Thursday, January 4, 2018

रात्रीचा पहारा !

रात्रीचा पहारा !


एक गंमत आम्हाला आमच्या लहानपणी, अधूनमधून अनुभवायला मिळायची. ती म्हणजे गल्लीत होणारा गल्लीतील मंडळींनीच केलेला रात्रीचा पहारा !
उन्हाळा सरतीच्या दिवसांत किंवा उन्हाळा जरा लांबल्याने, पाऊस अपेक्षेप्रमाणे वेळेवर किंवा लवकर आला नाही, की वडिलधारी मंडळी म्हणायची, ‘हा उन्हाळा लांबतोय, पावसाचा पत्ता नाही. लोकांना कामधाम नाही. चोऱ्या सुरू व्हायला नको म्हणजे झालं !’ त्यांच्या तोंडातून अनुभवाचे भविष्य बोलायचे अन् खरोखर बऱ्याच वेळा तसेच घडायचे. गांवात चोऱ्या सुरू व्हायच्या.
त्यावेळी गांवात पोलीसांची संख्या ती किती असायची, फारच थोडी ! आता पण तुलनेने काही विशेष फरक पडलेला नाही. मात्र त्यावेळी असे काही गांवात चोऱ्यामाऱ्यांचे प्रकार सुरू झाले, की तक्रारी वगैरे होत असतील, पण तरी त्यावेळी आम्हा त्यावेळच्या गांवकऱ्यांचा, पोलीसांपेक्षा स्वत:वरच जास्त भरवसा ! पण गावकऱ्यांचा स्वत:वर विश्वास असलेने खरोखर हे प्रकार कमी व्हायचे, ताबडतोब ! फार झालं तरच पोलीस स्टेशन ! हल्ली उठता बसतां पोलीस स्टेशन ! खरं असो का खोटं ते ठरविणार पोलीस ! त्यामुळं ताण इतका वाढलाय की याकडे सर्वसामान्यांची बघण्याची दृष्टी बदलली.
त्यावेळी या गल्लीतील मंडळी रात्री पहाऱ्याच्या निमीत्ताने दुसऱ्या गल्लीतील मंडळींना भेटायची. गप्पा व्हायच्या, मग त्या गप्पांना ना आदि ना अंत, ना शेंडा ना बुडखा ! सुदैवाने त्यावेळी जर कोणाच्यातरी घरी जाग असेल, तर या सर्वांना मध्यरात्री चहा पण मिळायचा. त्या अंधारात चहात किती दूध आहे, चहात साखर आहे का गूळ आहे, चहाची पावडर कोणती आहे आणि चहा आणलेले कप कसे आहे, याकडे कोणाचे लक्ष पण नसायचे. पण यामुळे एक व्हायचे, गांवातील एकी, मैत्री आपोआप दृढ व्हायची. या निमित्ताने किरकोळ विसंवादी सूर विसंवादी रहायचे नाही.
त्यामुळे ही एक आम्हा बालगोपाळ मंडळींसाठी ‘गंमत’ असायची. वडील, काका, शेजारचे काका रात्री पहाऱ्याला जायचे. सकाळी केव्हातरी चार-पाच दरम्यान ते यायचे, आम्ही तर झोपलेले असायचो. दुसऱ्या दिवशी मग घराच्या ओट्यावर जेवणखाण, भांडीकुडी आटोपल्यावर जी महिला मंडळींची बैठक व्हायची, त्यात रोज नवी बातमी असे. ‘आज रात्री काय तर या भागातून पळाले, आठ-दहा होते.’ दुसऱ्या दिवशी ‘आज तर तोंडाला फडके बांधल्याचे बघीतले.’ वेगवेगळ्या गप्पा आम्हाला रोज शाळा सुटल्यावर ओट्यावर ऐकायला मिळायच्या.
