Saturday, July 25, 2015

'मेहनत की आंच पाते पाते कच्ची चीजे भी पक जाती है'


साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वीची किंवा त्यापेक्षाही पूर्वीची संगीत-सभेची आठवण आहे ! आठवण आहे पुण्यातील !
श्री. सुधीर फडके, त्यावेळी नवोदित असलेले सतारवादक (आपणांस गीतरामायणाने परिचित असलेले स्वर्गीय बाबूजी नाही) आणि त्यांना साथ देणार होते तबलावादक पं. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज ! पंडितजींचे त्यावेळी समयोचित केलेले छोटेखानी प्रोत्साहनपर आणि त्याचवेळी जिद्द निर्माण करणारे भाषण नाही, वडिलकीच्या भावनेने दिलेली समज !
ते म्हणाले, 'देखो बेटा, मेरे जैसे बुढोके साथ आज तुझे चलना है I देखता हूँ कहाँ तक तू चल सकता है, यदि मेरे साथ चल सका तो मैं समझूँगा, हम आज भी बुढ़ापेमे तुम्हारे साथ चल सकते है I (और हंसते हुए बोले ) हमने नई पिढी ठीक तैयार की और अपनी संगीत की ज्योत नई पीढ़ी के हाथ सुरक्षित है और नहीं चल सका तो सोच लेना लक्ष्य और कितना दूर है I

त्यानंतर जी अविस्मरणीय संगीत-सभा झाली त्याचे वर्णन मी काय करणार ? पं. सामताप्रसाद यांचा तबला नुसता बोलत होता आणि संपूर्ण सभा निःशब्द होऊन ते नाद-ब्रम्ह श्रवण करीत होती. माझी आणि इतरांचीही परिस्थिती 'अनंत हस्ते कमलावराने, घेता किती घेशील दो कराने' या पेक्षा वेगळी नव्हती. आवर्जून येथे सांगण्याची गोष्ट म्हणजे, बालकाला चालणे जसे वडीलधारा शिकवतो, मात्र बालकाला वाटते, आता आपण चालायला लागलो आहे तर किती चालावे आणि नाही, बालक थकत जरी असला तरी वडीलधारा त्याला थकू देत नाही, त्याचा चालण्याचा आत्मविश्वास जागवतो.
पं. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज यांचे मला अत्यंत आवडलेले आणि मी कायम लक्षांत ठेवलेले वाक्य म्हणजे - 'मेहनत की आंच पाते पाते कच्ची चीजे भी पक जाती है'
श्री. सुधीर फडके, त्यावेळी नवोदित असलेले सतारवादक, आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
ही घटना आपल्यापैकी काही जणांना आठवतही असेल ! ही आठवण चाळवली ती Champra Deshpande यांच्या उस्ताद अल्लारखा आणि झाकीर हुसेन यांच्या नुकत्याच ऐकलेल्या कार्यक्रमाच्या घटनेने ! धन्यवाद ! ------ आठवण जागवल्याबद्दल !

Thursday, July 16, 2015

सत्याचे दर्शन


बऱ्याच वेळा येथे अमुक का होत नाही, ढमुक का होत नाही, याला जबाबदार कोण, त्यांना सत्तेवरून कडून टाकले पाहिजे, त्यांनी राजीनामे दिले पाहिजे, भारतांत आता काही खरे नाही, भारत कचरा-कुंडी झालेला आहे, आरक्षणामुळे गुणवत्ता मारली जाते, अल्पसंख्यांकांना लाडावून ठेवले आहे अथवा अल्पसंख्यांक येथील नागरिक आहेत त्यांच्यांवर अजिबात अन्याय व्हावयांस नको, जातीयता वाढली आहे ती गाडून टाकली पाहिजे अथवा आता हिंदू अन्याय सहन करणार नाही वगैरे स्वरुपाची विधाने वाचावयास मिळतात आणि प्रत्यक्ष ऐकावयास देखील मिळतात. यावर उत्तर काय असावे असा देखील खल सुरु असतो आणि प्रत्येक आपलेच मत अथवा धोरण बरोबर कसे हे देखील पटवून सांगत असतो. याबाबत चर्चा करीत नाही मात्र एक प्रसंग सांगतो, आपणांस काय समजते ते पहा, त्यातून काही उत्तर मिळाले तर सांगा आणि त्यामध्ये या सर्व परिस्थितीबदलाबाबत एखादा उपाय आहे का याचा देखील विचार करा आणि असल्यास त्यानुसार काही जमते का आणि जमल्यास काहीथोडे आचरण करता येते का पहा.

