Thursday, December 20, 2018

अपघात आणि नुकसानभरपाई

अपघात आणि नुकसानभरपाई

त्या दिवशी साधारणतः दुपारचा एक-दिडचा सुमार असेल, पावसाळ्याचे दिवस ! पण आमच्या मराठवाड्यांत कसला पाऊस अन असले काय, पण वातावरण होते. सिराज ड्रायव्हर हा मालकाच्या सांगण्याप्रमाणे त्याची ट्रक घेऊन औरंगाबादहून जळगांवकडे येत होता. खुल्दाबाद शिवाराजवळील 'टी पॉईंट'जवळ हा ट्रक घेऊन चालवत शांतपणे आला आणि त्याचवेळी तिकडून एक काळीपिवळी क्रुझर जीप भरपूर प्रवाश्याना घेऊन समोरून भरधाव वेगाने, सर्कशीतील प्रयोग सुरु असल्याप्रमाणे येत होती. ट्रकच्या सिराज ड्रायव्हरला याच्या या काळीपिवळीच्या या चमत्कारिक प्रयोगाची कल्पना नव्हती, हा त्याच्या बाजू शांतपणे चालत होता. कालीपिलीचा ड्रायव्हर मात्र काही ऐकायला तयार नव्हता. मात्र त्या बेफाम वेगात येऊन या क्रूझर जीपने या ट्रकला जो काही धडक दिली की एकदमच हलकल्लोळ उसळला. 

आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले. स्वाभाविकच बरीच मंडळी जखमी झाली होती. प्रवाशांनी, दोन्ही वाहनांच्या ड्रॉयव्हरांनी आणि आसपासच्या बघे मंडळींनी या सर्वांनी एकमेकांच्या आई-बहिणींचा उद्धार त्यांचा कसलाही संबंध नसतांना निष्कारणच केला. तेथील उपस्थितांमध्ये पण दोन गट होते 'सिराजची चूक नाही' हे सांगणारा गट थोडा कमकुवत होता तर 'कालीपिलीचा चूक नाही' हे सांगणारा गट चांगलाच प्रभावी होता. स्वाभाविकच, कालीपिलीचा 'एरिया' होता, त्यामुळे त्याला पाठिंबा असणारच ! फुलंब्री पोलीस स्टेशनाला अपघाताची तक्रार नोंदण्यांत आली. कसले आणि काय कागदपत्रे झालीत याची याला कल्पना असण्याचे कारणच नव्हते, कारण हा सिराज दवाखान्यांत भरती होता. बाकीच्या जखमींना पण दवाखान्यांत नेण्यांत आले. सिराजच्या गुढग्याला जबर मार बसून तेथे फ्रॅक्चर झाले आणि तो ड्रायव्हर म्हणून काम करण्याच्या कामाचा राहीला नाही. 

वयाच्या बावन्नाव्या वर्षी हा निकामी होऊन घरी बसला, कुटुंबातील माणसांच्या उदरनिर्वाहाची काळजी डोक्यांत ठेवत ! अपघातातून सावरल्यावर जळगांवला कामगार न्यायालयांत 'कामगारांचा नुकसान भरपाईचा कायद्यानुसार सिराजने नुकसानभरपाईचा अर्ज मालकाविरुद्ध आणि विमा कंपनीविरुद्ध केला. विमा कंपनींनी त्यांचे म्हणणे मांडले. सिराजने त्याला मालक देत असलेला पगाराचा दाखला सादर केला, त्यांत त्याला ५,०००/- रुपये पगार देत असल्याचे स्पष्ट लिहीलेले होते. त्याची अपघाताची कागदपत्रे, दवाखान्यातील औषधोपचाराची कागदपत्रे, एक्स रे, सक्षम अधिकाऱ्याचे अपंग असल्याबद्दलचे आणि अपंगत्व किती आहे याबद्दलचे प्रमाणपत्र दाखल केले. याचा साकल्याने विचार होऊन त्याला नुकसान भरपाई मिळावी असे सांगीतले.   

