Monday, January 8, 2018

दोन्ही मुलींच्या लग्नाची व्यवस्था करून गेले --------------

दोन्ही मुलींच्या लग्नाची व्यवस्था करून गेले --------------

माणसाच्या आयुष्यात केव्हा काय होईल याचा नेम नाही, मग तुम्ही 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' वगैरे काव्यमय भाषेत बोला किंवा नका बोलू ! घरातील कुटुंबकर्त्याची जबाबदारी तर अजूनच जास्त असते म्हणूनच त्याने जबाबदारीने वागले पाहीजे. कुटुंबकर्ता कसाही वागला किंवा व्यवस्थीत वागूनही काही दुर्दैवी घटना घडली तर त्या बिचाऱ्या घरातील लक्ष्मीवर जो प्रसंग गुदरतो त्याचे तर वर्णन करता येत नाही. घरातील परिस्थिती जर संपन्न असेल, घरातील माणसे सुसंस्कृत असतील, तिच्या पतीने काहीतरी बेगमी तिच्यासाठी करून ठेवली असेल तर ठीक; अन्यथा तिची परिस्थिती म्हणजे आपले सर्वस्व गेले, हे जे म्हटले जाते ते खरेच ठरते. बिचारी छोटीछोटी लेकरे, त्यांना तर काय झाले आहे हे नेमके समजत देखील नाही. त्यांना एवढेच समजते की आपल्याला एक माणूस जो नेहमी दिसायचा, आपले कोडकौतुक करायचा, फिरायला घेऊन जायचा, कड्यावर उचलून घ्यायचा, पटापट मुके घ्यायचा तो आता दिसत नाही. ते बालमन काय विचार करत असेल हे तरी आपल्याला काय समजणार ? मुलं जर थोडी मोठी असतील तर त्यांना थोडे समजते की आपले 'बाबा' आता दिसत नाही. विचारतात बिचारे आपल्या आईला, 'बाबा कोठे गेले ? बाहेर कोठे गेले ? येत का नाही घरी ? केव्हा येतील ? मला खाऊ आणतील काय ?' ती माउली बिचारी यांवर काय उत्तर देणार ? तिला तर बिचारीला बऱ्याच वेळा रडण्याची पण चोरी असते. काही काळानंतर तिची रवानगी तर बहुतेक तिच्या माहेरीच होते आणि ती देखील बिचारी आपल्या मुलांची होणारी सततची हेंडसाळ पाहू शकत नाही आणि एका दिवशी ती माहेरी येते ती कायमचीच !

रस्त्यावर होणारे सततचे अपघात, त्यांत आपला जीव गमविणारे किंवा अपंग होऊन आयुष्यभर जीवन कंठणारे दुर्दैवी जीव आणि त्यामुळे उघड्यावर पडलेले, संकटांत सापडलेले त्याचे कुटुंब ! अशीच एक घटना सन २००१ मधील ! हा आणि त्याचा मित्र मोटारसायकवर राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. वेळ रात्रीची, ११ - १२ दरम्यानची होती. महामार्ग असल्याने वाहतूक होती पण महामार्ग असल्याने गावांत असणारे दिवे रस्त्यावर नव्हते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा जो काही तेवढ्यापुरता प्रकाश रस्त्यावर पडत असेल तोच, अन्यथा अंधार ! त्याला रस्ता केंव्हा संपेल असे होऊन गेले होते. अधूनमधून येणाऱ्या रस्त्यातील गड्ड्यांची चालविणारा हा तम बाळगत नव्हता आणि त्यामुळे मोटारसायकल आपल्या गतीने जात होती. या विचारांत आणि धुंदीत रस्ता अगदी सरळ असल्याने त्याच्या मनात वेगळा विचार येण्याचे कारणच नव्हते. मनाच्या या अवस्थेने रस्त्यांत नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रककडे लक्ष द्यायला त्याला सुचले नाही कारण अंधारात तो ट्रक दिसतच नव्हता आणि मध्ये काही अडथळा असेल हा विचार नव्हता. वाहनाने त्याला गती असल्याने त्याचे काम केले आणि ती मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ट्रकचा आकार, मोटारसायकलचा वेग, त्याचा गाफीलपणा याचा एकत्रीत परिणाम काय तर जोरदार अपघात आणि त्याला झालेल्या जीवघेण्या जखमा ! त्यामुळे आलेल्या बेशुद्धीने त्याला कोणी दवाखान्यांत हलविले हे पण समजले नाही. त्याच्या एकंदरीत झालेल्या पहाता, दवाखान्यांत हलविणे हा केवळ उपचार होता. त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याने औषधोपचार सुरु असतानांच आपला प्राण सोडला. पोलीसांकडे तक्रार, गुन्हा नोंदणी, पंचनामे, उत्तरतपासणी वगैरे सर्व सोपस्कार पार पडले. त्याचा एकाच निष्कर्ष निघाला की त्याची पत्नी वयाच्या पंचविशीतच विधवा झाली आणि त्यांच्या दोन्ही छोट्याछोट्या शाळेत जाणाऱ्या मुली उघड्यावर पडल्या. त्यांच्या स्वप्नातील रंग उडाले. आता फक्त काळीकुट्ट स्वप्ने आणि पांढरेफटक कपाळ घेऊन आयुष्य काढायचे होते तिला ! यथावकाश लवकरच ती तिच्या माहेरी आली. धावपळ सुरु झाली ती मग तिच्या वडीलांची. 

