती आली, की आवर्जून निमंत्रण यायचं आईला, हाच तो काय मान ! घरातील कर्त्याला आयुष्यभराची साथ देतांना, आकाशवाणीची कलाकार होण्याची संधी पण तिला, वेडावून दाखवत, तिच्यासमोरून निघून गेली ! ‘आपल्या भाग्यात नाही’ म्हणत, संगीताच्या वाटेवर चालणं काही तिनं थांबवले नाही. ‘गाणं गायलं की संसाराचं गाणं होते, हे पण ऐकवलं गेलं !
अलिकडे आईवडिलांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर, माझ्या पत्नीने मुद्दाम तिच्यासाठी आणलेली पैठणी घेवून आम्ही रावेरला गेलो, तेव्हा त्यांना वाटलेले समाधान आईवडिलांच्या डोळ्यांत दिसत होते, शब्दातून व्यक्त झाले नसेल भलेही ! तीन वर्षांपूर्वी वडील गेले. इतक्या वर्षांचा सोबतीचा आधार गेला. तिला अजून विषण्णता आली. हे मनांतल्या मनातील आक्रंदन फार वाईट ! आयुष्यभर काट्याकुट्याच्या रस्त्यावर चालावं लागणारा, तसा योग घेवून येणारी ही मंडळी, जगांत कुठं गुळगुळीत व सुखद रस्ते पण असतात आणि त्यांवर पण काही जण चालत असतात, हेच विसरून जातात !
मला कामानिमीत्ताने इथं उच्च न्यायालयांत वकिली करण्यासाठी आल्यावर, असंख्य वेळा विमानाने प्रवास करण्याचा योग आला. याचा पाया कोणी घातला, हे मनांत आलं आणि मग तिचा, तिच्या नातीसोबत विमानप्रवास मुद्दाम ठरवला व झाला.
‘तुझे भाऊ असते, तर विमानातून फिरून आलो, हे सर्व गांवभर आठ दिवस सांगीतलं असतं.’ तिची प्रतिक्रिया !
नंतर गेल्या महिन्यात मावशी, तिची धाकटी बहीण, गेली. ही गाण्याच्या कार्यक्रमाची माझी इच्छा पुन्हा वर आली. मुलांनी आणि पत्नीने ‘आता तुमची इच्छा आहे ना ? करून टाका. कार्यक्रम रावेरलाच ठेवा. जळगांव किंवा औरंगाबादला नको. त्यांचे सगळं आयुष्य रावेरमधे गेलं आहे. आपल्याला त्रास झाला तरी चालेल !’ म्हणून आग्रह धरला. कार्यक्रम करायचा, तर परिचित कलाकार मंडळी देशाबाहेर ! शेवटी भेटायचे ठरवले, ते फेसबुकमुळे मित्र झालेले, श्री. मंगेश वाघमारे यांना ! आकाशवाणीत निवेदक म्हणून असलेले आणि संगीतातील दर्दीच नाही, तर शास्त्रशुद्ध संगीत शिकलेले ! आकाशवाणी निमित्ताने बऱ्याच संगीत क्षेत्राशी संबंधीत असलेल्यांचा नियमीत संपर्क तेथील मंडळींशी येत असतो, याची कल्पना होतीच. मग यांना आकाशवाणीतच भेटलो. आपला सूर कोणाशी जुळू शकतो, हे लक्षात आले की काहीही मनमोकळेपणाने बोलायला अडचण नसते.
‘तुमच्या डोळ्यांसमोर कोण आहेत?’ हे त्यांनी विचारल्यावर माझ्या मनांतील नांवे सांगीतली आणि त्याचा उपयोग नाही, हे पण सांगीतले. त्यांच्याकडची काही नांवे विचारली. आकाशवाणी मार्फत कार्यक्रम व्हायचे, तसा रावेरला ठेवता येईल का ? हे पण विचारले.
‘माझी इच्छा खूप आहे, पण तेवढी ताकद नाही. ही मंडळी माझी आहेत, माझ्यासाठी येतील. तिथं पैशाचा प्रश्न नाही, पण ती उपलब्ध नाही. आईसाठी कार्यक्रम करायचा आहे. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ती सेवा करतेय ! वाटलं तिच्यासाठी कार्यक्रम करावा. सध्या या वकिली व्यवसायाने, माझा या संगीत क्षेत्राशी जवळपास संपर्क तुटलेला आहे.’ मी ! माझी अडचण त्यांच्या लक्षात आली.
‘धनंजय जोशी, म्हणून आहे. नांदेडचे !’ श्री. मंगेश वाघमारे ! मी नांव ऐकलेले नव्हते.
‘आईच्या जुन्या पिढीच्या दृष्टीने सांगा.’ मी !
‘काही काळजी करू नका. चांगलं गाणारा आहे. श्रोत्यांची नाडी ओळखणारा आहे. याची मैफिल रंगते.’ श्री. मंगेशजी ! माझ्या चेहऱ्याकडे पहात ‘त्याची काही काळजी करू नका !’
‘काही हरकत नाही. मग लावा फोन !’ मी.
त्यांना फोन लावला आणि बोलणे झाले. १० / ११ एप्रिल रोजी ठेवता येईल, हे ठरलं. नक्की तारीख सांगतो म्हणून सांगीतले. दिनांक ११ एप्रिल कार्यक्रमाची ठरली.
नंतरचा मोठा प्रश्न, म्हणजे कार्यक्रमाची व्यवस्था आणि जबाबदारी ! कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून झटणारी मंडळी जशी असतात, तसाच कार्यक्रमाचा बोऱ्या कसा वाजेल, त्यांत विधोळ कसा होईल, हे पण कटाक्षाने पहाणारी व तसा आवर्जून प्रयत्न करणारी पण मंडळी असतात. काळजी वाटते, ती त्यामुळेच ! मग आठवण आली, ती अजूनही तीन पिढ्यांचे संबंध टिकवून ठेवणारे आठवले कुटुंबियांची ! डाॅ. राजेंद्र आठवले, हा माझा बालमित्र ! त्याला फोन लावला !
‘तुझ्याजवळ पैसे जास्त झालेत, म्हणून तू कार्यक्रम करत नाही, तर आईबद्दलच्या भावना आहेत म्हणून करतोय. कित्येक वर्षे ‘सांस्कृतिक कलामंच, रावेर’ कार्यक्रम करतेय. निर्मलाकाकूंचा सत्कार ठेवू आणि या निमित्ताने गाणे ! हे ठरवण्यासाठी इथं येण्याजाण्यात वेळ आणि पैसे घालवू नको. मी पहातो व्यवस्था कार्यक्रमाची ! काही अडचण असेल तर, आपल्याला फोनवर बोलता येते.’ त्याचा तीन पिढ्यांच्या नात्याला जागत मला दिलेला धीर व सल्ला ! त्याच्या या आश्वासनावर, मी निश्चिंत झालो. आणि मग सर्व जवळच्या नातेवाईकांना आणि जुन्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायला लागलो. मला जे निरोप देण्यासाठी जे फोन नंबर हवे होते, ते विनातक्रार, मी वेळीअवेळी मागीतले तरी, श्री. जयंत कुलकर्णी देत होते.
