Saturday, August 12, 2017

सर्वांचा चेन्नई प्रवास - विमानाने


सर्वांचा चेन्नई प्रवास -  विमानाने 

गेले तीनचार दिवस आम्ही सर्व जण चेन्नईला गेलो होतो. अर्थातच सर्वांनी जाण्यासारखे काही विशेष कारण नव्हते. बऱ्यांच वर्षांपूर्वी दक्षिण व उत्तर भारत व्यवस्थित पाहून झाला होता. त्यावेळेस मुले फारच लहान होती, कडेवर होती. आईवडिल चांगले हिंडते फिरते होते. यापूर्वी दक्षिणभारत यात्रा ही आम्ही सर्वांनी १९९४ डिसेंबर मधे केली होती. दक्षिण भारतात जास्त आमच्या कड्यावर बसणारी व जेमतेम पायी चालणारी मुलगी होती. तिची आवडती जागा म्हणजे आजीच्या कड्यावर किंवा तिच्या आजीला आवडणारे ओझे म्हणजे तिची नात ! अशी या दक्षिण भारतातील यात्रेत योजना होती.
त्यावेळी यात्रेचे निमित्त होते 'भारतीय कृषक समाज' यांचे मार्फत दरवर्षी शेतकऱ्यांसाठी होणारे अखिल भारतीय संमेलन होते. हे मी प्रथमच पाहिले, खूपच छान होते. मी या संस्थेचा आजीव सदस्य आहे. त्यावेळेस मा. बलराम जाखर हे 'भारतीय कृषक समाज' याचे भारतीय अध्यक्ष होते. संमेलन होते तामिळनाडूतील कोईमतूर शहरात ! शासनातर्फे सदस्याच्या कुटुंबातील सर्वांना संमेलनासाठीच्या प्रवास तिकीटात ७५% सवलत होती. आम्ही दोघांनीही आणि आईवडिलांनी त्याला जायचे ठरविले. सोबत कड्यावरचे ओझे म्हणजे अर्थातच माझी छोटी मुलगी ! या निमित्ताने संमेलन संपल्यावर दक्षिण भारतातील इतर गांवे पहाता येतील. ही पण इच्छा ! कोणत्याही मोठ्या व जास्त काळाचा प्रवास मला टप्प्याटप्प्याने व रेल्वेने करायचा असेल तर मी सर्वप्रथम 'रेल्वे टाईमटेबल' विकत आणायचो. त्यातील सर्व ठिकाणच्या वेगवेगळ्या गाड्यांची वेळ, प्रवासाचा कालावधी, मुक्कामाची सोयीची जागा वगैरे पाहून आपल्याला आपला कार्यक्रम तयार करावा लागतो.
प्रवासासाठी आजही सर्वांना परवडेल व सोयीचे ठरेल असे तेच साधन आहे. त्याची जागा दुसऱ्या कोणत्या वाहतूक साधनाने घेणे कठीणच ! मी भुसावळ रेल्वे कार्यालयातून विविध फॉर्म भरत व सोबत त्या साठी विविध दाखले जोडत 'स्लीपर कोचचे' आमचे सर्वांचे तिकीट काढले ! ते 'भुसावळ ते कोईमतूर व परत' असे ! त्या तिकिटांची मुदत बहुतेक तेहतीस दिवसाची होती. मात्र इतर ठिकाणी त्या मार्गाव्यतिरिक्त जायचे असेल तर आपल्या पैशाने व नेहेमीच्या भाड्याने जावे लागणार होते. दरम्यान कोईमतूरहून इतर ठिकाणी जावून पुन्हा परत भुसावळला त्याच्या आंत परत यायचे होते. पण बराच मोठ्या पल्ल्याच्या भाड्यासाठी सवलत होती.
