Saturday, August 12, 2017

तपकीर व लॉटरीचे तिकीट

तपकीर व लॉटरीचे तिकीट
माणसाला व्यसनं खूप असतात. काही वेळा तर छंदाचे रूपांतर व्यसनांत होते. दारू, सट्टा, पत्ता, गांजा, बाहेरख्यालीपणा वगैरे ही दबदबा असलेली मोठी व्यसने करणे व पार पाडणे साधी गोष्ट नाही. त्याचे काय भलेबुरे परिणाम होणार असतात ते होतातच ! पण सुपारी, तंबाखू, चहाकॉफी, तपकीर, लॉटरीची तिकीटे घेणे वगैरे तुलनेने किरकोळ असणारी व्यसने सांभाळणारे पण बरेच जण आहेत. तपकिरीचे व्यसन अलिकडे बरेच कमी झाले आहे, असे वाटते.
मला हे आठवण्याचे कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून वडिलांची आठवण येतेय. त्यांचा सरळमार्गी, पापभीरू स्वभाव ! सर्व कुटुंबासाठी ते शेवटपर्यंत देत राहिले. दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी ते आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांना व्यसन म्हणता येईल अशी दोन व्यसने, 'तपकीर' ओढणे आणि 'लॉटरीचे तिकीट' काढणे ! आई नेहमी बोलायची. 'तपकिरीने काय फायदा, तब्येत खराब होते.' येथे त्यांच्या डोळ्याचे आॅपरेशन करायचे होते. त्यांना डॉक्टरांनी तपकीर ओढू नका सांगीतले. काय करणार, मग शेवटी शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून तपकीर ओढणे सोडले होते.
त्यांचे तपकीर आणण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या वर्गमित्राचे, चंपालालशेट लोहार यांचे 'विश्वकर्मा जनरल स्टोअर्स' किंवा शारंगधरशेट कासार यांचे 'सौभाग्य वस्तू भांडार' ! तिथे गेल्यावर मनसोक्त गप्पा व्हायच्या, एकमेकांची सुखदु:ख जाणून घेतली जायची, ख्यालीखुशाली विचारली जायची, गल्लीतल्या तसेच गांवातल्या आणि देशांतल्या राजकारणावर चर्चा व्हायची व तपकीर पण शेवटी घेणं व्हायचे. बहुसंख्य वेळा मी सोबत असायचो, मी या चर्चेने कंटाळून जायचो. मात्र नंतर मी शाळेत जायला लागल्यावर मी एकटाच जावून तपकीर आणायचो. त्यांना लागायची ती मद्रास तपकीर ! तोळ्याच्या हिशोबाने मिळायची.
आमच्याकडे गांवी स्वयंपाकाच्या गॅसची सोय फार उशीरा म्हणजे सन १९८६ च्या दरम्यान आली. सर्व काम चुलीवरच ! मग काही वेळा लाकडे असायची तर काही वेळा शेतातील तुरखाट्या-पळखाट्या पण असायच्या ! सकाळच्या वेळी एखादेवेळी, 'सूनबाई, माझा पोरगा आहे का ?' अशी विशिष्ट स्वरांत हाक आली की आई भाऊंना सांगायची, 'दलालीण काकू आल्या. तपकीर संपली असेल.' असे म्हणत ती चहाचे आधण ठेवायची किंवा ठेवलेले असेल तर वाढवायची. 'दलालीण काकू' म्हणजे संपूर्ण रावेर गांवच्या 'दलालीण काकू' ! त्यांना नांवाने ओळखणार नसत की काय कोणास ठावूक ? आमच्या गल्लीच्या पार शेवटच्या टोकावर यांचे घर ! आमच्या भोकरीकर गल्लीत कोणाच्याही घरी कोणाबद्दल परकेपणा नव्हता. कै. धोंडोपंत दलाल म्हणजे 'दादा' ! यांना गल्लीतल्या पोरांनाच काय पण त्यांच्या आईवडिलांना पण रागवायचा हक्क होता. त्याबद्दल कोणाला काही वावगे पण वाटत नसे. रागावल्यावर त्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार वागावे लागे, त्याकडे दुर्लक्ष केले जात नसे. आजच्या सारखे घरातील काका-काकू, आजी-आजोबा हे मुलांना बोलल्यावर, त्यांचा अधिकार काढणारे मुलांचे आईवडिल त्यावेळी नव्हते.
आणि मग दलालीण काकू डुलतडुलत, नऊवारी पातळ सावरत यायच्या, त्या थेट मागच्या घरांपर्यंत ! पण मग अंगणातूनच त्यांची हाक येई, 'सूनबाई, चहा ठेव. हं, मोरया, तपकिरीची डबी कुठे आहे ?' अशी एक आज्ञा आईला आणि एक भाऊंना दिली जायची. आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचो. आईने त्यांच्या चहाची व्यवस्था अगोदरच लावली असायची. नऊवारी पातळ नेसलेल्या दलालीण काकू यायच्या, चुलीसमोर बसायच्या. आणि भाऊ तपकिरीची डबी द्यायचे. डबीचे झाकणावर टिचकी वाजवून डबी उघडून मग छान तपकीर ओढायची. समाधानाचा श्वास झाल्यावर, 'सूनबाईचा' चहा समोर आलेला असायचा. चहा निवांतपणे पितळीतून प्यायल्यावर, मग दलालीण काकूंचा भाऊंशी संवाद सुरू व्हायचा. 'अरे, सकाळी उठले, अन् पहाते तर काय डबीत तपकीर नाही. काही उमजेना ! शेवटी म्हटलं चला, तुझ्याकडे मिळेल. तुझी वेगळी असते, पण धकवून घेवू. तपकिरीशिवाय चहा काही बरोबर लागत नाही.'