गाण्यासाठी लागणाऱ्या साथीदारांची आठवण झाल्यावर, पहिले नांव आठवले, ते मला पूर्वी तबला शिकवणारे कै. बबनराव भावसार यांचा नातू श्री. पंकज भावसार याचे ! पण तो पुण्यात स्थायिक झालेला असल्याचे समजले. मग दुसरे मित्र श्री. विभाकर कुरंभट्टी यांच्याकडून श्री. संजय पत्की, जळगांव यांचे नांव समजले. यांच्याशी संपर्क साधल्यावर ‘श्री. धनंजय जोशी हा माझा मित्र आहे. माझे साथीदार घेवून जा. जमलं तर मी पण कार्यक्रमाला येईल.’ म्हणत मनमोकळेपणाने परवानगी दिली. तो ताण कमी झाला. ‘कोणी मिळाले नाही, तर मला सांग !’ हे माझे वर्गमित्र श्री. विजय सपकाळे, जळगांव आकाशवाणी निर्देशक यांचे आश्वासन होतेच. ‘कलाकारांच्या रहाण्याची व्यवस्था माझ्याकडे’ इति श्री. प्रमोद निंबाळकर, माझा वर्गबंधू !
दि. ११ एप्रिल रोजी पहाटे मी, हा कार्यक्रम मूर्त स्वरूपात आणणारे, श्री. मंगेश वाघमारे आणि गायक कलाकार श्री. धनंजय जोशी असे सोबत औरंगाबादहून निघणार होतो. आदल्या दिवशी श्री. मंगेशजींनी पहिली अडचण पुढे आणली. कार्यक्रमाला त्यांचे येणे जमणार नव्हते. आदल्या रात्री जळगांवहून साथीदारांना घेवून जाणाऱ्या टॅक्सीवाल्याने जमत नाही, म्हणून दुसरी अडचण पुढे ! म्हटलं इजा, बिजा आणि तिजा होतो की काय ? पण तसे झालं नाही, शेवटी ११ एप्रिलला सकाळी मी व श्री. धनंजय जोशी औरंगाबादहून जळगांवमार्गे रावेरला निघालो. मधे थांबत जळगांवहून हार्मोनिअमवर साथ करणारे श्री. अक्षय गजभिये आणि भुसावळहून तबलावादक श्री. तेजस मराठे यांना घेतले आणि रावेरला पोहोचलो.
‘तुझे भाऊ असते, तर आठ दिवस गांवात निमंत्रण देत फिरले असते.’ मी घरी पोहोचल्यावर आईचे सांगणे ! प्रत्येकाचा झालेला आनंद व्यक्त करण्याची पद्धत असते. या अशा वेळी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ आयुष्यात सोबत करणाऱ्याची आठवण येणं, हे अत्यंत स्वाभाविक होते. आईच्या डोळ्यातलं पाणी सांगत होतं. सर्व लेकीसुनांचे निरोप येत होते, काही आल्या होत्या. तिचा आनंद व समाधान डोळ्यातून वहात होतं.
श्री. धनंजय जोशींनी घरी आल्यावर आईला नमस्कार केला. त्यांचे बोलणे सुरू झाले. आई तिच्या जुन्या आयुष्यात पं. कृष्णराव पंडीत, पं. सी. आर. व्यास, तिचे गुरू कै. गोविंदराव कुलकर्णी, ग्वाल्हेर गायकी वगैरेत रमली. नंतर जेवणं झाली. संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आई पैठणी नेसून आली होती. तिच्या सुनेने, माझ्या पत्नीने आईवडिलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस केला, त्यावेळी दिलेली ! कित्येक वेळा एखाद्याचे तासभर बोलणं सांगणार नाही, तेवढी एक छोटी कृती सांगून जाते.
कार्यक्रम सुरू झाला. तिचा संस्थेमार्फत, तिच्या विद्यार्थ्यांकडून, गावकऱ्यांकडून सत्कार वगैरे आटोपला. श्री. धनंजय जोशी यांचा त्यांच्या संगीतातील कार्याचा परिचय करून देतांना, ‘हे नांदेडला इंजिनिअरिंग काॅलेजला भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहे’ म्हटल्यावर कडाडून टाळी ! मी म्हणालो पण त्यांना, ‘तुमच्या भौतिकशास्त्राला टाळी पडली बुवा !’ त्यांना पण मनापासून हसू आलं. —- आणि कार्यक्रम सुरू झाला. रंगायला लागला. श्रोत्यांना उठू नये असं वाटत होते, कार्यक्रम संपू नये असं वाटत होते, पण निवडणूक आचारसंहितेमुळे तो नाईलाजाने सव्वा दहापर्यंत आटोपावा लागला.
श्री. धनंजय जोशींना दुसऱ्या दिवशी सकाळी सचखंड एक्स्प्रेसने जायचे होते. पहाटे उठून रावेरहून भुसावळला गाडी पकडायची होती. सकाळी आम्ही उठलो. त्यांना पण ही माणसं बरी आहेत, असे वाटले असावं. सौ. चहा करत होती.
‘चेक दिला तर चालेल का ?’ मी विचारले.
‘चालेल !’ त्यांचे उत्तर !
चेक लिहीला आणि दिला. त्यांनी न पहाता सरळ खिशात टाकला. चहा आटोपला आणि भोकरीकर गल्लीतच टॅक्सी होती. त्यांत बसलो. टॅक्सी भुसावळला निघाली. रस्त्यात आणि रेल्वे उशीरा येणार असल्याने, प्लॅटफॉर्मवर भरपूर, अगदी घरगुती पण गप्पा झाल्या. गाडी आल्यावर ते बसले. मी परत रावेरला निघालो.
परत येतांना एकेक लक्षात आले. परमेश्वराने या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कोणाकोणाला पाठवले होते नाही ? अजून एक लक्षात आले, की आपल्याला श्री. मंगेश वाघमारे यांनी, या निमित्ताने फक्त चांगला कलाकारच नाही दिला, तर एक चांगला माणूस दिला आहे. आपल्याला माणसं खूप भेटतात, त्या यादीसाठी मोठे रजिस्टर लागते. मात्र चांगल्या माणसांसाठी यादी करायची, तर छोटी डायरी पुरते, कधीतरी एखादं नांव त्यांत लिहीलं जातं. माझ्या या छोट्या डायरीत जुन्या नावांसोबत, पूर्वी श्री. मंगेशजींचे होते. आता परवा अजून एक नांव वाढलंय - श्री. धनंजय जोशी, नांदेड !
(पोस्ट आवडली असेल, तर आनंदाने शेअर करा)