माझे एक परिचित, ज्यांना मी साधारणतः दहा वर्षांपासून ओळखतो, आमचा व्यवसाय एकच आहे, नेहमी बोलणेचालणे असते. त्यांचे आणि माझे काम बऱ्याच वेळा सारख्यांच अधिकाऱ्यांबरोबर पडते. प्रसंग आणि अनुभव त्या व्यक्तीबाबत आणि माझ्या परिचीताबाबत आहे. 

अगदी सुरुवातीला दहा वर्षापुर्वी ती एक व्यक्ती अधिकारी नव्हती ज्याबाबत हा प्रसंग आहे, आमच्यासोबतच काम करायची. त्यांचे काम यथातथा, मात्र 'मोठ्या घरातील' समजली जायची ! त्यावेळी माझ्या परिचिताचे त्याच्याशी वागणे अगदी जेवढ्यास तेवढे असे, काम पडल्यास बोलायचे किंबहुना जवळजवळ काहीही नसे त्यामानाने माझे वागणे जास्त जवळिकेचे / आपुलकीचे असे; याबाबत माझे परिचित मला नावेदेखील ठेवीत असत की मी कोणाबरोबरही आपुलकीने बोलतो. 

नंतर काही वर्षांनी बातमी आली, त्या व्यक्तीची निवड मोठ्या अधिकारपदावर होणार आहे आणि आपल्यातंच तो अधिकारी म्हणून येणार आहे, त्याबरोबर माझ्या परिचिताचे त्याच्याशी असलेले वागणे थोडे बदलले, तो आवर्जून त्यांना हसून प्रतिसाद देवू लागला, त्यांच्याशी बोलू लागला, अगदी त्याची त्यावेळी बोलण्याची इच्छा नसली तरी ! त्याचे लक्ष नसेल तर लक्ष वेधून बोलू लागला ! माझे वागणे तसेच होते; पण आता त्या व्यक्तीच्या सभोवती जास्त गराडा दिसू लागला, माझे बोलणे पाहिलेपेक्षा कमी झाले आणि मलाही वेळ मिळेनासा झाला कारण माझेही काम वाढले. ती व्यक्ती यथावकाश अधिकारपदावर गेली, आमचेवर अधिकारी म्हणून आली, आता माझे बोलणे जवळजवळ थांबल्यासारखे झाले, कारण माझे एक पथ्य आहे, ते मी नेहमी पाळतो; ते म्हणजे आपणांस कोणांस मदत करता आली नाही तरी चालेल पण त्याचे आपल्यामुळे नुकसान व्हावयांस नको. त्यामागे आपल्यामुळे कोणी अडचणीत येवू नये ही भावना ! मात्र आमचे परिचित आता त्यांना संधी मिळेल तेंव्हा किंबहुना संधी प्राप्त करून वारंवार भेटावयाचा प्रयत्न करू लागले. आता परिचित त्यांना नेहमी भेटावयाचा प्रयत्न करणे, त्याच्याबाबत गप्पांमध्ये अतिशय चांगले बोलणे, कोणी काही बोललेले थोडेजरी वावगे वाटले तरी बोलणाऱ्यास विरोध करणे असे करू लागले. 

