Saturday, July 7, 2018

गंगालहरी आणि दशाहार !


गंगालहरी आणि दशाहार !
जळगांवला असलेल्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात, याला ‘कमिटीची बाग’ म्हणून पण ओळखतात. मी तिथं बऱ्याच वेळा जायचो, आजी किंवा आजोबांबरोबर ! त्यांच्या घरापासून ही बाग अक्षरश: कोपऱ्यावर ! मात्र मामा किंवा मावशीबरोबर जायची ठिकाणे वेगळी असायची. बऱ्याच वेळा तेथील समोरच्या ‘सेवाश्रम’ या इमारतीत पण जायचो. तिथं भरपूर जागा आणि माझ्या बरोबरीचेच, म्हणता येतील अशी त्यांची मुले खेळायला, मावशी गप्पा मारायची तिच्या मैत्रिणीबरोबर !
आजोबांच्या घरापासून तिथं जवळच असलेल्या बद्रीनारायणांच्या चाळीसमोर एक ‘जिमखाना’ आहे, तिथून पुढे जावं लागते. त्या बद्रीनारायणाच्या चाळीत त्यावेळी कोणी तरी क्रिकेट रसिक किंवा खेळाडू असावा. त्याने अगदी हौसेने, त्यावेळी बाहेरच्या चाळीच्या दरवाज्याजवळच, भिंतीवर फळ्यासारखे काळ्या रंगाने रंगवले होते. त्याचा उपयोग फळ्यासारखा केला जायचा. या फळ्यावर मग खडू ओला करून, खेळाडूचे नांव, कोणाच्या धावा किती झाल्या, किती खेळाडू बाद झाले, शतकवीर कोण, प्रतिपक्षाच्या किती धावा आहेत वगैरे अगदी क्रिकेट मॅचच्या ठिकाणी, स्टेडियमवर जसे असायचे तसेच ! या वेळी जर मॅच सुरू असेल, तर मग येथील धावफलक पण वेळोवेळी अद्ययावत केला जायचा. या रस्त्यावर शेजारीच वल्लभदास वालजी वाचनालयाची जुनी इमारत आहे. हा सर्व भाग, या कमेटीच्या बागेचा मागचा भाग येतो. मागच्या भागांत एक लोखंडी गेट आहे. ते साखळदंड लावून अर्धवट, म्हणजे जेमतेम एक माणूसच जाता येईल असे का उघडे ठेवले असायचे. आता त्यावेळी ते पूर्ण का उघडे ठेवले नाही ? मला काही समजायचे नाही.
तिथल्या अजून दोन गोष्टी मला समजायच्या नाहीत. एक म्हणजे, माझा समज हा, की खेळायचं असतं, ते फक्त लहान मुलांनीच, अगदी फारच झालं तर शाळाकॉलेजला जाणाऱ्या मोठ्या मुलांनी ! पण इथं या ‘जिमखान्यात’ मोठमोठी माणसं ‘हाप चड्ड्या’ घालून खुशाल खेळायचे, बॅट व चेंडूने ! बरं, चांगले स्कूटरवर, मोटारसायकलवर यायचे, काही तर चक्क मोटारीतून यायचे आणि खेळायचे !
‘बरं, हे असं का ?’ असं घरी विचारावे, तर तिथं मोठे लोक खेळतात, हे उत्तर मिळायचे. आता मोठे लोक खेळतात, हे तर मला दिसायचेच, यांत पुन्हा तेच सांगण्यासारखे काय आहे ? मग मी समजायचो ते ‘मोठे लोक’ आणि ही मोठी माणसं समजतात ते ‘मोठे लोक’ यांत मोठाच फरक आहे, हे मला बरेच उशीरा समजले — मी मोठं झाल्यावर !