14.4.2019

Image may contain: 3 people, text
परवा दि. ११ एप्रिल, २०१९ (गुरूवार) रोजी सांस्कृतिक कलामंच, रावेर यांच्या ‘सांज पाडवा संयोजन समितीच्या’ वतीने रावेर, जि. जळगांव येथील संगीत विद्यालय, रावेर याच्या संचालिका श्रीमती निर्मला मोरेश्वर भोकरीकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराचे निमीत्ताने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक, सूरमणी श्री. धनंजय मोरेश्वर जोशी, नांदेड (आकाशवाणी व दूरदर्शन मान्यताप्राप्त ‘ए ग्रेड’ कलाकार) यांचे गायन ठेवले होते.
सांस्कृतिक कलामंचाचे अध्यक्ष श्री. पुष्कराज मिसर आणि मान्यवर कलाकार, अध्यक्ष यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्रीमती निर्मला भोकरीकर यांचा सत्कार श्री. प्रकाश मुजुमदार, चेअरमन, रावेर शिक्षण संवर्धक समिती, रावेर यांच्या हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध गायक, श्री. धनंजय जोशी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. त्यांच्या सोबत त्यांचे साथीदार, तबलावादक श्री. तेजस सतीष मराठे, भुसावळ आणि हार्मोनिअम वादक श्री. अक्षय गजभिये, जळगांव तसेच तानपुऱ्यावर साथ करणाऱ्या सौ. प्रांजली रस्से यांचा सत्कार करण्यात आला.
पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ श्रीमती निर्मला भोकरीकर, रावेर सारख्या छोट्या गांवात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विद्यार्थ्यांना शिकवत, त्यांनी शास्त्रीय संगीताची रूची त्या गांवात जोपासली. यांनी आपले संगीताचे शिक्षण विवाहापूर्वी सुमारे बारा वर्षे जळगांव येथील संगीतज्ञ, कै. गोविंदराव कुलकर्णी (कै. पं. कृष्णराव पंडीत, ग्वाल्हेर यांचे शिष्य) यांचेकडे घेतले. आपल्या सासरी म्हणजे रावेर येथे आल्यावर, काही वर्षांनी सन १९६४-६५ पासून त्यांनी संगीताच्या शिकवण्या घेण्यास सुरूवात केली. हे विद्यार्थी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षेसाठी जळगांवी घेवून जात. साधारणपणे १९८० पावेतो, हे असे सुरू होते. सन १९८१ पासून ते साधारण सन १९९६-९७ पावेतो रावेर येथे ‘संगीत विद्यालय, रावेर’ या नांवाने त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीताच्या परिक्षेचे केंद्र चालवले. नंतर देखील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सुरू होते ते गेल्या चार-पाच वर्षांपावेतो ! नंतर मात्र प्रकृती साथ देईना, म्हणून जरा थंडावले. या सुमारे १९६४ ते २०१५ पावेतोच्या काळात असंख्य विद्यार्थी त्यांच्याकडून शिकून गेले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी हा ज्ञानयज्ञ, स्वत: विद्यार्थ्यांना शिकवत तेवत ठेवला आहे. या परिसरातील कोणीही शास्त्रीय संगीत शिकलेला असेल, तर त्यांचे मूळ नक्कीच इथं सापडते.
मध्यंतरी त्यांनी, उमेदीच्या काळात, जळगांव आकाशवाणीवर ‘आकाशवाणी कलाकार’ म्हणून मान्यता मिळावी यासाठी दोन वेळा ‘आॅडीशन’ दिली, त्यांत उत्तीर्ण झाल्यावर मात्र, नंतर दिल्लीला रेकाॅर्डिंग करून पाठविण्याच्या वेळी, त्यांना घरगुती कारणाने जाता आले नाही. ती वाटचाल तिथंच थांबली. नंतर वर्तमानपत्रात मुलाखत, आकाशवाणी जळगांव केंद्राने मुलाखत घेवून या त्यांच्या कार्याची दखल घेतली. हे सर्व त्यांच्याबद्दल सांगत, सत्कार सभेची प्रस्तावना, त्यांचे चिरंजीव आणि औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठातील वकील, श्री. माधव भोकरीकर यांनी केली.
त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेला वारसा, पुढे चालविणारे आणि त्यांचे विद्यार्थी यांचा सत्कार, श्रीमती निर्मला भोकरीकर यांचेवतीने, त्यांचे चिरंजीव ॲड. माधव भोकरीकर यांनी केला. त्यांत सौ. प्रांजली रस्से (पूर्वाश्रमीच्या मीना भोकरीकर), श्री. प्रभुदत्त मिसर, श्री. अरूण सुगंधीवाले, सौ. प्रिती विखरणकर (पूर्वाश्रमीच्या प्रिती मच्छर), डाॅ. दत्तप्रसाद दलाल, श्री. हेमेंद्र नगरिया हे होते.
कार्यक्रमाचा सत्कार समारंभाचा भाग आटोपल्यावर, दुसरा भाग म्हणजे विद्यार्थ्यांचे व मुख्य गायकांचे आपल्या कलेचे सादरीकरण हा भाग सुरू झाला. श्रीमती निर्मला भोकरीकर यांची पूर्वीची विद्यार्थीनी सौ. प्रिती विखरणकर, औरंगाबाद यांनी ‘सरस्वती वंदना’ हे नृत्य अप्रतिमपणे सादर केले. नंतर श्रीमती भोकरीकर यांचे चिरंजीव आणि विद्यार्थी श्री. मुकुंद भोकरीकर यांनी हार्मोनियमवर राम नवरात्रोत्सवाचे औचित्य लक्षात घेवून, रामाचे भजन अतिशय सुंदर, लयकारी दाखवत सादर केले. त्यांना तबलासाथ श्री. तेजस मराठे यांनी केली.
नंतर समस्त रावेरवासी ज्यासाठी उत्सुक होते, तो कार्यक्रम म्हणजे सूरमणी श्री. धनंजय जोशी, नांदेड यांचे गायन सुरू झाले. सुरूवातीच्या स्वरलगावानेच सभा ताब्यात घेत, त्यांनी बिहाग राग गात असल्याचे सांगीतले. बिहाग या रागातील ‘कवना ढंग तोरा’ हा एकतालातील बडा ख्याल त्यांनी सुरू केला. अप्रतिम स्वरविस्तार करत राग डोळ्यांसमोर उभा केला. त्यानंतर तीनतालातील चीज ‘लगन तोसे लागी बलवमा’ ही सादर केली. त्यानंतर श्रोत्यांमधून फर्माईश आली, ती तरान्याची ! ‘श्रोत्यांना जलद लयीतील गीत आवडते, म्हणून कदाचित आपण तराना सांगत असाल, पण मध्य लयीत पण तराना, किती छान वाटतो, ते ऐकाच !’ म्हणत ‘रागेश्री’ या रागातील ‘तराना’ त्यांनी ऐकवला.
यानंतर ‘मानापमान’ या कै. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या नाटकातील, ‘या नवनवलनयनोत्सवा’ हे पद अप्रतिमपणे सादर केले. पदांत वेगवेगळे राग दाखवत, पुन्हा मूळ रागावर येता येते, हे ‘रागांतर’ प्रकाराने दाखवले.
‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ हे अशोकजी परांजपे यांचे गोरा कुंभार या नाटकातील गीत म्हटले. यानंतर भैरवीने सभेची सांगता केली ती ‘राम नाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी’ हे संत एकनाथ महाराजांचे प्रसिद्ध भजन गावून ! त्यांना तबल्यावर समर्थ साथ श्री. तेजस मराठे, भुसावळ आणि हार्मोनियमवर सुंदर साथ श्री. अक्षय गजभिये यांनी केली.
नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम नाईलाजाने उशीरा सुरू होणे, कार्यक्रमा दरम्यान लाईटाने थोडा वेळ करामत दाखवत अंधार करणे, तसेच सरतेशेवटी निवडणुका आणि त्याच्या आचारसंहितेचा बसलेला फटका, कार्यक्रमाची वेळ कमी होण्यात झाला. उत्तम सुरू असलेला व रंगात आलेला कार्यक्रम, निदान दोन-चार तास तरी अजून चालायला हवा होता, ही हुरहूर व्यक्त करत श्रोते घरी गेले.

14.4.2019

Image may contain: 15 people, including Uday Phadke, Pranjali Rasse, Sushilkumar Varma, Dhananjay Joshi Nanded and Tejas Marathe, people standing, wedding and indoor

Image may contain: 10 people, people smiling, people standing and wedding

https://scontent-bom1-2.xx.fbcdn.net/v/t1.0-9/57070947_2291720984217304_6019417440100810752_n.jpg?_nc_cat=100&_nc_eui2=AeHiUo3CLEMturDXXh852x2qvvUuCi70Aw7I14H6_StnryMqO1ULaP_pzwX7uk-X28Q1fxxPyeY7goz8rKc_mNBm8HNcsunshS7XChE3IO0zKw&_nc_oc=AQlBtW_t7uFeG8jGUScEzfei-FT8b9okOXy0c7B6CMHczQxEDr0BJaG_EguJrjXX_9Y&_nc_ht=scontent-bom1-2.xx&oh=943d2ba832dcaf973c6fc6ad3d7b7d0d&oe=5DC4CC0E



