Saturday, July 7, 2018

पाहुणे आणि पाहुणे संस्कृती

पाहुणे आणि पाहुणे संस्कृती

हल्ली कोणाच्याही घरी, पूर्वी जसे येत, तसे पाहुणे येणं तुलनेने कमी झालं आहे. बऱ्यापैकी मुक्काम ठोकणाऱ्या आणि ‘दे माय धरणी ठाय’ या चौथीत शिकलेल्या म्हणीचे प्रात्यक्षिके करून दाखविणाऱ्या पाहुण्यांची संख्या पण आता पार रोडावलीय, फारच कमी झालीय ! समजत नाही हो, इकडे लोकसंख्या वाढतेय म्हणताय आणि तरी पाहुण्यांची संख्या रोडावलीय ! वाढायला पाहीजे ना, खरं तर ! वास्तविक माझं गणित लहानपणापासून चांगले असल्यावर पण, मला काही घटनांमागची गणितंच काही वेळा समजत नाही. कदाचित आपलं जसं वय वाढतं आहे, तसं गणित समजण्याच्या ठिकाणच्या मेंदूतील सुरकुत्या कमी होत असतील, असे पण असेल. इकडे म्हटलं जातं की बेरोजगारी प्रचंड वाढतेय, पण शेतीला काम करायला मजूरसुद्धा मिळत नाही, अशी बरीच उदाहरणे आहेत. थोडक्यात आपल्याला ज्या कामाला माणूस हवा आहे, ते काम सोडून सर्व कामाला माणसं उपलब्ध असतात.

आता अलिकडे पाहुण्यांचे कमी झालेलं प्रमाण, हे पाहुण्यांना ते पाहुणे म्हणून गेलेल्या ठिकाणी, आलेल्या विविध चमत्कारिक व मर्मभेदी अनुभवामुळे हे घडले, का आता पाहुण्यांनाच कोणाकडे जायला जास्त वेळ राहीलेला नाही, त्यामुळे झाले देव जाणे ! पाहुण्यांची संख्या कमी करण्यांत अलिकडच्या काळांत फारच पेव फुटलेल्या, या ट्रॅव्हल्स कंपन्यांचा पण बराच हातभार आहे. त्यांना पण या पाहुण्यांचा खिसा खाली करायचा असल्याने, मग सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी सहली काढायच्या आणि या पाहुण्यांना मोहात पाडायचे, नाही त्या ठिकाणी घेवून जायचे, हेच त्यांचे काम ! त्यांचे काम सध्या जोरात सुरू असल्याने आपल्या संभाव्य पाहुण्यांच्या खाली होणाऱ्या खिशाबरोबर, त्यांचा म्हणजे ट्रॅव्हल कंपन्यांचा खिसा मात्र तट्ट फुगत जातो. एका दृष्टीने ते बरंय, आपल्या सारख्याच्या जिवाला जरा शांतता लाभते. ‘पाहुणे आणि पाहुणे संस्कृती’ किती धोक्यात आलीय त्यामुळे !

मध्यंतरी अशी एकाने टूम काढली, की सर्वांनाच पाहुणे काही नकोसे झालेले नाही, तर काहींना ते हवेसे पण वाटतात. असं म्हणणारा हा, पूर्वीपासून विरोधी पक्षात असायचा म्हणून पण बोलत असेल, असं मला वाटलं. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. पूर्वीपासूनची विरोधी पक्षातील मंडळी, आता विरोधी राहीलेली नाही, तर सत्ताधारी झाली आहेत. पूर्वापारपासूनची सत्ताधारी आता विरोधी पक्षात गेली आहेत. अर्थात त्यांना पण इतके वर्षे सत्तेत असल्याने, आलेल्या प्रसंगावधानी शहाणपणामुळे, विरोध करणे योग्य नसते, याची कल्पना असतेच ! त्यानुसार तसे साक्षात्कार पण त्यांना होतात. याला पूरक वातावरण व संधी मोठ्या मनाने पूर्वापारची विरोधी आणि सध्याची सत्ताधारी निर्माण करून देतात.

