Saturday, June 13, 2015

आज १३ जून ! - होय ! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे !


आज १३ जून ! ही दिनांक दरवर्षी येते, मात्र सेहेचाळीस वर्षांपूर्वी, १३ जून १९६९ रोजी नियतीने आपल्यातून ज्या माणसाला आपल्यातून ओढून नेले, 'असा माणूस गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुन्हा होईल का नाही ते सांगता येणार नाही' - होय ! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे !

अष्टपैलू, धुरंधर, व्यक्तिमत्व ! प्रभावी वक्ते, लेखक आणि 'केशवकुमार' या टोपण नांवाने लिहिणारे उत्तम गीतकार-कवी, विडंबनकार, नट आणि एक काळ जवळजवळ आपल्या एकट्याच्या बळावर रंगभूमी जीवंत ठेवणारे समर्थ नाटककार तसेच संगीत नाटककार, सर्वोत्तम चित्रपट निर्मितीत 'श्यामची आई' सारखा आदर्शवत मराठी चित्रपट निर्माण करून समाजास आणि उगवत्या पिढीस चिरंतन तसेच उपयोगी नीतीमूल्यांची जाणीव करून देवून 'साने गुरुजींचे चरित्र' समाजात तळागाळात नेणारे आणि संपूर्ण भारतात 'पहिले सुवर्णकमळ' मिळवणारे मराठी चित्रपटनिर्माते, धडाडीचे आणि पत्रकारितेचे नवनवीन मापदंड देणारे तसेच नवीन पत्रकारांना प्रोत्साहन देवून शिक्षकाची भूमिका उत्तमप्रकारे पार पाडून चांगले पत्रकार-लेखक तयार करणारे आणि 'मराठा' सारखे वर्तमानपत्र चालविणारे उद्योजक !

'------------- यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' असे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अक्षरशः हजारो सभा घेवून जनजागृती करणारे महाराष्ट्र राज्य निर्मितीचे अर्ध्वयू ! ज्यांच्या नांवावर आजही असंख्य खरे-खोटे विनोद खपविले जातात असे विनोदी कथालेखक, कादंबरीकार ! महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे साहित्यिक-राजकारणी ! आमच्या संतांवर प्रेम करणारा आणि वेळप्रसंगी त्यांचे विचार प्रवचनरूपाने समाजासमोर मांडणारा 'प्रवचनकार' ! शिक्षणक्षेत्रात आपल्या प्रतिभेने नवीन यशस्वी प्रयोग करणारा 'शिक्षणतज्ञ - शिक्षक' ! सर्वांत महत्वाचे म्हणजे मराठी मातीवर आणि माणसांवर प्रेम करणारे आणि त्यांच्याशी कृतघ्न नसणारा हा बलदंड मराठी माणूस ! यांच्याबद्दल काय लिहिणार आणि किती लिहिणार ? त्यांच्या एकेका क्षेत्रातील कर्तृत्वाबाबत कोणीही लिहिल्यास त्यावर असंख्य विद्यार्थी 'डॉक्टरेट - Ph. D. ' मिळवतील एवढे त्यांचे कर्तृत्व ! काही काळानंतर 'आचार्य अत्रे' या नावांच्या एकापेक्षा जास्त वक्ती होवून गेल्या असाही समज निर्माण होईल असे आणि एवढे यांचे कर्तृत्व ! असा माणूस मराठी होता आणि महाराष्ट्रांत जन्मला याचा आम्हा प्रत्येकांस अभिमान वाटला पाहिजे ! महाराष्ट्र ही अशा कर्तृत्वसंपन्न पुरुषांची जननी आहे, याचा यथार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि ते वेळोवेळी आपण दाखवून दिले पाहिजे - ही आपली जबाबदारी आहे !

त्यावेळी मी दुसरीत होतो. जळगावहून उन्हाळ्याची सुटी संपली म्हणून माझ्या आजोळहून घरी रावेरला यायला निघालो होतो; गाडीतसुध्दा 'आचार्य अत्रे' गेल्याचीच चर्चा होती. माझ्या बालमनाला हे समजेना सर्वच लोक या कोणत्या माणसाची चर्चा करत आहेत की एवढे दु:ख सर्वांना व्हावे ? प्रवास सुरु होता, मी न राहून गाडीतच माझ्या आईला प्रश्न विचारला, 'शेजारचे अत्रे वारल्याचे एवढे लोकांना कसे काय माहीत झाले ?' हा प्रश्न किती मूर्खपणाचा होता, मात्र त्यापेक्षा किती अज्ञानाचा होता, हे मला आजही जाणवते. मित्रांनो, तिने मला प्रवासांत दिलेले उत्तर माझ्या अजूनही लक्षात आहे, ती म्हणाली 'तू जे समजतो, ते हे अत्रे नाहीत. मात्र हे अत्रे किती मोठे होते हे तुला माहीत होईल, तेंव्हा तू मोठा झालेला असेल.' दुसरीच्या मुलाला जेवढे समजणे शक्य होते ते मला समजले, म्हणजे काहीही समझले नाही, मात्र 'आचार्य अत्रे' हे नांव कायमचे डोक्यात राहीले. 