त्यांच्या थोड्या गप्पा झाल्यावर त्यांना मग माझी आठवण यायची. 'अरे, तपकीर आणायला सांग रे.' म्हणत त्या कनवटीला खोचलेल्या कापडी पिशवीतून पाच-दहा पैसे काढायच्या ! काही वेळा सोबत पिशवी असायची, तर काही वेळा नसायची. 'काकू, तुम्ही जा घरी. मला पण तपकीर आणायची आहे. तुमची पण आणायला सांगतो.' भाऊ काकूंना सांगायचे. 'बरं, पाठव त्याला घरीच. तपकीर घेवून. मी निघते आता.' म्हणत त्या उठायच्या, चालायला लागायच्या. जाताजाता माझ्या धाकट्या काकूंशी बोलायच्या.
मग मी भाऊंकडून पैसे घेऊन दुकानांत जायचो. वडिलांना 'मद्रास तपकीर' लागायची, हे मला माहिती होते. भाऊंकडून पैसे घेवून, थोडे जवळचे दुकान बघायचे म्हणजे शारंगधरशेट कासार यांचे ! एकदा त्यांच्याकडून तपकीर घेतली व दलालीण काकूंना नेवून दिली. त्यांनी पुडी उघडून पाहिली, त्यांना हवी असलेली तपकीर नव्हती. 'अरे, ही माझी तपकीर नाही. परत कर आणि माझी आण.' त्यांनी त्यांच्या तपकिरीचे नांव सांगीतले. पुन्हा दुकानावर जाणे आले. त्यांच्याकडून तपकीर बदलवून घेणे आले. अपमानास्पद प्रसंग, करणार काय ? कारण घरातील काम सोडून इतरांच्या कामाला नकार देण्याइतका बाणेदारपणा त्यावेळी आमच्यात नव्हता. ते कोणाचेही काम असो, पूर्ण व्यवस्थितपणे करावे लागे. त्यातून सुटका नसे. अलिकडची पिढी तुलनेने भाग्यवान ! काम न करून सांगणार कोणाला ? परत गेलो, शारंगधरशेट बसले होते. त्यांना तपकिरीची पुडी परत दिली व सांगीतले, 'ही नको. बदलवून दुसरी द्या.' त्यांनी तपकिरीचे नांव विचारले, मी आठवू लागलो. मला सांगता येईना. त्यांनी माझी अडचण ओळखली व विचारले, 'कोणाला तपकीर पाहिजे आहे ?' मी समस्या सुटल्याच्या आनंदात सांगीतले, 'दलालीण काकू !' 'मग, हे अगोदर नाही सांगायचे की दलालीण काकूंची तपकीर म्हणून ?' शारंगधरशेट बोलले. मला ऐकून घेणे भाग होते. त्यावेळी कोणासाठीपण कोणाचेही बोलणे ऐकावे लागायचे, एकंदरीत तडफ कमीच होती. आता नाही ऐकणार कोणी ! त्यांनी काळसर तपकिरीची पुडी बांधली व सांगीतले, 'त्यांची तपकीर दिली आहे. यापुढे त्यांना हवी असेल तर त्यांचे नांव सांगत जा.' ही त्यांनी समज दिल्यावर, मी ती पुडी घेतली व काकूंना आणून दिली. त्यांना प्रसंग जसा घडला तसा सांगीतला. त्या हसल्या. त्यांनी पुडी उघडून पाहिली व समाधानाने मान हलवून 'छान !' म्हणत चिमूटभर ओढली. ते 'छान' कोणाला होते हे अजूनही समजले नाही; बहुतेक शारंगधरशेट यांच्या धोरणीपणाला असावे.
----------- ------------ -----------
माझे वडील आपल्या आयुष्यात केव्हा तरी 'लॉटरी' आपल्याला लागेल या आशेने नियमीत 'महाराष्ट्र राज्य लॉटरी'ची तिकीटे घ्यायचे. दर महिन्याला दोन ते पांच तिकीटे ! ते नोकरीला होते तेव्हा हे प्रमाण जास्त होते, कारण गांवात रोज येणंजाणं असायचे. मात्र शेवटी नोकरीतून दोन वर्षांची मुदतवाढ मिळाल्यानंतर, निवृत्त झाल्यावर तुलनेने त्यांचे गांवात जाणे कमी झाले; मग म्हणून तिकीटे काढणे आपोआपच कमी झाले. 'तिकीटांमधे जेवढे पैसे गेले तेवढेपण पैसे काही आजपर्यंत लॉटरीतून मिळाले नसतील.' आमच्या आईचे नेहमीचे उद्गार ! यांवर 'असू दे ! मिळतील केव्हा तरी !' हा वडिलांचा तिला दिलासा. आईचा यांवर विश्वास नसे. तिकीटे मात्र ते स्वत:च काढत, कोणाला काढण्यासाठी पाठवत नसत.
कदाचित माझ्यावर आईच्या कडक स्वभावाचा परिणाम जास्त असावा. मी लॉटरीचे तिकीट आजपर्यंत फक्त दोनदा काढले, ती निदान पंचवीस वर्षांपूर्वी ! एकदा म्हणजे तिकीटे विकणारा फारच पोरसवदा मुलगा होता, त्याच्या 'साहेब, एक तरी तिकीट घ्या.' या विनंतीतील स्वर मला हलवून गेला म्हणून ! -- आणि दुसऱ्यांदा भुसावळला कोर्टातून येतांना, घाईगर्दीत तिकीटविक्रेत्याने अगदी अजीजीने म्हटले म्हणून ! दोन्ही वेळा मला बक्षीस मिळाले, पण नंतर मी तिकीट काढले नाही. 'परमेश्वराला जर आपल्याला काही द्यायचे असेल तर तो आपल्या कष्टांचे फळ देईल, बसल्याबसल्या तिकीट काढून घरी पैसे देणार नाही' ही माझी भावना !
आता काही वेळा समजते या वयांत, भाऊ लॉटरीची तिकीटे का घेत असतील ? त्यासाठी जवळचे पैसे का खर्च करत असतील ? आता त्यांच्या, म्हणजे वडिलांच्या भूमिकेत आता मी आहे. मग त्यांच्यापुढील त्यावेळच्या असंख्य अडचणींचा डोंगर डोळ्यापुढे येतो. त्यांची ओढाताण, मनाची घालमेल, परिस्थितीचा रेटा, त्याला तोंड देण्याची असलेली ताकद ! ------ आणि मग माझाच मी असं काहीतरी लिहून जातो.