मग तयारी सुरू झाली प्रवासाची ! माझ्या पत्नीला कमालीची हौस आणि कामाचा उरक ! हिच्या दृष्टीस नसलेले काम दिसते व माझ्या दृष्टीस असलेले काम दिसत नाही. तयारी म्हणजे - घरातून फराळाचे जिन्नस तयार करणे, प्रवासाचे कपडे, मुलीसाठी संभाव्य औषधे वगैरे ! प्रवास जास्त दिवसांचा होता, नीट तयारी आवश्यक होती. निघालो - अहमदाबाद मद्रास या सुपर एक्सप्रेसने जळगांवहून संध्याकाळी ! गाडीत प्रचंड गर्दी ! आमच्या रिझर्वेशनला फारसा काही अर्थ राहिला नव्हता, पण बसायला जागा होती. गाडीतील टी. सी. तिकीट देण्यापेक्षा भांडण सुरू कसे होणार नाही याचीच काळजी घेत होता. प्रवासात सर्व आमच्या सारखीच मंडळी ! आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री मद्रास म्हणजे चेन्नईला पोहोचलो. मग तेथे एकेक ओळखीची मंडळी दिसू लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे मद्रासहून कोईमतूरला रेल्वे होती, तिने निघालो व साधारण दुपारी तीनचारच्या दरम्यान कोईमतूरला पोहोचलो. आमच्या सोबत त्या संमेलनास जळगांव जिल्ह्यातील बऱ्यापैकी शेतकरी मंडळी होती, पण हे तेथे गेल्यावर समजले. संमेलनात वेगवेगळे संशोधनात्मक उपकरणे, खतं, बी-बियाणं वगैरेंचे स्टॉल्स मांडले होते. माहिती खरोखरच छान मिळाली. जेवणाची थोडी अडचण झाली म्हणजे येथे फक्त भात व भाताचे प्रकारच विशेषकरून दिसत होते. आम्ही भाकरी-पोळ्यांवाले ! संमेलन आटोपले. आम्ही मग निघालो.
तेथून सर्वांसोबत खाजगी बसने दोनतीन ठिकाणे पहात रामेश्वरम् येथे आलो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ! अतिशय सुंदर मंदीर ! भगवान प्रभू रामचंद्रांनी स्थापित केलेले शिवलिंग ! समुद्रातील रेल्वे दुरूनच पाहिली, बसतां आले नाही.
दुसऱ्या दिवशी जगद्विख्यात ठिकाण, कन्याकुमारी बघायला गेलो. देवी कन्याकुमारी आपल्या भावी पतीची आराधना करत आहे. त्या मंदीरात गेलो. दर्शन घेतले. बोटीतून विवेकानंद स्मारकावर गेलो. सिंधुसागर, बंगालचा उपसागर आणि हा विशाल हिंदी महासागर तिथं एकत्र आलेले ! तीन वेगवेगळ्या छटा दिसायच्या, तिन्ही सागरांच्या ! कमालीचा जोरात वारा होता तिथं ! धडकी भरेल असा ! हिंदुधर्माची पताका जगभर फडकविणाऱ्या त्या महान युगपुरुषाच्या स्मारकाचे दर्शन घेतले. 'त्याच्या सूर्यासारख्या असलेल्या तेजाची पणती घेवून जाण्याचे तरी भाग्य मला मिळू दे' ही परमेश्वराजवळ प्रार्थना केली व सुंदर दर्शन झाले. तेथे मोठमोठे शंख खूप छान होते, एक घेतला.
प्रवासात आनंद येत होता. अजून बरीच ठिकाणे बघायची होती. तिकिटांची मुदत खूप शिल्लक होती. सोबतच्या लोकांची गती व आमची गती यांचा तालमेळ जुळेना ! शेवटी कन्याकुमारीहून संध्याकाळी टॅक्सीने त्रिवेंद्रमला आलो.
