Saturday, August 12, 2017

खान्देशातील राणूबाईचे रोट

खान्देशातील राणूबाईचे रोट

श्रावण महिना सुरू झाला की मनावर निवांतपणाची थोडी पातळ साय जमा होऊ लागते. निसर्ग हा फार मोठा मानसशास्त्रज्ञ आहे. मन प्रसन्न करावे, भिती घालावी, मनावर काळीशार उदासी पसरवावी तर त्यानेच ! मात्र आता या श्रावणात हिरवागार निसर्ग आसपास दिसत असतो. 'क्षणात उन तर क्षणात पाऊस' अशी अवस्था दिसते. त्यासाठी 'बालकवी' असावयास हवे पण ते आपल्याला कसे शक्य आहे ? अशी उनपावसाची गंमत अलिकडे फार दिसत नाही. अलिकडील काही वर्षांत पावसाचा कमालीचा लहरीपणा पाहिल्यावर निसर्गाने पण 'श्रावणमास' त्याच्या जागेवरून हलवला की काय कोण जाणे ? पण आम्ही 'उनपावसाची' लहानपणी नियमीत गंमत पाहिली आहे. 'चिमणाचिमणीचे लग्न' म्हणायचो त्याला आम्ही ! बिचारे चिमणाचिमणी 'चातुर्मासात' भर उनपावसात कसे लग्न करत असतील ? पण आसपास हिरवीगार रानं ! शेतकऱ्याला आपल्या हंगामाचा साधारण अंदाज आलेला असतो. उडीद, मूग, चवळी तरतरून येत असते. ही त्यांच्या लग्नाची लगबग ! पाखरांना अजून लग्नाला कोणता उत्तम काळ हवा ?
नागपंचमी नंतर नारळी पौर्णिमे दरम्यान येणाऱ्या रविवारी 'रोट' असतात 'राणूबाई कान्हूबाईचे' ! खान्देशात बहुसंख्य घरी रोट असतात. 'आदित्य राणूबाईची कहाणी' वाचायची या दिवशी ! सूर्यदेवतेची व देवीची पूजा असते. काहींकडे सूर्योदयाचे तर काहींकडे सूर्यास्तादरम्यानचे रोट असतात. काही भाग्यवानांकडे दोन्ही वेळचे 'रोट' असतात. आज घरी गांवी 'रोट' होते.
'रोट' हा सण म्हणजे आमचे समस्त घराण्यातील मुलं, मुली आठवून सर्व मुलांच्या प्रत्येकी पाचपाच मुठी व मुलींच्या, सुनांच्या तीनतीन मुठी गहू घ्यायचे, ते दळून आणायचे. मुलींच्या गव्हाच्या मुठी त्यांच्या लग्नापावेतोच ! मला लहानपणचे आठवते की जात्यावर हे गहू आजी तिच्या नेहेमीच्या बाईकडून अगोदरच सोवळ्यात दळून घ्यायची. काही वेळा ती बाई उपलब्ध नसायची. मग मोठीच गंमत, ते रोटाचे दळण मग दळायच्या - वहिनी आणि माझी आई. त्या दिवशी उपवास करावा लागे. माझ्या मोठ्या काकूंना सर्वजण 'वहिनी' म्हणायचे.
या पद्धतीने व अडीअडचणीतून दळले गेलेल्या गव्हाच्या पीठाचे, त्या दिवशी 'रोट' बनवले जायचे, तरी भरपूर पीठ उरायचे; मग ते रोज वापरून संपवून टाकावे लागत असे. जात्यावर दळलेले पीठ आपल्या नेहेमीच्या पिठाच्या चक्कीप्रमाणे बारीक येत नसे. मग त्याच्या पोळ्या या जरा जाडसर होत, आम्हा मुलांना खाण्यास जीवावर येई. 