Saturday, June 3, 2017

परिसंवाद

परिसंवाद

मी महाविद्यालयांत शिक्षण घेत असतांना मला अनुभव येई की काही वादविवाद स्पर्धांमध्ये स्पर्धक खूप मोठ्या प्रमाणांत भाग घेत. तेथे विजेत्यांची निवड कठीण होवून जाई मग त्यातून पहिले काही जास्त गुण मिळविणाऱ्यांची निवड केली जाई आणि त्यांचे गट केले जात, त्या गटाचा एक प्रमुख असे. त्या प्रत्येक गटाला आयत्या वेळी काही विषय देवून त्या गटांतील सर्व सदस्यांत विषयासंबंधी चर्चा घडवून आणली जाई. त्या वेळी जो काही प्रत्येक स्पर्धकाला वेळ दिला जाई त्यांत तो त्याचे मत मांडत असे. तो बोलत असतांना त्याच्या म्हणण्यांत कोणीही व्यत्यय आणत नसे. मग गटप्रमुख हा त्यातील मतितार्थ अगदी संक्षेपाने सांगत असे. असे क्रमाने होत त्या गटातील सर्व स्पर्धकांनी विचार मांडल्यावर, गटप्रमुख एकंदरीत सर्व चर्चेच्या सारांशाने व स्वत:चे मत मांडून त्या विषयाचा चर्चेअंती काय निष्कर्ष निघाला हे सांगत असे. त्यातून प्रत्येक सदस्याचे मत, विषयाची जाण, त्यातील मतांतर वगैरे कोणताही गोंगाट न होता व्यवस्थित समजत असे. त्याला परिसंवाद म्हटले जाई.
हे आता मला सगळे आठवण्याचे कारण काल कोणत्या तरी मराठी चॅनेलवर 'नोटाबंदी विषयी परिणाम' अशा स्वरुपाची चर्चा होती. त्यातील जो सर्व सदस्यांत चर्चा घडवून आणून विषय पुढे नेईल हे अपेक्षित होते, त्या प्रमुखाचे वागणे विचित्रच होते. परिसंवाद विषय नोटाबंदी व काळापैसा संबंधी होता. जर नोटाबंदीमुळे भीषण समस्या निर्माण झाली आहे, हा निर्णय चुकीचा कसा आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे कोणी सांगू लागले की हा त्याला प्रोत्साहन देवून, प्राम्टींग करून अजूनच बोलते करी. मात्र नोटाबंदी कशी योग्य, त्यांचे अर्थव्यवस्थेवरील संभाव्य चांगले परिणाम, आजचे दिसत असलेले परिणामांची व अडचणींची कारणे, त्यावरील उपाय वगैरे सांगू लागला की इतर कोणी काही बोलण्यापूर्वी व त्याचे म्हणणे त्याला पूर्ण करू न देता हाच स्वत: त्याच्याशी वादविवादाची कुस्ती सुरू करे, आणि त्याला विषय मांडू देत नसे. हा कार्यक्रम, त्यामागील हेतू अनुभवी माणसांना लक्षात येतच असेल.
मात्र लोकशिक्षणाची साधने मानले गेलेली, लोकशाहीत महत्वाची समजली जाणारी ही माध्यमे जर 'परिसंवादाची तत्वे' पाळणार नसतील, ती सर्वांसमक्ष पायदळी तुडवणार असतील तर जी मंडळी तुमच्या अपेक्षेच्या विरूद्ध मत मांडणार असतील तर त्यांना बोलावण्याची काहीही आवश्यकता नाही. मग 'वादे वादे जायते तत्वबोध:' वगैरे तत्वज्ञान काय खरे आहे ?
यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे जी अभ्यासू नवीन पिढी तयार व्हायला हवी, त्याला प्रतिबंध होतो. अगदी ग्रामपंचायतीच्या सभा ते लोकसभेतील चर्चा यांत आपल्याला यापेक्षा वेगळे अनुभव यापुढे येणार नाही. यामुळेच प्रसारमाध्यमे ही लोकशिक्षणाची, लोकजागृतीची, प्रबोधनाची साधने न रहाता निखळ प्रचाराची साधने होत असून आपली विश्वासार्हता गमवीत आहे, या निष्कर्षाला समाज आला तर त्याची काय चुकी आहे ?

२७ डिसेंबर २०१६

No comments:

Post a Comment