Image may contain: 10 people, including Shashank Katti and Pranjali Rasse, people standing, wedding and indoor
आताच श्री. प्रविण बर्दापूरकर यांची श्री. राज ठाकरे यांच्यावरची पोस्ट वाचली, काही मुद्दे सांगावेसे वाटले.
१. प्रत्येकाच्या भाषणाला जमणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतांमधे होईलच हे सांगता येत नाही, कारण ऐकायला येणारी मंडळी, ही उत्सुकतेने पण ऐकायला येतात. मत देणारी मंडळी मत देतांना, आपला-परका, पैसे देणारा-न देणारा, पैसे खावून काम करणारा-न करणारा, खरा-खोटा वगैरे ठरवून मग मत देतात. (इथं मी, सभेला येणारी मंडळी स्वत:हून येतात, त्यांना कोणी रोजंदार देवून आणत नाही, हे गृहीत धरले आहे.)
२. हा चांगला नाही, याच्याकडे जावू नका, हे जसे सांगीतले जाते, तसे कोणाकडे जावे, हे पण सांगावे लागते. हे जर सांगीतले नाही, तर तुमची भूमिका ही मार्गदर्शकाची नसून, संबंधीत व्यक्तीच्या द्वेषातून निर्माण झालेली आहे, हे समजण्याइतकी भारतातील जनता सूज्ञ व हुशार आहे. समर्थ पर्याय पुढे नसेल तर, केवळ द्वेष केल्याने काहीही साध्य होत नाही.
३. हा नको, तर कोण ? हा विचार पण जनतेने सभेला येण्यापूर्वी केलेला असतो. त्यात काही नवीन पर्याय मिळाला, तर उपयोग होतो, अन्यथा त्यातून फारसे काही साध्य होत नाही. जी मंडळी कुंपणावरची असतात, म्हणजे ज्यांचा विचार निश्चित झालेला, नसतो, त्यांच्यावर थोडाफार परिणाम होऊ शकतो, की जेव्हा तुल्यबळ व सक्षम पर्याय असेल ! इथं असे काहीही दिसत नाही.
४. आपल्याला जे ज्ञान असेल, ते सर्वांना द्यायला हवे, ही भूमिका जर असेल, तर तुम्ही ज्ञानी आहे, हे जनतेने पूर्वी मान्य करायला हवे, तुमची तेवढी विश्वासार्हता हवी. ती जर नसेल, तर या अशा कांगावखोर भाषणाचा विशेष परिणाम होत नाही. उद्या जर मा. मनमोहनसिंग, मा. प्रणव मुखर्जी, मा. अरूण जेटली, मा. सुरेश प्रभू, मा. रविशंकर प्रसाद, मा. अडवाणी वगैरे मंडळी आपल्याशी त्यांच्या क्षेत्रासंबंधी विषयावर बोलायला आली, तर त्यांना ऐकायला, सर्व विचारांची मंडळी येतील, कारण त्यांचे त्या क्षेत्रात योगदान आहे. असं इथं काय आहे, असं सांगता येईल ?
४. एकदा का तुमच्याजवळ सांगण्यासारखे काहीही नसून, केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी हे केले जात आहे, हे समजले की तुमच्या कार्यक्रमाला जनता करमणुकीच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त महत्व देत नाही.
५. विरोधकांचा आवाज दाबला जातोय, हे आपल्या बाबतीत जितके सत्य असते, तितकेच इतरांच्या बाबतीत पण असते.
६. राज्यशकट हाकणे म्हणजे भाषण करण्याइतके सोपे नाही, की उचलली जीभ आली लावली टाळ्याला ! शासनाने घेतलेले निर्णय, कोर्टाने दिलेले आदेशसुद्धा किती व्यवस्थित डावलले जातात, हे आपण वेळोवेळी पहात आलेलो आहे. यासाठी आपल्या विचारसरणीची, पक्षाची मंडळींची मजबूत यंत्रणा हवी, तसेच कामाप्रती श्रद्धा व कर्तव्याची जाण असलेली कर्मचारी यंत्रणा हवी, तरच त्याची, धोरणाची नीट अंमलबजावणी होते. नोकरीवर सरकारी कर्मचारी घेतांनाची, ‘पारदर्शक व्यवस्था’ आठवा, उत्तर मिळेल. आदर्शव्यवस्था आणि वस्तुस्थिती यांत जमीन आणि अस्मान इतके अंतर असते, खरे व खोटे इतके अंतर असते. एरवी चांगली पोपटपंची करणारी मंडळी, स्वत:वर वेळ आली, की कशी विपरीत वागतात, हा अनुभव पूर्वीपासून येत आलेला आहे. ‘त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता ?’ हे विचारावं लागते.
सरतेशेवटी काम करणारा कोण, आणि न करणारा कोण, हे जनता योग्यतऱ्हेने जाणून असते. सर्व काम सरकारने करायला हवे आणि ते पण फुकटात, ते त्याचे कर्तव्यच आहे, हा समज करून देणार असेल, तर ते केवळ चुकीचे नाही तर, अहिताचे आहे. जनतेने आपली जबाबदारी काय आणि सरकारची काय, हे ओळखायला हवे. त्यासाठी आपले कर्तव्य पार पाडून, सरकारला धारेवर धरायला हवे, तर ते यशस्वी होते. आपले कर्तव्य पार पाडणे कठीण असते, सरकारला, मग ते सरकार कोणाचेही असो, सोपे असते; पण चुकीचे असते, अंतीमत: देशाच्या, समाजाच्या अहिताचे असते.
तर सरते शेवटी आपच्याकडे किर्तन असले, की येणारा अनुभव आठवला तो सांगतो. काहींना किर्तनकाराचे किर्तन ऐकावे, दोन चांगले शब्द कानांवर पडतील असे वाटते. ते किर्तनाला जातात. मात्र काहींना किर्तन उधळून लावायचे असते. ते एखाद्या गल्लीतून हाकलत हाकलत, डुकराला किर्तनांतील श्रोत्यांत घुसवतात. गोंधळ होतो थोडावेळ ! मग किर्तन ऐकायला आलेली मंडळी, ही किर्तनांत शिरलेल्या डुकराला तर हाकलतातच पण हा किर्तनात डुक्कर घुसवून कीर्तनाची दाणादाण करणारा कोण आहे, त्याला पण पहातात.
या सरकारचे काम व्यवस्थित चालू आहे, त्याला नीट करू द्या !

19.4.2019
वकिली व्यवसाय सुरू करून कदाचित तीन-चार वर्षे झाली असतील. मी रावेरला होतो. नाल्यावर माझे आॅफिस होते. मी आॅफिसमधे बसलो होतो. समोर एक सोहळ्यावजा कार्यक्रम सुरू होता. नवीन कंपनीचे आॅफिस सुरू होणार होते. त्या कार्यक्रमाचे चहापाणी सुरू होते. येणाऱ्या जाणाऱ्याला कोणालाही मोफत चहापाणी मिळत असल्याने, त्याला कंपनी कशाची आहे, याची काळजी नव्हती आणि ते विचारण्याची पण आवश्यकता वाटत नव्हती. तो चहापाणी घ्यायचा आणि समाधानाने निघून जायचा. कंपनी खरंच चांगली दिसतेय, ही मनाशी खूणगाठ मांडूनच ! माझ्या आॅफिसमधे पक्षकार मंडळी बसलेली असली, की काही वेळा मी चहा बोलवायचो. समोरच महाजनचा चहाचा स्टाॅल होता. बऱ्याच वेळा, मी ओट्यावर आलो, आणि महाजनच्या दृष्टीस पडलो, तरी महाजन चहा पाठवून द्यायचा. त्या दिवशी तसेच झाले. काय चालू आहे, हे पहायला मी बाहेर आलो, महाजनने मला पाहीले आणि चहा पाठवून दिला.
‘कारे, काय चालले आहे ? कसली कंपनी आहे ?’ मी विचारले.
‘मस्त कंपनी आहे. तीनेकशे चहा लागतील, म्हणून सांगीतले मला !’ महाजन.
पण, नेमके काय, कशाची आहे ?’ मी.
‘आज तुम्ही वस्तूच्या किमतीच्या तीस टक्के पैसे भरायचे, बरोब्बर साठाव्या दिवशी तुम्ही बुक केलेली वस्तू किंवा रक्कम घेवून जायची. पुन्हा पैसे द्यायची आवश्यकता नाही.’ शेवटचे वाक्य महाजन ठासून बोलला.
हे ऐकल्यावर माझ्या आॅफीसमधल्या पक्षकारांच्या भुवया आकाशात !
‘आॅं ! अरे काय बी सांगतोय ?’ पक्षकार एका सुरात ? मला हसू आले.
‘काय हसतांय वकील साहेब !’ एक जण.
‘हसू नको, तर काय करू ? हे शक्य आहे का ?’ मी.
‘तुम्ही भलतेच सौंशयी !’ एक जण.
‘वकील लोकांना जिकडं तिकडं फसवाफसवीच सुरू हाय असं दिसतं’ एक त्यातला वयस्कर पक्षकार.
‘काहीतरी बुक करावं म्हंतोय ‘ तिसरा उतावीळ !
‘आजच्या कोर्टाच्या तारखेचे पहा, रिकाम्या गोष्टींपेक्षा ! बुकींग करायचे, ते चार-सहा महिन्यांनी करा ! जर ही कंपनी इथं राहिली तर !’ मी.
‘भयंकर सौंशयी सोभाव साहेबांचा !’ तोच पक्षकार.
‘तुमच्या केसमधे असे होईल, हा माझाच ‘सौंशय’ खरा ठरला ना ? तुम्ही तर म्हणत होते, ‘त्यानं जबान दिलीय. काही झालं तरी असं होनार नाही.’ मी. त्याला त्याच्या केसची आठवण करून दिली.
‘ते हाय म्हना !’ आता त्याच्या आवाजात दम नव्हता.
‘आणि महाजन, तू फक्त रोखीने चहा द्यायचं काम कर. त्या बुकींगच्या भानगडीत पडू नको.’ मी.
‘नाही साहेब, तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच नाही.’ महाजन किटली व ग्लास घेवून जाता म्हणाला.
साधारण साडेतीन-चार महिने झाले असतील. सकाळी आॅफिसमधे आलो, तर समोर पुन्हा गर्दी ! तिथं असंच कोणाला विचारलं, ‘दोन दिवस झाले, आॅफिस उघडले नाही कोणी.’ हे उत्तर मिळालं. आॅफिसमधे बसलेल्या पक्षकारांना विचारले.
‘तुमच्यापैकी कोणी बुकींग केले होते का ?’ मी.
‘नाय बुवा !’ सर्वांनी एकासुरात सांगीतले. मला हसू आलं.
‘तुमचं हसणं कोड्यात टाकतं पहा, साहेब !’ पक्षकारांपैकी एक !
‘साधी गोष्ट आहे. तीस टक्के किंमतीत त्याला वस्तू द्यायला परवडेल का ? तीन महिने पैसे गोळा करायचे, जमलेल्या पैशातून एखादा आठवडा, सर्वांना वस्तू द्यायच्या. मग मोठ्या व जास्त रकमेच्या वस्तूंचे बुकींग होते. जास्त रक्कम गोळा करायची, आणि एका दिवशी सर्व गाशा गुंडाळून पसार व्हायचं. मग हाच उद्योग दुसरीकडे सुरू करायचा. आपल्याकडे लोभी, आळशी आणि मूर्ख लोकांचा तुटवडा नाही. वेगवेगळ्या भागातल्या लोकांना फसवत, गल्ला जमवत रहायचा, हा असा फसवणुकीचा यांचा मुख्य व्यवसाय ! तुम्ही पोटाला चिमटी देवून पैसे कमवतात आणि जास्त लोभापायी यांना देवून टाकतात ! त्याचवेळी हे शक्य आहे का, हे विसरून जातात. याच तुमच्या स्वभावाचा ही मंडळी लाभ उठवतात.’ मी.
‘ते खरं हाय म्हना !’ त्यांच्याच पैकी एक जण !
‘पण फसल्याशिवाय अक्कल येत नाही ना !’ दुसरा.
‘माझा विचार झाला होता बुकींगचा, पण तुम्ही सांगीतल्याने गप्प बसलो. थोडक्यात वाचलो.’ तिसरा.
ही घटना तशी जुनी, पण बरीच शिकवणारी आणि आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी ! सध्या वातावरण असेच आहे. जे शक्य नाही, ती आश्वासने सध्या दिली जात आहे. सर्वांनाच ते समजेल असे नाही. आपल्याला पण वाटते, ‘अजून मागा. अजून मागा. ते का त्यांच्या पदरहून देताय ? मागा, मागा, मागा !’ काय शक्य आहे आपण विसरून जातो. आपली शक्ती कार्य करण्याऐवजी मागण्यात खर्च होते. देशाच्या तिजोरीवर डल्ला मारून थोडेफार मिळेल पण ! पण यासाठी आपण त्या लुटीत सहभागी व्हायचे ?