याला त्याला भेटत, माहीती विचारत, वकिलांना भेटून मग कसेबसे समजले की त्या ट्रकवाल्याचे विरुद्ध नुकसानभरपाईचा दावा 'मोटार वाहन कायदा, १९८९' नुसार करता येईल. तिच्या वडीलांनी मग कागदपत्रे गोळा केली, वकिलांकडे दिली. सुदैवाने त्या ट्रकचा विमा उतरविलेला होता. नुकसान भरपाई कमी त्रासाने मिळण्याची शक्यता निर्माण झाली. वकिलांनी माहीती घेऊन न्यायालयांत नुकसानभरपाईसाठी ट्रकमालक आणि त्याची विमाकंपनी यांचे विरुद्ध दावा दाखल केला. विरुद्ध बाजूला नोटीस लागणे, ते सर्व न्यायालयांत हजर होणे, त्यांनी ही नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी लेखी म्हणणे देऊन नाकारणे, शेवटी साक्षीदारांचे जाबजबाब होऊन निकालासाठी ठेवणे, यांत नऊ वर्षे गेली. निकालाचा दिवस आला. आपले माणूस तर आता परत मिळणार नाही पण निदान पोटापाण्याची आयुष्यभर जरी नाही तरी निदान पोरं मोठं होईपावेतो सोया झाली तरी खूप या मोठ्या आशेने तिचे वडील आणि ती, हे न्यायालयांत आले. पुकारा झाला, ते न्यायाधीशांसमोर उभे राहीले. 'बाई तुमचा नुकसानभरपाईचा अर्ज रद्द केला आहे. तिला काय बोलले हे समजलेच नाही. दुसऱ्या कामाचा पुकारा झाला अन हे बाहेर आले. त्यांच्या वकीलांनी सांगीतले, 'आपल्याला वरच्या कोर्टांत जावे लागेल. काळजी करू नका. ' तिच्या डोळ्यासमोर घरी परत येतांना अंधार होता. नवरा गेल्यावर, काही पैसे मिळतील या आशेवर दहा वर्षे गेली, आता अजून किती वर्षे थांबायचे अजून ? मुली मोट्या होताहेत, त्यांची शिक्षणे, त्यांची पुढची लग्नकार्ये ! तिला रडूच कोसळले ! बाप समजावीत होता, 'रडू नको मार्ग निघेल !' भारतीय सेनेमधील असलेल्या आणि शत्रूपुढे न डगमगणारा बाप मुलीच्या या दुःखापुढे हतबल झाला. 
   