मी एकदा सहज बोललो, 'हा अधिकारी झाल्यावर भलताच आळशी झाला आहे, अपेक्षेप्रमाणे आणि दर्जाप्रमाणे काम करीत नाही.' या माझ्या बोलण्यावर माझ्या परिचिताची आणि माझी थोडी बोलाचाली झाली, 'अहो, माणसाने कितीही काम केले तरी कमीच आहे. घाईघाईत काम केले तर न पाहता काम करतो म्हणून बोलतांत आणि नीट समजून, सर्वांचे ऐकून काम केले तर वेळ लागणारच; मग म्हणतांत काम करत नाही. माणसाने वागावे तरी कसे ? काम करणे कठीण झाले आहे. आपल्या अधिकाऱ्यासंबंधाने असे बोलू नये.' असे त्याने मला बजावले. त्याचा हा अवतार मला नवा होता. मला समजेना पूर्वी हा त्याचेशी काहीही न बोलणारा, याचा समर्थक कधीपासून झाला आणि मला त्याचा शत्रू कसा काय समजायला लागला ? 'अहो, मी त्यांना शिव्या वगैरे देत नाही, मी त्याच्या कामासंबंधाने बोलत आहे, हे माझेच नाही तर बहुसंख्यांकांचे मत आहे. त्यांचेबाबत मी वैयक्तिक कुठे बोलत आहे ?' हा माझा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न ! मात्र त्यांना पटला नाही आणि माझा हा परिचित तावातावाने निघून गेला. 

आता त्या अधिकाऱ्यांची निवृत्ती होणार होती, त्या निरोपसमारंभाची वर्गणी कार्यक्रमाची जबाबदारी घेणाऱ्यांनी माझेकडे मागितली, मी दिली. त्या निरोपसमारंभात मला माझे हे परिचित दिसले नाही. दुसऱ्या दिवशी ते भेटल्यावर मी त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले, 'काहो, कालच्या निरोप-समारंभाचे कार्यक्रमांत तुम्ही काही दिसला नाही,' त्यांचे उत्तर, 'मला काम होते, त्यामुळे येवू शकलो नाही, वर्गणीपण देता आली नाही.' त्यांच्याकडे मी पाहिले, 'आणि खरे सांगू का, तुम्ही त्यांचे खरे मित्र ! तुम्ही होते ना ! अशा कार्यक्रमांना येवून, त्यांत पैसे खर्च करण्याव्यतिरिक्त आपणांस काय मिळते ?' 

त्याला उमगलेल्या आणि मला अद्यापही न समजलेल्या या सत्याच्या दर्शनाने मी अवाक झालो.    

Friday, July 10, 2015

ज्योतिष आणि आपण


भविष्य आणि त्याचे विविध प्रकार, जादूटोणा-तंत्रमंत्र वगैरे हे जनमानसांत आजही खूप लोकप्रिय आहेत; आणि हे फक्त आपल्या भारतातच नाही तर सर्व जगतातच दिसून येते ! मग याला कोणी शास्त्र समजो अथवा कोणी भोंदूपणा-अंधश्रद्धा-फसवणूक म्हणो ! एक मात्र नक्की, ज्यावेळी आपली बुध्दी एखाद्या विषयावर चालेनासी होते, आपणांस आपल्या समस्येवर इतरांची मदत घेवूनही उपाय सुचत नाही, त्यावेळी आपणा सर्वांपेक्षा कोणीतरी वेगळी शक्ती यामागे आहे आणि ती या सर्वांचे नियंत्रण करीत असते; ही भावना स्वाभाविकपणे होत असते आणि त्यांत फारसे काही गैर किंवा अनैसर्गिक नाही, जो पावेतो याविषयाचे कुतूहल आहे, माग शोधण्याची इच्छाशक्ती आहे आणि तसा प्रामाणिक प्रयत्न आहे तो पावेतो फारसे काळजीचे कारण नाही कारण यातूनच विविध शोध लागले आहेत, चिंतन झालेले आहे, तत्वज्ञान आणि तत्वज्ञ निर्माण झाले आहेत; थोडक्यात नवनिर्मिती झालेली आहे. मात्र या कुतूहलाचा, विषयाचा माग शोधण्याचा वापर अप्रामाणिकपणे व्हावयास लागतो त्यावेळी धोक्याची घंटा वाजते, ती सर्व समाजासाठी ! 