डिसेंबरचा अखेरचा आठवडा, तेथे त्रिवेंद्रमला आल्यावर लॉज मिळेना ! आम्ही हिंदी वा इंग्रजी बोलणारे आणि समोरचे मल्याळम् बोलणारे ! दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नसल्यावर संभाषणाची मजा काही औरच असते. शेवटी त्या टॅक्सीवाल्याच्या लक्षात आले. 'लॉज, रूम ?' त्याने विचारले. समजण्यात अजून गोंधळ होऊ नये म्हणून मी होकारार्थी मान हलवली. संपूर्ण भारतांत त्या खुणेचा अर्थ एकच असल्याने आमची अजून परवड झाली नाही. मग त्याने तेथील एकाला त्याच्या भाषेत विचारले. तो दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करणारा होता. तो लगेच तयार झाला, आमच्यासोबत निघाला. त्याला थोडं हिंदी येत होते. 'डोन्ट वऽरी. मैं । प्राब्लेम साल्व्ह !' या दर्जाचे ! पण आता लॉज मिळणार हे समजले. आम्ही आलो, आमच्या मुक्कामाची सोय झाली. तीनचार दिवस आम्ही तेथे होतो. त्या दरम्यान तो आमचा दुभाष्या होता. आम्ही पद्मनाभ मंदीर बघीतले. त्रिवेंद्रमचा नॅशनल पार्क बघीतला, समुद्रकिनारा बघीतला, प्लॅनिटोरिअम बघीतले. फारच सुंदर !
तेथील दोन आठवणी सांगतो. तेथे माझ्या वडिलांना दातदुखी उमळली ! पुन्हा मग आमचा दुभाष्या व वडील हे डॉक्टरकडे ! वडील याला हिंदीतून, इंग्रजीतून सांगायचे, मग हा त्याला यांतून जेवढे समजले असेल ते डॉक्टरांना मल्याळीत सांगायचा. वडिलांनी सांगितलेले इंग्रजी का याने सांगीतलेले मल्याळी समजले, हे तो पद्मनाभम् जाणे; पण वडिलांचे दांत दुखणे थांबले.
येथील दुसरा अनुभव म्हणजे - पद्मनाभम मंदीरात आम्ही सर्व जण दर्शनाला गेलो होतो. आमच्या गप्पा मराठीत सुरू होत्या. शेजारून तेवढ्यात आवाज आला. 'कुठले तुम्ही ?' मराठीतून विचारणा झाल्याने आम्हीही चक्रावलोच ! शेजारचे गृहस्थ विचारीत होते. 'तीन वार झाले, इकडील भागांत आलोय ! मराठी शब्द ऐकायला मिळेना हो ! तुमचं बोलणं ऐकलं अन् रहावलं जाईंना !' हे बोलतांना त्यांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी होते. इंडियन आॅयलचे मोठे अधिकारी होते. फिरायला आले होते. तेथे रेस्ट हाऊस मधे रहात होते. 'मराठी असे आमुची मायबोली' हे खोटं थोडीच आहे ?
--------------------------------------------------------------------------------------------------------
आयुष्यभर तालुक्याच्या ठिकाणी आईवडिलांनी काढलेले आयुष्य ! घरातील सर्व कामे ही कामे किंवा कष्ट नसून आपल्या दिनचर्येचा भाग असतो ही आमच्या संपूर्ण घरातीलच शिकवण ! वापरायला हौदभर आडाचे पाणी ओढणे असो का शेतातील आलेली धान्याची शिल्लक कणसे कुटून त्याचे धान्य तयार करणे असो. श्रावणातील रोटासाठी रोट दळणे असो का तयार केलेली डाळ मुसळाने कांडणं असो. त्यांत तिने कष्टाने सांभाळलेली तिची संगीतविद्या ! जवळपास तीन तप केलेले शास्त्रीय संगीत शिकवण्याचे कार्य !