६ ऑगस्ट २०१७

खान्देशातील राणूबाईचे रोट

खान्देशातील राणूबाईचे रोट

श्रावण महिना सुरू झाला की मनावर निवांतपणाची थोडी पातळ साय जमा होऊ लागते. निसर्ग हा फार मोठा मानसशास्त्रज्ञ आहे. मन प्रसन्न करावे, भिती घालावी, मनावर काळीशार उदासी पसरवावी तर त्यानेच ! मात्र आता या श्रावणात हिरवागार निसर्ग आसपास दिसत असतो. 'क्षणात उन तर क्षणात पाऊस' अशी अवस्था दिसते. त्यासाठी 'बालकवी' असावयास हवे पण ते आपल्याला कसे शक्य आहे ? अशी उनपावसाची गंमत अलिकडे फार दिसत नाही. अलिकडील काही वर्षांत पावसाचा कमालीचा लहरीपणा पाहिल्यावर निसर्गाने पण 'श्रावणमास' त्याच्या जागेवरून हलवला की काय कोण जाणे ? पण आम्ही 'उनपावसाची' लहानपणी नियमीत गंमत पाहिली आहे. 'चिमणाचिमणीचे लग्न' म्हणायचो त्याला आम्ही ! बिचारे चिमणाचिमणी 'चातुर्मासात' भर उनपावसात कसे लग्न करत असतील ? पण आसपास हिरवीगार रानं ! शेतकऱ्याला आपल्या हंगामाचा साधारण अंदाज आलेला असतो. उडीद, मूग, चवळी तरतरून येत असते. ही त्यांच्या लग्नाची लगबग ! पाखरांना अजून लग्नाला कोणता उत्तम काळ हवा ?
नागपंचमी नंतर नारळी पौर्णिमे दरम्यान येणाऱ्या रविवारी 'रोट' असतात 'राणूबाई कान्हूबाईचे' ! खान्देशात बहुसंख्य घरी रोट असतात. 'आदित्य राणूबाईची कहाणी' वाचायची या दिवशी ! सूर्यदेवतेची व देवीची पूजा असते. काहींकडे सूर्योदयाचे तर काहींकडे सूर्यास्तादरम्यानचे रोट असतात. काही भाग्यवानांकडे दोन्ही वेळचे 'रोट' असतात. आज घरी गांवी 'रोट' होते.
'रोट' हा सण म्हणजे आमचे समस्त घराण्यातील मुलं, मुली आठवून सर्व मुलांच्या प्रत्येकी पाचपाच मुठी व मुलींच्या, सुनांच्या तीनतीन मुठी गहू घ्यायचे, ते दळून आणायचे. मुलींच्या गव्हाच्या मुठी त्यांच्या लग्नापावेतोच ! मला लहानपणचे आठवते की जात्यावर हे गहू आजी तिच्या नेहेमीच्या बाईकडून अगोदरच सोवळ्यात दळून घ्यायची. काही वेळा ती बाई उपलब्ध नसायची. मग मोठीच गंमत, ते रोटाचे दळण मग दळायच्या - वहिनी आणि माझी आई. त्या दिवशी उपवास करावा लागे. माझ्या मोठ्या काकूंना सर्वजण 'वहिनी' म्हणायचे.
या पद्धतीने व अडीअडचणीतून दळले गेलेल्या गव्हाच्या पीठाचे, त्या दिवशी 'रोट' बनवले जायचे, तरी भरपूर पीठ उरायचे; मग ते रोज वापरून संपवून टाकावे लागत असे. जात्यावर दळलेले पीठ आपल्या नेहेमीच्या पिठाच्या चक्कीप्रमाणे बारीक येत नसे. मग त्याच्या पोळ्या या जरा जाडसर होत, आम्हा मुलांना खाण्यास जीवावर येई. 'देवाचे रोट' नाही कसे म्हणणार ? मग खात असू, खावे लागत ! दिवसेंदिवस दळणारी मिळणे अवघड होवू लागले. धाकट्या काकू आल्या होत्या. ही पद्धत पाळणे नविन काळाच्या दृष्टीने टाकावू, त्रासदायक व अडचणीची होती. बदलणे आवश्यक होते. शेवटी आजीने एकदा रोटाचे दरम्यान पिठाची चक्की चालविणाऱ्या 'मुरलीधर पटेल' यांना माझ्या आईमार्फत सांगीतलं, 'इतकी वर्षे जात्यावर रोटाचे सोवळ्यात दळून घेतले. आता दळणाऱ्या मिळत नाही. तुझ्याकडून दळून घेत जाईन पण सोवळ्यात दळावे लागेल. जमेल का ? काय जे पाप लागेल ते मला लागू दे.' यांवर मुरलीधर काकांचा नकार येणं शक्यच नव्हते. मग आम्ही 'आई उद्या सकाळी रोटाचे दळायला आणणार आहे.' हा निरोप द्यायचो. दुसऱ्या दिवशी सकाळीच सुस्नात होवून, गिरणी स्वच्छ सारवून मुरलीधर काका आमची वाट पहात असायचे. त्या दिवशी कितीही गर्दी असली तरी 'रोटाचे' दळल्याशिवाय गिरणी सुरूवात होणार नसायची, म्हणून आम्हाला म्हणजे आईला लवकरच जावे लागे.
रोटाच्या दिवशी राणूबाईची पूजा म्हणजे आपली नेहमीची देवाची पूजा झाल्यावर, मधल्या घरात चौरंगावर धान्य अंथरून त्यांवर पाणी भरून कलश ठेवला जाई. त्यांवर नारळ ठेवले जाई. हे राणूबाईचे नारळ म्हणून बऱ्याच वर्षांपासूनचे असे. त्या नारळास व्यवस्थित खण गुंडाळला जाई, डोक्यावरून पदर घेवून दोन्ही कान व गाल गुंडाळून घेतल्यावर फक्त चेहरा दिसेल असे ते दिसे. त्याला नथ पण घातली जाई. चौरंगाभोवती केळीचे छोटे खांब छान दिसत. मग राणूबाईची पण नेहमीप्रमाणे पूजा होई.
जेवणांत त्या दिवशी तिखटाचा व मिरचीचा वापर नसे तर मिरे किंवा आलं वापरावं लागे. त्या दिवशी भात केला जाई पण वरण केलं जात नसे तर कढी केली जाई. भाजी असे ती दोडक्याची ! हरबऱ्याच्या डाळीचे मुटकुळे म्हणजे त्याला नारळ म्हणायचे ! पुरणपोळीचा नैवेद्य तर असेच. तांदुळाची खीर ! रोटाच्या कणकेच्या पोळ्या असत. उरलेली कणीक पुरणाच्या आरतीसोबत देवीजवळ ठेवली जाई. मग ती रोटाची कणीक संपेपर्यंत वरण नाही.
आमचेकडे रोट सायंकाळचे असल्याने जेवायला भरगच्च उशीर होई मग जेवणही भरगच्च असे. या विविध गोंधळ घालून बनविलेल्या पदार्थात माझ्यादृष्टीने कधीही वादग्रस्त नसलेला पदार्थ म्हणजे 'पुरणपोळीच' ! पुरणपोळी असल्यावर मग इतर कोणते पदार्थ आहेत यांकडे अजिबात लक्ष न देता मी निमूटपणे पुरणपोळी खाई. इतर पदार्थांची मला आठवण पण येत नसे.
काल आमच्या वकिल मित्रांकडे गप्पा मारत बसलो होतो. बोलताबोलता विषय निघाला. म्हटलं 'उद्या रोट आहे.' त्यांना 'रोट' या सणाची कल्पना नव्हती कारण ते मराठवाड्यातले ! भारतात विविध भागांत विविध चालीरिती, सणवार असतात. खान्देशमधील 'रोट' आणि भाद्रपदातील 'भुलाबाई' मला इकडे मराठवाड्यांत दिसत नाहीत. मग खान्देशमधील 'राणूबाई व कान्हूबाईचे रोट' यांची घरची आठवण आली.

