Friday, February 27, 2015

आधुनिक ऋषी - मा. चंडीकादास अमृतराव देशमुख उपाख्य मा. नानाजी देशमुख

भारत हा ऋषीमुनींचा देश आहे, आपल्या उत्तुंग आणि आकाशाला आपल्या ज्ञानाने गवसणी घालणाऱ्या ऋषीमुनींनी भारत देशाला आपल्या अविरत ज्ञानसाधनाने, निरंतर उन्नतीच्या ध्यासाने ज्ञानसंपन्न केलेले आहे. या महाराष्ट्राने आधुनिक काळात याच ऋषीमुनींच्या तोडीची अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वे आपल्या भारतमातेला दिलेली आहेत आणि भारतमातेची आपल्या परीने सेवा केली आहे. 

माझी मर्यादा मला माहीत आहे, सर्वांची नांवे येथे उधृत करणे कठीण आहे. त्यातील काहींची जरी लिहावयाची असली तरी त्याची देखील खूप मोठी यादी होईल हे महाराष्ट्रासाठी आणि मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, महान तत्वज्ञ आणि स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचणारे लोकमान्य बाल गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर, नामदार गोपाल कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महिलांसाठी अजोड कार्य करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे, केवळ दलित समाजाचेच नाही तर आपल्या बुध्दीने जग दिपवून टाकणारे घटनासामितीचे सदस्य भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, समाजाच्या विचारात देखील नसणाऱ्या महारोग्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचत जगाला दिग्मूढ करणारे डॉ. मुरलीधर देविदास उपाख्य बाबा आमटे, 'सब भूमी गोपालकी' म्हणत भूदान चळवळ उभारून जनतेकडून जमिनीचे अविश्वसनीय असे जनतेसाठी दान घेणारे महर्षी विनायक नरहर उपाख्य विनोबा भावे, स्त्रियांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपले जीवन उपयोगात आणणारे महात्मा ज्योतीराव गोविंदराव उपाख्य ज्योतिबा फुले आणि सौ. सावित्रीबाई फुले, सेनापती पांडुरंग महादेव बापट, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणारे नामदेव जाधव आणि देशासाठी तशीच कामगिरी बजावणारे जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य, डॉ. बानू जहांगीर कोयाजी, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, संत गाडगे महाराज, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, विश्वकोशाचे महाकाय काम मराठी भाषेत आणण्याचे शिवधनुष्य उचलणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, हिंदुहृदयसम्राट बाळ केशव उपाख्य बाळासाहेब ठाकरे, किती नांवे सांगावीत आणि किती नांवे लिहावीत तरी कितीतरी नांवे राहूनच जातात. 

यातील एक नांव असेच आहे, आधुनिक ऋषी - मा. चंडीकादास अमृतराव देशमुख उपाख्य मा. नानाजी देशमुख ! ११ ऑक्टोबर १९१६ रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गांवी जन्मलेल्या या चंडीकादास अमृतराव देशमुख यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०१० पावेतो आपल्या कर्तुत्वाने आपले नांव 'नानाजी देशमुख' या नांवाने संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगात चिरंजीव केले होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवणारा आणि मंदिरात राहून शिक्षण घेणारा 'चंडिकादास' याने आपले उच्च शिक्षण 'Birla Institute of Technology and Science Pilani' या प्रख्यात शिक्षणसंस्थेत घेतले.

हा 'चंडिकादास' मग डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या संपर्कात आला आणि 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या' परिवारात स्वयंसेवक म्हणून सामील झाला. 'भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होवू शकतो' या कल्पनेला मध्यवर्ती मानून रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले. उत्तरप्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असणाऱ्या 'नानाजींनी' सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय चारित्र्यावर आधारित असा एक राजकीय पक्ष उभारणेसाठी म्हणून प्रयत्न केले त्यातून 'भारतीय जनसंघ' स्थापन झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्री सुंदरलाल भंडारी, श्री अटलबिहारी वाजपेयी आणि श्री लालकृष्ण अडवाणी यांच्या माद्यमातून ते 'जनसंघाशी' संपर्कात राहिले. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी असत,  

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्मिक मानवतावाद' या तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांनी याच तत्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामाची उभारणी करण्याचा ध्यास घेतला, जनता पक्षाचे मंत्रिमंडळातील मंत्रिपद नाकारले, आणि राजकारण संन्यास घेवून अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि 'दीनदयाळ संशोधन संस्था' स्थापन केली. या माध्यमातून उत्तरप्रदेशातील 'गोंडा' जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले आणि तेथील शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. त्यानंतर मध्यप्रदेशातील 'चित्रकुट' जिल्ह्यात दुर्गम, पहाडी गावांतील जनतेला विविध प्रकल्पांच्या माद्यमातून आत्मनिर्भर आणि उद्योगी बनवण्यावर लक्ष दिले. 'पाणी अडवा - पाणी जिरवा' हि त्यांनी अमलात आणलेली कल्पना याने सिंचनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढविले. गो-वंश संवर्धन, पारंपारिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुलपध्दतीचे शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य, आयुर्वेदिक वनौषधींचे संशोधन आणि याच पद्धतीचे अनेक प्रकल्प त्यांनी 'चित्रकूटच्या' परिसरात सुरु केले. येथेच त्यांनी भारतातील पहिले 'ग्रामीण विद्यापीठ' हे 'चित्रकुट ग्रामोदय विश्वविद्यालय' या नावाने स्थापन केले. हे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना समाजशिल्पी बनविले. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गांव बनविले.  

'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे' ही समर्थ रामदासांची उक्ती लक्षात ठेवून सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे दर्शविणेसाठी चित्रकुटमध्ये अभूतपूर्व असे 'श्रीराम दर्शन' हे कायम स्वरूपी प्रदर्शन उभे केलेले आहे, रामायणातील घटनांसोबत प्राणीसृष्टीही उभी केली आहे. 'चित्रकुट' हे त्यांचे 'कर्मस्थान' होते. त्यांनी १९९० चे सुमारास मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यातील सुमारे २५० गावे दत्तक घेतली आणि त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा भरपूर प्रयत्न केला. स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शिद्ध बोलणे सुरु करून ग्रामविकासाचे काम सुरु केले. त्यांच्या या कामाचे फलित म्हणून चित्रकुट क्षेत्रातील ८० खेड्यातील न्यायालयातील जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले आणि एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. भारतातील इतर राज्यांमध्ये देखील दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरु आहे. भारत सरकारने या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 'पद्मविभूषण' हा पुरस्कार दिला. राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांचे वर्णन 'समाज उध्दारासाठी एकाच विचाराने प्रेरित झालेले व्यक्तित्व' या शब्दांत केले.

वयोमानाप्रमाणे होत असलेल्या त्रासाकरिता औषधोपचार करण्यासाठी त्यांनी दिल्लीला येण्यास नकार दिला. 'दधिची देहदान संस्था, नवी दिल्ली' या संस्थेला त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याचे इच्छा पत्र केले, संस्थेने ते स्विकारले. त्यांचा देह संशोधनासाठी 'All India Institute of Medical Science' यांच्याकडे पाठविला. या आधुनिक 'दधिची ऋषीचे' आम्ही वारसदार आहोत.
  


No comments:

Post a Comment