Monday, February 12, 2018

बंद झालेली सिनेमा थिएटर्स आणि मनाचे उघडलेले दरवाजे !

बंद झालेली सिनेमा थिएटर्स आणि मनाचे उघडलेले दरवाजे !
तो - घराच्या जवळ चित्रपटगृह असेल तर चांगला चित्रपट आल्यावर लगेच जाता येत.
ती - तसं काही नाही, बरं ! अलिकडे बहुतेक सर्व सिनेमा थिएटरवर तिकीटे ‘ऑन लाईन’ बुक करता येतात. मग तिथं जायला काय वेळ लागतो ? लगेच जाता येतं. मल्टीप्लेक्स असेल तर दोन-तीन तरी स्क्रीन असतातच. मग हवा तो मूव्ही अन् हवी ती वेळ !
तो - हल्ली सिनेमे तरी पहाण्यासारखे कोणते येतात ?
ती - ऑं ! का नाही ? दृष्टी हवी तशी, म्हणजे दिसतं !
एक वाक्य बोलल्यावर किंवा प्रश्न विचारल्यावर , त्याला खोडून काढत निदान चार-पाच भरभक्कम वाक्य उत्तर; हा संवाद कोणा-कोणांत असेल हे येथील अनुभवी व्यक्तींना सांगण्याची आवश्यकता नाही. मी चमकून त्या संवादाच्या रोखाने बघीतले तर ‘नातेसंबंध’ हा अस्तित्वात आलेला नव्हता, तर ‘संभाव्य’ अवस्थेत होता. कोण म्हणते, या रणरागिणींना कमकुवत ? अजून काय ‘अच्छे दिन’ यायचे बाकी आहे ?
सिनेमा टॉकीज किंवा सिनेमा थिएटर किंवा चित्रपटगृह हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व जिवाभावाचा विषय ! आदल्या दिवशी ‘सिनेमा’ पाहून आल्यावर, त्याची ‘स्टोरी’, त्यांत पदराचे काहीबाही घालून, बघीतलेल्या सिनेमापेक्षा जास्त तन्मयतेने व मनापासून, दुसऱ्या दिवशी शाळेत जसा वेळ मिळेल, जिथे वेळ मिळेल तिथे, सांगीतली नाही, असा मित्र किंवा मैत्रिण अजून जन्मायची आहे.
जसेजसे आपण मोठे होत जातो तसे ही तन्मयता कमी होत जाते, ‘स्टोरीत’ टाकली जाणारी फोडणी कमी होत जाते आणि आपण ती ‘कथावस्तू’ मग तुलनेने साक्षेपी किंवा कशी कमकुवत आहे, तिचा कथा मांडणीतील तोल, कसा किंचीत डावीकडे किंवा उजवीकडे कलला आहे, त्यामुळे कलाकृतीच्या नैसर्गिक बांधेसूदपणाला कशी हानी पोहोचते, त्यामुळे व्यापक अनुभूतीपासून प्रेक्षक वंचित रहातो. असे याचे मूल्यात्मक रसग्रहण करतो ! (हुश्श ! यापेक्षा ‘सिनेमा’ पाह्यलेला परवडतो बघा !)
आमच्या गांवाला ‘स्वस्तिक सिनेमा टॉकीज’ ! हिचे मालक गांवातील नाईक कुटुंब ! खूप जुनी टॉकीज ! त्यावेळी भुसावळला, बहुतेक मोठ्या सिनेमा वितरकांची कार्यालये असत. आम्ही केव्हातरी रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टॅंडवर गेलो तर, प्लॅटफार्मवर किंवा बसच्या ताणकाट्याजवळ ती चिरपरिचीत ‘सिनेमाची पेटी’ दिसायची. गॅल्व्हनाईज्ड टिनशीटची असलेली, सर्व बाजूनी चेपल्याने आकार बदललेली, पण तरीही उभट चौकोनी वाटणारी व चारही बाजूनी मध्यभागी काळ्या पट्टीचा बंध असलेली ! ती बघीतली की दोन-तीन दिवसांत सध्याचा सिनेमा बदलणार, हा आम्हाला अंदाज येई. मग पुढची उत्सुकता की कोणता सिनेमा लागणार ? आम्ही सध्या सुरू असलेला पण बघीतलेला नसायचा, व पुढे येणारा पण आम्हाला बघायला मिळण्याची शक्यता नसायची. ‘मुलं बिघडवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे, पोरांना सिनेमा पहाण्याची परवानगी देणे !’ हे सर्वमान्य तत्व त्यावेळी होते. सिनेमा पहाण्यासाठी पैसे मिळणं हे तर महाकर्मकठीण ! पण काही वेळा असा योग जुळून यायचा, कपिलाषष्ठीप्रमाणे, आणि आम्ही मग सिनेमाला जायचो. सोबत वडिलधारी बहीण, गल्लीतील काकू, आई वगैरे कोणी असायचे.