दुसरं म्हणजे, या बागेच्या मागच्या लोखंडी गेटमधून आम्ही जायचो, त्याच्या शेजारी पण एक नवीन चकचकीत वाटणारी छोटी इमारत होती. तिथं पण अधूनमधून बऱ्याच गाड्या उभ्या असत. गाडीतील मंडळी चांगली सुटाबुटात पण असत आणि त्यांच्या गाड्या पण छान असत. मात्र ती मंडळी माझ्यासमोर कधी चुकूनही बागेत आली नाही. बागेच्या जवळ जायचं आणि बागेत न जाता, दुसऱ्याच ठिकाणी बागेसमोर गाड्या उभ्या करून जायचं यांत काय शहाणपणा आहे, हे मला त्यावेळी तर अजिबात समजत नसे.
‘हे असे का करतात ? बागेत न येता, गाड्या बागेच्या बाहेर उभ्या करून, शेजारच्या इमारतीत का जातात ?’ या माझ्या प्रश्नावर ‘ती सर्व डॉक्टर मंडळी आहेत. त्यांचे आॅफिस आहे, तिथं मिटींग असते त्यांची !’ हे उत्तर मिळालं होतं. प्रत्यक्ष डॉक्टरला पण मोकळ्या हवेत, बागेत खेळल्याने, फिरल्याने आपल्या आरोग्यास चांगले असते, हे समजू नये, याचे तर मला मग फारच आश्चर्य वाटायला लागले होते. ‘लहान मुलांना समजत नाही. मोठ्यांनाच समजते.’ हा मोठ्यांचा निष्कर्ष चुकीचा असतो, पण लहानांनी तो बोलायचा नसतो, गप्प बसायचे, यांतच शहाणपणा असतो; हा निष्कर्ष मी शेवटी काढला आणि गप्प बसलो.
त्या बागेच्या शेवटच्या कोपऱ्यांत, म्हणजे लोखंडी गेटजवळील दुसऱ्या चौकोनांत, आजोबा आणि त्यांचे मित्र मंडळ करून गप्पा मारत असायचे. मी आपला तेथे इतरत्र खेळत असायचो. त्यांच्या गप्पांत घरचे विषय कमी असत मात्र तेथील नगरपालिका, सरकार हे विषय जास्त असत. त्यावेळी मला समज ती काय असणार ? मात्र या सर्व आजोबांचे ‘ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ सुरू झाले, की आता घरी निघायचे हे समजायचे. काही वेळा माझं खेळून समाधान झालेलं नसायचं मग मी हट्टाने त्यांना तेथील मंदीरांकडे घेवून जायचो, ‘आजीबरोबर येईल’ असे सांगत. यांचा मला दिवाळीतला आवडणारा कार्यक्रम म्हणजे ‘आवळी अष्टमी’च्या दिवशी आजोबा हे त्यांच्या सर्व मित्रांसाठी घरून फराळाचे आणायचे आणि तिथं या सर्वांसोबत ‘आवळी अष्टमी’ फराळाचे खावून साजरी व्हायची.
तिथं बागेत बांधीव सभामंडपात विठ्ठल रखुमाई, देवी, हनुमान, दत्त यांच्या मूर्ती आणि महादेवाची पिंड होती. पिंपळाचे झाड, वडाचे झाड तिथं होती आणि बागेत तर असंख्य झाडे ! सभामंडपाचे शेजारी पाण्याने भरलेला मोठा हौद, त्याला पितळी तोटी. पाण्याने हातपाय धुवून वर मंडपात, मंदीरात दर्शनाला यायचे. उन्हाळयात एखादे वेळी आजोबा सांगायचे, ‘आज गोष्ट ऐकायला ये. दशहरा सुरू होतोय, गंगालहरी सांगतील दिनकर भटजी आजपासून !’ मला दशहरा वगैरे समजत नसे, तर आज गोष्ट सांगणार, हे मात्र समजे. दशहरा आणि आंबे यांचे असलेले नाते पण मला आवडत असे. ‘दशहऱ्याच्या दहा दिवसांत रोज आंबा खावा’ असे म्हटले जाई. हा पण दशहऱ्याचा एक आवडणारा गोड मुद्दा होता.