३० जुलै २०१७


दिव्याची अमावास्या

दिव्याची अमावास्या

आज आषाढ वद्य अमावास्या, 'दिव्यांची अमावास्या' ! अलिकडे 'दिव्यांची अमावास्या' हा शब्द आपल्या हळूहळू विस्मृतीत जात आहे तर 'गटारी अमावास्या' हा शब्द हळूहळू जनमानसांत रूळत आहे, रुजवला जात आहे, जास्त परिचित होत आहे, केला जात आहे.
लहानपणापासून मला वाचनाची आवड ! मला वाचायला काहीही आवडते. माझे क्षेत्र कायद्यासंबंधाने असले पण मी साहित्याची, आयुर्वेदावरील पुस्तके वाचलेली आहेत, इंजिनिअरींगवरील वाचली आहेत, ज्याेतिष्यावरची वाचली आहेत, संगीतावरील वाचली आहेत, वगैरे. ! यांतील मला किती समजते याचे उत्तर मी देणार नाही. संतसाहित्य, लोकसाहित्य वगैरे वाचायला तर मला आवडतेच !
आपल्या लोकसाहित्यात कथाकथनांसोबतच काहीतरी समाजप्रबोधनाचे काम देखील नक्कीच केले आहे, ते दिसायला फक्त दृष्टी हवी. आपण विविध, नाही त्या बाबी, डोळे ताणताणून पहात असल्यास, आपल्या दृष्टीवर विपरीत परिणाम होवून, ती अधू होते. मग आपल्याला काही बघण्यासाठी चष्मा लावावा लागतो. मग त्या चष्म्यातून जे दिसणार, जसे दिसणार तसेच जग आहे, हे आपण मानू लागणार !
लोकसाहित्यात कहाण्या पण येतात. आज दिव्याची अमावास्या ! लहानपणी नियमीत वाचलेल्या कहाण्यांची आठवण झाली. श्रावण महिनाभर रोज कहाणी वाचायची, सुरूवात या दिव्याच्या अमावास्येस व्हायची. या दिवशी घरातील सर्व दिवे बाहेर निघायचे, वापरात असलेले व नसलेले देखील ! निरांजन, समया या देवापुढे नियमीत असायच्या. मात्र मोठी समई ही सणावाराला, दिवाळीला व या दिवशी काढली जायची. रॉकेल किंवा घासलेटवर चालणाऱ्या दिवट्या, चिमण्या व कंदील ! घासूनपुसून चकचकीत व्हायचीत. रांगोळीने धातूचे दिवे चकचकीत व्हायचे, साबणाच्या पाण्याने कांचेच्या कंदील-चिमण्यांच्या कुंड्या चक्क करायचो तर कंदील-चिमण्यांचे कांच राखेने व त्यानंतर कोरड्या फडक्याने स्वच्छ केले जायचे. ते चमकत असायचे. समयांसाठी वाती तर निरांजनांना फुलवाती ! चिमण्या, दिवट्यांना गोल वाती तर कंदीलासाठी रूंद चपटी वात असायची ! मग ही सर्व चकचकीत, चमचमणारी मंडळी पूजेसाठी पाटावर बसायची. पाटावर थोडे गहू, धान्य टाकलेले असायचे. पाटापुढे रांगोळी काढलेली असायची, त्यांवर हळदकुंकू टाकले जायचे कारण फक्त पांढरी रांगोळी नको. पाटासमोरच उदबत्तीच्या पितळी घरात उदबत्ती जळत असायची व शेजारी फुलवात जळत असायची, छोट्या निरांजनांत ! सर्व दिव्यांना हळदकुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा व्हायची ! हात जोडले जायचे व मनांत प्रार्थना व्हायची; उघडपणे ऐकू यायचं, 'सर्वांना सुखी ठेव' ! मग कहाणी सुरू व्हायची.
आपल्या संस्कृतीतील 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना प्रार्थनेच्या रूपांत, 'सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामय:' ही खूप खोलवर झिरपली आहे.
-------- ---------- -------- ------
ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होते, तेथे एक राजा होता. त्याला एक सून होती. एके दिवशी घरातील पदार्थ तिने स्वत: खाल्ला, मात्र आळ उंदरांवर टाकला. त्यांना वाईट वाटले, सूड घेण्याची इच्छा झाली. रात्री त्यांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरूणांत नेवून टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. घरांतील सासू-दिरांनी, तिची निंदा करून तिला घरातून हाकलून दिले.
त्या सुनेचा नित्य नेम असे. दिवे घासावेत, तेलवात करावी, ते स्वत: लावावेत. खडीसाखरेने त्याच्या ज्योती साराव्यात. दिव्याच्या अमावास्येस त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. हे सर्व सुनेला घरातून हाकलल्यावर बंद पडलं.
पुढं एकदा राजा अमावस्येचे दिवशी शिकारीहून येत होता. झाडाखाली मुक्कामास थांबला तर तेथे एक चमत्कार दिसला. त्याच्या गांवातील दिवे अदृश्यरूप धारण करून झाडावर बसले आहेत आणि एकमेकांशी गप्पा मारत आहे, त्यांना कशी पूजा मिळाली ते सांगत आहेत. राजाच्या घरचा दिवा बोलू लागला, 'यंदा माझ्यासारखा दुर्दैवी कोणी नाही. दरवर्षी माझा थाटमाट असायचा, सर्वांत मी मुख्य असायचो. यंदा त्याच्या सुनेला विनाकारण घरातून घालवून दिले' आणि त्याने सुनेने उंदरांवर कसा खोटा आळ टाकला, त्यांनी कसा सूड घेतला, त्यामुळे सुनेला घरातून कसे बाहेर काढले; ही सर्व कथा सांगीतली. 'मात्र सून कोठेही असो, ती तिथं खुशाल असो', हा आशीर्वाद दिला.
राजाला सत्य समजले, पश्चात्ताप झाला. तो घरी आला. त्याने सर्व चौकशी केली. कोणी प्रत्यक्ष पाहिले काय, याची चौकशी केली. तिचा दोष नाही हे समजले. तिला मेणा पाठवला, क्षमा मागितली, घरी बोलावले, सर्व घरांत प्रमुखत्व दिले. ते सर्व सुखाने रामराज्य करू लागले. त्यांना जसा दीपक पावला. तिच्यावरचा आळ टळला, तसा तुम्हाआम्हास पावो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !
-------- --------- ---------- -------
या लोकसाहित्याला आपल्या नागरी साहित्याचे मापदंड आपण लावायला नकोत तर त्यांतील भावनांना, त्यांतील विचारांना बघायला हवे. हे असे साहित्य लिहीणारी मंडळी खूप मोठी साहित्यीक होती का, या वादात जावून निष्कारणच मूल्यमापन करण्याच्या सव्यापसव्यात पडण्याऐवजी, ती तुमच्या आमच्यासारखी मंडळी होती, हे गृहीत धरावे. त्यांच्या मनाला काही लिहावेसे वाटले तर ते लिहून जायची. बघा, त्या लिखाणावर त्यांचे नांवसुद्धा मिळत नाही.
या कहाणीतून कोणते साहित्यीक मूल्य गवसले हे सूक्ष्मदृष्टीने वा काकदृष्टीने पहाण्याऐवजी, त्यातून सर्वसामान्यांस काय समजले तर - कोणावर खोटा आळ टाकू नये, मग तो मनुष्य असो का प्राणीपक्षी असो. त्याला पण जीव असतो. तो पण त्याचा प्रतिकार करू शकतो. त्याचे परिणाम आपल्यांस भोगावे लागतात. नीट चौकशी केल्याशिवाय शिक्षा करू नये अन्यथा निरपराधास कोणत्याही कारणावरून शिक्षा होवू शकते. आपण चुकी केली असेल तर त्याचा पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागण्यात कसलाही कमीपणा नाही, अगदी राजाला पण नाही. आपल्या केलेल्या भल्याबुऱ्या कर्माचे फळ आपल्याला बरोबर मिळते. आपण सत्कृत्य करत रहावे. हे सर्व इतक्या सोप्या भाषेत अजून कसे सांगता येणार. समाजप्रबोधन म्हणजे यापेक्षा वेगळे काय आहे ?
आज सकाळी उठलो, जळगांवी निघतानिघता आठवण झाली, ती उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावणमासाची ! महिनाभर वाचल्या जाणाऱ्या कहाण्यांची आणि त्याची सुरूवात करणाऱ्या या 'दिव्याच्या अमावस्येच्या कहाणीची' !

