Friday, November 10, 2017

तुळशीचे लग्न !

तुळशीचे लग्न !

आजची प्रबोधिनी एकादशी ! कार्तिक शुद्ध एकादशी, प्रबोधिनी एकादशी ! मग स्वाभाविकच उद्या कार्तिक द्वादशी, उद्यापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह मुहूर्त मानतात. भगवान श्रीकृष्ण आणि तुळशीचा विवाह करण्याची आपली ही सांस्कृतिक, धार्मिक परंपरा !
चातुर्मास संपल्याने विवाहेच्छुक यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असेल. काहींचे सुस्कारे व उसासे इथपर्यंत ऐकू येत होते. तुळशीचे लग्न झाले की ते मोकळे !
मी कॉलेजला होतो. शेजारी काही कुटुंबे होती. सर्वच खेळीमेळीने रहात. तुळशीचे लग्न आले. शेजारी कापसे म्हणून कुटुंब होते, उत्साही व हौशी ! बहुतेक विदर्भातले होते. त्यांच्या दारासमोरच मोठमोठ्या तुळशी होत्या, पुरेशी मोकळी जागा होती. त्यांच्या समोरच लग्न मोठ्या जोरात लागले. त्यांना मुलीकडचे म्हणून नांव घेण्याचा आग्रह करू लागले. तुळशीच्या वतीने नांव घ्यायचे, हा आग्रह ! मोठी पंचाईत ! गर्दीला तारतम्य नसते, पण गंमत होती. वातावरण निकोप व मोकळे होते.
प्रसाद घेतला, फराळ झाला. नांव काय घ्यावे हा प्रश्न राहिलाच होता. माझी काकू, आम्ही सर्व जण वहिनी म्हणायचो तिला ! त्या सर्वांत तीच वडिलधारी होती. सर्वच आजी म्हणायचे तिला तिथे ! ती शेवटी म्हणाली, ‘त्यांत काय मोठे घे, तुळशीच्या लग्नाचा उखाणा -
बोर भाजी आवळा । अन् कृष्णदेव सावळा ।
सर्व थक्क झाले क्षणभर ! मग एकदम हास्यकल्लोळ !

No comments:

Post a Comment