तसं तर, गोष्टी ऐकायला मला लहानपणापासून आवडायचे. त्याचा उपयोग मग पुढे गोष्टी सांगतांना पण झाला. त्या बागेतील सभामंडपात, बाजूलाच लाकडाचे एक व्यासपीठ ! तिथं प्रसंगानुरूप बऱ्याच वेळी दिनकरभटजी पोथी सांगायचे. त्यांचा चेहरा अजून पण डोळ्यांसमोर येतो. गोलसर सावळा भारदस्त चेहरा, डोक्यावर काळी टोपी, अंगात बऱ्याच वेळी असलेली पांढरी सैलसर बंडी, खांद्यावर पांढरे स्वच्छ उपरणं, कमरेला तसेच स्वच्छ धोतर, हातात आधारापेक्षा चाळा म्हणून असलेली काठी, डोळ्याला काळ्या फ्रेमचा चष्मा आणि पायात खडावा !
त्यांनी सांगीतलेली जगन्नाथ पंडीतांची ‘गंगालहरी’ मला अजून आठवते. त्यांनी सांगीतलेली कथा आठवल्यावर अजून डोळ्यांत पाणी येते. काय पण माणसं होती ? यांना कोणी दिलं असेल ‘कथाकथन’ करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण ? कोणी घेतली असेल का यांची आवाजाची चाचणी परिक्षा ? मात्र त्यांचे सुस्पष्ट, अगदी तालांत म्हटलेले श्लोक अजून कानांत येतात, त्वचेला जाणवतात, अंगावर काटा आणतात. खरं आहे, आपल्या मनांत, आपण सांगत असलेल्यावर मनस्वी, नितळ श्रद्धा असली, की समोरच्याच्या मनांत आपले विचार लवकर जात असावेत.
दशहऱ्यात ते गंगालहरी वाचत, पहिल्या दिवशी या ‘गंगालहरी’ची जन्मकथा सांगत आणि नंतर मग बहुतेक त्या दिवशी एक-दोन श्लोक झाले की तो दिवस आटोपे. त्यांची जगन्नाथ पंडीतांची गोष्ट सांगायला सुरूवात होई आणि मी ऐकू लागे.
शहाजहान बादशहाच्या काळातील ही घटना ! जिच्यामुळे सिद्ध झालं की आमच्या देशांत केव्हाही विद्वानांची कमतरता कधीच नव्हती. त्यावेळी पण हिंदु पंडीत आणि मुस्लीम मौलवी हे आपणच जास्त ज्ञानी, हे आपापलेच समजत. याबाबत एकदा, काही तरी निर्णय व्हावा म्हणून शहाजहान बादशहाने आपल्या महालांत हिंदू पंडीत आणि मुस्लीम मौलवींची शास्त्रार्थ चर्चा ठेवली. याची सर्वांना निमंत्रण पाठविलीत. अट ही की शास्त्रार्थ चर्चा कितीही दिवस चालली तरी हरकत नाही, पण श्रेष्ठ कोण याचा निर्णय व्हायला हवा, याशिवाय चर्चा थांबणार नाही, संपविली जाणार नाही. जो यांत जिंकेल त्याला पुरस्कार, तर पराजितास शिक्षा होईल. यासाठी योग्य तयारी करूनच भाग घ्यावा.
यांत भाग घेण्यासाठी देशांच्या कानाकोपऱ्यांतून विद्वान पंडीत, मौलवी मंडळी आली. यांच्यात कित्येक दिवस शास्त्रार्थ चर्चा चालली, पंडितांना हार खावी लागली आणि त्यांना शिक्षा म्हणून तुरूंगात पाठविण्यात आले. नंतर एके दिवशी बादशहाने घोषणा केली की 'अजूनही कोणी हिंदू पंडीत असेल, तर त्याने पुढे यावे, चर्चेत भाग घ्यावा, नाहीतर मुस्लीमांस विजयी ठरविण्यात येईल.