२३ जुलै २०१७

सर्वांचा चेन्नई प्रवास - विमानाने


सर्वांचा चेन्नई प्रवास -  विमानाने 

गेले तीनचार दिवस आम्ही सर्व जण चेन्नईला गेलो होतो. अर्थातच सर्वांनी जाण्यासारखे काही विशेष कारण नव्हते. बऱ्यांच वर्षांपूर्वी दक्षिण व उत्तर भारत व्यवस्थित पाहून झाला होता. त्यावेळेस मुले फारच लहान होती, कडेवर होती. आईवडिल चांगले हिंडते फिरते होते. यापूर्वी दक्षिणभारत यात्रा ही आम्ही सर्वांनी १९९४ डिसेंबर मधे केली होती. दक्षिण भारतात जास्त आमच्या कड्यावर बसणारी व जेमतेम पायी चालणारी मुलगी होती. तिची आवडती जागा म्हणजे आजीच्या कड्यावर किंवा तिच्या आजीला आवडणारे ओझे म्हणजे तिची नात ! अशी या दक्षिण भारतातील यात्रेत योजना होती.
त्यावेळी यात्रेचे निमित्त होते 'भारतीय कृषक समाज' यांचे मार्फत दरवर्षी शेतकऱ्यांसाठी होणारे अखिल भारतीय संमेलन होते. हे मी प्रथमच पाहिले, खूपच छान होते. मी या संस्थेचा आजीव सदस्य आहे. त्यावेळेस मा. बलराम जाखर हे 'भारतीय कृषक समाज' याचे भारतीय अध्यक्ष होते. संमेलन होते तामिळनाडूतील कोईमतूर शहरात ! शासनातर्फे सदस्याच्या कुटुंबातील सर्वांना संमेलनासाठीच्या प्रवास तिकीटात ७५% सवलत होती. आम्ही दोघांनीही आणि आईवडिलांनी त्याला जायचे ठरविले. सोबत कड्यावरचे ओझे म्हणजे अर्थातच माझी छोटी मुलगी ! या निमित्ताने संमेलन संपल्यावर दक्षिण भारतातील इतर गांवे पहाता येतील. ही पण इच्छा ! कोणत्याही मोठ्या व जास्त काळाचा प्रवास मला टप्प्याटप्प्याने व रेल्वेने करायचा असेल तर मी सर्वप्रथम 'रेल्वे टाईमटेबल' विकत आणायचो. त्यातील सर्व ठिकाणच्या वेगवेगळ्या गाड्यांची वेळ, प्रवासाचा कालावधी, मुक्कामाची सोयीची जागा वगैरे पाहून आपल्याला आपला कार्यक्रम तयार करावा लागतो.
प्रवासासाठी आजही सर्वांना परवडेल व सोयीचे ठरेल असे तेच साधन आहे. त्याची जागा दुसऱ्या कोणत्या वाहतूक साधनाने घेणे कठीणच ! मी भुसावळ रेल्वे कार्यालयातून विविध फॉर्म भरत व सोबत त्या साठी विविध दाखले जोडत 'स्लीपर कोचचे' आमचे सर्वांचे तिकीट काढले ! ते 'भुसावळ ते कोईमतूर व परत' असे ! त्या तिकिटांची मुदत बहुतेक तेहतीस दिवसाची होती. मात्र इतर ठिकाणी त्या मार्गाव्यतिरिक्त जायचे असेल तर आपल्या पैशाने व नेहेमीच्या भाड्याने जावे लागणार होते. दरम्यान कोईमतूरहून इतर ठिकाणी जावून पुन्हा परत भुसावळला त्याच्या आंत परत यायचे होते. पण बराच मोठ्या पल्ल्याच्या भाड्यासाठी सवलत होती.
मग तयारी सुरू झाली प्रवासाची ! माझ्या पत्नीला कमालीची हौस आणि कामाचा उरक ! हिच्या दृष्टीस नसलेले काम दिसते व माझ्या दृष्टीस असलेले काम दिसत नाही. तयारी म्हणजे - घरातून फराळाचे जिन्नस तयार करणे, प्रवासाचे कपडे, मुलीसाठी संभाव्य औषधे वगैरे ! प्रवास जास्त दिवसांचा होता, नीट तयारी आवश्यक होती. निघालो - अहमदाबाद मद्रास या सुपर एक्सप्रेसने जळगांवहून संध्याकाळी ! गाडीत प्रचंड गर्दी ! आमच्या रिझर्वेशनला फारसा काही अर्थ राहिला नव्हता, पण बसायला जागा होती. गाडीतील टी. सी. तिकीट देण्यापेक्षा भांडण सुरू कसे होणार नाही याचीच काळजी घेत होता. प्रवासात सर्व आमच्या सारखीच मंडळी ! आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री मद्रास म्हणजे चेन्नईला पोहोचलो. मग तेथे एकेक ओळखीची मंडळी दिसू लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे मद्रासहून कोईमतूरला रेल्वे होती, तिने निघालो व साधारण दुपारी तीनचारच्या दरम्यान कोईमतूरला पोहोचलो. आमच्या सोबत त्या संमेलनास जळगांव जिल्ह्यातील बऱ्यापैकी शेतकरी मंडळी होती, पण हे तेथे गेल्यावर समजले. संमेलनात वेगवेगळे संशोधनात्मक उपकरणे, खतं, बी-बियाणं वगैरेंचे स्टॉल्स मांडले होते. माहिती खरोखरच छान मिळाली. जेवणाची थोडी अडचण झाली म्हणजे येथे फक्त भात व भाताचे प्रकारच विशेषकरून दिसत होते. आम्ही भाकरी-पोळ्यांवाले ! संमेलन आटोपले. आम्ही मग निघालो.
