भविष्य आणि त्याचे विविध प्रकार, जादूटोणा-तंत्रमंत्र वगैरे हे जनमानसांत आजही खूप लोकप्रिय आहेत; आणि हे फक्त आपल्या भारतातच नाही तर सर्व जगतातच दिसून येते ! मग याला कोणी शास्त्र समजो अथवा कोणी भोंदूपणा-अंधश्रद्धा-फसवणूक म्हणो ! एक मात्र नक्की, ज्यावेळी आपली बुध्दी एखाद्या विषयावर चालेनासी होते, आपणांस आपल्या समस्येवर इतरांची मदत घेवूनही उपाय सुचत नाही, त्यावेळी आपणा सर्वांपेक्षा कोणीतरी वेगळी शक्ती यामागे आहे आणि ती या सर्वांचे नियंत्रण करीत असते; ही भावना स्वाभाविकपणे होत असते आणि त्यांत फारसे काही गैर किंवा अनैसर्गिक नाही, जो पावेतो याविषयाचे कुतूहल आहे, माग शोधण्याची इच्छाशक्ती आहे आणि तसा प्रामाणिक प्रयत्न आहे तो पावेतो फारसे काळजीचे कारण नाही कारण यातूनच विविध शोध लागले आहेत, चिंतन झालेले आहे, तत्वज्ञान आणि तत्वज्ञ निर्माण झाले आहेत; थोडक्यात नवनिर्मिती झालेली आहे. मात्र या कुतूहलाचा, विषयाचा माग शोधण्याचा वापर अप्रामाणिकपणे व्हावयास लागतो त्यावेळी धोक्याची घंटा वाजते, ती सर्व समाजासाठी !
आज हे मुद्दाम लिहिण्याचे कारण भविष्याबाबत / पत्रिकेतील विविध ग्रहांच्या स्थानाबाबत आणि त्यांच्या जातकाच्या कुंडलीवर / फलादेशावर होणाऱ्या परिणामाबाबत विषय निघाला. मला या विषयाची आवड आहे मात्र व्यवसायाच्या व्यापामुळे एकाग्रता / तपश्चर्या ज्यांत लागते अशी कामे धावपळीमुळे नीट होत नाहीत; म्हणून मग या विषयाकडे फारसे पाहिले जात नाही. गेल्या साधारणतः १५ / २० वर्षांपासून मी याचा बैठक मारून अभ्यास असा केला नाही. हीच बाब माझ्या आवडीच्या 'तबला' या विषयाची ! असो. हे कुतूहल चाळवले आणि निदान ज्यांना यांत काही माहिती हवी आहे त्यांना काही सांगू शकतो का हा विचार आला, आणि लिहिले झाले ! उपयोगी पडले तर घ्या नाही तर विचार करू नका.
भविष्य संबंधाने माझ्या वाचनांत जी काही पुस्तके आली त्यातील काही निवडक पुस्तके माझ्या संग्रही आहेत, त्याबाबत सांगता येईल -
१. मुद्राशास्त्र - केदार गोस्वामी - माणसाच्या चेहऱ्यावरून, अंगलक्षणावरून, अवयवावरून भविष्यासंबंधी सांगता येवू शकते.
२. रेखाशास्त्र - केदार गोस्वामी - आपल्या हातांवरील रेषा, त्यांचे परिणाम, ठळकपणा - अस्पष्टपणा त्यावरील छेद, जाळी, त्यावर असलेली विविध शुभाशुभ चिन्हे
३. Palmistry - Numerology - Astrology by Cheiro - यांत पाश्चात्य लेखकाचे त्यांचे भागांतील या विषयाबाबतचे मत आहे. आपले आणि त्यांचे विचार या मध्ये खूप अथवा मूळापासून फरक नाही.
४. हस्त चिन्ह शास्त्र - केदार गोस्वामी - आपल्या हातावर जी विविध प्रकारची चिन्हे असतात त्यांचे जातकांचे भविष्यावर होणारा परिणाम
५. हस्त लक्षण शास्त्र - केदार गोस्वामी - हाताची रचना, त्यावरील रेषा, उंचवटे, ग्रहांचे पर्वत, सखल भाग, त्याचा परिणाम- निष्कर्ष
६. रत्न शास्त्र - केदार गोस्वामी - रत्नांचे विविध प्रकार, प्रत्येक ग्रहांचे रत्न, राशीनुसार वापरावयाची रत्ने, ग्रहांच्या बलानुसार वापरावयाची रत्ने, त्यांचे परिणाम, रत्न लाभणे अथवा न लाभणे म्हणजे काय, रत्न खरे-खोटे कसे ओळखणार
७. कुंडली तंत्र आणि मंत्र - भाग १ आणि २ - श्री. व. दा. भट - कुंडली म्हणजे काय ? कुंडलीची ओळख, भाव, बारा घरे - त्यांची नांवे, ग्रह स्वरूप आणि कारकत्व, ग्रहांची स्थानाप्रमाणे फले, राशी - राशीस्वामी - त्यांचे गुणधर्म, ग्रहांची दृष्टी आणि त्यांचे परिणाम, एकच ग्रहाच्या दृष्टीचे वेगवेगळ्या राशींवर आणि स्थानांवर होणारे वेगवेगळे परिणाम, नक्षत्रे, भावेश आणि त्यांची स्थानपरत्वे फळ, दशा, अंतर्दशा, विंशोत्तरी दशा, स्पष्ट ग्रह, प्रत्येक ग्रहाचे कारकत्व आणि लग्नस्थानी असल्यास होणारे परिणाम
८. असे ग्रह अशा राशी - श्री. व. दा. भट - प्रत्येक राशी आणि ग्रह यांचे एकमेकांवर होणारे परिणाम
९. ज्योतिष योग - डॉ. नारायणदत्त श्रीमाली - ग्रह एकत्र आल्यास होणारे विविध शुभाशुभ योग आणि त्यानुसार जातकाचे भविष्य
१०. गाथा ग्रहांची - शांडिल्य - हे अतिशय छान पुस्तक आहे.
११. लाल किताब
१२. या व्यतिरिक्त नाशिक येथील ज्योतिष विषयक संस्थेने मला आठवते ते पांच किंवा सहा खंड अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून काढलेले आहेत. ते देखील छान आहेत.
सरतेशेवटी मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला की भविष्य बदलवू शकतो अथवा नाही या तपशीलांत जाण्यापेक्षा आपणांस जर संकटाची चाहूल लागणार असेल तर आपल्यास आपल्या सुरक्षिततेसाठी उपाय करता येतांत, येणारे संकट जाणवत नाही. डॉक्टरच्या इंजेक्शनच्या सुईपेक्षा शरीरांत अचानक घुसणारी सुई आपणांस जास्त हादरविते, वेदना देते. यावर यापेक्षा जास्त लिहीत नाही.
No comments:
Post a Comment