त्यावेळी काशीत महापंडीत, महाज्ञानी जगन्नाथ मिश्र रहात होते. काशी म्हणजे विद्वानांचे आगर, आश्रयस्थान आणि निर्मीतीस्थान पण ! त्यांना, म्हणजे जगन्नाथ पंडीतांना, ही घोषणा समजली. त्यांनी यां चर्चेत भाग घेण्यासाठी म्हणून बादशहाकडे प्रस्थान केले, आणि शास्त्रार्थ पुढे चालू करावा म्हणून सांगीतले. सर्व मुस्लीम मौलवी आणि विद्वानांत समक्ष बसून शास्त्रार्थ चर्चा सुरू झाली. ही सतत तीन दिवस व तीन रात्र सुरू होती. पहातापहाता सर्व मुस्लीम मौलवी, विद्वान पराभूत झाले. हा संपूर्ण शास्त्रार्थ महालाच्या झरोक्यातून शहाजहान बादशहाची मुलगी ‘लवंगी’ ऐकत होती, पहात होती.
बादशहा जगन्नाथ मिश्रच्या विद्वत्तेवर प्रसन्न झाले, त्यांना विजयी घोषीत केले. त्यांना हवे ते मागण्यास सांगीतले आणि हाच त्यांचा पुरस्कार असेल, हे पण सांगीतले.
जगन्नाथ मिश्र यांनी सांगीतले, ‘जितक्या पंडीतांना बादशहाने ते पराभूत झाल्यामुळे बंदी केले आहे, त्यांना मुक्त केले जावे.’ यांवर बादशहाने अजून पुन्हा त्यांना स्वत:साठी मागण्यास सांगीतले. पंडीतजी बादशहाच्या महालात उभे होते, त्यांनी इकडेतिकडे बघीतलं. त्यांची नजर बादशहाची मुलगी, ‘लवंगी’ हिचेवर गेली. ते म्हणाले, ‘महाराज, धन आणि राज्यसुख याची मला इच्छा नाही. द्यायचेच असेल तर ती युवती मला द्या.’ जगन्नाथ पंडीतांचे हे ऐकून बादशहा सुन्न होवून गेला. मात्र त्याला आपले वचन पाळणे भाग होते. त्याने आपली मुलगी, ‘लवंगी’ जगन्नाथ पंडीतांना दिली. जगन्नाथ पंडीत हे शहाजहान बादशहाची मुलगी, ‘लवंगी’सह बादशहाच्या दरबारातून विजयी होवून बाहेर पडले. ते लवंगीसह काशीला आले. मग जगन्नाथ पंडीतांनी शास्त्राप्रमाणे तिचे शु्द्धीकरण केले आणि तिच्यासह राहू लागले.
लवंगी ही मुस्लीम तर जगन्नाथ पंडीत हिंदू ब्राह्मण ! हे काही समाजाला पटले नाही आणि त्यांना बहिष्कृत केले. ते लवंगी सोबत आनंदात होते, पण आपल्याशी समाजाचे वर्तन त्यांना बोचत होते, त्यांच्या मनांस वेदना देत होते, ते मनांतल्या मनांत कुढत होते. यांतून मुक्त होण्यासाठी, त्यांनी एके दिवशी आपल्याच मनाशी ठरवले आणि जन्म झाला, तो सर्वश्रेष्ठ ‘गंगालहरी’ या काव्याचा !
जातीने बहिष्कृत केल्याने जो सामाजिक अपमान त्यांना सोसावा लागला, त्याचा परिपाक, ते एके दिवशी आपल्या लवंगीसह काशीच्या दशाश्वमेध घाटावर जावून बसले. त्या घाटाला बावन्न पायऱ्या आहेत. लवंगीसोबत बसून जगन्नाथ पंडीतांनी गंगामातेची स्तुती, प्रार्थना सुरू केली.