या गोंधळातून आमच्या वाटेला आलेले सिनेमे म्हणजे - सखू आली पंढरपूरा, वीर भीमसेन, रामराज्य, हर हर महादेव, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जय संतोषी मॉं, कृष्ण बलराम, राजा शिवाजी, जनम जनम के फेरे ! यांवरून कोणालाही कल्पना येईल, की सिनेमा पहायला मिळणं हे किती अवघड असे त्या काळी ! सोंगाड्या, पिंजरा, कभीकभी, आखरी खत, यादों की बारात, मैं सुंदर हूॅं, ज्वार भाटा, राजा जानी, जिने की राह वगैरे सिनेमे काहीतरी जबरदस्त योगामुळेच बघायला मिळाले आहेत.
स्वस्तिक टॉकीज ही नाईक कंपनीची ! तेथे सर्वात पुढे जमिन, त्याच्या मागे बाक आणि त्याच्या मागे खुर्च्या ! खुर्च्यांच्या मागे महिलांसाठीचा ओटा ! खुर्चीचा जो काही थोडाफार आराम बसणाऱ्याला मिळे तो महिलावर्गाच्या सिनेमाबद्दलच्या धावत्या वर्णनाने हिरावला जाई. काहींची रडती, दूधपिती मुलं सोबत असल्याने, त्यांचे रडणे थांबवून त्यांना गप्प करणे, हे पडद्यावरील दृश्यापेक्षा महत्वाचे असे. बाकी बाक आणि खुर्च्यांत आजच्या हिशोबाने फारसा काही फरक नव्हता. जो काही थोडा फरक डोळ्याने दिसे, तो त्यांवर प्रत्यक्ष बसल्यावर मनातून निघून जाई आणि दोघांतील साधर्म्य जाणवे. तीन किंवा चार इंटरव्हल संपूर्ण सिनेमात होत. त्यांतील एका वेळी, ‘इंटरव्हल’ हा शब्द समोर येई, त्यामुळे तो इंटरव्हल आहे, हे निश्चित सांगता येई, तर इतर वेळी असा शब्द न येता सिनेमा बंद होवून थिएटरात लाईट लागत, त्यामुळे त्याला पण प्रेक्षकांना इंटरव्हल मानण्यावाचून गत्यंतर नसे.