तेथून सर्वांसोबत खाजगी बसने दोनतीन ठिकाणे पहात रामेश्वरम् येथे आलो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ! अतिशय सुंदर मंदीर ! भगवान प्रभू रामचंद्रांनी स्थापित केलेले शिवलिंग ! समुद्रातील रेल्वे दुरूनच पाहिली, बसतां आले नाही.
दुसऱ्या दिवशी जगद्विख्यात ठिकाण, कन्याकुमारी बघायला गेलो. देवी कन्याकुमारी आपल्या भावी पतीची आराधना करत आहे. त्या मंदीरात गेलो. दर्शन घेतले. बोटीतून विवेकानंद स्मारकावर गेलो. सिंधुसागर, बंगालचा उपसागर आणि हा विशाल हिंदी महासागर तिथं एकत्र आलेले ! तीन वेगवेगळ्या छटा दिसायच्या, तिन्ही सागरांच्या ! कमालीचा जोरात वारा होता तिथं ! धडकी भरेल असा ! हिंदुधर्माची पताका जगभर फडकविणाऱ्या त्या महान युगपुरुषाच्या स्मारकाचे दर्शन घेतले. 'त्याच्या सूर्यासारख्या असलेल्या तेजाची पणती घेवून जाण्याचे तरी भाग्य मला मिळू दे' ही परमेश्वराजवळ प्रार्थना केली व सुंदर दर्शन झाले. तेथे मोठमोठे शंख खूप छान होते, एक घेतला.
प्रवासात आनंद येत होता. अजून बरीच ठिकाणे बघायची होती. तिकिटांची मुदत खूप शिल्लक होती. सोबतच्या लोकांची गती व आमची गती यांचा तालमेळ जुळेना ! शेवटी कन्याकुमारीहून संध्याकाळी टॅक्सीने त्रिवेंद्रमला आलो.
डिसेंबरचा अखेरचा आठवडा, तेथे त्रिवेंद्रमला आल्यावर लॉज मिळेना ! आम्ही हिंदी वा इंग्रजी बोलणारे आणि समोरचे मल्याळम् बोलणारे ! दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नसल्यावर संभाषणाची मजा काही औरच असते. शेवटी त्या टॅक्सीवाल्याच्या लक्षात आले. 'लॉज, रूम ?' त्याने विचारले. समजण्यात अजून गोंधळ होऊ नये म्हणून मी होकारार्थी मान हलवली. संपूर्ण भारतांत त्या खुणेचा अर्थ एकच असल्याने आमची अजून परवड झाली नाही. मग त्याने तेथील एकाला त्याच्या भाषेत विचारले. तो दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करणारा होता. तो लगेच तयार झाला, आमच्यासोबत निघाला. त्याला थोडं हिंदी येत होते. 'डोन्ट वऽरी. मैं । प्राब्लेम साल्व्ह !' या दर्जाचे ! पण आता लॉज मिळणार हे समजले. आम्ही आलो, आमच्या मुक्कामाची सोय झाली. तीनचार दिवस आम्ही तेथे होतो. त्या दरम्यान तो आमचा दुभाष्या होता. आम्ही पद्मनाभ मंदीर बघीतले. त्रिवेंद्रमचा नॅशनल पार्क बघीतला, समुद्रकिनारा बघीतला, प्लॅनिटोरिअम बघीतले. फारच सुंदर !
तेथील दोन आठवणी सांगतो. तेथे माझ्या वडिलांना दातदुखी उमळली ! पुन्हा मग आमचा दुभाष्या व वडील हे डॉक्टरकडे ! वडील याला हिंदीतून, इंग्रजीतून सांगायचे, मग हा त्याला यांतून जेवढे समजले असेल ते डॉक्टरांना मल्याळीत सांगायचा. वडिलांनी सांगितलेले इंग्रजी का याने सांगीतलेले मल्याळी समजले, हे तो पद्मनाभम् जाणे; पण वडिलांचे दांत दुखणे थांबले.
येथील दुसरा अनुभव म्हणजे - पद्मनाभम मंदीरात आम्ही सर्व जण दर्शनाला गेलो होतो. आमच्या गप्पा मराठीत सुरू होत्या. शेजारून तेवढ्यात आवाज आला. 'कुठले तुम्ही ?' मराठीतून विचारणा झाल्याने आम्हीही चक्रावलोच ! शेजारचे गृहस्थ विचारीत होते. 'तीन वार झाले, इकडील भागांत आलोय ! मराठी शब्द ऐकायला मिळेना हो ! तुमचं बोलणं ऐकलं अन् रहावलं जाईंना !' हे बोलतांना त्यांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी होते. इंडियन आॅयलचे मोठे अधिकारी होते. फिरायला आले होते. तेथे रेस्ट हाऊस मधे रहात होते. 'मराठी असे आमुची मायबोली' हे खोटं थोडीच आहे ?