21.4.2019

गांवची जत्रा, अन् कारभारी सत्रा !

गांवची जत्रा, अन् कारभारी सत्रा !
साधारण १०-१२ वर्षांपूर्वीची घटना ! आम्हा दोघांना जळगांवला जायचं होतं औरंगाबादहून ! जायचे तर रस्त्याने, एस् टी. बसशिवाय मार्ग नाही. त्यांत दोघांना जायचं म्हणजे, सर्व आवरून जावं लागतं घरातले ! माझी तयारी लगेच होते, पण माझी तयारी होणं, हे अजिबात महत्वाचे नसते. त्यावरील प्रतिक्रिया म्हणजे -
‘कपडे घातले म्हणजे झाली तयारी, असं नसते. घरातले सर्व नीट पाहून, झाकून-टोपून, गॅस बंद करून, दूध वगैरे कोणाला देवून, मग निघावं लागते.’ इति सौ. त्यामुळे मी सकाळी कितीही लवकर उठून कामाला लागलो, तरी त्याला काहीही अर्थ नसतो; तर हे सर्व आटोपून, जेवण वगैरे करून, निघतानिघता साधारणत: दुपारचे १२-१२.३० होतातच. त्याप्रमाणे आम्ही हे सर्व या नियमाप्रमाणे आटोपून एस् टी महामंडळाच्या स्टॅंडवर आलो. प्लॅटफॉर्मवर उभे राहीलो.
जळगांव, भुसावळ, जामनेर, रावेर, बुरहानपुर, मुक्ताईनगर वगैरे गाड्या सुटत होत्या, तिथं बघीतलं, तर काय समोरच भुसावळ गाडी लागली होती. म्हटलं ‘चला, ही जळगांवहून जाईल.’ तशी गाडीत विशेष गर्दी नव्हती. बरं वाटलं. मी गाडीत चढायला पाय ठेवला आणि चढताचढता विचारले, ‘जळगांवमार्गे का ?’
‘नाही. जामनेरमार्गे !’ गाडीतील कोणीतरी ! मी गाडीत पायरीवर चढलेला उतरलो.
‘नीट पाहून गाडीत चढत जा ! विचारले म्हणून बरे ! नाहीतर पहूरवरून जामनेरला पोहोचलो असतो.’ इतके स्पष्ट व निर्भीडपणे, बस स्टॅंडवरपण सर्वांसमक्ष कोण बोलले असेल, ते मी सांगत नाही. आपण अंदाज करावा. अनुभवींना याचा अचूक अंदाज येईल. पण उत्तर सांगू नका, मनांतच ठेवा. तोपर्यंत ती गाडी गेली.
थोड्याच वेळात दुसरी गाडी सरकन आली आणि उभी राहिली. ती पण भुसावळ ! तिची पाटी ती, जामनेरमार्गे असल्याची दाखवत होते. मी विचारले पण नाही आणि चढलो पण नाही. ती गाडी गेली, जवळपास रिकामीच होती. मग तिसरी आली व लागली प्लॅटफॉर्मला ! ती पण भुसावळ आणि जामनेरमार्गेच ! ती पण तशी रिकामीच गेली. मग चौथी आली, ती पण जामनेरमार्गे भुसावळ ! तोपावेतो जळगांवसाठी लोकांची गर्दी बऱ्यापैकी जमली होती. पण ती चौथी गाडी गेली. पाचवी व सहावी गाडी पण आली आणि आमच्या समोरून ‘टण् टण्’ अशी घंटी वाजवत कंडक्टरने नेली. आम्हा सर्वांचाच धीर सुटत होता. काही तर पुढे जावून, वाकडी मान वर करून, आपण नक्की जळगांवच्याच प्लॅटफॉर्मवर उभे आहोत ना ? याची पण खात्री केली. प्लॅटफाॅर्म जळगांवचा होता.
‘अहो, काही तरी करा. दीड तास झाला.’ सौ.
‘मी काय करू ? मी गाडीवाल्यांना सांगतोय का, की येवू नका म्हणून ?’ मी.
‘काहीही सांगीतले की तुमचे तिरपागडेच असते.’ सौ.
‘बरं. ठीक आहे. पहातो.’ माझी माघार ! तेवढ्यात सातवी गाडी आली. बॅगा घेवून मी पुढे जातो, तो ती गाडी पण ‘जामनेरमार्गे भुसावळ’ ! सर्वांना हे दिसल्यावर, -
‘काय टाईमटेबल करतात की गंमत करताय महामंडळवाले, कोणास ठावूक !’ एक प्रवासी !
‘पैसे घेवून नोकऱ्या लावतात xxxx !’ दुसरा. त्याच्या कोणाला तरी नोकरी मिळाली नसावी.
‘Xxxxx डिपार्टमेंटल सुरू करायला हव्या, म्हणजे समजेल !’ हा बहुतेक महसूल खात्यात असावा.
‘तिकडं कंट्रोलरला विचारलं, तर म्हणे येईल थोडं थांबा. अरे, कधी येईल ?’ एक सामाजिक कार्यकर्ता असावा. कंट्रोलरला नेमणूकपत्र देतांना ही अशी उत्तरे त्यांच्याकडून घनपाठी पद्धतीने तयार करून घेत असावीत.
तेवढ्यात तिकडच्या दरवाज्यातून ड्रायव्हर उतरला. मी ड्रायव्हरला म्हटले -
‘का रे भो, काही दया येतेय आमची ? सातवी गाडी आहे जामनेरमार्गे ! रिकाम्या जाताय नुसत्या !’
‘तुम्हाला कुठं जायचंय ?’ ड्रायव्हर.
‘जळगांवला ! किती गर्दी झालीय पहा. दीड तास झाला, गाडी नाही !’ मी. यांवर तो कंडक्टरशी काही बोलला. मग मला म्हणाला ‘साहेब, तुम्ही गाडीत बसा.’ आम्ही सामान घेवून गाडीत बसलो. तेवढ्या वेळात निदान चार वेळा मला सौ. ने ऐकवलं ‘ही गाडी जामनेरमार्गे आहे.’
‘अग, जरा स्वस्थ बसू दे ! दीड तास झाला मी उभा आहे.’ मी. नवऱ्याचा स्वस्थपणा बायकांना सहन होत नाही, हे ‘जागतिक सत्य’ म्हणून मान्य झाले आहे.
‘मग एकटे तुम्हीच काय, मी पण उभी आहे.’ सौ.
‘मग तू पण बैस जरा स्वस्थ.’ मी.
हे संभाषण वाढले असते, तेवढ्यात तो ड्रायव्हर आला. मी बाहेर आलो त्याच्याजवळ, गप्पा सुरू झाल्या.
‘साहेब, मी यातले पूर्वीचे तीन-चार जामनेरमार्गे भुसावळचे असलेले प्रवासी दुसऱ्या गाडीत बसवतो. ती गाडी इथून लागतेय. मग निघू.’ ड्रायव्हर !
‘कुठले भाऊ तुम्ही !’ मी.
‘कठोऱ्याचा ! तुम्ही कुठले साहेब ?’ ड्रायव्हर !
‘अरे भो, मी रावेरचा !’ मी.
‘माझी सासुरवाडी आहे रावेरची !’ ड्रायव्हर।
‘कोणाकडची ?’ मी.
‘शिवाजी चौकातील पाटील यांच्याकडची !’ तो.
‘अरे मग, सासुरवाडच्यांना असा त्रास देतोय का ? लक्षात ठेव, घरी समजलं तर, आज रात्री जेवण मिळणार नाही घरी !’ मी. त्याला पण हसू आले.
‘आमचे महामंडळ म्हणजे कसं आहे - ‘गांवची जत्रा अन् कारभारी सत्रा !’ सतरा कारभारी असले, की कामाचा असा बोऱ्या वाजतो. गाडी प्रवाशांसाठी आहे. आमच्या पगारासाठी नाही. साधी गोष्ट आहे, इथं आता एवढी गर्दी आहे, तर कमी प्रवासी लगेच दुसऱ्या असलेल्या गाडीत बसवायचे आणि ही त्याच रूटची गाडी आहे, तर तिकडे न्यायची ! प्रवासी जास्त असले की कलेक्शन चांगले येते. आमचा डेपो मॅनेजर मस्त आहे. त्याने आम्हाला पाॅवर दिलीय. काहीही करा, पण नियमात करा. माझी फुल परवानगी. पण बम्म कलेक्शन आणा. आमच्या डेपोचे कलेक्शन महाराष्ट्रात माहिती आहे. गाड्या चकाचक. प्रवासी दुसरी गाडी सोडून, आमच्या डेपोच्या गाडीत बसतात.’ हे इतके ज्ञान तर मला पण नव्हते. मी काही अजून विचारणार, तेवढ्यात कंडक्टर आला आणि - ‘जळगांवला जाणाऱ्या प्रवाशांनी या गाडीत बसा. जामनेरमार्गे जाणाऱ्यांनी शेजारच्या गाडीत बसा.’ हे खास आवाजात जाहीर केले. लोटालोटी करत सर्व प्रवासी चढले आणि गाडी जळगांवला निघाली.
लक्षात ठेवा, खंबीर निर्णय घेणाऱ्या एका डेपो मॅनेजरमुळे देखील, त्या डेपोचे कलेक्शन पण चांगले असते. त्याचे इतर सर्वत्र नांव होते. तो प्रवाशांना पण समाधान देतो. त्या डेपोच्या गाड्या जास्त चालतात. मात्र सतरा कारभारी असले, की प्रवाशांच्या दैनेला पारावार नसतो. माझ्यासारखा असा अनुभव, आपण यापूर्वी दहावर्षांपूर्वी घेतला होता कधी ?—- आता पण निर्णय घ्या !