एखादे वेळेस सिनेमा पहाता पहाता कोणाला, जनावर निघाले असे देखील जाणवे. त्यावेळी तर मग हे प्रेक्षक पडद्याकडे पहायच्याऐवजी, जमिनीवर उड्या मारत खाली जमिनीवर काही दिसते का हे शोधत. अंधार असल्याने कोणाला काही दिसत नसे, मात्र बहुतेकांजवळ आगपेटी असल्याने, थोड्यांच वेळांत बहुतेकांच्या हातात पेटत्या आगकाड्या दिसत. एका बाजूस ही अशी पेटत्या आगकाड्यांची दिवाळी दिसली, की दुसऱ्या भागातील मंडळी पण, मग पाय वर करून लगबगीने बाक किंवा खुर्च्यांवर उभे राहून ‘सर्रर्र सर्रर्र’ असे आवाज करत, या दिवाळीत आपल्या जवळच्या आगकाड्या ओढून सहभागी होत. या गडबडीत पेटती काडी कोणाच्यातरी अंगावर पडे, किंवा निदान काडी ओढणाऱ्याच्या तरी बोटाला चटका हमखास बसे. मग, ‘हात तेच्या बाड्झवू’ या प्राथमिक शांतीमंत्रापासून सुरूवात होवून, नंतर मुख्य मंत्र खणखणीतपणे म्हटले जात. मग एकदम, ‘हा गलका काय झाला’, हा विचार करून, तिथला डोअरकिपर आंत डोकावला, तर त्याच्याकडे पहात, भन्नाट जोडशब्दांची उधळण करत ! अन् मग थिएटरांत तात्काळ लाईट लागत ! —- हे आणीबाणीचे इंटरव्हल ! हा पण प्रसंग एखादवेळेस येई ! मात्र त्याचे फारसे कोणाला काही वाटत नसे. ‘शेजारी रान आहे, जनजनावर निघतेच’ ही अशी एकमेकांची समजूत घालत, पुढचा सिनेमा पहायला प्रेक्षक तयार असत. ‘लिंक’ तुटण्याच्या पलिकडची ही मंडळी खरी सिनेमाची मायबाप आहेत. त्यांचे प्रेमही तसेच व रट्टे पण तसेच !
दुसरी टॉकीज म्हणजे लोहार कंपनींची ‘लक्ष्मी टुरिंग टॉकीज’ ! ही ओपन टॉकीज ! प्रत्यक्ष आकाशातले ग्रहतारे पहातापहाता येथे सिनेमा पण पहाता येत असे. येथील प्रेक्षक हे कोणत्याही कारणावरून नेहमीच पडद्यावरील मारामारी व प्रसंग, आपापसांत आणि त्याच थिएटरांत, तेथेच करून बघण्याची अपेक्षा करत, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना संपूर्ण सिनेमा सुखरूप पहायला मिळणे, हे एक दिव्यच असे. त्याचा परिणाम, जे या प्रयोगात भाग घेत नसत, त्या प्रेक्षकांवर पण होत असे. त्यामुळे येथे तुलनेने जास्त सुरक्षा लागे. यांवर टॉकीज मालकांनी ही नेहमीची सराव परिक्षा टळावी यासाठी, चांगले व जुने सिनेमे आणायचे धोरण ठेवले होते. कोणी गोंधळ करायला लागले, की प्रेक्षकातीलच अंतर्गत सुरक्षारक्षक बाकीच्यांना, दोनदोन देवून, गप्प करत व तुलनेने थिएटर मालकावरचा ताण कमी होई.
आमच्या गांवाचे रक्षण समर्थपणे करू शकणारा भाग म्हणजे - बैठक, थडा व बाहीरपुरा ! या भागातील लोक या सिनेमा थिएटरच्या आंतील किरकोळ दंगामस्तीला थोडीच दाद देणार होते. लाईट लावून पाचसहा टॉकीज मालकाच्या घरचीच मंडळी थिएटरांत आली, की हा गोंधळ लगेच आटोक्यात येई ! टॉकीज मालक बैठकवरचे ! खरोखर आमच्या गांवात, या प्रत्येक भागाची स्वतंत्र बटालियन असावी, आमच्या गांवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायमचा सुटेल; हे माझे प्रामाणिक मत आहे.
तिसरे सिनेमा थिएटर म्हणजे - तिरूपती चित्र मंदीर ! अत्यंत सुंदर बांधलेले, छान व्यवस्था असलेले हे थिएटर ! बहुतेक ‘राम तेरी गंगा मैली’ या राज कपूरच्या चित्रपटाने या थिएटरची सुरूवात झाली. आमचे गांव सुधरले आहे, हे गांवात येणाऱ्या पाहुण्यास दाखवायचे असले, तर गांवातील मंडळी त्याला, ‘तिरूपती चित्र मंदीरात’ सिनेमा पहायला घेऊन जात. चित्रपट पाहून आल्यावर पाहुण्याला थिएटर कसे आहे हे विचारण्याची गरज नसे, त्याने इंटरव्हलच्या अगोदरच ‘थिएटर मस्त आहे’ हे कबूल केलेले असे.
