Sunday, March 8, 2015

'जागतिक महिला दिन' - कृतज्ञता दिन


आज 'जागतिक महिला दिन'! महिलांना या निमित्ताने शुभेच्छा देण्याची लगबग सुरु आहे, त्यात काही वेळा चढाओढही दिसत आहे, मला त्या तपशीलात जायचे नाही; मात्र महिलांचे महत्व आपल्या संस्कृतीत आपण एकाच दिवसापुरते पळत असतो का, हा प्रश्न आहे.

मला अगदी पूर्वीच्या विदुषी, तत्ववेत्या अशा महिलांबाबतच बोलावयाचे आहे असे नाही, जसे दीर्घतमसाची नात आणि काकाशिवताची मुलगी घोषा जिने आपल्या संपूर्ण जगातील आद्यसाहित्यातील, ऋग्वेदातील दोन सूक्ते रचलेली आहेत. जिच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिच्या असाध्य रोगावर देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांनी उपचार केलेत आणि तिला बरे केले, अशी तिची योग्यता!

मला महर्षी अगस्तींच्या पत्नीबद्दल म्हणजे लोपामुद्राबाबतही म्हणावयाचे नाही की ज्यांचे ऋग्वेदात तत्वचिंतक असे संभाषण, संवाद आहेत. ऋग्वेदात ज्यांचे संवाद, संभाषण यावे अशी त्यांची योग्यता होती.

 मला मैत्रेयीबाबतही सांगावयाचे नाही कि जी महर्षी याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी होती, जिला वेदांचे उत्तम ज्ञान होते, जिच्या ऋचा ऋग्वेदातदेखील आहेत आणि तिला ब्रह्मवादिनी म्हणून ओळखले जायचे.

मला गार्गीबाबतही सांगावयाचे नाही की तिला ब्रह्मवादिनी, म्हणजे जिला ब्रह्मविद्येचे ज्ञान आहे अशी व्यक्ती,  म्हणून ओळखले जायचे, जिने राजा जनकाने योजिलेल्या ब्रह्मयज्ञात भाग घेतला होता. तेथे झालेल्या वादविवादात तिने 'आत्म्याबाबत' विविध प्रश्न याज्ञवल्क्यास विचारून आपला प्रभाव पडला होता.

मात्र जिचा दिवस सूर्योदयापूर्वी सर्वांच्या आधी सुरु झालेला आणि जिचा दिवस सर्वांच्या नंतर संपलेला आपण सर्वजण शतकानुशतके पाहत आहोत, जिने आपल्या रक्ताने हा सर्व समाज जन्माला घातलेलाच नाही, तर पोसलेला आहे - अगदी विपरीत परिस्थितीतही! जिची आपल्या कुटुंबाकडून फक्त आपणास आपले म्हणावे अशीच अपेक्षा असते आणि जी आपण सर्वांना निरंतर देतच आलेली आहे, त्या महिलेला आपण काय देवू शकतो, हो अगदी शुभेच्छा तरी देवू शकतो का, तिची ती तरी अपेक्षा असते का?

आजचा महिला दिन हा तिच्या त्यागाचे स्मरण आपण या एका दिवशी तरी करावे आणि आपली कृतज्ञता  व्यक्त करावी यासाठीच आहे.    

No comments:

Post a Comment