--------------------------------------------------------------------------------------------------------
आयुष्यभर तालुक्याच्या ठिकाणी आईवडिलांनी काढलेले आयुष्य ! घरातील सर्व कामे ही कामे किंवा कष्ट नसून आपल्या दिनचर्येचा भाग असतो ही आमच्या संपूर्ण घरातीलच शिकवण ! वापरायला हौदभर आडाचे पाणी ओढणे असो का शेतातील आलेली धान्याची शिल्लक कणसे कुटून त्याचे धान्य तयार करणे असो. श्रावणातील रोटासाठी रोट दळणे असो का तयार केलेली डाळ मुसळाने कांडणं असो. त्यांत तिने कष्टाने सांभाळलेली तिची संगीतविद्या ! जवळपास तीन तप केलेले शास्त्रीय संगीत शिकवण्याचे कार्य !
आपली नोकरी संपूर्ण एकत्र कुटुंबासाठी सांभाळत, खेड्यापाड्यावर शेतावर जाणारे माझे वडील ! घरांतील काका ! पावसाळ्यात बैलसुद्धा जेथून जावू शकणार नाही अशा रस्त्याने समस्त शेतकरी जात, माझे काका, वडीलही जात ! आपला नोकरीतून वडिलांना मिळणारा पगार पहिल्या आठवड्याच्या आंत संपल्यावर पुढील संपूर्ण महिना काढणारे, शेतकरी वडिल ! शालेय जीवनातील या आठवणी मनाला आज पण अस्वस्थ करतात. महाविदयालयीन काळांत थोडी बरी स्थिती आठवते, तर महाविद्यालयीन शिक्षण संपून मी व्यवसाय सुरू केल्यावर जरा सुस्थितीचे अनुभव आले. नंतर चढउतार होत राहिले. गेल्या जवळपास दहाबारा वर्षांपासून मी इकडे औरंगाबादला स्थायिक झालो.
आपल्या या अशा सहजीवनाचा पन्नास वर्षांपेक्षा जास्त आयुष्याचा प्रवास अशा रस्त्यांनी त्यांनी, आईवडिलांनी, केलेला आम्ही पाहिलेला आहे. म्हणून काही दिवसांपासून मी आईला म्हणत होतो, 'आपण सर्वच चेन्नईला जावू, विमानाने !' आई नाही म्हणत होती. पण त्या निमित्ताने मला आईला न्यायचे होते, विमानाने ! वडिलांना पण न्यायचे होते, जमले नाही. गेल्या वर्षी ते आम्हाला कायमचे सोडून गेले. आजवरच्या आयुष्यात केवळ या आयुष्याचीच नाही तर पुढच्या आयुष्याचीही चाल, अशा खडतर रस्त्याने याच आयुष्यांत चालावी लागली तर शरीर थकणारच ! आयुष्यात ज्यांचा भरवसा धरावा, ज्यांच्यासाठी जगाशी वाईटपणा घेतला ते कृतघ्न झाल्यावर मन तर जास्त थकणार ! त्यांनी आयुष्यभर केलेल्या या खडतर रस्त्यावरील चालीने आपल्यासाठीचा खडतर रस्ता खूप कमी केला आणि आपल्याला चांगल्या रस्त्यावर आणून सोडले.
चार दिवसांपूर्वीच आम्ही सर्वच चेन्नईला गेलो होतो, विमानाने ! तेथील महाबलीपुरम् व कांचीपुरम पाहिले. तेथील मंदीरे पाहिली. आईला आमच्या परिने प्रवासात कसलाही त्रास होवू दिला नाही. रस्ताभर ती मुलांना म्हणत होती, 'तुम्हाला कड्यावर घेवून मी फिरले, आता म्हातारपणांत मला तुमच्या काठीने फिरायची वेळ आली आहे. ते असते, तर हे आठवडाभर गांवभर सांगत फिरले असते.' ती जे बोलून सांगत होती, सांगण्याचा प्रयत्न करीत होती त्यापेक्षा न बोललेले खूप होते. गेल्या पाच दशकांपेक्षा त्यांच्या जास्त काळाच्या सोबतच्या प्रवासातील आठवणी या चार दिवसांत आम्हाला आई काय सांगणार ? कोणाला सांगणार ? काही आठवणी सांगण्यासारख्या, तर काही न सांगण्यासारख्या ! काही मुक्तपणे वाटण्यासारख्या तर काही मनाच्या कप्प्यात खोलवर जपण्यासारख्या किंवा कायमच्या गाडून टाकण्यासारख्या ! काल रात्री घरी परत आलो.
आयुष्यभर खडतर रस्त्याने चालणाऱ्यास चांगल्या रस्त्याने चालतांना होणाऱ्या वेदना या शरीराच्या नसतांत तर गतकाळात केलेल्या पायपिटीच्या थकव्याचे मनावर उमटलेले व्रण असतात. ते ठुसठुसत असतात, मनातल्या मनांत !