असे सांगीतले जाते की, जगन्नाथ पंडीत आपल्या काव्याचे एक पद रचत होते आणि गंगानदीचे पाणी एक पायरी वर चढत होते. जगन्नाथ पंडीतांची बावन्न पदे झाली आणि गंगामातेने शेवटची बावन्नावी पायरी ओलांडत आपल्या या दुर्दैवी, विद्वान, समाजाने टाकून दिलेल्या पुत्राला त्याच्या सहचारिणीसह आपल्यांत आश्रय दिला. गंगेत ते दोघं वाहू लागले. जगन्नाथ पंडीतांनी गंगामातेची प्रार्थना केली, ‘ माते, आता आम्हाला तू आपल्या कुशीत घेतले आहे, संसाररूपी चिखलातून दूर केले आहे, तर आता पुन्हा आपल्यापासून वेगळे करू नको. आपल्या पवित्र धारेत पावन करून घे.’ गंगामातेने ती आपल्या पुत्राची ती शेवटची प्रार्थना स्विकारत, त्या दोघांना आपल्यांत आश्रय दिला.
त्यावेळी जगन्नाथ पंडीतांनी गंगामातेची जी स्तुती केली तीच ही बावन्न श्लोकांची ‘गंगालहरी’ ! आज पण तुम्ही काशाच्या भांड्यात गंगाजळ भरून श्रद्धेने, तन्मयतेने ‘गंगालहरी’ म्हणा, त्या भांड्यातील पाण्यावर तुम्हाला लहरी दिसतील !
कथा संपलेली असायची आणि दिनकर भटजी, तसेच समोर बसलेल्या श्रोत्यांचे पाणावलेले डोळेच, हे त्यांचे कान होवून पुढचे गंगालहरीचे श्लोक ऐकू लागायचे -
समृद्धं सौभाग्यं सकल वसुधायाः किमपि तत्-
महैश्वर्यं लीला जनित जगतः खण्डपरशोः ।
श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां
सुधासौन्दर्यं ते सलिलमशिवं नः शमयतु॥१॥
हे माते, भगवान शंकराच्या लीलेमुळे जन्माला आलेली तू, या पृथ्वीची समृद्धी आणि सौभाग्य आहे. वेदांचे सर्व सारतत्व तूच आहे. तुझे हे सौदर्यामृत असे दिव्य जल, आमचे सर्व अमंगळ दूर करो.
दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदाम्
द्रुतं दूरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम् ।
अपि द्रागाविद्याद्रुमदलन दीक्षागुरुरिह
प्रवाहस्ते वारां श्रियमयमऽपारां दिशतु नः॥२॥
उदञ्चन्मार्तण्ड स्फुट कपट हेरम्ब जननी
कटाक्ष व्याक्षेप क्षण जनितसंक्षोभनिवहाः ।
भवन्तु त्वंगंतो हरशिरसि गङ्गातनुभुवः
तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभव भङ्गाय भवताम्॥३॥
तवालम्बादम्ब स्फुरद्ऽलघुगर्वेण सहसा
मया सर्वेऽवज्ञा सरणिमथ नीताः सुरगणाः ।
इदानीमौदास्यं भजसि यदि भागीरथि तदा
निराधारो हा रोदिमि कथय केषामिह पुरः॥४॥
संस्कृत भाषेतील शिखरिणी वृत्तातील बावन्न श्लोकांचे ‘गंगालहरी’ हे काव्य ! जगन्नाथ पंडीत हे त्या काव्याचे जनक, आपल्या या काव्यातून गंगामातेला साद घालत आहे. तिने आपल्याला आपल्यात सामावून घेण्यासाठी कळवळून साद घालत आहेत. दिनकर भटजी हे आपल्या वाणीने, व्याकूळ झालेले जगन्नाथ पंडीत आणि जगन्नाथ पंडितांची ‘लवंगी’ आपल्या डोळ्यासमोर उभे करत.
कोण कुठले दिनकर भटजी ते मला तर ओळखत पण नसतील, पण या मंडळींनी आपल्या गांवात माझ्यासारख्या सुटीत हुंदडायला, पाहुणा म्हणून आलेल्यास पण माझ्या बालवयात काय दिलं, हे त्यावेळी तर समजलं नाही, पण आता समजतंय ! बालवयात आपण काय काय कमवलं आणि काय काय गमवलं, यासाठी आपल्याला, वयानं का होईना, पण मोठेच व्हावं लागतं, हेच खरं !

27. 6. 2018

No comments:

Post a Comment