पण तरी मला त्याचं म्हणणं समजेना की 'अजून पण बऱ्याच लोकांना पाहुणे यावेत असं वाटतं.'
‘हे कसं काय बुवा’, मला समजेना म्हणून मी विचारलेच.
‘साधी गोष्ट आहे, जिथं ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत, त्यांना पाहुणे म्हणून दुसरीकडे जायचं असते; तर जिथं या कंपन्या नाहीत, त्यांच्याकडे पाहुणे आलेत तरी त्यांची काही फारशी तक्रार नाही, असा निष्कर्ष काढता येतो.’ त्या निष्कर्षबहाद्दराचे उदाहरण ऐकून मी तर चाट पडलो. आमच्या गांवात ट्रॅव्हल कंपनी नव्हती, याचा असा पण निष्कर्ष निघू शकतो, ही मला कल्पना नव्हती. कोण कशावरून काय निष्कर्ष काढतील आणि कुठल्या घटनेचा काय निष्कर्ष निघेल काही सांगता येत नाही. शेवटी मी काही सूज्ञ समजले जात, त्यांना सुचवले व त्यांच्या वेंधळेपणाचा धोका स्पष्ट केला. त्याचा परिणाम आपल्या गांवात पाहुणे येणे फारच वाढले आहे, हे पण सांगीतले. इतकेच नाही तर ‘गांवातीलच मंडळींचे एकमेकांकडे पण फारच जाणंयेणं असतं, अगदी पाहुण्यांसारखं !’ हे पण निदर्शनास आणून दिलं, पण काही उपयोग नाही, अगदी ढिम्म ! खूप काकुळतीला येवून सांगीतलं, ‘निदान पुण्यामुंबई सारख्या गांवातील ट्रॅव्हल कंपनीची ‘फ्रॅंचाईशी’ तरी काढा’, पण यांवर माझ्याकडे प्रश्नार्थक व चमत्कारिक नजरेने पहाण्यापेक्षा त्यांनी काही केले नाही. ‘फ्रॅंचाईशी म्हणजे शाखा ! शाखा काढा’ माझ्या या कळवळून सांगीतलेल्या व हितकारक सल्ल्याचा पण काही परिणाम झाला नाही. शेवटी ही समस्या माझी मलाच बऱ्याच ‘ट्रॅव्हल एजन्स्या’ असलेल्या गांवी, माझे बस्तान हलवावे लागल्याने माझ्यापुरता सुटली. तरी इथं पण अपेक्षित आणि तसा म्हणण्याएवढा दर्जा नाही, जो इतर ठिकाणी आहे, कारण इथं पण पाहुणे येतातच ! यांवर माझे नम्र मत की माझ्या सौ. ला तर कोणाला पण आग्रहाने बोलावण्याची भयंकर आवड किंवा सवय ! तर तिचे आग्रही (मी दुराग्रही म्हणणार नाही) मत, की मी गांवचा कोणीही भेटला की त्याला बोलावतोच ! मला हे तिचे म्हणणं पटत नाही, पण कोण खरे किंवा कोणाचे बरोबर, हा येथील आजचा विषय अजिबात नाही. मी पण अलिकडे कमी धोके असलेल्या कामांकडे लक्ष देतो, डॉक्टरांच्या सल्ल्याने ! एकदा धोका पत्करलेला आहेच, तेवढा पुरे !

पाहुण्यांना वेगवेगळे धडे शिकवले जातात किंवा त्यांना काही वेळा प्राप्त परिस्थितीनुरूप शिकावे पण लागतात. भलतेच मार्मिक अनुभव असतात. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' किंवा 'प्रवृत्ती' म्हटलं तरी हरकत नाही. त्यांच्या कल्पनांचे परिणाम दूरगामी असतात. जसं कोणाकडे आलेल्या पाहुण्याला जर चांगले सफाचट करायचे असेल तर यजमान त्यांची ‘शेव्हींग क्रीम’ बेसीनच्या वरच्या आरशावर ठेवतात व टूथपेस्ट लपवून गुप्त जागी ठेवतात. हे सहज झाले असे दाखवून, जाणीवपूर्वक पण केले जाते किंवा काही वेळा सहज झाले असले तरी आपल्याला जाणीवपूर्वक वाटते. आपली भूमिका 'पाहुण्याची' का 'यजमानाची' यांवर ते अवलंबून असते. 'समोरच्याची डावी ती आपली उजवी' या नियमाप्रमाणे !

सकाळी लवकर उठायची सवय असेल, तर भल्या पहाटे पाहुणा उठला की तो बिचारा धडपडत शौचाला जावून येतो, अन् झटपट स्वत: जवळच्या टूथब्रशवर तेथील आरशा जवळच्या बेसीन वरील शेव्हींग क्रीम टूथपेस्ट समजून घेतो, आणि भरभर दात घासतो. त्याला आपल्या तोंडाला आलेल्या तेलकट भावनेचे व चवीचे कारण समजण्याच्या आंत, त्याच्या तोंडात चमत्कारिक चवीचा भरपूर फेस जमा झालेला असतो. कसातरी हा त्याच्या तोंडात जमलेला भरपूर फेस थुंकायचा प्रयत्न करतो, तर थुंकता थुंकता ‘आॅऽऽऽक्क’ करून भडभडून उलटी होते. आतडी ओढली जातात कारण अगोदरच पोट रिकामे झाले असते. या उलटीमुळे बिचाऱ्याच्या तोंडाची चव अजूनच जाते. याचे दडपण येऊन त्याला पुन्हा शौचाला जावे लागते. तेथे अस्वस्थपणे बसल्यावर पण, या तोंडाला आलेल्या विचित्र चवीमुळे त्याला सारख्या ओमाशा येत असतात. परिणामी या अडचणीच्या जागी आणि वेळी, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे आवाज येतात. पुन्हा कसेतरी हा धडपडत आटोपून बाहेर येतो. नंतर त्याला पाहुणचार म्हणून या अवस्थेत, हा सकाळी मिळालेला चहा प्यायल्यावर पण आपल्या तोंडाला पूर्वीची चव येत नाही आणि या चमत्कारिक चवीची आठवण जात नाही.

