Friday, September 15, 2017

कै. ना. भि. वानखेडे सर - सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर


कै. ना. भि. वानखेडे सर - सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर  

आपले रहाते गांव लहान असले की त्याचे आपल्याला फायदे जसे असतात तसे तोटे पण अनुभवायला येतात. आम्ही शाळेत शिकत असतांना आम्हा विद्यार्थ्यांपैकी कोणी कुठे इकडेतिकडे फिरतांना दिसले की कोणीही 'काय रे, इकडे गांधी चौकात काय फिरतोय ? घरी सांगीतले आहे का ? अन् हा कोण तुझ्या बरोबर ?' मग सगळं सांगावेच लागे, न सांगून सांगणार कोणाला ? नाही सांगीतले तर परत संध्याकाळी घरी विचारणा होणार - 'शाळा सोडून गांधी चौकात कोणाबरोबर होता ?' गंमत याची वाटते की त्यावेळी आजच्या सारखी अद्ययावत संदेशवहनाची साधने नव्हती पण तरी देखील संदेशवहन मात्र अद्ययावत व तात्काळ होत असे. अर्थात हा जसा अनुभव एखादे वेळी येई तसा -'अण्णा, आज तुमच्या मुलाने वर्गात कोणाला न येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्याच्याकडे लक्ष ठेवा. हुशार आहे. मुलगा पुढे जाईल.' हे पण सांगणारे भेटत.
गांवातील सर्वांची मुले ही त्यावेळी सर्व गांवाची असायची, त्यांच्या भविष्याची व भल्याबुऱ्याची काळजी गांवाला असायची. ही गांवाचं नांव सर्वदूर काढणारी व्हावी, हा प्रयत्न असायचा त्यांचा. ही मुलं वेगवेगळ्या घरांत रहात फक्त ! त्या सर्वांवर छत्र गांवाचेच असायचे म्हणून सर्वांचे आईवडील व पालक ही मुलं गावाच्या भरवशावर ठेवून निर्धास्त असायचे. ज्याने त्याने ज्याचे त्याचे पहावे इतरांत नाक खुपसू नये हे तत्व मुलांच्या बाबतीत बहुदा अपवाद असावे. बिडी पिणारा पण कोणी बिडी ओढण्याचे चाळे करणारा मुलगा दिसला की त्याच्या भाषेत बिनपाण्याने करायचा. त्यांत फारसे कोणाला वावगे पण वाटत नसे. सर्वांची जात ही बहुदा कागदोपत्रीच लिहीलेली असायची, आचरणांत क्वचितच असायची ! तेच बरे होते.
एकाददुसरा मग क्रांतीकारी विचाराचा निघायचा, की तो या गावकऱ्यांच्या जन्मदत्त अधिकारांना चॅलेंज द्यायचा, 'तुम्हाले काय करनं आहे ? मी माह्य पाहून घीन ?' हे ऐकल्यावर तो गांवकरी कायद्यातील सर्व तरतुदी बाजूला ठेवून त्याच्या खाड्कन मुस्कटात ठेवायचा आणि त्याला सरळ त्याच्या घरी घेवून यायचा. अशा गावकऱ्याच्या तावडीत सापडणे फारच वाईट ! कारण असे काही होऊन कोणी घरी आलं तर त्या मुलाची षोडषोपचार, महाभिषेकासह महाआरती ओवाळून व महानैवेद्य दाखवून दुप्पट पूजा होई. अशातऱ्हेने असे क्रांतीकारक व त्यांची क्रांती दडपली जाई. तरी पण आपल्या गांवाबद्दल कोणी बाहेरगांवी वाईट बोलत नसे, त्याला प्रेमच वाटे. इतकेच नाही तर गावाबद्दल भलेबुरे तो कोणाकडून ऐकूनही घेत नसे.
