Thursday, July 16, 2015

सत्याचे दर्शन


बऱ्याच वेळा येथे अमुक का होत नाही, ढमुक का होत नाही, याला जबाबदार कोण, त्यांना सत्तेवरून कडून टाकले पाहिजे, त्यांनी राजीनामे दिले पाहिजे, भारतांत आता काही खरे नाही, भारत कचरा-कुंडी झालेला आहे, आरक्षणामुळे गुणवत्ता मारली जाते, अल्पसंख्यांकांना लाडावून ठेवले आहे अथवा अल्पसंख्यांक येथील नागरिक आहेत त्यांच्यांवर अजिबात अन्याय व्हावयांस नको, जातीयता वाढली आहे ती गाडून टाकली पाहिजे अथवा आता हिंदू अन्याय सहन करणार नाही वगैरे स्वरुपाची विधाने वाचावयास मिळतात आणि प्रत्यक्ष ऐकावयास देखील मिळतात. यावर उत्तर काय असावे असा देखील खल सुरु असतो आणि प्रत्येक आपलेच मत अथवा धोरण बरोबर कसे हे देखील पटवून सांगत असतो. याबाबत चर्चा करीत नाही मात्र एक प्रसंग सांगतो, आपणांस काय समजते ते पहा, त्यातून काही उत्तर मिळाले तर सांगा आणि त्यामध्ये या सर्व परिस्थितीबदलाबाबत एखादा उपाय आहे का याचा देखील विचार करा आणि असल्यास त्यानुसार काही जमते का आणि जमल्यास काहीथोडे आचरण करता येते का पहा.

माझे एक परिचित, ज्यांना मी साधारणतः दहा वर्षांपासून ओळखतो, आमचा व्यवसाय एकच आहे, नेहमी बोलणेचालणे असते. त्यांचे आणि माझे काम बऱ्याच वेळा सारख्यांच अधिकाऱ्यांबरोबर पडते. प्रसंग आणि अनुभव त्या व्यक्तीबाबत आणि माझ्या परिचीताबाबत आहे. 

अगदी सुरुवातीला दहा वर्षापुर्वी ती एक व्यक्ती अधिकारी नव्हती ज्याबाबत हा प्रसंग आहे, आमच्यासोबतच काम करायची. त्यांचे काम यथातथा, मात्र 'मोठ्या घरातील' समजली जायची ! त्यावेळी माझ्या परिचिताचे त्याच्याशी वागणे अगदी जेवढ्यास तेवढे असे, काम पडल्यास बोलायचे किंबहुना जवळजवळ काहीही नसे त्यामानाने माझे वागणे जास्त जवळिकेचे / आपुलकीचे असे; याबाबत माझे परिचित मला नावेदेखील ठेवीत असत की मी कोणाबरोबरही आपुलकीने बोलतो. 

नंतर काही वर्षांनी बातमी आली, त्या व्यक्तीची निवड मोठ्या अधिकारपदावर होणार आहे आणि आपल्यातंच तो अधिकारी म्हणून येणार आहे, त्याबरोबर माझ्या परिचिताचे त्याच्याशी असलेले वागणे थोडे बदलले, तो आवर्जून त्यांना हसून प्रतिसाद देवू लागला, त्यांच्याशी बोलू लागला, अगदी त्याची त्यावेळी बोलण्याची इच्छा नसली तरी ! त्याचे लक्ष नसेल तर लक्ष वेधून बोलू लागला ! माझे वागणे तसेच होते; पण आता त्या व्यक्तीच्या सभोवती जास्त गराडा दिसू लागला, माझे बोलणे पाहिलेपेक्षा कमी झाले आणि मलाही वेळ मिळेनासा झाला कारण माझेही काम वाढले. ती व्यक्ती यथावकाश अधिकारपदावर गेली, आमचेवर अधिकारी म्हणून आली, आता माझे बोलणे जवळजवळ थांबल्यासारखे झाले, कारण माझे एक पथ्य आहे, ते मी नेहमी पाळतो; ते म्हणजे आपणांस कोणांस मदत करता आली नाही तरी चालेल पण त्याचे आपल्यामुळे नुकसान व्हावयांस नको. त्यामागे आपल्यामुळे कोणी अडचणीत येवू नये ही भावना ! मात्र आमचे परिचित आता त्यांना संधी मिळेल तेंव्हा किंबहुना संधी प्राप्त करून वारंवार भेटावयाचा प्रयत्न करू लागले. आता परिचित त्यांना नेहमी भेटावयाचा प्रयत्न करणे, त्याच्याबाबत गप्पांमध्ये अतिशय चांगले बोलणे, कोणी काही बोललेले थोडेजरी वावगे वाटले तरी बोलणाऱ्यास विरोध करणे असे करू लागले. 

मी एकदा सहज बोललो, 'हा अधिकारी झाल्यावर भलताच आळशी झाला आहे, अपेक्षेप्रमाणे आणि दर्जाप्रमाणे काम करीत नाही.' या माझ्या बोलण्यावर माझ्या परिचिताची आणि माझी थोडी बोलाचाली झाली, 'अहो, माणसाने कितीही काम केले तरी कमीच आहे. घाईघाईत काम केले तर न पाहता काम करतो म्हणून बोलतांत आणि नीट समजून, सर्वांचे ऐकून काम केले तर वेळ लागणारच; मग म्हणतांत काम करत नाही. माणसाने वागावे तरी कसे ? काम करणे कठीण झाले आहे. आपल्या अधिकाऱ्यासंबंधाने असे बोलू नये.' असे त्याने मला बजावले. त्याचा हा अवतार मला नवा होता. मला समजेना पूर्वी हा त्याचेशी काहीही न बोलणारा, याचा समर्थक कधीपासून झाला आणि मला त्याचा शत्रू कसा काय समजायला लागला ? 'अहो, मी त्यांना शिव्या वगैरे देत नाही, मी त्याच्या कामासंबंधाने बोलत आहे, हे माझेच नाही तर बहुसंख्यांकांचे मत आहे. त्यांचेबाबत मी वैयक्तिक कुठे बोलत आहे ?' हा माझा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न ! मात्र त्यांना पटला नाही आणि माझा हा परिचित तावातावाने निघून गेला. 

आता त्या अधिकाऱ्यांची निवृत्ती होणार होती, त्या निरोपसमारंभाची वर्गणी कार्यक्रमाची जबाबदारी घेणाऱ्यांनी माझेकडे मागितली, मी दिली. त्या निरोपसमारंभात मला माझे हे परिचित दिसले नाही. दुसऱ्या दिवशी ते भेटल्यावर मी त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले, 'काहो, कालच्या निरोप-समारंभाचे कार्यक्रमांत तुम्ही काही दिसला नाही,' त्यांचे उत्तर, 'मला काम होते, त्यामुळे येवू शकलो नाही, वर्गणीपण देता आली नाही.' त्यांच्याकडे मी पाहिले, 'आणि खरे सांगू का, तुम्ही त्यांचे खरे मित्र ! तुम्ही होते ना ! अशा कार्यक्रमांना येवून, त्यांत पैसे खर्च करण्याव्यतिरिक्त आपणांस काय मिळते ?' 

त्याला उमगलेल्या आणि मला अद्यापही न समजलेल्या या सत्याच्या दर्शनाने मी अवाक झालो.    

No comments:

Post a Comment