ज्यांच्या गल्लीत कुत्र्यांची संख्या जास्त तिथे तर भलताच कालवा ठरलेला ! उन्हाळयात गांवात बहुतेक जण बाहेरच झोपत. घरासमोर ज्यांचे ओटे प्रशस्त ते ओट्यावर झोपत. प्रत्येकाने आपल्याच घराच्या ओट्यावर झोपले पाहिजे असे नाही, जिथे जागा रिकामी असेल तिथं गोधडी टाकून झोपायचे हे सर्वांना माहीत ! काही तर सरळ खाटा टाकून रस्त्यातच झोपत, खाटा पुरल्या नाहीत तर मोकळ्या जागेतही झोपणारी मंडळी होती. त्यात कोणाला लाज वाटत नसे अथवा भिती पण वाटत नसे. रात्र ही विश्रांतीसाठी असते, जिथे जागा मिळेल तिथे पथारी टाकायची, हा पक्का समज ! ‘भुकेला कोंडा अन् निजेला धोंडा’ ही म्हण प्रत्यक्षात आम्ही अशी बघीतलेली आहे. अशा ठिकाणी जर मग काही कालवा झाला तर मग विचारू नका. घरातील व पहाऱ्यांच्या माणसांचे चढलेले आवाज, घरातील बायामंडळी जागी होऊन बाहेर आल्याने त्यांच्या हलक्या आवाजात संवाद आणि कुत्र्यांचा कालवा !
ही गंमत, एक प्रकारचा थरार असलेली, रोज गांवात कोणत्या तरी भागांत घडतच असे ! मग जिथे असे काही घडलेले असे, त्यांचा मान जास्त; कारण त्यांच्याकडे असलेली बातमी जास्त खमंग असे ! तसे पाहीले तर प्रत्येकाकडेच काही ना काही सांगण्यासारखे असेच ! पण यांच्या घटनेचा त्या दिवशी पहिला मान ! मग तो प्रत्यक्ष घडलेले, ऐकलेले आणि घडावे असे वाटलेले यांचे एकत्रित मिश्रण करून पण सांगायचा. ते प्रत्येकालाच ऐकण्याची उत्सुकता व गोडी, आज काय झाले याची !
दुसरा एक प्रकार म्हणजे थंडीच्या काळात ! दसऱ्यानंतर थोडी थंडी पडायला सुरूवात व्हायची. शेतकऱ्यांचा पीकांचा सर्व हंगाम शेतात असायचा, तो थेट कपाशी पूर्ण घरी येई पावेतो. खरं तसं जर पाहिलं, तर मग ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, त्यापैकी गहू, हरबरा अन् थोडी मोहरी पेरणारे पण कमी नव्हते. त्यांचा हंगाम यायचा निदान होळीच्या मागेपुढे ! या काळात या सर्व मंडळींचा शेतात हंगाम उभा आणि शेतात राखणीला गेलं नाही, तर मग शेतात चोऱ्या होणार ! शेतकऱ्याची वर्षभराची, हंगामभराची मेहनत, एका क्षणात दुसरा लुटून घेवून जाणार; आपल्या हाती रिकामी जमीन रहाणार ! त्यामुळे भर थंडीतही शेतात राखोळीला जावेच लागे, मजूरीवर रखवालदार ठेवला तरी ! ‘कुंपणच शेत खाते, तळे राखील तो पाणी चाखील’ अशा कित्येक म्हणी या ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ हीच म्हण खरी असल्याचे सिद्ध करतात. शेतातली चोरी म्हणजे त्याचवेळी सापडली तरच नंतर माल मिळायचा, चोरट्याला धडा शिकवून; नाही तर मग काही खरं नाही.
चोरी करणे हा पूर्वीपासूनच कौशल्याचा भाग मानला गेला आहे, एवढेच नाही तर तिला ‘चौर्यकर्म’ म्हणून आपण वर्गवारी केलेल्या ‘चौदा विद्या व चौसष्ठ कला’ यांत देखील स्थान दिले आहे. अलिकडे या कलेत बरीच मंडळी पारंगत झाल्याने त्यांना क्षेत्र कमी पडू लागले. त्यामुळे फक्त शेतीतच नाही तर जिथं कुठं याला वाव दिसेल अशी विविध क्षेत्र शोधण्याचे काम सातत्याने सुरू असते. या कष्टाला फळ येणारच ! आता तर इतकी क्षेत्रं शोधलेली आहेत आणि हे कौशल्य इतक्या क्षेत्रांत पसरलेलं आहे की असे अपवाद म्हणूनही कोणते क्षेत्र शिल्लक नसेल की जिथं चोरी झाली नाही किंवा ज्या क्षेत्रांत आपल्या ‘चौर्यकर्माचे कौशल्य’ दाखवणारी मंडळी नाहीत. असो. आपण प्रगतीपथावर आहोत.
