Monday, March 16, 2015

आपण प्रगत होत आहोत का?

आपण आजच्या आपल्या समाजजीवनाकडे पाहिले, विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया आणि त्यांची वागणूक पहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की जातीयवाद संपविण्याच्या नांवाखाली आपण अत्यंत जातीयवादी बनत आहोत, विशेष म्हणजे आपण फक्त जातीयवादीच नाही बनत नाही; तर आपल्या अशा वागणुकीतून आपला वैयक्तिक स्वार्थ सफल होवू शकतो हे लक्षात आल्याने, तसेच सध्या आपल्या भोंगळ अर्थाच्या लोकशाहीमुळे किंवा लोकशाहीचा भोंगळ अर्थ लावल्यामुळे माणसाचा मुळातील स्वार्थी आणि लोभी वृत्तीस कायद्याचे, सत्तेचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे की काय माझ्यासारख्यास वाटू लागले आहे, हीच भावना सर्वसाधारण जनतेची आहे. हे आपले वर्तन समाजविघातक, राष्ट्रद्रोही आणि विकृत मनोवृत्तीचे होत आहे. 

छोट्या छोट्या घटनातून आणि सध्याच्या आपल्या समाजाच्या प्रतिक्रियांतून काय अर्थ निघतो आणि मला वाटलेले त्यांचे परिणाम काय होत आहे यांची खात्री करावी, आपल्या मनाशी प्रामाणिकपणे खुणगाठ बांधली तरी चालेल. त्याबाबत एकाएका मुद्द्याचा आपण विचार करू. 

देशाची फाळणी - 
आपल्या देशाला इंग्रजांकडून मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, १५ ऑगस्ट, १९४७ नंतर, आपण धर्माच्या नांवावर झालेली देशाच्या फाळणीची भीषण सत्यता अनुभवलेली आहे, त्यातील काही साक्षीदार लोक अद्यापही आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारू शकतो, मुस्लीम विचारांना मानणारे बहुसंख्य लोक तत्कालीन पूर्व आणि पश्चिम पाकिस्थानात राहिले किंवा गेले. तेथे जे मुस्लिम विचारांचे नव्हते त्यांना एकतर तेथून बहुमताच्या जोरावर, धर्मवेडाच्या धुंदीत, त्यांची मिळकत हडप करण्याच्या हेतूने, राज्यसत्तेचे बळ लाभल्याने, निर्धाराने हाकलून लावले गेले अन्यथा त्यांना कमालीच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागले, त्यामुळे एकतर ते कायमचे विस्थापित झाले आणि भारतात आले अथवा तेथे त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून मुस्लिम विचारसरणी स्वीकारली. ही कृती आजही थांबलेली नाही. मात्र त्यावेळी तेथे असलेली हिंदूंची तसेच इतर धर्मीयांची संख्या आणि आज शिल्लक राहिलेली संख्या यांत कमालीचा फरक आहे, आज तेथे मुस्लिम धर्मियांव्यतिरिक्त इतर समाज जवळजवळ राहिलेला नाही. हे योग्य किंवा अयोग्य हे सांगण्याची अजिबात आवश्यकता आता राहिलेली नाही, कारण एकतर त्यास बराच काळ लोटलेला आहे आणि ती वस्थुस्थिति आहे, ती नाकारण्यात किंवा तिला निष्कारण तात्विक मुलामा देण्यात अर्थ नाही, त्याचे भीषण परिणाम आपण सातत्याने आजही भोगत आहोत, मानवाधिकार, स्वातंत्र्यापूर्वी एकमेकांत झालेले ठराव वगैरे या रिकाम्या गप्पांत काहीही अर्थ नाही कारण त्याकडे ज्या व्यक्ती अशी कृती करत आहेत त्या लक्ष देखील देत नव्हत्या कारण त्यांना ही भाषा समजत नाही आणि त्यांना ज्या भाषेत समजते त्या भाषेत आपली बोलण्याची क्वचितच तयारी असते. 

त्याव्यतिरिक्त बाकी राहिलेला प्रदेश जेथे आपण सध्या रहात आहोत, तो हा खंडित 'भारत' हा जरी हिंदू बहुसंख्य असला तरी, आपल्या तत्कालीन नेतेमंडळी यांनी, ज्या कारणामुळे फाळणी झाली त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून, तसेच ते कारण आपल्या समाजात पुन्हा निर्माण व्हावयास नको, याचा सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टीने विचार करून, संभाव्य शक्यता लक्षात घेवून किंबहुना ते जाणीवपूर्वक टाळून,  त्यावर कठोर देशहिताचा व्यावहारिक निर्णय घेण्याऐवजी - भोंगळ आदर्शवाद स्वीकारून वर्तन करते झाले. त्यावेळी ही अशी आदर्श वर्तणूक करणारी मंडळी समाजात किती असतात, त्यांचे समाज आणि राज्यकर्ते कितपत ऐकतात आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे अंमलबजावणी करतात, याचा आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांना विसर पडला अथवा त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले. राज्यकर्त्याची ही कर्तव्य टाळण्याची, देशविघातक वृत्ती आहे.  

सर्व धर्मांना त्यांच्या धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य भारतात राहील हे तत्व आपण घटनेनुसार स्वीकारल्याने, मात्र त्याचा अर्थ हा चमत्कारिकपणे समाजहिताचे विरुद्ध काढण्यास स्वार्थीपणाने परवानगी दिली. त्यामुळे त्याचा अर्थ आपण वेगवेगळ्या वेळी आपल्या स्वार्थासाठी, सत्ताप्राप्तीसाठी वेगवेगळा काढत राहिल्याने त्याला आपल्या लुच्चेपणाची झळाळी प्राप्त झालेली आहे. या आपल्या 'लुच्चेपणाच्या वृत्तीची', खंबीरपणे विरोध करण्याची मानसिकता वैयक्तिक स्वार्थामुळे कोणाचीही राहिलेली नाही, त्यास आपल्या 'राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा' ढोंगीपणाने शब्दच्छल करीत विरोध करत राहिलो. कारण त्यामुळे अल्पसंख्य समाजाची आपणांस आपोआप सहानुभूती मिळते, त्यांचे समर्थन मिळते हे लक्षात आले.  आपण देशविघातक, समाज फोडण्याचे कृत्य करीत आहोत याची जाणीव असूनही आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी आपण अंध झालेलो होतो आणि आजही आपले वर्तन तसेच आहे.

एकदा लोकशाही स्वीकारल्यानंतर बहुमताचे राज्य चालते, बहुमताला कमालीचे महत्व प्राप्त होते, तेथे आदर्शवाद, तत्व वगैरे बाबी नसतात. या सर्व बाबी बहुमताच्या जोरावर दडपून टाकता येतात किंवा आपल्या कृतीचे बहुमताला आवडेल असे स्पष्टीकरण देवून त्याचा सोयीचा अर्थ लावता येतो, त्यास विरोध करण्याची कोणाची हिंमत राहत नाही आणि दुर्दैवाने केला तरी त्याला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. आपल्या मागे समर्थन करणारी किती डोकी आहेत याला आणि फक्त यालाच महत्व प्राप्त होते, त्या डोक्यांमध्ये कोणते विचार आहेत, ते राष्ट्रउद्धारक आहेत का राष्ट्रविघातक आहेत याला कसलेही महत्व रहात नाही. असे जर आपण केले नाही तर आपला स्वार्थ आपणांस साधता येत नाही.

फाळणीचा येवढा घसघशीत फायदा लक्षात आल्यावर मग राज्यकर्ती, समाजकारण हे राजकारण डोक्यात ठेवून करणारी मंडळी 'फोडा आणि झोडा' या तत्वाचा अवलंब करून वागू लागली, धोरण ठरवू लागली अथवा त्याप्रमाणे बदलवू लागली, त्यातून सत्ताकारणाचा घसघशीत लाभ उठवू लागली. समाजास एकत्र करावयाचे आहे हे फक्त तोंडाने बोलावयाचे शिल्लक राहिले, मात्र कृती त्याच्या बरोबर विपरीत होऊ लागली. ज्या व्यक्ती, संस्था, संघटना समाज खऱ्या अर्थाने एकत्र करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांना जाणीवपूर्वक 'जातीयवादी' ठरविले गेले, त्यांच्या विरुद्ध समाजात दिशाभूल करून अडथळे उभे केले गेले.

समाज किंवा समाजाचे ऐक्य सांभाळण्यापेक्षा सत्ता सांभाळणेच फक्त महत्वाचे आणि एकमेव कार्य ठरले, त्यामुळे 'राजा हा विष्णूचा अवतार असतो, त्याचा शब्द देवाचा शब्द असतो' ही भावना जरी जनतेची असली तरी त्या भावनेचा कमालीचा आदर ठेवत असल्यासारखे दाखवीत त्याचाच गैरफायदा घेत ती भावना 'सत्तासोपान' होवून बसली. आपल्या कार्याचे 'सिंहावलोकन' करून त्यातील त्रुटी शोधून त्या दूर करण्याचे ऐवजी दुसरा पक्ष कसा नालायक आहे हे जास्तीत जास्त ठळकपणे जनतेवर ठसवून सत्ता मिळविण्याचा सोपा, यशस्वी प्रयत्न सुरु झाला. आदर्शवादाच्या, बहुजनसमाजहिताच्या, शोषित-वर्गास न्याय देण्याच्या वल्गना करत त्यांना वस्तुस्थितीपासून दूर ठेवले जावू लागले.  

(अपूर्ण) 

No comments:

Post a Comment