22.4.2019
परवा पाच हजार मित्र झाल्याने येथील मित्रमर्यादा संपली, आणि मनांत विचार आले.
सुरूवातीला इथं व्यवसायाच्या निमित्ताने, औरंगाबादला, या परक्या ठिकाणी आल्याने गांवची, परिचित मंडळी दुरावतील, या विचाराने सुरू झालेला हा प्रवास ! ती नियमीत भेटत रहावी, त्यांच्याशी गप्पागोष्टी होतील, या उद्देशाने सुरू झालेला इथला प्रवास, हा शालेय काळातील, बालपणांतील मित्र भेटण्यात खरंच रंगला.
नंतर तशी पूर्वपरिचित नसली, तरी आपल्या विचाराची मंडळी परिचित व ओळखीची वाटू लागली, मग ती संपर्कात असावी, म्हणून कुठलाही अहं न ठेवता, मी येथील मैत्रीसाठी नि:शंकपणे विनंत्या पाठवल्या. त्या बहुतेकांनी स्विकारल्यात. अजूनही त्यांत काही दुरावा आला नाही, असे मला तरी वाटते. आपली मंडळी इथं दिसताहेत, म्हणून मला पण विनंत्या आल्यात, मी पण मैत्रीचा हात स्विकारला.
मला असलेली शास्त्रीय संगीताची ओढ, इथं मला खूप मित्र देवून गेली. त्यांचा वावर तसा फारसा इथं नसतो. मात्र त्यांची मैत्री ही इथलं वातावरण संगीतमय बनवून टाकते.
वकीली व्यवसायातील मंडळी, तर सर्व भारतभर आमची मित्रच असते, त्याला इथं अधिकृतपणे ‘फेसबुकीय मान्यता’ मिळाली. त्यांत अजून दृढता आली, मैत्री घट्ट झाली.
मराठीतील साधं, सरळ लिखाण पण किती परिणामकारक ठरू शकते नाही ? क्लिष्ट विषय, हे सोप्या भाषेत दृष्टांताद्वारे आपल्या लिखाणाने सांगणारी मंडळी पण इथं मिळाली. आपल्या पत्रकारितेच्या कौशल्याने साहित्याचा दर्जा असलेली लेखक मंडळी, इथं मिळाली.
राजकारणाच्या वेडापायी कोणाला काहीही संबोधणारी मंडळी इथं दिसली, तसेच वैचारिक भिन्नता असली, तरी ती निखळ मैत्रीच्या आड येवू न देणारी मंडळी पण इथं मिळाली.
काही यापैकी, कोणी काहीही नसले तरी, मित्र म्हणून चांगली माणसं मिळाली. काहींच्या घरी जाण्याचा योग आला, तर काही माझ्याकडे पण भेटायला आलेत. काहींची इच्छा असून पण भेटीचा योग अजून आला नाही.
या सर्व मंडळीच्या संपर्काने, माझी लिखाणाची जुनी उर्मी पुन्हा प्रगट झाली, आणि गांवच्या आठवणी, शालेय आठवणी, व्यवसायातील अनुभव, संगीतातील मला समजलेले स्वर इथं प्रगट व्हायला लागले. काहींना आवडले असतील, काहीना नसतील पण आवडले.
एक मात्र नक्की इथं भरपूर जिव्हाळ्याने किंवा द्वेषाने लिहीलं, बोललं गेलं, तरी त्याचा परिणाम, आपल्या नित्य जीवनावर, या आभासी मैत्रीची व नात्यांचा, करून घ्यायचा नसतो, हे ठरवलं असल्याने, ती पीडा वाटली नाही.
मैत्री व मित्र हा विषय तसा, संपणारा नसतोच ! अजून काही जण माझ्यासोबत मित्र म्हणून येवू इच्छितात, मला पण ते इथं सोबत असावे असे वाटते. त्यामुळे काही नांवे, जी एकापेक्षा अधिक वेळा आली, ती वगळली. काही संस्था वगळल्या, आणि पुन्हा थोडीफार जागा करून घेतली, नव्या मित्रांचे स्वागत करायला !
काहीं चांगल्या मित्रांनी, आपले इथले मित्रसंबंध, आपले खाते बंद करून, सर्वांशीच संपुष्टात आणले. मनांत नाही म्हटले, तरी पाल चुकचुलीच ! त्यांची कारणे आणि अडचणी त्यांनाच माहीत.
—- इच्छा एकच की इथं कोणालाही एकसुरी व कंटाळवाणे वाटू नये. उत्साहाचा रंगबिरंगी झरा इथं निवांतपणे, निरोगी वातावरणांत मुक्तपणे झुळझुळ वहात रहावा.