कामगार न्यायालयांत न्यायाधीशांनी त्यांचे समोरील कागदपत्रे, पोलीस पेपर बघीतलेत, मात्र सिराज हा कालीपिली मधील प्रवासी समजून, ड्रायव्हर नसल्याचे जाहीर करत, त्याने केलेला नुकसानभरपाईचा अर्ज कामगार न्यायाधीशांनी रद्द केला. सिराज हैराण झाला. त्याच्या डोळ्यांपुढे अंधारच पसरला. ड्रायव्हर म्हणून काम करता येणे शक्यच नव्हते त्या दृष्टीने त्याच्या उत्पन्नाचे १००% नुकसान झाले होते. त्यामुळे अपंगत्व जरी १००% पेक्षा कमी असले तरी झालेले नुकसान विचारात घ्यावयास हवे, हे निश्चित होते. बिचाऱ्याला कालीपिलीत न बसताच कालीपिलीचा प्रवासी म्हणून अनुभव आला. आता त्याला वरिष्ठ न्यायालयांत म्हणजे 'उच्च न्यायालयांत' दाद मागण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्याने आणलेली सर्व कागदपत्रे आणि निकालाची प्रत बघीतली आणि मग त्या निर्णयाविरुद्ध अपील केले.      

येथे उच्च न्यायालयांत अपील दाखल केल्यावर एक करावे लागले की जास्तीचा पुरावा देणेचा अर्ज दाखल करावा लागला आणि तशी संधी मिळावी म्हणून विनंती केली. मा. न्यायाधीशांना मा. कामगार न्यायाधीशांच्या निर्णयातील वस्तुस्थितीच्या आणि कायद्याच्या विपरीत असलेले मुद्दे दाखविले. दरम्यानच्या काळांत त्या कालीपिलीतील प्रवाशांनीपण औरंगाबाद न्यायालयांत आपल्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावे केलेत. त्यांत हा सिराज ट्रक चालवीत होता आणि अमका कालीपिली चालवीत होता हे स्पष्टपणे लिहिलेले होते. ते दावे त्या प्रवाशांनी कालीपिलीच्या ड्रायव्हरसोबतच सिराजवरही केले होते. औरंगाबाद न्यायालयाने सिराजला त्या प्रत्येक कामांत हजर रहाण्यासंबंधाने नोटीस काढली होती. ती प्रवाशी मंडळी ही झालेल्या अपघाताची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. त्यांचे म्हणणे खोटे मांडणे शक्यच नव्हते. या सर्व केसेसच्या नकला उच्च न्यायालयांत दाखल केल्या. आता हा सर्व पुरावा नाकारणे कोणालाच शक्य नव्हते. एका अपघाताच्या केसचे कागदपत्र खालील न्यायालयांत होते आणि पोलीस पेपरमध्येपण सिराज ट्रक ड्रायव्हर होता हे स्पष्ट लिहीले होते हे सिराजला औरंगाबादला घाटीत दाखल करतांना स्पष्ट लिहिलेले दाखविले. उच्च न्यायालयाने अपील मंजूर केले आणि उपलब्ध पुराव्यानुसार विचार करून निर्णय द्यावा असा आदेश करत, काम फेरचौकशीसाठी पुन्हा कामगार न्यायालयांत पाठविले. त्यानंतर त्याला त्याच्या मनाप्रमाणे नुकसानभरपाई मिळाली. 

काम चालवीत असतांना सर्वसामान्यपणे घटना कशी घडू शकते, कोण काय करू शकतो, हे माणसाच्या स्वभावाचा विचार पक्का डोळ्यांसमोर ठेवत आपला मार्ग ठरविला पाहीजे. पक्षकार हा त्याच्या बद्दल सहानुभूती निर्माण व्हावी, आपल्याला फी कमी द्यावी लागावी म्हणून खऱ्याखोट्याची मिसळ बऱ्याच वेळा करतो. कालीपिलीत किँवा कोणत्याही अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांत बसतांना आपण दहा वेळा विचार करावा, कारण या अशा चमत्कारिक मनोवृत्तीमुळे केवळ आपण आपल्यालाच धोक्यांत घालत नसतो तर गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हरलापण धोक्यांत निष्कारणच घालत असतो. म्हणून माणसाचा हा स्वभाव आणि त्याची अपेक्षित कृती हे ओळखता आले की काम सोपे होते, मात्र ही सोपी गोष्टच बरीच कठीण असते. अनुभवाने येते हे ! मात्र त्यासाठी पक्षकारांकडून काही वेळा आपल्यालापण शिकावे लागते आपल्या फीच्या मोबदल्यांत !        









No comments:

Post a Comment