गांवातील सर्वांचेच एकमेकांच्या वागण्यावर आपोआप लक्ष असते, आपली गांवात उलटसुलट वागण्याची हिंमत होत नाही, कारण गांवात समाजाचे तेवढे वजन व धाक असतो. सर्वांचेच व्यवहार त्या छोट्या क्षेत्रात फिरत असतात त्यामुळे कोणापासून काही फारसे लपून रहात नाही. एखादा कोणाशी उलटसुलट वागत असेल तर परस्पर सरळ करण्याचा अधिकार हा गांवातील जबाबदार व्यक्तींना अवश्य असतो व तो गांवाने बिनतक्रार मान्य केला असतो. मग त्या जबाबदार माणसाची जबाबदारी अजूनच वाढते कारण त्याला बेजबाबदार वागून चालत नाही. बऱ्याच वेळा म्हणून असेही म्हटले जाते जबाबदारीचे महत्व बेजबाबदार माणसाला शिकवायचे असेल तर त्याला जबाबदारी द्यावी, तो आपोआप शिकतो.
आमची मराठी मुलांची शाळा, नं. २ ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा काय आणि सरदार जी. जी. हायस्कूल ही माध्यमिक शाळा काय, यांनी तर आम्हाला आयुष्यभर पुरून उरेल एवढी शिदोरी दिलेली आहे. आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांची नांवे जेव्हा निघतात तेव्हा काहींनी आपल्याला त्यावेळी शिकवले नाही याची मनाला अजूनही चुटपूट लागलेली आहे. आता ते शक्य पण नाही. त्यांत कै. बहादरपूरकर सर, कै. एस्. एस्. देव सर, कै. रावेरकर मॅडम व कै. व्यवहारे सर हे सर्व नंतर गर्ल्स हायस्कूलला गेले. त्यामुळे यांचे शिकवणे अनुभवायला मिळणारच नव्हते. मात्र कै. एस्. आर. कुलकर्णी (मोठे) हे सरदार जी. जी. हायस्कूल येथे असूनही मला त्यांनी शिकवण्याचे भाग्य लाभले नाही. कै. एस्. आर. कुलकर्णी (मोठे) हे लिहीण्याचे कारण आमच्या शाळेत दोन एस्. आर. कुलकर्णी होते. एक छोटे व दुसरे मोठे. दुसऱ्यांनी मला शिकवले आहे. त्यांचे शिकवणे पण उत्तमच ! त्यांनी मराठी, इंग्रजी व भूगोल शिकवलेत !
श्री. एस्. एस्. चौधरी यांचे मराठी व इतिहास, श्री. तिवारी सरांचा इतिहास व हिंदी, श्री. जमादार सरांचा भूगोल, श्री. नंदकुमार बालाजीवाले व श्री. एन्. एस्. पाटील सरांचे मराठी, सौ. के. व्ही. पाटील मॅडमचे गणित, श्री. बोरोले, वाणी व वऱ्हाडे सरांचे रसायनशास्त्र, श्री. एस्. एस्. पाटील सरांचे जीवशास्त्र, श्री. डेरेकर सरांचे संस्कृत, कलेचा इतिहास शिकवावा तो श्री. के. एम्. पाटील यांनी; काय सुंदर चित्र काढायचे ! किती नांवे सांगावीत ! ही सर्वच गुरूवर्य मंडळी कळकळीने शिकवायचे म्हणून ती अजून येथे ह्रदयांत आहे. ही आयुष्यभराची शिदोरी अधूनमधून उघडावी.
काहींचे काही विषय तर हातखंडा समजले जात, जसे कै. डी. टी. कुलकर्णी सरांचे केमिस्ट्री, कै. व्ही. बी. दीक्षित सरांचे गणित-भूमिती व भौतिकशास्त्र, कै. पी. के. भोकरीकर सरांचे 'हायर मॅथेमॅटिक्स' जे जुन्या मॅट्रीकला होते मात्र आम्हाला नव्हते, कै. मो. का. लोहार सरांचे हिंदी, कै. एस्. आर. कुलकर्णी (मोठे), कै. आर. बी. जोशी व कै. न. अ. देशपांडे सरांचे इंग्रजी, कै. पी. व्ही. पुराणिक यांचे इंग्रजी व संस्कृत, कै. पितळे मॅडमचे मराठी ! ही माझी गुरूवर्य मंडळी आता आमच्यांत नाही मात्र त्यांनी मला दिलेलं आयुष्यभर पुरेल इतकं आहे.
