Tuesday, September 5, 2017

लहानपणचे गणपती आणि रोजची आरती

लहानपणचे गणपती आणि रोजची आरती

गौरी-गणपतीचे दिवस आले की बालगोपाळांची लगबग पहाण्यासारखी असते. त्यांना मोठ्या माणसांची लुडबूड चालत नाही, फक्त काही मदतीसाठी ते त्यांचा 'आर्थिक' हस्तक्षेप खपवून घेतात. गणपतीची मूर्ती आपल्याला आपल्या लहानपणी, मोठ्यातमोठी का आणली पाहिजे हे लहानपणीच समजते, ते जन्मजात ज्ञान मोठेपणी डोक्यातून निघून जाते व आपण मोठी माणसे बनून मुलांना रागविण्यासाठी तयार असतो. गणपतीची मोठी मूर्ती का हवी हे समजण्यासाठी तरी 'लहानपण दे गा देवा' ! मला वाटते आमच्या तुकाराम महाराजांनी 'लहानपण दे गा देवा' हा अभंग लहानपणीच लिहीला असावा, भलेही जरा मोठे झाल्यावर लोकांच्या ऐकण्यात आला असेल.
मूर्ती कुठून आणायची, कोणत्या दुकानांत कोणती मूर्ती चांगली आहे, ती आपल्याला उपलब्ध आहे का इतर कोणी घेतली हे गणपतीच्या सोंडेत दुकानदाराने घालून ठेवलेली चिठ्ठी बघीतली की समजणे वगैरे गोष्टी लहान असल्याशिवाय समजत नाही. जन्मजात असलेले हे ज्ञान हळूहळू जसजसे आपण मोठे होत जातो तसे कमी होत जात असावे. वयोमानाप्रमाणे आपला अनुभव व ज्ञान वाढते असे मोठी माणसं म्हणतात खरं, पण मी याला लहानपणापासूनच सहमत नाही. आता केवळ वयाने मोठे झाल्याने तो विचार बदलणे हे काही मला पटत नाही.
गणपतीसाठी आरास करण्याची तयारी सुरू होते. गणपती डोंगरावर बसवायचा तर मग धान्याचे पोते मातीच्या पाण्यात चांगले थबथबीत भिजवून ते जमिनीत गाडलेल्या लहानमोठ्या काठ्यांवर टाकायचे. आपोआप डोंगर तयार होतो. काही वेळा त्या ओल्या मातीने थबथबलेल्या पोत्याचे वजन सहन न होवून, त्या ओल्या पोत्यास डोंगरासारख्या विविध सुळक्यांचे आकार देणाऱ्या काड्या, धरणीवर लोळण घेतात, मग संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत होतो. पहातापहाता उभा असलेला डोंगर नेस्तनाबूत करण्याचा चमत्कार देव व निसर्गच घडवतो असे नाही, तर लहान मुले पण हे चमत्कार घडवतात. लहान बालकांना देवाचे रूप उगीच नाही म्हणत !
हे कसेबसे डोंगर पक्के बसले की मग त्यांवर 'आळींग' शिंपडावे लागायचे. डोंगर हिरवागार दिसायला हवा ! आळींग लवकर उगवते. पहिल्या दिवशी शिंपडले की तीनचार दिवसांनी डोंगर जरा हिरवा दिसायला लागतो. आळिंगाची रोपे उगवून वर आलेली असतात. जर हिरवागार डोंगर नको असेल व गणपती ढगांत विराजमान हवा असेल तर मग त्या डोंगरावर कापूसच कापूस पुंजक्यांच्या रूपात पसरवून ठेवावा लागतो. पण त्या अगोदर डोंगरात सर्वात मागील भागांत न विसरतां एखादा स्टूल ठेवून गणरायाच्या मूर्ती स्थापनेसाठी जागा तयार करावी लागायची. मात्र खालचा स्टूल दिसायला नको, गणपती डोंगरातच बसलेला दिसायला हवा.
रोज संध्याकाळी गल्लीतील मुले येवून प्रत्येकाचा घरी आरती म्हणणार. त्या अगोदर 'एक दोऽन तीन चाऽऽर, करा बऽसूनी विचार' ही तसेच 'गण्या गण्या गणपती, चाळीस कमळे झळकती', वगैरे गाणे म्हणायची. मात्र विचार बसूनच का करायचा, उभं राहून किंवा पडल्यापडल्या करता येत नाही का ? हा जिज्ञासू विचार त्या वेळी मनाला शिवत नाही. तसेच प्रत्यक्ष गणाधीश असलेल्याला 'गण्या गण्या' या नांवाने हाक मारणे हे उद्धटपणाचे दिसेल, त्यामुळे प्रत्यक्ष विघ्नहर्त्याचा आपण अपमान करू, देवादिकांना भलत्याच