आज हे मुद्दाम लिहिण्याचे कारण भविष्याबाबत / पत्रिकेतील विविध ग्रहांच्या स्थानाबाबत आणि त्यांच्या जातकाच्या कुंडलीवर / फलादेशावर होणाऱ्या परिणामाबाबत विषय निघाला. मला या विषयाची आवड आहे मात्र व्यवसायाच्या व्यापामुळे एकाग्रता / तपश्चर्या ज्यांत लागते अशी कामे धावपळीमुळे नीट होत नाहीत; म्हणून मग या विषयाकडे फारसे पाहिले जात नाही. गेल्या साधारणतः १५ / २० वर्षांपासून मी याचा बैठक मारून अभ्यास असा केला नाही. हीच बाब माझ्या आवडीच्या 'तबला' या विषयाची ! असो. हे कुतूहल चाळवले आणि निदान ज्यांना यांत काही माहिती हवी आहे त्यांना काही सांगू शकतो का हा विचार आला, आणि लिहिले झाले ! उपयोगी पडले तर घ्या नाही तर विचार करू नका. 

भविष्य संबंधाने माझ्या वाचनांत जी काही पुस्तके आली त्यातील काही निवडक पुस्तके माझ्या संग्रही आहेत, त्याबाबत सांगता येईल - 
१. मुद्राशास्त्र - केदार गोस्वामी - माणसाच्या चेहऱ्यावरून, अंगलक्षणावरून, अवयवावरून भविष्यासंबंधी सांगता येवू शकते. 
२. रेखाशास्त्र - केदार गोस्वामी - आपल्या हातांवरील रेषा, त्यांचे परिणाम, ठळकपणा - अस्पष्टपणा त्यावरील छेद, जाळी, त्यावर असलेली विविध शुभाशुभ चिन्हे
३. Palmistry - Numerology - Astrology by Cheiro - यांत पाश्चात्य लेखकाचे त्यांचे भागांतील या विषयाबाबतचे मत आहे. आपले आणि त्यांचे विचार  या मध्ये खूप अथवा मूळापासून फरक नाही. 
४. हस्त चिन्ह शास्त्र -  केदार गोस्वामी - आपल्या हातावर जी विविध प्रकारची चिन्हे असतात त्यांचे जातकांचे भविष्यावर होणारा परिणाम 
५. हस्त लक्षण शास्त्र - केदार गोस्वामी - हाताची रचना, त्यावरील रेषा, उंचवटे, ग्रहांचे पर्वत, सखल भाग, त्याचा परिणाम- निष्कर्ष 
६. रत्न शास्त्र - केदार गोस्वामी - रत्नांचे विविध प्रकार, प्रत्येक ग्रहांचे रत्न, राशीनुसार वापरावयाची रत्ने, ग्रहांच्या बलानुसार वापरावयाची रत्ने, त्यांचे परिणाम, रत्न लाभणे अथवा न लाभणे म्हणजे काय, रत्न खरे-खोटे कसे ओळखणार 
७. कुंडली तंत्र आणि मंत्र - भाग १ आणि २ - श्री. व. दा. भट - कुंडली म्हणजे काय ? कुंडलीची ओळख, भाव, बारा घरे - त्यांची नांवे, ग्रह स्वरूप आणि कारकत्व, ग्रहांची स्थानाप्रमाणे फले, राशी - राशीस्वामी - त्यांचे गुणधर्म, ग्रहांची दृष्टी आणि त्यांचे परिणाम, एकच ग्रहाच्या दृष्टीचे वेगवेगळ्या राशींवर आणि स्थानांवर होणारे वेगवेगळे परिणाम, नक्षत्रे, भावेश आणि त्यांची स्थानपरत्वे फळ, दशा, अंतर्दशा, विंशोत्तरी दशा, स्पष्ट ग्रह, प्रत्येक ग्रहाचे कारकत्व आणि लग्नस्थानी असल्यास होणारे परिणाम
८. असे ग्रह अशा राशी - श्री. व. दा. भट - प्रत्येक राशी आणि ग्रह यांचे एकमेकांवर होणारे परिणाम 
९. ज्योतिष योग - डॉ. नारायणदत्त श्रीमाली - ग्रह एकत्र आल्यास होणारे विविध शुभाशुभ योग आणि त्यानुसार जातकाचे भविष्य 
१०. गाथा  ग्रहांची - शांडिल्य - हे अतिशय छान पुस्तक आहे. 
११. लाल किताब 
१२. या व्यतिरिक्त नाशिक येथील ज्योतिष विषयक संस्थेने मला आठवते ते पांच  किंवा सहा खंड अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून काढलेले आहेत. ते देखील छान आहेत. 

