Tuesday, September 5, 2017

शहरातील आणि गावातील आमंत्रण

शहरातील आणि गावातील आमंत्रण 

हा नुकताच तालुक्याच्या गांवातून म्हणजे खेडेवजा गांवातून, जिल्ह्याच्या गांवाला कॉलेजात शिकायला गेलेला ! या नविनच कॉलेजला गेलेल्या कॉलेजकुमारला व्यवहारांत काय समजते ? गांव सोडून, घर सोडून एकटे शिकण्यासाठी रहावे लागत असल्याने उगीचच त्याला आपण मोठे झालेलो आहे, असे त्याला वाटते; पण इतर मोठी माणसे त्याला लहानच समजत असतात, कारण एरवी त्यांच्यादृष्टीने तो लहानच !
मग चुकूनमाकून त्याला गांवातील ओळखीपाळखीचा, नात्यागोत्याचा तेथे कोणीतरी, केव्हातरी त्याला भेटला की या कॉलेजकुमारला बोलावतात, अगदी लाजेकाजेस्तव का होईना ! अर्थात अलिकडे ते पण प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेय ! जो तो आपापल्या कामात असतो.
मग आता त्याला नुसतंच कसं काय बोलावणार, म्हणावं लागते मग 'या रविवारी जेवायलाच ये' ! ते जरा बरं, भारदस्त व संस्कृती पाळल्यासारखं दिसतं ! बोलावल्यावर नाही कसं म्हणणार ? गांवातले संस्कार, सरळपणाचे किंबहुना भोळेपणाचे ! हा भोळा कॉलेजकुमार बिचारा रविवारी जातो, जेवायच्या वेळेला ! गप्पा मारूनमारून किती मारणार ? त्यांना पण भूकेची जाणीव व्हायला लागलेली असते. 'बरं, आता आला आहेस जेवायच्या वेळेला, तर जेवूनच जा !' जेवायला बोलावणाऱ्याचे उद्गार ! पोटात कावळे कोकलत असल्याने या वाक्याचा अर्थच समजत नाही. थोड्यावेळाने जेवण होते. हा घरी परत येतो.
गांववाल्यांस जिल्ह्याचे ठिकाणी शिकायला गेल्यावर तेथे कोणी जेवायला बोलावले तर खरंच जायचे नसते.

१७ ऑगस्ट २०१७

No comments:

Post a Comment