नांवाने संबोधणे वगैरे हे आपल्या संस्कृतीला धरून होईल का ? किंवा 'चाळीसच कमळं का झळकती, कमी किंवा जास्त का नाही ? तसेच 'कमळंच का, गुलाब किंवा झेंडू का नाही ? निदानपक्षी चमेली काय हरकत आहे किंवा गेल्याबाजारी मोगरा पण चालला असता, वगैरे शंका कोणाच्याही मनांत येत नाहीत. मनं नि:शंक असतात, अशा प्रत्येक विषयांत शंका उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षाचे मन त्यावेळेस आपल्या लहानपणी तयार झाले नसते, ते मोठेपणी परिपक्व होते व नाही त्या गोष्टीत शंका काढते.
गणपतीची सर्व गाणी म्हणून झाल्यावर मग आरतीची वेळ होते. वेगवेगळ्या आवाजातील, वेगवेगळ्या स्वरांत व विविध तालांत एकाचवेळी आरती म्हणून झाली की ती गणरायाला पावत असावी हा सर्वांचा पक्का समज असावा आणि त्याला गणरायाची पण फूस असावी अशी मला जबरदस्त शंका नव्हे खात्री आहे. 'अरे, नीट म्हणा. एका सुरात व तालात म्हणा. कसे म्हणताय ? टाळ्या कुठं चालल्याय ?' अशा स्वरूपाच्या या त्या घरातील वडिलधाऱ्याच्या सूचनेकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नसायची. आरती होवून प्रसाद घेतला की दुसरीकडच्या आरतीचे वेध लागलेले असायचे. 'अजून गाणी म्हणा. प्रसाद तयार होतोय.' अशी घरातून त्या मातोश्रीची सूचना आली की काही विशेष प्रसाद आहे, ही खूणगाठ बांधली जायची. मग उत्साहात वेगवेगळी गाणी आठवून आठवून म्हटली जायची. डोळा तयार होवून येणाऱ्या प्रसादावर असायचा ! मग प्रसाद यायचा, अपेक्षापूर्ती करणारा ! पण तो 'प्रसादा एवढाच' असायचा. मग तोंडात त्याची चव घोळवत दुसरीकडे आरतीला जायचे.
हे असे नऊ दिवस चालायचे. बदल व्हायचा थोडा तो 'महालक्ष्मींचे दिवशी' ! त्या दिवशी गणपती म्हणजे महालक्ष्म्यांजवळ ठेवला जायचा. तो सोवळ्यातला म्हणजे देव्हाऱ्यातला असायचा ! आमचा बालगोपाळांचा हा ओवळ्यातल्या ! प्रशस्तपणे बैठकीत असायचा, सर्वांच्या गराड्यात ! हे असं सर्वांपासून लांब सोवळ्यात बसणे गणपतीला, त्या गणांच्या नायकाला कसे आवडायचे देव जाणे किंवा तोच जाणे. दोन गणपती असायचे, त्यात काही वावगे नाही असे आजी म्हणायची. एकदा माझ्या मोठ्या काकांना, आम्ही त्यांना अण्णाकाका म्हणायचो, हुक्की आली. 'पोरांनो, दोनदोन गणपती काय मांडताय ? आपला देवातला गणपती असतो. तोच महालक्ष्मी जवळ ठेवायचा. असे म्हणाल्यावर आमच्या सारख्यांनी आजीला पुढे घालून दंगा न केला तरच नवल ! आपल्या ओवळ्यातील गणपतीवरील हक्क सोडायचा आणि त्या सोवळ्यातील गणपतीला आपले म्हणायचे ? 'अब्रह्मण्यम् !' शेवटी आजीच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, 'अरे, त्या पोरांच्या काय नादी लागतो. सणवार, उत्सव पोरांसाठीच असतात, आपल्या मोठ्यांसाठी असतात का ते ? त्यांना मजा वाटते, करू दे !' हा निर्णय आल्यावर अण्णाकाका आम्हाला घेऊन गणपती आणायला बाजारात गेले होते.
नऊ दिवसांच्या या नियमीत होणाऱ्या आरती नंतर, दहाव्या दिवशी आम्हा मुलांचा 'गण्या गण्या गणपती' पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी त्याच्या घरी जायचा आणि आम्ही बालगोपाळ सुन्न मनाने त्या आरतीच्या आठवणी मिरवणूकीत काढत फिरायचो. दुसऱ्या दिवशी शाळेत जायचे ते हरवलेल्या नजरेने आणि विसरलेल्या मनाने !

२७ ऑगस्ट २०१७

No comments:

Post a Comment