काल दिनांक १४ जून २०१५ चा 'Tarun Bharat' मधील Pradeep Rasse यांचा Yogesh Shukla यांनी उल्लेखित केलेला 'रिझल्ट' हा लेख वाचला. लेख चांगला आहे, त्यामुळे मलादेखील काही बाबी सुचल्या आणि सांगाव्याशा वाटत आहे. मी औरंगाबाद येथे असतो, जळगावचे वर्तमानपत्र त्यामुळे वाचायला मिळत नाही. त्यावर लगेच प्रतिक्रिया द्यावी असेही वाटत होते. आपण ठरवले आणि त्याप्रमाणे लगेच झाले हे बहुतांशवेळा आपल्या हातात नसते, तसेच झाले,
संध्याकाळी कोर्टातून आल्यावर पाहतो तो आमच्या शेजारच्यांची मुलगी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेली असल्याने त्यापुढील अभियांत्रिकी वगैरेसाठी आमचेकडे 'Online' तिचे आवेदनपत्र भरत होती, तिला बराच वेळ लागला; इंटरनेट आणि माझ्या मुलीची कृपा ! त्या उत्साहात असलेल्या मुलीला नाराज करून लगेच प्रतिक्रिया देणे जमले नाही, त्यामुळे मी माझे कामही केले नाही. या उद्याच्या पिढीच्या अडचणी खूप आहेत, त्यात आपल्यासारख्यांनी वाढ करणे उचित नाही, करता आली तर मदत करावी, हा माझा स्वभावधर्म मी सांगण्याचे अगोदर परिचितांना माहीत पडतो. (माझ्याकडचे इंटरनेट हे आमच्या ओळखींच्या सर्वाना त्यांचेच असल्यासारखेच वाटते, ते फक्त मी घरी असल्यावर मला वापरायला देतात फक्त लवकर आटपा असे सांगत नाही, ते त्यांच्या डोळ्यांत दिसू शकते. अर्थात त्यावरही माझी काही फारशी तक्रार नसते, पण त्यावर 'त्यांची गरज तुमच्यापेक्षा जास्त असते. तुम्हाला काय तुम्ही पहाटे उठून नेहमीप्रमाणे काम कराल, ते आपल्याकडे पाहते येतात का ? येवू शकत नाही, त्यांचे काम तत्काळ केले नाही तर नुकसान होईल, तुमचे काय होणार आहे ? कोर्टाचे काम ! - माझ्या गृहमंत्र्यांची आदेशवजा प्रतिक्रिया ! यावर मी काहीही बोलत नाही - गेल्या निदान २३ वर्षांचा भरभक्कम अनुभव आहे - काहीही उपयोग न होण्याचा अपवाद कदाचित सुरुवातीच्या काही वर्षांचा असावा, पण ती आठवणही आता धूसर झाल्यासारखी वाटते. असो - 'गेले ते दिन गेले')
विद्यार्थ्यांची आणि पालकांची अवस्था एकमेकांपेक्षा फारशी वेगळी नसते. ज्यांच्याकडे पैशांच्या थैल्या असतात ते उघडून बसलेलेच असतात आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना कसेही करून उघडावी लागते, अन्यथा त्याचा परिणाम त्याच्या मुलांवर, कुटुंबावर, घरातील वातावरणावर आणि सरते शेवटी समाजावर ! आपले वागणे अलिकडे असे होत चाललेले आहे की आपण समाजात राहतो आहे किंवा नाही ही शंका यावी. समाजाच्या सुख-दुःखाशी आपणास फारसे कर्तव्य राहिलेले नाही. एकत्र कुटुंबपध्दती जवळपास मोडीत निघालेली असल्याने सर्वांचा विचार करणे शिल्लक राहिलेले नाही किंबहुना सर्वांचा एकत्रित विचार निरपेक्षपणे करणे आणि नंतर निर्णय घेणे राहिले नसल्याने, स्वार्थ बोकाळल्याने एकत्र कुटुंबपध्दती संपुष्टात आली. शब्द हे पाळण्यासाठी असतात हे आजकाल फक्त संत तुलसीदासांनाच माहीत असावे असे वाटते. मी तर आता कोणी असे काही बोलले की 'ध्वनी निर्माण होतो' या पलिकडे त्याला महत्व देत नाही; कारण शब्दांचे पालन झाले हे त्यांनी ते पाळल्यावर मानावे, या मताचा मी झालेलो आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांकडे लक्ष देण्याऐवजी भविष्यातील त्यास फक्त आर्थिक फायदा देवू शकतील अशा योजना आखत असतो आणि त्याची अंमलबजावणी करायच्या कामाला लागतो. मग फक्त पैसे मिळवून देणारे कोणते शिक्षण आहे तेच बघितले जाते; मग त्या शिक्षणाला आणि पर्यायाने शिक्षणसंस्थांना महत्व येते. अलीकडच्या बहुतांश शिक्षणसंस्था या व्यापार करणारी कार्यालये झालेली आहे, पिढी घडवणारी नाही, त्यांच्या उद्देशांत तसे दाखविले असल्यास, ते शासनाची परवानगी मिळवण्यासाठी दाखवावे लागते म्हणून असते. या धबडक्यात जुन्या-जाणत्या शिक्षणसंस्थांना त्यांच्याशी स्पर्धा करायची असते. मग तुलना सुरु होते - टोलेजंग इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत वाचनालय, त्यासाठी लागणारा खर्च भरून काढण्यासाठी भरपूर शिक्षण-शुल्क घेण्याची संबंधित क्षेत्राकडून परवानगी, त्यासाठी किंवा नियमाप्रमाणे अपेक्षित काही गोष्टी नसल्या तर कराव्या लागणाऱ्या असंख्य खटपटी-लटपटी, मधूनच कर्मचारीवर्ग दाखवत असलेले कायद्याचे ज्ञान त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर समस्या ! बहुतांश कर्मचाऱ्यांना कर्तव्यापेक्षा असलेल्या हक्कांची जाणीव, त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्दैवी कुचंबना ! या सगळ्यांतून शिक्षण-संस्था चालवावी लागते, विद्यार्थी मिळवावे लागतात, ते दरवर्षी सतत टिकवावे लागतात,
पैसे मिळवणारेच शिक्षण घ्यायचे या अमलांत आणणाऱ्या आपल्या धोरणामुळे आपण कोणकोणत्या गोष्टींना मुकत चालले आहोत -
१. पटकन नांव घेण्यासारखे नवीन साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक, समाज-मदतनीस तयार होत नाहीत की जे समाजाला नवीन विचार देवू शकतील, मार्गदर्शन करू शकतील, मदत करू शकतील. सर्वांचे वर्तन हे मिळणाऱ्या पैशावर अथवा फायद्यावर अवलंबून असल्याने समाजातील प्रामाणिक वर्ग दुष्प्राप्य होत चालला असून, नवीन तयार होणे जवळपास थांबल्यासारखे झाले आहे. ढोंगी व्यक्तींची संख्या मात्र वाढलेली आहे.