सरतेशेवटी मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला की भविष्य बदलवू शकतो अथवा नाही या तपशीलांत जाण्यापेक्षा आपणांस जर संकटाची चाहूल लागणार असेल तर आपल्यास आपल्या सुरक्षिततेसाठी उपाय करता येतांत, येणारे संकट जाणवत नाही. डॉक्टरच्या इंजेक्शनच्या सुईपेक्षा शरीरांत अचानक घुसणारी सुई आपणांस जास्त हादरविते, वेदना देते. यावर यापेक्षा जास्त लिहीत नाही.   

Saturday, July 4, 2015

'नुकसानीपेक्षा कमी लाभ नेहमीच चालवून घ्यावा लागतो' ?

नुकतेच श्री. एकनाथ खडसे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य -'मदरसे या शाळा नाहीत' हे विधान केले. त्यावरून गदारोळ माजत आहे. त्यांनी निदान आपला १९७७ मधील शाळांसंबंधी असलेली कायद्यातील व्याख्या फक्त सांगितली. या स्वरुपाची व्याख्या ही या पूर्वीच्या कायद्यामध्ये देखील सांगितली आहे, त्यांत नवीन काहीही नाही; याचीही सर्वांना कल्पना असेल किंवा त्या सर्वांनी यांचा अभ्यास करून स्वतःला हे माहिती करून घ्यावे आणि आपले 'बकध्यान' सोडावे.

'कायद्याचे / नितीमूल्यांचे काटेकोरपणे पालन करावयाचे जाहीर करा' अशी कोणी मागणी केली अथवा तसे कोणी जाहिर केल्याने आणि विशेषतः बऱ्याच काटेकोरपणे पालन करावयाचे जाहिर केल्यास; त्यांत खूप जणांना खूप अडचणी निर्माण होतांत आणि त्यांचा सुखनैव चाललेला 'अव्यापारेषु व्यापार' धोक्यांत येतो.

ही बाब जर ---- आरक्षणासंबंधाने अथवा त्यांचेवर परिणाम करणारी होवू शकेल (प्रत्यक्षात असे नसले तरी ) अशी जाहिरात करता येईल अशा स्वरुपाची असेल / समाजातील गरिबांना अथवा कमी उत्पन्न असणाऱ्या किंवा जाहीर केलेल्या मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सोयी-सवलती (प्रत्यक्षांत जरी काढल्या जाणार नाहीत तरी) काढल्या जात आहेत असा समज निर्माण करता येईल असे वातावरण करणाऱ्या असतील / अल्पसंख्यांकांना (येथे मुस्लीम समजले जाते पण तसा उल्लेख केला जात नाही) असणाऱ्या अधिकारांना किंबहुना त्यांच्या आजपावेतोच्या कृतीकडे दुर्लक्ष होत जाणाऱ्या बाबींकडे आता दुर्लक्ष केले जाणार नाही' वगैरे ------------ अशा स्वरूपाची कोणीही विधाने केली तरी ती विधाने ही समाजविरोधी / त्यांच्या हक्कांविरोधी / समाजांत फूट पाडणारी / बेकायदेशीर आहेत असे रान जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक उठविले जाते.