त्यांत अजून एक नांव आहे ते माझ्या मित्राचे, डॉ. रविंद्र वानखेडे याचे वडील - कै. ना. भि. वानखेडे ! यांच्या म्हणजे रविच्या घरी म्हणजे भाजीबाजाराजवळ माझे नेहमीच जाणे व्हायचे. पहिली पासून आम्ही बरोबर ते दहावी पर्यंत ! वर्गात बरोबरच असायचो ! त्याच्या ताईचा गळा अत्यंत सुरेल ती आमच्याकडे, माझ्या आईकडे शास्त्रीय संगीत शिकायला यायची. कै. वानखेडे सरांचे घर काही वेगळे आहे ही भावनाच नसायची, मात्र सरांसमोर जायची हिंमत नसायची.
त्यांचा पोषाख म्हणजे पांढरे स्वच्छ धोतर, त्यांवर पांढरा मनिला व त्यांवर शेवाळी रंगांचा काहीशी चमक असलेला कोट ! काही वेळा राखाडी पण असायचा ! त्यांत कोटाच्या खिशाला खोचलेले बहुदा दोन पेन - एक निळा व दुसरा लाल शाईचा ! डोक्यावर काळी टोपी ! त्यांतून कडेने बाहेर आलेले पांढरे केस ! पायांत करकर वाजणाऱ्या वहाणा, नंतरच्या काळात काही वेळा बूट पण घालत. डोळ्यावर काळ्या जाड फ्रेमचा चष्मा ! वर्ण काळसर, गोलसर चेहरा ! ज्ञानाची चमक व बुद्धीचे तेज चेहऱ्यावर दिसायचे.
यांचे अक्षर अतिशय सुंदर ! वळणदार अक्षर म्हणजे काय हे दाखवायचे असेल तर कै. वानखेडे व श्री. तिवारी सरांचे अक्षर दाखवावे. चांगले अक्षर असलेले बरेच आहेत पण वळणदार अक्षर असलेले कमी असतीत. वळणदार अक्षर असलेले माझे अजून दोन मित्र आहेत. आश्चर्य म्हणजे अक्षर वळणदार असूनही दोन्ही डॉक्टर आहेत - एक म्हणजे डॉ. विवेक तडवळकर आणि हा डॉ. रविंद्र वानखेडे ! त्यांनी लिहीलेली 'प्रिस्क्रीपशन्स' त्यांच्या या अशा अक्षरांमुळे लवकर समजत नाही अशी 'औषध विक्रेता संघाची' तक्रार आल्याचे कानावर आले होते. खरेखोटे तो धन्वंतरीच जाणे !
कै. वानखेडे सरांनी मला बहुतेक आठवीत काही काळ संस्कृत शिकवले. त्यावेळेस त्यांत भगवद्गीतेतील एका अध्यायावर धडा होता. संस्कृत आम्हाला आठवीला संयुक्त होते, म्हणजे पन्नास मार्कांचे व पन्नास मार्कांचे हिंदी ! संस्कृत या विषयाची उत्तरे कशी लिहावीत, हे कोणाला समजणार ? सहामाहीत संस्कृतचा पेपर झाला. मी उत्तरे भरपूर लिहील्याने खुशीत ! पेपर तपासून आल्यावर पाहिले तर लाल शाईत शेरा ! 'आवश्यक तेवढेच लिहावे', मार्क पण काही विशेष समाधानकारक नव्हते. मी सरांना त्याबद्दल विचारले, त्यांवर - आपला धडा व त्यांतील मजकूर जेवढा असतो त्याच्या फार बाहेर जावून लिहीणे तुम्हाला आता अपेक्षित नाही. उत्तर तंतोतंत असावे. भोंगळ नसावे. त्यांचे हे सांगणे आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही प्रश्नावर लागू होईल.