थोडक्यात पण मग थंडीचे दिवस आले की हाच प्रकार ! नंतरच्या काळात वयोमानाने ही मंडळी रात्रीच्या पहाऱ्यासाठी म्हातारी झाली आणि आमच्यासारखी तरूण मंडळी त्यांची जागा घ्यायला आली.
वीसबावीस वर्षांपूर्वी हाच प्रकार झाला. आमच्या कॉलनीत ही बातमी पसरली. बाहेरून गॅंग आलीय, चोऱ्या वाढल्याय ! आमच्या कॉलनीत तर सुटीसुटी पण निदान शंभर तरी घरं होती, पण ही कॉलनी गावाबाहेर, अगदी भर रस्त्याला लागून ! रस्त्याला घर लागून असले की जसे ‘सर्वांचे लक्ष असते त्यामुळे सहसा चोऱ्यामाऱ्या कमी होतात. कोणी पाहील, ही भिती असते.’ हा फायदा तसेच ‘सर्व काम आटोपून, चोरट्याला लगेच पसार होता येते’ हा तोटा ! कॉलनीसाठी वॉचमन ठेवायचा का नाही ? यांवर चर्चा झाली. ‘काही गरज नाही. भर रस्त्यावर आपली घरं आहेत. कोण येतोय मरायला ? त्या गावातल्या गुरख्यालाच देवू दहा रूपये वाढवून, झाले ! तो चांगला लक्ष देईल मग !’ एकाने आपले सडेतोड मत व्यक्त केले. जणू गुरखा दहा रूपये कमी मिळत असल्याने, काम नीट करत नव्हता किंवा गुरख्याला दहा रूपये जास्तीचे मिळावे, म्हणून चौर्यकर्म करणाऱ्यांनी आपले कौशल्य दाखवायला सुरूवात केली होती. पण हे असे अनुभव सर्व ठिकाणी येतात, कारण प्रत्येक ठिकाणी या विचाराची मंडळी असते. बरीच भवती न भवती होऊन कॉलनीसाठी शेवटी वॉचमन नेमायचा ठरला ! त्याचे पैसे ठरले.
हा वॉचमन मग कामावर येवू लागला. रात्री साधारणत: नऊ साडेनऊच्या दरम्यान त्याचे शिट्यांचे आवाज यायचे. ते येत असल्याने आम्ही निर्धास्त होतो. जेवणखाण आटोपून दहा-साडेदहाला झोपायचे, तर पहाटे पांचच्या दरम्यान उठायचे हा माझा नेम ! त्यामुळे हा वॉचमन रात्रभर जागतो का नाही, याची मला कल्पना नव्हती. तरी वॉचमन पण बरोबर काम करतो की नाही, यांवर बारीक वॉच ठेवणारी मंडळी आमच्यात देखील होती. ही अशी मंडळी प्रत्येक ठिकाणी असतात, त्यामुळेच सर्वत्र बरं चाललंय ! ‘रात्री मोठ्या मुश्कीलीने बारा-एक पर्यंत असतो, मग काही त्याचा आवाज येत नाही. नेहमीच्याच गुरख्याचा आवाज येतो.’ ही त्यांनी दिलेली माहीती आम्हाला नवीन होती. आता यांवर काय करणार ? ‘त्यांनी त्यांच्या ड्युट्या वाटून घेतल्या असतील. तुम्हाला काय समजणार ?’ यांची विचारशक्ती अफलातून होती. ‘मग करणार काय ? वॉचमनला काढून टाकायचे का ?’ मी विचारले. ‘ते तर अजिबात नाही करायचे. तसे केले तर मग विचारायलाच नको, कारण मग हेच त्यांना आपली घरं दाखवतात xx करायला. कुठला रखवालदार सुटला ही माहीती ताबडतोब xxx कळते.’ ते निराशेने व भितीने बोलले. फुल्यांच्या जागचा शब्द बोलायला पण ते घाबरत होते. ‘मग काय करणार ? वॉचमनला काढायचे नाही, कारण तो आपली घरं दाखवेल चोरांना आणि तो काम पण करत नाही. मग नुसता पगार द्यायचा का मग ?’ मी त्राग्याने बोललो. ‘रात्रीच्या वेळी हे असे शब्द बोलायचे नसतात. भिंतीला कान असतात. काही करता, काही भलतंच व्हायचं ! तुम्ही पोरं तुम्हाला काय समजतं ?’ त्यांचा सूज्ञ सल्ला. ‘मग तुम्ही सांगा !’ आमच्यापैकी एकाने त्यांनाच मोठेपणा दिला. ‘सर्वात पहिले हे ठरवा की वॉचमनला अजिबात काढायचे नाही. त्याची फक्त वेळ बदलवायची.’ त्यांनी सांगीतले.