येथे बहुमताच्या जोरावर दडपशाहीने 'असे कायद्याप्रमाणे वागू नये' हे देखील सांगीतले जाते, 'बहुजनांचे न ऐकल्यांस काय होईल' हे उच्चरवाने सांगितले जाते, अगदी 'रस्त्यावर उतरू, परिणामांना तयार रहा !' ही धमकीची भाषा देखील बोलली जाते. धमकीची भाषा लोकशाहीत चालते, किंवा फक्त लोकशाहीतच चालते. मग संबंधित राजकीय पक्षांना मग त्यांत त्यांचे / त्यांच्या पक्षाचे 'भविष्यातील राजकीय नुकसान' दिसते (देशाचे / समाजाचे नाही), आणि मग इतके झाल्यावर त्यांची जरी इच्छा असली तरी मग दुर्दैवाने समाजाच्या खऱ्या अर्थाने हिताची असलेली ही बाब अमलांत आणली जात नाही. गेली कित्येक वर्षे हेच सुरु आहे; आपल्याला त्याची लाज वाटत नाही तर सवय झाली आहे. 

अशा असंख्य बाबी आहेत की आजही आपण कायद्याविरुद्ध / नितीमुल्यांविरुद्ध वागत असतो, माहित असूनही वागत असतो आणि त्यांत काही सुधारणा / बदल करावा असे 'आपल्या ढोंगी पुढाऱ्यांना अजिबात वाटत नाही, कारण त्यांना जे समाजाच्या अडाणीपणामुळे पुढारीपण मिळालेले असते ते धोक्यांत येवू शकते आणि ते पुढारीपण, त्यातून मिळणारे लाभ गमविण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते. सर्वसामान्य जनतेबाबत काय बोलावे - 'मुकी बिचारी कुणीही हाका !' कारण एकदा का जनतेने त्यांना निवडणुकींत निवडून दिले की त्या निवडलेल्या उमेदवारांनीच काही आत्मघातकी निर्णय घेवून पुन्हा निवडणुका लादल्या तरच जनतेला उमेदवार बदलविण्याचा पर्याय उपलब्ध असतो अन्यथा नाही. मात्र 'जनता पक्षाच्या' सन १९७९ नंतर हा प्रयोग करण्याचे धारिष्ट्य कोणी केलेले नाही; काहीही झाले तरी सत्ता शक्यतो सोडवायची नाही असाच प्रत्येक राजकीय पक्षाचा कल असतो. अलीकडे दिल्लीतील निवडणुकीत 'आप पक्षाने' तो प्रयोग केल्याचे जनतेला आवडले नाही आणि त्यांनी यासाठी 'भारतीय जनता पक्षाला' आणि 'भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला (इंदिरा )' यांना जबाबदार धरून पार लोळविले आहे. 

माझी राजकीय विचारधारा ही 'या संस्कृतीशी प्रामाणिक असणाऱ्या पक्षाशी' आहे; कारण आपली संस्कृती ही विचाराने अत्यंत सहिष्णू किंबहुना एवढ्या सहिष्णुतेची आवश्यकता नाही कारण यामुळे कदाचित आपले अस्तित्वच धोक्यांत येवू शकते आणि याबाबतीत तडजोड शक्य नाही; हा आणि असे वर्तन आत्मघातकीपणा आणि मूर्खपणाचे आहे हे माझे स्वतःचे प्रामाणिक मत आहे. याची खातरजमा आपण कोणीही जगांत इतर ठिकाणी तेथे 'अल्पसंख्यांक' असलेल्यांवर काय परिस्थिती येते आणि आपल्या भारतांत 'अल्पसंख्यांकांचे' कसे लाड अगदी तत्वांना बाजूला सारून, 'भारतीय राज्यघटना' दुर्लक्षित करून कसे चाललेले आहेत हे देखील आपण पाहतोच आहे. त्यामुळे 'भारतीय संस्कृती' मानणारा पक्षच आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकेल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही आणि अशी शंका इतरांच्याही मनांत नाही, नसते मात्र 'राजकीय लाभासाठी' ते त्यांना गैरसोयीचे असल्याने त्यांना जाहिरपणे तसे बोलता येत नाही. 