काहींना सकाळी शौचाला लवकर जावे लागते, या सवयीची माहिती यजमानांना असेल तर त्यांच्यापैकी कोणाला तरी नेमके त्याच दिवशी, सकाळी लवकर कुठेतरी जायचे असते. हा पाहुणा उठायच्या आंत त्याचा गजर वाजतो आणि तो संडासला जावून बसतो. त्या गजराने आणि याला सकाळच्या वेळी प्रातर्विधीच्या होणाऱ्या भावनेने जाग येतेच. संडासच्या आंत गेलेल्या घरातील माणसामुळे आंतून बंद असते. आंतला निवांत तर बाहेर याच्या जिवाची घालमेल ! आंत गेलेला दोन्ही ठिकाणचा आनंद घेत असतो. हा आंतून बाहेर तरी येईल की नाही का घराच्या बाहेर परस्पर पडण्याचे दुसरे दार संडासमधेच आहे, ही शंका यायला लागते. हे सर्व या बिचाऱ्या पाहुण्याला शेवटी असह्य होते. पण शेवटी तो पण पाहुणाच असतो, त्याला मार्ग तर काढावाच लागतो. मग स्वयंपाक घरांत काय पाडल्यावर बऱ्यापैकी आवाज होईल, हे लक्षात घेवून तसे करणे त्याला भाग पडते. धड्डाऽऽड खऽऽळ्ळ्ळऽऽऽ सऽऽट्टऽऽ असा काही तरी आवाज होतो. आणि लगेच दोन वेगवेगळ्या बंद दरवाज्यांच्या आंत जिवंतपणा येतो.

पहिले म्हणजे, संडासात तातडीने नळ सोडल्याचा आवाज होवून लगेचच दरवाजा उघडला जातो. दरवाजा उघडताक्षणीच, हा बिचारा घायकुतीला आलेला पाहुणा दरवाड्याआड जात दरवाजा बंद करून घेतो. मग निवांतपणे बसतो, बाहेर काय होते यांकडे कान देत.

दुसरा दरवाजा म्हणजे बेडरूमच्या दरवाजा ! त्याच्या आतून, 'सकाळी रोज आठाठ वाजेपर्यत लोळत पडतात आणि आज कोणी पाहुणा घरी आला तर काय पहाटे उठून बसलेय, कोणास ठावूक ?' आतून गृहस्वामिनीचा सकाळीच झोपमोड झाल्याचा, तसेच नवऱ्याने काम वाढवून ठेवल्यावर बोलतांना जो एक पक्का, अचूक, ठाम व ठाशीव स्वर लागतो तो स्वर; या दोघांचे मिश्रण असलेला स्वर लागतो. लगेच दुसरा पण, म्हणजे बेडरूमचा, दरवाजा उघडून तेथील गृहस्वामिनी, तिच्या स्वयंपाकघरातील भूकंप स्थितीची पहाणी करायला जाते. पाहुण्याची खोड मोडायला निघालेला यजमान, चिंतेने व भयभीत होवून तेथेच जातो. मग जुगलबंदी सुरू होते. एक स्वर दबक्या आवाजात आणि अधर लागतो, तर दुसरा तुलनेने ठाशीव व पक्का असतो. हा पाहुणा काही ऐकू येत नसले, तरी स्वयंपाकघरात काय असावे याचा अंदाज घेत निवांत आपले कार्य आटोपतो आणि मोकळेपणाने बाहेर येतो.

बाहेरचे वातावरण आणि त्यांत मिळणाऱ्या चहाची चव, जर हलकीफुलकी असेल तर तो पण गप्पांत सामील होत त्याची फजिती सांगतो, नाहीतर ही आठवण येथेच ठेवून पाहुणा तेथून त्याचे बस्तान ताबडतोब हालवतो.


23.6. 2018


No comments:

Post a Comment