25.4.2019

Image may contain: 5 people, including Harshad Shamkant Barve and Sujata Shembekar S, people smiling, text that says 'Friends Find Friends 5,000 friends Original Story Jayant Vidwans Harshad Jayant Machu Shamkant... Vidwans Sonwane राजेश कुलकर्णी Sanjiv Sujata Pednekar Shembeka... See All Friends'
या (दुष्ट) अनुभवातून कोण कोण गेले आहे ? आपल्याजवळ पण असतील तर ते सांगा.
१. घरात शेंगदाणे खरपूस भाजले असतांना, ते दिसेल असे न ठेवता, त्याचा ताबडतोब कूट करून टाकणे.
२. चांगले ताक केल्यावर, ते कोणाला प्यायला मिळण्यापूर्वीच, त्याच दिवशी त्याची कढी करणे.
३. आपण आज काहीतरी मस्त खमंग खायला मिळेल, अशा सकाळी झालेल्या चर्चेच्या आशेवर, दुपारी पानावर बसावे, तर जेवायला पानांत भलतेच बेचव काही !
४. मस्त सिनेमाला जायचे ठरवून, तिकीटे काढलीत, तर घरातील सर्व आटोपता आटोपता, टाॅकीजमधे पोहोचेपर्यंत सिनेमा सुरू होऊन गेलेला. मग प्रेक्षकांच्या पायावर पाय देत किंवा त्याचे पाय चुकवत, आपल्या आसनावर स्थानापन्न होणे. —- जातांना किंवा येतांना, याबद्दल चकार शब्द न काढता, सर्व दोष आपलाच आहे, हे कबूल करत येणे.
५. लग्न समारंभात फोटो काढण्याचे वेळी, नेमके गुप्त झाल्याने फोटो काढण्याचे राहून जाणे. —— त्याचे बोल त्या लग्नातील जोडप्याच्या मुलाच्या लग्नापर्यंत ऐकावे लागणे.
६. साड्यांच्या दुकानांत गेल्यावर एखादी साडी घ्यायला नकार दिला किंवा घेता आली नाही, तर त्यामुळे किती प्रकारे, किती काळ नुकसान झाले आणि ते नुकसान आपल्यामुळेच कसे झाले, हे पटवून घेणे.