आमच्या सरदार जी. जी. हायस्कूल येथे पण काही सुंदर चित्रपट विद्यार्थ्यांना शाळेकडून दाखविले जात. मी शाळेत ‘शेजारी’ हा चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांचा गजानन जागीरदार यांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेला चित्रपट पाहिलेला आहे. या विद्यार्थ्यांच्या वानरसेनेला समर्थपणे व प्रेमाने आवर घालणारी त्यावेळची आमची गुरुजन मंडळी होती. कै. वि. ब. दीक्षित, कै. एम्. पी. कोल्हे, कै. आर. बी. जोशी, श्री. एस्. एस्. तिवारी, श्री. के. एम्. पाटील वगैरे !
पंचवीस पैशात आमच्या मराठी शाळेने दाखवलेला आणि ‘स्वस्तिक टॉकीज’मधे बघीतलेला आचार्य अत्रे यांचा सुवर्णकमळ विजेता ‘श्यामची आई’ हा सिनेमा असो ! ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटातील प्रसंगात भूलोकीची अप्सरा असलेल्या मधुबालावर ‘रजपूत का वचन’ निभावण्यासाठी तुरूंगातून सुटका करण्यासाठी आलेला सलीमचा दोस्त अजित, हा पाणी शिंपडतांना, ‘आमच्या अंगावर का पाणी पडतेय’ या साधर्म्याने अवाक् झालेले आम्ही, प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्याने ‘लक्ष्मी टुरिंग टॉकीज’ मधून, त्या मधुबालाचे पुढे काय झाले, याचा विचार न करता, घरी धावतधावत येणारे आम्ही ! किंवा हाच सिनेमा संपूर्ण रंगीत केल्यावर ‘तिरूपती चित्र मंदीरात’ बघीतल्यावर, ‘वकिलसाब, कोई ऐसा सिनेमा हो, तो हमें देखने आना अच्छा लगता हैं’ म्हणणारा चिवडा विकणारा भैय्या असो ! या अशा मंडळींनी व तेथे पाहिलेल्या या अशा सिनेमांनी, माझी सिनेमा थिएटरची आठवण जिवंत ठेवलेली आहे. ही तिन्ही थिएटर आता कालौघात बंद झालेली आहेत, असे ऐकतो आहे. पण यासंबंधीच्या माझ्या आठवणी मात्र कशा बंद होणार ?
मुलं आता येथे म्हणतात, ‘बाबा, पीव्हीआरला —- हा मूव्ही लागला आहे. चांगला आहे, तुम्हाला आवडेल. तुमच्या दोघांची तिकीटे काढली आहेत. नाही म्हणू नका.’ आम्ही दोघं जातो, जावं लागतं. तसं मी बऱ्याच वेळा मुलांच्या किंवा माझ्या गृहमंत्र्यांच्या आग्रहाने सिनेमाला जातो. माझा रिकामा वेळ व त्या सिनेमाचा वेळ, याचा योग येता येता, सिनेमा बदलून जातो, पहाणे होत नाही. काही वेळा हे सर्व जमतं व आम्ही जातो. येथील टॉकीज चांगलीच आहे. आंत बसल्यावर गार वाटतं. आवाज, चित्र छान दिसतं. चित्रपट चांगला असेल तर तो पण आवडतो.
येथे संपूर्ण चित्रपटात एकच होणाऱ्या इंटरव्हलला कोणीतरी येते ‘खायला काय हवे’ म्हणून विचारतो. मी ‘काही नको’ म्हणून सांगतो, सवयीने ! कारण पूर्वीच्या इंटरव्हलला त्यावेळी मिळणारी पाच पैशाची शेंगदाण्याची पुडी घेण्याची आमची इच्छा असायची, पण हिंमत होत नसे. काही गोष्टी आपल्या कशा व केव्हा अंगवळणी पडतात लक्षातच येत नाही.

11.2.2018

No comments:

Post a Comment