'देवाचे रोट' नाही कसे म्हणणार ? मग खात असू, खावे लागत ! दिवसेंदिवस दळणारी मिळणे अवघड होवू लागले. धाकट्या काकू आल्या होत्या. ही पद्धत पाळणे नविन काळाच्या दृष्टीने टाकावू, त्रासदायक व अडचणीची होती. बदलणे आवश्यक होते. शेवटी आजीने एकदा रोटाचे दरम्यान पिठाची चक्की चालविणाऱ्या 'मुरलीधर पटेल' यांना माझ्या आईमार्फत सांगीतलं, 'इतकी वर्षे जात्यावर रोटाचे सोवळ्यात दळून घेतले. आता दळणाऱ्या मिळत नाही. तुझ्याकडून दळून घेत जाईन पण सोवळ्यात दळावे लागेल. जमेल का ? काय जे पाप लागेल ते मला लागू दे.' यांवर मुरलीधर काकांचा नकार येणं शक्यच नव्हते. मग आम्ही 'आई उद्या सकाळी रोटाचे दळायला आणणार आहे.' हा निरोप द्यायचो. दुसऱ्या दिवशी सकाळीच सुस्नात होवून, गिरणी स्वच्छ सारवून मुरलीधर काका आमची वाट पहात असायचे. त्या दिवशी कितीही गर्दी असली तरी 'रोटाचे' दळल्याशिवाय गिरणी सुरूवात होणार नसायची, म्हणून आम्हाला म्हणजे आईला लवकरच जावे लागे.
रोटाच्या दिवशी राणूबाईची पूजा म्हणजे आपली नेहमीची देवाची पूजा झाल्यावर, मधल्या घरात चौरंगावर धान्य अंथरून त्यांवर पाणी भरून कलश ठेवला जाई. त्यांवर नारळ ठेवले जाई. हे राणूबाईचे नारळ म्हणून बऱ्याच वर्षांपासूनचे असे. त्या नारळास व्यवस्थित खण गुंडाळला जाई, डोक्यावरून पदर घेवून दोन्ही कान व गाल गुंडाळून घेतल्यावर फक्त चेहरा दिसेल असे ते दिसे. त्याला नथ पण घातली जाई. चौरंगाभोवती केळीचे छोटे खांब छान दिसत. मग राणूबाईची पण नेहमीप्रमाणे पूजा होई.
जेवणांत त्या दिवशी तिखटाचा व मिरचीचा वापर नसे तर मिरे किंवा आलं वापरावं लागे. त्या दिवशी भात केला जाई पण वरण केलं जात नसे तर कढी केली जाई. भाजी असे ती दोडक्याची ! हरबऱ्याच्या डाळीचे मुटकुळे म्हणजे त्याला नारळ म्हणायचे ! पुरणपोळीचा नैवेद्य तर असेच. तांदुळाची खीर ! रोटाच्या कणकेच्या पोळ्या असत. उरलेली कणीक पुरणाच्या आरतीसोबत देवीजवळ ठेवली जाई. मग ती रोटाची कणीक संपेपर्यंत वरण नाही.
आमचेकडे रोट सायंकाळचे असल्याने जेवायला भरगच्च उशीर होई मग जेवणही भरगच्च असे. या विविध गोंधळ घालून बनविलेल्या पदार्थात माझ्यादृष्टीने कधीही वादग्रस्त नसलेला पदार्थ म्हणजे 'पुरणपोळीच' ! पुरणपोळी असल्यावर मग इतर कोणते पदार्थ आहेत यांकडे अजिबात लक्ष न देता मी निमूटपणे पुरणपोळी खाई. इतर पदार्थांची मला आठवण पण येत नसे.
काल आमच्या वकिल मित्रांकडे गप्पा मारत बसलो होतो. बोलताबोलता विषय निघाला. म्हटलं 'उद्या रोट आहे.' त्यांना 'रोट' या सणाची कल्पना नव्हती कारण ते मराठवाड्यातले ! भारतात विविध भागांत विविध चालीरिती, सणवार असतात. खान्देशमधील 'रोट' आणि भाद्रपदातील 'भुलाबाई' मला इकडे मराठवाड्यांत दिसत नाहीत. मग खान्देशमधील 'राणूबाई व कान्हूबाईचे रोट' यांची घरची आठवण आली.

३० जुलै २०१७


No comments:

Post a Comment