Friday, November 10, 2017

कार्तिक शुद्ध ११ ! प्रबोधिनी एकादशी !


आज कार्तिक शुद्ध ११ ! प्रबोधिनी एकादशी !
आषाढी एकादशीला, म्हणजे शयनी एकादशीला सुरु झालेल्या चातुर्मासाची आज कार्तिकी एकादशीला, प्रबोधिनी एकादशीला पूर्तता ! शयनी एकादशीला भगवान विष्णू शयन करतात आणि या प्रबोधिनी एकादशीला उठतात., हा आपला चालत आलेला समज ! आषाढी आणि कार्तिकीचे महत्व मी काय सांगणार ? पांडुरंगाच्या भक्तीने कोणताही जातीभेद डोक्यांत न ठेवता या सर्व वारकऱ्यांना, पंढरीच्या भक्तांना एकत्र जोडले ते आपल्या भक्तीने !
ही संत मंडळी कायकाय म्हणतात ते आजच्या निमित्ताने आपल्या हृदयांत साठवावे -
अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥
(संत ज्ञानेश्वर )
दामाजीचा भाव पाहून श्रीहरी । अनामिक निर्धारी स्वयें जाला
घेऊनिया द्रव्य निघाला श्रीहरी । जोहार जोहार करी पाता शहाते
द्रव्य देउनिया रसीद घेतली । भक्तांची माउली विठाबाई
एका जनार्दनीं भक्तांचिया । धावे पाठोपाठी भक्ताचिया
(संत एकनाथ )
केशवाचे ध्यान धरूनि अंतरी । मृत्तिकेमाझारी नाचतसे
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ । नेत्री वाहे जळ सद्गदीत
कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त
(संत गोराकुंभार)
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा
(संत सांवता माळी)
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने
त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस
जीव शीव करूनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी
विवेक हातवडा घेऊन । काम क्रोध केला चुर्ण
मनबुद्धिची कातरी । रामनाम सोने चोरी
ज्ञान ताजवा घेउन हाती। दोन्ही अक्षरे जोखिती
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस
(संत नरहरी सोनार)
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत
(संत सेना न्हावी)
देहीं देखिली पंढरी । विठू अविनाश विटेवरी
रुख्मिणी अंगना । आत्मा पुंडलिक जाणा
आकार तितका नासे । निराकार विठ्ठल दिसे
ऐसे गुज ठायींचें ठायी । चोख म्हणे लागा पायीं
(संत चोखा मेळा )
'आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध ।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ।।
(संत चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई )
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश
(संत बहिणाबाई )
नको देवराया अंत पाहू आता । प्राण हा सर्वथा फुटो पाहे
हरिणीचे पदास व्याघ्रे धरियेले । मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठाव न दिसें त्रिभुवनी । दवे वो जननी विठाबाई
मोकलूनी आस जाहले मी उदास । घेई कान्होपात्रेस हृदयांत
(संत कान्होपात्रा )
आम्ही बळवंताच्या दासी । कोण गर्भवास सोसी
करू यमासी ताडन । अमुचा धनी नारायण
जनी म्हणे हरी । पाप उरो नेदीं उरी
(संत जनाबाई )
भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार ।
उधार घ्यारे उधार घ्यारे। अवघे या रे जातीचे ।
येथे पंक्ति भेद नाही। मोठे काही लहान ।
तुका म्हणे माल घ्यावा । मुद्दल भावा जतन ।।
(संत तुकाराम महाराज )
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी ||
जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||
जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||
नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||
(संत नामदेव )

No comments:

Post a Comment