त्यांचे दोन्ही उपाय मनोमन पटलेलेच होते, अगदी सर्वांनाच ! कारण हा वॉचमन रात्रीचा तुलनेने लवकर येत असलेने, ज्यांची लहान मुले होती आणि ती चौकस होती, ती प्रश्न विचारून भंडावून सोडत की ‘बाबा, शिट्या कोण वाजवतोय ? का वाजवतोय ? मला पण आणून द्या शिटी, मला आवडते ती.’ यांची उत्तरे देतादेता आणि बालमानसशास्त्रानुरूप वागता वागता डोकं पकण्याची वेळ आली होती. पण त्या आठवड्यात एक लक्षात आले की कॉलनीतील जवळपास सर्व लहान मुलांजवळ शिट्या दिसायल्या लागल्या होत्या. दिवसभर घरात व कॉलनीत यांच्या शिट्यांची ‘फुर्रऽऽऽऽ फुर्रऽऽऽऽ’ आणि रात्र झाली की वॉचमनची ‘फुर्रऽऽऽऽऽ’ ! सर्वजण त्रस्त झाले होते. वॉचमनला कामावरून काढून, आपले घर चोरांना दाखवले जावे, हा धोका पण कोणाला पत्करायचा नव्हताच.
मग सर्वानुमते ठरले, की आपणच रात्रपाळी करून पहारा देत जावू. याची कल्पना त्या वॉचमनला देवू. त्याला पण बरे वाटेल व त्याच्यावर वचक राहील. प्रत्येक घरातून निदान एक-दोन जण घ्यायचे. आपली शंभर घरं आहेत, निदान शंभर जण तरी निघतील, याची यादी करा. सर्वांचे मग दहा-दहाचे गट करायचे, म्हणजे घरातील प्रत्येकाला दहा-अकरा दिवसांनी ड्यूटी करावी लागेल, कोणावर ताण पडणार नाही. जर कोणी काही कामामुळे रात्रपाळीला येणार नसेल, तर त्याने अगोदर कल्पना आपल्या गटात द्यायची; म्हणजे दुसऱ्या दिवशी जो असेल, त्याला घेता येईल आणि हा मग जो त्याच्या जागेवर गेला त्याच्या रात्रपाळीच्या दिवशी जाईल. सर्वांना सोबत शस्त्र ठेवायला सांगीतली. जाडजूड काठी प्रत्येकाजवळ हवी. त्याला खाली लोखंडी रिंग बसवून घ्यायला सांगीतले कारण काठीला मजबुती येते. मग राखण फिरस्ती ही रात्री अकरा वाजेपासून ते साधारणत: चार-साडेचारपर्यंत करा. रस्त्यावर वाहतूक चांगली सुरू झाली की घरी जायला मोकळे.
आम्ही रहात असलेला भाग शेताचाच व गांवाबाहेरील असल्याने जनजनावर नेहमीच तिकडे हमखास असायचेच. घरांना लागूनच बागायतीचा भाग असल्याने थंडी जास्तच जाणवायची, जंगलातील जनावरांचा पण काही वेळा वावर असायचा. त्यांच्या घरावर आक्रमण केल्यावर ते काय करणार ? तसे पाहिले तर आमचे गांव हे सातपुड्याच्या कुशीतीलच !
आमची रात्रपाळी सुरू झाली. रात्री अकराच्या बातम्या संपल्या की सर्व जण थंडीचा व्यवस्थित बंदोबस्त करून बाहेर पडायचे. कॉलनी तशी खूप मोठी नसल्याने सर्व कॉलनी पार करायला, अगदी रमतगमत पण, पंधरा मिनीटे लागायची. सर्वांच्या घरांवरून जायला पाहीजे, हे ठरवल्यावर मग अर्धा-पाऊण तास लागू लागला. गप्पा करत जायचे, पण थंडीत काय गप्पा मारणार आणि रोज नवीन विषय तरी काय आणणार ?