१६ जुलै २०१७

एक आठवण - पत्रकार मो. ग. तपस्वी यांची

एक आठवण - पत्रकार मो. ग. तपस्वी यांची  

आपल्या बोटांच्या चिमटीत एखादवेळेस काही क्षण आले असे वाटतात अन् पट्कन निसटून जातात, ते क्षण आपल्यासाठी नसतातच आणि नव्हतेच ! खूप उशीरा केव्हातरी, अशी काही घटना घडते अन् मग समजते आपल्याला ! पण तोपर्यंत निष्कारणच आपल्या जीवाची घालमेल सुरू असते, मनस्वास्थ्य बिघडते.
आपल्या विचारांच्या नादात, आपण काही सुंदर येणारे क्षण टाकून दिलेले असतात. काही आपल्याला खुणावत असतात पण आपले लक्षच नसते तिकडे, आपलेच दु:ख कवटाळून बसलेलो असतो आपण; मग ते क्षण येतात, आपल्याला बराच वेळ खुणावतात आणि मग कंटाळून निघून जातात, दुसऱ्यासाठी ! मग पुन्हा आपल्याच लक्षात येते, 'काय करून बसलो आपण ?' पुन्हा विचार, त्रागा, चिडचिड, पश्चाताप आणि मनाला लागलेली कोरणी ! काहींच्या दैनंदिनीत सुरूच असते हे !
काही क्षण खरे तर आपल्यासाठी नसतातच पण आपली मूठ, चिमूट इतकी काही घट्ट आणि पक्की असते की ते क्षण आपल्यापासून जावूच शकत नाही. आपल्याजवळील जुना पत्रव्यवहार, फोटो, पुस्तके, काही वस्तू - भोवरा, गोट्या, भोवऱ्याची जाळी, कॅसेटस्, सर्टिफिकेटस् बघा आपले मन दूर कुठेतरी भूतकाळात फिरून येते. काही वेळा बरं वाटते, तर काही वेळा वेदनादायक होते ! काही वेळा उगीच गंमत वाटते, अरे आपण असेही होतो तर ! मग, 'कोण होतास तू काय झालास तू ?' असे देखील वाटू शकते.
माझ्याकडे गांवी असतांना 'देवगिरी तरूण भारत' यायचा ! 'विवेक' पण यायचा ! काही ठिकाणी, काही विषयांच्या याद्या करायच्या असल्या की काही नांवे गुप्त पण ठरलेली असतात. ती कामाचे वेळी तात्काळ 'फिक्स्ड डिपॉझिट' सारखी प्रकट होतात.
कोणालाही कोणतेही काम करायचे असेल, नव्याने उभारायचे असेल तर हे 'फिक्स्ड डिपॉझिट' कमी व्हायला नको, ते नियमीत वाढायला हवे. 'फिक्स्ड डिपॉझिट' कोणते व 'करंट अकाउंट'चा कोणता बॅलन्स हे पण अलिकडे ओळखायची गरज भासू लागली आहे. बॅंकिंग नियमानुसार दूरदर्शी धोरणे व जास्त काळाच्या योजनांसाठी 'फिक्स्ड डिपॉझिट' हेच कामाचे असतात, 'करंट अकाउंट'चा बॅलन्स कितीही असला तरी कामाचा नसतो.
तर माझेकडे 'देवगिरी तरूण भारत' यायचा. त्यांत 'मा. गो. वैद्य', 'मोरेश्वर उपाख्य मो. ग. तपस्वी', 'मुजफ्फर हुसेन' वगैरेंचे लेख यायचेत ! मला लेख आवडायचे ! ही सर्व केवळ पत्रकारच नाही तर लेखक मंडळी आहेत. यांचे लिखाणांस तात्कालिक बातमी मूल्य जसे आहे तसेच यांतून ते काही निश्चित असा विचार देत असल्याने, त्या लिखाणांस अक्षरमूल्य पण आहे. पत्रकारास ध्येय असावे ते अक्षर वाड•मय निर्माण करण्याचे !
एकदा गांवी 'श्री. मुजफ्फर हुसेन' यांना बोलावले होते, व्याख्यानाला ! व्याख्यान अप्रतिम झाले. व्याख्यान संपल्यावर श्री. दिलीपशेट अग्रवाल यांच्या जुन्या घरी बैठक होती. श्री. कन्हैयाशेट अग्रवाल, डॉ. अनंत अकोले, श्री. जयंत कुलकर्णी, श्री. अशोक शिंदे, श्री. रविंद्र नेमाडे ही उत्साही मंडळी तर होतीच ! पण कै. काका शिंदे, कै. नाना लष्करे, कै. रूपचंद महाजन, कै. डॉ. न. पु. जोशी ही मंडळी 'गांवातील आधार' असलेली मंडळी होतीच ! तुलनेने त्या गप्पांत मीच नविन होतो. गप्पांमधून खंदे पत्रकार समाजातील नेमकी व्यथा कशी मांडतात, ते समजले.
'देवगिरी तरूण भारत' मधे नियमीत स्तंभलेखन करणारे 'मोरेश्वर उपाख्य मो. ग. तपस्वी' हे दिल्लीहून नासिकला आल्याचे समजले. योगायोगाने नासिकला त्या दरम्यान काम होते, त्यांचा पत्ता व दूरध्वनी होताच ! वेळ देखील होता आणि त्यांच्यासाठी मी वेळ काढणारच होतो. भेटीची वेळ घेतली, उन्हाळ्याचे दिवस होते बहुदा ! जळगांवच्या उन्हाळ्यातील उन्हाची सवय असलेला मी नासिकच्या उन्हाला जुमानणार नव्हतोच ! त्यांचे म्हणजे 'मो. ग. तपस्वी' यांचे घर सापडले.
निदान एकदीड तास गप्पा सुरू होत्या. त्यांच्याशी मी काय गप्पा मारणार ? निदान वीसबावीस वर्षांपूर्वीची गोष्ट ! त्यांच्या घरात त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे, पुरस्कार दिसत होती. पुस्तके भरपूर होती, हे माझ्यासाठी उत्तम व प्रसन्न वातावरण निर्माण करायला पुरेसे होते. त्यांच्या पण इकडील जुनी नातीगोती, ओळखी निघाल्याने परकेपणा कमी झाला. त्यावेळी त्यांचे कसलेसे लिखाण सुरू असल्याने तो पण उत्साह बोलण्यात दिसत होता. या माणसांचे बोलणे ऐकत राहिले तरी आपल्याला बरेच काही मिळत रहाते. नंतर त्यांची ग्रंथसंपदा, मराठीतील काही नामवंत कादंबऱ्यांची त्यांनी हिंदीत केलेली भाषांतरे, ज्यात कै. वि. स. खांडेकर यांची 'ययाति' ही कादंबरी होती.
काल त्यांचे १ मे, ९४ चे बहुदा त्यांच्या हस्ताक्षरातील, त्यांचा व्यवस्थितपणा व टापटीप दाखवणारे पत्र सापडले अन् असे कितीतरी क्षण आपले होते हे उगाचच जाणवले.

२ जुलै २०१७