30.4.2019

राग - भैरव

राग - भैरव
आपल्या बहुसंख्य आठवणींचे बीज हे लहानपणीच्या कुठल्यातरी घटनेमधे दडलेले असते. वटवृक्षासारखे न दिसणारे हे बीज, अशी काही, अलिकडे जरी घटना घडली तरी, आपल्याला थेट बालपणांत घेवून जाते. आपल्या तारूण्याचे भरभक्कम खोड आणि या डौलदार पानसंभाराला, जीवनामृत देण्याचे काम, बालपणी मजबूत झालेली मुळे करीत असतात.
दिवाळीच्या सुटीत आजोळी जळगांवी जायचो, त्यावेळी कार्तिकी एकादशीचा जळगांवचा रथोत्सव असायचा. त्या दरम्यान कार्तिक शुद्ध १४ म्हणजे ‘वैकुंठ चतुर्दशीस’ ‘हरिहर भेट’ असायची. जगाचा पालनकर्ता भगवान विष्णु हा ‘हरि’ आणि संहारकर्ता भगवान शिव हा ‘हर’ यांची भेट होते यादिवशी, ही श्रद्धा ! एरवी विष्णुला तुळस आणि शिवाला बेल वहायची ही पद्धत, ‘हरिहराची भेट’ दिसावी म्हणून बदलवली जायची. त्या दिवशी विष्णुला बेल तर शिवाला तुळस अर्पण केली जायची. यांतून समजायचे की ही ‘हरिहर भेट’ आहे.
त्या दिवशीची अजून विशेष गोष्ट लक्षात आहे म्हणजे, त्यांच्याकडच्या रोजच्या देवपूजेबद्दल ! पायावर पडले तर पायाचे बोट फ्रॅक्चर होवू शकेल, एवढ्या जड असलेल्या तांब्याच्या ताम्हणात सर्व देव पूजेला काढले जायचे, पूजा करून त्याच्या ठिकाणी देवघरांत ठेवले जायचे. अभिषेक करायच्या दिवशी, देव उजळवायच्या दिवशी मग चिंच, शिकेकाई, रांगोळी यांचा वापर करून, ते चकचकीत केले जायचे.
नित्यपूजेत मग अभिषेक सुरू व्हायचा. त्यांची कुलस्वामिनी देवी असल्याने ‘श्रीसूक्त’ म्हणून अभिषेक व्हायचा. विष्णुच्या ‘शाळीग्रामास’ पुरूषसूक्ताने तर महादेवावर ‘रूद्रभिषेक’ व्हायचा. अभिषेक करतांना रूद्राध्यायातील ‘चमक’ ऐकतांना ‘चमे चमे’ ऐकू यायचे आणि ‘नमक’ ऐकतांना ‘नमो नमो’ ऐकू यायचे, खूप छान वाटायचे.
नमकाचा एक नमुना बघायचा तर -
नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो
नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो
नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो
नमो बभ्लुशाय विव्याधिनेऽन्नानां पतये नमो
नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो
नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो
नमो रुद्रायाऽऽतताविने क्षेत्राणां पतये नमो
चमकाचा एक नमुना बघायचा तर -
वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मेऽपानश्च मे व्यानश्च मेऽसुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनूश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मेऽस्थानि च मे परूंषि च मे शरीराणि च मे ||
आणि त्यांत येणारा ‘महामृत्युंजय मंत्र’ -
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
या अशा जगत्संहारकर्त्या शिवाचे गण, त्यांचे अक्राळविक्राळ दिसणे, अघोरी साधना, आणि शत्रूचा अक्षरश: विध्वंस करून आपल्या कैलालोकी जाणारे ते स्मशाननिवासी महादेवाचे, शंकराचे सेवक ! सर्वच अनाकलनीय व अद्भूत वाटायचे. ‘चांदोबा’ मासिकात त्यावेळी ‘शिवपुराण’ म्हणून मुलांना समजतील अशा गोष्टी यायच्या. चित्रे पण खूप छान असायची. त्यातून शंकराचे एक नांव - भैरव, हे चांगलेच लक्षात राहिले. भैरव म्हणजे भयानक, भयापासून रक्षण करणारा ! आग ओकणारा त्रिनेत्र, विशाल शरीराचा, काळे वस्त्र परिधान केलेला, रूद्राक्षाच्या माळा घातलेला, हातात लोखंडाचा दंड घेतलेला आणि काळ्या कुत्र्यावर आरूढ झालेला, हा ‘तामसी’ मानला गेलेला देव !
सृष्टीची निर्मिती म्हणजे सृजन हे सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे काम, त्याने निर्मिलेल्या सृष्टीचे पालन हे भगवान विष्णुचे काम, ते आपण महत्वाचे मानतोच ! कदाचित यापेक्षा पण महत्वाचे असे काम म्हणजे, या सृष्टीचा विनाश करणे, संहार करणे, हे सृष्टीचा संहारकर्ता म्हणून भगवान शंकराचे काम ! या सृष्टीला लागलेले दोष, लागलेली कीड, इथं झालेले पापात्मे यांचा संहार जर केला नाही, तर नव्या सृजनशक्तीचा अविष्कार करायला ब्रह्मदेवाला जागा तरी मिळेल का ? पालनपोषण करायचे, तर भगवान विष्णुंनी या पापात्म्यांचे करायचे काय ? नवसृजनासाठी जागा हवीच, म्हणून भगवान शिवाची ही सर्व स्मशाननिवासी मंडळी फार महत्वाची आहे, आपल्या या सृष्टीसाठी !
भैरव म्हणजे शंकराचा अवतार एवढेच माहिती असल्याने, आईने तिच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला येणाऱ्या मुलींना, बहुतेक त्या ‘प्रवेशिका पूर्ण’च्या विद्यार्थी असाव्यात, ‘आज तुम्हाला ‘भैरव’ राग शिकवायचा आहे.’ हे सांगीतले, तेव्हा गंमत वाटली, आश्चर्य वाटले. शंकराच्या नांवाचा राग ! वा छान ! त्यावेळी त्यानुसार आवश्यक माहिती आई मुलींना देत होती. तुम्हा आम्हा सर्वांना ही तांत्रिक माहिती हवी असतेच, कारण आपल्याला राग डोळ्यांसमोर उभा करायला, गळा असेलच, असे नाही. ज्यांना गळा आहे, ते भाग्यवान ! त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त !
हा राग भैरव थाटातून निघतो. हा भैरव थाटाचा आश्रय राग आहे. या रागाची जाती संपूर्ण संपूर्ण आहे, म्हणजे यांत सर्व सात स्वर लागतात. या रागात ‘रिषभ’ आणि ‘धैवत’ कोमल लागतात. या रागाचा मुख्य स्वर म्हणजे ‘वादी’ हा धैवत, त्यानंतरचा मुख्य स्वर ‘संवादी’ हा रिषभ आहे. हा राग उत्तरांगप्रधान आहे. या रागाची गाण्याची वेळ समयचक्रानुसार पहाटे, संधीप्रकाश असतांना - साधारणत: ४ ते ७ अशी मानतात. त्यामुळे सकाळी हा राग खरोखरच ऐकायला छान वाटतो. या रागाची प्रकृती भक्ती आणि गंभीर आहे. परमेश्वराची आपल्यावर कृपा होत नाही, परमेश्वर आपल्यावर दया करत नाही, या भावनेतून भक्तीरसात्मक, गंभीर असलेली प्रार्थना स्वाभाविकच कारूण्याकडे झुकते. अंत:करणातील कारूण्यपूर्ण सादेने, तरी हा भैरव, हा परमेश्वर प्रसन्न होतो का, याची शंका येवू लागते. मग डोकावू लागते, ते किंचीत वैफल्य ! या रागातील वादी धैवत व संवादी रिषभ हे आंदोलीत करून लावले जातात. अवरोहात गंधार आणि निषाद यांचे प्रमाण अल्प असते. आरोहात काही वेळा पंचम न घेता, मध्यमावरून धैवतावर येतात.
या रागाचे आरोह, अवरोह आणि पकड पहा -
आरोह:- सा रे ग म प ध नी सां।
अवरोह:- सां नी ध प म ग रे सा।
पकड़:- ग म ध ध प, ग म रे रे सा।
या रागात पंचमाचा उपयोग जास्त केला, की रामकली या रागाचा भास होतो. मध्यमावर जास्त येऊन थांबले, की जोगिया राग वाटू लागतो. रामकली व जोगिया, हे पण ऐकायला अतीव गोड असलेले राग ! कोमल रिषभ असला की राग कारूण्याकडे झुकतो. भैरव या रागाच्या समप्रकृती असलेले राग म्हणजे, कालिंगडा व रामकली ! करूण रसपूर्णता असलेल्या या रागाची प्रकृती गंभीर आहे. तिन्ही सप्तकात विस्तार करता येणाऱ्या रागात, प्रभात भैरव, अहिर भैरव, शिवमत भैरव हे राग प्रचलित आहेत.
इतकी वर्षे झालीत, पण केवळ कानावर पडत राहिले, आणि स्मरणात राहीलेले हे भैरव रागातील धृपद -
गंगाधर शिवपिनाकि, त्रैलोचन शूलपाणि
नीलकंठ भस्मअंग, पार्वती अर्धअंग ।।धृ।।
करत्रिशूल डमरू बाजे, गले नाग मुंडमाल
कटीवसन व्याघ्रासन, वास करत भूतसंग ।।
परवा रविवार असल्याने नेहमीप्रमाणे सकाळी जळगांवी निघालो होतो. महिनाभर सुटी असल्याने मे महिन्यांत जाणार नव्हतो. त्यामुळे जरा लवकर निघायला लागणार होते, यावेळी महामंडळाच्या बसने जायचे होते. सकाळी रेडिओ लावला. उस्ताद बिसमिल्लाखाॅंसाहेबांचा अहिर भैरव सनईवर सुरू झाला. भगवान शंकराच्या नांवाचा हा राग, मनांत आपोआप हात जोडले गेले.
शास्तीय संगीतातील कलाकारांची गाणी आठवू लागली, त्यांचे वादन आठवू लागले. पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, उ. बिसमिल्लाखाॅं, उ. सइफुद्दीन डागर ! आणि आपल्या सर्वांना परिचित नसलेला हा राग, पण चित्रपटाच्या गीताने आपोआपच परिचित असलेल्या, ‘भैरव’ रागातील एकेक गाणे मला आठवू लागले.
राज कपूरचा सदाबहार चित्रपट - जागते रहे मधील - जागो मोहन प्यारे प्यारे, एक दुजे के लिये या चित्रपटातील - सोला बरस की बारी उमर को सलाम, उलझन या चित्रपटातील - अपनी जीवन की उलझन को कैसे मैं समझाऊ, दो आँखे बारह हात या चित्रपटातील - ए मालिक तेरे बंदे हम ! काय आणि किती ? आता हा भगवान शंकरांचे नांव घेऊन आलेला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील राग दिवसभर डोक्यात रहाणार होता, प्रवासभर आपल्याला साथ देत !
काही कलाकारांनी भैरव आणि त्याच्या प्रकारातील सादरीकरण -
१. भैरव - गायन - पंडीत जसराज - मेहेरबान
२. भैरव - गायन आणि बांसरी - जुगलबंदी - पंडीत जसराज आणि पंडीत हरिप्रसाद चौरसिया - आयो तो आनंद आनंद
३. अहीर भैरव (हिंदुस्थानी) व चक्रवाकम (कर्नाटकी) - गायन - जुगलबंदी -
४. भैरव - गायन - जुगलबंदी - पंडीत भीमसेन जोशी आणि डॉ. बालमुरली कृष्णन - हमसे करत तुम
५. भैरव - गायन - उस्ताद सईदुद्दीन डागर - आदी मध आणि अंत शिव https://www.youtube.com/watch?v=Yy9aJkZ2sRQ
६. भैरव - गायन - रशीद खान - पावन जब -
७. मंगल भैरव - गायन - विदुषी अश्विनी भिडे देशपांडे - जागो रे जागो भाई परभात
८. भैरव - सारंगी वादन - उस्ताद साबीर खान
९. भैरव - सनई वादन - उस्ताद बिस्मिल्ला खान - https://www.youtube.com/watch?v=uqNV2eo1OII
भैरव आणि त्याच्या प्रकारातील रागावर आधारलेली चित्रपट गीते -
१. भैरव - जागते रहो - जागो मोहन प्यारे - गायिका - लता मंगेशकर, गीत - शैलेंद्र आणि संगीतकार - सलील चौधरी - https://www.youtube.com/watch?v=_X0e5AS7EPw
२. अहीर भैरव - उलझन - अपनी जीवन की उलझन को - गायक - किशोरकुमार आणि लता मंगेशकर, गीत - एम जी हसमत आणि संगीत - कल्याणजी आनंदजी - https://www.youtube.com/watch?v=LHgsS2YmKeU
३. अहीर भैरव - एक दुजे के लिये - सोला बरस की बारी उमर को सलाम - गायक - लता मंगेशकर आणि अनुप जलोटा, गीत - आनंद बक्षी आणि संगीत - लक्ष्मीकांत प्यारेलाल - https://www.youtube.com/watch?v=z_eAMHB4W9M
४. भैरव - दो आँखे बारा हात - ए मलिक तेरे बंदे हम - गायिका - लता मंगेशकर, गीत - पं. भरत व्यास आणि संगीतकार - वसंत देसाई - https://www.youtube.com/watch?v=YmYFRNXrPdk
- माधव भोकरीकर
(लेख आवडला तर अवश्य 'शेअर' करा)

1.5.2019