Saturday, July 25, 2015

'मेहनत की आंच पाते पाते कच्ची चीजे भी पक जाती है'


साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वीची किंवा त्यापेक्षाही पूर्वीची संगीत-सभेची आठवण आहे ! आठवण आहे पुण्यातील !
श्री. सुधीर फडके, त्यावेळी नवोदित असलेले सतारवादक (आपणांस गीतरामायणाने परिचित असलेले स्वर्गीय बाबूजी नाही) आणि त्यांना साथ देणार होते तबलावादक पं. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज ! पंडितजींचे त्यावेळी समयोचित केलेले छोटेखानी प्रोत्साहनपर आणि त्याचवेळी जिद्द निर्माण करणारे भाषण नाही, वडिलकीच्या भावनेने दिलेली समज !
ते म्हणाले, 'देखो बेटा, मेरे जैसे बुढोके साथ आज तुझे चलना है I देखता हूँ कहाँ तक तू चल सकता है, यदि मेरे साथ चल सका तो मैं समझूँगा, हम आज भी बुढ़ापेमे तुम्हारे साथ चल सकते है I (और हंसते हुए बोले ) हमने नई पिढी ठीक तैयार की और अपनी संगीत की ज्योत नई पीढ़ी के हाथ सुरक्षित है और नहीं चल सका तो सोच लेना लक्ष्य और कितना दूर है I

त्यानंतर जी अविस्मरणीय संगीत-सभा झाली त्याचे वर्णन मी काय करणार ? पं. सामताप्रसाद यांचा तबला नुसता बोलत होता आणि संपूर्ण सभा निःशब्द होऊन ते नाद-ब्रम्ह श्रवण करीत होती. माझी आणि इतरांचीही परिस्थिती 'अनंत हस्ते कमलावराने, घेता किती घेशील दो कराने' या पेक्षा वेगळी नव्हती. आवर्जून येथे सांगण्याची गोष्ट म्हणजे, बालकाला चालणे जसे वडीलधारा शिकवतो, मात्र बालकाला वाटते, आता आपण चालायला लागलो आहे तर किती चालावे आणि नाही, बालक थकत जरी असला तरी वडीलधारा त्याला थकू देत नाही, त्याचा चालण्याचा आत्मविश्वास जागवतो.
पं. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज यांचे मला अत्यंत आवडलेले आणि मी कायम लक्षांत ठेवलेले वाक्य म्हणजे - 'मेहनत की आंच पाते पाते कच्ची चीजे भी पक जाती है'
श्री. सुधीर फडके, त्यावेळी नवोदित असलेले सतारवादक, आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
ही घटना आपल्यापैकी काही जणांना आठवतही असेल ! ही आठवण चाळवली ती Champra Deshpande यांच्या उस्ताद अल्लारखा आणि झाकीर हुसेन यांच्या नुकत्याच ऐकलेल्या कार्यक्रमाच्या घटनेने ! धन्यवाद ! ------ आठवण जागवल्याबद्दल !

No comments:

Post a Comment