पहिल्या दिवशी रात्री दीड-दोनच्या दरम्यान नेहमीचा गुरखा आला, त्याची शिटी लांबून ऐकू यायची. जवळ आल्यावर त्यांने आम्हाला सर्वांना पाहिल्यावर तो चकीत झाला. ‘साब, क्या हुआ । आज आप सब लोग ?’ त्याने विचारल्यावर त्याला ही हकीकत सांगीतली. हे सर्व आपल्यातलेच झाले म्हटल्यावर मग त्याला पण बरे वाटले. त्याने मग त्याच्या कामातल्या एकेक खुब्या सांगीतल्या. शिटी का मारायची ? किती वेळाने मारायची ? तिचे किती प्रकार, त्या प्रत्येक शिटीचा अर्थ ! एकमेकांना आम्ही लांबून निरोप कसे पोहोचवतो, कोणत्या भाषेत ! सर्व गांवाची राखण कशी करावी लागते ? किती लोक लागतात ? सध्या किती आहे ? एक भाग किती वेळात होतो ? या भागातील निरोप शेवटपर्यंत कसा पोहचविला जातो. एकच गुरखा एकाच भागांत नसतो, तो पण त्याचे भाग बदलवतो, जरी पैसे देणारी त्याची घरे बदलविली नाही तरी ! त्याला शिटी कुठे आहे हे विचारल्यावर त्याने ‘हम अलग मेटलवाली शिटी नहीं रखते । हम अपने मुँहसे बजाते ।’ आणि त्याने वाजवून दाखवली. आजपासून तुम्ही म्हणजे गांववाले राखण करताहेत हे कळवतो इतरांना म्हणजे तिकडून असा निरोप येईल. त्याने निरोप देण्याची व उत्तर येण्याची, अशा दोन्ही शिट्या हळू वाजवून दाखवल्या; मग जोरात वाजवून दाखवल्या ! खरोखर तिकडून उत्तर आले. पुन्हा शिटी आली. याचा अर्थ विचारल्यावर ‘हे इतरांना कळवतो. आपल्याला बरे झाले.’ हा अर्थ असल्याचे सांगीतले. गुरख्याच्या शिटीच इतके अर्थ असतात हे मला त्या दिवशी प्रथमच समजले. आपण शिटीचे निष्कारणच वेडेवाकडे अर्थ काढतो.
कुठला नेपाळ आणि तेथून कोणीही बोलावलेले नसतांना, ही मंडळी येतात प्रत्येक गांवात. स्वत:हून राखणदारीचे काम सुरू करतात, घरप्रत पंचवीस-तीस रूपये घेवून आपला विनातक्रार उदरनिर्वाह करतात. कसली ग्रॅच्युईटी, कसला प्रॉव्हीडंट फंड, कसली कंटीन्युईटी ऑफ सर्व्हीस, कसले रिटायरमेंट बेनिफिटस्, कसले पेन्शन ? यांना यांत काय मिळत असावे की हे पिढ्यानपिढ्या यांतच आहे ? प्रामाणिकपणे सतत काम करत राहीले की तुम्ही याच कामासाठी ओळखले जाणार, एवढे निश्चित ! यांचे या कामात इतके नांव झाले, विश्वासार्हता आहे की ‘राखणदार नेमला’ या ऐवजी ‘गुरखा’ नेमला हे आपण म्हणू लागलो.
रात्री दीडदोनला असेच फिरत असतांना, बातमी समजली की आठदहा जणांची टोळी अजंद्याहून निघून विवऱ्याकडे गेली आहे. तीनचा सुमार असावा, तेवढ्यात कोणीतरी शहाणा गाडीवाला बुरहानपुरहून आला, गाडीत मुलंबाळं आणि स्त्रियां होत्या; अन् त्याला जळगांवकडे जायचे होते. त्यात रस्त्याबद्दल त्याला खात्री नव्हती. त्याने आम्ही सर्व उभे होतो, रेस्टहाऊसपाशी; आम्हाला ‘कोण म्हणून’ विचारले. आम्ही कॉलनीवाले म्हणून सांगून रस्ता सांगीतला, अन् आठवणीने सांगीतले, ‘रस्त्यात कोणी हात दाखवला तरी अजिबात थांबू नका. सरळ जावू द्या.’ त्याने भराभर मुंडी हलवली आणि जोरात गाडी सोडली. पाचपन्नास फूट गेला असेल, तो थांबला. गाडी वळवली, पुन्हा आमच्याकडे आला, गाडीतल्या स्त्रियांनीच आमचे आभार मानले, ‘आप जैसे मिल गये, अच्छा हो गया । इनको क्या समजता ?’ रात्री अपरात्री यांना काही समजत नाही, हे आत्मविश्वासाने सांगणारी स्त्री दुसरी कोण असणार ? आमचे आभार मानून त्यांनी गाडी सुसाट गांवात घातली.