सर्वधर्मसमभाव ही भावना आपणांस कोणी शिकविण्याची आवश्यकता नाही, ती आपल्यांत उपजत, जन्मजात आहे. 'राजकीय पक्ष' आणि 'प्रामाणिकपणा' यांची जोडी लावावयाचे म्हटले तर ती अलिकडील कोणत्याही पक्षाचे वर्तनानुसार फारसी जुळणारी नाही हे कोणाच्याही लक्षांत येईल. तथापि 'आपल्या संस्कृतीशी' उघडपणे बांधील असल्याचे सध्या 'भारतीय जनता पक्ष', 'शिवसेना' हे आहेत हे कोणाच्याही लक्षांत येईल; म्हणून मला मी या पक्षाशी बांधील असल्याचे वाटत आहे इतकेच मात्र तसे नाही ! माझा कोणताही आवडता अथवा नावडता पक्ष नाही. साधारणतः १९८० चे दरम्यानची घटना असावी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो.  तत्कालीन सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांनी जम्मू-काश्मीरच्या निवडणुकींत 'कॉंग्रेसला' मदत करा अशा आशयाचे विधान केल्याचे मला आठवते. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' आणि 'कॉंग्रेस' याबाबत, त्यांच्या संबंधाबाबत मी काही कोणांसही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही; अगदी केंव्हाचेही 'कॉंग्रेसचे' वर्तन पाहिले तर ते सदोदीत 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' विरुद्धच राहिले आहे, अगदी बंदी आणण्याइतपत आणि आणीबाणीच्या कालखंडात पाहिले तर त्यांच्या स्वयंसेवकांना तुरुंगात घालण्याइतपत ! आणि असे असतांना 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वोच्च नेतृत्व' असे विधान करते याचा आपण सर्वांनी आजही अर्थ लावला पाहिजे. तो कोणी लावत नाही म्हणून हा वैचारिक गोंधळ होत असतो. आपल्याशी ही विचारधारा एकदा स्पष्ट झाली की मग सर्व पक्षांबाबत काही वेगळे वाटेनासे होते आणि त्याचा संबंध 'आपल्या संस्कृतीशी आपोआपच जोडला जातो' आणि मनांत शंका राहत नाही. 

आपल्या भारतातील बहुसंख्य कायदे हे आपल्या संस्कृतीशी नाळ असलेलेच आहेत, त्यातील तरतुदी या बहुतांश कठीण परिस्थितीत कसे वर्तन असावे हे सांगणारे आहेत आणि कायदा तयार करतांना, मंजूर करतांना या सर्व बाबी पहिल्या जातात कारण कायदा बनविण्याचेही एक शास्त्र आहे त्यानुसारच तो बनवावा लागतो. मात्र अलिकडे गैरसोयीच्या बाबी या जास्त चर्चेत येत नाहीत आणि त्या चर्चेंत आल्या, दुर्दैवाने 'अल्पसंख्यांकांच्या / मागासवर्गीयांच्या / लाभार्थींच्या विरोधांत' ते जात असले, जरी संपूर्ण समाजाचा विचार करता तसे अंतिमतः नसले तरी, आपण आवई उठविण्यास कमी करत नाही, ही आपल्या संस्कृतीशी प्रतारणा आहे, याची देखील आपणांस मनातून जाणीव असते पण आपण ते कबूल करत नाही कारण ते गैरसोयीचे असते, आपल्या वैयक्तिक हिताचे नसते ! 

ज्या बाबतीत काही कायदे नाहीत तेथेही आम्हा भारतीय संस्कृतीशी नाळ सांगणाऱ्या जनतेची तत्वाशी इतकी पक्की बांधीलकी आहे की आमच्याकडून वावगे वर्तन कोणते याचा गोंधळ होत नाही; म्हणून तसा अर्थ लावत आपले वर्तन होते आणि ते सध्याचे काळी जो 'पक्ष' आपल्या संस्कृतीशी जवळीक दाखविणारा आहे, त्याची आपण भलावण करीत आहोत असा समज होतो. मात्र तसे काहीही नसते - 'नुकसानीपेक्षा कमी लाभ नेहमीच चालवून घ्यावा लागतो' हे सर्वमान्य आणि सिध्द झालेले तत्व आहे.