निकालाच्या नकला काढणे, पुन्हा वरच्या न्यायालयाचा म्हणजे 'उच्च न्यायालयाचा' दरवाजा ठोठावणे आले. शेवटी हा निकाल मान्य नाही म्हणून उच्चन्यायालयांत अपील दाखल केले. अपिलाचे काम सुरु झाले. युक्तिवादाचे वेळी विमा कंपनीचे बाजूने खालच्या न्यायालयाचा निकाल असल्याने, त्यांना सोपे काम होते. खालच्या न्यायालयाचा निकाल बरोबर आहे, त्यांत काही बदल करण्याची आवश्यकता नाही, हे गृहीत होते. चिकीचे काय झाले हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही अपील करणाऱ्यावर होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी खालील कामकाजाची सर्व कागदपत्रे बघीतली. त्यांना त्यांत काही गैर वाटेना. चुकीचे काही आढळले नाही तर येथेपण निराशाच पदरी पडणार असे बिचारीच्या वडिलांना वाटू लागले. शेवटी पंचनाम्याचे कागद बारकाईने दाखविल्यावर, थोडा उलगडा होऊ लागला. रस्त्यात ट्रक थांबला होता ती जागा, महामार्गाची रुंदी, त्याचा डांबरी भाग, इतर वाहतुकीसाठी उरलेला रस्ता आणि त्या ट्रकवाल्याने न दाखविलेला 'सिग्नल' अथवा 'अडथळ्याची खूण' वगैरे बारकाईने दाखविल्यावर हेच सांगीतले की इतर वाहन कोठूनही आले असते तरी हा ट्रक असा मधोमध उभा होता की कोणत्याही बाजूने या अपघात हा होणारच होता. ही त्यांची, ट्रकवाल्याची कृती म्हणजे निष्काळजीपणा होय. त्या कारणासाठी म्हणून ट्रक मालक आणि त्याची विमा कंपनी वैयक्तिकपणे आणि संयुक्तपणे जबाबदार अर्जदाराच्या या अपघातामुळे झालेल्या नुकसानभरपाईस जबाबदार राहील. न्यायालयाने हे म्हणणे स्विकारले आणि मान्य केले. तिच्या पतीच्या घटनेच्या उत्पन्नाप्रमाणे, त्याचे मृत्यूसमयी असलेले वय, त्याच्यावर घरातील अवलंबून असलेली माणसे, पत्नीच्या आयुष्याचे आणि मुलांच्या भविष्याची जी धूळधाण झाली त्याची काही अंशाने का होईना पण पैशाच्या रूपात काय भरपाई करता येईल हा विचार झाला. तिचा पती जर जगला असता तर भविष्यातील महागाई आणि त्यानुसार त्याचे वाढणारे उत्पन्न यांचा मेळ घालून भविष्यांत त्याला किती उत्पन्न कमवता आले असते हे विचारात घेतले आणि नुकसानभरपाई देण्याचा आदेश ट्रकमलक आणि विमाकंपनी यांचे विरुद्ध दिला. तिच्या बिचारीच्या आयुष्याची बऱ्यापैकी बेगमी झाली. 

एके दिवशी तिचे वडील आले. हातावर पेढा ठेवला आणि 'साहेब, त्या पोरींचे वडील तर गेले पण त्यांच्या दोन्ही पोरींच्या लग्नाची बेगमी करून गेले. माझ्या मोठया नातीचे लग्न ठरविले आहे. आता हे पैसे कामास येतील. माझा पोरीला मी आहे तोवर सांभाळील त्यानंतर तिच्या मुली-जावयांनी सांभाळावे हीच परमेश्वराजवळ प्रार्थना ! 

समाजातील अनपेक्षित येणाऱ्या संकटांना तोंड देता यावे म्हणून समाजघटकांच्या हिताचे विविध कायदे शासनाने केले आहेत. गांजलेल्या, पिडलेल्या लोकांना विविध कायद्यानुसार काही मदत नेहमीच केली जाते. आपण रस्ता चालत रहावयास हवे, थांबायचे नाही.       

(संक्षीप्त रूपात 'दैनिक लोकमत जळगांव यांत दिनांक ३१. १२. २०१७ आणि ७. १. २०१८ रोजी प्रसिद्ध)

http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_JLLK_20171231_8_3&arted=Jalgaon%20Main&width=500px

http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/2018-01-07/6#Article/LOK_JLLK_20180107_6_3/123px


No comments:

Post a Comment