Friday, September 15, 2017

'गौरी लंकेश' हत्या

'गौरी लंकेश' हत्या 

आताच Praveen Bardapurkar यांचे 'गौरी लंकेश' या विषयाने त्यांच्या मनांत निर्माण झालेले व त्यांनी येथे व्यक्त केलेले विचार विचार वाचलेत.
अगदी खरं सांगायचे तर मला कै. गौरी लंकेश, कै. कलबुर्गी किंवा कै. गोविंद पानसरे यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हती, आणि नाही. माझे याबाबतचे अज्ञान असेल. सर्वच विषयाची सर्वांना माहिती असली पाहिजे असे पण नाही. कै. दाभोळकर मात्र माहीत होते कारण मी 'साधना' नियतकालिकाचा पूर्वी माझ्या शालेय व महाविदयालयीन काळात नियमीत वाचक होतो. त्या वेळी मी विविध विषयांवरील विविध वाचन केले अगदी ज्योतिष वगैरे वरील पण ! मात्र अलिकडे सर्वच अवांतर वाचन कमी झाले आहे, कारण व्यवसायावरील वाचायलाच वेळ पुरत नाही. वाचण्यासारखं काही दिसत नाही, असे माझे म्हणणं नाही.
कोणत्याही विचारसरणीच्या लोकांची हत्या असो, प्रत्यक्ष जीव घेणे असो किंवा त्याची कारकिर्द संपवणे मग कशाही भल्याबुऱ्या मार्गाने असो. दोन्ही पण हत्याच !
आता याबद्दल आपल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना काहीही असली तरी त्याच्याशी राज्यकर्त्यांना, समाजातील पुढारी म्हणून ओळखले जाणाऱ्यांना किंवा आपण पुढारी म्हणून ओळखले जावे असे वाटणाऱ्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते. या घडलेल्या घटनेचा आपल्याला लाभ कसा घेता येईल किंवा आपल्याला लाभ घेता येईल अशा घटना कशा घडतील यांकडे यांतील संधीसाधू लोकांचे लक्ष असते. या पासून मला वाटत नाही की कोणतेही क्षेत्र मुक्त असेल ! मग सामाजिक, आर्थिक वा राजकीय असो. सांस्कृतिक क्षेत्रातील घटना पण आपल्याला ऐकू येतातच !
आपली प्रगती होण्याऐवजी आसपास घडणाऱ्या घटनांमुळे सर्वांना सोपा मार्ग सापडला आहे की आवाज कायमचा बंद करणे व दहशत पसरवणे. जग दिवसेंदिवस लहान होत असल्याने जगांत विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना हे इथली उदाहरणे बनतात. या उदाहरणांचा कित्ता दोन्हीकडील मंडळी गिरवतात. आपण कित्ता गिरवला ते चांगले पण इतरांनी तसे वागू नये हे मानणे पण चुकीचेच ! आपल्या वागण्याने आपण इतरांना 'कसे वागावे' याचं उदाहरण घालून देत असतो.
न्यायशास्त्रात घटनेच्या क्रमातून, कृतीच्या पद्धतीतून, घटना किंवा कृतीमागचा हेतू काय असावा यांचा शोध घेतल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. ते एक शास्त्र आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पुढारी, राज्यकर्ते, 'समाजधुरीण' यांच्या 'कार्याची फळे' आता दिसू लागली आहे कारण तो रस्ता आता खूपच वापरतां झाल्याने गुळगुळीत व वाहता झालेला आहे. त्यामुळे अशा घटना आता वारंवार दिसतात व त्याचे मनातून कोणाला फारसे वाटत नाही व वाटून उपयोग नसतो. एखाद्यास फारतर हळहळ वाटते पण वाटूनही उपयोग काय हे पण समजते.
मग अशा घटना पाहिल्यावर बऱ्याच वेळा वाटते की यांचे निकालपत्र लिहून तयार असते फक्त घटना घडायचा अवकाश की त्यांवर स्वाक्षरी होवून जाहीर केले जाते. आपल्यासारखे वाचून त्यांवर चर्चा करतात.

९ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment