पद्मश्री श्री. कृष्णराव गणपतराव साबळे आणि आपल्या सर्वाना फक्त 'शाहीर साबळे' याच नांवाने परिचित असलेला यांच्या नांवापुढे दिनांक २० मार्च, २०१५ पासून दुर्देवाने कैलासवासी लिहावे लागणार! कालच त्यांचे वार्धक्याने निधन झाले, ते आता आपल्यात राहून गाणे म्हणू शकणार नाही आणि आपणास ते ऐकण्याचे भाग्य लाभणार नाही.
आपल्याला देशभक्तीपर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत ऐकताना त्यांची, त्या स्वातंत्र्ययोद्ध्याची,
आवर्जून आठवण होईल. आता संत एकनाथ महाराजांचे भारूडातून जीवनविषयक तत्वज्ञान 'विंचू चावला' असे ऐकतांना, 'अनंतफंदी' यांच्या 'बिकट वाट वहिवाट नसावी' या फटक्यातून ऐकताना त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
'महाराष्ट्राची लोकधारा' ही लोककला आपल्या कर्तुत्वाने संपूर्ण भारतभर नेणारा हा कलावंत, सन १९८४ साली 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' याने, सन १९८८ मध्ये 'शाहीर अमर शेख पुरस्कार' यांनी सन्मानीत झाला होता. सन १९९० मध्ये मुंबई येथे झालेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे; तसेच तेथेच झालेल्या 'अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे' ते अध्यक्ष होते. सन १९९० साली त्यांना 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' याने सन्मानित करण्यात आले. सन १९९८ साली त्यांनी त्यांनी कलेच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी भारत सरकारने 'पद्मश्री' हा नागरी सन्मान पुरस्कार त्यांना दिला.
आज त्यांच्या आणि आपल्या आवडीचे संत एकनाथ महाराजांचे हे भारुड दिल्याशिवाय राहवत नाही
सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार
अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?
काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला
मनुष्य इंगळी अति दारुण
((हा, हा, म्हणजे अति 'दारू' नं)
दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.
दारूण म्हणजे भयंकर.
(भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का ?)
अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
(अति भयंकर म्हणजे ?)
खूप भयंकर.
(अन् खूप भयंकर म्हणजे ?)
मायंदाळ भयंकर.
(अन् मायंदाळ भयंकर म्हणजे ?)
तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
(बापरे !))
मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं .....
((तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
गंगीचा इथे काय संबंध ?
(मग त्या रंगीनं.)
कुणाचाही संबंध नाही.)
तिनं म्हणजे त्या इंगळीनं
(महाराज इंगळी म्हणजे ?) ..... मोठा विंचू !
(अंदाजे केवढा ?) ..... तुझ्याएवढा !
मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं
सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची
या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा
(तंबाखु खाणं मागे सारा)
नाही, नाही, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा
तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
सत्वगुण लावा अंगारा, अन् विंचू इंगळी उतरे झरझरा
सत्य उतारा येऊन (आला का ?)
अवघा सारिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने
पुंडलीक वरदा (हरी विठ्ठल)
श्री ज्ञानदेव (तुकाराम)
पंढरीनाथ महाराज की जय
No comments:
Post a Comment