आपली नोकरी संपूर्ण एकत्र कुटुंबासाठी सांभाळत, खेड्यापाड्यावर शेतावर जाणारे माझे वडील ! घरांतील काका ! पावसाळ्यात बैलसुद्धा जेथून जावू शकणार नाही अशा रस्त्याने समस्त शेतकरी जात, माझे काका, वडीलही जात ! आपला नोकरीतून वडिलांना मिळणारा पगार पहिल्या आठवड्याच्या आंत संपल्यावर पुढील संपूर्ण महिना काढणारे, शेतकरी वडिल ! शालेय जीवनातील या आठवणी मनाला आज पण अस्वस्थ करतात. महाविदयालयीन काळांत थोडी बरी स्थिती आठवते, तर महाविद्यालयीन शिक्षण संपून मी व्यवसाय सुरू केल्यावर जरा सुस्थितीचे अनुभव आले. नंतर चढउतार होत राहिले. गेल्या जवळपास दहाबारा वर्षांपासून मी इकडे औरंगाबादला स्थायिक झालो.
आपल्या या अशा सहजीवनाचा पन्नास वर्षांपेक्षा जास्त आयुष्याचा प्रवास अशा रस्त्यांनी त्यांनी, आईवडिलांनी, केलेला आम्ही पाहिलेला आहे. म्हणून काही दिवसांपासून मी आईला म्हणत होतो, 'आपण सर्वच चेन्नईला जावू, विमानाने !' आई नाही म्हणत होती. पण त्या निमित्ताने मला आईला न्यायचे होते, विमानाने ! वडिलांना पण न्यायचे होते, जमले नाही. गेल्या वर्षी ते आम्हाला कायमचे सोडून गेले. आजवरच्या आयुष्यात केवळ या आयुष्याचीच नाही तर पुढच्या आयुष्याचीही चाल, अशा खडतर रस्त्याने याच आयुष्यांत चालावी लागली तर शरीर थकणारच ! आयुष्यात ज्यांचा भरवसा धरावा, ज्यांच्यासाठी जगाशी वाईटपणा घेतला ते कृतघ्न झाल्यावर मन तर जास्त थकणार ! त्यांनी आयुष्यभर केलेल्या या खडतर रस्त्यावरील चालीने आपल्यासाठीचा खडतर रस्ता खूप कमी केला आणि आपल्याला चांगल्या रस्त्यावर आणून सोडले.
चार दिवसांपूर्वीच आम्ही सर्वच चेन्नईला गेलो होतो, विमानाने ! तेथील महाबलीपुरम् व कांचीपुरम पाहिले. तेथील मंदीरे पाहिली. आईला आमच्या परिने प्रवासात कसलाही त्रास होवू दिला नाही. रस्ताभर ती मुलांना म्हणत होती, 'तुम्हाला कड्यावर घेवून मी फिरले, आता म्हातारपणांत मला तुमच्या काठीने फिरायची वेळ आली आहे. ते असते, तर हे आठवडाभर गांवभर सांगत फिरले असते.' ती जे बोलून सांगत होती, सांगण्याचा प्रयत्न करीत होती त्यापेक्षा न बोललेले खूप होते. गेल्या पाच दशकांपेक्षा त्यांच्या जास्त काळाच्या सोबतच्या प्रवासातील आठवणी या चार दिवसांत आम्हाला आई काय सांगणार ? कोणाला सांगणार ? काही आठवणी सांगण्यासारख्या, तर काही न सांगण्यासारख्या ! काही मुक्तपणे वाटण्यासारख्या तर काही मनाच्या कप्प्यात खोलवर जपण्यासारख्या किंवा कायमच्या गाडून टाकण्यासारख्या ! काल रात्री घरी परत आलो.
आयुष्यभर खडतर रस्त्याने चालणाऱ्यास चांगल्या रस्त्याने चालतांना होणाऱ्या वेदना या शरीराच्या नसतांत तर गतकाळात केलेल्या पायपिटीच्या थकव्याचे मनावर उमटलेले व्रण असतात. ते ठुसठुसत असतात, मनातल्या मनांत !

१६ जुलै २०१७

No comments:

Post a Comment