Tuesday, September 5, 2017

गणपती उत्सव

गणपती उत्सव

सुखकर्ता दुखहर्ता गणाधिराज गणेश आता आपल्यात वाजतगाजत यायला, फार तर चारपाच दिवसांचा अवधी आहे. विनायकाच्या आगमनाचे वेध तर आपल्याला फार पूर्वीच लागलेले असतात, निदान राखीपौर्णिमेपासून ! तसे पाहिले तर गणनायकाला आम्ही विसर्जनाचेच दिवशी 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणून आमंत्रण देवून ठेवतो. तो पण बिचारा या प्रेमळ भक्तांचे तीन वर्षे ऐकतो आणि चौथ्या वर्षी आपल्या मूळ पदावर येतो, आधिकमासाचा आधार घेत !
मध्यंतरी आम्ही सर्वजण चेन्नईला गेलो होतो. जवळच कांचिपुरम्, महाबलीपुरम् असल्याने येथे पण गेलो. कांचीपुरम येथे सहकुटुंब गेले तर खिशाला फटका नक्की बसतो, आपले वजन पण कमी होते; याची पुरूषमंडळींनी नोंद घ्यावी. केवळ सरकारचेच बजेट कोलमडते असे नाही तर कोणाचेही बजेट कोलमडवण्यास प्रत्येकाचे गृहस्थाश्रमी पुरुषाचे गृहखाते सज्ज व सक्षम असते. कांचिपुरमच्या साड्या निष्कारणच प्रसिद्ध झाल्यात. आम्ही तर सहकुटुंब व सहपरिवार होतो; त्यामुळे मी एकटा 'मन:शांती प्रकृतीस चांगली असते' या वाक्याचा जप करत कितीही खिसा हलका झाला तरी तिकडे लक्ष देत नव्हतो. सोबत मुलं असली, तर या बाबतीत ती 'मातृसत्ताक पद्धती' मानणारी असतात. तशी एरवी आपल्यासाठी आयुष्यभर 'पत्नीसत्ताक पद्धती' असते, पण ती सर्वदूरच असल्याने, त्याचे कोणाला विशेष वाटत नसावे.
महाबलीपुरम् येथे दगडापासून खूप सुंदर, अगदी छोट्याछोट्या मूर्त्या बनवतात. आपल्या डोळ्यांना आकर्षक वाटतात. मला पुस्तक खरेदी करण्यातलेच काय ते समजते, अशी घरच्यांची भावना आहे. 'एक दुकान चालेल इतकी पुस्तके आहेत, पुस्तक दिसायचाच अवकाश की घेतलेच ' आपले कौतुक करताहेत का टोमणे मारताहेत हे न समजू देता, दोन्ही कार्ये एकाचवेळी कौशल्याने करण्याचे सामर्थ्य विधात्याने स्त्री जातीला देवून पुरुषमंडळींवर घोर अन्याय केला आहे.
महाबलीपुरमला पल्लव राजवंशाचे राज्य होते. सातव्या आठव्या शतकांत बांधलेली ही सुंदर मंदीरे, शिल्पे बघीतली, तर आपल्याला आपल्या सांस्कृतिक समृद्धतेची कल्पना येते. भारतातील प्रत्येक भागाचे, राज्याचे आपले स्वतंत्र वैशिष्टय आहे. तामिळनाडू तसाच ! भारतातील दक्षिणभागातील तामिळनाडू राज्यातील, बंगालच्या उपसागरादरम्यान हा सुंदर समुद्रकिनारा ! येथील विविध मंदीरे, शिल्पे पहाण्यासारखीच ! स्वाभाविकच दगडातील काम करणारे शिल्पकार, लाकडातील काम करणारे काष्ठकार, धातूंचे ओतीवकाम करणारे कलाकार तेथे खूप आहेत.
राज्यांत शांतता असली की उद्योगधंदे व्यवस्थित चालतात व जनतेत समृद्धी येते, जनतेत समद्धी आली की कलेला आश्रय मिळतो व कलाकार सुखी होतात. जनता व कलाकार सुखी झाले की तेथील संस्कृतीचा उत्कर्ष होतो, तिचा उत्कर्ष झाला की संस्कृतीबद्दल चार परक्या ठिकाणी चर्चा होते. आपल्याकडे लक्ष वेधले जाते. आपल्याजवळ असलेली संपन्नता प्रत्येक परकीयांस मिळावी असे वाटू लागते. परचक्र येते. राजा, राज्यकर्ते व प्रजा खंबीर, सूज्ञ, देशहिताचा विचार करणारी व सक्षम असेल तर हे परचक्र दूर सारता येते, अन्यथा ---- आपण अनुभव घेतलाय !
महाबलीपुरम् म्हणजे ममल्लापुरम येथे या सांस्कृतिक समृद्धीच्या खुणा आपल्याला आज पण जाणवतात. तेथील तीनचार मंदीरे आईने बघीतली, बाकी मुले व आम्हीच होतो. आईला जास्त चालता येत नसल्याने गाडीत बसून रहावे लागे.
महाबलीपुरमला बघत होतो तेथे एक माणूस हातात एकाबाजूने पारदर्शक असलेले लांब पट्टीसारखे छोटे खोके दाखवत होता. मूर्तीविक्रेता होता तो ! तेथे तयार होणाऱ्या छोट्याछोट्या मूर्त्या छोटा एकाबाजूने पारदर्शक खोक्यातून विकत होता. गणेशमूर्ती, विनाऽयका ! दशावतार ! लक्ष्मी ! स्टोन स्टॅच्यू ! वेरी ब्युटीफूल, वेरी चीप !' मी बघीतले, तर छोट्या पारदर्शक खोक्यात गणपतीच्या, देवीच्या, दशावतार वगैरे देवतांच्या मूर्ती होत्या. मी बघतोय म्हटल्यावर त्याची रसवंती वहायला लागली. मधूनच हिंदी, इंग्रजी, तामिळ वगैरे शब्द ! हिंदी व इंग्रजी समजत होते. इतर शब्द नाही समजले तरी भाव समजला होता की 'या छोट्या मूर्त्या खूप छान आहे. खास दगडाच्या आहेत. इथलं हे वैशिष्टय आहे. या माझ्याजवळ असलेल्या सर्वप्रकारच्या मी अगदी स्वस्तात देतो आहे. इतके स्वस्त कुठे मिळणार नाही.' मी दोन खोके घेतले. थोडा पुढे आलो तर दुसऱ्याने आम्हाला म्हणजे मला गाठले. त्याच्या गयावया पाहून मी त्याच्याकडूनही एक खोका घेतला, निम्म्या किंमतीत ! माझ्या व्यवहारज्ञानाची पावती वेळीअवेळी परक्या ठिकाणी पण मिळाली. 'नाही ते भरमसाठ घेतात. काय करणार आहेत, इतक्या मूर्त्या ?' हा टोमणा कोणी मारला असेल हे अनुभवी व्यक्तींना सांगायलाच नको. 'अग, मूर्ती सुंदरच आहेत. तुला वस्तू वाटण्याची हौस आहे ना ? औरंगाबादला गेल्यावर दे एकेकाला.' हे सौभाग्यवतींना ऐकवल्यानंतर तिने पण संभाषण पुढे वाढले नाही. त्यांचे काय करायचे हे तिनं ठरवले असणार काय ठरवलेच होते. येथे आल्यावर ते जाणवले.
काल गणपती उत्सवाची लक्षणे जाणवायला लागली, अन् एवढे सर्व आठवलं !

२० ऑगस्ट २०१७

No comments:

Post a Comment