नंतर मी दहावीत असतांना काही दिवस त्यांनी मराठी शिकवले होते. त्यांत 'ग्रंथ हेच गुरू' हा न. चिं. केळकर यांचा, सेतुमाधवराव पगडी यांचा एक धडा होता आणि शिवकालीन बखरीमधील धडा होता. त्यांत त्यांनी मला आयुष्यभर लक्षात राहील असा शिकवलेला धडा म्हणजे - 'शिवाजीची आज्ञापत्रे !' शिवाजी महाराजांचे प्रजेवर असलेले प्रेम, त्यांनी आपल्या रयतेला म्हणजे जनतेला त्रास देवू नये म्हणून सैन्याला दिलेल्या तपशीलवार आज्ञा ! त्यांनी त्यासाठी योजलेला एकेक शब्द त्यामागील महाराजांची भावना, जर ही आज्ञा पाळली नाही तर दिलेली ताकीद ! सैनिकांच्या गलथानपणाने काय व कसे नुकसान होऊ शकते याची दिलेली उदाहरणे ! उंदराने जळती वात रात्री नेली तर सर्व भस्मसात होऊन जाईल, याची दिलेली काळजीयुक्त सूचना ! काय आणि किती सांगावे ? राज्यकर्त्यांची कर्तव्ये, जनतेच्या अपेक्षा, राज्याबद्दल व राजाबद्दल भावना, त्या वेळची परिस्थिती, मोघलाईतील रयतेवरील अन्याय, त्यापेक्षा शिवरायांचे हे राज्य 'स्वराज्य' वाटले पाहिजे असे राजांना का वाटले, त्या मागे त्या समाजाच्या भावनेचा विचार करता 'हे राज्य व्हावे हे तो श्रीची इच्छा' म्हणजे काय ? कै. वानखेडे सर इतिहास शिकवत होते, मराठी शिकवत होते, भारतीय राज्य घटनेची तत्वे सांगत होते का आपल्या समोर रामराज्य कसे असेल याचे चित्र रंगवत होते कोण जाणे ? समाजाच्या सुखदु:खाशी तुमची नाळ जुळलेली असेल तर त्या आपुलकीचा स्नेह, जीवनरस आपल्या बोलण्यातून दिसत असतो. त्यावेळेस रंगून शिकवत असलेले वानखेडे सर आज पण डोळ्यापुढे उभे आहेत.
दहावीला मी रावेर केंद्रात पहिला आल्यावर त्यांनी व एस्. आर. कुलकर्णी (छोटे) यांनी माझी अगदी प्रत्यक्ष पाठ थोपटून केलेल्या अभिनंदनाचा स्पर्श मला आज देखील जाणवतो. त्या स्पर्शाचा मला आज पण अडीअडचणीच्या वेळेला खूप आधार व धीर वाटतो. दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी अकरावी कॉमर्सला प्रवेश घेण्यासाठी गेलो असता त्यांनी मला लगेच प्रवेश दिला नाही. 'तुझ्या वडिलांना मी भेटतो.' म्हणून सांगून मला रवाना केले. नंतर वडीलांना भेटून 'याला सायन्सला घाला. खूप पुढे जाईल. तुमचे व शाळेचे नांव काढेल.' असे सांगत समजावले. यांत माझा प्रवेश रखडला होता. विद्यार्थ्याचे भविष्य हे आपले भविष्य, आपल्या मुलाचे भविष्य मानणारे शिक्षक या शाळेने दिले.
ज्यावेळी आपण त्रयस्थासारखा विचार करायला लागतो त्याचवेळी यांचे हे वागणं आठवते, असे परक्यासारखे वागणे बरं नाही, याची जाणीव होते. आपली गाडी रूळावरून घसरू नये म्हणून आजही आपल्याला त्यांच्या शिकवणीच्या रूपात सावरणारी ही गुरू मंडळी आपल्या आयुष्यातील कितीतरी संभाव्य अपघात टाळत असतात. प्रत्यक्ष परमेश्वराला वंदन केल्यावर गुरूला वंदन करावे हे सांगणारी आपली संस्कृती, आपल्याला गुरूचे महत्व सांगतांना शेवटी हेच सांगते - परमेश्वराची भेट घडवून आणणारा पण गुरूच असतो.
मध्यंतरी डॉ. रविंद्र औरंगाबादला सपत्नीक आला होता. त्याच्या मुलाची पण भेट झाली. आमच्या अशाच गप्पा पाहून त्याला गंमत वाटत होती. त्याचे काम आटोपल्यावर तो रावेरला निघून गेला. मला त्यावेळी त्याला व सौ. वहिनींना पुन्हा भेटता आले नाही. पण त्यामुळे तो या एवढ्या सगळ्या आठवणी ढवळून गेला.
(माझे जवळ असलेला सरांचा एकुलता एक फोटो ! मी उजवीकडे कोपऱ्यात !)

१० सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment