Saturday, August 12, 2017

तपकीर व लॉटरीचे तिकीट

तपकीर व लॉटरीचे तिकीट
माणसाला व्यसनं खूप असतात. काही वेळा तर छंदाचे रूपांतर व्यसनांत होते. दारू, सट्टा, पत्ता, गांजा, बाहेरख्यालीपणा वगैरे ही दबदबा असलेली मोठी व्यसने करणे व पार पाडणे साधी गोष्ट नाही. त्याचे काय भलेबुरे परिणाम होणार असतात ते होतातच ! पण सुपारी, तंबाखू, चहाकॉफी, तपकीर, लॉटरीची तिकीटे घेणे वगैरे तुलनेने किरकोळ असणारी व्यसने सांभाळणारे पण बरेच जण आहेत. तपकिरीचे व्यसन अलिकडे बरेच कमी झाले आहे, असे वाटते.
मला हे आठवण्याचे कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून वडिलांची आठवण येतेय. त्यांचा सरळमार्गी, पापभीरू स्वभाव ! सर्व कुटुंबासाठी ते शेवटपर्यंत देत राहिले. दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी ते आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांना व्यसन म्हणता येईल अशी दोन व्यसने, 'तपकीर' ओढणे आणि 'लॉटरीचे तिकीट' काढणे ! आई नेहमी बोलायची. 'तपकिरीने काय फायदा, तब्येत खराब होते.' येथे त्यांच्या डोळ्याचे आॅपरेशन करायचे होते. त्यांना डॉक्टरांनी तपकीर ओढू नका सांगीतले. काय करणार, मग शेवटी शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून तपकीर ओढणे सोडले होते.
त्यांचे तपकीर आणण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या वर्गमित्राचे, चंपालालशेट लोहार यांचे 'विश्वकर्मा जनरल स्टोअर्स' किंवा शारंगधरशेट कासार यांचे 'सौभाग्य वस्तू भांडार' ! तिथे गेल्यावर मनसोक्त गप्पा व्हायच्या, एकमेकांची सुखदु:ख जाणून घेतली जायची, ख्यालीखुशाली विचारली जायची, गल्लीतल्या तसेच गांवातल्या आणि देशांतल्या राजकारणावर चर्चा व्हायची व तपकीर पण शेवटी घेणं व्हायचे. बहुसंख्य वेळा मी सोबत असायचो, मी या चर्चेने कंटाळून जायचो. मात्र नंतर मी शाळेत जायला लागल्यावर मी एकटाच जावून तपकीर आणायचो. त्यांना लागायची ती मद्रास तपकीर ! तोळ्याच्या हिशोबाने मिळायची.
आमच्याकडे गांवी स्वयंपाकाच्या गॅसची सोय फार उशीरा म्हणजे सन १९८६ च्या दरम्यान आली. सर्व काम चुलीवरच ! मग काही वेळा लाकडे असायची तर काही वेळा शेतातील तुरखाट्या-पळखाट्या पण असायच्या ! सकाळच्या वेळी एखादेवेळी, 'सूनबाई, माझा पोरगा आहे का ?' अशी विशिष्ट स्वरांत हाक आली की आई भाऊंना सांगायची, 'दलालीण काकू आल्या. तपकीर संपली असेल.' असे म्हणत ती चहाचे आधण ठेवायची किंवा ठेवलेले असेल तर वाढवायची. 'दलालीण काकू' म्हणजे संपूर्ण रावेर गांवच्या 'दलालीण काकू' ! त्यांना नांवाने ओळखणार नसत की काय कोणास ठावूक ? आमच्या गल्लीच्या पार शेवटच्या टोकावर यांचे घर ! आमच्या भोकरीकर गल्लीत कोणाच्याही घरी कोणाबद्दल परकेपणा नव्हता. कै. धोंडोपंत दलाल म्हणजे 'दादा' ! यांना गल्लीतल्या पोरांनाच काय पण त्यांच्या आईवडिलांना पण रागवायचा हक्क होता. त्याबद्दल कोणाला काही वावगे पण वाटत नसे. रागावल्यावर त्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार वागावे लागे, त्याकडे दुर्लक्ष केले जात नसे. आजच्या सारखे घरातील काका-काकू, आजी-आजोबा हे मुलांना बोलल्यावर, त्यांचा अधिकार काढणारे मुलांचे आईवडिल त्यावेळी नव्हते.
आणि मग दलालीण काकू डुलतडुलत, नऊवारी पातळ सावरत यायच्या, त्या थेट मागच्या घरांपर्यंत ! पण मग अंगणातूनच त्यांची हाक येई, 'सूनबाई, चहा ठेव. हं, मोरया, तपकिरीची डबी कुठे आहे ?' अशी एक आज्ञा आईला आणि एक भाऊंना दिली जायची. आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचो. आईने त्यांच्या चहाची व्यवस्था अगोदरच लावली असायची. नऊवारी पातळ नेसलेल्या दलालीण काकू यायच्या, चुलीसमोर बसायच्या. आणि भाऊ तपकिरीची डबी द्यायचे. डबीचे झाकणावर टिचकी वाजवून डबी उघडून मग छान तपकीर ओढायची. समाधानाचा श्वास झाल्यावर, 'सूनबाईचा' चहा समोर आलेला असायचा. चहा निवांतपणे पितळीतून प्यायल्यावर, मग दलालीण काकूंचा भाऊंशी संवाद सुरू व्हायचा. 'अरे, सकाळी उठले, अन् पहाते तर काय डबीत तपकीर नाही. काही उमजेना ! शेवटी म्हटलं चला, तुझ्याकडे मिळेल. तुझी वेगळी असते, पण धकवून घेवू. तपकिरीशिवाय चहा काही बरोबर लागत नाही.'
त्यांच्या थोड्या गप्पा झाल्यावर त्यांना मग माझी आठवण यायची. 'अरे, तपकीर आणायला सांग रे.' म्हणत त्या कनवटीला खोचलेल्या कापडी पिशवीतून पाच-दहा पैसे काढायच्या ! काही वेळा सोबत पिशवी असायची, तर काही वेळा नसायची. 'काकू, तुम्ही जा घरी. मला पण तपकीर आणायची आहे. तुमची पण आणायला सांगतो.' भाऊ काकूंना सांगायचे. 'बरं, पाठव त्याला घरीच. तपकीर घेवून. मी निघते आता.' म्हणत त्या उठायच्या, चालायला लागायच्या. जाताजाता माझ्या धाकट्या काकूंशी बोलायच्या.
मग मी भाऊंकडून पैसे घेऊन दुकानांत जायचो. वडिलांना 'मद्रास तपकीर' लागायची, हे मला माहिती होते. भाऊंकडून पैसे घेवून, थोडे जवळचे दुकान बघायचे म्हणजे शारंगधरशेट कासार यांचे ! एकदा त्यांच्याकडून तपकीर घेतली व दलालीण काकूंना नेवून दिली. त्यांनी पुडी उघडून पाहिली, त्यांना हवी असलेली तपकीर नव्हती. 'अरे, ही माझी तपकीर नाही. परत कर आणि माझी आण.' त्यांनी त्यांच्या तपकिरीचे नांव सांगीतले. पुन्हा दुकानावर जाणे आले. त्यांच्याकडून तपकीर बदलवून घेणे आले. अपमानास्पद प्रसंग, करणार काय ? कारण घरातील काम सोडून इतरांच्या कामाला नकार देण्याइतका बाणेदारपणा त्यावेळी आमच्यात नव्हता. ते कोणाचेही काम असो, पूर्ण व्यवस्थितपणे करावे लागे. त्यातून सुटका नसे. अलिकडची पिढी तुलनेने भाग्यवान ! काम न करून सांगणार कोणाला ? परत गेलो, शारंगधरशेट बसले होते. त्यांना तपकिरीची पुडी परत दिली व सांगीतले, 'ही नको. बदलवून दुसरी द्या.' त्यांनी तपकिरीचे नांव विचारले, मी आठवू लागलो. मला सांगता येईना. त्यांनी माझी अडचण ओळखली व विचारले, 'कोणाला तपकीर पाहिजे आहे ?' मी समस्या सुटल्याच्या आनंदात सांगीतले, 'दलालीण काकू !' 'मग, हे अगोदर नाही सांगायचे की दलालीण काकूंची तपकीर म्हणून ?' शारंगधरशेट बोलले. मला ऐकून घेणे भाग होते. त्यावेळी कोणासाठीपण कोणाचेही बोलणे ऐकावे लागायचे, एकंदरीत तडफ कमीच होती. आता नाही ऐकणार कोणी ! त्यांनी काळसर तपकिरीची पुडी बांधली व सांगीतले, 'त्यांची तपकीर दिली आहे. यापुढे त्यांना हवी असेल तर त्यांचे नांव सांगत जा.' ही त्यांनी समज दिल्यावर, मी ती पुडी घेतली व काकूंना आणून दिली. त्यांना प्रसंग जसा घडला तसा सांगीतला. त्या हसल्या. त्यांनी पुडी उघडून पाहिली व समाधानाने मान हलवून 'छान !' म्हणत चिमूटभर ओढली. ते 'छान' कोणाला होते हे अजूनही समजले नाही; बहुतेक शारंगधरशेट यांच्या धोरणीपणाला असावे.
----------- ------------ -----------
माझे वडील आपल्या आयुष्यात केव्हा तरी 'लॉटरी' आपल्याला लागेल या आशेने नियमीत 'महाराष्ट्र राज्य लॉटरी'ची तिकीटे घ्यायचे. दर महिन्याला दोन ते पांच तिकीटे ! ते नोकरीला होते तेव्हा हे प्रमाण जास्त होते, कारण गांवात रोज येणंजाणं असायचे. मात्र शेवटी नोकरीतून दोन वर्षांची मुदतवाढ मिळाल्यानंतर, निवृत्त झाल्यावर तुलनेने त्यांचे गांवात जाणे कमी झाले; मग म्हणून तिकीटे काढणे आपोआपच कमी झाले. 'तिकीटांमधे जेवढे पैसे गेले तेवढेपण पैसे काही आजपर्यंत लॉटरीतून मिळाले नसतील.' आमच्या आईचे नेहमीचे उद्गार ! यांवर 'असू दे ! मिळतील केव्हा तरी !' हा वडिलांचा तिला दिलासा. आईचा यांवर विश्वास नसे. तिकीटे मात्र ते स्वत:च काढत, कोणाला काढण्यासाठी पाठवत नसत.
कदाचित माझ्यावर आईच्या कडक स्वभावाचा परिणाम जास्त असावा. मी लॉटरीचे तिकीट आजपर्यंत फक्त दोनदा काढले, ती निदान पंचवीस वर्षांपूर्वी ! एकदा म्हणजे तिकीटे विकणारा फारच पोरसवदा मुलगा होता, त्याच्या 'साहेब, एक तरी तिकीट घ्या.' या विनंतीतील स्वर मला हलवून गेला म्हणून ! -- आणि दुसऱ्यांदा भुसावळला कोर्टातून येतांना, घाईगर्दीत तिकीटविक्रेत्याने अगदी अजीजीने म्हटले म्हणून ! दोन्ही वेळा मला बक्षीस मिळाले, पण नंतर मी तिकीट काढले नाही. 'परमेश्वराला जर आपल्याला काही द्यायचे असेल तर तो आपल्या कष्टांचे फळ देईल, बसल्याबसल्या तिकीट काढून घरी पैसे देणार नाही' ही माझी भावना !
आता काही वेळा समजते या वयांत, भाऊ लॉटरीची तिकीटे का घेत असतील ? त्यासाठी जवळचे पैसे का खर्च करत असतील ? आता त्यांच्या, म्हणजे वडिलांच्या भूमिकेत आता मी आहे. मग त्यांच्यापुढील त्यावेळच्या असंख्य अडचणींचा डोंगर डोळ्यापुढे येतो. त्यांची ओढाताण, मनाची घालमेल, परिस्थितीचा रेटा, त्याला तोंड देण्याची असलेली ताकद ! ------ आणि मग माझाच मी असं काहीतरी लिहून जातो.

६ ऑगस्ट २०१७

No comments:

Post a Comment