Saturday, August 12, 2017

दिव्याची अमावास्या

दिव्याची अमावास्या

आज आषाढ वद्य अमावास्या, 'दिव्यांची अमावास्या' ! अलिकडे 'दिव्यांची अमावास्या' हा शब्द आपल्या हळूहळू विस्मृतीत जात आहे तर 'गटारी अमावास्या' हा शब्द हळूहळू जनमानसांत रूळत आहे, रुजवला जात आहे, जास्त परिचित होत आहे, केला जात आहे.
लहानपणापासून मला वाचनाची आवड ! मला वाचायला काहीही आवडते. माझे क्षेत्र कायद्यासंबंधाने असले पण मी साहित्याची, आयुर्वेदावरील पुस्तके वाचलेली आहेत, इंजिनिअरींगवरील वाचली आहेत, ज्याेतिष्यावरची वाचली आहेत, संगीतावरील वाचली आहेत, वगैरे. ! यांतील मला किती समजते याचे उत्तर मी देणार नाही. संतसाहित्य, लोकसाहित्य वगैरे वाचायला तर मला आवडतेच !
आपल्या लोकसाहित्यात कथाकथनांसोबतच काहीतरी समाजप्रबोधनाचे काम देखील नक्कीच केले आहे, ते दिसायला फक्त दृष्टी हवी. आपण विविध, नाही त्या बाबी, डोळे ताणताणून पहात असल्यास, आपल्या दृष्टीवर विपरीत परिणाम होवून, ती अधू होते. मग आपल्याला काही बघण्यासाठी चष्मा लावावा लागतो. मग त्या चष्म्यातून जे दिसणार, जसे दिसणार तसेच जग आहे, हे आपण मानू लागणार !
लोकसाहित्यात कहाण्या पण येतात. आज दिव्याची अमावास्या ! लहानपणी नियमीत वाचलेल्या कहाण्यांची आठवण झाली. श्रावण महिनाभर रोज कहाणी वाचायची, सुरूवात या दिव्याच्या अमावास्येस व्हायची. या दिवशी घरातील सर्व दिवे बाहेर निघायचे, वापरात असलेले व नसलेले देखील ! निरांजन, समया या देवापुढे नियमीत असायच्या. मात्र मोठी समई ही सणावाराला, दिवाळीला व या दिवशी काढली जायची. रॉकेल किंवा घासलेटवर चालणाऱ्या दिवट्या, चिमण्या व कंदील ! घासूनपुसून चकचकीत व्हायचीत. रांगोळीने धातूचे दिवे चकचकीत व्हायचे, साबणाच्या पाण्याने कांचेच्या कंदील-चिमण्यांच्या कुंड्या चक्क करायचो तर कंदील-चिमण्यांचे कांच राखेने व त्यानंतर कोरड्या फडक्याने स्वच्छ केले जायचे. ते चमकत असायचे. समयांसाठी वाती तर निरांजनांना फुलवाती ! चिमण्या, दिवट्यांना गोल वाती तर कंदीलासाठी रूंद चपटी वात असायची ! मग ही सर्व चकचकीत, चमचमणारी मंडळी पूजेसाठी पाटावर बसायची. पाटावर थोडे गहू, धान्य टाकलेले असायचे. पाटापुढे रांगोळी काढलेली असायची, त्यांवर हळदकुंकू टाकले जायचे कारण फक्त पांढरी रांगोळी नको. पाटासमोरच उदबत्तीच्या पितळी घरात उदबत्ती जळत असायची व शेजारी फुलवात जळत असायची, छोट्या निरांजनांत ! सर्व दिव्यांना हळदकुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा व्हायची ! हात जोडले जायचे व मनांत प्रार्थना व्हायची; उघडपणे ऐकू यायचं, 'सर्वांना सुखी ठेव' ! मग कहाणी सुरू व्हायची.
आपल्या संस्कृतीतील 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना प्रार्थनेच्या रूपांत, 'सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामय:' ही खूप खोलवर झिरपली आहे.
-------- ---------- -------- ------
ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होते, तेथे एक राजा होता. त्याला एक सून होती. एके दिवशी घरातील पदार्थ तिने स्वत: खाल्ला, मात्र आळ उंदरांवर टाकला. त्यांना वाईट वाटले, सूड घेण्याची इच्छा झाली. रात्री त्यांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरूणांत नेवून टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. घरांतील सासू-दिरांनी, तिची निंदा करून तिला घरातून हाकलून दिले.
त्या सुनेचा नित्य नेम असे. दिवे घासावेत, तेलवात करावी, ते स्वत: लावावेत. खडीसाखरेने त्याच्या ज्योती साराव्यात. दिव्याच्या अमावास्येस त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. हे सर्व सुनेला घरातून हाकलल्यावर बंद पडलं.
पुढं एकदा राजा अमावस्येचे दिवशी शिकारीहून येत होता. झाडाखाली मुक्कामास थांबला तर तेथे एक चमत्कार दिसला. त्याच्या गांवातील दिवे अदृश्यरूप धारण करून झाडावर बसले आहेत आणि एकमेकांशी गप्पा मारत आहे, त्यांना कशी पूजा मिळाली ते सांगत आहेत. राजाच्या घरचा दिवा बोलू लागला, 'यंदा माझ्यासारखा दुर्दैवी कोणी नाही. दरवर्षी माझा थाटमाट असायचा, सर्वांत मी मुख्य असायचो. यंदा त्याच्या सुनेला विनाकारण घरातून घालवून दिले' आणि त्याने सुनेने उंदरांवर कसा खोटा आळ टाकला, त्यांनी कसा सूड घेतला, त्यामुळे सुनेला घरातून कसे बाहेर काढले; ही सर्व कथा सांगीतली. 'मात्र सून कोठेही असो, ती तिथं खुशाल असो', हा आशीर्वाद दिला.
राजाला सत्य समजले, पश्चात्ताप झाला. तो घरी आला. त्याने सर्व चौकशी केली. कोणी प्रत्यक्ष पाहिले काय, याची चौकशी केली. तिचा दोष नाही हे समजले. तिला मेणा पाठवला, क्षमा मागितली, घरी बोलावले, सर्व घरांत प्रमुखत्व दिले. ते सर्व सुखाने रामराज्य करू लागले. त्यांना जसा दीपक पावला. तिच्यावरचा आळ टळला, तसा तुम्हाआम्हास पावो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !
-------- --------- ---------- -------
या लोकसाहित्याला आपल्या नागरी साहित्याचे मापदंड आपण लावायला नकोत तर त्यांतील भावनांना, त्यांतील विचारांना बघायला हवे. हे असे साहित्य लिहीणारी मंडळी खूप मोठी साहित्यीक होती का, या वादात जावून निष्कारणच मूल्यमापन करण्याच्या सव्यापसव्यात पडण्याऐवजी, ती तुमच्या आमच्यासारखी मंडळी होती, हे गृहीत धरावे. त्यांच्या मनाला काही लिहावेसे वाटले तर ते लिहून जायची. बघा, त्या लिखाणावर त्यांचे नांवसुद्धा मिळत नाही.
या कहाणीतून कोणते साहित्यीक मूल्य गवसले हे सूक्ष्मदृष्टीने वा काकदृष्टीने पहाण्याऐवजी, त्यातून सर्वसामान्यांस काय समजले तर - कोणावर खोटा आळ टाकू नये, मग तो मनुष्य असो का प्राणीपक्षी असो. त्याला पण जीव असतो. तो पण त्याचा प्रतिकार करू शकतो. त्याचे परिणाम आपल्यांस भोगावे लागतात. नीट चौकशी केल्याशिवाय शिक्षा करू नये अन्यथा निरपराधास कोणत्याही कारणावरून शिक्षा होवू शकते. आपण चुकी केली असेल तर त्याचा पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागण्यात कसलाही कमीपणा नाही, अगदी राजाला पण नाही. आपल्या केलेल्या भल्याबुऱ्या कर्माचे फळ आपल्याला बरोबर मिळते. आपण सत्कृत्य करत रहावे. हे सर्व इतक्या सोप्या भाषेत अजून कसे सांगता येणार. समाजप्रबोधन म्हणजे यापेक्षा वेगळे काय आहे ?
आज सकाळी उठलो, जळगांवी निघतानिघता आठवण झाली, ती उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावणमासाची ! महिनाभर वाचल्या जाणाऱ्या कहाण्यांची आणि त्याची सुरूवात करणाऱ्या या 'दिव्याच्या अमावस्येच्या कहाणीची' !

२३ जुलै २०१७

No comments:

Post a Comment