या गडबडीत आमचे सकाळचे फिरणे थोडे विस्कळीत झाले होते. वडीलधाऱ्या मंडळींचा सकाळी मैल दोन मैल फिरण्याचा दिनक्रम मात्र नियमीत सुरू होता. आम्ही अधूनमधून जायचो, रात्रपाळीची रखवाळी सांभाळत. असे साधारणपणे चारपाच आठवडे गेले असतील. सकाळी असाच फिरायल्या गेल्यानंतर घरी परत आलो तर काय ? ओट्यावर ही सर्व वडीलधारी मंडळी वर्तमानपत्र घेऊन बसली होती. मी आल्याबरोबर, ‘हे रात्रभर गस्त घालत फिरणे काय खरं आहे काय ? पेपरमधे काय आलंय, वाचलं का ?’ विचारले. मी म्हटलं, ‘काय ? मला कल्पना नाही.’ यांवर त्यांनी वर्तमानपत्र हातात दिले, अन् ‘वाचा, काय रात्रीचं फिरणे म्हणजे जीवावर उदार होणं झालंय !’ म्हणाले. मी वर्तमानपत्र पुढूनमागून बघीतले. रोजच्याच बातम्या ! विशेष काही नाही. ‘शेवटच्या पानाच्या आदल्या पानावर खाली कोपऱ्यात वाचा.’ हे बोलल्यावर बघीतले. तर ‘स्टेशनरोड अजंदा उटखेडा भागांत वाघाच्या पायाचे ठसे दिसल्याचे वार्ताहर सांगतो.’ अशी बातमी तपशीलवार छापली होती, ती वाचली. ‘हं, इकडे वाघ फिरतोय आणि त्याच्या बरोबरीने सोबत काय आपण फिरणार ? हे म्हणजे ‘असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’ झालं.’ अशी प्रतिक्रिया नोंदविली. ‘मग रात्रीची गस्त ?’ मी म्हणालो ! ‘ते रात्री पाहू,’ त्यांचे तात्काळ उत्तर !
रात्री सर्वांची बैठक नेहमीप्रमाणे झाली. ही बातमी तर जोरात चर्चेत होती. पहातापहाता एकदीड वाजला. नेहमीचा गुरखा आला. आम्ही सर्व एका ठिकाणी बसलेले असू हे त्याला अपेक्षित होतेच. त्याला ही बातमी सांगीतल्यावर आश्चर्य वाटले नाही. ‘ये तीन दिनसे मालूम था मुझे । कुछ जंगलका माहोल बदल गया था ।बादमें आया पेपरमें । अभी रात जादा घुमनेंकी जरूरत नहीं । एक जगह बैठकर शिटी मारते रहना, पंधराबीस मिनीट बाद आगे जाना । खेतींमे चोरी तो छोड दो अभी । जब शेरोंवाली मॉं ख़ुद रक्षा करने लिए बाहर पड़ी हैं तो ऐसे थोड़ी जायेगी, और किसकी हिंमत हैं की उनके सामने कोई चोरी करें।’ हे त्याचे बोलणे ऐकल्यावर आम्हाला त्या मध्यरात्री पण हसू आले. आणि खरोखरच —— नंतर शेतातल्या चोऱ्यांच्या बातम्या ऐकू येईनाशा झाल्या. आमची गस्त पण अधूनमधून झाली.
‘जब शेरोंवाली मॉं ख़ुद रक्षा करने लिए बाहर पड़ी हैं तो किसकी हिंमत हैं की उनके सामने कोई चोरी करें।’

No comments:

Post a Comment