मी जळगांवच्या 'नूतन मराठा कॉलेज'चा विद्यार्थी ! माझ्या विद्यार्थीदशेत महाविद्यालयाचे प्राचार्य होते, (कै.) डॉ. के. आर. सोनवणे आणि संस्थेचे चेअरमन होते (कै.) नानासाहेब एस. आर. चौधरी, एड्व्होकेट ! महाविद्यालयात त्यावेळी (कै.) पुरुषोत्तम नागेश उपाख्य पु. ना. ओक, (कै.) सेतुमाधवराव पगडी, क्रिकेटमहर्षी (कै.) दि. ब. देवधर, डॉ. गंगाधर पानतावणे, कवी आणि आकाशवाणी अधिकारी श्री. उत्तम कोळगावकर, अभिनेते श्री. अशोक सराफ वगैरे नामवंत व्यक्तींची व्याख्याने मला ऐकावयास मिळाली.
(कै.) पुरुषोत्तम नागेश उपाख्य पु. ना. ओक यांनी माझ्या आठवणीप्रमाणे तीन दिवस व्याख्यान दिले होते. कोणत्या घटनांमध्ये ऐतिहासिकत्व कसे बघावे, त्यातून आजच्या काळातील आपण काय शिकावे, त्या घटनांचे आज काय महत्व आहे ? कोणत्याही घटनांचा आपण त्रयस्थ वृत्तीने, तत्कालीन परिस्थितीचा विचार करून, त्याची सत्यासत्यता कशी पडताळावी वगैरे ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी सांगितल्या होत्या. आम्हा विद्यार्थ्यांना हे देखील सांगितले होते की याचा उपयोग फक्त इतिहासाची आवड असणाऱ्यांनाच होणार नाही तर तुमच्या जीवनांत एखादी बाब खऱ्याखोट्याच्या कसोटीवर तपासावयाची असेल तर त्यासाठी हे मार्गदर्शक ठरू शकेल. इतिहास कसा पाहावा - आत्मसात करावा, त्यातून आपण काय घ्यावे, पाल्हाळीक - अनावश्यक बाबी कशा दुर्लक्षित कराव्यात, असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले होते. 'ताजमहाल नसून तेजोमहाल' हा त्यांचा विषयही त्यांनी तेथे 'स्लाईडस' सोबत मांडला होता. आम्हां विद्यार्थ्यांना तो आवडला आणि पटलाही होता. त्यांनी आम्हांस जरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो आम्ही इतिहासाचे विद्यार्थी नसल्याने फारसा मनावर घेतला नाही. मात्र त्यांनी सांगितलेले सत्यासत्य पारखून घेण्याचे मुद्दे हे खरंच कायमच लक्षांत रहाण्यासारखे आहेत. त्यामुळे आजच्या काही 'पोस्टवर' ज्यावेळी अशोभनीय, अर्वाच्य असा त्यांच्या संबंधाने मजकूर येतो त्यावेळी हा त्यांनीच सांगितलेल्या कसोटीवर उतरत नाही.
(कै.) सेतुमाधवराव पगडी यांच्यासारखा इतिहासाचे मुखोद्गत वर्णन करणारा, विविध भाषा जाणणारा मी प्रत्यक्ष अद्याप ऐकलेला नाही. त्यांचे आमच्या महाविद्यालयांत बहुधा तीन दिवस व्याख्यान होते, नक्की आठवत नाही.
तेथील 'समता' या नांवाने चालणारे भित्तीपत्रकाच्या संपादक मंडळांत मी होतो. त्यावेळी औरंगाबाद येथील साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांना यानिमित्ताने आम्ही बोलाविले होते, त्यांचे आमंत्रण स्विकारल्याचे स्वहस्ताक्षरांतील पत्र आले होते, त्यांचे अक्षर - अप्रतिम, वळणदार ! समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे गिरविलेले ! असो.
No comments:
Post a Comment