२. मुलभूत संशोधन व्हावे, त्यातून नवनवीन शोध लागावेत, आपणांस आणि समाजास ज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा राहिलेली नाही. ते महत्वाचे क्षेत्र मागे पडत चाललेले आहे. ज्या थोड्याफार जाणकारांना हे महत्वाचे आहे आपण करावे असे वाटते ते प्रयत्न करतात; त्यांचे प्रयत्न बऱ्याचवेळा विफल होतील असा आर्थिक-बाबींना महत्व देणारा आपला करत असतो. यांत आपले जातीपातीचे राजकारण, त्यांच्या सोयी-सवलती, हजारो वर्षांपासूनचे झालेले अथवा न झालेले - खरेखोटे अन्याय हे देखील परिणाम करत असतात. हे विद्यार्थी जर कमालीचे बुध्दीमान असतील तर ते कंटाळून परदेशाचा रस्ता धरतात आणि नाद सोडतात, किंबहुना अगोदरपासूनच धोरण आखून ठेवतात. ही बाब तर एवढी भीषण आणि गंभीर आहे की आपल्या समाजांत काही दिवसांनी फक्त 'कचरा-कुंड्याच' दिसतील की काय, असे वाटू लागले आहे.
३. आपले आणि समाजाचे अंतिम हित हे देखील पैशाच्या स्वरुपात मोजले जावू लागलेले आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे प्रामाणिकपणा हा देखील आर्थिक व्यवहारावर मोजला जावू लागला आहे. पैसे नसणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता राहिलेली नाही फक्त मतलबासाठी काही वेळ-काही वेळा लक्ष दिल्यासारखे करावे, झाले. याचा अत्यंत वाईट, हृदयास घरे पडणारा अनुभव आपणा सर्वाना आजचे 'राजकीय पक्ष' देत आहेत. पक्षाची विचारधारा, आदर्श, योग्य नेतृत्व, संस्कार, परंपरा इत्यादी बाबी बोलणे म्हणजे ते सुध्दा आपला वेळ वाया घालवणे आहे, असे वाटू लागले आहे.
४. कर्तव्यपालन ही समोरच्याची जबाबदारी असते, आपण फक्त हक्काचे वाटेकरी आहोत अशी समाजभावना बनत चाललेली आहे. त्यासाठी मग सर्व क्षेत्रांत भेदभाव केला तरी चालतो त्याने आपले काहीही होत नाही असे अनुभव येवू लागले आहेत. विद्यार्थ्यांची कर्तव्ये, पालकांची कर्तव्ये आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण समाज ज्यांना नियंत्रित करतो त्याची, राज्यकर्त्यांची कर्तव्ये याचा विसर पडायला लागला आहे.
४. कर्तव्यपालन ही समोरच्याची जबाबदारी असते, आपण फक्त हक्काचे वाटेकरी आहोत अशी समाजभावना बनत चाललेली आहे. त्यासाठी मग सर्व क्षेत्रांत भेदभाव केला तरी चालतो त्याने आपले काहीही होत नाही असे अनुभव येवू लागले आहेत. विद्यार्थ्यांची कर्तव्ये, पालकांची कर्तव्ये आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण समाज ज्यांना नियंत्रित करतो त्याची, राज्यकर्त्यांची कर्तव्ये याचा विसर पडायला लागला आहे.
मित्रांनो, असंख्य बाबी आहेत ! मी निराशावादी कधीही नव्हतो मात्र दिवसेंदिवस संकटे वाढत चाललेली आहेत आणि त्यातूनच आपणांस मार्ग काढावयाचा आहे आणि यशोशिखरावर पोहोचवायचे आहे, याचा आपणांस कधीही विसर पडता कामा नये. आपले चिरंतन मार्गदर्शक म्हणूनच 'रामायण आणि महाभारत' आहेत. 'सर्व धर्मानपरित्यज्य मामेकं शरणं व्रज' - आपण भगवद्गीतेला शरण जायचे आणि त्यात सांगितलेला कर्मयोग अंमलात आणायचा. म्हणूनच आपण वनवासात असलो तरी ते कर्तव्यबुध्दीने, कष्टाने, सर्व संकटे पार पडून 'सत्य प्राप्त केले पाहिजे'.
No comments:
Post a Comment