त्यानंतर मी चौथीत असतांना माझ्या काकांनी, त्यांना आम्ही नानाकाका म्हणत असू ! त्यांनी माझी वाचनाची आवड पाहून माझ्या नांवाने 'राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयात' माझे नांव नोंदवून मला सभासद केले. ग्रंथपाल होते 'सोनू बुलाखी वाणी', हे आम्हा मुलांत अत्यंत कडक म्हणून प्रसिध्द होते ! मला पाहिल्यावर 'याला काय सभासद करतात? काय वाचणार आहे हा ?' या त्यांच्या माझ्याबद्दलच्या प्रतिक्रियेवर माझा त्यांच्या बद्दलच ग्रह अजूनच पक्का झाला' एवढेच नाही तर त्यांना पुस्तकाबाबत काहीही समजत नाही याची भर पडली. मात्र तरीही नानाकाकांनी दरमहा ५० पैसे अशी सहा महिन्यांची एकूण वर्गणी ३ रुपये भरली आणि मी सभासद झालो. (दरमहा ५० पैसे यावर जावू नका - त्यावेळी आमच्या गांवाला झणझणीत मिसळ १५ पैशांला मिळत होती. हिशोब करा - 'एका डॉलरचे किती रुपये होतील' या चालीवर)

त्यानंतर आचार्य अत्र्यांची वाचनालयात असणारी जवळजवळ सर्वच पुस्तके मी वाचली. मग नाटके - 'साष्टांग नमस्कार', 'घराबाहेर', 'भ्रमाचा भोपळा', 'उद्याचा संसार', 'लग्नाची बेडी', 'मोरूची मावशी' आणि 'तो मी नव्हेच' हे वाचण्यासोबतच रंगभूमीवर पहाण्यास मिळाले ! 'मी कसा झालो' 'हशा आणि टाळ्या' त्यांचे 'कऱ्हेचे पाणी' यांचे सर्व खंड वाचले. 'समाधीवरील अश्रू' वाचले. 'मराठी माणसे - मराठी मने' हे त्यांचे पुस्तक आम्हांस, महाविद्यालयात पहिल्या वर्षाला अभ्यासाला होते. असे समृध्द, विचारप्रवर्तक, कसदार साहित्य आपणास वाचावयास मिळाले पाहिजे आणि ते आपण 'कोणत्या जातीच्या माणसाने लिहीले आहे ?' याचा विचार न करता वाचले पाहिजे - अर्थात आपणांस आपली प्रगती व्हावी असे वाटत असेल तरच !

तत्कालीन समाजाचा समर्थपणे मुकाबला करून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 'अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत' सहकार्य करणारा हा जन्माने 'ब्राह्मण माणूस' यांचे भान आपण आजच्या समाजाच्या जातीविषयक अत्यंत प्रदूषित वातावरणांत अवश्य ठेवले पाहिजे आणि अशा कर्तृत्ववान माणसांच्या भूमीत राहणाऱ्या आपण दिवसेंदिवस जाणीवपूर्वक वाढवत नेणारी ही जातीयता आणि ढोंगी सहिष्णुता संपविली पाहिजे - आपल्या, समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी !  आज हे आठवले कारण ती आहे एक माझ्या शालेय जीवनातील, न समजणाऱ्या काळातील पण माझ्या कायमच्या स्मरणांत राहून गेलेली ही १३ जून १९६९ ची आठवण !

आपणासाठी त्यांच्या 'संगीत प्रीतीसंगम' या नाटकातील एक पद -
किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार ?
लक्ष चौर्‍याऐंशींची ही नको आता येरझार

लोखंडाचे गुणदोष बघे का परीस
लेकराची कासावीस माहीत आईस !

पाण्यामाजी तूच देवा तारीले पाषाण
ब्रीद तुझे दीनानाथा, पतितपावन !

कठीण तो मायापाश सुटेना कोणास
कपाळीचा टळेनाही कोणा वनवास !

अनाथांचा नाथ तुला बोलतात संत
काकुळती आलो आता नको बघु अंत

कोठे गुंतलासी राया, कोणाला ताराया ?
पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया !

No comments:

Post a Comment